पुरुष समजून घेताना...

'पुरुष मला समजलेला' या पुस्तकाविषयी

अ‍ॅरिस्टॉटलचं एक वचन आहे, 'प्रत्येक चांगली व्यक्ती एक नागरिक म्हणून चांगली असेलच असे नाही.' याच धर्तीवर 'प्रत्येक चांगला पुरुष एक बाप, मुलगा, भाऊ, मित्र, प्रियकर किंवा नवरा म्हणून तितकाच चांगला असेल असे नाही.' असं बहुतांश स्त्रियांचं मत असतं. पुरुष भूमिकांनुसार आपलं वागणं का बदलतो या प्रश्नाचा मागोवा 'पुरुष मला समजलेला' हे 'मिडिया वॉच' प्रकाशनाचं नवं पुस्तक घेतं. महाराष्ट्रातल्या समाजाभिमुख क्षेत्रांत कार्यरत असलेल्या नऊ (लेखिका, कवयित्री आणि पत्रकार) स्त्रियांनी 'पुरुषा'च्या वर्तनाविषयीची आपली निरीक्षणं या पुस्तकात नोंदवलेली आहेत. ही निरीक्षणं स्वानुभवाच्या तुकड्यांवर आधारित आहेत तर कधी त्यांना बाह्यघटनांचे संदर्भ आहेत. अर्थात स्वानुभव असला तरी स्त्रियांच्या बाबतीत 'पर्सनल इज पॉलिटिकल' हे केट मिलेटचं सत्तरच्या दशकातलं विधान आजही लागू होतं त्यामुळे ही निरीक्षणं वैयक्तिक न राहता प्रातिनिधिक ठरतात. 

कवयित्री मल्लिका अमर शेख, योजना यादव, शर्मिष्ठा भोसले, स्त्रीवादी कार्यकर्त्या वंदना खरे, लेखिका व सामाजिक कार्यकर्त्या अरुणा सबाने, समाज अभ्यासक प्रज्ज्वला तट्टे आणि पत्रकार हर्षदा परब, मनश्री पाठक, हिनाकौसर खान-पिंजार यांचे मननीय लेख या पुस्तकात आहेत. यशिवाय एखाद्या 'एलजीबीटीक्यू' प्रतिनिधीचा लेख या पुस्तकाला आणखी वेगळा आयाम देऊ शकला असता. एकूणच 'पुरुषत्वाचा अभ्यास' आता जगभरात महत्त्वाचा ठरू लागला आहे. या पार्श्वभूमीवर या पुस्तकाकडे पाहिलं जावं अशी अपेक्षा नामवंत लेखिका प्रज्ञा पवार अभ्यासपूर्ण प्रस्तावनेतून व्यक्त करतात. मिडिया वॉच प्रकाशनाचे संपादक अविनाश दुधे यांनी या पुस्तकाचं संपादन केलं आहे

'शरीर' या एकमेव सत्याभोवती फिरत पुरुष इतरही अनेक गोष्टी करतात हे नमूद करताना मल्लिका शेख यांना प्रश्न पडतो- 'बायकांनी त्यांना मुळात इतकं महत्त्व का द्यावं, वापरून झाल्यावर त्यांना वाटते का गरज बाईला समजून घ्यायची? मग कशाला उमगायला हवा आहे पुरुष?' या उपहासगर्भ प्रश्नामागची कारणं आणि स्पष्टीकरण त्यांच्या लेखात सविस्तरपणे येतं. 'माचो', अस्सल पुरुषासारखं वागणं म्हणजे नेमकं काय याबद्दल बहुतेक पुरुषांच्या मनात स्पष्टता नसते. बर्‍याचदा त्यांच्यात उपजत नसलेला हिंसक भाव ते या 'मर्द-लुक'शी जोडतात. समाजाचा निम्मा भाग असलेल्या स्त्रियांच्या वाट्याला एखादा राखीव डबा, राखीव सीट येणं हा त्यांना स्त्रियांनी घेतलेला 'अ‍ॅडव्हांटेज' वाटतो. कायद्याचा गैरवापर करून पुरुषांचा फायदा घेणार्‍या चारदोन स्त्रिया त्यांना तमाम 50 टक्के लोकसंख्येच्या प्रतिनिधी वाटतात. अशा कितीतरी चुकीच्या गृहितकांवर आधारलेल्या पुरुषांच्या मनोवृत्तीचं पृथक्करण वंदना खरे आपल्या लेखातून करतात. 

बाहेर स्त्रियांना प्रोत्साहित करणारे पुरुष घरातल्या गुणवान स्त्रियांना मात्र विरोध करतात. अमृता प्रीतम वाचायला आवडते पण एखाद्या विवाहित स्त्रीनं पुरुषाशी उघडपणे मैत्री केली तर ती बदफैली ठरते. स्त्रीपुरुषांसाठी नीतिनियमांची वेगवेगळी परिमाणं वापरणार्‍या दुटप्पी समाजाबद्दलची चीड अरुणा सबाने यांच्या अशा परखड शब्दांतून उतरते. नवर्‍यानं मारझोड करून घराबाहेर काढल्यावर प्रसंगी बेरात्री त्यांच्या दारात मदतीसाठी उभ्या राहिलेल्या उच्चशिक्षित स्त्रिया त्यांना अस्वस्थ करतात त्यामुळे 'कायद्याआधी माणसानं फक्त स्वतःला घाबरावं.' असं त्या बजावतात. आयुष्यात अनेक भलेबुरे अनुभव घेतल्यानंतरही 'पुरुष आता माणसाळतो आहे' अशी उमेद त्या व्यक्त करतात तेव्हा 'माणसाळणे' या शब्दापाशी आपण नकळत थबकतो.

पारंपरिक पुरुष जाऊ द्या, स्वतःपेक्षा वरचढ किंवा बरोबरीच्या स्त्रीशी जमवून घेणं अगदी पुरोगामी चळवळीतल्या पुरुषांनाही फारसं जमत नाही. आत्महत्या करणारे शेतकरी अनेक आहेत. त्यांच्या बायका मात्र पलायनवाद न स्वीकारता जगण्याशी दोन हात करतात. ही मतं आहेत प्रज्ज्वला तट्टे यांची. त्या म्हणतात, 'आपल्या रोजच्या भाषेतसुद्धा स्त्री-पुरुष भेदभाव आहे म्हणून भाषेपासून आधीचं जुनं सगळं डिलिट करावं लागेल.'  एकंदर पुरुषवर्तनाचं हे सोलीव स्वरूप कोणत्याही संवेदनशील माणसाला स्तंभित करणारं आणि विचारी पुरुषाला अंतर्मुख करणारं आहे. 

दुसर्‍या बाजूला 'पुरुषाचं पुरुष असणं आणि बाईचं बाई असणं हे दोन्ही प्रतिक्रियात्मक असतं.' हे नेमकेपणानं सांगत योजना यादव समतेच्या आणि आदर्श पुरुषाच्या व्याख्यांबाबत गोंधळलेल्या स्त्रियांना विचारप्रवृत्त करतात. 'काटेकोर स्त्रीवादी फूटपट्ट्या लावताना बरोबरीतला विवेक नाकारता येत नाही पण साहचर्याचे निकष याहून अधिक गहिरे असू शकतात.' 'आयुष्यातल्या पुरुषाचं गुणांकन करताना तो माणूस म्हणून कमी पडतोय की आपल्या अपेक्षांचा रखवालदार म्हणून याची परखड समीक्षा बाईला करता यायला हवी.' यादव यांचे हे बिनतोड मुद्दे पुरुषाकडे पूर्वग्रह ठेवून पाहणार्‍या स्त्रियांना आत्मपरीक्षण करायला नक्कीच भाग पाडतात. 

ठरावीक (पुरुषी मानली गेलेली) क्षेत्रं निवडून त्यांत सतत यशस्वी होण्याचं दडपण घेऊन, जगणं ओढत राहणार्‍या पुरुषांकडे शर्मिष्ठा भोसले अनुकंपेनं बघतात. वरचढ असणं म्हणजे पुरुष असणं ही व्याख्या किती खोलवर रुजलीय याची त्यांनी दिलेली उदाहरणं मनोज्ञ आहेत. अगदी सासूसुनेच्या नात्यात सासू जणू पुरुषाच्या भूमिकेत असणं, इतकंच नव्हे तर 'गे' जोडप्यातही श्रेष्ठत्वानुसार नवराबायकोच्या भूमिका ठरवणं इथपर्यंत. 'तो दारु पितो, बसून खातो पण माझ्यावर कधी हात उचलत नाही.' ही समाधानाची बाब मानणार्‍या बाईनं कोणत्या पातळीवर जाऊन तडजोड स्वीकारलीय हे त्या दाखवून देतात. सरसकट सर्व स्त्रियांच्या प्रतिष्ठेचा विचार न करता 'आमची इज्जत - त्यांची इज्जत' असे भाग पाडून मग काय तो स्टँड घेणार्‍या जातीयवादी पुरुषसमूहांच्या वृत्तीबाबत त्या निडरपणे खेद व्यक्त करतात.

पुरुष उघडपणे तर बायका गुपचूप पण नकळत एकमेकांना स्कॅन करत असतात. एकमेकांकडे बघणं हे कॉमन किंवा नैसर्गिक आहे. मग पुरुषांच्या नजरांचा नेहमी वावगाच अर्थ का घेतला जातो? कायम त्यांनाच दोष का दिला जातो? बायकांनी त्यांच्या एखाद्या पुरुषासाठी केलेला दिखाऊपणा दुसर्‍यानं पाहिला तर आरडाओरडा का केला जातो? नवरा कमावत नाही म्हणून बायको त्याला घटस्फोट देऊ शकते पण बायको कमावत नाही म्हणून नवरा घटस्फोट देऊ शकतो का? प्रश्नाच्या दुसर्‍या बाजूकडे लक्ष वेधणारे असे अनेक मुद्दे हर्षदा परब यांच्या लेखातून खणखणीत शब्दांत उपस्थित होत जातात.

समाजानं लादलेली अनेक न पेलणारी जुनी ओझी वाहताना पुरुष गुदमरतो आहे. नव्या दिशा चोखाळू पाहणार्‍या स्त्रियांकडे कौतुकाच्या नजरेनं बघताना आपलं सत्तास्थान हिरावलं जाण्याची भीती त्याला वाटते आहे. 'सँडविच' झालेल्या या आजच्या पुरुषाकडे हिनाकौसर खान आपलं लक्ष वेधतात. 'सततचं सशक्तपणाचं ओझं भिरकावून स्वतःतलं अपूर्णत्व मान्य करण्याचं' आवाहन त्याला करतात. स्त्रियांविषयी खालच्या पातळीवर जाऊन बोलणं, भांडी घासण्यावरून टुकार कालबाह्य विनोद करणं सोडलं तरच तो या द्विधा अवस्थेतून बाहेर पडून आजचा पुरुष होईल हे त्या आवर्जून सांगतात.

या गोंधळलेल्या पुरुषाला आपली वाट सहज सापडावी, त्याच्यातल्या गुणांचं दर्शन व्हावं, ज्याच्यासाठी तक्रारमुक्त रोमँटिक कविता लिहिता येतील असा पुरुष त्यानं व्हावं अशी आस मनश्री पाठक यांना लागल्याचं त्यांचा लेख थेटपणे सांगतो. त्यांच्यासारख्या आजच्या स्त्रीला त्याला कोणत्याही अटीविना 'मोकळ्या आभाळा'खाली भेटायचं आहे. 

हे सगळे लेख वाचताना नीलिमा या कवयित्रीची 'पूल' ही हिंदी रचना आठवते.

"कैसा तड़फड़ाता है तुम्हारा सुपोषित अहम... 
जब मैं करती हूँ अनपेक्षित प्रश्न
तुम्हारे उन आकलनों पर... 
जो टिके थे तुम्हारे तजुर्बे की शय पर...
ठीक उस पल चट्टानों के मजबूत छाती से गुजर... 
बनाती है नदी अनजान पगडंडियां
और नदियों की छाती पर तिर आता है पुल...
तुम चाहो तो हम मिल सकते हैं...
बहती हुई नदी के इंद्रधनुषी पुल पर... प्रिय!"

हे पुस्तक म्हणजे स्त्रियांचं आक्रंदन नाही. यात त्रागा, वैताग नाही. ही वस्तुस्थितीची तटस्थ पण समंजस मांडणी आहे. यातल्या समाजजीवनात मुरलेल्या जुन्याजाणत्या लेखिकांचा सूर आशावादाकडे झुकलेला असला तरी त्यांच्या लेखनात वास्तवाबद्द्लची खंत आणि उद्वेग अधिक जाणवतो. तुलनेनं या पुस्तकातल्या नव्या दमाच्या पत्रकार लेखिका पुरुषाच्या वर्तनातल्या सकारात्मक बदलांची विशेष दखल घेताना, त्याचबरोबर स्त्रीच्याही वर्तनाकडे सम्यक दृष्टीनं पाहताना दिसतात. आजच्या पुरुषाच्या जाणिवेत हळूहळू रुजू लागलेलं माणूसपण नेणिवेपर्यंत पोहोचावं, आश्वासक संवादाच्या पुलानं स्त्री-पुरुषाचं जग जोडलं जाऊन अधिकाधिक परस्परपूरक व्हावं हे या पुस्तकाचं उद्दिष्ट आहे. प्रश्न इतकाच आहे की, याला किती पुरुष वाचक लाभतील? मुखपृष्ठावरच्या प्रश्नचिन्हातून दिसणार्‍या दगडी पुरुषी डोळ्यांना नव्या दृष्टीकोनाचा आणि या विषयावर घट्ट मिटल्या ओठांना समजूतदार हुंकाराचा स्पर्श झाला तरच तो चेहरा सचेतन होऊ शकेल.

- मोहिनी मोडक


पुरुष मला समजलेला
प्रकाशक - मिडिया वॉच पब्लिकेशन
पृष्ठे - 94
किंमत - 150 रुपये

Tags: परिचय नवे पुस्तक परीक्षण मोहिनी मोडक मिडिया वॉच पुरुष पुरुष मला समजलेला स्त्री पुरुष संबंध Book Marathi Book Review Introduction Mohini Modak Media Watch Male Understanding Male Load More Tags

Comments:

Ashok Pardhi

सन्माननीय मोहिनी मोडक यांनी '' पुरुष मला समजलेला '' या पुस्तकाचे फार अभ्यासपूर्ण शैलीत समीक्षण केलेले आहे .

Add Comment