कृतिशील विचारवंत - ईहवादी प्रतिभावंत 

साहित्य अकादमी आयोजित ‘हमीद दलवाई - व्यक्ती आणि साहित्य’ या परिसंवादातील प्रास्ताविक

भारतीय साहित्य आणि भाषा यांच्या संवर्धनासाठी कार्यरत असणारी सर्वोच्च राष्ट्रीय संस्था म्हणजे साहित्य अकादमी. त्यामुळे अकादमीद्वारे आयोजित परिसंवाद आणि चर्चासत्र यांचे विशेष महत्त्व असते. एखादी व्यक्ति, साहित्य, विचार राष्ट्रीय स्तरावर पोहोचवण्यासाठी अकादमीचे कार्यक्रम उत्प्रेरक ठरत असल्याचा आजवरचा अनुभव आहे. अकादमीने 25 मे 2021 रोजी ‘हमीद दलवाई - व्यक्ती आणि साहित्य’ याविषयावर ऑनलाईन परिसंवादाचे आयोजन केले होते. न्यायमूर्ती हेमंत गोखले या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. यावेळी अकादमीच्या मराठी सल्लागार मंडळाचे सदस्य एकनाथ पगार यांच्यासह प्रा. नितीन रिंढे, विनोद शिरसाठ, अन्वर राजन आणि अझरुद्दीन पटेल या वक्त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. या परिसंवादाचा वृत्तांत इथे वाचता येईल. परिसंवादात एकनाथ पगार यांनी  केलेले प्रास्ताविक कर्तव्यच्या वाचकांसाठी प्रसिद्ध करत आहोत. 

दलवाईंचे व्यक्तित्व विचारवंत, लेखक, संघटक आणि उद्बोधनाचे कार्यकर्ता अशा विविध भूमिकांनी साकारलेले आहे. लेखक-पत्रकार-विचारवंत या भूमिकांच्या केंद्रस्थानी उद्बोधनकार, कर्तासुधारक या भूमिकाच आहेत.

‘मोहम्मद अली जिना - मुस्लीम नेतृत्वाचा एक अभ्यास’ या दलवाईंनी लिहिलेल्या लेखात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे एक अवतरण उद्धृत आहे. ते असे –

‘एखाद्या व्यक्तीचे मूल्यमापन जेव्हा ती व्यक्ती नुसत्या वैचारिक पातळीवर काम करते तेव्हा त्या व्यक्तीच्या विचारांमधून करावयाचे असते; परंतु अशी व्यक्ती जेव्हा कृतिशीलही असते तेव्हा विचारांच्या व कृतीच्या संदर्भात तिचे मूल्यमापन करावे लागते आणि विचार आणि कृती परस्परविरोधी असतील तर ते कृतीच्या संदर्भात करावे लागते.’

दलवाई पुढे म्हणतात - ‘जिना काय किंवा गांधीजी काय... कोणाचेही मूल्यमापन याच संदर्भात केले गेले पाहिजे. किंबहुना मी तर पुढे जाऊन असे म्हणेन की, व्यक्ती, तिने केलेली आंदोलने, तिचे विचार, तिच्या कृती या साऱ्यांचे बरेवाईट परिणाम कोणाचेही मूल्यमापन करताना विचारात घ्यावे लागतील.’

दलवाई हे सेक्युलर विचारवंत होते तसे समाजवास्तवाचा अन्वयार्थ लावणारे ललित लेखकही होते. आपल्या विचारांना कृतीने आविष्कृत करण्यासाठी त्यांनी चळवळी उभारल्या, सत्यशोधक मंडळ स्थापन केले. मेळावे, मोर्चे, अभ्यासवर्ग, पाहणीदौरे, लोकसंवाद उपक्रम यांचे अद्वैत साधणारे ‘विचारकृत’ विवेकी व्यक्तित्व होते.

प्रतिभावंत वास्तवसाक्षी लेखकपण त्यांच्या ठायी होते. 1955 ते 1965 या काळात त्यांनी कथा-कादंबरी असे कथनात्मक साहित्य निर्माण केले आहे. मौज, सत्यकथा, वसुधा, मराठवाडा या नियतकालिकांतून त्यांनी कथालेखन केले. त्यांच्या ‘लाट’ (साधना) कथासंग्रहातल्या कथांमधून ग्रामीणता, ग्रामीण वास्तव आणि मुस्लीम भावविश्व, स्त्री-जीवनातील दमन, दारिद्र्‌य आणि सामाजिक विषमता अशा आशयसूत्रांचे हे आविष्करण आहे.

‘जमीला जावद’ (साधना) या कथासंग्रहात 1952-1966 या काळातील मुस्लीम समाजजीवनाचे अंतरंग दर्शवणाऱ्या 11 कथा आहेत.‘वंगण’ हा कथासंग्रह साधना प्रकाशन लवकरच प्रकाशित करत आहे. त्यामध्ये 1955-1965 या काळातील 15 कथा आहेत.

‘इंधन’ही कादंबरी (1966) कोकणी खेड्यातील समूह, मानस प्रकट करते. जातीय, धार्मिक, सामाजिक स्तरभेद दर्शवते. वास्तवलक्ष्यी कथानकातून दलवाईंनी मुस्लीम कुटुंब, इतर सामाजिक गट, व्यक्तिसंबंध, नातीगोती आणि दंगाहिंसा यांचे चित्रण केले आहे. ही कादंबरी अप्रत्यक्षपणे स्त्रीजीवनाची आणि समूहजीवनाची शोकात्म जाणीव करून देते. धर्माच्या आधाराने घडलेले संघर्षक्षण असहायता-हतबलता कसे निर्माण करतात याची कथारेषा इथे प्रबळ आहे. अज्ञान - दारिद्र्य - स्वकेंद्रित्व यांचे भेदक चित्रण आहे.

तटस्थपणे - बाजू वगैरे न घेता प्रत्यक्षगत घटना, माणसे यांना दलवाईंनी ‘इंधन’मध्ये संयमाने जिवंतपण दिले. पात्रांच्या संवादात खास चिपळूण परिसरातील बोलीचे उपयोजनही वैशिष्ट्यपूर्ण आहे. कथांच्या तुलनेने ‘इंधन’ ही कादंबरी अधिक चर्चेत राहिली आहे. अभ्यासक्रमात - संशोधन उपक्रमांतही ‘इंधन’चे आशयनावीन्य आणि लेखकाची जीवनदृष्टी यांमुळे मराठी ग्रामीण कादंबरीच्या इतिहासात तिला वैशिष्ट्यपूर्ण स्थान मिळाले आहे.

मुस्लीम समाजातला जन्म, वावर, समाजवादी विचार, इहवादी विचार, मुस्लिमांमधील स्त्री-जीवनाचे अवकळा आलेले दर्शन, राष्ट्र सेवादलातला सहभाग, मुस्लिमांमधील सामाजिक-आर्थिक शोषणाचे प्रसंग, उलेमा किंवा तत्सम मुस्लीम धर्मप्रवक्ते यांचे आदेशात्मक विचार, मुस्लिमांचे शिक्षण - उर्दूसारखे माध्यम - समकालीन उच्च शिक्षण आणि मुस्लिमांचे शिक्षणग्रहणाचे तोकडे प्रयत्न, हिंदू-मुस्लीम संबंध, दंगेधोपे, बांगलादेश-जम्मू काश्मीर सीमावर्ती प्रदेशांतील मुस्लिमांची दशा, भारतीय राज्यघटनेचे 1950नंतरचे चलनवलन अशा विविध घटितांच्या संस्कारांनी बुद्धिप्रामाण्यवादी - विवेकवादी विचारी कार्यकर्ता अशी दलवाईंची प्रतिमा निर्माण झाली. यांमधूनच वैचारिक साहित्याची निर्मिती त्यांनी केली आहे.

1968मध्ये ‘मुस्लीम पॉलिटिक्स इन सेक्युलर इंडिया’ हे इंग्लीशमधले प्रबंधात्मक लेखन प्रकाशित झाले आहे. कवी दिलीप चित्रे यांनी हे शब्दांकन केले आहे. प्रा. अ. भि. शहा, यदुनाथ थत्ते, नरहर कुरुंदकर, भाई वैद्य यांच्या विचारांचे सान्निध्यही दलवाईंना मिळाले आहे. सेक्युलर-ईहवाद आणि बुद्धिप्रामाण्यवाद त्यांनी आपल्या विचारकृतींमध्ये मुरवलेला दिसतो. मुस्लीम धर्माची, मुस्लीम संस्कृतीची, मुस्लीम स्त्रीजीवनाची चिकित्सा त्यांनी केली. राजकारणातले मुस्लिमांचे अस्तित्व कोणते, भारतीय परिप्रेक्ष्यात मुस्लिमांच्या अल्पसंख्यत्वाचे काय करायचे, भारत हे बहुधार्मिक, बहुभाषक, बहुसामाजिक, बहुसांस्कृतिक राष्ट्र आहे. स्वातंत्र्य-समता-बंधुता, सामाजिक न्याय, धर्मातीतता, वैज्ञानिक दृष्टीकोन या मूल्यांवर आधारलेल्या भारतीय राज्यघटनेचे अनुसरण आपण करत आहोत... तेव्हा ‘समान नागरी कायदा’ हा विषयही त्यांच्या विचारविमर्शात आणि सुधारकी कृतींमध्ये आलेला आहे.

मुस्लीम पॉलिटिक्स इन सेक्युलर इंडियाचे (1968) ‘भारतातील मुस्लीम राजकारण’ हे अनुवादित पुस्तक पुढे प्रकाशित झाले. 1968मध्ये ‘मुस्लीम जातीयतेचे स्वरूप - कारणे व उपाय’ हे वैचारिक पुस्तक साधना प्रकाशनाने प्रकाशित केलेले आहे.

1966मध्ये तेव्हाचा पूर्व पाकिस्तान (म्हणजे आत्ताचा बांगलादेश) सीमारेषेवर जाऊन त्यांनी भारतीय प्रदेशातल्या लहानथोरांशी संवाद साधला. या वृत्तान्तकथनाची पुस्तिका ‘इस्लामचे भारतीय चित्र’ या नावाने प्रकाशित झाली आहे. 2002मध्ये ‘भारतीय मुसलमान आणि राष्ट्रीय एकात्मता’ हे विचारचिंतन आले.

मुस्लिमांचे सर्वांगीण उत्थान व्हावे आणि विश्वनागरिकत्वाचे भानही जागे व्हावे म्हणून त्यांनी आपल्या वैचारिक साहित्यातून ईहवादी सेक्युलर, उदारमतवादी विचारविश्व उभारले आहे. वैचारिक प्रबोधन आणि मुस्लीम समाजाची सुधारणा यांची सांगड घालणारे हे त्यांचे लेख म. फुले, आगरकर, लोकहितवादी ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या वैचारिक लेखनाच्या परंपरेतले पुढचे पाऊल ठरते. निर्भयतेने आणि बुद्धिप्रामाण्यावर आधारलेल्या समाजसुधारणेचा कार्यक्रम त्यांनी आखला. नवमतवादी प्रबोधनाचे कृतिकार्यक्रम हाती घेतले.
त्यांच्या कृतिउपक्रमांतून सुधारणावादी चळवळींना प्रारंभ झाला. विशेषतः राज्यघटना अस्तित्वात आल्यानंतरच्या काळातले 27 वर्षांतले हे मुस्लिमांचे उत्थानकार्य म्हणावे लागेल. यातले महत्त्वाचे कृतिउपक्रम पाहू...

18 मार्च 1966 या दिवशी मुंबई विधानसभेवर सात मुस्लीम महिलांचा मोर्चा किंवा एप्रिल 1968मध्ये सदा-ए-निसवां (स्त्रियांचा आवाज) या मुस्लीम स्त्रियांच्या संघटनेची स्थापना - मुस्लीम समाजाचे प्रबोधन व्हावे म्हणून संघटना-स्थापनेचे प्रयत्न त्यांनी केले. त्यातूनच त्यांनी इंडिअन सेक्युलर सोसायटीची स्थापना 1968ला केली. या सोसायटीचे अध्यक्ष प्रा. अ. भि. शहा होते तर दलवाई उपाध्यक्ष होते. म. फुले यांच्या सत्यशोधक समाजाच्या धर्तीवर मुस्लीम सत्यशोधक मंडळ 22 मार्च 1970ला स्थापन केले. ‘समान नागरी कायदा’ करावा असे 500 मुस्लीम स्त्री-पुरुषांचे निवेदन 8 एप्रिल 1970 या दिवशी त्यांनी तत्कालीन मुख्यमंत्र्यांना दिले. 

मुस्लीम कार्यकर्त्यांची अभ्यासशिबिरे, अखिल मुस्लीम परिषदांचे आयोजन, मुस्लीम शिक्षण परिषदेचे आयोजन, कार्यकर्ता स्नेहमीलन शिबिरे, ऑल इंडिया कॉन्फरन्स फॉर फॉरवर्ड लुकिंग मुस्लीम, महाराष्ट्र मुस्लीम सामाजिक परिषद अशा आयोजनांबरोबरच मुस्लीम सत्यशोधक पत्रिका प्रकाशन या चळवळी त्यांनी केल्या. पुरोगामित्व हे सत्त्व मुस्लीम समाजात यावे असे स्वप्न ते पाहत आले आणि प्रबोधनाच्या चळवळींना बळ दिले. भारतात आणि सीमावर्ती प्रदेशात मुस्लीम समाजाच्या अंतरंगाचे दर्शन त्यांनी घेतले. पाहणी, अभ्यासदौरे, सभा, बैठका, परिषदा, विचारसत्रे, मोर्चे, निवेदने अशा विविध मार्गांनी मुस्लीम समाजाची मानसिकता उन्नत, उदार आणि प्रगल्भ व्हावी म्हणून प्रयत्न केले.

त्यांच्या विचारांत आणि कृतिउपक्रमांत सतत संगती राहिली. मुस्लीम समूहमानस विचलित व्हावे; सनातनी धर्मविचारात आधुनिकता यावी; समता, बंधुता, स्वातंत्र्य यांचे मोल राखले जावे अशी त्यांची अपेक्षा होती. संस्कृती, धर्मविचार यांत काळानुरूप परिवर्तन घडले पाहिजे. किंबहुना वास्तवाची कठोर चिकित्सा व्हावी. बुद्धिवादी दृष्टीने समाज, धर्म, संस्कृती, वर्तमान जीवनसंदर्भ तपासणे आवश्यक असते. सनातनी धर्ममार्तंडांना काळाची आणि मानव्याची जाणीव व्हावी ही कळकळ त्यांच्या व्यक्तित्वात होती. ध्येयनिष्ठा, निर्भयता आणि बुद्धिवाद यांच्या आधारावरच त्यांनी त्यांच्या चळवळींना चैतन्य दिलेले दिसते.

दलवाईंच्या कृती-उक्ती-संघटनबांधणीत जीवनजाणिवांमध्ये वेगळेपण आणि बंडखोरी आहे. रूढ मुस्लीम संकेतांमधील नको असलेल्या गोष्टींवर त्यांचे आघात आहेत. धर्म - धर्मग्रंथ - सांस्कृतिक चौकटी, तत्त्वज्ञान, आचारव्यवहार यांत परिवर्तन व्हावे; विचारदृष्टी आणि आचारसंकेत बदलावेत असा प्रखर बुद्धिवाद दलवाईंनी मांडला आहे. शब्दप्रामाण्य किंवा ग्रंथप्रामाण्य, धर्मरक्षक हे सारे नाकारण्याचे धाडस त्यांनी दाखवले.

त्यांच्या प्रखर, बौद्धिक कृतिउक्तीमध्ये प्रक्षोभ ठासून भरलेला आहे. ‘कुराण हा ईश्वराचा अखेरचा आणि परिपूर्ण संदेश आहे अशी ज्याची श्रद्धा आहे तो आणि फक्त तोच मुसलमान’ ही व्याख्या त्यांनी अमान्य केलीही. धर्मग्रंथ किंवा प्रेषित यांना प्रश्नांकित करूनही ‘मी मुसलमान आहे!’ अशी ग्वाही ते देतात. दलवाईंच्या विचारांना - चळवळींना परंपरागत, सनातनी विचारांच्या लोकांकडून नकार मात्र मिळत राहिला. धर्मग्रंथ किंवा शब्दप्रामाण्य प्रश्नांकित करण्याची ही कृती निषेधात्मक मानली गेली. मुस्लीम व्यक्तिगत कायदा, धर्मप्रमुखांचे इशारे/फतवे यांचा आग्रह कायमच राहिला आहे.

आधुनिक मूल्यसरणी ही बुद्धिप्रामाण्य, वैज्ञानिक दृष्टी यांवर आधारलेली आहे. निखळ मानव्य हेच त्यांचे इप्सित होते. मुस्लीम स्त्रीजीवनाकडे निखळ मानव्य विचाराने पाहणारे दलवाई हे पहिलेच कृतिशील विचारवंत ठरतात, ईहवादी प्रतिभावंत लेखक ठरतात.

- एकनाथ पगार

Tags: Eknath Pagar Speech Sahitya Akademi Muslim Islam Reforms Social Movement हमीद दलवाई एकनाथ पगार साहित्य अकादमी मुस्लीम इस्लाम समाज सुधारणा व्यक्तिवेध Load More Tags

Comments:

अभ्यासपूर्ण विश्लेषण

पुरोगामित्व मुस्लीम समाजात यावे म्हणून हमीद दलवाईंसारखे लेखक, कार्यकर्ते यांची संख्या मुस्लीम समाजात वाढली पाहिजे.

Add Comment