शंख घोष - व्यक्तित्व आणि कृतित्व 

बंगाली भाषेतील या सुप्रसिद्ध कवी- समीक्षकाचे नुकतेच निधन झाले... 

फोटो सौजन्य: @BanglarGorbo MB

बंगाली भाषेतील सुप्रसिद्ध कवी, समीक्षक शंख घोष यांचे नुकतेच (21 एप्रिल) रोजी वयाच्या 89 वर्षी कोरोनामुळे निधन झाले. त्यांच्या साहित्यिक कार्याचा धावता आढावा घेणारा हा हिंदी भाषेतील लेख के. के. बिर्ला फाउंडेशनने प्रकाशित केलेल्या 'सरस्वती सन्मान 1991-2000' या पुस्तकातील असून त्याचा हा मराठी अनुवाद.  

बंगालच्या इतिहासातील एका कठीण काळात साहित्यिक क्षितिजावर शंख घोष यांचा उदय झाला. देश फाळणीने हादरला होता. विशेषतः बंगाल अद्यापही फाळणीच्या दुःखात होरपळत होता. त्याच्यावरील जातीय हिंसेचे डाग अद्यापही ताजे होते. पूर्व बंगालमधून आलेल्या लोकांच्या समस्यांना अंत नव्हता. सगळीकडे एक प्रकारची अनिश्चितता पसरलेली होती. 

बांग्ला साहित्यातील लेखक आणि वाचक यांच्यासाठीदेखील हा अनुभव वेदनादायी होता. बांग्ला भाषा आता अशा दोन देशांमधील साहित्याचे माध्यम झाली होती... जे देश दोन भिन्न मतांमध्ये विभागले गेलेले होते. हे प्रचंड दुःखद असले तरी त्यामुळे साहित्याचा प्रवाह मात्र थांबला नाही. फाळणीनंतर भारताचा भाग झालेल्या पश्चिम बंगालने फाळणीच्या अभूतपूर्व अनुभवांनी साहित्याला एक नवे परिमाण दिले. हरवलेल्या जन्मभूमीचा विरह या रचनांमधून प्रभावीपणे प्रतिबिंबित झालेला आहे. तत्कालीन अनुभवांपासून दूर जात ती जन्मभूमी भूतकाळात विलीन होऊन स्मृतींमध्ये वसली.

तत्कालीन पूर्व बंगालच्या एका गावात 1932मध्ये  जन्मलेले शंख घोष यांनी वयाच्या बाराव्या वर्षी कविता लिहायला सुरुवात केली होती... पण फाळणीने स्वतःच्या जन्मस्थळीच उपरे ठरवले तेव्हा ते घराच्या शोधात कोलकाता इथे आले आणि त्यांच्या साहित्यिक जीवनाला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली. 

शंख घोष हे वास्तविकपणे स्वातंत्र्यानंतरचे लेखक आहेत पण पद्मा नदीच्या काठावर वसलेले ते छाटेसे गावदेखील त्यांच्या मनात होते... कारण ते वयाची सोळा वर्षे त्या छोट्याशा गावात राहत होते. ते गाव प्रतीकाच्या रूपात कधीकधी त्यांच्या कवितेतून डोकावते. आपल्या जन्मभूमीला कायमचे मागे सोडण्याचा अनुभव त्यांनी ‘सकाल बेलार आलो’ (सकाळची किरणे - 1972) आणि ‘सुपारी बाणेर सारि’ (सुपारी वनाचे  सिंहावलोकन - 1990) या दोन कथांतून मांडला.  या दोन्ही कथांचे नायक लेखकावरच आधारित आहेत.

शंख घोष यांचा स्वभाव नम्र आणि संकोची होता त्यामुळे या गजबजलेल्या महानगरात आयुष्याची घडी बसवताना त्यांना अनेक अडचणी आल्या. त्यांविषयी कित्येक वर्षांनंतर त्यांनी लिहिले, ‘मला आठवतेय की, पद्मा नदीच्या काठावर एक छोटीशी रेल्वे कॉलनी होती. तिथून मी कलकत्त्याच्या कृत्रिम वातावरणात आलो तेव्हा खूप गोंधळलेलो होतो.’ 

सामान्य वाचकांबरोबरच साहित्यिक टीकाकारांनीदेखील त्यांच्या कवितांचे स्वागत उत्साहाने केले. 1950मध्ये त्यांच्या सुरुवातीच्या कवितांमधील एक कविता ‘पाथेय’ या काव्यपत्रिकेत प्रकाशित झाली होती. त्या काव्यपत्रिकेचे संपादक बांग्लाचे प्रसिद्ध कवी बुद्धदेव बोस हे होते. बुद्धदेव फक्त कवितेसाठी कविता लिहिण्यावर विश्वास ठेवणारे होते. 

‘पाथेय’नंतर शंख घोष यांची कविता ‘परिचय’ या नियतकालिकात प्रकाशित झाली. त्या कवितेचे शीर्षक होते ‘यमुनावती’. ‘परिचय’ डाव्या विचारसरणीची वकिली करणारे नियतकालिक होते. त्याचे संपादक डाव्या कवितेचे प्रवर्तक शुभाष मुखोपाध्याय होते. विरोध प्रदर्शित करताना पोलिसांच्या गोळीने एका मुलीचा मृत्यू होतो... त्यावर ही कविता आधारित होती. शुभाष यांनी कवितेच्या विषय आणि कवीने वापरलेली लोकधून यांची खूप प्रशंसा केली.
1953मध्ये सुरू केलेल्या ‘कृत्तिवास’ या कवितेसाठीच्या नियतकालिकात युवा कवींचा एक अन्य गट घोष यांची कविता छापू इच्छित होता. त्यांच्या प्रयत्नांना यशही आले. शंख यांची ‘दिनगुली-रातगुली’ (दिवस आणि रात्र) ही कविता या नियतकालिकातील पहिल्या अंकातली पहिली कविता ठरली. 

या नियतकालिकाच्या संस्थात्मक सदस्यांमध्ये सुनील गंगोपाध्याय यांनी 1984मध्ये शंख घोष यांच्याविषयी ‘त्या काळातील सर्वात प्रसिद्ध युवा कवी’ असे लिहिले होते आणि पुढे जोडले की, ‘त्या सुंदर कवितेमुळेच ते नियतकालिक महत्त्वपूर्ण झाले.’ शंख यांनी दुसऱ्या अंकातही पूर्वीप्रमाणेच प्रथम स्थान प्राप्त केले. त्यानंतर 1956मध्ये ‘कृत्तिवास’नेच त्यांचा पहिला कवितासंग्रह ‘दिनगुली-रातगुली’ (दिवस आणि रात्र) हा प्रकाशित केला. जवळजवळ एक दशकभर शंख घोष या नियतकालिकाशी जोडलेले राहिले... पण हा संबंध केवळ लेखनापुरताच मर्यादित राहिला. आपल्या सरळ आणि नम्र स्वभावामुळे घोष नेहमीच काहीसे अलिप्त राहिले. 

‘कृत्तिवास’ने स्वातंत्र्योत्तर बंगाली कवितेवर मुद्रा उमटवलेली असली तरी एका दशकानंतरच त्याने आपली तेजस्विता हरवली. त्याचे काही सदस्य महत्त्वपूर्ण कथाकार म्हणून अधिक प्रसिद्ध झाले तर काही सदस्यांनी कविता लिहिणेच सोडले... पण शंख घोष यांनी कविता लिहिणे सोडले नाही. ज्या काळात बंगालमध्ये कवी मोठ्या प्रमाणात कविता लिहीत होते त्या काळात शंख घोष अत्यंत सावधपणे कविता करत होते. शिशिरकुमार दास यांनी आपल्या संशोधनपर लेखात लिहिले आहे की, ‘कोणत्याही काळात बंगाली  भाषेत कविता इतक्या मोठ्या प्रमाणात लिहिली गेली नव्हती. केवळ मोठ्या प्रमाणात कवी कविता लिहीत आहेत असे नाही तर कविता प्रकाशितदेखील होत आहेत. मागील पन्नास वर्षांत कवींच्या विभिन्न समुहांकडून कवितांचे संग्रह मोठ्या संख्येने प्रकाशित झाले आहेत. वेगवेगळ्या कवींचे संग्रहदेखील हजारोंच्या संख्येने प्रकाशित झाले आहेत.’ पण शंख घोष यांनी स्वतःला नियंत्रित ठेवले. त्यांचा पहिला कवितासंग्रह 1956मध्ये प्रकाशित झाला होता. त्यांनी 1960पर्यंत स्वतःला कवितेपासून सुनियोजित पद्धतीने दूर ठेवले. 

या काळात त्यांनी खूप कमी लिहिले आणि त्यापेक्षाही खूप कमी प्रकाशित केले. 1967पर्यंत त्यांनी दुसऱ्या संग्रहासाठीच्या कविता एकत्रित केल्या नाहीत. आपल्या पहिल्या संग्रहानंतर बारा वर्षांनी शंख घोष यांनी ‘शंख घोषेर श्रेष्ठ कविता’  (शंख घोष यांच्या श्रेष्ठ कविता - 1970) या संग्रहाच्या प्रस्तावनेत स्वतःविषयी लिहिले, ‘कधीकधी कुण्या कवीला एका कवितेसाठी दिवसेंदिवस प्रतीक्षा करावी लागते. माझे मात्र तसे नाही. पुनरावृत्तीला मी थारा देत नाही म्हणून मी कमी लिहितो. त्याची मला भीती वाटत नाही.’  या एका सिद्धान्ताचे पालन शंख घोष यांनी आयुष्यभर केले.

शंख घोष यांचा पहिला कवितासंग्रह ‘दिनगुले- रातगुले’ हा तुलनेने लहान असला तरी त्यात विविध विषयांवरील कविता होत्या. उदाहरणार्थ, त्यांची एक कविता 93 ओळींची आहे. 7 ते 12 जानेवारी यादरम्यानची दरीच्या स्वरूपातील लिहिलेली कविता आहे. यात शंख घोष यांनी अशा एका आत्म्याचा ताण चित्रित केला आहे जो बाह्य जगतात उडण्यासाठी तयार होतो आहे. त्याच्यासाठी कविता आणि प्रिया आपापसांत मिळून मिसळून जातात. कवितेचा प्रारंभ एका काळ्या रात्रीपासून होतो आणि शेवट तांबडे फुटण्याने होतो. या कवितेमध्ये संस्कृतनिष्ठ भाषा वापरली आहे... तर अत्यंत साध्या शैलीत लिहिलेली या संग्रहातील एक कविता आहे, ‘स्वदेश, स्वदेश करिश कारे’ ही कविता एकदम साधी आहे. तिसऱ्या प्रकारच्या कवितेचे एक उदाहरण म्हणजे ‘यमुनाबती’. यात कवीने बालकवितेतील भाषा आणि लोकधून वापरली आहे. ‘दिनगुली-रातगुली’  या कवितासंग्रहात दोन प्रकारच्या कवितांचा समावेश आहे. व्यक्तिगत अनुभवांवर आधारित कविता आणि सामाजिक प्रतिबद्धतेच्या कविता.  त्यांच्या अन्य संग्रहांतदेखील हेच वैशिष्ट्य पाहायला मिळते. 

शंख घोष यांचे गद्य पुस्तक ‘निःशब्देर तर्जनी’ (मौनाचे संकेत) 1966मध्ये प्रकाशित झाले. हा एक छोटासा निबंध आहे. यात काव्याच्या शक्तीविषयी शंख घोष लिहितात, ‘कविता शांतपणे लिहायला हवी. व्यक्तीने मूक कविता लिहायला हवी किंवा व्यक्तीने शांतपणे मूक कविता लिहायला हवी.’ त्यांना जाणवले की, खरी कविता पतनाची अनुमती देत नाही कारण त्याचा परिणाम विकृत आणि अंततः कवितेचा नाश हाच आहे.

शंख घोष यांनी आपला दुसरा कवितासंग्रह ‘नीहित पाताल छाया’ (मातीची निष्क्रिय सावली) हा एका दशकानंतर 1967मध्ये प्रकाशित केला. अर्थात त्या दशकात लिहिलेल्या इतर कविता नंतर दोन संग्रहांतून प्रकाशित झाल्या. पहिला संग्रह ‘आदिम लता गुल्ममय’  (1972) आणि दुसरा संग्रह ‘तुमि तो तेमाने गौरी नओ’ (तु तर तितकी गोरी नाहीस - 1978) हा आहे. कवितेची ही तीनही पुस्तके साठच्या दशकात लिहिलेल्या कवितांचे संकलन आहे. या संग्रहात शंख घोष यांच्या लहान कविताही आहेत. ते त्यांच्या कवितांचे वैशिष्ट्य आहे. या कवितांच्या ओळी छोट्या आणि साध्या असतात. त्यांना आलंकारिक भाषेपासून दूर ठेवलेले असते मात्र कवितेत अर्थपूर्ण शब्दांचा उपयोग केलेला असतो.

‘पान्जोरे डांडेर शब्द’ (मणक्याच्या हाडादरम्यान - 1980) या संग्रहामध्ये शंख घोष यांच्या कवितेने गीतात्मकतेत एक नवी उंची गाठली. यात चार ओळींच्या 64 कविता आहेत. या सगळ्या कवितांत एक संगीतात्मक लय आहे. ‘पान्जोरे डांडेर शब्द’मधील कवितांसोबतच शंख घोष यांनी इतरही कविता लिहिल्या. सहाव्या दशकाच्या शेवटी पश्चिम बंगाल हिंसेने ग्रासलेला होता. 1950च्या दशकात सुरुवातीला उत्तर बंगालच्या नक्षलबाडी गावात जे कृषक आंदोलन सुरू झाले होते ते आता नवीन क्रांतिकारी स्वरूपात पुढे आले होते. यात शाळाकॉलेजांतील मुलेमुली सहभागी झाली होती. या आंदोलनात मोठ्या प्रमाणात हिंसा झाली आणि आंदोलनात झालेल्या चुकांमुळे शेवटी ते आंदोलन फसले. या आंदोलनाने तरुणांचे खूप नुकसान केले.

ज्या दोन संग्रहांत शंख यांनी या अनिश्चिततेचे आणि भयाचे चित्रण केले ते संग्रह आहेत ‘मूर्खा बडो, सामाजिक नय’ (एक महान मूर्ख, सामाजिक नाही -1974) आणि दुसरा संग्रह ‘बाबरेर प्रार्थना’ (बाबराची प्रार्थना - 1976) या कवितासंग्रहातील कविता एक प्रकारचे आक्रमण, उपरोध आणि ताण यांसाठी ओळखल्या जातात. ‘बाबरेर प्रार्थना’मधील कविता अणीबाणीच्या काळात लिहिल्या गेल्या होत्या. त्या कवितांमधून शंख घोष निर्भयतेचा पुरस्कार करतात. 

शंख घोष यांचे गद्यलेखन त्यांच्या काव्यलेखनाच्या समांतर चालत राहिले. त्यांचा पहिला कवितासंग्रह ‘दिनगुली-रातगुली’ तर पहिले गद्य पुस्तक ‘युवा वाचकांसाठी’ हे होते. 1956मध्ये प्रकाशित झालेले हे पुस्तक म्हणजे  एकोणिसाव्या शतकातील समाजसुधारकांचे संक्षिप्त चरित्र होते. त्यानंतर जवळजवळ दहा वर्षे त्यांनी खूप कमी लिहिले. नंतर त्यांचे गद्य आणि पद्य लेखन हातांत हात घालून चालत राहिले. पहिल्यांदा उल्लेख केलेल्या दोन काल्पनिक कथा आणि थोडेसे अन्य निबंध यांचा अपवाद वगळता शंख घोष यांनी प्राध्यापकीय समीक्षेपासून स्वतःला दूर ठेवले.

शंख यांचे समीक्षेचे पहिले पुस्तक ‘कालेर मात्राओ रवींद्र नाटक’ (1969) हे रवींद्रनाथांच्या नाटकांच्या संदर्भातील आहे. या पुस्तकात त्यांचे तेरा लेख संकलित केलेले आहेत. त्यातून ते टागोर यांच्या नाटकात ‘यात्रा’ आणि अन्य बंगाली नाट्यकलेच्या स्थानिक प्रकारांचे योगदान कसे आहे हे दाखवतात. त्याचबरोबर त्यांच्या काही नाटकांचा युरोपीय नाटकांसोबत तुलनात्मक अभ्यासदेखील करतात. वास्तविकपणे शंख घोष यांची गद्य शैली विलक्षण आणि अद्वितीय अशी आहे. 

1963मध्येच शंख घोष यांनी आलोक रंजन दासगुप्ता यांच्या साथीने ‘सप्त सिंधू दस दिगंत’ हा कवितासंग्रह संपादित केला. यात अनेक भाषांमधील कविता होत्या. 21 वर्षांनंतर 1984मध्ये त्यांनी अखिल भारतीय दृष्टीकोन आपलासा करण्यासाठी ‘ऐतिहेर विस्तार’ (परंपरेचा विस्तार) शीर्षकाचा एक निबंध लिहिला होता. त्यात त्यांनी म्हटले आहे की, ‘ऐतिहासिक किंवा अन्य कारणांनी आमच्यामध्ये सांस्कृतिक भंगलेपण उत्पन्न झाले आहे. सौंदर्यबोधाच्या साथीने यातून आपल्याला बाहेर पडावे लागेल.’ तेलुगु कवी चेरबंदराजूर यांच्या कवितांचे या संदर्भातील अनुवाद त्यांनी केले. मलयालम लेखक कुमार आसन आणि उर्दू कवी इकबाल यांच्याविषयीचे लेख लिहिले. त्यांनी अनुवादित केलेल्या ‘बहुल देवता, बहुल स्वर’ (अनेक ईश्वर, अनेक स्वर - 1986)  या कवितासंग्रहामध्ये हो चि मिन्ह, निकोलस गयन तसेच ब्रेख्त यांच्या कवितांचे अनुवाद आहेत.

त्यांच्यासारखा लाजाळू आणि अल्पभाषी असणारा एक विस्थापित  युवक... ज्याला कोलकात्यामध्ये 50 वर्षांपूर्वी असहाय, अस्पृश्य अनुभव आले होते... तोच युवक आज या महानगराच्या केंद्रस्थानी आहे. 

(अनुवाद - चंद्रकांत भोंजाळ)

- डॉ. (श्रीमती) जयंती चट्टोपाध्याय                 

Tags: बंगाल बंगाली साहित्य कविता शंख घोष साहित्य Bengal West Bengal Partition Shankh Ghosh Poetry Literature Load More Tags

Comments:

अरुण कोळेकर ,सासवड

बंगाली कवीची नव्याने अनुवादाच्या रुपाने ओळख झाली. धन्यवाद.

Swapnil Vasant Ughade

Nice one.. very good translation ! Actually feel that era. Great !

उतम भोईटे

A good appreciation

Add Comment

संबंधित लेख