जय जगत 2020पदयात्रा तात्पुरती स्थगित

'पदयात्रा: आर्मेनियामधली' या दीर्घ लेखाचा शेवटचा भाग

येरेवान शहरात आयोजित चर्चासत्रात सहभागी झालेले पदयात्री

2 ऑक्टोबर 2019 रोजी गांधींजींच्या 150व्या जयंतीनिमित्त ज्येष्ठ गांधीवादी कार्यकर्ते पी. व्ही. राजगोपाल यांच्या नेतृत्वाखाली  'जय जगत 2020 - जागतिक शांती मार्च' या पदयात्रेला दिल्लीतील महात्मा गांधींच्या समाधीस्थळापासून- राजघाटपासून- सुरुवात झाली. तीन महिने भारतात तर उरलेले नऊ महिने विदेशात, अशी वर्षभर चालणारी ही 14 हजार किलोमीटरची पदयात्रा 10 देशांतून प्रवास करणार होती. या यात्रेदरम्यान जगभर अहिंसा, शिक्षण व सामाजिक न्यायाशी संबंधित महत्त्वाच्या विषयांवर प्रशिक्षण व कार्यक्रम होणार होते.पदयात्रेचा मूळचा मार्ग हा राजघाट ते वाघा-बॉर्डर; तिथून पाकिस्तान, इराण, आर्मेनिया, जॉर्जिया, नंतर बाल्कन राष्ट्रे, मग इटली आणि शेवटी स्वित्झर्लंड असा होता. या पदयात्रेची सांगता 2 ऑक्टोबर 2020 रोजी संयुक्त राष्ट्र संघाचे मुख्यालय असलेल्या जिनिव्हा येथे होणार होती.

मराठीतील प्रसिद्ध लेखक मिलिंद बोकील या पदयात्रेत सहभागी झाले होते, त्या अनुभवावरील लेख समकालीन प्रकाशनाकडून लवकरच येणाऱ्या 'क्षितिजापारच्या संस्कृती' या त्यांच्या पुस्तकात समाविष्ट केला आहे. तो संपूर्ण लेख क्रमशः आठ भागांत प्रसिद्ध करीत आहोत. त्याचा हा अंतिम भाग. 
- संपादक

येरेवानमध्ये राहात असताना 13 मार्चला सरकारी सूत्रांकडून असा निरोप आला की करोना व्हायरसमुळे उत्पन्न झालेली परिस्थिती बघता दहा दिवस पदयात्रा स्थगित ठेवावी आणि त्या काळात येरेवानमध्येच राहावे. परिस्थिती पूर्ववत झाल्यावर मग पदयात्रेला प्रारंभ करावा. असे काही होणे हे अपेक्षितच होते. करोना व्हायरसचा प्रादुर्भाव जानेवारी महिन्यापासूनच व्हायला लागला होता. भारतातून 5 मार्चला निघालो तेव्हा काही जाणवले नव्हते. मात्र आम्ही पदयात्रेत असताना जगाची परिस्थिती बदलत होती. इटली आणि स्पेनमध्ये मोठ्या प्रमाणावर लागण झाल्याच्या बातम्या येत होत्या. करोनाचे सावट वाढत होते.
    
तसे एरवीही येरेवानमध्ये चार-पाच दिवस राहणार होतो, पण आता दहा दिवस राहावे लागणार होते. अशा परिस्थितीत करण्यासारखे एकच असते, ही गोष्ट मान्य करून त्याप्रमाणे आपल्या जीवनक्रमात योग्य तो बदल करायचा. तेव्हा असे ठरले की या काळाचा सदुपयोग करून त्याचे रूपांतर ‘अभ्यास वर्गा’त करावे. आपल्याला एका जागी थांबायला सांगितले आहे तर त्या काळात अहिंसा आणि शांती यावर जितके मनन-चिंतन करता येईल तितके करावे. तसे तर पदयात्रा चालत असतानाही करत होतोच. दररोज संध्याकाळी सात वाजता प्रार्थना व्हायची आणि ती झाली की दिवसभराचा आढावा घेतला जायचा. मी जिलला असे सुचवले होते की यावेळी एखादा विषय घेऊन त्यावर आपण स्वाध्याय करावा. उदाहरणार्थ, गांधींजींची अकरा व्रते आहेत, त्यातले एकेक घ्यावे. तिने ते मान्य करून मलाच मासीसमध्ये तसे करायला सांगितले. त्या दिवशी ‘अस्वाद’ व्रतावर मी बोललो कारण काही काही पदयात्री जेवणव्यवस्थेसंबंधित शेरे मारायला लागले होते. 
    
तेव्हा आता जर दहा दिवस थांबायचे आहे तर मग हे अभ्यास शिबिर व्यवस्थित आयोजित करायचे ठरले. आम्ही जिथे राहात होतो ती जागा मध्यवर्ती असली तरी इतक्या लोकांना सोयीची नव्हती. तेव्हा निम्म्या लोकांसाठी जवळची एक वेगळी जागा शोधायचे ठरले. असाही एक पर्याय समोर आला की येरेवानमध्ये राहण्याऐवजी एखाद्या लहान गावात जाऊन राहावे जिथे मोकळेपणाने राहता तरी येईल. स्वाध्यायासाठी पदयात्रींचे गट तयार केले. त्या प्रत्येक गटाला एकेक विषय वाटून देण्यात आला. याच गटांना स्वयंपाक आणि इतर व्यवस्थांची जबाबदारीही देण्यात आली. दर दिवशी सकाळी दहा ते बारा अशी अभ्यासवर्गाची वेळही ठरली. पहिल्या दिवशीचा अभ्यासवर्ग मी ‘मानवजातीची एकरूपता’ या विषयावर घेतला. नंतरचा आर्मेनियाच्या इतिहासावरचा ठरवला होता.
    
आर्मेनियातून पदयात्रा जॉर्जियामध्ये जाणार होती. जॉर्जियामध्ये एक गांधी-आश्रम होता. ते सगळी स्थानिक व्यवस्था बघणार होते. आर्मेनिया-जॉर्जिया यांची सीमा जोडलेली आहे. त्या सीमेवरच व्हिसा मिळायची तरतूद होती. जॉर्जिया झाल्यानंतर काळा समुद्र पार करून बल्गेरियामध्ये जायचे होते आणि तिथून ज्यांना बाल्कन राष्ट्रे म्हणतात त्या सर्बिया, बोस्निया, हऱ्झेगोविना, क्रोएशिया करून भूमध्य समुद्र पार करून इटली आणि शेवटी स्वित्झरलंड असा मार्ग होता. तिचे वेळापत्रक पूर्वी अनेकदा बदलले होते आणि आता तर निश्चित बदलणार होते.
    
परिस्थितीशी अशा प्रकारे जुळवून घेऊन तिथे राहायला लागलो. दहा दिवसांनी का होईना पदयात्रा सुरू होईल या आशेने. मात्र पंधरा तारखेच्या सकाळी आर्सन आणि डेव्हिड आम्हाला भेटायला आले. त्यांनी एक दुर्दैवी बातमी आणली होती. ते म्हणाले की सरकारमधील आमच्या मित्रांकडून आम्हाला कळले आहे की जागतिक परिस्थिती पूर्णपणे बिघडली असून आर्मेनियामध्येही सरकार आणीबाणी आणण्याच्या विचारात आहे. तशी आणीबाणी लागू झाली तर तुम्ही इथेच अडकले जाल. जॉर्जियाने आपली सीमा बंद केली आहे. सगळे जगच ‘लॉक डाउन’च्या दिशेने निघाले आहे. तेव्हा तुम्ही पदयात्रा स्थगित करून आपापल्या देशात जाणे उत्तम. आम्ही तुम्हाला त्या गोष्टीत सर्वतोपरे मदत करू. तुम्हाला काही अडचण येऊ देणार नाही.
    
ती बातमी म्हणजे पदयात्रेवर एक प्रकारचा घालाच होता. जिल, राजगोपाल आणि त्यांच्या साथीदारांनी आधीची सात वर्षे या पदयात्रेची तयारी केली होती. काही जणांनी पदयात्रेचा सगळा मार्ग आधी फिरून निश्चित केला होता. ठिकठिकाणी संपर्क केले होते. निधी गोळा केला होता. देशविदेशातून लोक एकत्र आले होते. चार महिन्यांहून जास्त काळ चालणेही झाले होते. आणि आता ती स्थगित करायची. पुढे काय होईल याची काहीही कल्पना नसताना. पण काही इलाज नव्हता. हे एक जागतिक संकट होते आणि अशा वेळी प्रत्येकाने केवळ आपापल्या देशातच नाही तर घरात थांबणे आवश्यक होते. छातीवर दगड ठेवून राजगोपाल यांनी परत फिरायचा निर्णय घेतला. सुदैवाने सगळ्या भारतीय लोकांसाठी दुसऱ्या दिवशीच्या विमानाची परतीची तिकीटे मिळाली. फ्रान्स, स्वित्झर्लंड, स्पेनमधल्या पदयात्रींनी आपापल्या देशात जाण्याचे प्रस्थान ठेवले. 
    
डेव्डिड आणि आर्सन यांनी दिलेला शब्द पाळला. त्यांनी आमच्यासाठी एका मोठ्या वाहनाची व्यवस्था केली आणि सर्वांना दुसऱ्या दिवशी व्यवस्थित विमानतळावर पोहोचवले. सरकारचे सहाय्य असल्याने त्यात काही अडचण आली नाही. दिल्लीला दुसऱ्या दिवशी पोहोचलो. पुढच्याच आठवड्यात भारतात टाळेबंदी जाहीर झाली.     
    
घरी सुखरूप परतलो. आर्मेनियामधल्या आठवणी सोबत घेऊन. एरवी कदाचित कधीच बघायला मिळाला नसता असा एक देश बघायला मिळाला. तोसुद्धा पायी चालत. तिथली शुद्ध, करकरीत हवा छातीत भरून घेता आली. अन्नाचा स्वाद घेता आला. त्या दिव्य अरारात पर्वताचे दर्शन झाले. प्राचीन इतिहास समजला. संस्कृतींमधले दुवे लक्षात आले. असे दुवे की जे पुस्तक वाचून समजत नाहीत; त्यासाठी त्या भूमीतच जावे लागते.

जॉर्जियामधल्या मोठ्या कॉकेशसमध्ये चालायचे स्वप्न मात्र अधुरे राहिले.

-मिलिंद बोकील
(ललित आणि वैचारिक या दोन्ही प्रकारातले साहित्य लिहिणारे फार कमी लेखक मराठीत आहेत, आणि ज्यांच्या लेखनाला राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय परिप्रेक्ष्य असतो असे लेखक तर त्याहून कमी आहेत. त्या दोन्ही बाबतीत  मिलिंद बोकील हे आघाडीवरचे नाव आहे.)

वाचा 'पदयात्रा: आर्मेनियामधली' या दीर्घ लेखाचे इतर भाग-
1. 
जय जगत 2020: न्याय आणि शांततेच्या दिशेने टाकलेले पाऊल 
2. बर्फाळ कॉकेशस पर्वतरांगा आणि आर्मेनियन शाळा 
3. अझरबैजान सीमेलगतचा धोकादायक टप्पा 
4. अरारात पर्वताच्या पायथ्याशी...
5. चाळीस पदयात्रींचे आदरातिथ्य करणारे शेतकरी जोडपे

6. प्राचीन आणि अर्वाचीन जगाचा सांधा जोडणारे येरेवान शहर
7. संपन्न सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारसा लाभलेले शहर..

Tags:Load More Tags

Comments:

विजय यादव

जय जगत पदयात्रेत प्रत्यक्ष सहभागी असल्याची अनुभूती या लेखमालेने दिली.

नीती बडवे

अप्रतिम. मिलिंद बोकीलांच्या लिखाणाबद्दल एवढं एकच म्हणावसं वाटतं. अर्मेनियाच्या वंशसंहाराबद्दल अनेकदा ऐकलं होतं. अगदी अलिकडे तुर्कस्तानावर अर्मेनियाची माफी मागून नुकसान भरपाई साठी EU दबाव आणत होती. कॉकेशियन पर्वत कॉकेशियन चॉक सर्कलमुळे पूर्वीच माहीत झाला होता. बोकिलांचा लेख दर दिवशी अर्मेनियन संस्कृती आणि देशाबद्दल उत्सुकता वाढवत होता. वर्णनातून चित्र डोळ्यासमोर उभे राहात होते. विशेषतः पुरातत्त्व विभागाच्या संग्रहालयात ली माहिती भारावून टाकणारी होती. तिथलं आदरातिथ्य थक्क करणारं आहे. शेवटपर्यंत वाट पाहिली ती पदयात्रेच्या उद्देशानुसार काय कार्यक्रम झाले याची. कदाचित पुस्तकात अशी माहिती इतरत्र आली असेल. सुंदर लेख. मालिका साधनाने आमच्यापर्यंत पोचवली याबद्दल आभार.

Add Comment

संबंधित लेख