गुजरात निवडणुकीने विरोधी पक्षांना दिलेला धडा 

विरोधी पक्षांनी बोध न घेतल्यास 2024 च्या लोकसभा निवडणुकीत या निकालाचीच पुनरावृत्ती होऊ शकते.

'आप'चे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार ईशुदान गढ़वी आणि अरविंद केजरीवाल

गुजरात विधानसभा निवडणूक निकाल हा भारतातील तमाम विरोधी पक्षांना दिलेला इशारा आहे. 2024 च्या लोकसभा निवडणुकीपर्यंत या इशाऱ्याचा अर्थ लक्षात घेऊन काम न केल्यास विरोधी पक्षांना दारुण पराभवासाठी तयार राहावे लागेल. अन्यथा, 2029 च्या लोकसभा निवडणुकीपर्यंत भाजप सरकारकडून एखादी मोठी चूक झाल्यामुळे जनमत आपोआप विरोधात जाईल आणि आपल्याला संधी मिळण्याची वाट पाहत राहणे हाच पर्याय उरेल.

गुजरात विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने ऐतिहासिक यश मिळवले. काँग्रेस नेते मुख्यमंत्री माधवसिंग सोळंकी यांच्या नेतृत्वाखाली 149 जागांवर विजय मिळवण्याचा विक्रम मोडीत काढत भाजपने 182 पैकी 156 जागांवर विजय प्राप्त केला. गुजरातमध्ये सत्ता मिळत असल्याचा दावा करणाऱ्या आम आदमी पक्षाला फक्त पाच जागा मिळाल्या. गेल्या 27 वर्षांपासून विरोधक असलेल्या काँग्रेस पक्षाला अवघ्या 17 जागा मिळाल्या. गुजरात विधानसभा निवडणुकीत भाजपला मिळालेल्या यशातून विरोधी पक्षांनी बोध घेणे गरजेचे आहे. अन्यथा 2024 च्या लोकसभा निवडणुकीत त्याची पुनरावृत्ती होण्याची शक्यता आहे.

लोकप्रिय ब्रँड निर्मिती

भारतीय जनता पक्षाने निवडणुकीत यश संपादन करण्यासाठी ‘नरेंद्र मोदी’ नावाचा ब्रँड विकसित केलेला आहे. केंद्र राज्य आणि स्थानिक पातळीवरील निवडणुकादेखील मोदींच्या नावाने लढवल्या जातात. गुजरातच्या निवडणुकादेखील पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नावाने लढविल्या गेल्या. पंतप्रधानांनी गुजरातच्या निवडणुका जिंकण्यासाठी जीवाचे रान केले. रॅली, रोड शो आणि सभांच्या माध्यमातून विरोधकांचा समाचार घेतला. भविष्यात काँग्रेस किंवा अन्य विरोधी पक्षांना भारतीय जनता पक्षाला निवडणुकीत पराभूत करायचे असेल तर पंतप्रधान नरेंद्र मोदींसारखा लोकप्रिय ब्रँड निर्माण करावा लागेल. नरेंद्र मोदींच्या जनमानसातील प्रतिमेला छेद दिल्याशिवाय किंवा पर्याय समर्थ नेतृत्व निर्माण केल्याशिवाय भारतीय जनता पक्षाला पराभूत करता येणार नाही हा धडा गुजरातच्या निवडणुकीने विरोधी पक्षाला दिला आहे.

अस्मितेच्या राजकारणाचा वापर

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाने नेहमीच अस्मितेच्या राजकारणाला महत्त्व दिलेले आहे. गुजरात निवडणुकीत देखील भाजपने गुजराती अस्मिता आणि ओळखीला सर्वाधिक महत्त्व देऊन निवडणुकीत प्रचंड यश मिळवले. पंतप्रधानांनी स्वतःला ‘गुजरातचे सुपुत्र’ म्हणून प्रोजेक्ट करणे. ‘गुजरात कि शान’ म्हणून भाजपने पंतप्रधानांची प्रतिमा विकसित करणे या सर्व गोष्टी गुजराती ओळख किंवा अस्मितेला अधोरेखित करणाऱ्या आहेत. राष्ट्रीय राजकारणात हिंदुत्वाचा रक्षक, देशभक्तांचा पक्ष, शत्रूंना धडा शिकविणाऱ्यांचा पक्ष इत्यादी अस्मितादर्शक प्रतीकनिर्मितीतून भाजपने विरोधी पक्षांना निवडणुकीच्या राजकारणात फार मागे सोडलेले आहे. भारतीय जनता पक्ष अस्मितेच्या राजकारणाच्या माध्यमातून जनतेत निर्माण झालेल्या भावनातिरेकाचा उपयोग करून सहानुभूतीची लाट निर्माण करतो. आणि सहानुभूतीच्या लाटेवर स्वार होऊन निवडणुकीत दणदणीत विजय मिळवतो, हे 2014 आणि 2019च्या लोकसभा निवडणुकीने सिद्ध केलेले आहे. त्यांची पुनरावृत्ती 2024 मध्ये टाळायची असेल तर विरोधी पक्षांनी देखील पर्यायी अस्मितादर्शक प्रतिके विकसित करणे गरजेचे आहे. भाजपने विकसित केलेल्या प्रतीकांतील अंतर्विरोध वा उणिवा जनतेसमोर उजागर करणे गरजेचे आहे.

प्रतिमाभंजन आणि प्रतीक निर्मितीचे राजकारण

भारतीय जनता पक्षाने विरोधी पक्षांचे प्रतिमाभंजन करून गुजरात निवडणुकीत यश संपादन केलेले आहे. ‘काँग्रेस कसा गुजरातद्वेष्टा आहे. काँग्रेसच्या नेतृत्वाने मोदींना कसा त्रास दिलेला आहे. काँग्रेसचे नेते मोदींबद्दल कशी बदनामीकारक विधाने करतात. आप शहरी नक्षलवाद्यांचा पक्ष आहे, हे शहरी नक्षलवादी गुजरातमध्ये शिरण्याचा प्रयत्न करत आहेत. तो प्रयत्न भाजप कधीही यशस्वी होऊ देणार नाही’ अशा प्रकारचा प्रचार करून भाजपने काँग्रेस आणि आपच्या प्रतिमेवर हल्ला करून गुजरातमध्ये विजय संपादन केला. राष्ट्रीय राजकारणात काँग्रेसला ‘टुकडे टुकडे गॅंग’ ही दिलेली उपमा, राष्ट्रद्रोह्यांना मदत करणारा पक्ष, परिवारवादी पक्ष अशी प्रतिमा विकसित करून भाजप विजय मिळवत आलेला आहे. 2024च्या निवडणुकीत भाजपला रोखायचे असेल तर काँग्रेस आणि विरोधी पक्षांना आपल्या प्रतिमेत बदल करणे गरजेचे आहे. भाजपकडून प्रतिमाभंजन करण्यासाठी केल्या जाणाऱ्या प्रयत्नांना चोख उत्तर देणे गरजेचे आहे. प्रतीक निर्मिती आणि प्रतीक संवर्धनाशिवाय विरोधी पक्षांना भाजपसमोर पाय रोवून समर्थपणे उभे राहता येणार नाही.

मतविभागणीस पायबंद

गुजरात विधानसभा निवडणुकीत काँग्रेस आणि आप पक्षांमध्ये झालेल्या मतविभागणीचा भारतीय जनता पक्षाला फार मोठा फायदा झालेला आहे. काँग्रेसच्या मोठ्या प्रमाणावर जागा कमी होण्याचे कारण म्हणजे काँग्रेसची मते मोठ्या प्रमाणावर ‘आप’कडे वळली. 2017 मध्ये काँग्रेसला 41 टक्के मते आणि 77 जागा मिळाल्या होत्या. या निवडणुकीत आपच्या आगमनामुळे काँग्रेसची मतांची टक्केवारी 27.3 टक्क्यांपर्यंत घसरली. 77 जागांवरून अवघ्या 17 जागा मिळाल्या. आम आदमी पक्षाला 12.92 टक्के मते आणि 5 जागा मिळाल्या. भारतीय जनता पक्षाला 2024 च्या लोकसभा निवडणुकीत विजय मिळवण्यापासून रोखायचे असेल तर विरोधी पक्षांनी एकत्र येऊन निवडणुका लढविणे गरजेचे आहे. विरोधी पक्षांमध्ये होणाऱ्या मतविभागणीचा भाजपला नेहमीच फायदा होत राहिलेला आहे. राष्ट्रीय राजकारणात भाजपला एकट्याने शह देऊ शकेल असा कोणताही विरोधी पक्ष सध्या अस्तित्वात असल्याचे दिसून येत नाही. त्यामुळे विरोधी पक्षांनी आपापसांतील मतभेदांचे निराकरण करून भाजपविरोधात आघाडी वा युती करून निवडणुका लढविल्याशिवाय यश मिळणार नाही हा गुजरात निवडणुकीने दिलेला संदेश आहे.

तिकीट वाटपात सावधानता 

गुजरात विधानसभा निवडणुकीत भाजपने तिकीट वाटप करताना सजगता दाखवली आहे. अनेक दिग्गज नेते आणि मंत्र्यांना तिकीट नाकारून नव्या चेहऱ्यांना संधी दिली. त्यामुळे पक्षाला अँटीइन्कम्बनसीचा फटका बसला नाही. भाजपने हा धाडसी प्रयोग अनेक राज्यांमध्ये आणि लोकसभा निवडणुकीमध्येदेखील मर्यादित प्रमाणात अंमलात आणला होता. गुजरातमध्ये मोठ्या प्रमाणावर अंमलात आणल्याचा फायदा पक्षाला झाला. भाजपने अवलंबलेल्या धोरणामुळे पक्षाला सातत्याने नव्या दमाच्या नेतृत्वाचा पुरवठा होत राहिलेला आहे. भारतीय जनता पक्षाला शह देण्यासाठी नवनेतृत्व निर्माण करण्याचा प्रयत्न विरोधी पक्षांनी करणे गरजेचे आहे. काँग्रेस किंवा इतर विरोधी पक्षांमध्ये विशिष्ट कुटुंबातून नेतृत्वाचा पुरवठा केला जात असतो. वर्षानुवर्षे एकाच व्यक्तीच्या हातात किंवा तिच्या समर्थकांच्या हातात पक्षाची सूत्रे असतात. नवनेतृत्वनिर्मितीला फारसा वाव या पक्षाकडून दिला जात नसल्याकारणाने तरुण नेतृत्वाची वानवा या पक्षांकडे आहे या परिस्थितीत बदल केल्याशिवाय विरोधी पक्षांना भवितव्य नाही हे गुजरात निवडणुकीने दाखवून दिले आहे.

जातीय समीकरणाचा वापर

गुजरात विधानसभा निवडणुकीत तिकीट वाटप करताना जातीय समीकरणावर विशेष लक्ष केंद्रित केल्यामुळे भाजपला हे उत्तुंग यश मिळाले. राज्यातील जवळपास सर्वच प्रमुख जातींना तिकीट वाटप करताना सामावून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. परिणामतः बहुसंख्य जातीगटाचा पाठिंबा मिळवण्यात भाजप यशस्वी ठरला. भाजपने हाच फॉर्म्युला राष्ट्रीय राजकारणात वापरण्यास सुरुवात केलेली आहे. जास्तीत जास्त जातींना जोडण्याचा प्रयत्न करून विरोधी पक्षांचा पाया कमकुवत करण्यास सुरुवात केलेली आहे. गुजरातसारख्या राज्यामध्ये दलित, आदिवासी, मुस्लीम या काँग्रेसच्या पारंपरिक ‘व्होट बँक बँके’ला देखील त्यांनी आपल्याकडे वळून घेतलेले आहे. त्यामुळे भविष्यातील निवडणुकीत भाजपला शह देण्यासाठी विरोधी पक्षांना आपला सामाजिक पाया विस्तारावा लागेल. समाजातील विविध घटकांना पक्षाच्या रचनेत सामावून घ्यावे लागेल त्याशिवाय भाजपला शह देता येणार नाही हे गुजरातच्या निवडणूक निकालातून लक्षात येते.

मजबूत संघटन आणि विजयाची मानसिकता

भारतीय जनता पक्ष प्रत्येक निवडणुकीत अत्यंत ताकदीने उतरतो. त्यासाठी भाजपने कार्यकर्त्यांची अत्यंत भक्कम नेटवर्क उभे केलेले आहे. संघ आणि इतर हिंदुत्ववादी सहयोगी संघटनांचे नेटवर्कदेखील त्यांना मदत करत असते. ज्या प्रदेशात त्यांचे नेटवर्क कमी आहे अशा भागात विरोधी पक्षांचे उमेदवार आयात करून विजय प्राप्त करतात. गुजरात मध्येदेखील 2017 च्या निवडणुकीत काँग्रेसने भाजपला कडवी लढत दिली होती. काँग्रेसचे हे कडवे आव्हान मोडून काढण्यासाठी भाजपने अनेक काँग्रेस नेत्यांना आपल्या पक्षात आणून तिकीटे बहाल केली याचा परिणाम असा झाला की काँग्रेसचे संघटन कमकुवत बनले. याचा आपोआप फायदा भाजपला मिळाला. काँग्रेस पक्ष पराभूत मानसिकतेतून गुजरात निवडणुकीला सामोरे गेला. राहुल गांधी यांनी दोन सभा वगळता गुजरात विधानसभा निवडणुकीकडे दुर्लक्ष केले. काँग्रेसचे अनेक वरिष्ठ नेते निवडणूक प्रचारापासून दूर राहिले. चेहराविहीन प्रचार, फक्त ग्रामीण भागाकडे लक्ष, कमकुवत संघटन इत्यादी कारणांमुळे काँग्रेसचा दारूण पराभव झाला. भविष्यात या चुका दुरुस्त केल्या नाहीत तर काँग्रेस पक्षाचा देश पातळीवर असाच दारुण पराभव होईल हा गुजरात निवडणुकीने दिलेला धडा आहे.

आपची नवी ओळख 

काँग्रेस आणि भाजप यांच्या पोकळीत शिरून आम आदमी पक्ष आपला प्रभाव हळूहळू देशभर वाढवून काँग्रेसची जागा घेण्याचा प्रयत्न करत आहे हे गुजरातच्या निवडणुकीवरून सिद्ध झाले. गुजरातच्या निवडणुकीत आपला फक्त पाच जागा मिळालेल्या असल्या तरी मतांची टक्केवारी 13 टक्क्यांपर्यंत पोहोचली आहे हे दुर्लक्षित करता येणार नाही. गुजरात राज्यात मिळालेल्या मतांमुळे आम आदमी पक्षाला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा प्राप्त झालेला आहे. त्यामुळे भविष्यात भाजपला शह देणारा पक्ष म्हणून आप ओळख निर्माण करतो आहे. गुजरात विधानसभा निवडणुकीने आपची निर्माण केलेली नवी ओळख भारताच्या काँग्रेससह तमाम विरोधी पक्षांच्या भवितव्यावर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे. त्यामुळे काँग्रेसच्या पक्षनेतृत्वाने गुजरातमधील पराभवाचे गंभीरपणे चिंतन करून आपला जनाधार वाढवण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याची संधी गुजरात निवडणूक निकालाने करून दिलेली आहे.

विकासाचे राजकारण

गुजरात निवडणुकीत सुरुवातीच्या काळामध्ये भाजप सरकारला अँटी इन्कम्बनसीचा फटका बसेल असा अंदाज होता. परंतु भाजपने सलग सात वेळा गुजरातमध्ये विजय मिळवून विकासकामांच्या जोरावर प्रो-इन्कम्बनसीने सत्ता मिळवता येते हे दाखवून दिलेले आहे. नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली गुजरात मॉडेलच्या नावाने जे विकासाचे राजकारण गुजरातपासून ते देशपातळीवर अंमलात आणले गेले, त्याचा फायदा गुजरातसह देशातील सर्वच निवडणुकींत भाजपला मिळाला. जातीपातीच्या आणि धार्मिक ध्रुवीकरणाच्या राजकारणाला भाजपने विकासाचे इंजिन जोडून निवडणुकांमध्ये यश संपादन केले. त्यामुळे भाजपला रोखायचे असेल तर त्यांच्या विकास मॉडेलमधील उणिवा जनतेसमोर आणणे गरजेचे आहे. भाजपचे विकास मॉडेल समाजातील मूठभर वर्गाच्या हितसंबंधाच्या संरक्षणापुरते मर्यादित आहे हे जोपर्यंत जनतेला पटवून दिले जात नाही तोपर्यंत विरोधकांना यश मिळण्याची सुताराम शक्यता नाही हा गुजरात निवडणुकीने दाखविलेला आरसा आहे.

गुजरात विधानसभा निवडणूक निकाल हा भारतातील तमाम विरोधी पक्षांना दिलेला इशारा आहे. 2024 च्या लोकसभा निवडणुकीपर्यंत या इशाऱ्याचा अर्थ लक्षात घेऊन काम न केल्यास विरोधी पक्षांना दारुण पराभवासाठी तयार राहावे लागेल. अन्यथा, 2029 च्या लोकसभा निवडणुकीपर्यंत भाजप सरकारकडून एखादी मोठी चूक झाल्यामुळे जनमत आपोआप विरोधात जाईल आणि आपल्याला संधी मिळण्याची वाट पाहत राहणे हाच पर्याय उरेल.

- डॉ. महेंद्र पाटील
mahendrakakuste@gmail.com
(लेखक, एस.पी.डी.एम.महाविद्यालय, शिरपूर जि. धुळे येथे राज्यशास्त्र विभाग प्रमुख म्हणून कार्यरत आहेत.)

Tags: Election Gujrat Election Results Narendra Modi Voting Load More Tags

Comments: Show All Comments

Dr. Qadri Sajid

Very Nice Article Prof. M.V.Patil

Suresh Topkar

उत्कृष्ट विश्लेषण. अगदी भाजपच्या प्रचार मुद्द्यांचा अभ्यास करून तशीच मॉडेल्स विरोधी पक्षांनी अमलात आणली तर किंचित काहीतरी निभाव लागेल, कदाचित..

डॉ एस एन पटेल

अभ्यासपूर्ण विश्लेषण.... परंतु हरियाणा भाजपने सर्व काही करुन सुध्दा विजय मिळवता आला नाही

Prof Yuvaraj Bediskar

महेंद्र पाटील सर राजकीय विश्लेषण अभ्यासपूर्ण करण्यात तरबेज आहेत

Bhushan Yashwant Kuwar

अतिशय उत्तम विश्लेषण योग्य मुद्द्यांची मांडणी काँग्रेसने आत्मा परिक्षण करून भारतीय जनता पार्टीच्या उणिवा योग्य प्रकारे जनतेसमोर मांडणे व त्यांची मांडणी करणे. व्यक्तिगत टीका न करता भाजपाच्या अजेंडा कसा चुकीचा आहे त्यामुळे काय परिणाम होऊ शकतो हे जनतेसमोर मांडणे तरच काँग्रेसला यश मिळेल आपण अतिशय उत्तम विश्लेषण केले सर

Anup Priolkar

Perfect analysis.

Add Comment