लिहीत राहण्यासाठी मला झगडावेच लागते!

प्रसिद्ध तमीळ लेखिका सलमाशी साधलेला संवाद...  

मागील महिन्यात साहित्य अकादमी पुरस्कारांची घोषणा झाली. सोनाली नवांगुळ यांना 'मध्यरात्रीनंतरचे तास' या कादंबरीच्या मराठी अनुवादासाठी साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला. मूळ तमीळ कादंबरीचे नाव आहे 'इरंदम जमनकालीन कथाई' आणि तिची लेखिका आहे सलमा! सलमाच्या या पहिल्या कादंबरीला अनेक आंतरराष्ट्रीय पुरस्कारही मिळाले. लेखिका, सामाजिक कार्यकर्ती, राजकारणी असे विविधांगी व्यक्तिमत्त्व असणाऱ्या सलामाशी साधलेला हा संवाद...

प्रश्न - तुमच्या कादंबरीच्या मराठी अनुवादाला साहित्य अकादमी पुरस्कार मिळाल्याचे कळल्यावर कसे वाटले?
-  'इरंदम जमनकालीन कथाई'च्या मराठी अनुवादाला भारतातला एक महत्त्वाचा पुरस्कार मिळाल्यामुळे मला खूप खूप आनंद झाला. ही कादंबरी मराठीत अनुवादित झाली आणि ती वाचलेल्या वाचकांचे मला अनेक इ-मेल्स आले. याचाच अर्थ हे पुस्तक मराठी वाचकांनी उत्तमरीत्या स्वीकारले. पुरस्काराने अर्थातच आनंद द्विगुणित झाला.

प्रश्न - या कादंबरीला असा काही पुरस्कार मिळेल असे तुम्हाला वाटले होते का?
- ही कादंबरी इंग्लीशमध्ये अनुवादित झाली तेव्हा तिला काही आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले होते. त्यामुळे ही कादंबरी दुसऱ्या भाषेत अनुवादित झाली की त्यालासुद्धा पुरस्कार मिळतील अशी आशा होतीच.

प्रश्न - ही कादंबरी लिहायला तुम्हाला साधारण किती काळ लागला?
- ही कादंबरी पूर्णत्वाला नेण्यास मला तीन वर्षे लागली.

प्रश्न - मुस्लीम समाजाच्या रुढी, परंपरा कधी सांभाळत तर कधी मोडत तुम्ही तुमचे जगणे चालू ठेवले. याविषयी जरा आम्हाला सांगा.
- ज्या समाजात मी लहानाची मोठी झाले त्या समाजाची साहित्याशी काहीच ओळख नव्हती. त्यामुळे काही लिहिणे, वाचणे आणि प्रकाशित करणे तितकेसे सोपे नव्हते. मला अजूनही वादविवादाला तोंड द्यावे लागते. माझ्यासाठी ही न संपणारी समस्याच आहे. त्यामुळे लिहीत राहण्यासाठी मला झगडावेच लागते.

प्रश्न - सोनाली नवांगुळ यांच्या अनुवादित पुस्तकाच्या परिशिष्टात तुमच्या दोन मुलाखती आहेत. बालपण ते आत्तापर्यंतचा तुमचा प्रवास थक्क करणारा आहे. त्या प्रवासाविषयी काही सांगा.
- मी शाळेत गेले नाही, माझे शालेय शिक्षण होऊ शकले नाही. मी कायमस्वरूपी बंधनातच होते. माझ्या इच्छेविरुद्ध माझे लग्न केले. माझे आयुष्य एका खेड्यात त्याच पद्धतीने चालले होते. बहुतेक स्त्रिया असेच आयुष्य जगतात याची मला कल्पना आहे. संघर्ष करून मला यातून बाहेर पडायचे होते. सर्व समस्यांशी सामना करत मी माझ्या अस्तित्वाची जगाला जाणीव करून दिली. महिला लिहित्या होतात तेव्हा त्यांना समस्यांना सामोरे जावेच लागते. माझ्यासारखी पार्श्वभूमी असलेल्या महिलांना तर जरा जास्तच संघर्ष करावा लागतो. महिलांना सामाजिक, सांस्कृतिक, कौटुंबिक दडपशाहीला कायम सामोरे जावेच लागते. पण आता मात्र मी ही दडपशाही झुगारून दिली आहे!

प्रश्न - आपण आपल्या प्रत्येक गोष्टीवर हक्क सांगतो. मात्र तुम्ही बरेचसे लेखन, विशेषतः कविता स्वतःची ओळख लपवत, नाव बदलून लिहिल्या... 
- माझ्या लेखनाला माझ्या समाजाकडून आणि माझ्या कुटुंबाकडून खूप विरोध होता... म्हणून मी दुसरे नाव धारण करून लिहिले. लिहिण्यासाठी सतत संघर्ष करून मी थकले आहे. मी काय लिहावे आणि काय लिहू नये याची सर्व मानसिक बंधने झुगारल्यामुळेच मी मोकळेपणाने आणि नेमकेपणाने लिहू शकले.

प्रश्न - तुमच्या कवितांचा इंग्लीश अनुवाद झाला आहे का? 
- माझा वेगळा असा कवितासंग्रह नाही, पण माझ्या कविता वेगवेगळ्या कवितासंग्रहांचा भाग आहेत. 'वाइल्ड गर्ल्स विकेड वर्ड्स' या कवितासंग्रहात तमीळ भाषेतील महत्त्वाच्या चार कवयित्रींच्या कविता आहेत. त्यात माझ्याही कविता आहेत.

प्रश्न - तुमच्या एकूण साहित्यसंपदेविषयी आम्हाला सांगा.
- माझे दोन लघुकथासंग्रह आहेत. त्याशिवाय दोन कादंबऱ्या, तीन कवितासंग्रह आणि एक प्रवासवर्णन अशी साहित्यसंपदा माझ्या नावावर आहे. यातील बरेचसे साहित्य मल्याळम आणि इंग्लीश या भाषांमध्ये अनुवादित झाले आहे. आता सध्या मी तिसऱ्या कादंबरीचे लेखन करते आहे. ती लवकरच प्रकाशित होईल. कल्याणरमण यांनी माझ्या कविता आणि लघुकथा अनुवादित केल्या आहेत. मीना कंदसामी यांनी माझ्या दुसऱ्या कादंबरीचा अनुवाद केला आहे.

प्रश्न - लेखन, घरदार, मुलंबाळं, राजकारण सगळ्याच पातळ्यांवर कशा काय लढता? इतके बळ कुठून येते?
- जास्तीत जास्त वेळ लेखनात घालवणे हे माझे वेडच आहे. कोणत्याही महिलेसाठी कुटुंब म्हणजे दडपशाहीची यंत्रणाच असते आणि ती सांभाळण्यातच तिचा बराचसा वेळ जातो. पण मी या अडचणींच्या पलीकडे गेले आहे. राजकारण हे पूर्ण वेळ देऊन जबाबदारीने करण्याचे काम आहे. मी माझी दोन दशके राजकारणात घालवली आहेत. पण आता असे वाटते की, मी माझा वेळ वाया घालवला. माझी खरी ओळख माझे लेखन आहे. भविष्यात मी जास्तीत जास्त वेळ लेखनासाठी देणार आहे. लेखिका हीच माझी मूळ ओळख आहे.

प्रश्न - सर्व आघाड्यांवर काम करताना वेळेचे गणित कसे बसवता? याविषयी विस्ताराने सांगा म्हणजे आमच्यासारख्या इतर महिलांना तुमच्याकडून शिकता येईल.
- राजकारणात काम करताना वेळेचे गणित जुळवणे हे खूप मोठे आव्हान असते. ते कठीण असते. लिहिणे ही माझी वैयक्तिक बाब आहे. त्यामुळे केव्हा लिहायचे ते मी ठरवू शकते, पण राजकारण हा पूर्ण वेळेचा व्यवसाय आहे. मला कोणत्याही सबबी देता येत नाहीत की थांबता येत नाही. राजकारणात तुमचा वेळ तुमचा नसतोच. राजकारण माझा वेळ घेते आहे ही माझी अडचण आहे. अगदी आताचेच पाहा ना... मी या मुलाखतीची उत्तरे स्थानिक निवडणुकीच्या मध्यांतरात देते आहे.

प्रश्न - साहित्य क्षेत्रात अजून कायकाय काम करायचे आहे? याविषयी काही ठरवले आहे का?
- आता मी ठरवले आहे की, कादंबरी आणि आत्मचरित्र लिहायचे आणि मी ते लिहीन.

प्रश्न - गृहिणी, लेखिका, यशस्वी राज्यकर्ती यांपैकी कोणती भूमिका निभवायला तुम्हाला आवडते? त्याचे कारण काय? 
- गृहिणी म्हणून असलेली माझी ओळख मला आवडत नाही. लेखिका म्हणून असलेली माझी ओळख मला महत्त्वाची वाटते. लेखनामुळेच मला जागतिक पातळीवर ओळख आणि आदर आजपावेतो प्राप्त झाला आहे. मी स्वतःला यशस्वी राजकारणी समजत नाही. महिलेला राजकारणात यशस्वी होणे तितकेसे सोपे नसते. ते खरेच फार कठीण आहे. अजून तरी मी यशस्वी राजकारणी नाही.

(मुलाखत व शब्दांकन - ऋता ठाकूर, अहमदनगर)
rutavijayarv@gmail.com

Tags: मुलाखत सलमा ऋता ठाकूर साहित्य तमीळ कादंबरी Interview Salma Literature Ruta Thakur Novel Load More Tags

Comments: Show All Comments

मुकुंद रामचंद्र नगराळे

साधनामध्ये सोनाली नवांगुळ यांची मुलाखत वाचल्यावर उत्सुकता वाढली होती. आता या मुलाखतीमुळे भर पडली. लवकरच वाचायला सुरुवात करतो.

दत्ताराम जाधव.

दै.लोकसत्तामध्ये अनुवादकार सोनाली नवांगुळ यांनी लिहिलेल्या लेखात सलमा यांच्या याच कादंबरीवर घेतलेल्या मुलाखतीत कादंबरीचे नांव इरंधम नामशीन कधाई दिले आहे आणि ऋता ठाकूर यांनी घेतलेल्या मुलाखतीत इरंदम जमनकालीन कथाई म्हटलं आहे. असो.ऋता ठाकूर आणि सोनाली नवांगुळ यांनी सलमा यांच्या कादंबरीवर मुलाखत घेवून कादंबरीची उत्सुकता द्विगुणित केली आहे.विकत घेऊन नक्की वाचणार. दत्ताराम जाधव./मुंबई

विनायक रघुनाथराव पवळे

ऋता ने तमिळ लेखिका सलमा ची घेतलेली मुलाखत वैशिष्ठ्यपूर्ण वाटली ती यासाठी की, ऋता मराठी भाषेची विदुषी तर सलमा तमिळ भाषिक. लॉकडाऊन च्या काळात प्रत्यक्ष भेट नाही, तर भ्रमणध्वनीवर झाला संवाद. त्यासाठी आधार घ्यावा लागला इंग्रजी भाषेचा. परंतु ह्रदयाचा ह्रदयाशी संवाद व्हायला भाषेचा अडसर आलाच नाही. मुलाखतीतून भावना समजल्या आणि ऋता ने त्या छान पणे शब्दबद्ध केल्या. त्यामुळे सलमा आपलीच वाटायला लागली आणि अर्थातच तिचं साहित्य वाचण्याची जिज्ञासा निर्माण झाली यात शंकाच नाही. धन्यवाद ऋता! ....विनायक पवळे, अहमदनगर.

ब्रीजकुमार परिहार

"सलमा" यांच्या कादंबरीबद्दल खुप उत्सुकता होती. ती मराठीत आल्यापासून आवर्जून वाचण्याची धडपड सुरु आहे. (या मागे अर्थातच वेगळ कारणही आहे.) पण ही कादंबरी अशी वरचेवर वाचण्यासारखी निश्चितच नाही. त्यामुळे खरंतर तिचा अभ्यासच करणार आहे. आता ऋता यांच्यामुळे उत्सुकता पुन्हा निर्माण झाली आहे. दिवाळीनंतरचा Task हाच असेल. धन्यवाद ऋताजी..!

Ajaykumar Pawar

Very nice and outstanding conversation written by Ruta Thakur,she has honestly asked questions which are all in peopls mind, I think good job done by Ruta

चंद्रकांत भोंजाळ

ऋता ठाकूर यांनी घेतलेली सलमा ची मुलाखत खूप आवडली, सलमा यांच्याशी सविस्तर बोलायला हवे, धन्यवाद

Anjali Dilip kulkarni

खुप छान ऋता,मुलाखत वाचून कादंबरी वाचण्याची उत्सुकता वाढली आहे.

दत्ता दिकोंडा

खूप छान ऋता, सलमा सारख्या संघर्षातून पुढे आलेल्या भगिनीची ओळख करुन दिली. साधना चे तर खूपच धन्यवाद...!!!

संजय मेश्राम

छान ओळख करून दिल्याबद्दल ऋता ठाकूर आणि साधना परिवाराला धन्यवाद. मुलाखत आणखी सविस्तर हवी होती. लेखिकेच्या कथा, कादंबऱ्या यांचे विषय काय, आगामी कादंबरीचे कथासूत्र काय... आदी जाणून घेण्याची उत्सुकता आहे.

Hira janardan

मेश्राम ह्यांच्याशी मी सहमत आहे.

Add Comment

संबंधित लेख