6 मार्च 2026 ला अजित शिरोळे लिखित आणि शिवानी राजेशिर्के-अजित शिरोळे या वडील-मुलीच्या जोडीने दिग्दर्शित केलेला ‘भिडेवाडा : जातीपलीकडची माणसं’ नावाचा चित्रपट प्रदर्शित झाला. महात्मा जोतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या कार्याचं महत्त्व आधुनिक तरुण पिढीच्या दृष्टीकोनातून समजून घेणारा हा चित्रपट आहे. येत्या 11 एप्रिलला महात्मा जोतिबा फुले यांचे 200 वे जयंतीवर्ष सुरू होत आहे. त्यानिमित्त अजित शिरोळे, शिवानी राजेशिर्के आणि या चित्रपटात महात्मा फुले यांची भूमिका साकारणारे अभिनेते धीरेश जोशी यांच्याशी संवाद साधला.
‘भिडेवाडा – जातीपलीकडची माणसं’ ही गोष्ट तुम्हाला सांगावीशी का वाटली?
अजित शिरोळे : माणूस म्हणून मला असं सतत जाणवतं की, आजकाल जातीयतेची दरी स्वातंत्र्यपूर्व काळापेक्षाही जास्त रुंदावली आहे. पूर्वीही समाजात जातीवर आधारित भेदभाव होतेच, आणि अत्यंत अनिष्ट चालीरीती, शोषण होतं. पण आजच्या घडीला पन्नास ते साठ वर्षांच्या दरम्यान वय असलेल्या पिढीला फार टोकदारपणे दिसत असेल, की आजच्या काळात फार बटबटीतपणाने आपल्याला हा भेदभाव करायला लावला जातो, आणि समाजातल्या अनेक गटांना विनाकारण एकमेकांशी संघर्ष करत राहायला लावलं जातं. आणि म्हणूनच “जातीपलीकडची माणसं” हा विचार मला आवर्जून मांडायचा होता.
1848 मध्ये तात्यासाहेब भिडे यांनी मुलींची शाळा सुरू करण्यासाठी महात्मा फुले यांना आपल्या वाड्याची जागा उपलब्ध करून दिली. ‘स्त्रीशिक्षणात समाजहित आहे’ हे जाणणारी माणसं त्या निमित्ताने एकत्र आली. त्यांनी काम करताना ‘जात’ हा मुद्दा कधीच केंद्रस्थानी ठेवला नाही. त्यांचा दृष्टीकोन मानवी होता. आणि त्यामुळेच पुढच्या काही दशकांत स्त्रियांच्या बाबतीत, जातीव्यवस्थेच्या बाबतीत समाजात काही चांगले बदल घडले. हा विचार मला मांडावासा वाटला.
माझ्या मनात हा विषय बराच काळ होता. पण तो पटकथेत कसा आणायचा, आणि आजच्या प्रेक्षकाशी कसा जोडायचा, याची नेमकी दिशा लक्षात येत नव्हती. मला केवळ इतिहास दाखवायचा नव्हता, कारण इतिहास सांगितला की त्या व्यक्तींमधलं आणि आपल्यामधलं अंतर वाढत जातं. पण मला ते अंतर कमी करायचं होतं. आजच्या तरुणांना हा आशय-विषय जवळचा वाटला पाहिजे, हे माझ्या डोक्यात निश्चित होतं. आजच्या पिढीच्या नजरेने इतिहासाकडे बघून, तरुणांना समजेल अशा भाषेत एक प्रेरक विचार मांडला तर तो जास्त प्रभावी ठरेल, असं मला वाटत होतं. त्या दृष्टीने कथानकाची मांडणी केली.
चित्रपटाची सुरुवात सावित्रीबाई पुणे विद्यापीठात होते. एका बाजूने आजच्या काळातल्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणाशी, शिक्षणव्यवस्थेशी, शिक्षणाच्या राजकारणाशी जोडलेलं कथानक पुढे जातं, आणि त्याच प्रवासात सावित्रीबाई आणि महात्मा फुले यांचा भिडेवाड्यापासून राष्ट्रपती भवनापर्यंतचा ऐतिहासिक प्रवासही उलगडत जातो.
अजितजी, तुमचा स्वतःचा या क्षेत्रातला अनुभव अनेक वर्षांचा आहे, परंतु या चित्रपटाचं दिग्दर्शन तुम्ही स्वतः न करता शिवानीवर ती जबाबदारी सोपवलीत...
अजित शिरोळे : ज्यांच्यासाठी सिनेमा बनवायचा त्या तरुण पिढीचा, ताज्या दृष्टीचा दिग्दर्शक असला पाहिजे असं मला वाटत होतं. शिवाय शिवानी स्वतः सावित्रीची सुशिक्षित लेक आहे, शिक्षिका आहे, त्यामुळे तिचा विचार केला. तिला मी संकल्पना सांगितली, चर्चा केली. त्या विषयाकडे पाहण्याची तिची दृष्टी आणि तिचा अभ्यास पाहून मला विश्वास वाटला, म्हणून तिच्यावर दिग्दर्शनाची जबाबदारी सोपवली. स्क्रिप्टचा विचार, कलाकार निवड, एकूण निर्मितीचा प्रवास या सर्व गोष्टींचा तिने खूप अभ्यास केला. शिवाय मीही तिच्या पाठीशी होतोच.
चित्रपट निर्मितीचा प्रवास नेमका कसा झाला?
अजित शिरोळे : सुरुवातीला एका निर्मात्यांनी पैसे गुंतवले होते आणि काही दिवसापर्यंत काम सुरळीत झालंही. पण नंतर काही तांत्रिक आणि आर्थिक कारणांमुळे त्यांना पुढे जाता आलं नाही, तेव्हा माझ्या पत्नीने, जयश्रीने धाडस केलं. फुले दांपत्याने फक्त “पहिली शाळा सुरू केली” एवढंच त्यांचं काम नाही, त्यांनी समाजासाठी अनेक पातळ्यांवर संघर्ष केला आहे. आज माणसामाणसात वाढणारा दुरावा कमी करण्यासाठी त्यांच्या विचारांची गरज आहे. त्यामुळे आपण स्वतः पैसे घालून हा विचार आजच्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी उपयोगात आणला पाहिजे,” असं तिने निक्षून सांगितलं. तिच्या त्या निर्णयामुळे चित्रपट तडीस गेला.
पुण्याच्या गोखले इन्स्टिट्यूटमध्ये शूटिंग सुरू असताना समता परिषदेच्या काही कार्यकर्त्यांना कळलं की हा चित्रपट महात्मा फुल्यांवर आहे. त्यांनी सुरुवातीला निरीक्षण केलं, काही चुकीचं तर दाखवत नाहीत ना?, याचा ते सतत अंदाज घेत होते. पण पुढे त्यांच्या लक्षात आलं की आम्ही योग्य विचार मांडतोय. आणि एकदा खात्री झाल्यानंतर मात्र त्यांनी आम्हाला साथच दिली. मदतही ऑफर केली.
शिवानी, हा तुमचा पदार्पणाचा चित्रपट आहे. हा अनुभव कसा होता?
शिवानी राजेशिर्के : हा माझा दिग्दर्शनाचा पहिलाच अनुभव असल्यामुळे सुरुवातीला मी खूप नर्व्हस होते. पण बाबांचं मार्गदर्शन होतं आणि संपूर्ण टीमची उत्तम साथ होती, त्यामुळे सगळं हळूहळू सुरळीत होत गेलं. शूटिंगसाठी लोकेशन्स ठरवणं, त्या काळाला साजेशी वेशभूषा, कलाकारांची निवड, त्यांच्याशी संपर्क, शूटिंगचं वेळापत्रक ठरवणं, या सगळ्या गोष्टी एकत्र जमवणं मोठं आव्हान होतं. पण टीमवर्कमुळे ते शक्य झालं. बाबांच्या अनुभवाचा, मार्गदर्शनाचाहि वेळोवेळी उपयोग झाला. प्री-प्रोडक्शनपासून पोस्ट-प्रोडक्शनपर्यंत प्रत्येक टप्पा शिकण्यासारखा होता. पूर्वी हे सगळं पाहिलेलं होतं, इतिहासाचा आणि फिल्मचा थोडा अभ्यास असला तरी प्रत्यक्ष अनुभव पूर्णपणे नवीन आणि शिकवणारा, हुरूप आणणारा होता.
तुम्ही स्वतः एक शिक्षक आहात, ही गोष्टसुद्धा या चित्रपटासाठी निश्चित महत्त्वाची ठरली आहे...
शिवानी राजेशिर्के : मी स्वतः पुण्यातल्या एका इंग्रजी माध्यमाच्या शाळेत इंग्रजी शिकवते. शिक्षक असल्यामुळे एक गोष्ट मला प्रकर्षाने जाणवते. आजचे शहरी मध्यमवर्गीय पालक मुलगा-मुलगी असा दुजाभाव तुलनेने खूपच कमी करतात. अनेक पालक तर मुलींना जास्त जपणं, त्यांना चांगलं शालेय शिक्षण, वाचन, व्यक्तिमत्त्वविकास, असं म्हण कला-क्रीडा प्रशिक्षण देणं, किंवा कराटेसारखं एखादं स्वसंरक्षणासाठी उपयोगी पडेल असं कौशल्य विकसित करणं, हे आवर्जून करतात. त्यांच्या शक्य त्या सर्व इच्छा पूर्ण करतात, खाणं-पिणं, कपडेलत्ते या बाबतीत मुलींचे विशेष लाड करतात. “आमच्या पिढीत मुलींना जे सहज मिळत नसे, किंवा आम्हाला जे मिळालं नाही ते आम्ही मुलींना अधिक द्यायचा प्रयत्न करतो”, असा त्यांचा दृष्टीकोन असतो. शालेय, महाविद्यालयीन आणि विद्यापीठीय पातळीवरच्या शिक्षणात मुली पुढे असतात.
ही गोष्ट सावित्रीबाईंच्या विचारांमुळेच घडली आहे असं मला वाटतं. त्यांनी मुलींसाठी शाळसुरू करेपर्यंत काही मुलींना घरातल्या पुरुषांकडून अक्षरओळख करून दिली जात असे, नाही असं नाही, पण मुलींना औपचारिकपणे शाळेत आणून शिकवणं हा देशातल्या महिलांच्या प्रगतीच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा टप्पा होता. तिथून पुढे महिलांसाठी शिक्षणाची, कामाची अनेक दालनं खुली झाली.
सावित्रीबाई केवळ तिथे थांबल्या नाहीत. तर त्यांनी वंचितांसाठीही काम केलं. प्लेगच्या साथीत रुग्णसेवा केली. हे सगळं करत असताना, त्यांनी कधीही दुजाभाव केला नाही. शिक्षक म्हणून त्याच भावनेने काम करण्याचा माझा प्रयत्न असतो आणि दिग्दर्शक म्हणूनसुद्धा त्यांच्या कामाचा विचार करताना त्यांच्या कामाचे वेगवेगळे पैलू मला महत्त्वाचे वाटत गेले, आणि त्याप्रमाणे आम्ही त्याचं चित्रण केलं.
चित्रपटात सावित्रीबाईंच्या आयुष्यातले कोणकोणते पैलू दाखवले आहेत?
शिवानी राजेशिर्के : मुलींची शाळा सुरू करण्यातलं सावित्रीबाईंचं योगदान, त्यासाठी त्यांनी सोसलेल्या हालअपेष्टा, यांची माहिती लोकांना असते. पण सुरू केलेल्या कामाने समाजात मूळ धरेपर्यंत निष्ठेने, सातत्याने काम करत राहणं, त्या कामात आणखी लोकांना सहभागी करून घेणं, हा सततचा जागरूक आणि विधायक संघर्ष त्यांनी चालू ठेवला. जोतिबा गेल्यानंतर लोकांच्या त्यांच्याकडून असलेल्या अपेक्षाही वाढल्या. त्यामुळे त्यांचा पुढचा प्रवास अधिक खडतर होता. प्लेगच्या साथीत लोकांसाठी त्यांनी केलेलं काम, गोरगरीब-वंचितांना वैद्यकीय मदत मिळवून देण्यासाठी केलेले प्रयत्न, आणि जातिभेदाच्या विरोधातला संघर्ष, सत्यशोधक चळवळीच्या माध्यमातून त्यांनी चालू ठेवलेला संघर्ष हा सगळा प्रवास, चित्रपटात दाखवला आहे.
चित्रपटाची कथा थोडक्यात सांगा...
शिवानी राजेशिर्के : ही समांतर कथा आहे—एक ऐतिहासिक आणि एक आजची. कथेचा संघर्ष सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातल्या दोन परस्परविरोधी गटांत विभागल्या गेलेल्या विद्यार्थ्यांपासून सुरू होतो. यातला एक गट कट्टर धार्मिक, जातीय पगडा असलेला आहे आणि दुसरा डाव्या विचारसरणीचा आहे.
अजित शिरोळे : कथानायक ‘धर्मरक्षक संघटने’चा युवा नेता आहे. त्याची प्रेयसी, नायिका, ब्राह्मण मुलगी आहे. त्यांच्या ‘मास कम्युनिकेशन’च्या अभ्यासक्रमाअंतर्गत ‘भिडेवाडा’ येथे शैक्षणिक सहल ठरते. ते तिथे जातात आणि त्या मुलीला भिडेवाडा पाहून वाटतं की आपण याच विषयावर फिल्म बनवण्याचा प्रोजेक्ट करायला हवा. त्याने तिचा प्रियकर अस्वस्थ होतो. ही सावित्रीबाई फुलेंच्या विचारांकडे झुकली, तर ती आपल्या विरोधात जाईल असं त्याला वाटायला लागतं.
शिवानी राजेशिर्के : नायिकेच्या मैत्रिणीवर अतिप्रसंग होतो. ती मैत्रीणही धर्मरक्षक संघटनेची सदस्य असते, आणि तिच्यावर अतिप्रसंग करणाराही संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचा मुलगा असतो. त्या संघटनेचे लोकही मुलीच्या बाजूने उभे राहत नाहीत. कारण शेवटी देव आणि धर्मापेक्षा सत्ता आणि पैसा हाच मोठा मुद्दा ठरतो. तेव्हा मैत्रिणीला न्याय मिळवून देण्यासाठी नायिका लढा सुरू करते. नायक तिला थांबवण्याचा प्रयत्न करतो. तो म्हणतो, “तू डॉक्युमेंट्री कर, पण प्रत्यक्ष लढ्यात पडू नको.” पण “सावित्रीबाईंचा इतिहास वाचूनही माझ्या मैत्रिणीला न्याय मिळवून देऊ शकत नसेन, तर त्या विचारांचा उपयोग काय?” असा विचार करून नायिका न्यायासाठी उभी राहते. सावित्रीबाईंच्या संघर्षाशी तिचा संघर्ष जोडला जातो.
एकीकडे जोतिबा-सावित्रीबाई यांचं प्रेरक काम आणि दुसऱ्या बाजूला विद्यापीठातील जातीवाद, विद्यार्थ्यांमधील राजकारण, शिक्षणाचं धर्माधारित ध्रुवीकरण, स्त्रीचा सन्मान असे मुद्देही या दोन पातळ्यांवर घडणाऱ्या कथानकात हाताळलेले आहेत.
धीरेश, या चित्रपटात तू महात्मा फुलेंची भूमिका साकारली आहेस, त्यासाठी तू कशी तयारी केलीस?
धीरेश जोशी : अजित शिरोळे माझा बालपणीपासूनचा मित्र आहे. त्याने मला फक्त मी एक सिनेमा करतोय, तू सेटवर ये, मग पुढची चर्चा करू, असं सांगितलं. तो सिनेमामध्ये एखाद्या भूमिकेसाठी मला विचारेल असा मला अंदाज होता. आणि मित्र सिनेमा करतो आहे, आणि आपल्याला बोलावतो आहे तर आपण काम करूया, असा विचारही मी स्वतःशी केला होता. त्यामुळे त्याने मला कोणतीही लहानमोठी भूमिका दिली असती तरी मी केवळ मैत्रीखातरही होकार दिलाच असता.
पण जेव्हा मी सेटवर गेलो, तेव्हा त्याने थेट सांगितलं की तुला महात्मा फुलेंची भूमिका करायची आहे. मला पहिल्यांदा धक्का बसला. कारण नुकतीच मी झी5 वर आलेल्या केसरिया नावाच्या वेब मालिकेत गांधीजींची भूमिका केलेली होती. माझी उंची वगळता बाकी दिसणं गांधीजींच्या भूमिकेला साजेसं वाटू शकतं पण महात्मा फुलेंचं जे चित्र आपल्या डोळ्यांपुढे आहे, तसा मी दिसत नाही, पण अजितला वाटलं की मी ही भूमिका साकारू शकतो, आणि त्या विश्वासामुळे आम्ही पुढे गेलो.
तू केसरियामध्ये गांधीजींची भूमिका केली आहेस, बलसागर भारत होवो या सचित्र अभिवाचनाच्या प्रयोगांत तू साने गुरुजींच्या भूमिकेत असतोस, सुधीर फडके यांच्या बायोपिकमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांचीही झलक आम्ही तुझ्या रूपात पाहिली आहे, आणि या चित्रपटात तू महात्मा फुलेंच्या भूमिकेत आहेस, एवढं वैचारिक वैविध्य असलेल्या ऐतिहासिक व्यक्तिरेखा तू साकारल्या आहेस. एखाद्या वास्तविक, ऐतिहासिक व्यक्तीची भूमिका साकारणं यासाठी तुम्ही तसे दिसणं, किंवा त्यांचे विचार तुम्हाला पटणं किती महत्त्वाचं ठरतं?
धीरेश जोशी : नट म्हणून अशी भूमिका स्वीकारताना दिसण्याचा विचार मनात येतोच, नाही असं नाही, पण फक्त दिसणं फार महत्त्वाचं नसतं. त्या व्यक्तीची वैचारिक भूमिका तुमच्यात उतरली पाहिजे. ती प्रामाणिकपणे वठवली तर आपण तसे दिसत नसलो तरी आपण त्या भूमिकेत प्रेक्षकांना पटतो. आपल्याला एखाड्या नेत्याची वैचारिक भूमिका पटत नसली तरी ती विचार म्हणून समजून घेता आली तरी अभिनेता म्हणून साकारता येऊ शकतेच. या चित्रपटातली महात्मा फुलेंची भूमिका मात्र केवळ अभिनेता म्हणून नव्हे तर माणूस म्हणूनही माझ्या विचारांशी जुळणारीच आहे.
माझं कुटुंब राष्ट्र सेवा दलाशी जोडलेलं आहे. त्यामुळे महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या विचारांशी माझा लहानपणापासून परिचय होता. ‘शेतकऱ्यांचा आसूड’ सारखं साहित्य आमच्या घरात होतं. त्यांच्या कार्याविषयी अनेक माध्यमांतून माहिती मिळत गेलेली होती. त्यांची सामाजिक वैचारिक भूमिका माझ्या परिचयाची तर आहेच शिवाय मला पटणारीही आहे. म्हणून वेगळी तयारी ‘करावी’ लागली नाही.
अजितचा ‘जातीपलीकडची माणसं’ हा विचार मला महत्त्वाचा वाटला. आपल्या समाजावर जातीव्यवस्थेचा पगडा एवढा आहे, की आपण इतिहासातल्या महनीय व्यक्तींनाही जातीत बांधण्याचा प्रयत्न करतो. पण या लोकांचं काम मानवतेसाठी होतं. ते जातीत बंदिस्त नव्हतं. ही गोष्ट प्रेक्षकांपर्यंत पोहोचवणं आज खूप गरजेचं आहे, हे मला मनापासून पटलं. आणि म्हणून मी जे मनापासून वाटतं, ते प्रामाणिकपणे सादर करायचं ठरवलं.
आणखी एक गोष्ट मला स्क्रिप्ट वाचल्यावर लक्षात आली. अजितने लिहिलेली पटकथा आणि संवाद इतके सुंदर आहेत की ते नुसते स्वच्छ आणि प्रामाणिकपणे म्हटले तरी प्रेक्षकांपर्यंत पोहोचतील असा मला विश्वास वाटला.
चित्रपटातले महात्मा फुले तुम्हाला असे सापडले. बाकी सर्व कलाकारांची निवड करताना तुमचा विचार काय होता?
अजित शिरोळे : आम्हाला हा विषय फक्त एका पिढीपुरता मर्यादित ठेवायचा नव्हता. म्हणूनच प्रत्येक पिढीतल्या वेगवेगळ्या विचारधारांचं प्रतिनिधित्व या कथानकात येतं. ते पडद्यावर साकार करण्यासाठी योग्य कलाकार कोण असेल याचा विचार केला, आणि कलाकारांची निवड केली.
शिवानी राजेशिर्के : बहुसंख्य कलाकार माझ्यापेक्षा बरेच जास्त अनुभवी आहेत. आणि मी त्या अर्थाने नवखी आहे. पण तरी माधव अभ्यंकर, श्रीराम पेंडसे, प्रतिभा भगत यांच्यासारखे अनुभवी ज्येष्ठ कलाकार असोत, धीरेश जोशी, प्राजक्ता गायकवाड, यांच्यासारखे लोकप्रिय, अनुभवी, कसलेले आणि वयाने तरुण पिढीला जवळचे कलाकार असोत की नेहा सोनावणे, ऋतुराज वानखेडे यांच्यासारखे नव्या पिढीचे ताजे चेहरे असोत, सर्वांनी खूपच चांगलं काम केलं, सहकार्य केलं. भूमिकेविषयी चर्चा करताना त्यांच्या अनुभवाचाही उपयोग झाला. त्यामुळे चित्रपट समृद्ध झाला आहे.
कलाकारांनी या भूमिकांसाठी काही विशेष तयारी केली होती का?
शिवानी राजेशिर्के : शूटिंग सुरू करण्यापूर्वी कलाकारांना स्क्रिप्ट दिलेली होती. सर्वांनी मिळून तीन दिवस एकत्रितपणे स्क्रिप्ट वाचली. पात्रांच्या भूमिका, त्यांच्या विचारांत होणारा बदल, त्यामागची कारणं, इतिहास, विचारधारा, यावर बरीच चर्चा केली. एक प्रकारे चित्रपटाची कार्यशाळा झाली असंच म्हणता येईल.
शूटिंग करतानाही सगळे कलाकार त्यांच्या पात्राशी प्रामाणिक होते. स्वतःचा सीन सुरू नसतानाही त्यांच्या वागण्यात त्या भूमिकेचं भान दिसायचं.
अजित शिरोळे : वेगवेगळ्या पिढीचे, वेगवेगळ्या पार्श्वभूमीचे कलाकार एकत्र आलेले होते, सर्वांनी मिळून एक विचार मांडण्याची प्रक्रिया सुरू करण्यासाठी, किंवा इंग्रजीत म्हणतात तसं ‘सेम पेजवर’ येण्यासाठी हा टप्पा आवश्यक होता.
चित्रपटाच्या शूटिंगदरम्यानच्या काही आठवणी...
धीरेश जोशी : या चित्रपटातला जोतिरावांच्या मृत्यूचा रात्री उशिरा शूट झालेला प्रसंग माझ्या कायम लक्षात राहील. एखाद्या नेत्याचा उत्तराधिकारी हा सर्वानुमते पुरुषच असण्याचा तो काळ होता, आणि तेव्हा त्यांनी आपल्या कामाची धुरा सावित्रीबाईंच्या खांद्यावर सोपवणं हे मला खूप महत्त्वाचं वाटलं.
या प्रसंगात मला खरंच तिरडीवर बांधून ठेवलेलं होतं, आणि अभिनेता म्हणून ते केवळ सादर करतानासुद्धा, एक सामान्य माणूस म्हणून मी स्वतःच्या मृत्यूच्या कल्पनेने हादरून गेलो होतो. आपली तिरडी उचलणार हा विचार आतल्या आत कुठेतरी सहन होत नव्हता. तेव्हा मला खूप स्पष्टपणे आणि प्रकर्षाने जाणीव झाली की, समाजाच्या हितासाठी, स्वातंत्र्यासाठी, किंवा त्या त्या काळातल्या महत्त्वाच्या सामाजिक ध्येयांसाठी ज्यांनी जिवाचीसुद्धा पर्वा केली नाही, ती माणसं काय धीराची असतील!
इतिहास आणि वर्तमान यांची सांगड घालणाऱ्या चित्रपटांमध्ये बरेचदा फ्लॅशबॅकचं तंत्र वापरलेलं दिसतं. पण तुम्ही त्या तंत्राचा वापर न करता, फिल्म-इन-फिल्म या तंत्राचा वापर केला आहे, त्याविषयी सांगा...
शिवानी राजेशिर्के : या चित्रपटात महात्मा फुले आणि सावित्रीबाई येतात ते नायिकेच्या मासकम्युनिकेशनच्या प्रोजेक्टसाठी केलेल्या शॉर्टफिल्ममधल्या व्यक्तिरेखा म्हणून. त्यांचा विचार काय असेल / असता / होता, हे ती दिग्दर्शकाच्या नजरेतून, म्हणजे तो विचार काय असेल / तो कसा मांडला जाईल हे ठरवू शकण्याच्या भूमिकेतून बघते आहे. ती इतिहास, समाज आणि विचार यांचं इंटरप्रिटेशन स्वतः करते आहे, आणि ते तिच्या शॉर्टफिल्मच्या आणि भिडेवाडा या आमच्या फिल्मच्या प्रेक्षकांना दिसतं आहे. नव्या पिढीने इतिहासाचा सकारात्मक अन्वयार्थ लावला तर काय चांगलं घडेल याचंही हे चित्रण आहे.
अजित शिरोळे : मी आधी म्हणालो त्याप्रमाणे आम्हाला सरळसोटपणे इतिहास दाखवून आजचा काळ आणि तो काळ अशी सोपी विभागणी करायची नव्हती. आपण आणि ते यांच्यातली दरी वाढवायची नव्हती, आजच्या कथेच्या माध्यमातून आणि आजच्या पिढीच्या दृष्टीकोनातून इतिहासातला महत्त्वाचा विचार समोर आणायचा होता. म्हणून हे तंत्र वापरलं.
धीरेश जोशी: फ्लॅशबॅक हा अनेकदा प्रेडिक्टेबल होतो. आता काहीतरी ऐतिहासिक, आणि त्याला समांतर काहीतरी वर्तमान घटना यांची सांगड एकसुरी वाटू शकते. पण या चित्रपटात आम्ही ते टाळू शकलो. नव्या पिढीच्या चष्म्यातून दिसणारे शॉर्टफिल्ममधले जोतिबा-सावित्रीबाई रंगवणं, हा खूप छान अनुभव होता.
चांगल्या विषयांवरचे, गंभीर वैचारिक मराठी चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरतीलच याची खात्री देता येत नाही. त्या दृष्टीने तुम्ही केलेलं धाडस विशेष आहे...
अजित शिरोळे : माझा सिनेसृष्टीतला 30-35 वर्षांचा अनुभव आहे. मी सहज एखादा कमर्शियल चित्रपट करू शकलो असतो. पण आजच्या पिढीत वाढलेली दरी मला अस्वस्थ करते.
महात्मा फुले यांनी शाळा सुरू केली तेव्हा त्यांनी “मुलगी कोणत्या जातीची आहे” असा विचार केला नाही. पहिल्या शाळेतल्या पहिल्या बऱ्याच मुली ब्राह्मण कुटुंबातल्या होत्या. त्यांना शिकवण्याचे त्यांनी नाकारले नाही. कारण त्यांचा विचार “मुलगी शिकली पाहिजे” एवढाच होता.
माझ्या लहानपणी मित्रमैत्रिणींच्या नात्यात “समोरचा कोणत्या जातीचा आहे” हा प्रश्नच येत नव्हता. आज कोणाशीही पहिल्यांदा ओळख होत असतानाच तो विचार पुढे येण्याचं वाढतं प्रमाण मला स्पष्ट दिसतं. आणि म्हणूनच वाटलं की चित्रपट हे आपलं माध्यम वापरून काहीतरी सकारात्मक करायला हवं.
सध्या समाजमाध्यमं हे चित्रपटांच्या प्रमोशनचं एक महत्त्वाचं माध्यम आहे. तुम्हाला त्याचा अनुभव कसा आला? तुमच्या ट्रेलरवर एक विचित्र कमेंट आली होती—“शिरोळे नावाचा माणूस जोशी नावाच्या माणसाला फुलेंची भूमिका का देतो?” अशा प्रतिक्रिया पाहून काय वाटतं?
शिवानी राजेशिर्के : हो, मी ती कमेन्ट पाहिली होती. मला ते अत्यंत दुर्दैवी वाटलं. कारण चित्रपटाची टॅगलाइनच ‘जातीपलीकडची माणसं’ अशी आहे. तरीसुद्धा प्रेक्षकांचा पहिला विचार जर हाच असेल, तर आपण समाज म्हणून कुठे चाललो आहोत? याचा त्रासही झाला. पण अशा कमेन्ट्सकडे दुर्लक्ष करणं हेच बरं असतं, एक कुठलीतरी कमेन्ट कुठेतरी कोपऱ्यात पडून राहते. त्यावर वर आपण प्रतिवाद केला, तर त्या प्रतिक्रिया आणि त्यातला अविचार जास्त मोठा होतो, वितंडवाद वाढतो, त्यामुळे आम्ही अशा कमेन्ट्सना हवा देत नाही.
चित्रपट मार्चमध्ये प्रदर्शित झाला. प्रतिसाद कसा होता?
शिवानी राजेशिर्के : आम्ही जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने 6 मार्च 2026 ला चित्रपट प्रदर्शित केला. साधारणपणे महिनाभर थिएटरमध्ये चित्रपट चालला, हा माझ्यासाठी मोठा अनुभव होता, कारण आज मराठी चित्रपट टिकवणं कठीण आहे.
आणखी एक अनुभव सांगते, चित्रपट प्रदर्शित झाल्यावर नगरसेवक कोले यांनी त्यांच्या मतदारसंघातील लोकांसाठी दोन शो घेतले. लोकांना बांगड्या किंवा भेटवस्तू देण्यापेक्षा त्यांनी विचार पोहोचवण्यासाठी चित्रपट दाखवला, ही गोष्ट खूप महत्त्वाची वाटली.
एक चित्रपट बघून समाज बदलत नसतो. एकूणच समाज बदलतो त्याची कारणं इतकी नेमकी नसतात, आणि बदलाचा वेगही कमी असतो. समाज बिघडायलाही वेळ लागतो, आणि सुधारायला तर त्याहून पुष्कळ जास्त वेळ लागतो. आपण फक्त माध्यम बनू शकतो.
अजित शिरोळे : मला जे लोकांपर्यंत पोहोचवायचं होतं, जे सांगायचं होतं, ते मी चित्रपटातून सांगितलं आहे. एवढंच म्हणेन की हा चित्रपट पाहून चारच लोकांनी जरी विचार केला, तरी आमचा उद्देश साध्य झाला.
आता चित्रपटासाठी पुढची योजना काय आहे?
अजित शिरोळे : आमचा उद्देश विचार पोहोचवणं, आणि प्रेक्षकांना विचार करायला लावणं हाच आहे. आम्ही यातून नफा काढण्याचा विचार प्राधान्याने करत नाही. आता हा चित्रपट चित्रपटगृहात नाही, पण जर एखाद्या संस्थेला तो दाखवायचा असेल, तर त्यांनी फक्त तांत्रिक खर्च दिला तरी आम्ही त्यांच्या प्रेक्षकांना हा चित्रपट दाखवण्याची व्यवस्था करू. हा चित्रपट पैसे कमवण्यासाठी नाही. OTT संदर्भातदेखील चर्चा सुरू आहे, लवकरच उपलब्ध होईल.
संवाद आणि शब्दांकन : ऋचा मुळे
kartavyasadhana@gmail.com
Tags: जोतिबा फुले Jotiba Phule Mahatma Phule सावित्रीबाई फुले savitribai phule education faction polarization शिक्षण धार्मिक ध्रुवीकरण शिक्षणाचे राजकारण धर्माचे राजकारण Load More Tags
Add Comment