कोरोनाच्या साथीचे मानसिक संसर्ग रोखण्यासाठी...

विमानतळावरून बाहेर पडताना प्रवाशांच्या शरीराचे तापमान मोजताना कर्मचारी (फोटो सौजन्य: jagran.com)

सुरुवातीला केवळ काही देशांपर्यंत मर्यादित असलेली कोरोनाची साथ फेब्रुवारी महिन्यापासून जगभरात पसरू लागली आहे. मानवजातीचा साथीच्या आजारांचा आजवरचा इतिहास पाहता, या साथीवर ताबा मिळवण्यासाठी साधारण एखाद्या वर्षाचा कालवधी लागू शकतो. कोरोनासारखे साथीचे आजार केवळ माणसाच्या शरीरावरच हल्ला करतात असे नाही, तर ते समाज जीवनाच्या इतर अनेक महत्वाच्या क्षेत्रांवरही प्रभाव टाकून जातात. 

कोरोनाच्या साथीचा आर्थिक आणि सामाजिक क्षेत्रावर झालेला परिणाम आपल्याला दिसू लागलेलाच आहे. पण मानसिक आरोग्यावरील परिणामही आता जाणवू लागले आहेत. गेल्या काही वर्षांपासून मानसिक आरोग्याविषयी समाजात जागृती होत असल्याचे दिसून येते. कोरोनामुळे मानसिक आरोग्यावर होणाऱ्या परिणामांविषयीही आपल्या समाजात चर्चा सुरु झाली, हे देखील महत्वाचे आहे. या निमित्ताने कोरोनाच्या साथीमुळे होणाऱ्या मानसिक परिणामांविषयी थोडे समजून घेवूया...

आपल्याला पुरेशी माहिती नसणाऱ्या कोरोनासारख्या संसर्गजन्य आजाराला मानवी मन तीन प्रकारे प्रतिसाद देवू शकते. व्यक्तीने दिलेल्या भावनिक प्रतिसादाचे रुपांतर पुढे कोरोनासारख्या साथीला समाजाने दिलेल्या मनोसामाजिक प्रतिसादात होते. 

यातील पहिला भाग आहे तो साथीच्या संभाव्य परिणामांकडे ‘दुर्लक्ष’ करण्याचा. सुरुवातीला काही प्रमाणात चीनमध्ये आणि नंतर इटलीमध्येदेखील समाजमनातून याच स्वरुपाची प्रतिक्रिया आली. आणि त्याचे तोटे आता आपण बघतच आहोतच. दुसरी प्रतिक्रिया असते ‘चिंताग्रस्त’ होण्याची. ‘आता आपले कसे होईल? आपल्याला किंवा आपल्या जवळच्या व्यक्तीला हा आजार होईल का? आपल्याला मृत्यूची तर भीती नाही ना?’ इथपासून ते ‘जगाचा अंत आता जवळ आला आहे’ इथपर्यंत, अशी कोणत्याही प्रकारची ही प्रतिक्रिया असू शकते! 

दैवी उपचाराचा दावा करणारे बाबा, मौलवी, पाद्री यांसारखी मंडळी मानवी मनाच्या या आदिम दुर्बलतेचा गैरफायदा उचलतात. म्हणूनच गेल्या दोन आठवड्यात कोरोनावर इलाज म्हणून विविध प्रकारचे तेल, गोमुत्र यांपासून ते ज्यावर झोपल्याने कोरोना होत नाहीत अशा गाद्या; अशा अनेक गोष्टी बाजारात विकल्या जात आहेत.
 
तिसरा प्रतिसाद असतो त्या आजाराच्या साथीच्या वास्तवाला सामोरे जाण्याचा. यामध्ये नागरिक आजाराविषयीची योग्य माहिती तज्ञ व्यक्तींकडून घेतात आणि त्यानुसार शास्त्रीय पद्धतीचा अंगीकार करत करोनाच्या साथीला सामोरे जातात. आजवरच्या मानवी इतिहासावर दृष्टिक्षेप टाकल्यावर लक्षात येते की, कोरोनासारख्या साथीच्या आजाराला शास्त्रीय पद्धतीने सामोरे जाण्याची पद्धतच सर्वांत प्रभावी ठरली आहे.
 
मात्र सगळेच मानवी समूह शास्त्रीय पद्धतीचा वापर करतीलच असे नाही. राजकीय नेते, प्रशासन, आरोग्य यंत्रणा, माध्यमे आणि नागरिक हे सगळे घटक साथीविषयी त्या देशाचा मनोसामाजिक प्रतिसाद ठरवत असतात. धर्म, जात, देश अशा मानवनिर्मित सीमांमध्ये अडकणे किंवा आपत्तीच्या वेळी लोकांच्या अडचणींचा गैरफायदा उचलून नफेखोरी करणे, अशा कुप्रवृत्तीही जगभरात दिसून येतात. 

अशा स्वरूपाचा मनोसामाजिक प्रतिसाद हा कोरोनासारख्या साथीची तीव्रता अनेक पटींनी वाढवू शकेल अशी भीती युवाल नोआ हरारीसारखे विचारवंत आणि अमेरिकेसारखे देश व्यक्त करीत आहेत, हे या निमित्ताने आपण समजून घेतले पाहिजे. हे झाले सामाजिक मानसिक पातळीवरचे परिणाम. आता आपण व्यक्तिगत पातळीवरचे मानसिक परिणाम समजून घेवू. 

कोरोनासारख्या साथीच्या आजाराचा सर्वाधिक मानसिक परिणाम अती चिंतेचा आजार व स्वभाव असलेल्या व्यक्तींना होतो. समाजात मोठ्या प्रमाणात दिसून येणारा हा विकार असल्यामुळे या घटनेचे गांभीर्य वाढते. कोरोनासारख्या साथीच्या काळात अशा लोकांना असणारा त्रास वाढतो. झोप व जेवण कमी होणे, चिडचिड वाढणे, कोणतेही शारिरीक कारण नसताना डोके दुखणे, असलेल्या चिंतेची तीव्रता वाढणे, आपल्याला करोनाचा आजार होईल अशा भीतीने ग्रासले जाणे इत्यादी स्वरुपाची लक्षणे या व्यक्तींमध्ये दिसू लागतात.

‘ओब्सेसिव्ह कंपल्सिव डीसऑर्डर’ नावाचा एक मानसिक आजार असतो. त्यात आजारी व्यक्ती स्वच्छतेविषयी अतिरिक्त संवेदनाशील असतात. करोनाच्या आजारात स्वच्छतेचे नियम सर्वांनाच अधिक जागरूकपणे पाळावे लागतात. अशावेळी हा आजार असणाऱ्या लोकांचा त्रास काही कालवधीकरिता वाढूही शकतो.

दुसरा महत्वाचा मानसिक परिणाम होतो तो विलगीकरणाला (Isolation) सामोरे जावे लागणाऱ्या व्यक्तींना. आपल्या देशात विलगीकरणाची सुविधा बहुतांशवेळा सरकारी इस्पितळांत असते. अशा इस्पितळांमधील स्वच्छतागृहे, पिण्याचे पाणी, स्वच्छता अशा महत्वाच्या गोष्टी अनेकदा अत्यंत दुर्लक्षित स्थितीत असतात. केवळ संशयावरून विलीगीकरण केलेल्या व्यक्तीला ‘आपल्याला कोरोनाचा संसर्ग झाला आहे का नाही’ या विषयीच्या अनिश्चितेने ग्रासलेले असते.

या विलगीकरण कक्षात करमणुकीची साधने नसतात. अशा अडचणीच्या व अनिश्चिततेच्या परिस्थितीत मानसिक ताणातील वाढ ही स्वाभाविक प्रतिक्रिया आहे. हा तणाव टोकाचा वाढला तर व्यक्ती अशा विलागीकरण कक्षातून पळून जाण्याची आणि स्वत:ला इजा करण्याची शक्यता असते. दिल्लीमधील एका विलगीकरण कक्षातील कोरोनाच्या संशयित रुग्णाने आत्महत्या केल्याची घटना ताजी असताना, विलागीकरण करताना मानसिक आरोग्याचीजी काळजी घ्यावी लागते त्या विषयी जागरूक होणे आवश्यक आहे.  

केरळसारख्या राज्यात विलागीकरण कक्षातील लोकांशी संवाद साधण्याचे वेगळे प्रशिक्षण आरोग्य यंत्रणेला देण्यात येत आहे. विलगीकरणातील व्यक्तीशी नीट संवाद केला; त्याला योग्य माहिती दिली; मनोरंजनाची साधने उपलब्ध करून दिली, तर विलगीकारणाच्या कालखंडातील ताणतणाव हाताळणे संशयित अथवा बाधित व्यक्तीला सोपे जावू शकते.

विलगीकरणाच्या कालखंडात हातावर पोट असलेल्या व्यक्तींना आर्थिक समस्या भेडसावू लागतात. या परिस्थितीचा त्यांच्या मानसिकतेवर मोठा परिणाम होतो. यंत्रणेने आणि समाजाने त्यांच्या मनस्थितीचा आणि परिस्थितीचा विचार करायला हवा. विलागीकरण कोशातून बाहेर आल्यानंतरही अशा रुग्णांना किंवा त्यांच्या कुटुंबाला बहिष्कृत करणे, अशा गोष्टी भीती आणि अज्ञानामुळे समाजाकडून होऊ लागल्या आहेत. ज्यांना आधाराची गरज आहे त्यांनाच अशा प्रकारे बहिष्कृत करणे हा कायद्याने तर गुन्हा आहेच पण ती अमानवी कृतीदेखील आहे.

शाळा आणि कार्यालये बंद झाल्याने किंवा घरून काम करायचे असल्याने, रोजचे काम नाही याचा सुरुवातीला आनंद वाटू शकतो पण एका मर्यादेनंतर ते देखील कंटाळवाणे होऊ लागते. अशावेळी अचानकपणे उपलब्ध झालेल्या या वेळेचा उपयोग आपल्या आनंदाच्या गोष्टी करण्यासाठी, कुटुंबासोबत वेळ घालवण्यासाठी, काही नवीन छंद जोपासण्यासाठी करता येवू शकतो. आपले मानसिक आरोग्य चांगले ठेवण्यासाठी या सर्वांचा उपयोग होऊ शकतो.

आरोग्य सुविधा पुरवणाऱ्या व्यक्तींना या कालखंडात अधिक ताणाला सामोरे जावे लागते. रुग्णाच्या संपर्कात आल्यामुळे त्यांना या आजाराची लागण होण्याची शक्यताही अधिक असते. याचा ताण त्यांच्या स्वत:वर प्रकृतीवर आणि कुटुंबियांवर पडतो. अशावेळी त्यांना भावनिक आधार देणे; त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करणे, हे देखील समाज म्हणून आपले कर्तव्य आहे.

प्लेग किंवा देवी यांच्या साथीच्या तुलनेत कोरोनाच्या साथीला सामोरे जायला आजचे जग खूपच अधिक सक्षम आहे. कोरोनासारख्या साथीच्या रोगांची संकटे मानवी मनाला अस्वस्थ करून घाबरून टाकतात हे जरी खरे असले तरी, मानवी मनातील स्वत:पलीकडे बघण्याच्या भावनेलाही ती जागृत करत असतात. प्लेगच्या साथीमध्ये लोकांची सेवा करत असताना सावित्रीबाई फुलेंना मृत्यू आला होता. कोरोनाचा सामना करणाऱ्या काही आरोग्य कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाल्याचे प्रसंगही घडत आहेत.

मानसिक पातळीवर या साथीकडे संकट म्हणून बघायचे की धीराने आणि विचारपूर्वक सामोरे जायचे, हे प्रत्येकाने स्वत:शी आणि समाज म्हणून आपण सर्वांनी ठरवण्याची हीच वेळ आहे. 

- डॉ. हमीद दाभोलकर, सातारा.
hamid.dabholkar@gmail.com 

(लेखक मानसोपचार तज्ज्ञ आहेत. ते परिवर्तन संस्था आणि महाराष्ट्र अंनिस या संस्थांसोबत काम करतात.)

Tags: करोना हमीद दाभोलकर मानसिक स्वास्थ्य Hamid Dabholkar Corona Corona Virus Pendemic कोरोना Load More Tags

Comments: Show All Comments

माधव बावगे

९४०४८७०४३५

मीरा भानुदास बोरकर

सर आपण खूपच अभ्यासपूर्ण लेख सादर केला आहे.या लेखामुळे आपण स्वतःला मानसिक ताण न घेता कोणत्याही परिस्थितीत मानसिकता चांगली ठेवावे याचे मार्गदर्शन होते तसेच आपल्याबरोबर असणार्या व्यक्तींना आपण माहिती देऊ शकतो.अधश्रदधेपेक्षा आरोग्यसेवा महत्त्वाची आहे हेही सर्वांनी स्विकारले पाहीजे खूप खूप धन्यवाद

सीए.दत्तात्रय खेमनर

हमीद सर , आपण छान लेख लिहिलाय. मानसिक खंबीरपणा वाढिण्याकरिता सद्याच्या परिस्थितीमध्ये आपला लेख उपयोगी पडेल.

डॉ सुनील पाटील

सर, सदर लेखा बाबत आपले खुप आभार, एकटे पणाच्या काळात स्वतःचे आत्मपरीक्षण करुन मानसिक दृष्ट्या स्वतःला ह्या अनिबाणीच्या काळात कसे सक्षम बनवणे गरजेचे आहे याचा विचार करण्यासाठी सदरचा लेख खूप महत्त्वाचा आहे. डॉ सुनील पाटील. अध्यक्ष शिवशंभो आधार निवासी व्यसनंमुक्ती केंद्र, कोडोली ता. पन्हाळा जि. कोल्हापूर.

जयंत काटकर

सर खूप खूप धन्यवाद अश्या आणीबाणी प्रसंगी आपला लेख खूप मानसिक आधार देणारा आहे असेच व्यक्त होत रहा धन्यवाद

निशांत सुनंदा विश्वास

सर, अत्यंत महत्वाचा अन् योग्यवेळी लेख आम्हांला सुपूर्द केल्या बद्दल आभार. हे कर्तव्य तुमच्याकडूनच अपेक्षित होतं ते तूम्ही पूर्ण केलत असं मला वाटतयं. प्रत्येकजन या प्रसंगातून जात आहे त्याचा फायदा काही लोक व संस्था भय पसरवण्याचं काम करत आहेत. या ताणामुळे बहूतांश माणसांच्या मानसिक आरोग्याचे प्रश्न गंभीर होत आहेत. आपण यावर सतत व्यक्त होत रहावं कारण या आजाराचे आणि त्यानं केलेल्या प्रलयाचे पडसाद खुप काळ मानवी मनावर परिणाम करत राहणार आहेत. धन्यवाद...

Daniel M

अश्या social - distancing च्या काळात extrovert, out-going व्यक्तिमत्त्व असलेल्या लोकांना चटकन एकटे राहणे त्रासदायक वाटु शकते.तर याऊलट introvert लोकांना हा काळ आनंददायी वाटु शकतो.

विष्णू काटकर

विषयाचा आवाका मोठा असून तो छानच संक्षिप्त केलात,आवडला लेख

प्रभा पुरोहित

करोना साथीचा मनोवैज्ञानिक दृष्टिकोनातून चांगला आढावा लेखात आला आहे. थोडे अधिक विस्ताराने आले तर आवडले असते.

छाया पोवार

खूप चांगला लेख यावेळी सर्वसामान्य जनतेचे मनोधैर्य वाढवणे गरजेचे आहे . अतिशय उपयुक्त माहिती मिळाली.

सुनील स्वामी

डॉक्टर, लेख खूप महत्त्वाचा आहे. बेफिकीर वृत्ती आणि नंतर दहशतीखाली जाणं या दोन्ही गोष्टी मोठ्या प्रमाणात घडतायत. न्युज चॅनल्सवर दिवसभर त्याच त्याच बातम्याही लोकांच्या मनात दहशत, काळजी निर्माण करतात. अशावेळी दिवसभरात एखादेवेळीच बातम्या पाहणे चांगले. वेळीच गांभिर्य ओळखून काळजी घेणं चांगलं..

बबन कानकिरड अकोला

कोरोना चिंंता कण्यापेक्षा उज्ज्वल भविष्यासाठी चिंंतन करण्याची गरज आहे!

प्रशांत देशपांडे. नाशिक.

डॉक्टर, करोनाची मानसिक दहशत कमी होण्याच्या व समाज व्यवहारातील तारतम्य ध्यानात येण्याच्या अनुशंगाने आपला लेख खूपच प्रभावी ठरतो.

मृणालिनी दत्तात्रय मोरे

मनोधैर्य वाढविणे आणि जनजागृती करणे गरजेचे आहे. मी ही clinical psychologist and counseling म्हणून काम करत आहे.सोलापूर मध्ये राहून आम्ही कशाप्रकारे मदत करू शकतो?

Add Comment