महिला खोखो संघाची कर्णधार

'माणूस'मधील 50 वर्षांपूर्वीच्या सदराची पुनर्भेट (7/22)

प्रातिनिधिक चित्र | hindustantimes.com

पळतीमध्ये महाराष्ट्रातल्या सर्वोत्कृष्ट खेळांडूत प्रतिभा गोखले या प्रमुख आहेत. भरपूर स्टॅमिना आणि पळतीला लागणारी सर्व प्रकारची कौशल्ये यांचा त्यांच्यात सुरेख समन्वय आहे. अनेक मोठ्या सामन्यांतही त्या सात मिनिटांच्या डावात पाच अथवा सहा मिनिटे एकट्याच पळाल्या आहेत. खुंटावर मारण्याचे कौशल्य आपल्यामध्ये नाही या स्वरूपाच्या स्वतःच्या कमतरेतीचीही जाणीव स्पष्टपणे ठेवणारा खेळाडू हा मला नेहमीच चांगला खेळाडू वाटतो.

वैद्यकीय क्षेत्रातील माझ्यासारख्या माणसाला क्रीडाक्षेत्रात समव्यवसायी व्यक्ती भेटणे अनेक अर्थांनी आनंदाचा क्षण वाटतो. महाराष्ट्र राज्याच्या महिला खोखो या संघाच्या कर्णधार प्रतिभा गोखले ह्या एम.बी.बी.एस.च्या पहिल्या वर्षाच्या विद्यार्थिनी आहेत ही गोष्ट त्यांना आणि क्रीडाक्षेत्राला निश्चितच भूषणावह आहे. वयाच्या एकविसाव्या वर्षी या दोन्ही क्षेत्रांतील त्यांची झेपही खासच कौतुकास्पद. शिवाजी पार्क दादरच्या लोकसेना या संघातून त्यांच्या खेळाची जडणघडण झाली. लंगडीचा फायदा त्यांनाही झाला. त्याबरोबरच लोकसेनेतील रमेश वरळीकर आणि लोकमान्य विद्यामंदिर शाळेतील बाबा यादिक यांचे मार्गदर्शनही बहुमोल ठरले.

शाळेत असताना हिंद ट्रॉफी ही मानाची ट्रॉफी त्यांनी सतत तीन वर्षे जिंकली. अनेक स्थानिक व परगावचे सामनेही गाजविले. रुईया कॉलेजला असताना त्या कॉलेजचा संघ दोन्ही वर्षे अजिंक्य होता आणि पहिल्यापासूनच त्यांची मुंबई विद्यापीठ संघात निवड झाली. कित्येक वर्षे सतत अजिंक्यपद मिळवणाऱ्या इंदूर विद्यापीठाला हरवून मुंबई विद्यापीठाने जे अजिंक्यपद बंगलोरला मिळाले त्यात त्यांचा मोठा वाटा होता. नागपूरला त्या मुंबई विद्यापीठाच्या संघनायिका होत्या. कोल्हापूरला 1966 साली राज्य क्रीडा महोत्सवात अजिंक्य ठरलेल्या मुंबई जिल्ह्याच्याही त्याच कर्णधार होत्या. हैदराबाद, कराड या दोन्ही ठिकाणच्या अ.भा. सामन्यांत त्या महाराष्ट्र राज्याकडून खेळल्या आणि यंदा त्यांना कप्तानपदाचा मान मिळाला. पळतीच्या पहिल्याच बॅचमध्ये त्यांचा समावेश हमखास असतो. पळतीमध्ये महाराष्ट्रातल्या सर्वोत्कृष्ट खेळांडूत त्या प्रमुख आहेत. भरपूर स्टॅमिना आणि पळतीला लागणारी सर्व प्रकारची कौशल्ये यांचा त्यांच्यात सुरेख समन्वय आहे. अनेक मोठ्या सामन्यांतही त्या सात मिनिटांच्या डावात पाच अथवा सहा मिनिटे एकट्याच पळाल्या आहेत. खुंटावर मारण्याचे कौशल्य आपल्यामध्ये नाही या स्वरूपाच्या स्वतःच्या कमतरेतीचीही जाणीव स्पष्टपणे ठेवणारा खेळाडू हा मला नेहमीच चांगला खेळाडू वाटतो.

वैद्यकीय विषयाचा अभ्यास सांभाळूनही त्यांनी आपला दर्जा नियमित सरावाने टिकवला आहे. परीक्षेच्या आधी दोन महिने येईल तेवढाच काय तो खंड. मध्य प्रदेश राज्याच्या बलाढ्य संघाशी यशस्वीपणे मुकाबला करून आपला संघ अजिंक्य पद मिळवेल अशा निर्धाराने त्यांच्या नेतृत्वाखाली सराव करणाऱ्या, सराव शिबिरातील महाराष्ट्र राज्य महिला संघामागे माझ्यासारख्या हजारो क्रीडाशौकिनांच्या शुभेच्छा उभ्या आहेत.

कोंडी फोडण्यासाठी

महाराष्ट्रात कबड्डी स्पर्धा अनेक ठिकाणी घेतात. साऱ्याच जणांना पाहिजे असतात, दर्जेदार संघ आणि नामवंत खेळाडू! नवीन होतकरू खेळाडूंना चुका सुधारण्यास आणि कौशल्य दाखविण्यास वाव मिळणार कधी? सन्मित्र संघ त्यासाठी यंदा एक नवीन उपक्रम करणार आहे. पुण्यातील महानगरपालिकेच्या प्रत्येक वार्डातून ते एक कबड्डी संघ घेऊन अशा 70 वार्डांतील 70 संघांचे ते सामने भरविणार आहेत. तर पत्रव्यवस्थेसाठी केलेल्या 30 विभागांतून 30 संघ-सामने औद्योगिक विभागात भरविणार आहेत. खूप होतकरू खेळाडूंना त्यामुळे मनमुराद खेळावयास मिळेल. अर्थात, अशा सामन्यांना परवानगी देताना असोसिएशनच्या काही नियमांत फेरबदल करावे लागतील. या उपक्रमाचे महत्त्व लक्षात घेऊन असोसिएशन कोणती भूमिका घेते हे पुढे येईलच.

(पूर्वप्रसिद्धी : माणूस, 13 जानेवारी 1971)

- डॉ. नरेंद्र दाभोलकर

Tags: नरेंद्र दाभोलकर अंनिस सामाजिक कार्यकर्ता माणूस साप्ताहिक श्री. ग. माजगावकर क्रिडा नरेंद्र दाभोळकर खेळ क्रिकेट सामना Load More Tags

Add Comment