'महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन शिबिर - खंडाळा' : थंड हवेतील गरम चर्चा

'माणूस'मधील 50 वर्षांपूर्वीच्या सदराची पुनर्भेट (22/22)

प्रातिनिधिक चित्र

डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची मुख्य ओळख अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे प्रणेते अशी आहे. त्यानंतर साधना साप्ताहिकाचे दीड दशक संपादक अशीही त्यांची एक महत्त्वाची ओळख आहे. मात्र आयुष्याच्या पंचविशीपर्यंत त्यांची मुख्य ओळख राष्ट्रीय स्तरावरील कबड्डी खेळाडू अशी होती. त्यांना राज्य सरकारचा क्रीडा क्षेत्रातील सर्वोच्च मानला जाणारा शिवछत्रपती पुरस्कार दोन वेळा मिळाला होता. एकदा कबड्डीचा उत्कृष्ट खेळाडू म्हणून, आणि दुसऱ्यांदा कबड्डी खेळातील अन्य योगदानासाठी (संघटक, पंच, कॉमेंटेटर, स्तंभलेखक, क्रीडाप्रसारक, इत्यादी प्रकारच्या).

अशा डॉ. दाभोलकरांनी माणूस साप्ताहिकात 1970 - 1971 मध्ये क्रीडांगण हे पाक्षिक सदर लिहिले. त्यात कब्बडी, कुस्ती, अन्य देशी खेळ यांच्यासोबत क्रिकेटवरही त्यांनी लिहिले आहे. या सदरातील एकूण 22 लेखांतून क्रीडा संस्कृती रुजावी यासाठी आसुसलेले मन आणि एकूणच खेळांच्या विषयी असलेले त्यांचे प्रगल्भ विचार यांचे दर्शन घडते.  

तब्बल 50 वर्षांपूर्वी प्रसिद्ध झालेले आणि त्यानंतर आजतागायत कुठेही  उपलब्ध नसलेले हे लेख, साधनेतील आमचा तरुण सहकारी समीर शेख याने 'माणूस'च्या अर्काइव्हमधून संकलित केले आहेत. डॉ. दाभोलकर यांच्या आयुष्यातील सुरुवातीचे हे पर्व किती रोमांचक असेल याची कल्पना तर या लेखमालेतून येईलच, पण 50 वर्षांपूर्वीच्या क्रीडा जगताची एक झलकही पाहायला मिळेल. डॉक्टरांच्या व्यक्तिमत्वातला फारसा समोर न आलेला पैलू दाखवणारे हे लेख आजही वाचनीय आहेत, यात शंकाच नाही. 31 जुलैपासून 30 ऑगस्टपर्यंत ही 22 लेखांची लेखमाला 'कर्तव्य'वरून पुनर्भेट म्हणून सादर केली गेली. या लेखमालेतला हा शेवटचा लेख.

होणार होणार म्हणून गाजत असलेले महाराष्ट राज्य कबड्डी असोसिएशनचे पावसाळी शिबिर 11 व 12 तारखेला पार पडले. गरमागरम चर्चा करताना निदान ठिकाण तरी थंड हवेचे असावे या कल्पनेने बहुधा खंडाळ्याची निवड केली असावी.

पावसाळी शिबिराचा हा उपक्रम चार वर्षांपूर्वी असोसिएशनने चालू केला. वर्षभरात होणाऱ्या स्पर्धांचा कार्यक्रम जाहीर करावा, त्यातील अडचणी दूर करण्याचा प्रयत्न व्हावा ही शिबिरामागची मूळ कल्पना. हळूहळू संघटनात्मक अडचणी, सामन्यांचे विविध नियम, खेळाच्या विकासाची आगामी वर्षातील दिशा- या गोष्टींचाही विचार शिबिरात होऊ लागला. शिबिरांना महत्त्व येऊ लागले. सुरुवातीला शिबिरात थोड्या व्यक्ती, संस्थाच हजर राहत. शिबिरातील महत्त्वाचे निर्णय हे बहुसंख्य संस्थांच्यापर्यंत पोहोचले तरी त्यांबाबत त्या उदासीन राहत. किंबहुना हे नियम कधी झाले? कुणी केले? असेही प्रश्न बहुसंख्यांच्याकडून येऊ लागले. दुर्दैवाने महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्या या बाबतच्या काही प्रमाणात शिथिल व सदोष अंमलबजावणीमुळे या प्रश्नांतून निर्माण होणाऱ्या वादाची तीव्रता वाढू लागली. गेल्या वर्षी केलेल्या नियमांतून निर्माण झालेला गोंधळ, आव्हाने-प्रतिआव्हाने यांमुळे महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनचा रंगमंच गेले तीन-चार महिने धुमसत होता. साध्या साध्या गोष्टींना भलतेच महत्त्व प्राप्त झाले होते. कोण कुणावर कशी कुरघोडी करणार याचे मोर्चे बांधले जात होते. खंडाळ्याच्या शिबिराच्या वृत्तांताबद्दल म्हणूनच महाराष्ट्रातील कबड्डी खेळाडूंत, संघटकांत एक प्रकारचे औत्सुक्य होते.

शिबिरासाठी पाठविलेल्या परिपत्रकातील शेवटच्या पत्राने या गोंधळावर कळस चढवला. शिबिरामध्ये सामने भरविणाऱ्या संस्थांपैकी प्रत्येक संस्थेच्या एक वा अधिक प्रतिनिधींनी उपस्थित राहावे ही आधीची सूचना. आवश्यक ते शुल्क देऊन यासाठी सामने भरविणाऱ्या महाराष्ट्रातील सर्वच संस्थांनी आपापले प्रतिनिधी नोंदवले. किती झाले तरी त्यांच्याच दृष्टीने हे शिबिर सर्वांत महत्त्वाचे होते. शिबिरातील निर्णयावरून त्यांच्या स्पर्धांची भवितव्ये आणि स्वरूप ठरणार होते आणि ऐन वेळी महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनने शेलबाँब टाकला. “फक्त एकच प्रतिनिधी यावा आणि त्यानेही पहिल्या दिवशी अवघ्या दोन तासांच्या चर्चेनंतर शिबिर सोडावे.” ही एकतर्फी निर्णायक सूचना अपमानस्पद होतीच आणि हेतूबद्दल संशय निर्माण करणारी होती.

शिबिराला सुरुवात व्हावयाची होती दुपारी दोनपासून. पण सकाळपासून आलेल्या प्रतिनिधींमध्ये हाच विषय रंगत होता. आपापले व्यवसाय बाजूला ठेवून ज्यांनी दोन दिवसांची सवड काढली ते सांगलीचे खासदार अण्णासाहेब गोरखडे, सोलापूरचे यल्लाप्पा जेनुरे, मिरजेचे वैद्य-करमरकर ही सर्व मंडळी आणि इतर आठ-दहा संस्थांचे प्रतिनिधी ही आपापल्या क्षेत्रातील कामाची माणसे होती. केवळ दोन तासांसाठी आणि केवळ सूचना देण्यासाठी इतक्या लांब रखडत येण्याचे त्यांना काही कारण नव्हते. सर्वच संस्था प्रतिनिधींनी या बदलाबाबत राज्य असोसिएशनला धारेवर धरले. आपली न पटणारी भूमिका मांडण्याचा केविलवाणा प्रयत्न पत्रकांच्या अध्वर्यूंनी केला. अर्थातच त्यांना माघार घ्यावी लागली आणि साऱ्या संस्थांचे प्रतिनिधी दोन्ही दिवस शिबिरात राहिले.

अधिकृतपणे प्रवेश नोंदला गेला नाही म्हणून ‘राणा प्रताप’चे प्रतिनिधी हेमंत जोगदेव यांना बाहेर जाण्याची पाळी अगदी सुरुवातीला आली. हा मुद्दा विलक्षण खडाजंगी उडविणारा ठरला. ‘नियमाचे पालन करावयास हरकत नाही पण तुम्हीच पुरविलेल्या माहितीप्रमाणे नियमाचे काटेकोर पालन केले तर शिबिराला सर्वच जिल्हा आणि संस्था प्रतिनिधी बसू शकत नाहीत.’ हा मुद्दा पुण्याच्या केळकरांनी मांडला. जवळजवळ सगळ्यांचाच त्याला संपूर्ण पाठिंबा होता. शेवटी हेमंत जोगदेवांना परत बोलाविले गेले. कबड्डीचे सगळे मंदिर हे सामने भरविणाऱ्या या संस्थांच्या पायाभूत आधारावर उभे आहे. महाराष्ट्रात एखाद्या वर्षी कबड्डीचे सामनेच भरले नाहीत तर असोसिएशनच्या कामाचे आणि खेळाचे काय ज्ञान राहील, याचा विचार वरील दोन्ही प्रकार घडविण्याआधीच सुज्ञांनी करावयास हवा होता. विनाकारण कटुता वाढवून काय साधले? शिवाय एका बाजूला नियम लक्षात न घेता त्यामागची भावना लक्षात घ्या हे सांगत असतानाच दुसऱ्या बाजूने नियमांची शिस्त पहिली- अशा दोन्ही भूमिका वठवणे हास्यास्पद नाही का? का सोईस्करपणे नियमांचे पालन आणि सोईप्रमाणे नियमामागच्या भावनेचे पालन! पहिल्या दोन वादग्रस्त घटनांनी चर्चेला निराळेच स्वरूप आले आणि मग पुढची चर्चाही मुळी वेगच घेईना. सुमारे साडेतीन-चार तासांच्या चर्चेनंतर मग खुल्या चर्चेचे स्वरूप बदलून गटवार चर्चा करण्याचे निर्णय घेण्यात आले.


हेही वाचा : 'शांतिपर्वातील कथा'चे प्रास्ताविक - स. मा. गर्गे


गटवार चर्चा ही कल्पना रामबाण ठरली. संबंधित हितसंबंधी एकत्रित आल्याने सामने भरविणाऱ्या संस्थेच्या प्रतिनिधींना मनमोकळेपणे चर्चा करून निष्कर्षाला येणे सोपे झाले. दुसऱ्या गटाने पंच, निरीक्षक, पंचमंडळ वगैरे गोष्टींबाबतची चर्चा केली.

दोन गटांनी एकमुखाने संमत केलेले हे निष्कर्ष सकाळी खुल्या चर्चेसाठी सर्वांच्या पुढे आले. वातावरण खूपच निवळले होते. चर्चा आटोपशीर आणि नेमकी झाली. अखिल भारतीय पातळीवरचे सामने हा थट्टेचा विषय काही ठिकाणी होतो. तेव्हा महाराष्ट्राबाहेरील किमान तीन प्रांतांतले संघ सामन्यात भाग घेण्यास आणलेच पाहिजेत हा दंडक स्वतः संस्थाचालकांनीच घालून घेतला. तीन वर्षांपर्यंत प्रयत्न करूनही ही गोष्ट साध्य न झाल्यास पुढे तीन वर्षे त्यांना फक्त महाराष्ट्र राज्यपातळीवरचेच सामने भरविण्यास मान्यता द्यावी हेही मान्य झाले. खासगी संघाची होणारी कुचंबणा थांबविण्यासाठी फक्त व्यावसायिक अगर फक्त खासगी संघाचेच सामने भरवावेत आणि दोन वर्षांतून किमान एकदा खासगी संघाचे सामने भरवावेतच हाही नियम, मागच्या वर्षीचाच पण पक्का केला. विभागातून एकाच्या ऐवजी दोन संघच वर घेतले जावेत हा मागच्या वर्षी वादाला कारणीभूत ठरलेला विषय दोन या आकड्यांवर शिक्कामोर्तब करून अधिकृतपणे संपविण्यात आला.

पंच, निरीक्षकाचे अविकार हा आणखी एक वादग्रस्त मुद्दा. पंच ठरविणे अथवा वैयक्तिक बक्षीस कोणाला द्यावयाचे याला त्याची अनुमती घेणे हे त्याचे अधिकारक्षेत्र नाही ही गोष्ट पक्की केली गेली. त्याच्या मर्यादा नेमक्या आखून दिल्या गेल्या. पंच आणि निरीक्षक हे शक्यतो सामने भरविणाऱ्या संस्थेच्या जिल्ह्यातलेच नसावेत, असा संकेत ठरला. कुठल्याही प्रकारच्या रोख बक्षिसांना बंदी घालण्यात आली. इतर स्वरूपांतील बक्षिसे देतानाही ती सामना समितीच्या निवड मंडळामार्फतच द्यावयास हवीत. आपल्या आवडत्या खेळाडूला खेळ झाला नसतानाही त्याला हेतुपुरस्सर उचलून धरण्याचा प्रयत्न यामुळे थांबविला जाईल.

सांगली प्रकरणाचे पडसाद या शिबिरात उमटावेत ही स्वाभाविक अपेक्षा. खासदार अण्णासाहेब गोटखिंडे यांनी हा प्रश्न उपस्थित करूनही तो चर्चेला येऊ शकला नाही. या विषयावर एक समिती नेमली आहे. ती गव्हर्निंग कौन्सिलला आपला अहवाल सादर करील आणि मग त्यावर निर्णय घेतला जाईल, असे उत्तर खासदारसाहेबांना मिळाले. सांगली प्रकरणाच्या संदर्भात इतर अनेक प्रश्न उपस्थित होणार होते, त्यांची परस्परच वासलात लागली. ‘आमच्या अंगात ताकद असेल तर - आणि ती आहे - सांगलीकर-सोलापूरकरांना पुढील वर्षी अ. भा. स्पर्धेसाठी परवानगी कशी मिळते पाहू,’ हा म. रा. क. अ. च्या एका जबाबदार कार्यकर्त्याचा पवित्रा आणि सांगलीकरांचे तसेच काही अनुत्तरित करणारे प्रश्न यांची जुगलबंदी पाहण्याचा योग यामुळे हुकला. कबड्डीच्या भल्यासाठी अर्थातच हा योग कधीच आला नाही तरच बरे वाटेल. ज्या तथाकथित अखिल भारतीय कबड्डीचा व्याप महाराष्ट्रातल्या काही जिल्ह्यांपुरताच मर्यादित आहे. त्याला आता कुठे बाळसे येत असताना हा वाद न निघणेच श्रेयस्कर.

सातारकरांनी एक चांगली सूचना शेवटी केली. कबड्डीमध्ये त्या गोष्टीची नितांत आवश्यकता, त्या बदलत्या स्वरूपाबद्दल हा प्रश्न होता. कबड्डी क्रीडारसिकांच्या जिव्हाळ्याच्या या प्रश्नाबद्दल आतापर्यंतच्या कोणत्याच शिबिरात चर्चा होऊ नये वा बैठकीसाठी पाठविलेल्या मुद्द्यांमध्येही त्याचा उल्लेख असू नये हे दुर्दैवच. या प्रश्नावरची निकड सर्वांनाच मान्य झाली. कमी जागेत, ठरावीक वेळेत, एका दमात शारीरिक संघर्ष आणि कौशल्य यांचा मिलाप घडविणारा खेळ म्हणजे कबड्डी. कबड्डीच्या ह्या स्वरूपाला जास्तीत जास्त उठाव देण्यासाठी या मूलभूत गोष्टी कायम ठेवून कबड्डीत काही बदल घडविणे अत्यावश्यक आहे. कबड्डीचा सध्याचा कंटाळवाणेपणा वाढत चालला तर कबड्डीकडे क्रीडारसिक लवकरच पाठ फिरवतील. कबड्डीला गतिमानता येईल हे बघणे अतिशय आवश्यक आहे. पुण्याच्या सन्मित्र संघाचा प्रयत्न सोडला तर या बाबत प्रयत्न कुणी केलेच नाहीत. महाराष्ट्रातील कबड्डी क्षेत्रातील सर्व संस्था व व्यक्तींकडून या संदर्भात सूचना मागवाव्यात. एका समितीने त्यातील तीन सर्वोत्तम सूचना निवडाव्यात आणि प्रायोगिक चाचणीवर मग या स्वरूपाचे सामने भरवूनही बघावेत असा आराखडा केला गेला. सातारच्या श्री शिवाजी उदय मंडळाने, सांगलीच्या तरुण भारतने आणि सोलापूरच्या जय भवानीने तर ही प्रायोगिक चाचण्यांची जबाबदारी घेण्याचे मान्यही केले.

शिबिराचे उद्घाटन क्रीडा अनुदान मंडळाचे प्रमुख वाखारकर यांच्या हस्ते झाले. त्यांचे भाषण अतिशय तळमळीचे आणि उद्बोधक झाले. कबड्डी असोसिएशनच्या कामाचा त्यांनी मनमोकळा गौरव केला. सरकारच्या मर्यादा स्पष्ट केल्या आणि त्याबरोबरच कबड्डीमध्ये प्रायोगिक स्वरूपाच्या नवीन विचारांची आवश्यकताही हिरीरीने पुढे मांडली. बेसबॉलसारखा खेळ अजूनही बदलतो आहे तर कबड्डीला बदलत राहण्यासाठी काय हरकत आहे, असा प्रश्न त्यांनी विचारला. शिबिराची शेवटची दहा मिनिटे वगळता या बाबत विचारच झाला नाही हे फारसे भूषणावह नाही. वेळेच्या आधीच शिबिराचे सूप वाजविले जात असताना कबड्डीचे बदलते स्वरूप कसे असावे यासाठी थोडा अधिक वेळ सर्वांनी काढला असता तर बरे झाले असते.

समारोपाचे भाषण भारतीय क्रीडा संघटक आणि कबड्डीचे अध्वर्यू शंकरराव साळवी यांनी केले. कबड्डीसाठी तळमळीने काम करणारा, फटकळपणे बोलणारा आणि भव्य दिव्य घडविण्यासाठी धडपडणारा असा हा माणूस. त्यांचे हे सारे गुण त्यांच्या समारोपाच्या भाषणात व्यक्त झाले. पण का कोण जाणे, प्रतिनिधींच्या हृदयाला ते तेवढे भिडलेले दिसले नाही. विचारांची एकवाक्यता आणि भावनेची विभिन्नता असा प्रकार या बाबत होतो का? - खरे तर होतोच. याची प्रामाणिक चौकशी प्रत्येकाने स्वतःच्या मनाशी केली पाहिजे आणि वैयक्तिक भावनांचा हा कारणपरत्वे आलेला दुरावा बाजूला करून संघटनेला केवळ नियमाने नव्हे मनानेही एकसंधपणे उभे केले तर - कबड्डीमध्ये खऱ्या अर्थाने क्रांती घडू शकेल.

(पूर्वप्रसिद्धी : माणूस, 2 ऑक्टोबर 1971)

- डॉ. नरेंद्र दाभोलकर


क्रीडांगण सदरातील या आधी प्रसिद्ध झालेले सर्व लेख वाचा या लिंकवर


 डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या 78व्या जन्मदिनी म्हणजे 1 नोव्हेंबर 2022 ला ही लेखमाला साधना प्रकाशनाकडून पुस्तकरूपाने येत आहे.

Tags: नरेंद्र दाभोलकर अंनिस सामाजिक कार्यकर्ता माणूस साप्ताहिक श्री. ग. माजगावकर क्रिडा नरेंद्र दाभोळकर खेळ क्रिकेट सामना Load More Tags

Add Comment