कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे प्रमाण वेगाने वाढतेय 

कांदा लागवड : पीक पद्धतीमधील बदलाचा चांगला संकेत

फोटो सौजन्य : entrepreneurreporters.com

कांदा या पिकाने दुष्काळी परिसरातील गावांतील अनेक शेतकऱ्यांची ऊसतोडणी थांबवली... मात्र या वर्षी जास्तीच्या पावसाने आणि रोगराईने ऊसतोड थांबवून शेती करणारा शेतकरी अडचणीत आला आहे. तरी बऱ्याच शेतकऱ्यांचे म्हणणे असे की, या वर्षी रोगराईने आणि अतिवृष्टीने जरी कांदा पिकाचे खूप नुकसान झाले तरी गुंतवणुकीएवढे किमान उत्पन्न मिळाले... त्यामुळे दुष्काळी परिसरातील गावांमध्ये कांदा पिकाची लागवड अनेक शेतकऱ्यांनी पुन्हा केली. या (रब्बी) हंगामात कांदा पिकाकडून शेतकऱ्यांच्या अपेक्षा खूप वाढलेल्या आहेत.

दुष्काळी भागात पीक पद्धतीत बदल केला तर दुष्काळाची तीव्रता कमी केली जाऊ शकते असे मत बहुतांश अभ्यासकांचे आणि पाणीतज्ज्ञांचे आहे. पीक पद्धतीमध्ये बदल करायचा म्हणजे जास्त पाणी लागणारी पिके न घेता  कमी पाण्यावर येणारी पिके घेणे आणि शेती कसण्याच्या व पाणी देण्याच्या पारंपरिक पद्धती सोडून देणे. याउलट पाणी व्यवस्थापन आणि नियोजन वापरून कमी पाण्यावर येतील अशा पिकांचे वाण (बियाणे) वापरणे, नवनवीन तंत्रज्ञान वापरून आधुनिक पद्धतीने शेती कसणे म्हणजे पीक पद्धतीत बदल होय.  

...पण प्रचलित असलेली पिके आणि कसण्याची पद्धत सोडून दुसरे कोणते पीक घ्यायचे हा प्रश्न शेतकऱ्यांसमोर असतोच. सुधारित (आधुनिक तंत्रज्ञान वापरून) पद्धतीने शेती करण्यासाठी शासन व्यवस्था, कृषी विद्यापीठ आणि प्रशासनाद्वारे (कृषी विभाग) योग्य मार्गदर्शन केले जात  नाही हा शेतकऱ्यांचा आत्तापर्यंतचा अनुभव आहे.

दुष्काळी भागातील शेतकरी पीक पद्धतीत बदल करायला तयार नसतात... कारण शेतीमध्ये नफ्याचा परतावा देईल असे कोणते पीक आहे, याबाबत शेतकऱ्यांना खातरीशीर माहिती नसते. शेतकऱ्यांच्या मनात संदिग्धता असते. नवीन पीक घ्यायचे म्हणजे जोखीम आली, ही जोखीम स्वीकारायला शेतकरी कोणत्याही स्थितीत तयार नसतो... त्यामुळे पारंपरिक पद्धतीने, पारंपरिक पिके घेण्याकडेच त्यांचा कल राहतो. काही गावांमध्ये पाझर तलावातून किंवा इतर मार्गाने शाश्वत पाणीस्रोत उपलब्ध झाले तर हमीभाव आणि नगदी पैसा हातावर देणाऱ्या ऊस या पिकाची लागवड झाल्याचे सर्रास पाहायला मिळते... मात्र गेल्या दहापंधरा वर्षांत मराठवाड्यात, पश्चिम महाराष्ट्रात आणि उत्तर महाराष्ट्रात वर्षभर पाणी मिळेल असा स्रोत शेतकऱ्यांकडे नसतानाही, केवळ आठमाही पाणीस्रोतावर खरीप आणि रब्बी अशा दोन्ही हंगामांमध्ये नगदी पीक घेण्याचे प्रमाण वाढत आहे. ते पीक म्हणजे ‘कांदा पीक’ होय.

गेल्या दहा वर्षांपासून दुष्काळी भागात कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे प्रमाण वेगाने वाढत आहे. पीक पद्धतीमधील बदलाचा हा चांगला संकेत आहे. आहारामध्ये कांद्याचा सर्वाधिक वापर असल्यामुळे कांदा हे व्यापारीदृष्ट्या सर्वात महत्त्वाचे पीक आहे. कांदा या पिकास महाराष्ट्रातील वातावरण अनुकूल असून किती क्षेत्र लागवडीखाली असेल याची वास्तव आकडेवारी उपलब्ध नाही... मात्र दीड लाख हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रावर प्रतिवर्षी कांदा लागवड होत असावी असा अंदाज कांदा उत्पादक शेतकरी आणि व्यापारी यांच्याकडून सांगितला जातो. राज्यात नाशीक, पुणे, सोलापूर, जळगाव, धुळे, अहमदनगर, सातारा हे जिल्हे कांदा उत्पादनासाठी ओळखले जातात. नाशीक जिल्हा तर कांदा उत्पादनासाठी देशात प्रसिद्ध आहे. त्यात कांदा विक्रीसाठी लासलगाव बाजारपेठ खूपच आवक असणारी आहे. राज्यातील एकूण कांदा उत्पादनापैकी 37 टक्के आणि देशातील 10 टक्के कांदा नाशीक जिल्ह्यात पिकवला जातो.

कांदा पिकासाठी पावसाळा आणि हिवाळा या हंगामांतील वातावरण पोषक मानले जाते. इथल्या वातावरणानुसार दोन ते तीन हंगाम घेतले जातात. कांद्याच्या वाढीला थंड तर पोषणासाठी थोडेसे उष्ण वातावरण आवश्यक आहे. तसे वातावरण पावसाळा आणि हिवाळा अशा दोन्ही (जून ते ऑक्टोंबर आणि नोव्हेंबर ते फेब्रुवारी) हंगामांत मिळते... त्यामुळे कांदा पीक दोन्ही हंगामांत घेतले जाते. कांदा पिकासाठी पाण्याचा निचरा होणारी भुसभुशीत (सेंद्रिय खताला साथ देणारी आणि मध्यम कसदार) जमीन हवी असते.

कांदा पिकाचे वाण (बियाणे) वेगवेगळ्या प्रकारचे  आहे. शेतीचा पोत कोणत्या प्रकारचा आहे त्यानुसार पिकाचे वाण (बियाणे) निवडावे लागते. सर्वसाधारपणे शेतकऱ्यांच्या हाती 100 ते 150  दिवसांत पिकाचे उत्पादन येते. कांदा पिकाचे वैशिष्ट्य असे की, पूर्ण वाढ होण्यापूर्वी पाणी कमी करून पीक काढता येते. या पिकाची ओळख कमी पाण्यावर येणारे पीक अशीच आहे. महाराष्ट्रात कांदा पिकाचे उत्पादन हेक्टरी 200 ते 250  क्विंटलपर्यंत घेणारे शेतकरी आहेत. कांदा पिकाचे बियाणे इतर पिकांच्या तुलनेत थोडेसे महाग असते... त्यामुळे काही शेतकरी विक्रीच्या कांद्याची लागवड करण्याऐवजी बियाणाचे उत्पादन घेतात. बियाणांच्या उत्पादनातूनदेखील कांदा लागवडीएवढे उत्पन्न मिळते असे अनेक शेतकऱ्यांचे अनुभव आहेत.

कांदा हे तीन महिन्यांचे पीक. मराठवाड्यातील बीड, उस्मानाबाद, जालना, लातूर, परभणी या जिल्ह्यांतील दुष्काळी-कोरडवाहू आणि माळरान परिसरात कांदा या पिकांचे क्षेत्र वाढत आहे... पण कांदा पीक घेण्यासाठी हंगामी काळात (पावसाळा-हिवाळा) तीनचार वेळेस पाणी मिळेल अशी सोय झाली तरी लागवड करण्यास वाव आहे. नगदी पीक म्हणून कांदा पिकाकडे पाहिले जाते. खरीप हंगामात शेतकरी मूग, उडीद, सोयाबीन, धने ही पिके घेतात. या पिकांच्या पाठीवर (बेवडावर) कांदा लागवड केली जाते... त्यामुळे हे पीक अगदी जोमाने येते. हे पीक घेण्यासाठी सर्वच (लागवड, खुरपणी, काढणी, कापणी, निगा राखणे इ.) बाबतींत महिला शेतकऱ्यांचा पुढाकार उल्लेखनीय आहे... त्यामुळे बहुतेक शेतकरी महिलांच्या कष्टावर घेतलेले पीक असा कांद्याचा उल्लेख करतात.

2020 या वर्षातील पावसाळ्यात रोगराईने आणि अतिवृष्टीने कांदा पीक संकटात सापडले होते. अनेक शेतकऱ्यांचे खूप मोठे नुकसान झाले. तरीही बऱ्याच शेतकऱ्यांनी हिवाळा हंगामातील कांदा लागवड मोठ्या जोमाने केली. मुंडेवाडी, नरेवाडी, एकुरका (ता. केज) पांढऱ्याची वाडी, धावज्याची वाडी, खर्डेची वाडी, येळंबघाट, निवडंगवाडी, डोईफोडवाडी, नेकनूर (ता. बीड) या गावांतील बऱ्याच शेतकऱ्यांनी सांगितले की, या वर्षी रोगराईने आणि अतिवृष्टीने जरी कांदा पिकाचे खूप नुकसान झाले तरी गुंतवणुकीएवढे किमान उत्पन्न मिळाले... त्यामुळे दुष्काळी परिसरातील गावांमध्ये कांदा पिकाची लागवड अनेक शेतकऱ्यांनी पुन्हा केली. या (रब्बी) हंगामात कांदा पिकाकडून शेतकऱ्यांच्या अपेक्षा खूप वाढलेल्या आहेत.

खरीप हंगामामध्ये कांदा पिकांच्या झालेल्या नुकसानीचा थोडक्यात आढावा...

कांदा या पिकाने दुष्काळी परिसरातील गावांतील अनेक शेतकऱ्यांची ऊसतोडणी थांबवली... मात्र या वर्षी जास्तीच्या पावसाने आणि रोगराईने ऊसतोड थांबवून शेती करणारा शेतकरी अडचणीत आला आहे. यासंदर्भात शेतकऱ्यांशी संवाद केला. त्यातून मिळालेल्या माहितीनुसार दुष्काळी परिसरातील गावांमधील (मुंडेवाडी, बाभूळगाव, सारणी  ता. केज, जिल्हा. बीड) कांदा उत्पादक शेतकऱ्यांवर एका मागोमाग एक संकटे (अतिवृष्टी आणि रोगराई) येत राहिली. बाजारात कांद्याचा तुटवडा निर्माण झाल्याने भाव चांगला राहिला आहे... त्यामुळे शेतकऱ्यांच्या खूप आशा या पिकावर लागल्या होत्या... मात्र निर्यातबंदी, अतिवृष्टी आणि रोगराई यांमुळे कांदा या पिकाचे खरीप हंगामातील उत्पादन खूपच घटलेले पाहण्यास मिळाले.

तपशिलात जाऊन आढावा घेतल्यास कांदा बियाणे महागल्याने दुष्काळी परिसरातील गावांमध्ये कांदा लागवड या वर्षी जेमतेम झाली होती. उदाहरणार्थ, खरीप हंगामात कांदा बियाणे 2000 ते 4500 रुपये प्रतिकिलोप्रमाणे बाजारात उपलब्ध होते... त्यामुळे बियाणाला आलेली महागाई व रोपावर झालेली रोगराई यांमुळे शेतकऱ्याला तर लाखभर रुपयांपर्यंत खर्च गेला. कांदा बियाणांचा आणि रोपांचा तुटवडा निर्माण झाल्यामुळे या वर्षी कांदा लागवड खर्चीक झाली होती. त्यातच ऑगस्टमध्ये लागवड केलेल्या कांदा पिकात पिळा, मूळ कुजव्या, करपा व मर रोग आल्याने कांद्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. कांदा पीक हातात येऊन वाया गेल्याच्या प्रतिक्रिया अनेक शेतकऱ्यांकडून मिळाल्या.

खरीप हंगामात एकरी किमान 25 ते 35 हजार रुपये खर्च येत असल्याने सामान्य शेतकऱ्यांनी कांदा लागवडीकडे पाठ फिरवली. काही शेतकऱ्यांनी अतिवृष्टीमध्ये कांदा लागवड नको म्हणून रोप तयार करून विक्रीचा निर्णय घेतला होता... मात्र तयार झालेले रोप अतिवृष्टीने आणि उष्णतेने 70  ते 75 टक्के वाया गेल्याचे दिसून आले. ज्या शेतकऱ्यांनी मोठ्या मेहनतीने निसर्गावर मात करत रोप जगवले त्यांना दोन किलो बियाण्यांचे दर्जेदार रोप तयार करण्यासाठी किमान दहा हजार ते बारा हजार रुपये मोजावे लागले.

शेतकऱ्यांनी ऑगस्ट महिन्यात कांदा लागवड केली. त्या लागवडीनंतर मूळकुजव्या व मर रोग आला... याशिवाय जमिनीत असलेली हुंगनी व मोरआळी यांच्यामुळे  कांदा या पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. कांदा पिकावरील या रोगराईची समस्या दूर करण्यासाठी शेतकऱ्याला पिकावर मोठ्या प्रमाणात रासायनिक औषधांच्या फवारण्या कराव्या लागल्या. लागवडीनंतर कांदा पीक रोगराईमुळे विरळ होत गेले... त्यामुळे एकरी उत्पादनात घट झाल्याचे पाहण्यास मिळाले. या संदर्भात मुंडेवाडी येथील कांदा उत्पादक शेतकरी नानासाहेब मुंढे म्हणाले की, यंदा जूनमध्ये अतिउष्णतेने आणि नंतरच्या अतिजोरदार पावसाने कांदा रोपांचे किंवा बियाणाचे नुकसान झाले... तरीही त्यांनी कशीबशी लागवड पूर्ण केली... पण आता पिकावर मर रोग येत आहे... त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत असून उत्पादनावर परिणाम होत आहे.

नानासाहेब पुढे सांगतात की, रोप तयार करण्यासाठी सहा किलो फुरसुंगी वाणाचे बियाणे दहा गुंठे क्षेत्रावर टाकले होते, पाऊसपाण्याचा अंदाज बघता माझे सात एकर जमिनीवर पुरेल एवढे रोप तयार व्हायला पाहिजे होते... पण तसे झाले नाही, वातावरणातील बदलाने 80% रोपे हातची गेली. केवळ दीड एकर क्षेत्रावर लागवड करावी लागली. नानासाहेब मुंढे यांच्याप्रमाणे इतरही उदाहरणे आहेत. त्यांपैकीच एक कांदा उत्पादक शेतकरी सुरेश डोईफोडे यांचे. त्यांची वीस हजार रुपये किमतीची रोपे वाया गेल्याने त्यांनी या वर्षी कांदा लागवड केली नाही... तर सुदाम घोळवे यांनी रोपे तयार करणे आणि लागवड करणे या दोन्हींसाठी लाखभर रुपये मातीत घातल्याचे सांगितले. अशा प्रकारे नुकसान झालेली उदाहरणे बीड आणि केज तालुक्यांत गावोगावी दिसून येतात... मात्र नुकसान होऊनही कांदा पीक काही प्रमाणात तरी फायदा देऊन गेल्याचीदेखील गावोगावी काही उदाहरणे आहेत.

एक उदाहरण स्वतःचे आहे. हे उदाहरण तपशीलवार पाहणे आवश्यक आहे.

पहिल्याच वर्षी कांदा लागवड केली असल्याने उत्पादन खर्च आणि उत्पन्न यांचे गणित चुकायला नको या अंदाजाने सप्टेंबर महिन्यात 20 गुंठे क्षेत्रफळावर कांदा लागवड केली. खरीप हंगामात याच शेतीत मूग हे पीक घेतले होते.

उत्पादनासाठी आलेला खर्च आणि उत्पन्नाचे गणित

20 गुंठे क्षेत्रावर कांदा लागवडीसाठी आलेल्या खर्चाचा (रुपये) तपशील असा...

पाळी – 400,
बियाणे - 4600,
पहिली फवारणी (रोप असताना) - 250,
खत - 260,
दुसरी फवारणी - 600,
तिसरी फवारणी - 400,
टॉनिक फवारणी - 500,
औषधे - 900,
खताची बकेट (बाय पावर) - 600,
खताचे पोते (10:26:26) - 1300,
एकूण चार खुरपण्या - 2500,
कांदा लागवडीचा मजुरी खर्च - 1800
तर त्यात वाहतूक खर्च (मुंडेवाडी ते सोलापूर) - 2000 रुपये.

यामध्ये घरच्या व्यक्तींच्या मेहनतीचा, मजुरीचा, वेळेचा खर्च पकडला नाही... तरी एकूण 16110 रुपये इतका खर्च आला. एकूण 11.90 क्विंटल उत्पादन मिळाले. उत्पादन कमी वाटेल... पण रोगराईने आणि अतिवृष्टीने खूप नुकसान केले होते... तरीही इतके उत्पादन निघाले हे चांगलेच म्हणावे लागेल. सोलापूर कृषी बाजार समितीमध्ये कांदाविक्री केली. भावदेखील ठीक मिळाला. मोठ्या आकाराच्या कांद्याला 22 रु., मध्यम आकार 19 रु., फांगडी असलेला 15 रु. आणि चिंगळ्या असलेला 5 रु. किलो दर मिळाला. एकूण बावीस हजार रुपयांचा झाला... शिवाय 7000 रुपयांची रोपे विकली असे एकूण 29000 रुपये  उत्पन्न मिळाले. खर्च वजा करता 12890 रुपये शिल्लक राहिले. अतिवृष्टी झाली नसती तर निश्चित जास्त उत्पन्न मिळाले असते.

ऊसतोडणी मजूर ते कांदा उत्पादन घेणे अशी कुटुंबाची वाटचाल झाली. या वर्षी प्रथम कांदा लागवड केली होती. रोगराईने आणि अतिवृष्टीने खूप नुकसान झाले... त्यामुळे कांदा लागवडीचा पहिलाच प्रयोग फसला असे वाटत होते... पण हात रिकामा राहणार नाही हा आशावाद आणि योग्य नियोजन होते. कांदा काढून टाका असे अनेक जण सांगत होते... पण पीक जसे येईल तसे येईल या भरवशावर ठेवला. या प्रयोगात छोटेसे यश मिळाले.  

दुष्काळी भागात कांदा उत्पादक शेतकऱ्यांची संख्या वाढत आहे. तसेच कांदा लागवड, रोपांचे संगोपन, पाणी देण्याची पद्धती, खतांचा डोस देण्याची पद्धत, रोगराई पडली तर काळजी घेण्याचे तंत्रज्ञान, कांदा प्रक्रिया, साठवण या घटकांमध्ये अनेक त्रुटी आहेत. याविषयी मार्गदर्शन होणे गरजेचे आहे. कांदा जास्त दिवस टिकण्यासाठी मार्गदर्शन आणि सुविधादेखील मिळण्याची शेतकऱ्यांची अपेक्षा आहे... पण हवे तसे लक्ष शासनाने आणि प्रशासनाने दिलेले नाही. कांदा चाळ उभारण्यासाठी जाहीर केलेल्या योजनेचा लाभ अनेक शेतकऱ्यांना अर्ज करूनही मिळालेला नाही. कांदा प्रकिया युनिट आणि कांद्यापासून इतर पदार्थ तयार करण्याचे केंद्र विकसित झालेले नाही. ते विकसित करणे गरजेचे आहे. अशा अनेक उणिवा या पीक उत्पादनामध्ये आहेत. त्या दूर करण्यासाठी धोरणात्मक हालचालींची गरज आहे.

कांदा या पिकाच्या रूपाने दुष्काळी भागात पीक पद्धतीतील नगदी पीक घेण्याचा मार्ग सापडला आहे... कारण दुष्काळी भागातील अनेक गावांमधील ऊसतोडणीसाठी जाणारे मजूर हळूहळू या पिकाकडे वळताना दिसत आहेत. ही कांदा लागवड ऊसतोड मजुरांच्या कोयता मुक्तीची नांदी ठरेल का हे पाहणे महत्त्वाचे आहे.

- सोमिनाथ घोळवे
 somnath.r.gholwe@gmail.com

(डॉ. सोमिनाथ घोळवे हे शेती, दुष्काळ व पाणी प्रश्नाचे अभ्यासक असून द युनिक फाउंडेशन येथे संशोधक म्हणून कार्यरत आहेत.)

Tags: कांदा उत्पादन पीक नगदी पीक दुष्काळ सोमीनाथ घोळवे onion onion farming crop sominath gholwe Load More Tags

Add Comment