वस्ती नंबर अकरा

15 जून - ना. ग. गोरे यांच्या जयंतीनिमित्त...

नारायण गणेश ऊर्फ नानासाहेब गोरे यांची उभ्या महाराष्ट्राला ओळख आहे ती मुख्यतः समाजवादी नेते म्हणून. 15 जून 1907 ते 1 मे 1993 हा त्यांचा कालखंड. आज त्यांची 114 वी जयंती. 1957 ते 62 पुणे लोकसभा मतदार संघातून लोकसभेवर, 1967-68 पुणे शहराचे महापौर, 1970 ते 76 राज्यसभेवर, 1977 ते 79 ब्रिटनमध्ये भारताचे उच्चायुक्त हे त्यांच्या राजकीय कारकिर्दीतील महत्वाचे टप्पे. मात्र 1981 ते 83 या काळात ते साधना साप्ताहिकाचे संपादक होते आणि ललित व वैचारिक स्वरूपाच्या दोन डझन पुस्तकांचे लेखक अशीही त्यांची महत्त्वाची ओळख आहे. त्यांच्या निवडक लेखांचे पुस्तक 'नारायणीय' या नावाने, 1993 मध्ये प्रकाशित झाले, त्याची नवी आवृत्ती दोन दशकांनंतर आज साधना प्रकाशनाकडून आली असून ती विक्रीसाठी उपलब्ध आहे. या पुस्तकातील हा लेख कर्तव्यच्या वाचकांसाठी.  

- संपादक

ट्रामनाक्यापासून समुद्रापर्यंत जाणारा जो नवा राजरस्ता बांधण्यात येत आहे, त्याच्या दुतर्फाची नगररचना अद्यापि पुरी झालेली नाही. रस्त्याच्या एकाच बाजूला विलायती बोटींसारख्या दिसणार्‍या धावत्या रेषांच्या आणि एकाहून एक वरचढ अशा हवेल्या तयार झाल्या आहेत. पण त्यातसुद्धा अधून-मधून बखळी मोकळ्या पडलेल्या आहेतच आणि तिथे पूर्वीच्या रहिवाशांपैकी एखाद-दुसरे कुटुंब चार-दोन माडांच्या पुंजक्यांच्या आश्रयाने रेंगाळत राहिलेले दिसते. बाकी कुठे विटांची रास पडलेली असेल, तर कुठे नुसतीच घाणेरीची किंवा टाकळ्या-आघाड्यांची झाडे उगवलेली असतील. रस्त्याच्या दुसर्‍या बाजूला अजून एकही इमारत उठलेली नाही. रस्त्यापासून आत सुमारे दोन फर्लांगांच्या अंतरावर समुद्राच्या पाण्यात पाय पसरून बसलेली टेकडी एव्हाना जवळजवळ अर्धीअधिक खांदण्यात आलेली असून कसल्या तरी प्रचंड कारखान्याचे खांब, तुळवटे, कैच्या वगैरे अजस्र लोखंडी सामान येऊन पडले आहे. दिवसभर राजरस्त्यापासून टेकडीच्या पायथ्यापर्यंत अजस्र अशा मालमोटारी वाळू, सिमेंट, लोखंडी कांबी इत्यादी माल घेऊन जात असतात आणि तिथली उकरलेली माती व टेकडीच्या पोटातून निघालेला फालतूक मुरूम वाहून आणीत असतात. मालमोटारींच्या या अखंड रहदारीने आणि शेकडो लोकांच्या पायचालीने रस्त्यापासून टेकडीपर्यंत आता एक उकीरपाकीर आणि कच्ची सडकच तयार झालेली आहे. ही कच्ची सडक एका अंगाला, टेकडी दुसर्‍या अंगाला आणि राजमार्ग तिसर्‍या अंगाला- मिळून जो एक जमिनीचा त्रिकोणाकृती धडपा तयार झालेला आहे, तीच वस्ती नंबर अकराची जागा.

ही वस्ती मी प्रथम पाहिली ती ‘समुद्रफेना’च्या तिसर्‍या मजल्यावरील मेघडंबरीतून. त्या दिवशी आकाश स्वच्छ झाले असले तरी, आधी तीन-चार दिवस सतत पाऊस पडून गेला होता आणि एरवी झोकदार दिसणार्‍या इमारतीसुद्धा पारोशा दिसू लागल्या होत्या. त्यामुळे मी पाहिले तेव्हा उकिरड्यावर एखाद्या मळक्या-फाटक्या चिरगुटाचा बोळा फेकून दिलेला असावा, तशी वस्ती दिसत होती. गटाराच्या कडेला पान खाऊन थुंकलेल्या खाकर्‍याप्रमाणे तिचे दर्शन गलिच्छ वाटत होते. तो प्रशस्त नि नितळ राजमार्ग, त्याच्या एका अंगाला दिमाखाने उभी असलेली ती प्रासादमाला, तो गडद निळ्या पाण्याचा उसळता दर्या आणि त्यात ही वस्ती! ‘गेट वे ऑफ इंडिया’जवळच्या पदपथावर आपली फोडाळलेली पाठ उघडी टाकून पालथ्या पडलेल्या कुष्ठरोग्याची मला आठवण झाली आणि शिसारी येऊन तोंडात थुंकी साठली. पण तरीही तिथे माणसांची हालचाल चालली होती. छपरांतून स्वयंपाकाचा धूर निघत होता. पोरे किंचाळत होती. म्हणजे या देशातल्या समाजाचाच तो एक भाग होता; मग तो बहिष्कृत असला म्हणून काय झाले? आपल्या देहाचाच तो एक अवयव होता; मग तो नासलेला असला म्हणून काय झाले? त्याची नुसती शिसारी येऊन काय उपयोग?

रस्ते आखल्यावाचून या वस्तीची मांडणी झालेली आहे, पाया भरल्यावाचून येथील घरे उभी केलेली आहेत आणि विवाहबंधनावाचून इथले संसार चालत आहेत. एक पुरुष, एक स्त्री व तीन-चार पोरे एके दिवशी कुठून तरी येतात, बांधून झालेल्या खुराड्यांच्या रांगा ओलांडून झाल्यावर, सांगितलेल्या तीन सीमांच्या त्रिकोणात जिथे कोठे दीड-दोन वाव लांब व तेवढीच रुंद जागा दिसेल तिथे आपल्याजवळची एखादी फाटकी वाकळ, चिंध्यांचे गाठोडे, मडकी-डबडी व पोरे ठेवतात आणि घर बांधायला सुरुवात होते. बाई घराचे सामान आणायला बाहेर जाते आणि पुरुष जागा साफ करण्याच्या उद्योगाला लागतो. जागा कशीबशी समपातळीत आणून वासे पुरण्यासाठी आठ-दहा खड्डे तयार केले आणि काही वेडेवाकडे वासे, जुने बारदान, चिरगुटे, कंतानाच्या चिरोट्या, गंजून गेलेल्या डब्यांचे पत्रे अशी सामग्री जमली की, घर उभे राहते. टेकडीतल्या मातीचे लिंपण-सारवण केले आणि त्यात तीन दगड मांडले की, संसार सुरू झाला.

खुराड्यांमध्ये जी जागा राहील तो रस्ता, तेच सांडपाणी वाहून नेण्याचे गटार आणि तोच लहान मुलांचा शौचकूप व मोठ्यांची मुत्री! मोठी माणसे तेवढी शौचासाठी टेकडीवर जातात, नाही तर वाळवंटावर जातात. चार-दोन दिवसांनी जेव्हा केव्हा अंघोळ करायची, तेव्हा पुरुष उघड्यावरच दारासमोर स्नान करतात आणि बायका आपापल्या खुराड्याच्या आडोशाला जाऊन नेसूचे सोडून ठेवून दोन प्रहरी अंगावर पाणी घेतात. येथे मुळात लज्जा सांभाळण्यासाठी साधनेच इतकी तुटपुंजी आहेत की, लज्जा हा एक अलंकार म्हणून वापरण्याची कल्पनाही कोणाच्या मनात येत नाही. स्तन, नितंब व लिंग हे जे अवयव आपण अत्यंत गुह्य मानतो, ते इथे इतके परिचित आहेत की- त्यांच्या दर्शनाने येथे विशेष प्रक्षोभ निर्माण होत नाही अथवा त्यांच्या उल्लेखाने कोणाच्या मनावर फारसा खोल ओरखडा उठत नाही.

या वस्तीत येणारी माणसे देशाच्या चार कोपर्‍यांतून यदृच्छया आलेली आहेत, हे वस्तीमध्ये सहज जरी फेरफटका मारला तरी लक्षात येईल. दररोज समुद्राच्या भरतीच्या लाटा या शहराच्या किनार्‍यावर ज्याप्रमाणे शेवाळाचे पुंजके, माशांचे सांगाडे, नारळाच्या कवच्या, लाकडांची फळकुटे, शिंपांचा चूर फेकून देत असतात; त्याचप्रमाणे या शहराकडे आर्थिक ओढीने येणार्‍या मानवांच्या लाटा मनुष्यरूपी फोलकटे मुख्य वस्तीच्या काठाकाठाने आणून टाकीत असतात. येथून दोन फर्लांगांवर असलेल्या सिमिटाच्या चाळीत जा- सकाळी गिरण्यांनी साताचा भोंगा दिला की वारुळातून मुंग्यांची रांग निघावी त्याप्रमाणे बाया व बाप्ये हातात शिदोरीची पुरचुंडी अथवा डबा घेऊन कामावर जाण्यासाठी चाळीच्या पोटातून लगबगीने बाहेर पडत असलेली दिसतील. अकराच्या सुमारास शाळेची घंटा झाली की, शेकडो पोरे पाट्या-दप्तरे सावरीत शाळेकडे धावू लागतील. दादर-गिरगावकडच्या मध्यमवर्गीयांच्या चाळींतून दहा ते साडेदहाच्या दरम्यान बूट-पाटलूण घातलेल्या कारकुनांच्या पलटणीवर पलटणी स्टेशनकडे जात असलेल्या दृष्टीला पडतील; पण वस्ती नंबर अकरामध्ये तशी कोणतीच हालचाल तुम्हाला कोणत्याही वेळी दिसणार नाही. तेथील मुले-माणसे सदैव कामात असतात, असे पाहिजे तर म्हणावे किंवा सदैव मोकळी असतात, असेही पाहिजे तर म्हणावे! या पहिल्या खोपटात गुंटूरकडचा इरण्णा आहे, दुसर्‍यात मेडक (हैदराबाद) कडचा गनी आहे, तिसर्‍यात दावणगिरीकडचा चिनय्या आहे, चौथ्यात खानदेशच्या बाजूचा सुपडू आहे आणि असेच शेवटच्या खुराड्यापर्यंत आहे. पण यांपैकी कोणालाही ‘तू काय करतोस?’ असे विचारले तर, ‘मी अमुक एक धंदा करतो’ असे कोणी सांगणार नाही. जंगलामध्ये वाट चुकावी तशी त्यांची या शहरात वाट चुकलेली आहे आणि ती ते सदैव शोधीत आहेत. त्यांच्या बायका उकिरड्यांतून, बोळांतून, दगडा-मातीतून रेल्वे शेडजवळच्या राखेच्या ढिगांतून, मार्केटच्या आसपास फेकून दिलेल्या साली-देठांतून सदैव काही तरी शोधून काढीत असतात. त्यांची उघडी-नागडी मुले हातात एखादी काटकी किंवा डबडे घेऊन गटारांच्या कडेकडेने डुकरांच्या पिलांसारखी वणवणत असतात, सापडेल ते आपल्या पांढर्‍याशुभ्र दातांनी करंडीत असतात, झिंज्यांतून बोटे घालून आपली माथी कराकरा खाजवीत असतात आणि हे सर्व करून ती कंटाळली म्हणजे रस्त्याच्या कडेलाच जरा सावली पाहून झोपी जातात. जी पोरे जरा मोठी-टणक झालेली आहेत, ती कंपाऊंडवरून चढून स्टेशनात उतरतात आणि तिथे हमाली करतात किंवा नाक्यावर उभे राहून गरजू लोकांना टॅक्सी बोलावून देतात किंवा कचर्‍याच्या ढिगातून धड कागद धुंडाळून काढतात आणि मग ते भेळवाल्याला विकतात. 

पण इरण्णा, गनी, चिनय्या, सुपडू, इटोबा यांचे पोट कसे भरते? नुसते उकिरडे धुंडाळून किंवा भीक मागून तर खास नव्हे. या वस्तीतील बायका-माणसे कधी गवंड्या-सुतारांच्या हाताखाली तर कधी सरकारी गुदामात, कधी कचराडेपोत तर कधी विटांच्या भट्टीवर अशी हमाली कामे करतात. पण ती कामे हंगामी म्हणून उघड कामांच्या जोडीला त्यांना इतरही कामे करावी लागतात. उदाहरणार्थ- गनीला ज्याप्रमाणे मोटारींची ठाकठूक करण्यापुरती माहिती आहे. त्याचप्रमाणे पत्त्यावरच्या जुगारातही त्याचा हात बरा चालतो. म्हणून मोटारींचे कष्टाचे आणि मळकट काम करण्याच्या भानगडीत फारसे न पडता, तो आता एखादा सुरक्षित कोपरा पाहतो आणि तिथे पत्ते पिसू लागतो. चपळ आणि काळ्या कुळकुळीत शरीराचा इरण्णा रात्री जो कोठे नाहीसा होतो, तो सकाळी आठ-नऊच्या सुमाराला पाचाची नोट कमरेला लावून येतो. लोकांना ठाऊक आहे की, तो दारू गाळण्याच्या कामात मोठा तरबेज आहे. चिनय्या हा मल्लेनाडच्या जंगलातील रानरेड्यासारखा आडव्या अंगाचा आणि झापडलेल्या डोळ्यांचा रगेल आदमी आहेे. तो दिवसभर आपल्या घरात एक रकटे पसरून खुशाल घोरत पडलेला असतो. त्याची ‘अव्वा’ तीन-त्रिकाळ चहा उकळते, त्यात मूठभर साखर घालते आणि आपल्या पोरांना अधून-मधून खारका नि खोबरे देते. त्यामुळे रेल्वेच्या वाघिणी फोडण्याशी चिनय्याचा बराच दाट संबंध असावा, असे मानण्यास जागा आहे. पण नक्की कोण कसे सांगू शकणार?

श्रीमंतांच्या दुसर्‍या किंवा तिसर्‍या पिढीत आपणाला असे आढळून येते की, पुरुषाच्या तोंडावर एक प्रकारचा मेंगेपणाचा तवंग पसरू लागतो आणि दृष्टीमध्ये वेडगळपणाची झाक मारू लागते. कमालीच्या निर्धास्त सुखाचा हा शारीरिक परिणाम होय. याच्या उलट, या वस्तीतल्या पुरुषांकडे पाहिलं तर त्यांच्या शारीरिक हालचाली आणि त्यांची नजर यांच्यामध्ये रानमांजरांच्या सावधगिरीसारखी सावधगिरी व चपळाईसारखी एक प्रकारची चमत्कारिक चपळाई दिसून येई. आजूबाजूच्या जगावर त्यांचा मुळीच विश्‍वास नसतो आणि आपल्यावर या जगाचा विश्‍वास नाही, हे त्यांना ठाऊक असते. कष्ट करणारे आणि कमावणारे, गट करणारे आणि झगडणारे, प्रेम करणारे आणि वैर करणारे, आनंद करणारे आणि शोक करणारे जे जग आपल्या सभोवार पसरले आहे- त्याच्याशी आपले जीवन कोणत्याही धाग्यांनी जोडलेले नाही, हीच जाणीव त्यांच्या मनात सर्व काळी वसत असते. भोवतालच्या समाजावर झडप घालून हवे ते आपण हस्तगत करावयाचे आहे आणि समाजाच्या झडपेपासून स्वत:चा बचाव करायचा आहे- या एकाच वेळी आक्रमक व रक्षणात्मक पद्धतीचा ठसा त्यांच्या व्यवहारावर उमटलेला दिसेल; परंतु जगाशी जोडणारा धागा तर राहोच, पण तेवढ्या त्या वस्तीतल्या माणसांना एकत्र जोडणारा धागा कोठे तरी आढळतो काय? माळावर घट्ट जमीन पाहून आपली पाले ताणणार्‍या आणि जिथे कुठे वस्ती पडेल तिथे आपली निशाणी रोवून व देव मांडून राहणार्‍या वडारांशी अथवा वैदूंशी तरी या वस्तीतल्या समाजाची तुलना होऊ शकेल काय? नाही. कारण तेथील रहिवाशांना ना जातगंगा, ना निशाण, ना देव-दैवते. येथील सारे जीवन विखुरलेले आहे. अस्थिरता, संकीर्णता आणि विफलता यांनी भरलेले, किडलेले, कुजलेले आहे.

अशा ठिकाणी कसली परंपरा? कोठली संस्कृती? कशाचे इमान? या भरड जमिनीत जगणारी ही रोपटीच नव्हेत. त्यामुळे येथून पन्नास कदमांवर असलेल्या दमेकरी झिप्रूच्या मुलांच्या गालफडाची हाडे चिनय्याच्या गालफडाच्या हाडांसारखीच वर आलेली आणि त्यांचे डोळे चिनय्याच्या डोळ्यांपुढे झापडलेले दिसले, तर त्यात चमकून जाण्यासारखे आपण काही मानू नये किंवा इराण्णाच्या मुलीचे केस पिंगट आणि डोळे घार्‍या रंगावर कसे गेले, याचे आश्‍चर्यही करू नये. कारण या वर्णसंकराचे कोणाला आश्‍चर्य वाटले, तर त्याने झिप्रूच्या अथवा इरण्णाच्या घरवालीकडे पाहावे आणि फाटक्या चोळ्यांमध्ये कशाबशा सामावून घेतलेल्या त्यांच्या स्तनांप्रमाणेच त्यांच्या विषयवासनाही येथील कौटुंबिक संकेतांच्या फाटक्या चिंध्यांत सामावून राहण्यासारख्या नाहीत, असा विचार करावा. वस्तीतील ज्या बायका वर्णाने जरा उजळ आहेत, चणीने जरा थोराड आहेत, मनाने धिटुकल्या आहेत; त्यांना हवे तेवढे गिर्‍हाईक आहे. घराची मुळीच ओढ नसेल, तर त्या वस्तीतून अजिबात निघूनच जातात; जर काही ओढ असेल, तर रक्तात रक्ताची सारखी भेसळ होत राहते आणि यांपैकी कशाचाच कोणी येथे विषाद मानीत नाही.

या वस्तीतल्या समाजातील माणसे आज येथे दिसत आहेत, म्हणून ती उद्या येथेच असतील, असे मुळीच नाही. उद्या ही वस्तीच्या वस्तीच उठवली जाईल किंवा सरकारचे पोलीस येऊन एकदम पाच-पंचवीस जणांना पकडून नेतील किंवा चार-दोन कुटुंबे मुंबईहून मद्रासकडे जाताना मधेच बिनतिकिटाचे प्रवासी म्हणून त्यांना तुरुंगात पोचवतील. असे प्रसंग आले म्हणजे नवर्‍यांपासून बायका व आयांपासून मुले वेगळी फेकली जातात आणि ताटातूट झालेली माणसे रडून-भेकून काही काळ गेल्यावर दुसर्‍या कोठल्या तरी शहराच्या कडेला वस्ती करून राहिलेल्या अशाच प्रकारच्या मानवी समुदायाशी एकरूप होतात.

भाषा हे मानवसमाजाला एकत्र सांधण्याचे एक फार प्रबळ साधन आहे, परंतु हे साधनही अशा वस्त्यांमधून नसते. तिथल्या अठरापगड लोकांची व्यवहारातील भाषा म्हणजे एक अत्यंत क्षीण, कुरचूक, निर्धन अशी बोली असते. तिच्याद्वारा सूक्ष्म विचारांचे संक्रमण अथवा जतन होणेच अशक्य. अर्थात हे साधनच नष्ट झाले, म्हणजे पुढे सूक्ष्म अथवा व्यापक विचार मनात उपजणेच बंद पडते. आपण भाषेला विचारांचे वाहन मानतो; पण भाषा ही विचारांची जननी असते, हेही खरे नाही काय? विचारविनिमयाचे व विचाररक्षणाचे हे साधनच जिथे उपलब्ध नाही, तिथे समाजातल्या कोणत्याही एकरसात्मक भागात आढळणार्‍या, गाणी-उखाणे-म्हणी-कथा इत्यादी गोष्टी आढळून येऊ नयेत, हे साहजिकच होय. त्यांमुळे हा समाज हळूहळू परंपराशून्य आणि संस्कृतिशून्य बनत जातो. त्याच्यापायी मानबिंदू नावाची चीजच उरत नाही आणि माणूसपणाचे जे काही शांत तेज असते, ते त्यांच्या नजरेमधून कायमचे मालवले जाते.

देशामधील बहुतेक औद्योगिक शहरांच्या अंगांवर अशा प्रकारच्या वस्त्यांची खटे पडलेली आहेत. दुर्गंधीचे हे जानोसे, बीभत्स जीवनाची ही माहेरे म्हणजे आधुनिक नागर समाजाची जणू अंतर्मने होत. अन्तर्मनातला हरएक संघर्ष, त्यातल्या विवस्त्र वासना, त्यातला चिखल या वस्त्यांत भरलेला आहे. जातिविभक्त समाजव्यवस्थेने हिंदुस्थानात महार-मांग आणि आदिवासी समाज निर्माण केले; पण आजचा अर्थविभक्त समाज अस्पृश्य व आदिवासी समाजाहूनही महाभयानक असा हा व्रात्य समाज निर्माण करीत आहे. हा समाज म्हणजे कबंध आहे त्याला शिरही नाही आणि हृदयही नाही. औद्योगिक नगराची वाढ करीत असता, औद्योगिक साधनांमुळे समाजावर आघात होऊन त्याचा जो चुरा होत जातो, त्या चुर्‍याचे करायचे काय- हा विचार आतापर्यंत आम्ही ज्याप्रमाणे दुर्लक्षित करीत आलो त्याप्रमाणे पुढेही होत राहणार असेल, तर या संस्कृतिहीन व्रात्य वस्त्या वाढतच जातील. साखर कारखान्यातल्या चरकात उसाच्या मोळ्या जाऊन पडू लागल्या म्हणजे तो उसाचा रस निघतो. त्याचे झपाट्याने पृथक्करण सुरू होते अन् एकीकडून रवेदार, पांढर्‍याफेक साखरेचे एकसाची स्फटिक बाहेेर येत राहतात आणि दुसरीकडून काळाकुट्ट, बरबरीत व दर्पयुक्त असा मळीचा प्रवाह सुरू होतो. साखरेच्या दाण्यांत जीवनांश उतरतो आणि मळीमध्ये गदळ उतरते. वस्ती नंबर अकरासारख्या वस्त्या म्हणजे आजच्या समाजजीवनातील मळी आहे. हे सगळीकडे माजत चाललेले मळीचे डोह पाहिले म्हणजे मनाला घृणा वाटते, कीव वाटते आणि लाजही वाटते.

- ना. ग. गोरे 


नारायणीय - निवडक ना. ग. गोरे हे पुस्तक खरेदी करण्यासाठी इथे क्लिक करा 


हा लेखही वाचा : कारागृहाच्या भिंती - ना. ग. गोरे

Tags: ना ग गोरे नारायणीय लेख साधना प्रकाशन N G Gore Narayaniya Book Load More Tags

Comments:

Anjani Kher

समाजशास्त्रज्ञाच्या तीक्ष्ण नजरेने केलेले वर्णन आणि विश्लेषण अस्वस्थ करते. मेश्राम आणि प्रगती पाटील यांनीही तेवढ्याच धारदार नजरेने पहिले आहे. त्यांचेही कौतुक वाटले.

प्रगती पाटील

लेख वाचताना रक्ताची भेसळ हे शब्द मलाही अनुचित वाटले. भेसळ ऐवजी सरमिसळ हा शब्द अधिक समर्पक ठरला असता. मात्र संपूर्ण लेख समाजातील वास्तविकतेचे दर्शन घडवून मनास अस्वस्थ करतो हे नक्की.

संजय मेश्राम

रक्तात रक्ताची भेसळ? दोन माणसांचे रक्त एकत्र आले तर ती भेसळ होते? म्हणजे रुग्णालयात गरजू रुग्णाला जे रक्त दिलं जातं, ती सुद्धा भेसळच म्हणणार?

Anup Priolkar

Article disturb emotional feelings. Poverty is the main root of this life journey.

Add Comment