दोन अखिल भारतीय कबड्डी स्पर्धा : मराठा लान्सर आणि सुभाष मंडळ नागपूर

'माणूस'मधील 50 वर्षांपूर्वीच्या सदराची पुनर्भेट (9/22)

प्रातिनिधिक चित्र | hindustantimes.com

अखिल भारतीय स्वरूपाच्या दोन क्रीडा संघटनांचे अध्यक्षपद एकाच माणसाकडे राहू नये हा नियम. पण तो धाब्यावर बसवून हे महाशय व्हॉलीबॉल आणि कबड्डी या संघटनांचे अध्यक्षपद गेले कित्येक वर्षे भोगत आहेत. सर्व प्रकारच्या मार्गांचा अवलंब करून, या ना त्या कारणाने गेली सहा वर्षे अ.भा.क. असोसिएशनच्या निवडणुकाच मुळी त्यांनी घेतलेल्या नाहीत. चार राज्यांतील चार बगलबच्चे ताब्यात ठेवून खुर्ची सांभाळण्याच्या या उद्योगात कबड्डीच्या विकासाची फिकीर आहे कुणाला? 

कबड्डीला ‘देशी खेळांचा राजा’ समजण्यात येते. इतर महाराजांचे नसले तरी या राजाचे ग्रहमान सध्या जोरात आहेत. दर्जेदार कबड्डी स्पर्धा भरविण्याची एक निकोप स्पर्धाच जणू सध्या महाराष्ट्रात चालू आहे आणि पुणे-मुंबईकरांच्या तोडीस तोड ठरून विदर्भ सध्या या बाबतीत ‘फॉर्मा’त आहे.

एवढ्याशा विदर्भात सुमारे 11 अखिल भारतीय स्वरूपाच्या कबड्डी स्पर्धा होतात. त्यांपैकी नागपूर, हिंगणघाट, दिग्रस, चंद्रपूर येथील संयोजक आपले अखिल भारतीय सामने खरेखुरे कसे ठरावेत यासाठी अहमहमिकेने प्रयत्न करतात. भारतामधील निरनिराळ्या राज्यांतून बोलाविलेले कबड्डीचे संघ, त्यांच्या येण्या-जाण्याच्या आणि राहण्या-जेवण्याच्या खर्चाची विनामूल्य पण उत्कृष्ट व्यवस्था, सुवर्णपदके, चांदीचे पदक आणि रोख बक्षिसे यांची लयलूट आणि ‘दाद’ देणारा प्रेक्षकवर्ग, हे सारे खेळाडूला खासच आकर्षित करणारे असते.

नागपुरात नुकत्याच लागोपाठ पार पडलेल्या अशा दोन स्पर्धा मला खेळावयास आणि पाहावयास मिळाल्या. मराठा लान्सर आणि सुभाष मंडळ नागपूर या संस्थांनी त्या आयोजित केल्या होत्या. जानेवारी 15 ते 18 आणि 21 ते 24.

महाराष्ट्रातल्या निवडक संघांबरोबरच तामिळनाडू, मध्य प्रदेश, म्हैसूर, राजस्थान, ओरिसा इत्यादी राज्यांतले संघ या मैदानावर उतरले. महिलांच्याही आठ निवडक चमूंनी या स्पर्धा गाजविल्या. मराठा लान्सरतर्फे झालेल्या सामन्यात विभागीय (Zonal) सामने विशेष रंगले नाहीत पण वाद पद्धतीच्या सामन्यात खूप बहारदार खेळ बघावयास मिळाला. सातारा आणि दिग्रस, पी.एम.टी. पुणे आणि हिंदसायकल मुंबई हे असे सामने. पुण्याच्या बाळ कोंढाळकरच्या तडाखेबंद चढायांनी हिंदसायकलवर लावलेले लोण आणि मिळवलेली आघाडी पुणेकर सांभाळू शकले नाहीत. निदान रेषा बंद करण्याचा आणि शेखर शेट्टीच्या वेगवान चढायांचा खेळ करून हिंदसायकल आली आणि ती टिकवली. (बाळ कोंढाळकरसारखा अनेक वर्षे राष्ट्रीय स्पर्धा गाजविणारा खेळाडू अधिक विचारपूर्वक आणि धीमेपणे खेळ करेल तर त्याच्या संघाला तो अनेक अजिंक्यपदे सहज मिळवून देईल.) उपांत्य फेरीत भोपाळकरांनी दिग्रसच्या संघाचे कच्चे दुवे हुडकून त्यांचा पराभव केला. अंतिम सामना मात्र एकतर्फीच झाला. पहिल्यापासून आक्रमक पवित्रा स्वीकारून हिंदसायकलने पहिल्याच डावात एवढी आघाडी मिळविली की मारेकऱ्यांना त्याच्या जवळपास जाणे अशक्य व्हावे. सामन्यातल्या उत्कृष्ट चढाईचे पारितोषिक मुंबईच्या शेखर शेट्टीला मिळाले. आपल्या उंचीचा सुयोग्य उपयोग करून वेगवान आणि कौशल्यपूर्ण चढाई करणाऱ्या भारतातील प्रमुख खेळाडूंत शेखरचे नाव घेतले जाते ते सार्थ ठरावे असा त्याचा खेळ झाला खरा!

महिला संघातील अनपेक्षित निकालाने सर्वांनाच धक्का दिला. उपांत्य फेरीत तामिळनाडू संघाने मुंबईच्या नवयुग संघाला हरविले. प्रतिस्पर्धी संघ केव्हाही हलका लेखू नये हा धडा मुंबईकर भगिनी या सामन्यापासून निश्चितच शिकतील. दुसरा उपांत्य सामना मात्र नागपूरच्याच दोन संघातच झाला आणि युवक क्रीडा संघ विजयी ठरला. फारशी योग्यता नसताना बचावात्मक खेळ आणि जोरदार नशीब याच्या साहाय्यानेच अंतिम फेरीपर्यंत वाटचाल केलेल्या तामिळनाडू संघाला युवक क्रीडाकडून पत्करावा लागलेला पराभव स्वतःच्या संघाचे नेमके निदान करावयास उपयोगी पडला असेल अशी आशा आहे.

सुभाष मंडळाच्या विभागीय सामन्यापासूनच अटीतटीच्या झुंजी झाल्या. ‘ए’ गटातील प्रेसिडेंट क्लब बंगलोर, ज्योती मंडळ वर्धा यांना विभागीय विजेते, उपविजेते पद मिळाले खरे; पण या विभागात पराभूत ठरलेला अमरावतीचा संघही वरील दोघांना तोडीस तोड होता. बिचारे अवघे दोन गुणांनी हार खाऊन विभागातून बाद झाले. ‘ब’ विभागातून राणाप्रताप, पुणे आणि नवरंग मंडळ, दिग्रस वर आले. या दोन संघांचा सामना आणि या दोन्ही संघांचा अकोल्याच्या संघाबरोबर झालेली लढत ही कबड्डीरसिकांना खेळाची मेजवानी देणारी ठरली. ‘क’ विभागात अलाहाबाद, रुरकेला इत्यादी संघांना सहजपणे पराभूत करणाऱ्या सातारच्या श्री शिवाजी उदय मंडळाला हिंगणघाटच्या सुभाष मंडळाने जोरात झुंजविले. अवघ्या एक गुणाने विजयी ठरून सातारकर विभागीय विजेते ठरले. ‘ड’ विभागात मुंबईच्या दुर्गामाता संघाने मात्र सर्वांना सरळसरळ चितपट केले.

बचावात्मक कबड्डीचे नगारे सगळीकडे वाजत असताना बाद पद्धतीच्या सामन्यात नागपूरकरांना मात्र श्वास रोखावयास लावणारा खेळ पाहावयास मिळाला. शिवाजी उदय मंडळाचे ज्योती मंडळ, वर्धा आणि प्रेसिडेंट क्लब बंगलोर याबरोबर झालेले सामने आणि बंगलोर व हिंगणघाटचे सामने हे जादा वेळ देऊन खेळावयास लागले आणि त्या सर्व 50 मिनिटांच्या खेळाची अनिश्चितता व विजयश्री खेचावयास दोन्ही संघांची चाललेली धडपड यामध्ये खऱ्याखुऱ्या कबड्डीचे कौशल्य प्रेक्षकांना बघावयास मिळाले.

दिग्रसच्या नगरपरिषदेने उपांत्य पूर्व फेरीत मुंबईकरांना पराभूत करून सर्वांनाच धक्का दिला. पण ही तर कुठे सुरुवात होती. विभागीय सामन्यात त्यांच्यावर मात करणाऱ्या राणाप्रताप संघाला त्यांनी बाद उपांत्य फेरीत पराभूत करून अंतिम फेरी गाठली. अंतिम फेरीत त्यांचा आणि शिवाजी उदय मंडळ सातारा यांच्यामधील सामना खूपच रंगला. सातारच्या भाग्यवंत अहिरे, गोपाळ माने यांनी केलेले चढाईचे भगीरथ प्रयत्न आधीच्या सामन्याप्रमाणे पराभवाचे विजयात रूपांतर करू शकले नाहीत. दिग्रसचा संघ होता किरकोळ शरीरयष्टीचाच. पण सुरेख क्षेत्ररक्षण आणि रामू पवारचे सुयोग्य नेतृत्व यांच्या बळावर त्यांनी हे अखिल भारतीय अजिंक्यपद प्राप्त करून घेतले.

विभागीय सामने सहजपणे जिंकून अंतिम फेरीपर्यंत वाटचाल केलेल्या मुंबईच्या जॅफेमॅनर्स आणि पुण्याच्या राणाप्रताप या संघांतील लढत रंगणार नाही असे पहिल्या दहा मिनिटांत वाटत होते. सामना शून्य गुणावर संथपणे चालला होता. जयश्री कदमने एकाच चढाईत चार गडी बाद करून मुंबईला एकदम आघाडी मिळवून दिली. बैठक मारून खालच्या पायाने गडी बाद करण्याचे तिचे कौशल्य हे पुरुष खेळाडूंनी कित्ता गिरवावा इतके ‘खास’ होते. मिळवलेली ही आघाडी सांभाळताना मात्र मुंबईकरांना त्रासाचे गेले. पुण्याच्या जयश्री झेंडे आणि रंजना गुप्तेने सामना आपल्या बाजूने फिरवण्याचा धडाडीचा प्रयत्न केला पण निर्णायक यश मिळवण्याइतके यश त्यांच्या प्रयत्नांना लाभू शकले नाही.

सामन्याचे उद्घाटन आणि बक्षीस समारंभ या दोन्ही प्रसंगी महाराष्ट्राचे अर्थ व क्रीडामंत्री मा. शेषरावजी वानखेडे उपस्थित होते. घरगुती जिव्हाळ्याने (उद्योगपती असलेल्या प्रमुख पाहुण्यांची देणगी हजारावरून पाच हजारांपर्यंत वाढविण्यास त्यांचा चांगलाच उपयोग संस्थेला झाला.)

खेळाची ज्ञात आणि मात आणि खेळाडूंना खेळण्याचा मनमुराद आनंद देण्यासाठी तर सामन्याचा फायदा झालाच पण बंगलोर, भिलाई, जोधपूर, रुरकेला अशा लांबलांबच्या कबड्डीच्या मोहिमांची प्रेमपूर्वक आमंत्रणे साऱ्या भारतभर पोहोचली आणि दूरवरच्या स्वाऱ्यांची स्वप्ने कबड्डीचे मावळे बघू लागले हेही खूप मोलाचे. ज्या ज्या वेळी ह्या मुलूखगिरीच्या स्वाऱ्या होतील त्या त्या वेळी वाचकांना त्याचा वृत्तान्त पेश होईलच.

आता यांना हाकलले पाहिजे

राष्ट्रीय खेळ म्हणून ज्या कबड्डीची टिमकी वाजवितात, त्या कबड्डीच्या अखिल भारतीय असोसिएशनचा कारभार अत्यंत असमाधानकारक आणि गलथान आहे असेच म्हणावे लागते. या सगळ्यामागचे सूत्रधार म्हणून या असोसिएशनचे अध्यक्ष श्री. त्रिपाठी (अलाहाबाद) यांना जबाबदार धरावे लागेल.

खरे म्हटले तर अखिल भारतीय स्वरूपाच्या दोन क्रीडा संघटनांचे अध्यक्षपद एकाच माणसाकडे राहू नये हा नियम. पण तो धाब्यावर बसवून हे महाशय व्हॉलीबॉल आणि कबड्डी या संघटनांचे अध्यक्षपद गेले कित्येक वर्षे भोगत आहेत. सर्व प्रकारच्या मार्गांचा अवलंब करून, या ना त्या कारणाने गेली सहा वर्षे अ.भा.क. असोसिएशनच्या निवडणुकाच मुळी त्यांनी घेतलेल्या नाहीत. चार राज्यांतील चार बगलबच्चे ताब्यात ठेवून खुर्ची सांभाळण्याच्या या उद्योगात कबड्डीच्या विकासाची फिकीर आहे कुणाला? ज्या उत्तर प्रदेशातील ते अध्यक्ष आहेत त्या उत्तर प्रदेशात हाताच्या बोटावर मोजण्याइतक्यादेखील जिल्हा कबड्डी संघटनाची स्थापना नसावी आणि एकही मोठी स्पर्धा भरू नये हे कशाचे लक्षण? स्वतः स्पर्धा आयोजित करणे दूर राहिले पण इतरांनी ज्या अखिल भारतीय स्पर्धा आयोजित केल्या, त्यासाठी पाठविलेल्या 100 रुपये प्रवेश फीची पावतीही मिळू नये हे कोणत्या कार्यक्षमतेत बसते? अनेक वेळा सूचना करूनही पतियाळाच्या A.I.N.I.च्या संस्थेला कबड्डीचे Syllabus सादर केले जाऊ नये, मग कबड्डीचा पद्धतशीर विकास होणार कसा? प्रांतवार कबड्डी संघटनेचे काम सजविणे, अविकसित भागाचे दौरे आयोजित करणे, आंतरराज्यीय प्रचारासाठी एखादे बुलेटीन वर्षातून एकदा-दोनदा प्रकाशित करणे, अथवा आंतरराष्ट्रीय मैदानावर कबड्डीची पताका फडकवणे या साऱ्या गोष्टी तर मग खूपच दूर राहिल्या.

महाराष्ट्रामध्ये कबड्डी असोसिसेशनचे काम सजले आहे. इथला खेळ आणि खेळाडू अनेक दृष्टीने सुखात आहेत, पण ज्या खेळाला राष्ट्रीय म्हणावयाचे त्या खेळाचा विकास आणि प्रसार साऱ्या भारतवर्षात व्हावयास हवा. निरनिराळ्या राज्यांतील शासनांचा आणि जनतेचा कल लक्षात घेता हे शक्य आहे पण अखिल भारतीय कबड्डी असोशिएशनच्या खुर्च्या मर्यादित स्वार्थासाठी जोपर्यंत त्रिपाठी आणि कंपनीने अडविल्या आहेत तोपर्यंत हे परिवर्तन घडावे कसे? बदलाची सुरुवात ही अ.भा.क.अ.ची कार्यकारिणी बदलून करावी लागेल.

फेब्रुवारीच्या 10 ते 14 तारखेपर्यंत दिल्लीला जे अखिल भारतीय आंतरराज्य कबड्डी सामने होणार आहेत त्या वेळी महाराष्ट्र, दिल्ली, हैदराबाद, आंध्र, मद्रास येथील कार्यकर्ते Vote of non-confidenceच्या मार्गाने त्रिपाठींना पदच्युत करून दिल्लीचे महापौर मल्होत्रा यांना हे पद विभूषित करण्याची विनंती करणार आहेत असे समजते.

कबड्डीच्या प्रसाराची झालेली कोंडी फुटण्यासाठी ही दिल्लीवरची स्वारी यशस्वी होणे आवश्यक आहे.

***

मराठा लान्सर या संस्थेच्या सामन्याच्या बक्षीस समारंभाच्या वेळी वेद प्रकाश आणि त्याचे वस्ताद उपस्थित होते. अवघ्या चौदाव्या वर्षी आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सुवर्णपदक मिळवणाऱ्या या ‘वंडरबॉय’चे खूपच हार्दिक स्वागत आणि कौतुक झाले.

सुभाष मंडळाने सामन्याच्या उद्घाटनप्रसंगी त्यांचे पश्चिम जर्मनीत जाऊन आलेले खेळाडू श्री. भट यांचा बेताचा मल्लखांब सादर केला. मल्लखांबातले शिवछत्रपती पारितोषक यंदा त्यांना मिळाले तर एका तरुणाच्या कर्तृत्वाचा योग्य सन्मान झाल्याचे समाधान लाभेल.

अमरावतीच्या हनुमान मंडळाचे दहा खेळाडू व कबड्डीमधील दुखापती या विषयाचा शास्त्रीय अभ्यास करावयास या सामन्याला आले होते. त्यांनी त्याचा एक मोठा फॉर्म तयार केला होता व तो ते सर्व खेळाडूंच्याकडून भरून घेत. त्यांनी छोट्या-मोठ्या दुखापतींचे फोटोही घेतले. सुमारे वर्षभर निरनिराळ्या सामन्यांतून ही माहिती गोळा करून नेत्यांना अहवाल सादर करतील. देशी खेळाच्याबाबत हा पहिलाच या स्वरूपाचा प्रयत्न होत आहे. त्यांचे संचलनही खूपच नेटके आहे.

(पूर्वप्रसिद्धी : माणूस, 6 फेब्रुवारी 1971)

- डॉ. नरेंद्र दाभोलकर

Tags: नरेंद्र दाभोलकर अंनिस सामाजिक कार्यकर्ता माणूस साप्ताहिक श्री. ग. माजगावकर क्रिडा नरेंद्र दाभोळकर खेळ क्रिकेट सामना Load More Tags

Add Comment