राफेल नदाल जगातील सर्वोत्तम टेनिसपटू का आहे...

खेळ किती एकाग्र चित्ताने खेळला जाऊ शकतो ते जाणून घ्यायचे असल्यास नदालचा खेळ बघावा.

फोटो सौजन्य: reuters.com

11 ऑक्टोबर 2020 रोजी राफेल नदालने फ्रेंच खुल्या स्पर्धेचे (फ्रेंच ओपनचे) विजेतेपद मिळवून इतिहास घडवला. फ्रेंच ग्रँड स्लॅम स्पर्धा 13 वेळा जिंकण्याचा नवीन विश्वविक्रम त्याने प्रस्थापित केलाच... शिवाय रॉजर फेडररच्या 20 ग्रँड स्लॅम विजेतेपदांची बरोबरीही केली. शाब्दिक कोट्या करणारे इंग्लिश समालोचक म्हणाले 'ट्वेंटी-ट्वेंटीमध्ये (2020 या वर्षी) फेडरर - नदाल ट्वेंटी-ट्वेंटी (20-20) ग्रँड स्लॅम विजेतेपदे मिळवून जगातील सर्वाधिक यशस्वी टेनिसपटू ठरले.'

फेडरर - नदाल किती महान टेनिसपटू आहेत हे समजून घेण्यासाठी ग्रँड स्लॅम स्पर्धा म्हणजे नक्की काय असते याचे आकलन सर्वप्रथम व्हायला हवे. 

असोसिएशन ऑफ टेनिस प्रोफेशनल्स (Association of Tennis Professionals - ATP) या संस्थेतर्फे वर्षभर जगात सर्वत्र टेनिस स्पर्धा आयोजित केल्या जातात... ज्या स्पर्धांमध्ये सहभागी होण्यासाठी जगातील मोजकेच सर्वोत्तम टेनिसपटू पात्र ठरतात. त्या स्पर्धांमध्ये टेनिसपटू जितके सामने जिंकतात त्यावरून त्यांना काही गुण (पॉइंट्स) प्राप्त होतात आणि त्यावरून त्यांचे जागतिक क्रमवारीतील मानांकन (रँकिंग) ठरते. 

वर्षभरात फक्त चार ग्रँड स्लॅम स्पर्धा होतात - ‘ऑस्ट्रेलिअन ओपन’ (जानेवारी), ‘फ्रेंच ओपन’ (मे-जून), ‘विम्बल्डन’ (जून- जुलै), ‘यूएस (अमेरिकन) ओपन’ (ऑगस्ट-सप्टेंबर). इतर कुठल्याही स्पर्धांच्या तुलनेत ग्रँड स्लॅम स्पर्धांचा थाट निराळा, चुरस तीव्र, पैसाही अमाप! जगातील सर्वोच्च पातळीवरील स्पर्धात्मक टेनिस खेळणे ही स्पर्धेत सहभागी होणाऱ्या 128 खेळाडूंसाठी अतीव सन्मानाची गोष्ट असते. शंभरच्या आत ज्यांचे रँकिंग नाही अशा खेळाडूंना ग्रँड स्लॅम स्पर्धेत पात्र ठरण्यासाठीही पात्रता फेरीचे सामने खेळावे लागतात.

स्पर्धेत सहभागी होणारे 128 टेनिसपटू हे आपापल्या देशातील सर्वोत्तम खेळाडू असतात. या पातळीवर पोहोचण्याअगोदर अनेक वर्षे त्यांनी आपल्या खेळावर कठोर परिश्रम घेतलेले असतात. एटीपीच्या दुय्यम दर्जाच्या जागतिक स्पर्धा - ज्यांना चॅलेंजर्स म्हटले जाते... त्या स्पर्धा खेळलेल्या आणि जिंकलेल्या असतात. खेळातील कुठलाही चढउतार, ताणतणाव सहन करण्याची शारीरिक आणि मानसिक क्षमता त्यांच्यात असते... त्यामुळे 128 पैकी कुठल्याही टेनिसपटूमध्ये मानांकित खेळाडूंना पराभूत करण्याची क्षमता असते. दरवर्षी कुठल्या ना कुठल्या मानांकित टेनिसपटूला शंभरच्या आत रँकिंग नसलेला एखादा खेळाडू पहिल्यादुसऱ्या फेरीत गारद करून खळबळ उडवून देतो. अशा परिस्थितीत सातत्याने टिकून राहण्याचे, जिंकण्याचे प्रचंड मोठे आव्हान आणि दडपण जुन्याजाणत्या खेळाडूंवर असते. 

टेनिससारख्या अत्यंत वेगवान, सामर्थ्यवान खेळात शारीरिक, मानसिक सामर्थ्य टिकवून ठेवत, अपरिहार्य दुखापतींमधून सावरत 10, 15, 20 वर्षे सर्वोच्च स्पर्धात्मक खेळ खेळत 20-20 ग्रँड स्लॅम विजेतेपदे मिळवणे हा पोरखेळ निश्चितच नव्हे.

रॉजर फेडरर, राफेल नदाल, यांच्यापाठोपाठ 17 ग्रँड स्लॅम जिंकणारा नोवॅक जोकोविच हे तिघे टेनिस इतिहासातील आजवरचे सर्वोत्तम खेळाडू आहेत ते यामुळेच. विशेष गोष्ट अशी की, तिघेही समकालीन आहेत आणि तिशी ओलांडल्यानंतरही विशीच्या खेळाडूंना लाजवेल असा खेळ करत आहेत.

या तिघांमध्ये सर्वोत्तम कोण असा प्रश्न नेहमीच उद्भवत असतो. भूतकाळातली उत्तरे वेगळी असली तरी या क्षणी त्याचे उत्तर आहे - राफेल नदाल. फेडरर-नदाल या दोघांकडेही 20-20 ग्रँड स्लॅम विजेतेपदे असताना मी नदालला झुकते माप का देतेय असा विचार करून फेडररच्या चाहत्यांनी कृपया माझ्यावर नाराज होऊ नये... कारण मीसुद्धा तुमच्याप्रमाणेच सदैव फेडररचीच चाहती होते आणि आहे. 

फेडरर-नदाल यांच्यामध्ये आजवर जितके चुरशीचे सामने झालेत त्यात मी सदैव फेडररलाच पाठिंबा दिलाय, तो जिंकला तेव्हा आनंद व्यक्त केलाय आणि तो हरला तेव्हा मला नदालचा रागही आलाय... पण नदाल सातत्याने इतक्या उच्च दर्जाचे टेनिस खेळतोय की टेनिसचा कुठलाही जाणकार त्याच्या महानतेबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित करू शकत नाही. 

‘Respect should be earned, not demanded...’ असे म्हटले जाते. ‘आदर मागून मिळत नाही... तो कमवावा लागतो...’ राफेल नदाल आपल्या सातत्यपूर्ण सर्वोत्कृष्ट खेळाने माझ्यासकट जगातील अनेक टेनिसप्रेमींच्या आदरास पात्र ठरलाय.

20 विजेतेपदे फेडररचीही असली तरी नदालने मिळवलेल्या 20 विजेतेपदांपैकी 13 विजेतेपदे त्याने फ्रेंच ओपन स्पर्धा जिंकून मिळवली आहेत जो एक प्रचंड मोठा विश्वविक्रम आहे. पुरुष असो अथवा महिला... आजवर कुठल्याही टेनिसपटूला एकाच ग्रँड स्लॅमची 13 विजेतेपदे मिळालेली नाहीत. 

‘फ्रेंच ओपन’ ही सर्वाधिक कठीण ग्रँड स्लॅम समजली जाते. याचे कारण म्हणजे ‘फ्रेंच ओपन’ ही क्ले कोर्टवर म्हणजे मातीच्या मैदानावर खेळली जाते. इंग्लंडमधील ‘विम्बल्डन’ ही स्पर्धा ग्रास कोर्टवर म्हणजे व्यवस्थितपणे कापलेल्या हिरवळीवर खेळली जाते. ‘ऑस्ट्रेलिअन ओपन’ आणि ‘अमेरिकन ओपन’ या स्पर्धा हार्ड कोर्टवर म्हणजे काँक्रीटवर सिंथेटिक आच्छादन असलेल्या मैदानावर खेळल्या जातात. 

यात हिरवळीवर टेनिस बॉल सर्वाधिक वेगात उसळतो, हार्ड कोर्टवर मध्यम वेगात आणि मातीच्या मैदानात सगळ्यात कमी वेगात उसळतो. बॉलचा वेग तुलनेने कमी असल्याने प्रतिस्पर्धी पळत जाऊन बॉलपर्यंत पोहोचण्याची शक्यताही अधिक असते... त्यामुळे दोन्ही बाजूचे टेनिसपटू एकमेकांच्या दिशेने बॉल फटकावत राहतात आणि प्रेक्षक श्वास रोखून ते (ज्यांना रॅलीज असे म्हटले जाते ते) बघत राहतात. इतर कुठल्याही मैदानाच्या तुलनेत मातीच्या मैदानावरच्या रॅलीज अधिक दीर्घ होतात... त्यामुळे याला ‘कलात्मक टेनिस’ म्हटले जाते.

इंग्लंडमधील विम्बल्डनच्या हिरवळीवर बॉल प्रचंड वेगात येतो. तिथे ‘सर्व्ह अँड व्हॉली’च्या खेळास अधिक प्राधान्य मिळते. प्रचंड वेगाने केलेली सर्व्हिस प्रतिस्पर्ध्याने कशीबशी नेटपर्यंत परतवली की सर्व्हिस करणारा नेटजवळ जाऊन असा जबरदस्त फटका (व्हॉली/विनर) मारतो की, त्याला परतवणे प्रतिस्पर्ध्यासाठी जवळपास अशक्य असते. 

मातीच्या कोर्टवर एकेका पॉइंटसाठी माराव्या लागणाऱ्या 15-20 फटक्यांच्या तुलनेत 'सर्व्ह अँड व्हॉली'चा पॉइंट तीन किंवा पाच फटक्यांत संपतो. या प्रकारच्या ताकदवान, वेगवान खेळातही वेगळा आनंद असल्याने त्याचेही अनेक चाहते आहेत... पण ज्यांना ‘कलात्मक टेनिस’ आवडते त्यांना ‘फ्रेंच ओपन’सारख्या मातीच्या मैदानावरील स्पर्धा अधिक आवडतात.

दीर्घ रॅलीज खेळण्यासाठी प्रचंड स्टॅमिना तर हवाच... शिवाय बॉलला विशिष्ट पद्धतीने स्पीन करून (फिरवून) फटके मारण्याचे, क्वचित कमी वेगात ड्रॉप शॉट मारण्याचे कौशल्यही आत्मसात करावे लागते. मातीत वेगाने पळताना चटकन दिशा बदलणे सोपे नसते. अनेकदा पाय निसटतो. बऱ्याचदा पाय घसरवतच (स्लाईड करत) फटका मारावा लागतो. हे सारे दिव्य पेलणे अत्यंत कौशल्याचे काम आहे.

आर्थर ॲश, बोरीस बेकर, पिट सॅम्प्रस, स्टिफन एडबर्ग, जॉन मॅकेन्रो, मार्टिना हिंगीस, व्हिनस विल्यम्स यांसारख्या अनेक महान खेळाडूंनी इतर ग्रँड स्लॅम स्पर्धांमध्ये अनेक विजेतेपदे मिळवली... परंतु ‘फ्रेंच ओपन’ त्यांच्या कधीही आवाक्यात आले नाही. 13 वेळा ‘फ्रेंच ओपन’ जिंकणारा राफेल नदाल हा जगातील सर्वोत्तम टेनिसपटू आहे असे त्यामुळेच म्हणावेसे वाटते.

2020च्या जानेवारी महिन्यात वर्षाची सर्वात पहिली ग्रँड स्लॅम ‘ऑस्ट्रेलिअन ओपन’ मेलबर्नमध्ये संपन्न झाली तेव्हा चीनव्यतिरिक्त इतरत्र कुठेही कोरोनाचा मागमूस नव्हता. मे-जूनमध्ये होणारी ‘फ्रेंच ओपन’ नदाल जिंकेल आणि रॉजर फेडररच्या विक्रमाशी बरोबरी साधेल याबद्दल त्याचे चाहते निःशंक होते... परंतु मार्चच्या सुरुवातीला कोरोनाचा जोर वाढू लागल्यानंतर ‘टोकियो ऑलिम्पिक’ 2021पर्यंत आणि ‘फ्रेंच ओपन’ अनिश्चित कालावधीसाठी लांबणीवर टाकण्यात आली. परंपरावादी ब्रिटिशांनी मात्र विम्बल्डनबद्दल बरेच दिवस मौन बाळगले आणि अखेरतः विम्बल्डन लांबणीवर न टाकता सरळ रद्द करण्याची घोषणा केली. व्यावसायिकदृष्ट्या चोख असणाऱ्या विम्बल्डन आयोजकांनी स्पर्धेचा विमा उतरवला असल्याने स्पर्धा रद्द झाल्यास त्यांचे आर्थिक नुकसान होणार नव्हते. 

मे महिन्यात इटली-स्पेनसह संपूर्ण युरोपात कोरोनाचा कहर सुरू होता. स्पॅनिश नागरिक असलेल्या नदालने मे-जूनमध्ये ‘फ्रेंच ओपन’मध्ये इतिहास रचण्याची स्वप्ने रंगवली असतील... पण कोरोनामुळे त्याला सक्तीने घरातच क्वारंटाईन राहण्याची वेळ आली होती. आपल्या दैनंदिन व्यायामाचे, घरी करत असलेल्या स्वयंपाकाचे फोटो, व्हिडिओ तो सोशल मीडियावर टाकत होता आणि संकटात मी मनोधैर्य गमावलेले नाहीये असाच संदेश त्याच्या चाहत्यांना देत होता.

अमेरिकेत कोरोनाचा कहर सुरू असतानाच ‘अमेरिकन ओपन’ ऑगस्टमध्ये नियोजित वेळेनुसार सुरू झाली. कोरोनाच्या सावटाखाली झालेली ही स्पर्धा प्रेक्षकांविनाच संपन्न झाली. फेडरर, नदाल यांसारख्या नामांकित खेळाडूंनी अमेरिकावारी टाळली. फेडररने ‘फ्रेंच ओपन’मध्येही अनुपस्थिती जाहीर केली. नदाल मात्र तिथे इतिहास घडवण्यास आतुर होता... परंतु तत्पूर्वी त्याच्या मार्गातील अनेक अडथळ्यांवर त्याला मात करावी लागणार होती.

‘फ्रेंच ओपन’ सुरू होण्याच्या आठवडाभर आधी ‘इटालिअन मास्टर्स’ (1000 गुणांच्या स्पर्धेला मास्टर्स असे म्हणतात.) ही मातीच्या मैदानावरील स्पर्धा इटलीतील रोममध्ये संपन्न होते. या स्पर्धेला ‘फ्रेंच ओपन’ची पूर्वतयारी समजले जाते आणि या स्पर्धेचा विजेता ‘फ्रेंच ओपन’चा सर्वाधिक प्रबळ दावेदार असतो. 

याअगोदर नऊ वेळा नदाल ही स्पर्धा जिंकला होता आणि कोरोनाकाळातील सक्तीच्या दीर्घ विश्रांतीनंतर तो इटलीत दहाव्या विजेतेपदाच्या इच्छेने मैदानात उतरला होता... पण उप-उपान्त्यफेरीत (क्वार्टर फायनलमध्ये) अघटित घडलं. अर्जेंटिनाच्या दिएगो श्वार्ट्झमनने नदालला 6-2, 7-5 असे सरळ सेटमध्ये पराभूत करून खळबळ उडवून दिली. 

श्वार्ट्झमनची उंची अवघी पाच फूट सहा इंच इतकी आहे. यशस्वी टेनिसपटू होण्यासाठी उत्तम उंची असणे आवश्यक मानतात. फेडरर, नदाल, जोकोविच या साऱ्यांची उंची सहा फुटांपेक्षा अधिक आहे. जॉन इस्नर नावाच्या अमेरिकन टेनिसपटूची उंची तर चक्क सहा फूट दहा इंच इतकी आहे. विम्बल्डनच्या हिरवळीवर 'सर्व्ह अँड व्हॉली'चा खेळ करताना हे उंच टेनिसपटू कमी उंचीच्या खेळाडूंचा अक्षरशः धुव्वा उडवतात... 

पण मातीच्या मैदानावर खेळाडूंच्या उंचीपेक्षा खेळाची शैली, फूटवर्क, स्टॅमिना या गोष्टी अधिक महत्त्वाच्या ठरतात. या गुणांच्या जोरावर साडेपाच फुटांच्या चपळ श्वार्ट्झमनने नदालसारख्या महान टेनिसपटूला पराभूत केले. 'नदाल आता संपला' अशा आशयाची कुजबूज करण्याची संधी टीकाकारांना मिळाली. जो टेनिसपटू इटालिअन ओपनची उपान्त्य फेरीही गाठू शकला नाही तो ‘फ्रेंच ओपन’ काय जिंकणार अशा शेरेबाजीस ऊत आला. 

श्वार्ट्झमनला नमवून इटालिअन ओपनचे विजेतेपद मिळवणाऱ्या, सद्यःस्थितीत जगातील प्रथम क्रमांकाचा टेनिसपटू असलेल्या नोवॅक जोकोविचला ‘फ्रेंच ओपन’ किताबाचा सर्वाधिक प्रबळ दावेदार समजले जाऊ लागले.

21 सप्टेंबर 2020 रोजी अनेक मतमतांतरांच्या पार्श्वभूमीवर ‘फ्रेंच ओपन’ला सुरुवात झाली. मेऐवजी सप्टेंबरमध्ये स्पर्धा सुरू झाल्याने खेळाडूंना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. पॅरिसमधील हवामान थंड होऊ लागले होते. क्वचित पाऊस पडत होता. 

अशा थंड वातावरणात दरवर्षी नेहमी इनडोअर टेनिस स्पर्धा होतात... पण कोरोनामुळे सर्व वेळापत्रक बिघडले आणि आऊटडोअर असलेली ‘फ्रेंच ओपन’ थंडीतच संपन्न झाली. थंड वारे वाहत असल्याने टेनिसपटू जेरीस आले होते. सुरुवातीचे काही दिवस तर अनेक पुरुष-महिला टेनिसपटू जॅकेट वगैरे उबदार कपडे घालून सामने खेळत होते. 

34 वर्षांचा नदाल या थंड वातावरणात ताज्या दमाच्या तरुण खेळाडूंपुढे तग धरू शकणार नाही अशाही शक्यता वर्तवण्यात आल्या... पण नदाल किती अद्भुत रसायन आहे याची कल्पनाच टीकाकारांना नव्हती. अगदी पहिल्या सामन्यापासून त्याने विजेत्याच्या थाटात खेळायला सुरुवात केली. खेळ किती एकाग्र चित्ताने खेळला जाऊ शकतो ते जाणून घ्यायचे असल्यास नदालचा खेळ बघावा. मैदानावर असताना तो जणू एका वेगळ्याच धुंदीत असतो. त्याच्या चेहऱ्यावर आत्मविश्वास ओसंडून वाहत असतो. बॉलशिवाय त्याला जणू दुसरे काहीच दिसत नाही. अत्यंत तंत्रशुद्ध रितीने प्रचंड आवेशाने जेव्हा तो फटके मारतो तेव्हा त्याच्या त्या आत्मविश्वासपूर्ण आवेशानेच समोरच्या खेळाडूचे अर्धे अवसान जणू गळून पडते. 

अर्थात आवेश असला तरी त्याच्यात आक्रस्ताळेपणा अथवा अखिलाडू वृत्ती नाहीये. अत्यंत सहजगत्या त्याच्या बाजूच्या मैदानात तो असा लीलया संचार करतो की, त्याचा जन्म जणू हेच काम करण्यासाठी झालाय असे वाटते.

‘फ्रेंच ओपन’च्या चौथ्या फेरीत नदालचा सामना त्याच्यापेक्षा 14 वर्षांनी लहान असलेल्या सबेस्टियन कोर्डा या वीसवर्षीय टेनिसपटूशी होता. सबेस्टियनचे वडील पेत्र कोर्डा हेदेखील एकेकाळचे प्रसिद्ध टेनिसपटू आणि ग्रँड स्लॅम विजेते होते. असे असूनही लहानपणापासून सबेस्टियन आपल्या वडिलांना आदर्श न मानता नदालला आदर्श मानत होता यातूनच तो नवोदितांसाठी किती प्रेरक आहे याची प्रचिती येते. नदालने सबेस्टियनला 6-1, 6-1, 6-2 असे सहजगत्या हरवले आणि उज्ज्वल भविष्यासाठी अनेक सदिच्छाही दिल्या.

नदालची खरी कसोटी होती ती उपान्त्य फेरीत. तिथे त्याच्यासमोर आव्हान होते ते दिएगो श्वार्ट्झमनचे. तोच लहानखुऱ्या चणीचा चपळ श्वार्ट्झमन ज्याने ‘इटालिअन ओपन’च्या मातीच्या मैदानावर नदालचा नुकताच पराभव केला होता... परंतु पूर्वानुभवाने शहाणपण आलेल्या नदालने या वेळी श्वार्ट्झमनला कुठलीही संधी न देता त्याचा 6-3, 6-3, 7-6 असा त्याचा सहज पराभव केला. श्वार्ट्झमनच्या खेळाचा दर्जा उच्च होताच... नदालच्या खेळाचा दर्जा अत्युच्च होता...!

अंतिम फेरीत नदालची गाठ होती ती नोवॅक जोकोविचशी. जोकोविच जागतिक क्रमवारीत प्रथम स्थानी तर नदाल द्वितीय स्थानी. तो वयाने नदालपेक्षा एक वर्षाने लहान, 17 ग्रँड स्लॅम विजेतेपदे मिळवून अठराव्याकडे वाटचाल करणारा. दोघांनी भूतकाळात अटीतटीचे अनेक सामने खेळलेले असल्याने त्यांचा हा सामनाही अत्यंत अटीतटीचा होऊन पाच सेटपर्यंत जाईल असे जाणकारांना वाटत होते... पण नदालने 6-0, 6-2, 7-5 अशा प्रकारे पहिले तीन सेट जिंकून सामना पाच सेटपर्यंत लांबवला नाही. 

जगातील पहिल्या क्रमांकाच्या टेनिसपटूला पहिल्या सेटमध्ये त्याने एकही गेम जिंकण्याची संधी न देता 6-0 असा सेट जिंकला. यातूनच त्याची प्रचंड विजिगिषु वृत्ती ध्यानात येते.

इथे हे नमूद करणे गरजेचे आहे की, जोकोविच अजिबात वाईट टेनिस खेळत नव्हता. त्याचा खेळ उत्तमच होता... परंतु नदालचा खेळ अक्षरशः झंझावाती होता...! जोकोविच कानाकोपऱ्यात बॉल फटकावत होता आणि तिथवर पोहोचणे अशक्य आहे असे प्रेक्षकांना वाटत असतानाच नदाल प्रत्येक कानाकोपऱ्यात पोहोचून जोकोविचला चोख प्रत्युत्तर देत होता. हे माझे 'क्ले कोर्ट' आहे आणि मीच इथला राजा आहे असेच जणू तो जोकोविचला आपल्या रॅकेटद्वारे ठणकावून सांगत होता. 

सामन्यात वरचढ होण्याची एकही संधी जोकोविचला न देता नदालने सामना आणि ‘फ्रेंच ओपन’ किताब जिंकून फेडररच्या विश्वविक्रमाशी बरोबरी केली. नदाल फेडररपेक्षा पाच वर्षांनी लहान असल्याने भविष्यात तो फेडररचा विक्रम मोडण्याची दाट शक्यता आहे.

फेडरर - नदाल - जोकोविच हे तिघे जवळपास 16-17 वर्षांपासून टेनिस विश्वावर आधिपत्य गाजवत आहेत. प्रत्येकाचा स्वतःचा असा एक मोठा चाहता वर्ग आहे. आपला आवडता टेनिसपटूच सर्वश्रेष्ठ आहे असे त्या-त्या वर्गाला वाटत असते... परंतु नदालने जोकोविचचा सपशेल पराभव करून ‘फ्रेंच ओपन’ किताब जिंकल्यानंतर जोकोविचच्या चाहत्यांनीही खुल्या मनाने नदालचे अभिनंदन केले. 'मी जोकोविचचा फॅन आहे... पण सर्वोत्कृष्ट खेळल्याबद्दल नदालचे मनःपूर्वक अभिनंदन' अशा आशयाच्या प्रतिक्रिया अनेक टेनिसप्रेमींनी सोशल मिडियावर व्यक्त केल्या. मी स्वतः फेडररची फॅन असूनही मला नदालचा सर्वोत्तम खेळ आणि त्याची लढाऊ वृत्ती, दोन्ही प्रशंसनीय वाटते.

फेडरर - नदाल - जोकोविच यांच्यासारखे टेनिसपटू दशकांत नव्हे तर शतकांत मोजकेच असतात. आनंदाची गोष्ट अशी की, ते अद्याप खेळत असल्याने त्यांच्या सुवर्णयुगाचा साक्षीदार होण्याची संधी टेनिसप्रेमींना आहे. 

ज्यांना टेनिसमध्ये नव्याने रस निर्माण होतोय त्यांना अत्युच्च दर्जाचे टेनिस बघायचे असल्यास त्यांनी रॉजर फेडरर, नोवॅक जोकोविचचा खेळ तर बघावाच... त्याहीपेक्षा अधिक लक्षपूर्वक राफेल नदालचा खेळ बघावा, त्याच्या खेळाच्या चित्रफिती युट्यूबवर बघाव्यात आणि खेळाचे अभिजात सौंदर्य अनुभवावे!

- डॉ. प्रगती पाटील 
pragati.rationalist@gmail.com

Tags: क्रीडा टेनिस राफेल नदाल फ्रेंच ओपन रॉजर फेडरर नोवॅक जोकोविच विम्बल्डन मार्टिना हिंगीस व्हिनस विल्यम्स दिएगो श्वार्ट्झमनचे प्रगती पाटील Sports Tennis Pragati Patil Rafael Nadal French Open Roger Federer Novak Djokovic Wimbledon Venus Williams Martina Hingis Diego Schwartzman Load More Tags

Comments:

Siddhu

मला टेनिस मधे रॉजर,नोवाक,राफेल तिघे आवडतात कारण त्यांच्यासारखे सुपरस्टार एका दशकात कोणीही पाहिले नाही,पण सर्वात उच्च दर्जाचा आदर्श खेळाडू,असेल तो म्हणजे राफेल नदाल.सलाम आपल्या लेखनीला,अतिशय उत्कृष्ट पद्धतीने आणि सर्वसमावेशक अभ्यास , सल्यूट !!!

मिलिंद घायवट

सुदंर आणि सविस्तर लेख.

RATNAKAR SURESH PAWAR

लेख वाचताना नादालचे काही गुप्त आणि सुप्त गुण वाचनात येतील असे वाटत होते. मात्र लेख भरकटला आहे. असे शेवटी शेवटी वाटायला लागले. लेख तितका प्रभावी नाही.

Somnath Nikam

मला टेनिस मधील काहीही कळत नाही, पण वरील लेखमूळे माझा आत्मविश्वास वाढण्यास मदत झाली व टेनिस विषयी कुतूहल निर्माण झाले.

प्रगती पाटील

भारतात क्रिकेटइतके टेनिस लोकप्रिय नाही. नदालच्या विक्रमाच्या अनुषंगाने लोकांना टेनिसची प्राथमिक माहिती व्हावी आणि टेनिस बघण्यात रस निर्माण व्हावा या उद्देशाने हा लेख लिहिलाय. नदालचा फिटनेस लक्षात घेता अजून अनेक ग्रँड स्लॅम विजेतेपदांचा तो मानकरी ठरेल हे निश्चित आहे. तेव्हा त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील पैलूंवर लिहिता येईलच.

Add Comment