पुढची पावले

मेळघाट : शोध स्वराज्याचा - भाग 31

स्वराज्याचा आनंद असा फुलावा | फोटो सौजन्य : मिलिंद बोकील

सकस म्हणावे असे ललित व वैचारिक या दोन्ही प्रकारचे लेखन मागील दोन अडीच दशके सातत्याने करीत आलेल्या मराठी लेखकांमध्ये मिलिंद बोकील हे नाव अग्रभागी घ्यावे लागते. त्यांच्या सर्व प्रकारच्या लेखनामध्ये अभ्यास व संशोधन तर असतेच, पण त्यांनी निवडलेले बहुतांश विषय आणि त्यातील आशय 'किती जवळ तरीही किती दूर' अशी जाणीव वाचकांच्या मनात उत्पन्न करणारे असतात. मग ते 'जनाचे अनुभव पुसतां' असेल किंवा 'समुद्रापारचे समाज' असेल. गेल्या पाच सात वर्षांत त्यांनी केलेले दोन अभ्यास विशेष उल्लेखनीय व अधिक उपयुक्त म्हणावे लागतील. 'गोष्ट मेंढा गावाची' आणि 'कहाणी पाचगावची'. याच साखळीतील तिसरा अभ्यास म्हणता येईल असे त्यांचे लेखन म्हणजे 'मेळघाट : शोध स्वराज्याचा'. हा अभ्यासही त्यांनी कमालीच्या वाचनीय पद्धतीनेच लिहिला. ते सर्व लेखमालेच्या स्वरूपात कर्तव्य साधना वरून मागील चार महिन्यांपासून (31 ऑक्टोबर 2020 ते 07 फेब्रुवारी 2021) प्रत्येक शनिवारी आणि रविवारी प्रसिद्ध होत राहिले. एक महत्त्वाचे दालन या लेखमालेमुळे वाचकांना खुले झाले. आज या लेखमालेचा शेवटचा भाग प्रसिद्ध होत असून ही लेखमाला साधना प्रकाशनाकडून लवकरच पुस्तक रूपाने प्रसिद्ध होणार आहे.  

आधी म्हटल्याप्रमाणे मेळघाटमधली ही प्रक्रिया म्हणजे स्वराज्याचा शोध आहे. तो शोध असल्याने अर्थातच पूर्णत्वाला गेलेला नाही. किंबहुना आत्ता त्याची नुसती सुरुवात आहे. दुसरी गोष्ट अशी की, ही प्रक्रिया स्वराज्याची आहे याचे पूर्ण भान मेळघाटवासीयांना आले आहे असेही नाही. त्यांच्या दृष्टीने आत्ताची पायरी ही आपल्या जंगलाच्या काही भागाचे व्यवस्थापन करण्याची आहे. ते काम जर व्यवस्थित केले आणि लोकांना स्वयंशासनाची सवय लागली तर पुढच्या शक्यता दिसू लागतील. 

हे करण्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे... ती म्हणजे जाणीव-जागृती. ग्रामसभा हे स्वराज्याचे साधन असते आणि स्वराज्याच्या दिशेने चालायचे असले तर प्रथम ग्रामसभेची प्रक्रिया मजबूत करायला पाहिजे हे आपण आधीच्या प्रकरणात पाहिले... मात्र त्याही आधीची पायरी म्हणजे गावातल्या सर्व लोकांना ही जाणीव हवी की, आपण हे जे काम करतो आहोत ते अंतिमतः स्वराज्याचे आहे. हे नुसते गाव सुधारण्याचे किंवा तेंदू पाने विकून चार पैसे मिळवण्याचे काम नाही. स्वराज्य हा शब्द सध्या त्यांना अवघड वाटेल... पण सर्वसामान्य माणसांनाही ही गोष्ट समजते की, आपल्या गावाचे निर्णय आपणच घेतले पाहिजेत आणि त्यात सर्वांना सामील करून घेतले पाहिजे. 

 

आपले निर्णय आपण घेणे, त्या निर्णयांना बांधील राहणे, ते अमलात यावेत म्हणून जी शिस्त पाळायची ती पाळणे, जी जबाबदारी आपल्यावर येईल ती उचलणे आणि शेवटी ते उद्दिष्ट पार पाडणे ही प्रक्रिया सर्वसामान्य माणसे सहज पार पाडू शकतात... मात्र त्यांना तशा तऱ्हेची जाणीव व्हावी लागते. मेळघाटमधील प्रत्येक रहिवाशाला अशी जाणीव होणे हे सगळ्यात महत्त्वाचे आहे. खोजसारख्या संस्थांचे जे खरे काम आहे ते हे आहे. 

पुढची गोष्ट सक्षमता ही आहे. जाणीव झाली... पुढे काय? तर त्या जाणिवेचे रूपांतर क्षमतेमध्ये करणे आवश्यक असते. सगळ्यांनी मिळून सहमतीने निर्णय घेणे ही एक क्षमता आहे... पण त्याचबरोबर ते निर्णय पार पाडणे, ते करण्यासाठी सामाजिक रचना करणे, त्यात ज्या अडचणी येतील त्यांचे निराकरण करणे, शासन-प्रशासन-ठेकेदार-बँका इत्यादी घटकांशी संबंध ठेवणे, आर्थिक हिशेब ठेवणे अशा निरनिराळ्या गोष्टी या क्षमतेमध्ये सामील होतात. असे काम करण्याची गावकऱ्यांची क्षमता वाढवणे हेही स्वयंसेवी संस्थांचे काम आहे.  

ही क्षमता कशी वाढेल? त्यासाठी मुख्य गोष्ट म्हणजे संस्थांचा आणि लोकांचा सांधा घट्ट जुळला पाहिजे. संस्थांचा लोकांशी घनिष्ठ संपर्क हवा. गावाच्या नाडीवर संस्थांचे बोट हवे. गावाच्या हृदयातील सामाजिक धडधड संस्थांनी सतत ऐकायला हवी. संस्थांचे जे प्रमुख कार्यकर्ते असतात ते प्रत्येक गावात रोज जाऊ शकतील असे नाही... परंतु त्यांनी आपले जे दुसऱ्या फळीतले कार्यकर्ते असतात त्यांना गावे वाटून दिली पाहिजेत आणि प्रत्येक गावात काय प्रक्रिया चालते याचा सतत आढावा घेत राहायला पाहिजे. 

या साखळीतला मुख्य दुवा म्हणजे गावातले कार्यकर्ते. ते संस्थांचे प्रतिनिधी असतीलच असे नाही. त्या मुख्यतः गावातील स्वयंस्फूर्त व्यक्ती असतील - ज्या आपापला व्यवसाय, रोजगार सांभाळून गावासाठी काम करतील. प्रत्येक गावात अशा कार्यकर्त्यांचा एक गट किंवा टीम असायला पाहिजे... निवळ एकदोन पुढारी असून भागणार नाही. या गटाचे प्रशिक्षण हे काळजीपूर्वक आणि सातत्याने करायला पाहिजे. 

संस्थांच्या कार्यकर्त्यांची जी समज विकसित झालेली आहे तीच समज गावातील कार्यकर्त्यांचीही हवी... म्हणजे त्यांच्यामध्ये विसंवाद निर्माण होत नाही. यामध्ये स्त्रियांची संख्या बरोबरीने असायला पाहिजे हे निराळे सांगायला नको. आधीच्या प्रकरणांमध्ये पाहिले त्याप्रमाणे स्त्रिया जितक्या जागृत होतील तितकी ही प्रक्रिया अधिक मजबूत होईल.

गावकऱ्यांची क्षमता वाढवण्याचा मुख्य मार्ग म्हणजे त्यांना अभ्यास करायची सवय लावणे. मेंढा-लेखा किंवा पाचगाव या गावांनी जे यश मिळवले त्यामध्ये ‘अभ्यास’ या गोष्टीचा महत्त्वाचा वाटा होता. मुळात तीसुद्धा साध्या, अल्पशिक्षित आदिवासींचीच गावे होती... पण अभ्यास करायला ते गावकरी डरले नाहीत. पूर्वी आदिवासी ‘कागदा’ला घाबरायचे... मात्र या गावांनी, आपल्या सहयोगी मित्रांसोबत, ‘कागद’ वाचायची क्षमता विकसित केली. त्या कागदावर जी अक्षरे छापलेली होती त्यांचा अर्थ समजून घेतला, त्यावर विचार केला, निर्णय घेतले, वेळप्रसंगी कागदाला कागदाने उत्तर दिले. 

अभ्यास ही फक्त शहरी लोकांची, सुशिक्षितांची मक्तेदारी नाही. कोणताही माणूस अभ्यास करू शकतो. जी माणसे समूहामध्ये एकत्र आलेली आहेत ती तर जास्त चांगला अभ्यास करू शकतात... कारण एकमेकांशी संवाद केल्याने त्यांची क्षमता वाढते... मात्र अशा अभ्यासाची सवय लावायला लागते. कायद्याचा किंवा नियमांचा बारीक अभ्यास केला की एक वेगळीच निर्भयता येते. आपण कायदे वाचत नाही म्हणून आपल्याला त्यांची भीती वाटते. कायदा नीट वाचला की आपले हक्क काय, अधिकार काय, जबाबदारी काय, कर्तव्य काय हे कोणाही माणसाला समजते. अशा तऱ्हेची क्षमता वाढवणे, त्यासाठी गावागावांमध्ये ‘अभ्यास मंडळां’ची स्थापना करणे हे काम मेळघाटमध्ये करावे लागेल. 

याला जोडून जे काम आहे ते सरकार आणि त्याच्या निरनिराळ्या विभागांशी संबंध ठेवण्याचे आहे. आधी पाहिले त्याप्रमाणे सरकारशी संबंध काही एकाच सरळ रेषेतला नसतो. सरकार ही जरी एक मोठी शक्ती असली तरी मुळात ते निर्माण केलेले असते लोकांनी. आपल्या सरकारवर आपला हक्क हा असतोच. त्या हक्कापोटी सरकारकडून जी कामे करून घ्यायची असतात ती सरकारी विभागांशी संबंध ठेवून करून घ्यावी लागतात. तसे करताना लोकांची जी जबाबदारी किंवा कर्तव्ये असतात ती लोकांना पार पाडावी लागतात. 

हे आपले सरकार आहे असे म्हटल्यावर त्याच्याशी योग्य ते सहकार्य करणे आवश्यकच असते. ते सरकार अन्याय करत असेल तर त्या अन्यायाचा प्रतिकारही लोकांनाच करावा लागतो किंवा ते आपल्या अपेक्षांना उतरत नसेल तर निवडणुकीच्या माध्यमातून ते बदलावेही लागते. अशा रितीने सरकारशी विविध पातळ्यांवर आणि विविध पद्धतींनी संबंध ठेवावा लागतो. याचेही प्रशिक्षण लोकांना देणे आवश्यक असते... म्हणजे संस्था वा कार्यकर्ते सोबत नसतानाही ते हे कार्य पार पाडू शकतात. 

 

सध्या आदर्शात्मक वाटली तरी स्वराज्य ही एक सुंदर संकल्पना आहे. भारतामध्ये तर तिला फार मोठा प्राचीन वारसा आहे. मुळात जरी ती राजकीय असली तरी जीवनाच्या सर्वच क्षेत्रांना लागू होणारी आहे. आपल्या जीवनावर आपला ताबा असावा ही माणसाची प्राथमिक गरज आहे. आपल्याजवळ अन्नधान्याची खातरी असावी, आपल्याला आवडेल ते शिक्षण घेण्याची संधी मिळावी, आपल्या आरोग्याचे आपण रक्षण करावे, आपली भाषा जपता यावी, आपली कला-संस्कृती अबाधित राहावी, आपल्यावर दुसऱ्या कोणाची सत्ता चालू नये, आपणही दुसऱ्या कोणावर वर्चस्व गाजवू नये आणि सर्वांसोबत आनंदाने जीवन जगावे यालाच स्वराज्य असे म्हणतात. 

या स्वराज्याचा शोध खरेतर सर्वांनीच घ्यायचा आहे... परंतु दुर्दैवाने शहरी, पांढरपेशा, मध्यमवर्गीय समाज या संकल्पनेला पारखा झालेला आहे. हे काम खरेतर मुंबई-पुणे-नागपूर-कोल्हापूर यांसारख्या शहरांतील सुशिक्षित लोकांनी केले पाहिजे... परंतु आपल्या जीवनाची सूत्रे दुसऱ्यांच्या हाती सोपवण्यात त्यांनी धन्यता मानलेली आहे... त्यामुळे स्वराज्याचा शोध हा दूर, डोंगरदऱ्यांमध्ये राहणाऱ्या गोंड-कोरकूंसारख्या आदिवासी समूहांना घ्यावा लागतो आहे. तसा शोध ते घेतही आहेत. त्या शोधामध्ये त्यांच्या बरोबरीने उभे राहणे आणि त्यांना काही शिकवण्याऐवजी त्यांच्याकडून शिकणे हे काम बाकीच्या समाजाने केले पाहिजे. ही लेखमाला त्यासाठी आहे.  

 

- मिलिंद बोकील

(ललित आणि वैचारिक या दोन्ही प्रकारातले साहित्य लिहिणारे फार कमी लेखक मराठीत आहेत, आणि ज्यांच्या लेखनाला राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय परिप्रेक्ष्य असतो असे लेखक तर त्याहून कमी आहेत. त्या दोन्ही बाबतीत मिलिंद बोकील हे आघाडीवरचे नाव आहे.)


'मेळघाट : शोध स्वराज्याचा' या लेखमालेतील इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा.

Tags: लेखमाला मिलिंद बोकील मेळघाट भाग - 31 स्वराज्य मेळघाट : शोध स्वराज्याचा Melghat Milind Bokil Part -31 Swarajya Load More Tags

Comments:

Anup Priolkar

All the Articles was very meaningful. End is too good.Thanks to the writer and credit to Sadhana Weekly.

Add Comment