मांडूळ : लढणाऱ्या माणसांच्या कथा 

जयवंत बोदडे यांच्या मांडूळ या कथासंग्रहाचा परिचय 

जयवंत बोदडे हे खानदेशातील एक धडपडणारे लेखक! सतत त्यांची लेखनासंबंधी धडपड सुरू असते. तसा तर त्यांचा पिंड शिक्षकाचा. उमदा उपक्रमशील आदर्श शिक्षक म्हणून त्यांची ख्याती आहे. असा हा उपक्रमशील शिक्षक संवेदनशील मनाचा आहे. त्यांच्या ह्या संवेदनशील मनाला सर्जनाचा व नवनिर्मितीचा नाद आहे. ह्या नादापायी ते सतत लिहिते असतात. ‘घुंगराची गाडी’ बालकविता संग्रह आणि ‘टिच्चू आणि बिल्लास’ बालकथासंग्रह त्यांचे मुलांसाठी प्रसिद्ध आहेत. सोबतच ‘पोर्ट्रेट’ नावाचा कवितासंग्रहही प्रकाशित झाला आहे. त्यांचा  ‘मांडूळ’ हा कथासंग्रह नुकताच प्रसिद्ध झालेला आहे.

मांडूळ हे शीर्षक वैशिष्ट्यपूर्ण आहे. लेखक ज्या प्रदेशातून येतो तो मुक्ताईनगर तालुका आणि त्याच्या आजूबाजूला लागून असलेला जंगल प्रदेश हा नेहमीच मांडूळ तस्करी व वन्य प्राण्यांच्या अवैध शिकारींमुळे चर्चेत राहिलेला आहे. विशेषकरून येथील आदिवासी, ग्रामीण शेतमजूर, शोषित, वंचित, दलित समाज -  भूलथापा, अनिष्ट प्रथा-परंपरांचा बळी ठरलेला आहे. अजूनही तो पराकोटीच्या दारिद्र्यात आणि अज्ञानात जगताना दिसतो. राजकीय नेतृत्वाकडून विकासाच्या वल्गना केल्या जात असल्या तरी येथील समाज कष्ट, यातना, दुर्दैवाच्या खाईत कसा खितपत पडलेला आहे, याचे मूर्तिमंत चित्रण म्हणजे मांडुळ हा कथासंग्रह होय!

जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षक असल्याने लेखकाचा ग्रामीण भागाशी, तेथील जनसामान्यांच्या जगण्याशी त्यांचा जवळचा संबंध येतो. त्यांची बहुतेक सेवा मुक्ताईनगर परिसरात गेल्याने लेखकाने या प्रदेशातील लोकमानस सजगपणाने आपल्या कथालेखनातून चित्रित केला आहे. ‘वढोडा-डोलारखेडा राखीव वनक्षेत्र’ असेल किंवा ‘पूर्णाकाठची वेदना’ असेल - लेखक लिलया तेथील भूप्रदेशासह चितारतात व सजीव पात्रांची निर्मिती करत जातात. पूर्व खानदेशातील तावडी बोलीकथांना अनोखे कथन रूप प्रदान करते.      

अनेक वन्यजीव लोकांच्या अज्ञानाचे, खोट्या प्रलोभनांचे बळी ठरत आहेत. वाघांची, हत्तींची किंवा हरणांची शिकार अनेक कारणांनी केली जाते. बहुतेक शिकारी अज्ञानातून आणि लालसेपोटी घडत असतात. मांडूळांची शिकार हा त्यातीलच एक प्रकार. या समस्येलाच कथाविषय बनवून लेखकाने शिकारीआडून चालणाऱ्या विविध अनिष्ट प्रकारांची भांडाफोड केली आहे. त्यातून लेखकाने वन्यप्राण्यांची बाजू समाजासमोर मांडलेली दिसते. ही मोठीच कामगिरी म्हणायला हवी. जंगल किंवा मुके प्राणी यांच्या व्यथा वेदना मांडणारा हा लेखक म्हणूनच महत्वाचा ठरतो.

लेखकाचा मन:पिंड हा शोषित, वंचित, दलितांच्या बाजूने आहे हे उघडच आहे. म्हणूनच तो त्यांच्या उत्थानाच्या गोष्टी सांगतो. या घटकांच्या अवनतीला कारणीभूत असलेल्या कथावस्तूंची मांडणी करतो. ग्रामीणांच्या अधोगतीची कारणमीमांसा करणारी ही कथा आहे. व्यसन हा कुठल्याही कुटुंबाला गर्तेत नेऊन सोडणारा घटक आहे. व्यसनापायी अनेक कुटुंबे धुळीस मिळालेली आपण पाहिली आहेत. व्यसन हा कुटुंबाच्या प्रगतीतील प्रमुख अडथळा आहे हा धागा पकडून लेखकाने या संग्रहातील ‘दारूबंदी’ ही कथा लिहिली आहे. दारूमुळे सुखासमाधानाने नांदणारे कुटुंब कसे रसातळाला जाते याचे वर्णन ही कथा करते. व्यसनाचा हा विळखा तोडून टाकण्यासाठी सरसावलेल्या रणरागिणींचीही ही कथा आहे. या कथेतील भागाबाई वाड्यातील आपल्या भगिनींचा संसार सावरण्यासाठी पुढे सरसावतांना दिसते.

अशीच लढाऊ स्त्री ‘राक्षस’ या कथेतून भेटते. या कथेतील नायिका जेवली ही सोशिक आहे. नवऱ्यासाठी व कुटुंबासाठी ती सतत झटत असते. काबाडकष्ट करत असते. मुलाबाळांचे शिक्षण, त्यांचा अभ्यास, घरातील कामे आवरून शेत शिवारात राबत असते. एवढे सारे करूनही नवरा तिला मारझोड करत असतो. शिवाय संशयाची पालही त्याच्या मनात चुकचुकत असते. व्यसनाच्या आहारी गेलेला हा धनराज टोकाचा निर्णय घेत बायकोला संपवायला निघतो; पण जेवली यातून आपली सुटका कशी करून घेते, याची ही कथा आहे. या कथेतील नायिकासुद्धा शेवटच्या क्षणापर्यंत कुटुंबाला सावरताना दिसते. अशा लढाऊ नायिका निर्माण करून लेखकाने चांगला संदेश दिलेला आहे.


हेही वाचा : व्यवस्थेची चिरफाड करणाऱ्या कविता - सुरेश सावंत


डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दलितांच्या उद्धारासाठी केलेले कार्य सर्वज्ञात आहे. बाबासाहेबांनी दिलेल्या शिकवणीचे अनुसरण अनेक कुटुंबे करताना दिसतात; मात्र अशा कुटुंबांची होणारी प्रगती पाहून काही घटक दुखावतात. ते ग्रामीण भागातील दलित बांधवांची दिशाभूल करतांना दिसतात. ‘धर्म’ या कथेतून ही समस्या लेखकाने मांडलेली आहे. विशेष करून पुढारलेल्या समाजघटकांकडून ही अडवणूक होते. धर्म या कथेत किरंगे गुरूजींबाबत अशी घटना घडते. मुलीचे शाळेत नाव दाखल करताना ते रामदासची दिशाभूल करत तिची जात हिंदू महार टाक असा आग्रह धरतात; पण रामदास या गोष्टीला बळी पडत नाही. “सवलती नही भेटल्या तरी चालतील पण मी बाबासाहेबांनी दिलेली शिकवण व बौद्ध धर्म सोडणार नाही” असे बाणेदार उत्तर तो देतो.

‘मांडूळ’ ही या संग्रहातील महत्त्वाची आणि कथासंग्रहाचा गाभा म्हणता येईल अशी कथा. या कथेतून लेखकाने अनेक पातळ्यांना स्पर्श केला आहे. राजकीय दुरावस्था, प्रशासकीय भोंगळ कारभार आणि अज्ञानातून घडणाऱ्या वन्यप्राण्यांच्या हत्यांना वाचा फोडण्याचे मोठेच काम लेखकाने या निमित्ताने केलेले आहे. सोबतच अज्ञान, प्रलोभनांचे बळी ठरलेल्यांनाही सुनावले आहे. कुणाच्याही अध्यात मध्यात न जाणाऱ्या मुक्या जित्राबांचा घात करणाऱ्यांचे कधीही भले होत नाही. त्यांच्यावर अन्याय करणाऱ्यांना नियती धडा शिकवल्याशिवाय राहत नाही, असे ठणकावून सांगणारी ही कथा आहे. मांडूळाची शिकार करणाऱ्या शिवा आणि रघूला कशी अद्दल घडते ते या कथेतून वाचायला मिळते. ही कथा वाचताना अंगावर शहारे उठतात, शिवाय अनेक प्रकारची नवी माहिती मिळते. ‘तानक्या’ कथेतील नायकाची घुसमटही अशीच लक्षात राहते.

‘शिकार’ ही कथासुद्धा वन्यप्राण्यांविषयीचीच आहे. वन्यप्राण्यांचा गावकऱ्यांना, विशेषतः शेतकऱ्यांना खूप त्रास असतो. या त्रासाने शेतकरी पुरते वैतागलेले असतात. शेतकऱ्यांना शेती कसणे मुश्किल होऊन जाते. पिकाची नासाडी होते. हाती आलेले पिक घेता येत नाही. वाघ, बिबट्या यासारख्या वन्यप्राण्यांची दहशत पसरते. कधी कधी गावकरी, शेतकरी- शेतमजूरांवर हल्ले होतात. ह्या सगळया त्रासाची कहाणी लेखक मांडत जातो. वन्यप्राण्यांविषयी जशी लेखकाला कणव आहे; तशी शेतकरी, शेतमजूरांमध्ये असलेली हिंस्त्र प्राण्यांची दहशतही लेखक रेखाटतो. या प्राण्यांना हुसकावता किंवा मारताही येत नाही. वन्यप्राण्यांची शिकार हा भयंकर गुन्हा आहे. अशा दुहेरी कात्रीत सापडलेल्या शेतकऱ्यांची ही कथा आहे.

लेखकाचे निरीक्षण चौफेर आहे. आपल्या आजूबाजूचा भवताल त्याला चांगलाच परिचयाचा आहे. गाव, शिवारासोबतच वेशीबाहेरही त्याची नजर आहे. वेशीबाहेर वसलेली पालं, ह्या पालांमधून चालणाऱ्या हालचाली त्यांची नजर टिपते. विशेषतः येथील वैगुण्यावर त्यांची नजर स्थिरावते. पालांवरील पुरूष दैवतांची सोंगं करतात. साक्षात देव बनून गावात फिरतात. गावकऱ्यांना आशिर्वाद देतात. दान,धान्य, देणग्या उकळतात आणि पालावर आल्यावर संध्याकाळी हेच देवांची सोंगे घेणारे दारू पितात, मटण खातात, मनसोक्त भांडणे करतात- हा विरोधाभास लेखकाने ‘खलनायक’ या कथेतून मांडला आहे. लेखकाची नजर अशा दुटप्पी वागणाऱ्यांना सोडत नाही.

‘वादळ’ ही अशीच वरवर सभ्य भासणाऱ्या माणसाच्या राक्षसी, विकृत वृत्तीचा बुरखा फाडणारी कथा आहे. वरवर सरळमार्गी दिसणारी व्यक्तीही विकृत असू शकते किंवा बनू शकते. अशा व्यक्तीचा विकृत होण्याचा प्रवास कसा असू शकतो, याचे सविस्तर दर्शन वादळ ही कथा घडविते. साध्या सरळ माणसात झालेल्या अशा बदलामुळे काय खळबळ माजते, कुटुंबाला त्याचा काय त्रास होतो, यातून उद्भवणाऱ्या गमती जमती मुळातून वाचण्यासारख्या आहेत. या प्रकाराने वैतागलेली घरधनीण जशी आपल्या लक्षात राहते, तशी गावरान आंबे विकणारी यशोदाबाईसुद्धा लक्षात राहते. लेखकाला पात्रांची उभारणी चांगलीच जमली आहे. व्यवसायानुरूप वातावरणनिर्मिती, दिलखेचक भाषाशैली, बोलीभाषेची गोडी व सहजता यामुळे ही पात्रे ठसठशीत होतात. कथेला पुढे नेत भारदस्तपणा बहाल करतात. मालन बुढी हीसुद्धा तिच्या चांगुलपणामुळे अशीच लक्षात राहते.

‘स्टीलचा रॉड’, ‘एन्जिओप्लास्टी’ ह्या आणि इतरही मुळातून वाचण्यासारख्या कथा आहेत. एकूणच ‘मांडूळ’ हा कथासंग्रह वाचनीय झाला आहे. मला या खानदेशी कथाकाराचे कौतुक करावेसे वाटते. एक तर त्याने एका अनोळखी, अलक्षित अशा विषयवस्तूंना कथावस्तू बनवण्याचे धाडस दाखवले आहे. पूर्व-खानदेशी तावडी बोलीचा चपखल आविष्कार करणारी, लढणाऱ्या माणसांची ही कथा आहे आणि ती प्रभावी आहे. म्हणूनच कथालेखक कौतुकास पात्र आहे!

मांडूळ (कथासंग्रह)
लेखक - जयवंत बोदडे
अथर्व पब्लिकेशन, जळगाव
पृष्ठे - 108, किंमत - 175 रूपये.

- अशोक कौतिक कोळी, जामनेर
ashokkautikkoli@gmail.com     

Tags: मराठी साहित्य बोलीभाषा ग्रामीण लेखक खानदेश साहित्य संस्कृती परिचय Load More Tags

Add Comment

संबंधित लेख