ग्रामीण अर्थव्यवस्थेच्या अर्थकारणाचे चक्र कधी फिरणार?

या अर्थव्यवस्थेत ‘आठवडी बाजार’ हे रक्तवाहिन्यांप्रमाणे काम करत असतात.

आठवडी बाजाराचे प्रातिनिधिक चित्र | फोटो सौजन्य: मुक्त ज्ञानकोश

‘आठवडी बाजार’ हे ग्रामीण अर्थव्यवस्थेतल्या आर्थिक व्यवहारांचे मोठे ठिकाण आहे.  आजपासून अनलॉकडाऊन प्रकियेचा चौथा टप्पा सुरू होत आहे. तरीदेखील लॉकडाऊनदरम्यान बंद पडलेले आठवडी बाजार खुले करण्यात आलेले नाहीत. परिणामी, ग्रामीण भागांतले अर्थव्यवहार आणि व्यवसाय गेल्या पाच महिन्यांपासून ठप्प आहेत. आठवडी बाजारांवर पहिला आघात नोटाबंदीने, तर दुसरा आघात वस्तू आणि सेवा कराने (जीएसटीने) केला. या दोन्ही आघातांतून बाहेर पडण्याचे प्रयत्न हळूहळू सुरू असतानाच कोरोनाच्या महामारीने गाठून अवसानघात केला आहे. 

या आघातांमुळे पेचप्रसंगात सापडलेल्या आणि मोडकळीस आलेल्या ग्रामीण अर्थव्यवस्थेवर खोलवर आणि दीर्घकालीन परिणाम झाले आहेत. ‘आठवडी बाजार’ म्हणजे ग्रामीण भागाच्या आत्मनिर्भरतेच्या वाटचालीतला आधार. या संकटामुळे तो आधारच हिरावून घेतला गेला आहे. परिणामी, ग्रामीण अर्थव्यवस्थेचे कंबरडे मोडले आहे. लॉकडाऊनमुळे ‘आठवडी बाजार’ बंद झाल्याने ग्रामीण अर्थकारणावर आणि समाजजीवनावर झालेल्या परिणामांचा आढावा या लेखातून घेण्यात आला आहे. 

नेकनूर (ता. जि. बीड) इथल्या आठवडी बाजारातली ही काही उदाहरणे...
 
1.आठवडी बाजारात परंपरागत बांगडीविक्रीचा व्यवसाय करणारे धनंजय कोकीळ म्हणतात, “मी या वर्षाच्या उन्हाळा हंगामातील (मार्च ते मे 2020) व्यवसायासाठी नातेवाइकांकडून उसने पैसे घेऊन बांगड्यांचा माल भरला होता. धंदा सुरू होण्याअगोदरच लॉकडाऊन चालू झाले. परिणामी, सर्वच माल घरात पडून आहे. आठवडी बाजारातील व्यवसायावर अवलंबून असल्याने कर्जबाजारी होऊन कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे.” (मुलाखत - 14 ऑगस्ट 2020)

2. केवळ एक एकर शेतजमीन असणारे आणि कुटुंबाच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी 28 वर्षांपूर्वी (1992मध्ये) पारंपरिक शेतीव्यवसाय सोडून आठवडी बाजारात अल्पोपाहाराचा हॉटेल-व्यवसाय सुरू करणारे मराठा समाजातले भागवत शिंदे म्हणतात, “अल्पभूधारक असल्याने नाइलाजाने सामाजिक विरोध पत्करून हॉटेल व्यवसाय सुरू केला. हॉटेल व्यवसायाच्या आधारे कुटुंबाच्या मूलभूत गरजा जेमतेम पूर्ण होत असत... मात्र लॉकडाऊनमुळे संपूर्ण व्यवसायच बंद पडला आणि केलेली गुंतवणूक वाया गेली. मुलांच्या शिक्षणाच्या, आरोग्याच्या आणि कुटुंबाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी खासगी सावकाराचे कर्ज घेतल्याने कर्जबाजारी झालो आहे.” (मुलाखत - 13 ऑगस्ट 2020) 

3. परंपरागत कपडे शिवण्याचे काम करणारे शिंपी समाजातले बंडू पिसे सांगतात, “80 हजाराचे रोखीने आणि 50 हजाराचे उधारीवर अशी सव्वा लाखांहून अधिक गुंतवणूक कापड मालामध्ये केली होती. लॉकडाऊन सुरू झाल्यापासून तो माल घरात पडून आहे. उधार घेतलेल्या मालाचे पैसे वसूल करण्यासाठी व्यापारी घरी चकरा मारत आहे. काहीच धंदा नसल्याने त्यांना पैसे देऊ शकत नाही. आता घरखर्च भागवणे आणि हाच व्यवसाय पुन्हा नव्याने उभा करणे हे खूपच कठीण आव्हान आहे.” (मुलाखत - 13 ऑगस्ट 2020) 

4. गेल्या पंधरा वर्षांपासून आठवडी बाजारात फळे विकणारे केरबा धेडुळे आपली व्यथा सांगताना म्हणतात, “प्रत्येक आठवडी बाजारात होणाऱ्या व्यवसायातून खर्च वजा जाता केवळ 500 ते 700 रुपये राहतात. या व्यवसायात पन्नास हजार रुपयांची गुंतवणूक केली... मात्र लॉकडाऊनने सर्व गुंतवणूक वाया गेली. नव्याने व्यवसाय सुरू करण्यासाठी खासगी सावकाराकडून व्याजाने पैसे घेतल्याशिवाय व्यवसाय सुरूच करता येणार नाही अशी परिस्थिती आहे.” (मुलाखत - 10 ऑगस्ट 2020) 

5. शेतीबरोबरच शेतीतल्या भाजीपाल्याची आठवडी बाजारात विक्री करणारे प्रभाकर मुंडे. “आठवड्यात एकदा भाजीपाला विकून केवळ 400 ते 500 रुपये शिल्लक राहतात. त्या पैशांनी कुटुंबाचा आठवड्याचा किराणा मालाचा आणि भाजीपाल्याचा खर्च भागत होता. लॉकडाऊनपासून हे सर्वच बंद झाले आहे. लॉकडाऊनने तर तोंडातला घासच काढून घेतला आहे.” अशा शब्दांमध्ये मुंडे आपल्या भावना व्यक्त करतात. (मुलाखत - दि. 14 ऑगस्ट 2020) 

आठवडी बाजारावर अवलंबून असलेल्या कुटुंबांच्या अशा अनेकविध कहाण्या आहेत.

‘आठवडी बाजार’ हा ग्रामीण अर्थचक्र फिरवणारा महत्त्वाचा घटक. ग्रामीण भागातील शेतकरी, समाजघटक, अलुतेदार, बलुतेदार, अल्पसंख्याक, फिरस्ते (भटक्या जातीजमाती) या सर्वांचे आर्थिक व्यवहार याच बाजारावर आधारलेले असतात. व्यवहारनिहाय पाहिल्यास आठवडी बाजारांवर पुढील सर्व व्यवसाय–व्यवहार–व्यक्ती अवलंबून असतात:

1. उत्पादित वस्तूंचे विक्रेते - जनरल स्टोअर्स, रेडिमेड कपडे, वुलनचे रेडिमेड कपडे, बांगडी, भांडी, किराणा, शेती अवजारे, पशुखाद्य, सुया-दाभण-खेळणी, चप्पल-बूट आणि शालेय साहित्य इत्यादी मालाचे विक्रेते.
2. प्रक्रिया व्यावसायिक - गूळ, रसवंती, तेल, तूप, डाळ इत्यादी मालाचे विक्रेते. 
3. शेतीमाल विक्रेते - अन्नधान्य, वैरणचारा, आडते, भुसार, भाजीपाला, फळ, सुकामेवा इत्यादीचे विक्रेते.
4. कलाकुसर व हस्तकला यांद्वारे उत्पादन करणारे कारागीर आणि माती, कापड, चामडे, लाकूड, लोखंड इत्यादींपासून वस्तू तयार करणारे.
5. सांस्कृतिक मनोरंजन करणारे कलाकार - तमासगीर, नाटकमंडळी, मदारी, डोंबारी, नागवाले, पाळण्यावाले, बहुरूपी इत्यादी.
6. इतर व्यापारी - पाळीव प्राण्यांची खरेदीविक्री करणारे. 
7. इतर व्यावसायिक – चहाचे स्टॉल्स, अल्पोपाहाराची व खाद्यपदार्थांची हॉटेले, खानावळी, तंबाखूपानवाले, मसालेवाले, मटणवाले व मासेवाले, पक्षी-अंडी यांची विक्री करणारे इत्यादी.  
8. इतर कामगार - हमाल, मालवाहतुकीच्या छोट्या वाहनांचे चालक, रोजंदारी मजूर, दलाल इत्यादी.
9. सेवाक्षेत्रातले कामगार, मदतनीस इत्यादी.

ग्रामीण अर्थव्यवस्थेच्या चक्रात ‘आठवडी बाजार’ हे रक्तवाहिन्यांप्रमाणे काम करत असतात. राज्य शासनाने कोरोना महामारीमुळे केलेल्या लॉकडाऊनमध्ये आठवडी बाजार जरी बंद केले असले तरी अनलॉकडाऊनच्या प्रकियेत स्थानिक प्रशासनांना सामाजिक अंतराचे पालन करत आणि विकेंद्रीकरणाच्या माध्यमातून गावोगावचे आठवडी बाजार चालू ठेवणे शक्य होते... मात्र ते पूर्ववत सुरू झालेले नाहीत. शहरी भागात मात्र कृषी उत्पन्न बाजार समित्या, मार्केट यार्ड्स, मंडया इत्यादी हळूहळू चालू केले. 

आठवडी बाजारावर संबंधित गावातील ग्रामपंचायत, नगरपरिषद, नगरपालिका यांचे नियंत्रण असते. बाजारासाठी जागेची उपलब्धता, सोयीसुविधा उपलब्ध करून देणे ही जबाबदारी ग्रामपंचायतींवर असते. त्यासाठी ग्रामपंचायतीला नाबार्ड, राज्य शासनाचा पणन विभाग यांचे सहकार्य मिळते... मात्र अनेक आठवडी बाजारांना या मूलभूत सुविधा अद्यापही उपलब्ध झालेल्या नाहीत. ग्रामीण अर्थव्यवस्थेतले अनेक व्यवहार परस्परांवर अवलंबून असल्यामुळे  आठवडी बाजार दर आठवड्याला भरत राहतात, असतात.  

आठवडी बाजाराची परिसरनिहाय आणि गावांच्या भौगोलिक स्थानानुसार परंपरागत वैशिष्ट्ये निर्माण झालेली आहेत. उदाहरणार्थ, बैलबाजार, भाजीपाला बाजार, कपडे बाजार इत्यादी.

आठवडी बाजाराचे वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये खरेदीविक्रीचे व्यवहार रोखीने आणि उधारीने असे दोन्ही पातळ्यांवर ज्यांच्या-त्यांच्या सोयीनुसार होत असतात. तिथे विश्वास आणि ओळख यांना महत्त्व असते. ग्रामीण समुदायाची नाळ या बाजारातल्या अर्थव्यवहारांशी जोडली गेलेली असते.

शासनाने लॉकडाऊनच्या काळात शेतीतील कामे करण्यास परवानगी दिली होती... पण शेतीतून निघालेला शेतीमाल विकायचा कोठे हा प्रश्न शेतकऱ्यांसमोर होताच. मोठ्या शहरात माल घेऊन जाण्याची परवानगी होती... मात्र शहरात घेऊन जाण्याएवढा जास्तीचा माल शेतकऱ्यांकडे नसतो. नेकनूर (ता. जि. बीड) परिसरातील काही शेतकऱ्यांनी एकत्र येत बीड शहरात शेतमाल नेऊन तो विकण्याचे धाडस केले... मात्र शेतीमाल विकूनही योग्य तो भाव मिळालाच नाही. परिणामी, शेतीमाल शहरात घेऊन जाण्यासाठी खर्च झालेल्या वाहनभाड्याएवढेही पैसे मिळाले नाहीत.

दुसरे असे की, शहरांनजीकचे काही शेतकरी शहरात फिरून शेतीमाल विकू शकतात... मात्र खेडेगावांत, वाड्या-वस्त्यांवर राहणाऱ्या शेतकऱ्यांनी आत्तापर्यंत केवळ आठवडी बाजारातच भाजीपाला आणि शेतीमाल विकलेला आहे... त्यामुळे त्यांनी शहरात जाऊन भाजीपाला विकण्याऐवजी तो बांधावर टाकून देणे पसंत केले.

मार्केटयार्डमध्ये, कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या बाजारांमध्ये शेतीमालाची आवकजावक किती राहते यावर शेतीमालाचे बाजारभाव ठरत असतात... पण आवकजावक कशा प्रकारची आहे याची माहिती शेतकऱ्यांना मिळत नाही. परिणामी, जे व्यापारी आणि ग्राहक शेताच्या बांधावर येतील त्यांनाच शेतकऱ्यांनी मिळेल त्या भावाने भाजीपाला विकला... मात्र खराब न होणारा शेतीमाल घरीच ठेवला. घरी ठेवलेल्या शेतमालाला अनलॉकडाऊनच्या काळात विक्रीसाठी काढल्यावर योग्य भाव तर मिळाला नाहीच... शिवाय शेतकऱ्यांना शेतीमालाच्या विक्रीसाठी खूप त्रासही सहन करावा लागला. 

उदाहरणार्थ, कापूस एकाधिकार केंद्रांवर झालेली गर्दी आणि वेळेवर पैसे मिळत नाहीत हे पाहून शेतकऱ्यांनी खासगी व्यापाऱ्यांना कापूस विकणे पसंत केले... मात्र खासगी व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांकडून भाव पाडून कापूस विकत घेतला. अजूनही काही शेतकऱ्यांचा कापूस, ज्वारी, बाजरी, गहू आणि कांदा घरीच पडून आहे.

ग्रामीण भागातील आठवडी बाजारावर अवलंबून असलेल्या असंघटित क्षेत्रातील अनेक मजूर, भूमिहीन व रोजंदारी करणारे शेतमजूर या सर्वांचा रोजगार लॉकडाऊनने हिरावून घेतला असून त्यांना बेरोजगारीमध्ये लोटले आहे. या सर्वांना कधी रोजगार मिळणार हा प्रश्न आहे. या मजुरांना आठवडी बाजारात व्यापारी, दुकानदार, व्यावसायिक, धान्य-आडते यांच्याकडे हक्काची मजुरी मिळते. बाजारात मिळालेल्या मजुरीवरच अनेक मजुरांची कुटुंबे चालतात... मात्र लॉकडाऊनने या मजुरांच्या तोंडातला घास हिरावून घेतला आहे. अनेक कुटुंबे अर्धपोटी दिवस काढत आहेत.

ग्रामीण भागातील बलुतेदार, अलुतेदार, कारू-नारू, भटक्या जातीजमाती, अल्पसंख्याक या समाजघटकांनी आठवडी बाजाराचा आधार घेत पारंपरिक व्यवसाय सोडून आधुनिक शिक्षण, आधुनिकीकरण आणि औद्योगिकीकरण यांच्या संयोगाने नव्याने निर्माण झालेले व्यवसाय स्वीकारले... कारण आठवडी बाजारामुळे त्यांना हक्काचे खरेदीविक्रीचे ठिकाण आणि ग्राहकवर्ग मिळाला. उदाहरणार्थ, मातंग समाजातल्या व्यक्तीने झाडू बनवून केवळ स्वतःच्या गावात विकण्याऐवजी ते आठवडी बाजारात नेल्यामुळे इतर गावांतले ग्राहक मिळाले. भोई समाज, कुलूप विकणारा जोरी समाज, लोखंडाच्या वस्तू तयार करून विकणारा घिसाडी समाज अशी यांची अनेक उदाहरणे देता येतील. गावपातळीवर वस्तू विकताना सौदेबाजी करण्यास मर्यादा येतात... मात्र आठवडी बाजारात तशा मर्यादा नसतात. विक्रेते आणि ग्राहक यांच्यात स्पर्धा असते.

समाजव्यवस्थेने नाकारलेला आणि आठवडी बाजारावर अवलंबून असलेला समाजघटक म्हणजे भटक्या विमुक्त जातीजमाती होय. या भटक्या जमातींमधले लोक आठवडी बाजारात कलाकुसरीच्या वस्तू, हस्तकला वस्तू, उत्पादित साधने, खेळणी इत्यादी विकून; मजुरी, रोजंदारी, मनोरंजन करून; आणि पडेल ते व मिळेल तेवढे काम करून कुटुंबाच्या मूलभूत गरजा पूर्ण करत होते. गेल्या पाच महिन्यांपासून लॉकडाऊनमुळे या जातीजमातींचा उपजीविकेचा आधार आणि सर्व साधनेच हिरावली गेली आहेत. आता या जातीजमाती कशा जगतील हा आणि असे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.

बाजारावर अवलंबून असलेल्या भटक्या जातीजमातींचा वेध घेतला असता... भटक्या जातीजमातींमधल्या व्यक्तींनी जर विविध गावांमध्ये जाऊन धंदा, काम, व्यवसाय करावा म्हटले तर गावबंदी असल्याने इतर गावांतल्या गावकऱ्यांनी त्यांना गावांमध्ये येऊ दिलेले नाही. या सर्व कुटुंबांवर अर्धपोटी राहून उपासमारीची वेळ आली आहे. मग ते लोक शेती आणि शेतीशी संबंधित कामे मिळवण्याचा प्रयत्न करतात. मात्र शेतकऱ्यांच्या मतानुसार या जमातींतील व्यक्तीकडे  शेती आणि शेतीसंबंधित कामांची कौशल्ये नाहीत... त्यामुळे जमातीमधील अनेक कुटुंबांतील कर्त्याधर्त्यांचा एक दिवस काम करणे आणि दुसऱ्या दिवशी पालावर थांबणे असा दिनक्रम चालू आहे. 

भटक्या जमातींतील व्यक्ती सांगतात की, शेतीतील कामे हळूहळू शिकून घेण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत... मात्र कामे मिळत नाहीत. शेतकरीवर्गही पूर्ण विश्वासाने कामे देत नाही. भटक्या जमातींतील असल्याने नेहमी संशयाच्या नजरेनेच पाहिले जाते. अनलॉकडाऊनच्या प्रकियेत भटक्या जमातींचे तरुण मिळेल त्या कामांच्या शोधात गावोगाव फिरत आहेत. दुसरे असे की, भटक्या जातीजमातींच्या कुटुंबांकडे गावाचे रहिवासी असल्याची कागदपत्रेच नसल्याने रेशनवरचे धान्यही मिळत नाही... त्यामुळे भटक्या जमातींतील कुटुंबे अतिशय वाईट अवस्थेत आहेत. या दुष्टचक्रातून बाहेर पडण्यासाठी या भटक्या जमाती आठवडी बाजार सुरू होण्याची वाट पाहत आहेत. 

1990नंतरचे उदारीकरणाचे धोरण आणि शासनाचे शेतीविषयक धोरण यांमुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेवर हळूहळू आघात होणे सुरू झाले. ग्रामीण भागांतले अर्थव्यवहार हे गावपातळीवरच्या बाजारांच्या आणि आठवडी बाजारांच्या ठिकाणी तग धरून होते... मात्र लॉकडाऊनच्या काळात ही ठिकाणे ठप्प झाली आहेत. बंद पडलेले ग्रामीण अर्थचक्र पुन्हा सुरू व्हावे यासाठी शासनाने धोरणात्मक पातळीवर लक्ष घालण्याची गरज निर्माण झाली आहे. त्यातून ग्रामीण अर्थव्यवस्थेच्या चक्राला उभारी मिळेल. अन्यथा ग्रामीण भागावर सुलतानी संकट कोसळेल हे निश्चित.

- डॉ. सोमिनाथ घोळवे 
somnath.r.gholwe@gmail.com
 

(लेखक, शेती, दुष्काळ व पाणीप्रश्न यांचे अभ्यासक असून द युनिक फाउंडेशन, पुणे येथे वरिष्ठ संशोधक आहेत.)

Tags: मराठी सोमिनाथ घोळवे आठवडी बाजार ग्रामीण अर्थव्यवस्था लॉकडाऊन Sominath Gholwe Athavdi Bajaar Rural Economy Load More Tags

Comments:

Mangesh shard jaganade

lekha vachun bare vatale aapn amchya vyatha mandlyat mi 1998 pasun bazaravarti maza &mazya kutunmbacha udarnirvah kart aahe........thanks

Hira

सारे काही सुन्न करणारे... निर्नायकी अवस्था..निर्लज्ज पुढारी . केव्हा संपणार हे नष्टचर्य???

Add Comment

संबंधित लेख