घराघरातलं पालकत्वाचं वास्तव अधोरेखित करणारं पुस्तक

फारूक एस. काझी यांच्या 'शहाण्या बाबाची कहाणी' या पुस्तकाला लिहिलेली प्रस्तावना

आदर्श पालकत्व कसं असावं, यापेक्षा घराघरातलं वास्तव काय असतं हे त्यांनी यात मांडलं आहे. हे सर्व बाबाच्या नजरेतून लिहिलं आहे, याला मराठी साहित्याच्या दृष्टीने अनन्यसाधारण महत्त्व आहे. कारण आपल्याकडे ‘बाबा काम करतो’ हे ठसवलं गेलं आहे. पण बाबा मुलांकडे बघतो, त्यांना सांभाळतो, एवढंच नाही तर त्यांच्याविषयी लिहितो, हे अप्रूप आजही आहेच.

फारूक एस. काझी हे बालसाहित्यातलं ठळक नाव. त्यांनी लिहिलेल्या, अनुवाद केलेल्या अनेक गोष्टी आपण वाचल्या असतील. लोकसत्ता, लोकमत, सकाळ, नवशक्ति, इत्यादी वर्तमानपत्रं तसेच पिकू, किशोर, वयम, ऋग्वेद, मुलांचे मासिक अशा अनेक मासिकांतून त्यांचं साहित्य प्रकाशित झालेलं आहे. याशिवाय त्यांनी फेसबुकवर लिहिलेली मुलांविषयीची निरीक्षणंही खूप छान असतात.

आता हरिती प्रकाशनातर्फे त्यांचं नवं पुस्तक ‘शहाण्या बाबाची कहाणी’ प्रकाशित होत आहे. या पुस्तकाबद्दल सर्वप्रथम खूप खूप शुभेच्छा!

फारूक काझी हे मुळात एक शिक्षक आहेत. कायमच त्यांचा वावर मुलांबरोबर असतो. इथे अब्बू या नात्याने अलफाजचं वर्णन खूपदा आलं आहे. मुलं खट्याळ असतात, स्वतःच्या मनाचं खरं करण्यात पटाईत असतात, पण ती फार समजूतदारही असतात. त्यांच्यात कुतूहल काठोकाठ भरलेलं असतं. हे निसर्गापासून ते मोठ्यांच्या वागण्यापर्यंत सर्वच बाबतीत असतं. कुतूहल, मुलांचं हसणं, रुसणं, शिकणं, शिकायला सरळ नाही म्हणणं, अगदी अनपेक्षित क्षणी मुलांनी बौद्धिक झलक दाखवणं आणि ती यांना जाणवणं, समजणं, अभ्यास नाही म्हणणाऱ्या मुलांनी अचानक कलेच्या प्रांतात उतरून किंवा सहज खेळता खेळता अभ्यासातल्या गोष्टी म्हणून दाखवणं या गोष्टी फारूक काझी यांनी फार सहजतेने टिपल्या आहेत. मुलांच्या मनातल्या अशा गोष्टी टिपणं हे त्यांच्या स्वभावाचं वैशिष्ट्य. कारण अशा गोष्टींचे काही खास सुवर्णक्षण असतात. ते त्याच क्षणी टिपावे लागतात. लक्षात घ्यावे लागतात. तसे ते लक्षात नाही घेतले तर 

‘देखो इन्हें ये हैं ओस की बूंदे 
पत्तों की गोद में आसमां से कूदे 
अंगडाई ले फिर करवट बदल कर 
नाजूक से मोती हंस दें फिसल कर 
खो ना जायें, ये तारें जमीं पर’ 

या प्रसून जोशी यांच्या कवितेतील ओळींतील ताऱ्यांसारखे जमिनीवर हरवून जाण्याची शक्यता फार असते. हे क्षण मौल्यवान असतात. एखादंच वाक्य, एखादाच शब्द किंवा एखादंच हास्य त्या क्षणांना अमरत्व बहाल करतं. असे कित्येक क्षण फारूक काझी यांनी या पुस्तकात जागोजागी लिहिले आहेत..

फारूक एस. काझी

पुस्तकातील प्रकरणांकडे नजर टाकली तर, ‘चांद को क्या हुया’ हे प्रकरण एखाद्या कवितेसारखं आहे. असे सगळे सुवर्णक्षण त्यात लिहिलेत. रात्री न झोपणाऱ्या बाळाचं काय करायचं हा प्रश्न खूप जणांकडे असतो, पण इथे पालकत्व शांत आणि सहनशील व्हायला लागलं असं ‘थांब, येऊ दे त्यांना, सांगतेच नाव!’ या प्रकरणात लेखकांनी म्हटलं आहे.

‘होमवर्कची फवारणी’ यासारख्या लेखात मुलांचं बालपण अभ्यासाच्या ओझ्याखाली हरवून बसण्याची शक्यता ते व्यक्त करतात. मुलांना मार न देता त्यांना समजून घेतलं तर गोष्टी सोप्या होतात, हे त्यांचं निरीक्षण कृतीतून आलेलं आहे. अम्मी अब्बू यांच्याइतकेच मुलांसाठी दादा-दादी, नाना-नानीही महत्त्वाचे असतात, ते त्यांची श्रीमंती वाढवतात हे वाक्य किती खरंय! ‘तू सुंदर आहेस’ हे प्रकरण तर सर्वांनी वाचावं आणि त्यातून खूप काही शिकावं असंच आहे. ‘फक्त पालक, मालक नव्हे’ यातून मुलं आपल्याकडे कसं बघतात, आपलं कसं निरीक्षण करत असतात, हे उदाहरणातून लिहिलं आहे. ‘अब्बू तुम्हारी आवाज लई बढने लगीय जी, तुमे खतरनाक खलनायक हैं’ हे अलफाज म्हणजेच फारूक काझी यांच्या बिट्टूचं वाक्य फक्त त्यांनाच नाही, तर आपल्या सर्वांनाही खूप काही सांगून जाणार आहे. अलफाजला जेव्हा गजल नावाची बहीण झाली तेव्हा ‘भावंडात मैत्री कोणी करवायची?’ हे प्रकरणही छान झालं आहे.

मुखपृष्ठ : अन्वर हुसेन | ब्लर्ब : बालाजी मदन इंगळे

पुस्तकाचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे पुस्तकाची भाषा. कोणालाही सहज समजेल अशी सोपी आणि (शिक्षक असल्यामुळे की काय) गुंतवून ठेवणारी भाषा या पुस्तकात वाचायला मिळते. या भाषेत दखनी ह्या संवाद भाषेचा वापर आला आहे. त्यामुळे भाषेचा गोडवा वाढतो. ते वाचायला छान वाटते.

एकूणात या लेखमालेतील सर्व लेख म्हणजे पुस्तकाची सर्वच प्रकरणं एकदा नव्हे; तर पुन्हा पुन्हा वाचण्यासारखी आहेत. पालक-शिक्षक- लेखक आणि मुलांच्या वर्तनाचा अभ्यासक या सर्वच भूमिका पुस्तकातील प्रत्येक प्रकरणात जाणवतात आणि आपल्याला एक नवीन दृष्टिकोन देऊन जातात..

सर्वांत महत्त्वाचं म्हणजे आदर्श पालकत्व कसं असावं, यापेक्षा घराघरातलं वास्तव काय असतं हे त्यांनी यात मांडलं आहे. हे सर्व बाबाच्या नजरेतून लिहिलं आहे, याला मराठी साहित्याच्या दृष्टीने अनन्यसाधारण महत्त्व आहे. कारण आपल्याकडे ‘बाबा काम करतो’ हे ठसवलं गेलं आहे. पण बाबा मुलांकडे बघतो, त्यांना सांभाळतो, एवढंच नाही तर त्यांच्याविषयी लिहितो, हे अप्रूप आजही आहेच. त्यादृष्टीने बघितलं तर असं एक पुस्तक मराठी भाषेत हवंच होतं, असं म्हणावं लागेल.

शहाण्या बाबाची कहाणी
लेखक : फारूक एस. काझी
हरिती प्रकाशन, पुणे
मूल्य : रुपये 150/-, पाने : 80
संपर्क: सृजन बुक्स, पुणे
बसवंत 8956080218

- डॉ. श्रुती पानसे
shruti.akrodcourses@gmail.com 
(लेखिका, मेंदू आणि शिक्षण अभ्यासक/समुपदेशक म्हणून कार्यरत असून वृत्तपत्रांमध्ये स्तंभलेखनही करतात.)


साधना साप्ताहिकाचा बालकुमार दिवाळी अंक आजच खरेदी करा.

 

Tags: बालसाहित्य मुलांसाठीची पुस्तके पुस्तक परिचय हरिती प्रकाशन श्रुती पानसे मराठी shruti panse literature faruk s kazi marathi books for children Load More Tags

Comments:

Shri. Kiran Hindurao Patil

अभिनंदन. अभ्यासपूर्ण व उदभोदक लेख आहेत.

Add Comment

संबंधित लेख