खणखणीत बंद्या रुपयाचा मोलाचा खजिना!

94व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात सयाजीरावांसंदर्भातील 50 ग्रंथांचं प्रकाशन

2016मध्ये महाराष्ट्र शासनाने ‘महाराजा सयाजीराव गायकवाड चरित्र साधने प्रकाशन समिती’ स्थापन केली. या समितीनं आजवर सयाजीरावांसंदर्भातील 62 ग्रंथ 25 खंडांमध्ये प्रकाशित केले. याच मालिकेतील 50 ग्रंथ नाशिक इथं होणाऱ्या 94 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात प्रकाशित होणार आहेत. आधुनिक भारताचा आदर्शलोक चितारणाऱ्या सयाजीराजांच्या कर्तृत्वाचा दस्तऐवज सहजप्राप्य होणे ही मराठी वाचकांसाठी अभिमानाची गोष्ट ठरेल.

राजा कसा असावा, राजकर्तव्यं आणि जबाबदाऱ्या काय असतात याची चर्चा महाभारतातील शांतिपर्वात भीष्म, युद्धिष्ठिर आणि कृष्णाच्या संवादात वाचायला मिळते. शरपंजरी भीष्म तिथं "राजधर्म, आपद्धर्म आणि मोक्षधर्माविषयी सांगतांना प्रजेचं हित, सुशासन, न्यायाचं आणि सत्याचं पालन हाच राजाच्या नित्य काळजीचा विषय असायला पाहिजे, बुद्धिमान राजा हा कर्मशील असणं आवश्यक असतं पण ज्ञान हे श्रेष्ठ सुख आहे याची त्यानं सतत जाणीव ठेवली पाहिजे." असं सांगतात. आधुनिक काळात आदर्श राजाच्या या व्याख्येत बडोद्याचे सयाजीराजे गायकवाड बरोबर बसतात.

सयाजीराव गायकवाडांच्या कारकिर्दीतलं त्यांचं बहुविध क्षेत्रांतलं कार्य, प्रजेच्या हितासाठी त्यांनी राबवलेल्या योजना आणि अनेक कल्याणकारी योजनांसह असंख्य संस्था, व्यक्ती आणि उपक्रमांच्या पाठीशी उदारपणे उभं राहणं ही आदर्श नायकाची लक्षणं त्यांच्या ठायी खचितच होती. आधुनिक भारताच्या कल्पनेत त्याचं कार्य पुढंही अनेकांना प्रेरक ठरलेलं आहे. भारतीय आणि पाश्चिमात्य परंपरांतल्या विचारांचं त्यांनी नीटपणे परिशीलन केलेलं असल्यानं त्यांनी केलेल्या कार्यातून आणि मांडलेल्या विचारांतून त्यांच्या द्रष्टेपणाची साक्ष पटते. महाराजा सयाजीराव गायकवाड हे तत्कालीन भारतातील सगळ्यांत प्रगतिशील विचारांचे आणि विश्वभान असलेले राजे होतेच; पण ते वैविध्यपूर्ण भारताचे बौद्धिक धुरीणत्वही करत होते.

मात्र महाराष्ट्राचे भूमिपुत्र असलेल्या सयाजीरावांविषयी महाराष्ट्रातच पुरेसं दस्तऐवजीकरण झालेलं नव्हतं. ती मोठी उणीव गेल्या काही वर्षांत बाबा भांड यांच्या अविश्रांत अशा संशोधनाच्या ध्यासातून, त्यांनी त्यातून मिळवलेल्या कागदपत्रांच्या, दस्तऐवजांच्या, ग्रंथांच्या आणि साधनस्रोतांच्या उपलब्धीतून दूर झाली आहे. 

वैविध्यपूर्ण भारताचं बौद्धिक धुरीणत्व करणाऱ्या प्रगतिशील विचारांच्या अशा राजाच्या सर्वांगीण कार्याच्या चतुःसीमा कवेत घेणारा प्रकल्प महाराष्ट्रात शासनाच्या ‘महाराजा सयाजीराव गायकवाड चरित्र साधने प्रकाशन समिती’द्वारे पाच वर्षांपूर्वी सुरू झाला. अल्पावधीतच शासनानं या समितीद्वारे सयाजीरावांसंदर्भातील 25 खंडांतील 62 ग्रंथ प्रकाशित करून अपूर्व अशी कामगिरी केली आहे. त्याचबरोबर बाबा भांड यांनी साकेत प्रकाशनातर्फे सयाजीरावांवरील 17 ग्रंथ प्रकाशित केले. ‘महाराजा सयाजीराव गायकवाड संशोधन व प्रशिक्षण संस्थे’नं 16 ग्रंथ प्रकाशित केलेले आहेत. मधल्या कोरोना संकटाच्या काळात सगळे व्यवहार ठप्प झालेले असताना महाराजा सयाजीराव यांच्या अलौकिक कार्याचा परिचय सहजपणे लोकांना व्हावा या प्रामाणिक भूमिकेतून ‘सयाजी ज्ञानमाले’च्या ई-पुस्तिका मोफत स्वरूपात महाराष्ट्राला उपलब्ध करून देण्यात येत आहेत. कृषी, उद्योग, आरोग्य, कला, क्रीडा, वास्तुशिल्प, साहित्य, कला, संस्कृती, धर्म, जात, तत्त्वज्ञान, शिक्षण, संशोधन, प्राच्यविद्या, पुरातत्त्व, आंतरराष्ट्रीय संबंध, स्वातंत्र्यलढा अशा विविधांगी विषयांवरच्या सुमारे 110 ई-पुस्तिका जुलै 2021 पासून ‘महाराजा सयाजीराव गायकवाड संशोधन व प्रशिक्षण संस्थे’द्वारे दोन दिवसांआड मोफत वितरित करण्यात येत आहेत. या पुस्तिका छापील स्वरूपातही लवकरच उपलब्ध होणार आहेत.

अशा संशोधन प्रकल्पांचं महत्त्व काय असतं?
गेले काही महिने मला व्हॉट्सअ‍ॅपवर दर दोन दिवसांआड ई-पुस्तिकेची एकेक प्रत मिळत होती. कमी पृष्ठे असलेली, एकेका विषयाची संक्षिप्त, तरीही पुढील वाचनासाठी जिज्ञासा जागवणारी पुस्तिका वाचूनही लवकर होत असे. हे वाचन करत असताना मला सत्तरच्या दशकात निर्माण झालेले, विविध संस्थांनी, वाचक चळवळींनी आणि आंदोलनांनी केलेल्या पुस्तिकांचे संच आठवत होते. या पुस्तिकांनी तरुणपणात आमची वैचारिक जडणघडण झाली, असे सांगणारे कित्येक प्रौढ लोक मला भेटलेले आहेत. नवीन ज्ञानाची आस असणारे कार्यकर्ते, महाविद्यालयीन किशोर विद्यार्थी, अभ्यासक यांना या पुस्तिकांचा मोठा लाभ होत आहे हे गेल्या पन्नास वर्षांत लक्षात आलेलं आहे. शिवाय अलीकडं वाचनाचं प्रमाण कमी झालं आहे असं ऐकताना एकूण वाचनसंस्कृतीच्या अभिवृद्धीमधे असे उपक्रम उपकारक ठरतील हे उघडच आहे.

कालोचित कॉपीलेफ्ट चळवळ
आंतरजालाचा व्यापक प्रसार झाल्यापासून जगभर अक्षरशः कोट्यवधी पुस्तके ई-स्वरूपात सहज उपलब्ध झालेली आहेत. ही एक प्रकारची 'हक्कसोड' (कॉपीलेफ्ट) चळवळ आहे. ज्यांना सहजासहजी पुस्तकांपर्यंत पोहचणं, ती प्राप्त करणं शक्य नसतं, ज्यांना परवडू शकत नाही असे महाविद्यालयांतील, विद्यापीठांमधील तरुण विद्यार्थी, संशोधक यांना यामुळं मोठाच दिलासा मिळालेला आहे. देशोदेशींच्या विद्यापीठांची जर्नल्स आणि डिजिटल लायब्रऱ्या आता विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देता येणं शक्य झालेलं आहे. अनेक वेबसाइट्स अशा असंख्य पुस्तकांच्या ई-प्रती मोफत उपलब्ध करून देत आहेत. भारत सरकारनं डिजिटल लायब्ररी ऑफ इंडियाच्या (डीएलआय) माध्यमातून भारतीय भाषांमधील आणि इंग्रजीतील एकोणिसाव्या शतकापासूनची हजारो पुस्तके त्यांच्या वेबसाइटवर मोफत ठेवलेली आहेत. महाराष्ट्र शासनाच्या राज्य मराठी विकास संस्थेनं जुन्या दुर्मिळ ग्रंथांचे, कोशांचे आणि नियतकालिकांचे डिजिटल रूपातले संच सर्वांसाठी मोफत उपलब्ध केलेले आहेत. एकूण मानवी संस्कृतीच्या विकासाच्या टप्प्यावर ही ग्रंथांची सहजप्राप्यता खऱ्या वाचकाला लाभदायक ठरो. त्यामुळे ‘महाराजा सयाजीराव गायकवाड संशोधन व प्रशिक्षण संस्थे’च्या ई-पुस्तिकांच्या उपक्रमाचं हे पाऊल कालोचित आणि औदार्याचंच आहे.

जुन्या, दुर्मिळ दस्तऐवजांमुळं आपल्याला इतिहास तर कळतोच, पण जगाविषयीचं आकलन वाढायलाही मदत होत असते. यात स्वतःविषयीच्या स्थानाचं, स्वतःविषयीचं आकलनही सामील असतं. समाज आणि परिवर्तनाविषयीची जाण वाढतेच, पण आपण अधिक चांगले नागरिक म्हणून घडावं आणि तौलनिक मूल्यमापन व्हावं यासाठी अशा साहित्याचं वाचन आपल्याला समृद्ध करीत असतं. इतिहास आपल्याला भूतकाळापासून शिकण्याची संधी देत असतो. हे शिक्षण अगत्याचं असतं. कारण नेहरूंच्या उक्तीनुसार जे इतिहास विसरतात, ते (तशाच) इतिहासाची पुनरावृत्ती करण्यासाठी अभिशप्त असतात. 

त्यामुळं सयाजीराव गायकवाड यांच्याविषयीचा हा उपलब्ध झालेला खजिना महाराष्ट्राच्या सांस्कृतिक इतिहासातली एक महत्त्वाची घटना तर आहेच, पण हा सगळा ऐवज अतिशय मोलाचा आहे. तो वाचला जावा. त्यामुळे अनेक पैलूंनी आपल्याला अंतर्दृष्टी मिळू शकेल.

सयाजीराव आणि ज्ञानव्यवहार
पारतंत्र्यातील भारतात विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात जे धुरीण आणि अभिजन महाराष्ट्रातील समाजाची वैचारिक दिशा ठरवीत होते, त्याची सुरुवात एकोणिसाव्या शतकाच्या मध्यावरच झाली होती. त्यात मुंबई-पुणे इलाख्यातील तत्कालीन नवशिक्षित, उच्च विद्याविभूषित, व्यासंगी असे तरुण होते. आधुनिकतेची आस बाळगलेल्या या पिढीनं ज्ञाननिर्मितीचा अभूतपूर्व प्रयोग महाराष्ट्रातल्या प्रबोधनकाळात केला. त्यात सयाजीराव गायकवाडांनी सुरू केलेल्या ग्रंथमालेचा मोठा वाटा होता. विविध क्षेत्रांतील विद्वान, भाषाभ्यासक यांच्या द्वारे त्यांना प्रोत्साहन देऊन अनेक ग्रंथ त्यांनी स्वखर्चाने छापून घेतले. ही एक ऐतिहासिक कामगिरीच होय. भीष्मानं राजधर्मात सांगितलेल्या ज्ञानाच्या श्रेष्ठतेचं मूल्य सयाजीराजांनी पुरेपूर ओळखलेलं होतं.

ज्ञानव्यवहारात संशोधन, ग्रंथनिर्मितीस उपयुक्त पर्यावरण आणि सामान्य वाचकांपर्यंत हे ग्रंथ पोहोचणं या गोष्टी महत्त्वाच्या असतातच, पण त्या सामाजिक-राजकीय-सांस्कृतिक वातावरण अधिक विकासगामी होण्यासाठीही पोषक असतात. ब्रिटिश अंमल असताना एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीस महाराष्ट्रात जे प्रबोधन सुरू झालं त्यामुळं मराठी समाजासाठी बहुमोल अशी सामाजिक, सांस्कृतिक कामगिरी झाली. राष्ट्रवादी-राजकीय विचारांचं जागरण झालं. वाङ्मय, इतिहास, समाजशास्त्रे, पदार्थविज्ञान, रसायनशास्त्रांसह अनेक क्षेत्रांमध्ये एकाच वेळी लोकोपयोगी साहित्य निर्मिती करून एतद्देशीय लोकांना आधुनिक मूल्यांचा परिचय घडावा यासाठी अविरत श्रम केले. अनेक क्षेत्रांमध्ये हे नवजागरण होत असताना महाराजा सयाजीरावांनी यातलं महत्त्व ओळखून विविध क्षेत्रांमधली विद्वान मंडळी जोडून घेतली. अरविंद घोष, चिं. वि. जोशी, केळूसकर, राजारामशास्त्री भागवत, खासेराव जाधव, केशवराव देशपांडे आणि इतर अनेक उच्च विद्याविभूषित गुणीजन त्यांच्या आसपास राहिले.

डॉ. आंबेडकरांच्या जीवनात सयाजीराजांचं स्थान किती कळीचं होतं हे आपण जाणतोच, पण त्यांनी राष्ट्रचळवळीतील पितामह दादाभाई नौरोजी, ना. गोपाळ कृष्ण गोखले, म. फुले, न्या. रानडे, लोकमान्य टिळक, मादाम कामा, जमशेटजी टाटा, महर्षी शिंदे, कर्मवीर भाऊराव पाटील, महर्षी कर्वे, गंगारामभाऊ म्हस्के यांच्यासारख्यांच्या कार्यास दाद दिली, साहाय्य केलं. त्याचबरोबर डेक्कन मराठा एज्युकेशन असोशिएशन, डेक्कन एज्युकेशन सोसायटी, फर्ग्युसन महाविद्यालय, भारत इतिहास संशोधन मंडळ, भांडारकर प्राच्यविद्या संस्था- अशा अनेक संस्थांनाही उदारपणे राजाश्रय दिला. स्वातंत्र्ययुद्धाला त्यांचा सक्रिय पाठिंबा होता. ब्रिटिश अमलाखालील संस्थानाधिपतीनं असं करणं हे धाडस होतं. पण ते या बाबतीत निग्रही आणि धोरणी होते. पाश्चात्त्य शिक्षकांकडून घेतलेले धडे, आधुनिकतेशी झालेला परिचय, परंपरेचं नीट भान यांमुळं त्यांचं विश्वभान व्यापक होतं. त्याचा उपयोग त्यांनी सजगपणे प्रशासनात प्रजेच्या हितासाठी आणि राष्ट्राच्या उभारणीसाठी केला. समता हे तत्त्व आधुनिकतेतल्या व्यक्तिवादाशीही संबंधित असल्यानं स्वातंत्र्याचा आदर करताना विषमतेचा प्रतिकार करणंही आवश्यक असतं हे त्यांनी ओळखलं होतं. त्यांच्या या द्रष्टेपणामुळंच ते जनप्रिय आणि रयतेचे राजे झाले.

स्तुत्य उपक्रम
स्वातंत्र्योत्तर काळात यशवंतराव चव्हाणांनी साहित्य, संस्कृती आणि कला या गोष्टी राज्याच्या एकूण उन्नतीसाठी पोषक असतात हे ओळखून ज्या संस्था सुरू केल्या त्याची फळे पुढील काळात दिसू लागली. शासनाच्या विविध संस्थांनी आणि महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती महामंडळानं जी ग्रंथनिर्मिती केली ती खरोखरच स्तुत्य आहे आणि सयाजीराजांविषयीचं जे साहित्य इतकी दशकं अपरिचित राहिलं होतं ते या प्रचंड ग्रंथनिर्मितीद्वारे मराठी वाचकांपुढं आलं आहे ही एक अपूर्व घटना आहे. बाबा भांड यांच्या व्यक्तिगत संशोधनाचा, कष्टाचा, तन-मन-धनानं या विषयाशी एकरूप होण्याचाही या निर्मितीत मोठाच वाटा आहे. विशेषतः शासनाच्या सहयोगानं हे प्रकल्प राबवले गेलेले असल्याने हे ग्रंथ तुलनेने बऱ्याच कमी दरात वाचकांना उपलब्ध होत आहेतच. पण स्वतः बाबा भांड यांनी सुरू केलेली ई-पुस्तिकांची मोफत 'सयाजी माला' हा उपक्रम तर अभिनंदनीय आहे!

- गणेश विसपुते  
bhasha.karm@gmail.com

(गणेश विसपुते हे कवी, समीक्षक, अनुवादक आणि चित्रकार आहेत.)

Tags: गणेश विसपुते सयाजीराव गायकवाड अखिल भारतीय साहित्य संमेलन चरित्र ग्रंथ Ganesh visputay Sayajirao Gaekwad Akhil Bhartiya Sahitya Sammelan e-books Load More Tags

Add Comment