'गांधी खुर्द आणि बुद्रुक'ची प्रस्तावना (संपादित अंश)

'गांधींविषयी' या ग्रंथाचे तीन खंड 25 जानेवारी 2022 पासून उपलब्ध झाले आहेत.

सेवाग्राम कलेक्टिव्ह आणि साधना प्रकाशन यांचा संयुक्त प्रकल्प असलेल्या 'गांधींविषयी' या ग्रंथाचे तीन खंड 25 जानेवारी 2022 पासून उपलब्ध झाले आहेत. या तीन खंडांमध्ये मिळून 76 लेख आहेत, ते साधना, नवभारत, समाजप्रबोधन पत्रिका, गांधीमार्ग इत्यादी नियतकालिकांतून प्रसिद्ध झालेले आहेत किंवा वेगवेगळ्या पुस्तकांतून घेतलेले आहेत. 1915 ते 2015 या शंभर वर्षांत लिहिले गेलेले हे लेख 43 लेखकांचे आहेत (अर्थातच काहींचे लेख एकापेक्षा अधिक आहेत).गेल्या शंभर वर्षांतील मराठी भाषेमधील गांधींविषयक गंभीर वैचारिक साहित्यातून आजच्या काळाच्या संदर्भात महत्त्वाचे ठरणारे लेख या प्रकल्पासाठी निवडले आहेत. हे अतिशय महत्त्वाचे आणि भावी काळाचा वेध घेणारे चिंतन आहे. समाजाविषयी आस्था बाळगणाऱ्या सर्वांसाठी पुढील काही दशके उपयुक्त ठरू शकेल असा हा त्रिखंडात्मक ग्रंथरूपी खजिना आहे. त्यातल्या तिसऱ्या खंडाचे (गांधी खुर्द आणि बुद्रुक) संपादन रमेश ओझा यांनी केले आहे. प्रस्तुत खंडाला त्यांनी लिहिलेल्या प्रस्तावनेचा संपादित अंश प्रसिद्ध करतो आहोत.

गांधीजींचा भारतातील सार्वजनिक जीवनात प्रवेश झाल्यापासून आजपर्यंत मराठीत गांधीजींविषयी बरेच काही लिहिले गेले आहे. त्यातील चिरंतन मूल्य असणारे लेख निवडून आम्ही त्यांची यादी बनविली. तेव्हा आमच्या लक्षात आले की या सर्वांचे किमान तीन खंड होतील. विषयवार तसे खंड बनविण्याचे ठरल्यावर या तीनही खंडांची प्रस्तावना वेगवेगळ्या व्यक्तींनी लिहावी असे ठरले. पहिल्या खंडाची प्रस्तावना श्री. किशोर बेडकीहाळ यांनी लिहावी, दुसऱ्या खंडाची प्रस्तावना श्री. अशोक चौसाळकर यांनी लिहावी आणि तिसऱ्या संकीर्ण खंडाच्या प्रस्तावनेसाठी बेडकीहाळ यांनी महाराष्ट्रातील एका विद्वानांचे नाव सुचविले. तेव्हा माझा मित्र विजय तांबे याने आग्रह केला की, तिसऱ्या खंडाची प्रस्तावना मी लिहावी.

मराठी माझी मातृभाषा नाही आणि सामान्यत: मी माझ्या मातृभाषेशिवाय दुसऱ्या भाषेत लिहीत नाही. दुसऱ्या भाषेत लिहिण्याचा मला सराव नाही. आणि माझ्या लिखाणाला मातृभाषेत जी धार येते ती अन्य भाषेत येऊ शकत नाही. पुष्कळ वेळा मला दुसऱ्या भाषेत लिहिण्याचे निमंत्रण मिळाले आहे पण प्रत्येक वेळी मी नाही म्हटले. मात्र या वेळी जेव्हा विजयने माझे नाव सुचवले तेव्हा मी त्याला नकार देऊ शकलो नाही. मनात एक-दोन विचार आले. पण मी गप्प राहिलो. त्या वेळी मी विचार केला की, मी किमान प्रस्तावना लिहिण्याचा प्रयत्न तरी करायला हवा. कारण ह्या सर्व प्रक्रियेत माझे काही उत्तरदायित्व आहे.

या खंडाला ‘संकीर्ण’ नाव देण्यात आले आहे. गुजराथी भाषेत, ज्यात कुठलाही केंद्रीय विषय नाही अशा मिश्र लेखांच्या स्वरूपाला ‘प्रकीर्ण’ म्हटले जाते (गुजराथीत संकीर्ण म्हणजे संकुचित). तसे तर गांधीजींच्या जीवनात कुठलीच गोष्ट संकीर्ण नव्हती. बकरीला चारा टाकणे हीपण तितकीच गंभीर बाब होती जितके स्वराज मिळवणे. महाराष्ट्रात एकाच गावाला खुर्द व बुद्रुक म्हणण्याची पद्धत आहे, उदा. गागोदे खुर्द व गागोदे ब्रुद्रुक. गांधीजींच्या बाबतीत ही फूटपट्टी लावता येत नाही आणि म्हणायचेच असेल तर असे म्हणू शकता की, गांधी खुर्दने गांधी ब्रुद्रुक घडविला.

व्यक्ती म्हणून मी खुर्द गांधीत अधिक रस घेतो. गांधीजींचे दक्षिण आफ्रिकेतील सहकारी हेन्री पोलॉक यांची पत्नी मली पोलॉक तिच्या आठवणीत लिहिते, ‘गांधीजींची श्रवणशक्ती अदभुत होती. गांधीजी जेव्हा ऐकत, तेव्हा बोलणाऱ्याच्या डोळ्यांत असे पाहत आणि तितक्याच एकाग्रतेने ऐकत की जणू तुम्हाला वाटावे की तुमच्या शिवाय व तुम्ही जे सांगताय त्याशिवाय जगात महत्त्वाचे काहीच नाही.’ त्यांच्या या गुणामुळे गांधीजी, बोलणाऱ्याने हुशारीने लपविलेले किंवा आपल्या मर्यादेमुळे न सांगितलेले, ते समजू शकत. गांधीजींना ‘चतुर बनिया’ बनविण्यात त्यांच्या या श्रवणशैलीचा मोठा भाग होता. तसेच कुणाला असे वाटता नये की आपले त्याच्याकडे लक्ष नाही, हा त्याचा अपमान आहे, हा नीतीपाठही होता.

या तिसऱ्या खंडात जे लेख घेण्यात आले आहेत ते संकीर्ण आहेत. पण किरकोळ नक्कीच नाहीत. 'गांधीजी आणि भाषा' ही चर्चाही तितकीच महत्त्वाची, जितकी 'गांधीजी आणि मार्क्सवाद'. या खंडात एकूण 22 लेखांचा समावेश केला आहे.

श्री. सुरेश द्वादशीवार यांनी गांधीजी आणि त्यांचे गूढ नामक लेखात गांधींचे गूढ रहस्य शोधण्याचा प्रयत्न केला आहे. जो माणूस पहिल्या नजरेत अव्यवहारी, आदर्शवादी, भोळसट वाटत होता, त्याच्याविषयी, ‘जशास तसे’ वागणारे परम व्यवहारी लोकमान्य टिळक स्वत:च्या अनुयायांना सांगून गेले की, यापुढे भारताचे नेतृत्व हे गांधी करतील. लोकमान्यांना कळले होते की, हा माणूस अव्यवहारी नसून राजकारणाला नवी दिशा देऊ इच्छिणारा एक प्रयोगवीर आहे.

श्री. पन्नालाल सुराणा यांचे 'गांधीजी व जातिव्यवस्था' या विषयाची चर्चा करणारे दोन लेख या ग्रंथात समाविष्ट करण्यात आले आहेत. गोलमेज परिषद हा इंग्रजांचा खेळ आहे, हे गांधीजी ओळखून होते. म्हणून तर पहिल्या गोलमेज परिषदेत त्यांनी भाग घेतला नव्हता. गांधीजी जाणून होते की सरकार गोलमेज परिषदेचा उपयोग, ‘भारतीय भांडी आपसात कशी आवाज करतात पहा’ हे जगाला दाखवून देण्यासाठी करणार आहे. भारताला डोमिनियन स्टेटचा दर्जा मिळेल व गोलमेज परिषदेतून त्याचा मार्ग निघेल अशा व्हाईसरॉय लॉर्ड आयर्विनच्या तोंडी आश्वासनावर विश्वास ठेवून विविध पक्ष, समाज आणि विचार ह्यांचे प्रतिनिधित्व करणारे लोक तेथे गेले होते. गांधीजींना परिषदेच्या फलश्रुतीबद्दल फार विश्वास नव्हता, काँग्रेसच्या लोकांना अधिक होता. गांधींची चतुराई बघा. सरकार गोलमेज परिषदेचा उपयोग भारतीय नेत्यांमधील मतभेद उघड करण्यासाठी करू इच्छित होते तर गांधीजींनी लंडनभेटीचा उपयोग शोषित प्रजेचे प्रतिनिधी म्हणून शोषक व्यवस्था, संस्थानवाद, विकासाच्या नावाने विकसित केलेली भुलवणारी सभ्यता यांचा उहापोह करण्यासाठी व लोकांच्या मूलभूत अधिकारांना समर्थन मिळविण्यासाठी केला. परिषदेच्या सभागृहात गांधीजींना थेट हिंदूंचे प्रतिनिधी म्हणून दाखवण्याचे काम चालू होते तर बाहेर रस्त्यावर गांधीजींना मानवाचा; त्यातही अंतिम जनाचा आवाज या रूपात पाहिले जात होते. परिषदेत गांधीजींना खलनायक म्हणून पाहिले जात होते तर परिषदेच्या बाहेर त्यांना देवदूत समजले जात होते.

पन्नालाल सुराणांनी एका जागी असे सूचित केले आहे की, 'गांधीजींना एका वेळेस असे वाटत होते की वर्णव्यवस्था अपरिग्रहाच्या सिद्धांताची पुष्टी करण्यास उपयोगी ठरू शकेल.' मला असे वाटते की, गांधीजींमधील परिवर्तनशीलता सनातनी हिंदू जितकी समजून घेऊ शकले तितकी ती समतावादी ओळखू शकले नाहीत. हिंदू, हिंदुत्व, सांप्रदायिकता, बहुसंख्यांकांचा राष्ट्रवाद, हिंदू-मुस्लिम प्रश्न आणि सांप्रदायिक एकता याबाबतही हेच झालेले आहे. सेक्युलर हिंदूंपेक्षा हिंदुत्ववादी हिंदूंनी गांधीजींना अधिक ओळखले आहे. त्यांना कळले होते की गांधीजी सेक्युलर व बहुविध (प्लुरल) भारताचे खंदे पुरस्कर्ते आहेत. म्हणूनच अशा भारताच्या शिल्पकारावर (आर्किटेक्टवर) सतत हल्ले अजूनही करण्यात येत आहेत.

प्रा. फक्रुद्दीन बेन्नुर यांनी ‘गांधीजींची धर्म, वर्ण, जाती आणि अस्पृश्यता- यावरील इतिहासशास्त्रीय चिकित्सा’ असा एक विशाल कॅनव्हास घेऊन लेख लिहिला आहे. गांधीजींबाबतचे गैरसमज मुख्यत: त्यांच्या धर्मविषयक भूमिकेमुळे झाले आहेत. ते अहिंसक समाजरचनेसाठी आवश्यकतेनुसार धर्माचा उपयोग करतात. स्वत:च्या पद्धतीने धर्मवचनांचा अर्थ लावतात, धर्मसमन्वय करतात, धर्मातील रूढ वा प्रस्थापित अर्थांची आणि आदेशांची उपेक्षा करतात, जरूर पडली तर त्यांना विरोधही करतात. धर्मविचार हाताळतांना गांधीजी यशस्वी झालेत की पराजित हा एका स्वतंत्र अभ्यासाचा विषय आहे. प्रा. बेन्नुर यांनी या बाबतीत काही दिशादिग्दर्शन केल्याचे आढळते.

नलिनी पंडित त्यांच्या चिकित्सक अभिप्रायांविषयी विख्यात आहेत. ‘महात्मा गांधी : राजकारण व तत्त्वज्ञान’ या लेखात नलिनीताई म्हणतात की, गांधीजी बाह्य अर्थाने धार्मिक असले तरी त्यांच्या काळातील पुरोगामी सुधारकांपेक्षा अधिक प्रगतीशील होते. लेखिका म्हणते की, स्वत:चे म्हणणे लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी आणि त्यांना परिवर्तनासाठी तयार करण्याकरिता कर्मशील गांधीजींनी विचारांची सूक्ष्मता आणि सातत्य याकडे कमी लक्ष दिले हे आपण समजू शकतो, पण गांधीवादी विचारकांनीही याकरिता फारसे कष्ट घेतल्याचे दिसत नाही. त्यांनी गांधीवादी राष्ट्रवाद अधिक विकसित करायला हवा होता.

प्रा.मधु दंडवते यांचा ‘भारतीय समाजवादावरील गांधीजींचा प्रभाव’ हा लेख या ग्रंथात समाविष्ट केलेला आहे. जेव्हा समाजवाद्यांना ते गांधीवादी-समाजवादी भारताची रचना करू शकतील असा विश्वास होता त्यावेळी, म्हणजे 1959मध्ये हा लेख साधना साप्ताहिकात लिहिला होता. गांधीजींनीही आपल्या शेवटच्या वर्षांत समाजवाद्यांकडून अशी अपेक्षा ठेवली होती. लेखक म्हणतो, ‘गांधीजींच्या विचारधारेमधील मानवतावादी दृष्टी व समाजवादामधील शास्त्रीय, बुद्धिप्रामाण्यवादी व ऐहिक भूमिका यांच्या संयोगातून भारतीय समाजवाद समृद्ध झाला आहे, हे नि:संशय. हे समृद्ध तत्त्वज्ञान मानवतावादी लोकशाही समाजवादी भारत निर्माण करणाऱ्यांना मार्गदर्शक ठरेल.’ वास्तव हे आहे की समाजवाद्यांच्या आपसातील तीव्र भांडणांमुळे ही प्रक्रिया थांबली व पुढे अवरुद्ध झाली. असे झाले नसते तर भारताचा आजचा इतिहास वेगळा राहिला असता.

नानासाहेब गोरे यांचा गांधीजींच्या विश्वस्त कल्पनेविषयीचा लेख या खंडात घेतला आहे. नानासाहेब म्हणतात की, ‘बुद्धिवाद्यांची बुद्धी, सत्ताधीशांची सत्ता, प्रतिभावानांची प्रतिभा आणि सामर्थ्यवानांचे सामर्थ्य ही त्यांची संपत्ती आहे आणि ह्या सर्वांचा उपयोगही विश्वस्त भावनेने व्यापक जनहितार्थ केला जायला हवा.’

प्रा.राम जोशी यांनी गांधीजींच्या शिक्षण विचारांबद्दल लिहिले आहे. सुशिक्षित व्यक्तीला शारीरिक श्रम हे हलक्या प्रतीचे व लज्जास्पद वाटू लागल्यावर सवर्ण-अवर्ण, शिक्षित-अशिक्षित, सुसंस्कृत-असंस्कृत, शहरी-ग्रामीण असे भेद पडून रुंदावत जातात. गांधीजींना माणसा-माणसातील भिंती तोडायच्या होत्या व त्याकरता त्यांनी नवीन शिक्षणपद्धती विकसित केली. आचार्य भागवतांनी त्यास ‘समुच्चय शिक्षण’ असे नाव दिले.

महात्मा गांधी विज्ञानविरोधी होते असा एक गैरसमज सर्वत्र पसरलेला आढळतो. पण प्रभाकर नानावटी लिहितात की, जर विज्ञानाचा अर्थ निरीक्षण, परीक्षण आणि संशोधन असेल तर गांधीजींना वैज्ञानिक म्हणायला हवे. प्रयोगशाळेत वैज्ञानिक ज्याप्रमाणे प्रयोग करत असतो, त्याप्रमाणे प्रत्येक काम ते अगदी एकाग्र होऊन करत व परिणामांचे आकलनही करीत, आवश्यकतेनुसार सुधारणा करीत व कधी कधी प्रयोग बदलूनही पाहत.

गांधीजींच्या या वैज्ञानिक दृष्टीबद्दल अजून एक लेख या खंडात समाविष्ट केला आहे. तो रवींद्र रुक्मिणी पंढरीनाथ यांनी लिहिला आहे. ते लिहितात की, गांधीजी विवेकवाद मानत होते, परंतु त्यांनी विवेकवादाला सर्वोच्च मूल्य मानले नव्हते. कारण अगदी स्पष्ट आहे. गांधीजींची बांधिलकी सत्याशी होती. ते सत्यशोधक होते म्हणून ते सत्याची कोणतीही शक्यता नाकारणारे नव्हते.

या खंडात नीलकंठ लोखंडे यांनी गांधीजींच्या आश्रमजीवनाविषयी एक मननीय लेख लिहिला आहे. आश्रमात गांधीजी आत्मशक्ती जागृत करीत होते व सहजीवन प्रयोगाद्वारे परक्यांना आपलेसे करीत साम्राज्यशक्तीला आव्हान देत होते.

रामदास भटकळ यांचा ‘गांधी आणि भाषा’ हा लेख या खंडात आहे. सत्य-अहिंसेशिवाय अन्य तीन गोष्टींची गांधीजींनी उपासना केली- हिंदू-मुस्लिम एकता, अस्पृश्यतानिवारण व हरिजनांना न्याय आणि भाषा. गांधीजींसाठी भाषा हा नेहमी आवडीचा, साधनेचा व आधुनिक भारत घडविण्यासाठी आवश्यक असा विषय राहिलेला आहे. रामदास भटकळ लिहितात की गांधीजींना बहुभाषिकतेचा परिचय लंडनमध्ये नारायण हेमचंद्र या गुजराती साहित्यकारांनी करविला. त्यांनी या क्षेत्रात खूप काम केले असले तरी ते उथळ स्वरूपाचे होते. गांधींना तेव्हा कळायला लागले होते की भाषा हे स्वत:साठी, तसेच इतरांसाठीही एक प्रबळ माध्यम आहे. त्यांना हे ही कळले की स्वत:ला आंदोलित करणे आणि इतरांचा प्रतिसाद मिळविणे ह्या दोन्ही टोकांना जोडू शकेल अशी भाषा हवी. भटकळांनी गांधीजींचा भाषाविचार व भाषाव्यवहार याबाबत आपल्या लेखातून विस्तृतपणे मांडणी केली आहे.

डॉ. गणेश देवींनी आपल्या लेखातून गांधीजींच्या भाषाव्यवहाराविषयी थोड्याशा वेगळ्या, तत्त्वज्ञानाच्या अंगाने प्रतिपादन केले आहे. त्यांचा हा लेख वेगळ्याच लयीने जातो. त्या लयीचा आस्वादच आपल्याला वेगळ्या जगात घेऊन जातो. डॉ. देवी म्हणतात की, गांधीजींनी ‘अहिंसा’, ‘अपरिग्रह’, ‘सत्य’, ‘सत्याग्रह’, ‘आत्मा’ हे शब्द परंपरेतून घेतले तरी त्यांना स्वत:चा अर्थ दिला. गांधीजी फक्त वकील नव्हते तर ते निष्णात वकील होते. वकील कधी आरोपाच्या भाषेत बोलतो तर कधी बचावाच्या भाषेचा प्रयोग करतो. गांधीजी साक्षीच्या भाषेला अधिक महत्त्व देतात, जे त्यांना सत्यापर्यंत नेईल. अशी अनेक विचारोत्तेजक, सुंदर निरीक्षणे देवींच्या लेखात सापडतात. ते सर्व येथे लिहून मला लयभंग करायचा नाही.

ह्या ग्रंथातील माधव चोळे यांचा ‘गांधी विचारांची सद्य:कालीन उपयुक्तता’ नामक लेख 2017 साली ‘नवभारत’मध्ये प्रकाशित झालेला आहे. गांधीजींच्या उपयोगितेची चर्चा जितकी त्यांच्या समकालीनांनी केली त्यापेक्षा अधिक त्यांच्यानंतरच्या लोकांनी केली व त्याहीपेक्षा अधिक ती आज होताना दिसते. गांधीजींच्या उपयोगितेविषयी संपूर्ण जगात जितके प्रश्न उपस्थित केले जात आहेत त्यापेक्षा अधिक भारतात होत आहेत. हा दीर्घ लेखाचा विषय आहे. माझ्या दृष्टीने माधव चोळे यांनी या दीर्घ लेखाच्या विषयाला लघुपटात सामावण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे. त्यांच्या लेखात गांधीजींच्या उपयोगितेवरील प्रश्नांची तोंडओळख होईल. पुढे त्यावर चिंतन करण्याचे काम वाचकांचे आहे.

प्रा. श्याम पाखरे यांनी ‘गांधीचे राजकारण : लिंगभावात्मक दृष्टिकोण’ असा एक मननीय लेख लिहिला आहे. गांधीजींनी त्यांच्या आत्मकथेत मांसाहार केल्याचा उल्लेख आहे. मांसाहाराने पौरुष प्राप्त करून इंग्रजांना देशातून हाकलून लावायचे व देश स्वतंत्र करावयाचा असे त्यांच्या मनात होते. मुसलमानांमध्ये हिंदूंपेक्षा अधिक पौरुष असते व भारतीयांपेक्षा युरोपियनांत अधिक पौरुष असते असा त्याकाळी दृढ समज होता. इंग्रजांनीही असा समज पसरविला होता याचा उल्लेख श्याम पाखरे यांनी ह्या लेखात केला आहे.

गांधीजींनी दंडाऐवजी आत्म्यात शक्ती शोधून पौरुषाची व्याख्याच बदलून टाकली. पौरुष प्राप्त करण्यासाठी मांसाहार करण्याची आवश्यकता नाही, शाखांवर लाठी फिरवण्याची गरज नाही, शत्रुगोटातील स्त्रियांचे चारित्र्य लुटण्याची गरज नाही, इतिहासाच्या पुनर्लेखनाची गरज नाही, टोळ्या बनवून आव्हान देण्याची व गोंगाट करण्याची गरज नाही आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे ‘हे बायकांचे काम नाही’ असे म्हणून समाजाच्या अर्ध्या अंगाला राष्ट्र घडविण्याच्या कार्यात उंबरठ्याबाहेर ठेवणे जरुरीचे नाही. गरज आहे ती कशाचीही भीती न बाळगता, कथित पौरुषवाल्यांच्या डोळ्यात डोळे घालून आपले म्हणणे मांडण्याची. जेव्हा तुम्ही समोरच्या व्यक्तीच्या डोळ्यात डोळे घालून आत्मविश्वासपूर्वक बोलाल, तेव्हा तुम्ही स्वत:च शक्तीचे स्वरूप धारण कराल.

गांधीजी फक्त सत्यशोधक नव्हते, शक्तिशोधकही होते. त्यांच्या सत्याग्रहात सत्य आणि शक्तीचा समन्वय झालेला दिसतो. गांधीजींनी शक्तीवर चढवलेला पौरुषाचा लेप काढून टाकताच हिरण्यमय पात्रासारखे शक्तीचे खरे स्वरूप प्रकट झाले. ती शक्ती लिंगनिरपेक्ष आहे, ती सात्त्विक व शीतल आहे, ती गोंगाट करणारी नसून संथगतीने वाहणाऱ्या प्रवाहासारखी आहे. ती शक्ती सर्वसमावेशक आणि सार्वत्रिक आहे. जो कुठल्याच कामाचा नाही असे संबोधण्यात येते त्यालाही कामाचा बनविणारी ही शक्ती आहे. ती मातृहृदयी आहे, ती भीतही नाही व भिववीतही नाही. गांधीजींनी परिवर्तनाच्या आंदोलनाला तथाकथित पौरुषाच्या जाळ्यातून मुक्त करीत तिला लिंगनिरपेक्ष, सार्वत्रिक, सात्त्विक, मुलायम आणि दादा धर्माधिकारींच्या शब्दात सांगायचे तर ‘ललित’ स्वरूप दिले.

प्रा.सु.श्री. पांढरीपांडे यांनी ‘आधुनिकोत्तरवाद आणि गांधी’ नामक लेखात आधुनिकोत्तरवादाचे जनकत्व गांधीजींना बहाल केले आहे. पुढे लेखकाने ‘आधुनिकोत्तरवाद’ काय आहे हे विस्तारपूर्वक आणि खूपच साध्या भाषेत समजावले आहे. मात्र ह्या लेखात गांधीजींना आधुनिकोत्तरवादाचे जनकत्व दिल्यानंतर ते सिद्ध केलेले नाही. मला वाटते ते शक्यही नाही. असे असले तरी गांधीजींच्या सांस्कृतिक अभिव्यक्तीशी जे परिचित आहेत. त्यांना आधुनिकोत्तरवादाच्या ऐरणीवर पुन्हा एकदा गांधीजींच्या सांस्कृतिक भूमिकेला तपासणे नक्कीच आवडेल.

ह्या खंडात ‘गांधीजी आणि आधुनिक मराठी साहित्य’ असा गो.म. कुलकर्णी यांचा सविस्तर आणि विचारगर्भ लेख घेतलेला आहे. मी. ह.ना. आपटेंपासून जी.ए. कुलकर्णीपर्यंतचे मराठी साहित्य वाचले आहे, ते एक रसिक म्हणून. साहित्याची समीक्षा करण्याची माझी कुवत नाही. म्हणून गो.म. कुलकर्णीच्या लेखाविषयी काही लिहिणे ही माझी धृष्टता ठरेल. मी लेखकाची उपेक्षा करीत नाही. पण मला माझ्या मर्यादांचे भान आहे, हे मी अधोरेखित करू इच्छितो.

ह्या खंडात कुमार गंधर्वांनी राग मल्हारमधून ‘गांधी राग’ कसा रचला त्याची गोष्ट आहे. प्रसिद्ध मराठी साहित्यकार दि.के. बेडेकर यांचे दोन लहानसे ललितलेख व तेही बेडेकरी शैलीत असलेले या खंडात सामावण्यात आले आहेत. ते दोन ही लेख अर्थगंभीर व रसपूर्ण आहेत. म्हणून माझ्या कुठल्याही प्रकारच्या इंगिताविना वाचकांनी त्यांचा आस्वाद घ्यावा.

शेवटी मला उपसंहारात इतकेच मांडायचे आहे की गांधीजींचे समग्र आयुष्य दोन भागात विभागले गेले आहे, किंवा दोन टोकाचे एनकाउंटर त्यांना करावे लागले होते. एका बाजूला विकासाच्या पाश्चात्य अवधारणेला त्यांनी आव्हान दिले, जे ‘हिंद स्वराज’मागील दर्शन आहे आणि दुसऱ्या बाजूला महाराष्ट्राने निर्माण केलेल्या विभाजनरेखा, बेटे, ध्रुव त्यांनी निष्प्रभ केले. महाराष्ट्रसोबतच्या त्यांच्या ह्या एनकाउंटरची परिणती गांधीहत्येत झाली.

माझे असे मत आहे की पन्नास वर्षांनंतर, गांधीजींच्या द्विशताब्दीवर्षी, भारताची अस्मिता आणि हिंदू पौरुष ह्यांच्यातील संघर्ष निमाला असेल. एकोणिसाव्या शतकात महाराष्ट्राने निर्मिलेल्या विभाजनरेखा बुजलेल्या असतील आणि भ्रामक आधुनिकतेसमोर गांधीजींची प्रासंगिकता निर्णायक ठरली असेल. तो गांधी युगानयुगे जिवंत राहील.

अस्तु.

- रमेश ओझा
ozaramesh@gmail.com


सेवाग्राम कलेक्टिव्ह आणि साधना प्रकाशन यांचा संयुक्त प्रकल्प...
गांधींविषयी
खंड 1 : गांधी : जीवन आणि कार्य 
खंड 2 : गांधीविचार आणि समकालीन विचारविश्व
खंड 3 : गांधी खुर्द आणि बुद्रुक 
दर्जेदार निर्मिती व हार्डबाउंड अशा तिन्ही खंडांची एकूण किंमत 1350 रुपये.
सवलतीत 900 रुपये. पोस्टाने घरपोच हवे असल्यास 1050 रुपये.

संपर्क : 
साधना प्रकाशन 431, 
शनिवार पेठ, पुणे 411030 
sadhana.prakashan@gmail.com  
Ph. 02024459635, 
Mob. 7058286753

'गांधीविषयी'चे तिन्ही खंड AMAZON वर उपलब्ध आहेत.

Tags: महात्मा गांधी साधना प्रकाशन खुर्द आणि बुद्रुक गांधी आणि महाराष्ट्र Load More Tags

Add Comment

संबंधित लेख