आनंदाची फुलबाग : मुलांचं भावविश्व समृद्ध करणारी कविता

वीरभद्र मिरेवाड यांच्या बालकवितासंग्रहाचा परिचय

महाराष्ट्रात आज जेवढे काही आघाडीचे उपक्रमशील शिक्षक आहेत, त्यांपैकी वीरभद्र मिरेवाड सर एक आहेत. त्यांचे मन अतिशय संवेदनशील व हृदय मातृप्रेमाने ओथंबलेले आहे. त्या अर्थाने ते पूज्य साने गुरुजींचे वारसदार ठरतात. साने गुरुजी नेहमी म्हणत, ‘करील मनोरंजन जो मुलांचे जडेल नाते प्रभूशी तयाचे!’ मुलांसाठी सतत धडपड करणारे, मुलांच्या भावविश्वाशी सातत्याने समरस होणारे वीरभद्र मिरेवाड हे या वाटेवरील आदर्शवत पथिक ठरतात!

वीरभद्र मिरेवाड हे नाव आता मराठी साहित्यविश्वात चांगलेच रूढ झालेले आहे. सततच्या चिंतनशील वृत्तीने व उपक्रमशील स्वभावाने ते नेहमीच चर्चेत राहतात. संवेदनशील कवी व आदर्श उपक्रमशील शिक्षक अशी त्यांची ओळख आहे. व्यवसायाने प्राथमिक शिक्षक असलेले वीरभद्र मिरेवाड हे सतत मुलांसाठी धडपडत असतात. विविध उपक्रम राबवत असतात. ‘कोरोना काळात मुलांसाठी कविता’ हा त्यांचा विशेष उल्लेखनीय उपक्रम! कोरोनासारख्या वैश्विक महामारीतही ते मुलांसाठी कार्यरत राहीले. या काळात मराठीतील नामवंत साहित्यिकांशी प्रत्यक्ष संवाद साधून त्यांच्या उत्तमोत्तम काव्यरचना मिळवून प्रत्यक्ष त्या त्या कवींच्या आवाजात विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविल्या!

यातून त्यांची मुलांसाठीची बांधिलकी दिसून येते. महाराष्ट्रात आज जेवढे काही आघाडीचे उपक्रमशील शिक्षक आहेत, त्यांपैकी मिरेवाड सर एक आहेत. त्यांचे मन अतिशय संवेदनशील व हृदय मातृप्रेमाने ओथंबलेले आहे. त्या अर्थाने ते पूज्य साने गुरुजींचे वारसदार ठरतात. साने गुरुजी नेहमी म्हणत, ‘करील मनोरंजन जो मुलांचे जडेल नाते प्रभूशी तयाचे!’ मुलांसाठी सतत धडपड करणारे, मुलांच्या भावविश्वाशी सातत्याने समरस होणारे वीरभद्र मिरेवाड हे या वाटेवरील आदर्शवत पथिक ठरतात! स्वतः एक उत्तम वक्ते व निवेदक आहेत. आपल्या रसाळ वाणीने व ओघवत्या निवेदन शैलीमुळे रसिकमान्यतेची मोहर त्यांच्या नावावर उमटलेली आहेच; सोबतच मान्यवर कवी म्हणूनही सुप्रसिद्ध आहेत.

‘माती शाबूत राहावी म्हणून’ या कवितासंग्रहामुळे वीरभद्र मिरेवाड हे नाव सर्वत्र पोहोचले. या संग्रहातून त्यांनी सशक्त व आशयघन कविता दिली. नावीन्यपूर्ण शब्दकळा व घनदाट आशय यामुळे ही कविता सर्वदूर पोहोचली. ग्रामीण कवितेचा एक नवा टप्पा यानिमित्ताने त्यांनी गाठला. या संग्रहामुळे वीरभद्र मिरेवाड यांना प्रसिद्धी मिळाली असली तरी त्यांचा खरा पिंड हा बालसाहित्यिकाचा आहे हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. व्यवसायाने शिक्षक असल्यामुळे त्यांचा संबंध विद्यार्थ्यांशी वारंवार येतो. विद्यार्थ्यांसाठी त्यांची सतत धडपड चालू असते. या धडपडीतूनच त्यांच्या हातून उत्तमोत्तम बालसाहित्याची निर्मिती होते. ‘कोरोना काळात मुलांसाठी कविता’ याच धडपडीतून आल्या. ‘पाखरगाणी’ हा बालकविता संग्रह लक्षवेधक ठरला. या एकूणच यशानंतर त्यांचा ‘आनंदाची फुलबाग’ हा नवा, टवटवीत, ताजा, तजेलदार बालकविता संग्रह प्रसिद्ध झाला आहे.

मराठीतील प्रथितयश प्रकाशन संस्था, जी नेहमीच नाविन्यपूर्ण आशय-विषयाच्या शोधत असते, अशा ‘ग्रंथाली प्रकाशन संस्थे’ने हा नाविन्यपूर्ण, चित्तवेधक संग्रह प्रकाशित केला आहे. हा काव्यसंग्रह इतका देखणा, सर्वांगसुंदर झाला आहे, की पाहताच क्षणी प्रेमात पडावे. ‘आनंदाची फुलबाग’ हे शीर्षकच चित्तवेधक आहे. सहजच बालमन तिकडे आकर्षित होते. काय आहे या फुलबागेत? अशी उत्सुकता ताणली जाते. सोबतच मुखपृष्ठावरील आकर्षक चित्रनगरी व रंगसंगती मनात आनंदलहरी उत्पन्न करतात, ज्या हे पुस्तक हातात घ्यायला भाग पाडतात. एकदा का ही आनंदाची फुलबाग हातात घेतली, की संपूर्ण बागेची सहल पूर्ण केल्यावाचून राहवत नाही. यातच कवी वीरभद्र मिरेवाड यांची शब्दभूल यशस्वी होते. सोबतच चित्रकार संतोष घोंगडे यांनी ज्या आत्मीयतेने ही शब्दबाग फुलवली आहे त्यालाही तोड नाही, म्हणूनच या दोन्ही शब्दप्रभूंचे मी मन:पूर्वक अभिनंदन करतो!

आनंदाच्या फुलबागेची मांडणी तर उत्तम आहेच; पण त्यातील प्रत्येकच शब्दझाड आनंदाने लदबदलेले आहे. प्रत्येक कविता लक्ष वेधून घेते. त्या- त्या शब्दांना जवळ थांबायला भाग पाडते; नव्हे वाचकांचे पाऊल पुढे पडतच नाही. एक एक कविता समजून घेतल्याशिवाय, प्रत्येकच शब्दफुलाचा सुगंध चाखल्याशिवाय पुढे पाऊल पडतच नाही. प्रत्येक फुलात सुगंध ठासून भरला आहे. एवढा, की रसिक वाचक तृप्त झाल्याशिवाय राहत नाही. सुगंधाचे, रसिकतेचे, नमुनेही एवढे की मन बेभान होते; नव्हे मन फुलपाखरू होऊन बागडू लागते. शब्दफुलांची एवढी रंगीबेरंगी नानाविध उधळण क्वचित आढळते. अगदी बालकवींची ‘फुलराणी’ किंवा ‘श्रावणमास’ अनुभवावी किंवा ग.ह.पाटलांची ‘फुलपाखरू’ एवढी तरल, सजग ही शब्दकळा आहे. अलिकडच्या काळात क्वचित आढळणारी नादमयता यात ओतप्रोत भरलेली आहे, म्हणूनही मला ही बालकविता आगळीवेगळी व महत्त्वाची वाटते.


हेही वाचा : खळाळता अवखळ झरा आणि इतर कथा : अनुभवाचा गोष्टीरूप आविष्कार - वीरभद्र मिरेवाड


यातील कविता सहज, सुंदर व विलोभनीय आहेत, आशयघन व नादमधुर आहेत. मुलांचे भावविश्व समृद्ध करणारी विषयाची वैविध्यता आहे. म्हणूनच पारंपरिक बालकवितेपेक्षा ती वेगळी आहे. एकेका विषयाला धरून ती आपल्याला या शब्दबागेची ओळख करून देते. आणि वाचकांच्या मनात कुतुहलाची, आनंदाची पेरणी करत जाते. आनंद तर तिच्या पानापानांत आहे. वाचक झाडाझुडपांत लपतो, पावसात भिजतो, रानवाऱ्याचा सुगंध चाखतो, फुलपाखरांसवे भिरभिरतो… पशुपक्ष्यांची भाषा बोलतो…

बाग माझी, फुलेही माझी
आपणच व्हावे माळी
मध बनवून देण्या जगा
होऊन राहावी पोळी

फुलपाखरू बनण्याची, मधमाशी बनण्याची, रानपाखरू बनण्याची इच्छा येथे पूर्ण होते. कवीच्या शब्दांमध्ये तेवढी ताकद आहे. तो रानाची, शेतशिवाराची, गावपांढरीची, परिचित-अपरिचित जगाची  सहल घडवून आणतो. ज्ञान, मनोरंजन, आनंद, कुतूहल पेरत जातो. ज्ञानाचे महत्त्व सांगताना कवी पुस्तकांकडे घेऊन जातो. आनंदाच्या फुलबागेत या पुस्तकांचेही झाड आहे. या झाडावरील रसाळ ज्ञानफळे आपण सहजच चाखतो. 

मनी ठसावा एकच पुस्तकाचा ध्यास, 
सुंदर होईल जीवन हमखास! 

असे तो खात्रीशीर सांगतो.

ज्ञानाचे भांडार
कवितेचा खजिना
खरोखरच पुस्तक
अप्रतिम दागिना

पुस्तक दागिना आहे, सच्चा मित्र आहे, त्याचे महत्त्व आजही कायम आहे, असे कवी अधोरेखित करतो. पुस्तकाच्या नव्या करकरीत पानातील सुगंधाची तुलना कवी पहिल्या पावसातील मातीच्या सुगंधाशी  करतो. ही नाविन्यपूर्ण शब्दकळा अनोखी ठरते. मातीचा हाच सुगंध या संग़्रहातील पानापानांतून दरवळतो. सुगंधाची ही अनोखी लयलूट येथे आहे. म्हणूनच ही आनंदाची फुलबाग अनोखी ठरते. कवीसोबतच वाचकांचे मन म्हणूनच म्हणते,

शेतशिवारात माझ्या
डोले साखळीचे पाते
मन आनंदी आनंदें
साळुंकी नाचे….

शब्दांच्या या फुलबागेत मनपाखरू मनसोक्त बागडते, हिंडते, कल्पनेच्या भराऱ्या घेते. उंच उंच प्रश्नांचे मनोरे उभे करते. कल्पनेच्या या जगात कुतूहल आहे. थरार आहे. नाविन्याचा ध्यास आहे. सोबतच सर्जनाची पेरणी आहे. या कवितासंग्रहाचे हे महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे की, यातील शब्दकळा मुलांना केवळ आणि केवळ कल्पनेची भूल पाडत नाहीत तर त्यांना सृजनाची भरारी घ्यायला भाग पाडतात. तशा अर्थाने ही कविता सर्जनाची पेरणी करणारी, मुलांच्या पंखात बळ भरणारी आणि मुख्य म्हणजे नवकल्पनांची मांडणी करणारी आहे. कल्पना कणापरी ब्रम्हांडाचा भेद करी! अशी ही भेदकारी कविता आहे. आपल्या नवकल्पनेची मांडणी करताना कवी म्हणतो,

माझे तेज तुला देतो
तुझे तेज मला दे
उजळून टाकीन दाही दिशा
खेळ खेळूया खुल्लमखुल्ला!

अशी ही नवतेजाची, नवचेतनेची, नवचैतन्याची नवी शब्दकळा आहे. तीत भारावलेपण आहे. संस्कारांची रूजवण आहे. पुस्तकांसोबतच ती संगणकाचीसुद्धा महती गाते. संगणकामुळे जग मुठीत आल्याचा आनंद व्यक्त करते. तसेच संगणकामुळे माणूस जवळ आल्याचेही सांगते. ही कविता नवी असली तरी मानव्याची कास धरणारी आहे. माणूसकी, सहृदयता, आत्मियता, ओलावा, जिव्हाळा जपणारी आहे. नात्यांची वीण ती घट्ट वीणते. नात्यांचे महत्त्व जाणते. त्या अर्थाने नात्यांचा परिघ विस्तारणारी ही कविता आहे. या नात्याने पशूपक्षी, प्राणी आणि माणसंही आहेत. सोबतच शिवार, वावर, मातीसुध्दा आहे. मायमातीचं नातं घट्ट करणारी ही कविता आहे. यातील ‘मूळ स्वभाव जाईना’, ‘गंमत’, ‘जादूगार’, ‘घूस’, ‘मदारी’ यांसारख्या कविता मुळातून वाचाव्या अशा आहेत. तर ‘आजी’ ‘माय’, ‘माझे सर’, ‘बाळ’, ‘आजोबा’ या कविता उत्तम व्यक्ती चित्रण करणाऱ्या आहेत. ‘रानपाखरे’, ‘धरती’, ‘हेकळणी’ या नितांतसुंदर रचना आहेत.

शेतशिवारात माझ्या
नाही कशाची कमी
देवा एवढे कर
दे पावसाची हमी

स्वतःसोबतच कवी शेतशिवाराची काळजी व्यक्त करण्याचे भान व्यक्त करतो. मुलांमध्ये प्राण्याविषयी, निसर्गाविषयी दयाभाव उत्पन्न करतो. येथे आपल्याला गाई-वासरं भेटतात. टपोरी कणसं भेटतात. आंबेराईतील शेंदऱ्या-बदामी रंगाचे आंबे भेटतात. खळाळणारे झरे भेटतात. गगनभरारी घेणारे पक्षी भेटतात. पावसाचे टपोरे थेंब भेटतात. या शब्दथेंबात वाचकमन चिंबचिंब भिजत राहतं. शब्दधारांची ही मैफल उत्तरोत्तर रंगत जाते. दाट काळा पाऊस बनून कोसळत राहते. आंतरिक उमाळयातून फुलून आलेली ही फुलबाग अशीच टवटवीत राहावी यासाठी कवीला मन:पूर्वक शुभेच्छा!

आनंदाची फुलबाग (बालकाव्यसंग्रह)
लेखक : वीरभद्र मीरेवाड
प्रकाशक : ग्रंथाली प्रकाशन
प्रथम आवृत्ती: मे 2022
पृष्ठे : 56 किंमत : 125/-

- अशोक कौतिक कोळी, जामनेर
ashokkautikkoli@gmail.com      

Tags: poems child poems marathi literature बालसाहित्य बालवाङ्मय साहित्य Load More Tags

Comments:

Shivaji pitalewad

सर आपल्या काव्य संग्रहाच खूप खूप स्वागत!

Add Comment

संबंधित लेख