ऑस्ट्रेलिअन ओपनची वाढती चुरस 

द्वितीय फेरीनंतर आता निवडक 32 पुरुष आणि महिला खेळाडू तृतीय फेरीत पोहोचल्याने यापुढील सर्व सामने अत्यंत अटीतटीचे होणार आहेत यांत शंकाच नाही. 

फोटो सौजन्य: Cameron Spencer | NYT

ऑस्ट्रेलिअन ओपनच्या एकेरी श्रेणीतील दुसऱ्या फेरीचे सर्व सामने गुरुवारी संपले. दुहेरी श्रेणीतील पहिल्या फेरीचेही सर्व सामने संपले. एकेरीत भारताचे प्रतिनिधित्व करणारा एकमेव टेनिसपटू सुमीत नागल यास प्रथम फेरीतच जागतिक क्रमवारीत 69व्या स्थानावर असणाऱ्या लिथुआनियाच्या रिकार्डास बरांकिसने 6/2, 7/5, 6/3 असे पराभूत केले. एकेरी श्रेणीत प्रथम फेरीत पराभूत होणाऱ्या टेनिसपटूला एक लाख डॉलर्स इतकीच (!) रक्कम मिळत असल्याने सुमीत नागलला तेवढ्या रकमेवर समाधान मानावे लागले.

पुरुष दुहेरीत खेळणाऱ्या भारताच्या रोहन बोपण्णाचा पहिल्याच फेरीत पराभव झाला. फ्रेंच ओपन मिश्र दुहेरीचा माजी विजेता असलेल्या रोहन बोपण्णासाठी या वर्षीच्या ऑस्ट्रेलिअन ओपनच्या स्मृती फारशा सुखावह नव्हत्या. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर स्पर्धेत सहभागी होणाऱ्या अनेक खेळाडूंना स्पर्धेअगोदर ऑस्ट्रेलियात येऊन आपापल्या हॉटेल रूम्समध्ये दोन आठवडे क्वारंटाईन होण्यास भाग पडले. 

रोहन बोपण्णा आपल्या रूमबाबत अत्यंत नाराज होता. दीडशे स्क्वेअर फुटांच्या त्या लहानशा खोलीची खिडकी केवळ तीन इंच इतकीच उघडत असल्याने खोलीत हवा खेळती राहत नाही, कोंदट वातावरणात व्यायाम करताना अस्वस्थ वाटते अशा त्याच्या अनेक तक्रारी होत्या. दुहेरीतील त्याचा साथीदार कोरोना संसर्ग झाल्याने ऑस्ट्रेलियावारी करू शकला नाही आणि स्पर्धेच्या ऐन तोंडावर नवीन जोडीदार शोधण्याची कसरत त्याला करावी लागली. 

रोहन बोपण्णा आणि त्याचा नवीन जपानी साथीदार बेन मॅक्लाकनचे सूर फारसे जुळलेच नाहीत. नाम-जी-संग आणि मिन-क्यू-सोंग या कोरिअन जोडीकडून ते 6/4, 7/6 असे सरळ सेटमध्ये पराभूत झाले. (ग्रँड स्लॅममध्ये पुरुष एकेरीचे सामने बेस्ट ऑफ 5 सेट्‌सचे होत असले तरी दुहेरीचे सामने बेस्ट ऑफ 3 सेट्सचेच होतात.) 

पुरुष दुहेरीत स्लोवकियाच्या इगोर झेलेनीच्या साथीने खेळणारा भारताचा दिविज शरनही प्रथम फेरीतच पराभूत झाला. केन क्रॅवित्झ-यानिक हाफमन या जर्मन जोडगोळीने त्यांना 6/1, 6/4 असे सहजगत्या पराभूत केले.

महिला दुहेरीत भारताचे प्रतिनिधित्व करणारी अंकिता रैना ही ग्रँड स्लॅममध्ये खेळणारी पाचवी भारतीय महिला ठरली आहे. तिच्याअगोदर निरुपमा मंकड (क्रिकेटपटू अशोक मंकड यांच्या पत्नी) (1971), निरुपमा वैद्यनाथन (1998), शिखा उबेरॉय (2004), सानिया मिर्झा (2005) यांनी भारताचे प्रतिनिधित्व केले होते. पुण्यात हिंदू जिमखान्यावर टेनिसचे प्रशिक्षण घेऊन कारकिर्दीची सुरुवात करणारी अंकिता रोमानियाच्या मिहेला बझारनेस्क्यूच्या साथीने ऑस्ट्रेलिअन ओपन दुहेरी खेळत होती. बेलिंडा वूलकॉक-ओलिव्हिया गडेकी या ऑस्ट्रेलिअन जोडीने त्यांना 6/3, 6/0 असे सहजगत्या पराभूत केले.

भारतीय खेळाडूंचे आव्हान संपुष्टात आले असले तरी जगभरातील उत्तमोत्तम खेळाडूंचे उच्च दर्जाचे टेनिस बघणे ही टेनिसरसिकांसाठी पर्वणीच आहे. जागतिक क्रमवारीत प्रथम स्थानावर असलेल्या ऑस्ट्रेलियाच्या ॲशली बार्टीने दुसऱ्या फेरीत आपल्याच देशातील दारिया गॅवरीलोवाचा 6/1, 7/6 असा पराभव करून तृतीय फेरीत प्रवेश केला. 

चोवीसवर्षीय ॲश बार्टी ही एक हरहुन्नरी खेळाडू आहे. फक्त टेनिसच नव्हे तर क्रिकेटमध्ये आणि गोल्फमध्येही तिला रुची आणि गती आहे. कुमारवयापासून टेनिसमध्ये उत्तम कामगिरी करूनही तिने वयाच्या अठराव्या वर्षी टेनिसमधून ब्रेक घेऊन क्रिकेट खेळण्याचा निर्णय घेतला. त्याअगोदर तिने क्रिकेटचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण घेतलेही नव्हते... पण अल्पावधीतच तिने खेळ आत्मसात केला अन्‌ दोन वर्षे अष्टपैलू क्रिकेटपटू म्हणून राष्ट्रीय स्तरावरील क्रिकेट खेळण्याचा आनंद घेतला. त्यानंतर पुन्हा टेनिसकडे वळून 2019ची फ्रेंच ओपन जिंकून जागतिक क्रमवारीत प्रथम स्थानावरही मजल मारली. स्थानिक गोल्फ स्पर्धेतही तिने अजिंक्यपद मिळवले आहे. 

अनेकविध खेळांची आवड असलेली, सदैव हसतमुख असणारी ॲश बार्टी मायदेशात ग्रँड स्लॅम खेळत असल्याने तिला स्थानिक प्रेक्षकांचा भरघोस पाठिंबा मिळत आहे. त्यांच्या अपेक्षा सार्थ ठरवत ती अजिंक्यपद मिळवते का ते पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

दुसऱ्या फेरीत विजयी झालेल्या सिमोना हॅलेप (2), नाओमी ओसाका (3), एलिना स्वीतोलीना (5), कॅरोलिना प्लिश्कोवा (6), आर्यना सबालेंका (7), सरीना विल्यम्स (10), बेलिंडा बेंचिच (11), गार्बिनी मुगुरुथा (14), इगा श्वाटेक (15) या सर्व टेनिसपटूही तिला कडवी झुंज देऊन विजेतेपद मिळवण्यास आतुर आहेत. व्हीनस विल्यम्सला पायाला झालेल्या दुखापतीमुळे सारा इराणीकडून 6/1, 6/0 असा अत्यंत करुण पराभव पत्करावा लागला. दुखापतग्रस्त असूनही तिने सामना सोडून न देता खिलाडू वृत्तीने सामना पूर्ण केला. सोफिया केनिन (4), बियांका आंद्रेस्क्यू (8), पेट्रा क्विटोवा (9) या मानांकित टेनिसपटूही द्वितीय फेरीत पराभूत झाल्या आहेत. (ग्रँड स्लॅम स्पर्धेत जगातील सर्वोत्तम 32 खेळाडूंना मानांकन दिले जाते, त्यांनाच मानांकित म्हटले जाते.)

पुरुष एकेरीत द्वितीय फेरीत जागतिक क्रमवारीत पंचावन्नाव्या स्थानावर असलेला मार्तन फुचोवीच आणि सतरावा मानांकित स्टॅन वावरिंका यांच्यातील लढत अत्यंत रोमहर्षक झाली. (तीन ग्रँड स्लॅम जिंकलेला स्वित्झर्लंडचा स्टॅन वावरिंका हा भारताच्या भूमीवरील सर्वाधिक यशस्वी टेनिसपटू आहे. भारतात दरवर्षी संपन्न होणाऱ्या टाटा ओपन स्पर्धेत तो चार वर्षे विजेता ठरलेला आहे). 

पाच सेट्समध्ये चाललेल्या लढतीत दोन्ही खेळाडूंनी एकमेकांविरुद्ध अनेक मॅच पॉइंट्स वाचवत सामना नाट्यमय केला. अखेरीस फुचोवीचने चार तास चाललेला हा सामना सलग तीन मॅच पॉइंट्स वाचवत 7/5, 6/1, 4/6, 2/6, 7/6 असा जिंकला. स्टेफॅनोस त्सित्सिपास (5), फॅबिओ फॉनिनी (16) या दोघांनीही द्वितीय फेरीत आपापल्या प्रतिस्पर्ध्यांविरुद्ध 5 सेट्समध्ये चित्तथरारक विजय मिळवले.

द्वितीय फेरीत प्रथम मानांकित नोवाक जोकोवीचला जागतिक क्रमवारीत 59व्या स्थानावर असलेल्या फ्रान्सिस तियाफूने 6/3, 6/7, 7/6, 6/3 असे झुंजवले. उंचापुरा, धिप्पाड तियाफू हळुवारपणे बॉल मारू शकतो याची कुणी कल्पनाही करू शकणार नाही... पण त्याने जोकोवीचला चकवण्यासाठी कधी वेगात तर कधी अत्यंत हळुवारपणे ड्रॉप शॉट, स्लाइस बॅकहॅन्ड यांसारखे शॉट मारून त्याच्या नाकी नऊ आणले. दुसरा सेट तियाफूने टायब्रेकरमध्ये जिंकल्यावर प्रेक्षकांनीही त्याला भरभरून दाद दिली. वैतागलेल्या जोकोवीचनेही तियाफूला ‘जशास तसे’ प्रत्युत्तर देत मधूनच हळुवार शॉट्स मारण्यास सुरुवात केली. दोघांची जुगलबंदी बघताना प्रेक्षकांची चांगलीच करमणूक झाली. तिसरा सेट पुन्हा टायब्रेकरमध्ये गेल्यावर मागच्याच सेटप्रमाणे तियाफू जिंकतोय की काय असे वाटत असताना जोकोवीचने दोन जबरदस्त Ace (एस) मारून सामन्याचा नूरच पालटून टाकला अन्‌ तिसरा, चौथा सेट जिंकून सामना जिंकला.

जेव्हा एखादा खेळाडू प्रचंड वेगात अशी अचूक, बिनतोड सर्व्हीस करतो ज्यास प्रतिस्पर्धी खेळाडूची रॅकेट स्पर्शही करू शकत नाही... तेव्हा त्याने ‘एस’ मारला असे म्हटले जाते. ‘एस’चा शब्दशः अर्थ आहे एक्का. (एखाद्या क्षेत्रातील निष्णात, तरबेज व्यक्तीसाठीही ‘एस’ हा शब्द वापरण्यात येतो.) एस हा खरोखर हुकमाचा एक्काच असतो. निर्णायक क्षणी दीर्घ शॉट्स (रॅलीज) खेळताना चुका होऊन पॉइंट अन्‌ गेम/सेट/मॅच गमावण्याचा धोका असतो. हे टाळून जो खेळाडू दणदणीत ‘एस’ ठोकण्याची क्षमता ठेवतो... तो आपल्या बाजूला सामना फिरवू शकतो.

सद्य स्थितीत जोकोवीचचा कोच असलेला, क्रोएशियाचा पूर्वाश्रमीचा प्रसिद्ध टेनिसपटू गोरान इवानीसेवीच हा ‘एस’ मारण्यात इतका तरबेज होता की, अजूनही जगातील मोजक्याच सर्वश्रेष्ठ ‘एस’ मारणाऱ्या खेळाडूंमध्ये त्याची गणना होते. भारतीय टेनिसमध्ये त्याच्यासंदर्भात एक मजेशीर आठवण आहे. 1995मध्ये तो भारतात डेव्हीस कपचे सामने खेळण्यासाठी आला होता. जागतिक क्रमवारीत सातव्या स्थानावर असलेल्या चोवीसवर्षीय गोरान इवानीसेवीचचा मुकाबला जागतिक क्रमवारीत एकशे तेविसाव्या स्थानावर असणाऱ्या भारताच्या बावीसवर्षीय लिएंडर पेसशी दिल्लीत झाला होता. पहिले दोन सेट्स इवानीसेवीचने जिंकल्यामुळे हिरमुसलेले भारतीय प्रेक्षक लिएंडरने तिसरा सेट टाय-ब्रेकरमध्ये जिंकल्यावर अक्षरशः वेडावले. क्रिकेटच्या सामन्यात जसा जल्लोश करतात तसा जल्लोश ते लिएंडरच्या प्रत्येक पॉइंटवर करू लागले. 

दिल्लीच्या प्रचंड उष्णतेने इवानीसेवीचचा जीव अगोदरच हैराण झाला होता, त्यात प्रेक्षकांच्या हुल्लडबाजीने तो पुरता वैतागला अन्‌ त्याचा सूरच हरपला. पाच सेट चाललेला सामना लिएंडरने 6/7, 4/6, 7/6, 6/4, 6/1 असा जिंकला तेव्हा मैदानावर उपस्थित असलेले आणि टीव्हीवर सामना बघत असलेले सर्व भारतीय हर्षातिरेकाने वेडावले! हा सामना बघत असताना मला स्वतःला लिएंडरच्या विजयाचा आनंद होत होताच... परंतु प्रेक्षकांनी असे बेछूट, बेभान वर्तन करून भारताची प्रतिमा खराब करू नये असेही वाटत होते. 

टेनिसच्या सामन्यात अधूनमधून हुल्लडबाजी करण्यासाठी फ्रेंच टेनिसप्रेमी प्रसिद्ध आहेत... परंतु भारतीय टेनिसप्रेमींच्या हुल्लडबाजीच्या तुलनेत फ्रेंच लोक अत्यंत सौम्य आहेत असेच इवानीसेवीचला त्या क्षणी वाटले असेल.

यंदाच्या ऑस्ट्रेलिअन ओपनमध्ये जोकोवीचला थोडाफार संघर्ष करावा लागला असला तरी द्वितीय मानांकित राफेल नदालने आपले दोन्ही सामने अगदी आरामात जिंकलेले आहेत. रॉजर फेडररच्या अनुपस्थितीत जोकोवीच आणि नदाल यांच्यात विजेतेपदासाठी विशेष चुरस असणार आहे हे नक्की. 

द्वितीय फेरीनंतर आता निवडक 32 पुरुष आणि महिला खेळाडू तृतीय फेरीत पोहोचल्याने (32 खेळाडूंनाच मानांकन देण्याची पद्धत असल्याने) यापुढील सर्व सामने अत्यंत अटीतटीचे होणार आहेत यांत शंकाच नाही. पुरुष एकेरीत दहाव्या मानांकित गेल मॉन्फिल्सचा अपवाद वगळता इतर 9 मानांकित खेळाडू तृतीय फेरीत पोहोचले आहेत. डॉमिनीक थीम (3), डॅनिअल मेदवेदेव (4), स्टेफॅनोस त्सित्सिपास (5), अलेक्झांडर झ्वेरेव (6), आंद्रे रुब्लोव (7), दिएगो श्वार्ट्झमन (8), मॅतिओ बेर्रितिनी (9) या प्रमुख मानांकित टेनिसपटूंसह इतर अनेक टेनिसपटू विजेतेपदासाठी संघर्ष करण्यास सज्ज झाले आहेत. ऑस्ट्रेलिअन ओपनची चुरस दिवसेंदिवस वाढतच आहे....

- डॉ. प्रगती पाटील, पुणे.
pragati.rationalist@gmail.com

(लेखिका, भारतीय सैन्यदलात वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत होत्या.)

Tags: टेनिस ऑस्ट्रेलिअन ओपन ग्रँडस्लॅम Pragati Patil Sports Australian Open Tennis Grandslam Load More Tags

Add Comment