जयंत पवार - समकालीन मराठी कथेतला अनन्य कथाकार

सत्याचा शोध घेणारा जयंत प्रामाणिक आणि तळ गाठू पाहणारा जिद्दी लेखक होता!

जयंतचं जाण्याचं वय नव्हतं. वस्तुतः गेली काही वर्षं एकीकडे तो मृत्यूशी सामना करत होता आणि दुसरीकडे त्याही परिस्थितीत संपूर्ण लेखकपण निष्ठेला लावून अखेरपर्यंत लिहीत होता. डोळ्यांना दिसणारं, जाणवणारं आणि खुपणारं सत्य सांगणं हे लेखकाचं काम असतं हे त्याचं मत होतं आणि ते करताना आपली शैली, निवेदन तंत्रं, आशयात बेमालूमपणे मिसळलेल्या भाषेचा विलक्षण वेगळा वापर, कथनतंत्रातले प्रयोग करत राहणं, परंपरेतल्या कथनरूपांचा वापर, प्रस्थापित मिथकांची मोडतोड करत हे तो अतिशय गांभीर्यानं आणि सर्जकपणे करत होता. त्याची नाटकं, भाषणं, त्याच्या कथा, मुलाखती, त्याचे विविध विषयांवरचे लेख हे त्याचं लेखन वाचलं की लेखक म्हणून त्याची विस्तारकक्षा केवढी मोठी होती हे लक्षात येतं. 

त्याची ओळख झाली ती 1992-93 साली कधीतरी. लोकवाङ्मयगृह तेव्हा एखाद्या प्रकाशनासोबत तीनचार दिवसांचा लोकोत्सव आयोजित करत असे. अशा एका कार्यक्रमानंतर त्याची ओळख झाली. त्याला भेटल्यावर पहिली खूण मनात उमटायची ती ही की, हा माणूस अतिशय ऋजू, काहीसा संकोची आणि अनाग्राही आहे. तो उंच होता त्यामुळं लक्ष देऊन ऐकताना तो वाकून, हाताची घडी घालून, दुसरा हात तोंडावर ठेवून आपल्याकडे वेधक नजरेनं पाहत असे त्यामुळं त्याच्याविषयी पटकन आपलेपणा निर्माण व्हावा असं त्याच्यात काही तरी होतं. नाटकं-एकांकिका तो लिहीत होता. महाराष्ट्र टाइम्समध्ये नाट्यसमीक्षेसह साहित्यिक विषयांवरही तो सातत्यानं लिहीत होता. चारपाच वर्षांनी त्याचं 'अधांतर' हे नाटक आलं आणि मग तो कथालेखनाकडे वळला. अर्थात सुरुवातीला त्याच्या कथालेखनाचा वेग जास्त नव्हता पण ज्या कथा या शतकाच्या पहिल्या दशकात येत गेल्या त्या वाचताना आपण अतिशय वेगळ्या प्रकारचं, अद्भुत ताजेपणा असलेलं असं काही वाचतो आहे हे जाणवत होतं. 18 वर्षांत प्रकाशित झालेल्या त्याच्या चार कथासंग्रहांत लहानमोठ्या कथा एकूण सव्वीसेक कथा आहेत पण त्यांचा पट विस्मित करणारा आहे. दोन दशकांत जयंतनं मराठी कथेला जी मौलिक उंची मिळवून दिलेली आहे त्यामुळं समकालीन मराठी कथेतला तो अनन्य कथाकार ठरतो.

जयंतचं बालपण गिरणगावात गेलं. तिथल्या कष्टकऱ्याच्या वस्तीत भजनं, भारुडं, तमाशे-वग, शाहिरी कलापथकं, जलसे, दशावताराचे खेळ हीच मनोरंजनाची साधनं होती. या कष्टकऱ्यांची मुळं मुंबईबाहेर दूरच्या लहान-लहान ग्रामीण भागांत होती. अफ्रिकनांचे जत्थे गुलाम म्हणून पश्चिमेत नेले गेले तेव्हा त्यांना जहाजांवर कोबड्या-मेंढ्यांप्रमाणे फळ्यावर भरून नेलं गेलं होतं. सारा प्रवास दाटीवाटीनं उभं राहून केला जायचा. त्यात कुणी आजारी पडलं, मेलं तर त्याला जहाजावरून समुद्रात फेकून दिलं जात असे. यातून जे जगले-वाचले त्यांनी गुलामीत आपल्यासोबत जगतानाही आपल्या संस्कृतीतलं संचित त्यांच्यासोबत नेलं होतं. त्यांचं संगीत, त्यांची चित्रकला, गाणी त्यांच्यासोबत होती. मग त्यांनी  टिन्स, पत्रं, काठ्या जमेल त्या साधनांनिशी हे संगीत आणि गाणी नव्या ठिकाणीही सुरू केली. आजच्या अफ्रो-अमेरिकन संगीतातल्या विविध रूपांत त्याचे आविष्कार आपल्याला दिसतात.

गिरणगावासारख्या भागातल्या कष्टकऱ्यांनीही आपल्या संस्कृतीतलं हे संचित तिथं याच प्रकारे टिकवलं होतं. याचा जवळून परिचय जयंतला झालाच शिवाय ते त्यानं स्वतःच्या वाढीत स्मृतिसंचित म्हणूनही जपलं. याची अर्थात दुसरी बाजूही होती. विषमतेची कडूझार फळं तिथल्या प्रत्यक्ष जगण्यात त्याला दिसत होती. माणसांचं उद्ध्वस्तलेपण, ससेहोलपट, जागा, भौतिक साध्या सुखांचा अभाव यांनी एक प्रकारची जगण्याची उघडीवाघडी, भीषण बाजूही त्यानं पाहिली-अनुभवलेली होती. तो स्वतःही विशीबाविशीत गिरणीत काम करत होता. हे सगळं मनात टिपून ठेवलेलं आणि पुढे शिकताना, नवं जग धुंडाळताना, समजून घेताना अनेक गोष्टींचे अन्वय तो स्वतःच लावत गेला. जगणं हे गूढ आहेच आणि अतर्क्यही आहे ही गोष्ट त्याला उमजायला लागली होती. आपण आपलंच, आपल्या अनुभवातलं, खास आपल्याच कल्पनाविश्वातलं असंच लिहायला पाहिजे हे त्याला एका टप्प्यावर कळलं. आहे त्या परिस्थितीच्या कारणांच्या मुळाशी जाणं, शोध घेणं हे सुरू झालं. त्याच्या कथाविश्वात हे सगळं नेपथ्यासारखं आपल्याला दिसू शकतं पण नेपथ्यापुढची मांडणी त्यानं स्वतःच्या वैचारिक वाढीतून केली होती.

त्याला शोषणाच्या परी दिसल्या, कुठले अदृश्य हात ही आयुष्यं भरडून काढताहेत हे शोधत तो त्यांच्या उगमापर्यंत गेला. उतरंडीतले वरचे आणि सत्तेची रूपं यांचे विकराळ मुखवटे त्याला सत्यासारखे गवसले. हा एका संवेदनशील लेखकानं गांभीर्यानं खोलात जाऊन घेतलेला शोध होता. लेखक म्हणून हे पहिलं काम केल्यानंतर ही सत्यं उघडकीस आणण्याचं काम हे त्याचं पुढचं काम होतं. ते काम त्यानं आणखीनच गांभीर्यानं केलं कारण तिथं त्याच्यापुढे आव्हानंही अधिक होती. तो ज्या कथाप्रकारात लिहीत होता. त्यात नावीन्य नसण्याचा तो काळ होता. इथं त्यानं त्याच्याजवळ साचत गेलेलं संचित, वैचारिक भान, परंपरेतल्या कहाण्या, लोककला, दंतकथा हे सगळं तर वापरलंच शिवाय प्राचीन पौराणिक मिथकं, निवेदनाची तंत्रं, भाषिक लयी, नवे रूपबंध या सगळ्या अस्त्रांनिशीही तो सज्ज झाला. मधल्या काळात तो हिंदीतलं साहित्य, लॅटिन अमेरिकन साहित्य वाचायला लागला होता. वाचणाऱ्या मित्रांसोबत त्याविषयी चर्चा करायला लागला होता. वाचनानं विस्मित करणाऱ्या या प्रवासात त्यानं स्वतःला चिंतनाच्या पातळीवर सतत प्रसरणशील ठेवलेलं होतं. हे करताना आपल्या आतल्या केंद्रावर कुणाचाही प्रभाव पडणार नाही पण लेखनाच्या व्यूहनीतीचे समांतर विकल्प आपणच शोधायचे हे जणू त्यानं निश्चित केलेलं होतं. स्व-रूपाविषयीचं त्याचं भान अतिशय प्रखर होतं.

जयंत महानगरातला नागरिक होता म्हणून त्याला महानगरी लेखक असं बिरूद देणं योग्य होणार नाही. 'लेखक हा चिरडल्या गेलेल्या जगातल्या चिरफाळलेल्या माणसाचा प्रतिनिधी आणि अशा वंचिताचाच वंशज असतो.' असं त्यांनं साहित्य अकादमीचा पुरस्कार स्वीकारताना केलेल्या भाषणात म्हटलं होतं. तो अशा वंचितांचा खऱ्या अर्थानं वंशज होता. माणसाच्या जगण्याला भेडसावणाऱ्या गोष्टी हा त्याच्या चिंतनाचा विषय होता. ज्या बारकाईनं आणि संवेदनशीलतेनं त्यानं महानगरातल्या तळात जगणाऱ्यांचं जग दाखवलं त्यामुळे त्यानं मराठी कथेचा परीघ खचितच प्रशस्त केलाच शिवाय मराठी साहित्यपरंपरेतल्या श्रेष्ठ लेखकांचा तो प्रतिनिधीही ठरला. त्याची नाटकं आणि कथा यांनी मराठी साहित्यात मौल्यवान भर घातली.

त्याच्या शैलीचं वैशिष्ट्य हे होतं की, त्यात दृक प्रतिमा वाचकाला दिसू लागत. विनोद कुमार शुक्ल म्हणतात त्याप्रमाणे मैं दृष्यों में सोचता हूँ और फिर सोचने को उस दृश्य में लिखने की कोशिश करता हूँ | हे जयंतच्या बाबतीतही खरं आहे. तो समकाळाचा लेखक असला तरी द्रष्टेपण त्याच्यात होतं. महानगराच्या वास्तवाखाली किंवा वास्तवापलीकडचं वास्तव त्याला दिसायचं. उत्तरभारतातून आलेले मुंबईतले जत्थे हा 'मराठी' लोकांसाठी संवेदनशील विषय असतो. त्यांचा उल्लेख हेटाळणीवजा 'भय्ये' असा केला जातो. 'मोरी नींद नसानी होय' या कथेतलं रेल्वे प्लॅटफॉर्मवरचं जग पाहिलं तर तिथल्या चहाच्या टपऱ्या, वेठबिगारासारखी काम करणारी तिथली मुलं, ती मुलं जिथून आणि ज्या परिस्थितीत आणली गेली आहेत त्याचं वास्तव, त्या मुलांच्या गावाकडचं उद्ध्वस्तलेपण, विधवा आया आणि कर्जाच्या दाबातून असहायतेतून दूर लोटावी लागणारी पोटची पोरं, शेताच्या बांधावरून आईला शेवटचं पाहत त्यांनी गाव सोडणं, रेल्वेचा प्रवास करत मुंबईत दाखल होणं आणि नव्या विश्वात निमूटपणे शरण जाणं इथपर्यंतचा प्रवास जयंत अतिशय संवेदनशीलतेनं टिपताना त्यातली दृश्यात्मकता जीवघेणी करतो.

त्याच्या नजरेचा कॅमेरा महानगरात संवेदनशीलतेनं सगळीकडे फिरतो पण असा की, तो लो अँगलच्या दृष्टिबिंदूतून महानगरात चाळींच्या जागी उठत जाणारे स्कायस्क्रेपर्स आणि टॉवर्स, मेनहोलमधला काळोख आणि त्यातली घाण, ट्रेनमधला पाकीटमाराला मारणारा हिंस्र जमाव आणि झुंडीतलं क्रौर्यही निर्ममतेनं टिपत जातो. सार्वजनिक हिंसेच्या कारणांमागे जात-जात तो त्याचं टोक बरोबर विषमतेत, अमानुष भांडवलशाहीनं सामान्यांची लक्तरं केली आहेत - त्याच्यात नेमकेपणानं शोधतो. उत्तर भारतीय स्थलांतरितांची बोलीभाषा, त्यांच्या 'मुलुखा'कडच्या पात्रांची भाषा अशी विभिन्न रूपं तो आशयाच्या स्तराशी अतिशय वास्तविक जवळकीनं आणि सहजपणे वापरतो आणि आशयाच्या भौगोलिक नेपथ्याचाही पट विस्तीर्ण करत नेतो.

प्रचंड पसरलेल्या एकाच महानगरात वेगवेगळी जगं एकाच वेळी नांदत असतात. बाजारवादानं या जगांमध्ये भिंती उभ्या केलेल्या आहेत. अंतरं निर्दयतेनं वाढवत नेलेली आहेत. त्यांच्या मधोमध अधोविश्वाच्यासुद्धा तळाशी लोटले गेलेल्यांच्या जगण्याच्या खटपटीत धुमश्चक्रीनं व्यापलेला इलाखा आहे. तो व्यवस्थेनं फेकून दिलेल्या अवशिष्टासारखा आहे. जगण्याच्या आटापिटीत त्याच्या चिंध्या झालेल्या आहेत. या खोल विवरात - 'लोअर डेप्थ्स'मध्ये - गुदमरत जगण्याची धडपड करणाऱ्यांची जगं जयंत मुखर करतो. ते करताना अधोविश्वाचे इतके सूक्ष्म तपशील नोंदवतो की, वाचकाला तिथं - त्या दृश्यात प्रत्यक्ष पोहोचवतो.

जयंतनं आपण कथाच लिहीत राहणार हे ठरवलेलं होतं. त्याला कादंबरी लिहिण्याचाही वारंवार आग्रह झाला पण तो आपल्या निर्णयावर ठाम होता. अतिशय जाणीवपूर्वक आणि गांभीर्यानं त्यानं हा रूपबंध निवडलेला होता. त्या अखेरच्या कथासंग्रहातली 'तुझ्या नादानं पाहिली तुझीच रे पंढरी' हा लेख नसून मुळात तीही एक कथाच समजावी असं त्याचं म्हणणं होतं.

त्याच्या कथेची आणखी दोन महत्त्वाची वैशिष्ट्यं म्हणजे इमॅजिनेशनचा आणि फॅण्टसीचा त्यानं केलेला वापर. वास्तवातून त्याच्या कथेचा आशय 'टेंगशे...'सारख्या कथेत कविता होत-होत फॅन्टसीत जातो. त्याच्या कथांमध्ये वास्तवाच्या आणि फॅण्टसीच्या हद्दी पुसल्या जाऊन एक निराळंच नेपथ्य उभं राहिलेलं आपल्याला दिसतं. कल्पनाशीलतेनं तो आशयाला वेगवेगळ्या पातळ्यांवर फिरवतो आणि अंतिमतः त्याची कथा आपण काहीतरी अपूर्व, विलक्षण वाचल्याची जाणीव देत आपल्याला गरगरवून टाकते. सत्याचा शोध घेत आपल्याजवळची अस्त्रं वापरत तो वास्तवाच्याच बहुविध रूपांची अर्थवत्ता वाढवतो.

कथेतला तपशील देताना जयंतच्या कथेत वास्तविक ऐतिसाहिसक संदर्भ बेमालूमपणे मिसळलेले दिसतात. 'बाबू भंगारवाल्याच्या वखारीतली दुपार' ही कथा वाचताना वाचक म्हणून आपला वेगळ्याच दुनियेत प्रवेश होतो. त्या वखारीत काय नाही? अलिबाबाची जणू ती गुहाच आहे. त्यातला बाबू आपल्याला वखारीचा इतिहास सांगताना, 'माझ्या खापर खापर पणजोबांची भंगार सामानांची वखार होती कलकत्त्यात. 1757 सालातली गोष्ट सांगतोय. इस्ट इंडिया कंपनीचा रॉबर्ट क्लाइव्ह आणि बंगालचा सरदार मीर जाफर असे समोरासमोर बसले होते. मीर जाफरनं सगळं सैन्य भंगारात काढून नवाब सिराज उद्दौलाशी दगाबाजी करायचा सौदा केला होता. क्लाइव्ह त्याला गादीवर बसवणार होता. त्या बदल्यात कंपनीकडून एक कोटी रुपये देण्यात येतील असं मीर जाफरनं लिहून घेतलं. ब्रिटिशांच्या हिंदुस्थानातल्या वसाहतीचा पहिला करारनामा माझ्या खापर-खापर पणजोबांच्या साक्षीनं झाला...' अशा कल्पनारम्य तपशिलांनिशी वर्णन येतं. त्याचं भंगाराचं दुकान, आतल्या खोलीतल्या डबीतला किडा हे सगळं मोठं रूपक बनून येतं.

जयंतच्या अनेक कथांमध्ये अनेक पातळ्यांवर प्रयोग आहेत. ते भाषेचे, निवेदन पद्धतींचे, रूपबंधांचे, वास्तवाच्या आणि फॅण्टसीच्या विलक्षण मिश्रणाचे आहेत. त्याचबरोबर तो जुनी मिथकं मोडत नवी मिथकं उभी करत होता. लाक्षागृहासारख्या मिथकाला तर पार उलटं करून ठेवतो. तिथं पांडव आणि कुंती तर मेले नाहीत पण निषादपुत्र मात्र कारस्थान करून पांडवांकडून मारले गेले असं सांगताना आपल्याला कथनाच्या दुसऱ्या बाजूंचा - शोषितांच्या बाजूचा विचार करायलाही ही कथा भाग पाडते. कल्की, शंबूक, सप्तचिरंजीवांच्या अमरत्वाचा अंश वापरून मूर्ख सत्ताधीशानं महामारीवरच्या लशीची कल्पना सांगणं यांचा औचित्यपूर्ण आणि कल्पक वापर जयंतच्या कथांमधून आपल्याला दिसतो. काळाच्या जबड्यात असहायपणे गडप होत जाणाऱ्या जगाच्या लिहिलेल्या या बखरीच आहेत. तळातल्या माणसाचं सद्यकालीन व्यवस्थेत चिरडलं जाणं - चिरफाळणं - चिंध्या होणं हा त्याच्या चिंतेचा निरंतर सवाल आहे आणि हे लेखकाच्या प्रगल्भ आणि सखोल आस्थेशिवाय शक्य नसतं. हा सवाल त्याच्या कथांमध्ये सातत्यानं मोठा-मोठा होत प्रतिध्वनींसह आदळत राहतो. महानगराच्या अदृश्य ठेवल्या गेलेल्या जगातल्या गर्दी-कल्लोळ-कोलाहलाची मिळून कर्कश शांततेतली एक निःस्तब्ध किंकाळी हे वाचताना सतत ऐकायला येते आणि या कथा वाचून झाल्यावर आपल्याला अंतर्मुख करते.
 
सर निघाले सप्तपाताळाकडे, तर्काच्या खुंटीवरून निसटलेलं रहस्य या कथांमधील 'टेंगशे', 'बाबा', 'व्यास', 'शांताराम' अशी लेखकाची अनेक पात्रंही आपल्याला जयंतच्या कथांमध्ये आढळतात. 'तर्काच्या खुंटीवरून...'मधला रहस्यलेखक काका आपल्या पुतण्याला सांगतो, 'आयुष्य जटिल आहे. सगळीकडेच उजेड नसतो. जिथे उजेड नसतो तिथे पुरेसा काळोखही नसतो. मात्र जिथे-जिथे भुयारं असतात तिथं त्यांच्या आत काळोख असतो. आपल्याला वाटतं, आत काही आहे पण काही सापडेल म्हणून हात घालून बसलास तर झ्याट काही सापडत नाही. प्रत्येक रहस्यामागे एक सत्य उभं असतं पण काळोखातून ते कधी आलंच समोर तर भाजून काढतं भोसडीचं. डोळे फुटतात. गांडीला बुडबुडे येतात. तेव्हा त्याच्या नादाला लागू नये पण सत्य शोधायची खाज असतेच आपल्याला...' यावर जयंतनं आपल्या मुलाखतीत म्हटलं आहे की, 'खरा प्रतिभावान लेखक त्याच्या पुढे जाऊन आपले डोळे फोडून घ्यायला तयार होतो. आपल्या बहुतेक जिद्दी, प्रामाणिक आणि तळ गाठू पाहणाऱ्या लेखकांची उमर ही पुढची पायरी गाठण्याच्या सिद्धतेसाठी खर्ची पडते.' सत्याचा शोध घेणारा जयंत असा प्रामाणिक आणि तळ गाठू पाहणारा जिद्दी लेखक होता असं निश्चितपणे म्हणता येतं.

वरवर जयंत मृदू वाटत असला तरी मूल्यांबाबत अतिशय ठाम आणि प्रतिबद्ध होता. वंचितांप्रति जशी त्याची प्रतिबद्धता होती तशीच लेखकाच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याविषयीही होती. त्यांच्या वेगवेगळ्या भाषणांमधून, लेखांमधून निर्भीडपणे तो अखेरपर्यंत बोलत होता. दुर्गा भागवत, विंदा करंदीकर ही उदाहरणं देत त्यानं करंदीकरांनी सांगितलेल्या पंचमहापातकांची आठवण करून देत स्वातंत्र्यानंतर गांधीहत्या हे आपलं पहिलं तर बाबरी बाबरी मशीद पाडणं हे पाचवं महापातक आहे हे रोखठोकपणे सांगितलं होतं. सध्याच्या काळात लेखक एकटा पडला आहे, त्याचं लिहिण्याचं स्वातंत्र्य काढून घेतलं जात आहे याचा तो गेली काही वर्षं पुनरुच्चार करत होता. नयनतारा सहगल यांना साहित्य संमेलनासाठी निमंत्रण देऊन अपमानास्पदरीत्या नंतर ते नाकारलं गेल्यानंतर त्यानं मुंबईत शिवाजी मंदिरात झालेल्या मुंबईतल्या सभेत निर्भयपणे दडपशाही आणि गळचेपी यांविषयी आपली मतं मांडली होती.

जे निकं सत्य आहे ते दाखवणं लेखकाचं काम असतं. ते दाखवायची निकड असलेले लोक आज कमी असलेल्या काळात जयंत हा विरळा लेखक होता. माणसाप्रति प्रगल्भ आणि सखोल आस्था, लिहिण्याचं प्रयोजन आणि समकालीन जागतिक साहित्यातल्या नव्या आणि भारतीयत्वाशी जुळतील अशा सगळ्या शक्यता तपासून पाहणारा हा गंभीर लेखक होता. मित्र म्हणून उदार, पाठीशी राहणारा आणि निर्मळ मनाचा हा प्रेमळ माणूस होता. वाचलेलं-लिहिलेलं यांविषयी सतत संवादशील असलेला, आवडलेल्या गोष्टींबद्दल दिलखुलास दाद देणारा होता. हा मित्र काही काळाचाच सोबती आहे हे जाणवून खंत वाटत राहायची पण स्वतःच्या येऊ घातलेल्या मृत्यूबद्दलही त्यानं चिंतन केलेलं असणार. त्याविषयी तो बोलणं टाळायचा किंवा स्थितप्रज्ञ राहायचा. अनेक अडचणींतही त्यानं स्वाभिमान सोडला नाही. अखेरच्या काळात मृत्यूविषयी त्यानं काही कथाही लिहिल्या.

जयंत खऱ्या अर्थानं निवळ मराठीचा नव्हे तर भारतीय लेखक झाला होता. दीर्घ काळानंतर मराठीला असा लेखक सापडला होता ज्याच्यात भविष्यात अजूनही विलक्षण साहित्य निर्माण करण्याच्या शक्यता होत्या. त्या अर्थानं त्याचं जाणं खूपच अकाली आहे. आणखी दहा वर्षं त्याला मिळती तर केवढं तरी आणखी उत्कृष्ट साहित्य आपल्याला मिळालं असतं. सुदैवानं अलीकडे त्याची दोन पुस्तकं हिंदीत प्रकाशित झाली आहेत. इंग्लीशमध्ये होईल. त्याचं अप्रकाशित साहित्यही भरपूर आहे. अलीकडे अनेक सुहृद पाठोपाठ एक्झीट घेताना पाहून निराश होण्यासारखी स्थिती आहे. जयंतसोबतच्या कितीतरी आठवणी आहेत. एकत्र केलेले प्रवास आहेत. रात्र-रात्रभर जागून केलेल्या देशोदेशीच्या पुस्तकांबद्दलच्या, चित्रपटांविषयीच्या कितीतरी गप्पा आहेत पण त्या आठवणीच असतील. केवळ हा दिलासा की, आत्मीयतेच्या घट्ट नात्यांनी बांधली गेलेली ही गुणवान माणसं कोणत्याही परिस्थितीत तुमच्यासोबत राहिली. त्यांनी आम्हाला समृद्ध केलं.

सध्याच्या काळातलं विखारी होत गेलेलं वातावरण, व्यक्ती-व्यक्ती आणि समाजातला सहज मोकळेपणा हरवून जाणं, आपण आणि ते अशा फळ्या उभ्या राहाणं आणि यात लेखकाची होणारी गळचेपी यांविषयी तो वारंवार खंत व्यक्त करत होता. तेवढ्यावरच न थांबता तो या परिस्थितीचं समाजशास्त्रीय आणि राजकीय विश्लेषणही त्याच्या भाषाणांमधून, लेखांमधून आणि निवेदनांमधून करत होता. 2014पासून पुस्तकांवर आलेली बंधनं, बंदी, पुस्तकं नष्ट केली जाणं यातून लेखक म्हणून तुम्ही अस्वस्थ होत गेलेला आहात काय... असा थेट सवाल तो करत होता. जे निर्भीड आहेत, ज्यांची लेखक असण्यावर निष्ठा आहे त्याच लेखकांसाठी हा सवाल होता. लेखक-कलावंताला योग्य कारणासाठी रास्त राग येणं गरजेचं आहे. त्यानं भय बाळगता कामा नये. निर्भयपणे त्यानं स्वातंत्र्याच्या रक्षणासाठी जाब विचारला पाहिजे या मताचा तो उच्चार करत होता. संविधानानं दिलेला अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा हक्क मिळवण्यासाठी,  बजावता येण्यासाठी जे-जे त्याच्या विरोधात आहेत, ज्या व्यवस्था किंवा सरकार यांना रोखणं गरजेचं आहे. लेखकानं प्राणपणानं ते करण्याची गरज आहे. आज लेखक एकटा पडला आहे, त्याला हवं तसं नष्ट करता येतं असा जो समज निर्माण केला गेला आहे तोही घालवायला आपल्यालाच प्रयत्न करावे लागतील हे सांगण्यासाठी तो अखेरपर्यंत कार्यरत होता.

त्याच्या लेखांचं आणि भाषणांचं संकलन तसंच अप्रकाशित साहित्याचं प्रकाशन होणं आवश्यक आहे... यथावकाश ते होईलसुद्धा. त्यातूनही तो आपल्यासोबत राहील, प्रेरणा देत राहील पण तरीही तो निघून गेला आहे; उमेदीच्या, लेखनाच्या ऐन भरात आलेला असताना निघून गेला आहे हा सल विसरता येत नाही. कारण सामाजिक-राजकीय पातळीवर प्रगल्भपणे सतत विचारशील असलेल्या, खऱ्या अर्थानं भारतीय लेखक म्हणावा अशा श्रेष्ठ दर्जाच्या लेखकाची, मित्राची एक्झीट रितेपण वाढवणारी आहे. ग़ालिबनं त्याच्या रोजनिशीत 1 सप्टेंबर 1858 रोजी एक नोंद केली आहे की, 'इंग्रजांच्या सोजिरांनी गेल्या काही दिवसांत अशा कत्तली केल्या आहेत की, त्यांत माझे कित्येक जिवलग, कितीतरी सख्खे मित्र, आप्त, चाहते आणि शागीर्द नाहीसे झाले आहेत. हे दुःख सांगण्यापलीकडचं आहे. आता मी गेलो तर मला खांदा द्यायला तरी कुणी असेल की नाही असं वाटतं.'

2021 या वर्षानं असे क्रूर प्रसंग आपल्यावर आणले की, आपणही तसेच अनुभव घेतलेले आहेत. यात जयंतसारख्या लिहित्या लेखकाचं जाणं जिव्हारी लागण्यासारखंच आहे. 

- गणेश विसपुते  

bhasha.karm@gmail.com

(गणेश विसपुते हे कवी, समीक्षक, अनुवादक आणि चित्रकार आहेत.)

Tags: जयंत पवार गणेश विसपुते कथा साहित्य लेखक नाटककार jayant pawar ganesh vispute story literature Load More Tags

Comments:

विष्णू दाते

स्वर्गीय श्री जयंत पवाराविषयीचं आत्मियता जागवणार् लेखन!

दत्ताराम जाधव.

जयंत पवार आणि माझी भेट निवडक कामानिमित्त झाली.माणूस खूपच भला आणि ऋजू . विसपुते सरांमुळे जयंत पवार अधिक समजले आणि आपण त्यांच्या परिवारातील व्हायला खूप उशीर केला याची टोचणी लागली.

नम्रता

जयंत पवार यांच्या निधनाने माझ्यासारख्या सामान्य वाचकाला वाईट वाटले आहे. श्री गणेश विसपुते ह्यांचे आपल्या निर्भय लेखक मित्राचे उमेदीत जाण्याचे दुःख साहजिकच आहे. त्यांच्या लेखन वैशिष्ट्याबद्दलचे विवेचन वाचनीय आहे. श्री जयंत पवार ह्यांना भावपूर्ण श्रध्दांजली.

अरुण कोळेकर ,सासवड

जयंत पवार यांच्या लेखनवैशिष्ट्यांचा आणि सकस साहित्य निर्मितीचा घेतलेला वेध वाचनीय आणि संस्मरणिय उतरला आहे. लेखनातील आत्मियता आणि आस्वादकता वाचकाला बांधून ठेवणारी आहे. जयंत पवार यांचे असे अकाली जाणे अनेकांना दुःखद करुन गेले आहे. त्यांच्या लेखनशैलीचा पोत आणि त्यांनी आपल्या साहित्यातून उजागर केलेले अनोखे जग वाचकांना अंतर्मुख आणि अस्वस्थ करणारे उतरले आहे. या लेखाने जयंत पवार यांच्या लेखनविश्वांवर टाकलेला दृष्टिक्षेप त्यांच्या लेखनाच्या शक्यता किती व्यापक आणि विस्तारित जाणाऱ्या होत्या हे समजून घेता येते.

Hira janardan

आभाळ ओंजळीत घेणारे प्रभावी विवेचन

Add Comment

संबंधित लेख