'स्कॅम 1992' मालिका अणि आपल्या नैतिकतेचा घोटाळा

या अज्ञात मृगजळाकडे सजगपणे पाहण्याची प्रक्रिया सुरू व्हायला हवी...

फोटो सौजन्य: Sony LIV

'स्कॅम 1992' च्या निमित्तानं वित्तीय क्षेत्रातले घोटाळे काय असतात, कसे घडतात, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्याकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टीकोन काय असतो/असावा याही प्रश्नांवर थोडा विचार करणं गरजेचं आहे...!

सध्या वेबसिरीजच्या जगात सर्वात जास्त धुमाकूळ घालणाऱ्या मालिकांपैकी एक म्हणजे 'स्कॅम 1992'. उदारीकरणाचा उंबरठा ओलांडून देश पहिलं पाऊल टाकत असताना, शेअर बाजार नावाच्या एका 'अलग दुनिये'ची ओळख शिक्षित वर्गाला करून देणाऱ्या हर्षद मेहताची ही कहाणी आहे. 

वित्तीय क्षेत्रातला पहिला गाजलेला घोटाळा सुचेता दलाल आणि देबाशीष बसू या पत्रकार दाम्पत्यानं आपल्या ‘द स्कॅम’ या पुस्तकात शब्दबद्ध केला... 'स्कॅम 1992' हे त्याचंच हे चित्ररूप. त्या निमित्तानं ही मालिका त्या घोटाळ्याच्या गोष्टीला न्याय देते का? की त्यात घोटाळेबाज हर्षद मेहताचं उदात्तीकरण आहे? हीही चर्चा जोरात सुरू आहे... पण त्याच निमित्तानं वित्तीय क्षेत्रातले घोटाळे काय असतात, कसे घडतात, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्याकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टीकोन काय असतो/असावा याही प्रश्नांवर थोडा विचार करणं गरजेचं आहे...!

गेल्या तीस वर्षांत घोटाळे करणारे हर्षद मेहतापासून ते नीरव चोक्सीपर्यंत बदलले, त्यांची कार्यपद्धती बदलली, कायदे कडक झाले आणि ते तोडणारे अजूनच चतुर! पण या सगळ्यामागं एक समान धागा आहे आणि तो समजून घ्यायचा तर वित्तीय व्यवहाराची मुळं समजली पाहिजेत. मुळात वित्तीय व्यवहार म्हणजे पैसे 'भाड्यानं' देणं. यात देणाऱ्याला काही काळानं मूळ पैसे परत मिळावेत आणि वर ते वापरायला दिल्याचा मोबदला मिळावा हे अपेक्षित आहे... मात्र असे पैसे देताघेताना काही गोष्टी गुंतलेल्या असतात. त्यात एक म्हणजे तारण किंवा अशी मालमत्ता जी दिलेल्या पैशांपोटी हमी असते. पैसे समभागांत (शेअर्समध्ये) गुंतवले असतील तर त्यातून निर्माण होणाऱ्या मालमत्तेची मालकी देणाऱ्यांची असते. दुसरं म्हणजे पैसे घेणारा आपण काय कारणासाठी ते घेत आहोत तो उद्देश स्पष्ट करूनच सहसा पैसे मागत असतो.

भारतातल्याच काय... पण जगभरातल्या घोटाळ्यांची सुरुवात इथे होते. प्रत्येक घोटाळेबाज एकतर या मालमत्तेचं मूल्य वाढवून मांडतो (जसं बहुतेक रिअल इस्टेट घोटाळ्यात पाहायला मिळतं), कधीकधी तर तारण मालमत्ताच फसवी असते (जशा हर्षदनं खोट्या बँक रिसिट्स दाखवल्या) आणि / किंवा घेणारा पैसे ज्या उद्देशासाठी घेतो त्यापेक्षा भलत्याच उद्देशासाठी वापरतो (जसं हर्षदनं बँकांचे पैसे घेतले सिक्युरिटी विकत घ्यायला आणि वापरले शेअर बाजारात). यात घोटाळेबाजाचा हिशेब (युक्तिवाद) असा असतो की, आपण जिथे पैसे वापरत आहोत तिथे बक्कळ नफा होणारच आहे. त्यातून मुद्दल आणि भरघोस मोबदला आपण देऊच... त्यामुळे हमीच्या मालमत्तेचा वापर करायची वेळ येणारच नाही आणि कोणत्या उद्देशानं वापरले त्याचा फरकही देणाऱ्याला पडणार नाही... शिवाय त्या निमित्तानं आलेले मुबलक पैसे स्वतःच्या चंगळवादी ऐशाआरामासाठी वापरले तर काय अडचण आहे? 

मात्र असा बक्कळ नफा हे घोटाळेबाजाचं निवळ स्वप्नरंजन असतं. कधी तो ते जाणूनबुजून करत असतो... तर कधी स्वतःच्या कुवतीची घमेंड असते, भ्रम असतो... पण परिणाम एकच होतो. कधी-ना-कधी जेव्हा त्याला फटका बसतो तेव्हा त्यानं ज्यांच्याकडून पैसे घेतले त्यांना सोबत घेऊन तो बुडतो! यात पैसे देणारे कधी आर्थिक व्यवहारात अडाणी असतात, प्रचंड नफ्याची अशक्यप्राय स्वप्नं त्यांना खरी वाटतात (बहुतेक एमएलएमच्या किंवा चेन मार्केटिंगच्या उद्योगात असे लाखो भाबडे लोक फसतात. शेअर बाजारात चुकीच्या कंपन्यांवर पैसे लावणारेही अनेकदा यात येतात) तर कधी बँकांचे किंवा वित्तसंस्थांचे अधिकारी स्वतः लाच खाऊन असे पैसे उपलब्ध करून देतात.

...पण ही झाली घोटाळ्याची चिरफाड. समाज अशा घोटाळेबाजांकडे कसं पाहतो? वित्तीय कायदे तोडणाऱ्यांना शिक्षाही तशी सौम्य असते आणि ती बहुधा आर्थिक असते... फारच क्वचित तुरुंगवासाची शिक्षा असते. बाकी चेन मारणाऱ्यांना पकडण्यासाठी हिकमत दाखवणाऱ्या सुरक्षा यंत्रणांना फसवून हजारो कोटींचे घोटाळेबाज देशाबाहेर अगदी सहज फरार होतात. सामान्य जनतेलाही घोटाळेबाजांबद्दल एक छुपी सहानुभूती असते. ‘स्कॅम 1992’ या मालिकेत हर्षदला 'गरीब बिच्चारा' असा दाखवायचा प्रयत्न झालेला आहे असा आरोप आहे. डीएसकेसारख्या बिल्डरबद्दल सहानुभूती दाखवणारे मेसेज अनेकदा फिरतात. 'मोठी स्वप्नं पाहण्यात गुन्हा आहे का?' किंवा 'त्याचा बिचाऱ्याचा हिशेब फसला... नाहीतर तो एक उद्योजक होता.' असले युक्तिवाद अनेकदा केले जातात. 

चेन मार्केटिंगबद्दल काहीही बोललं की लोक समर्थनार्थ चवताळून येतात. अनेक घोटाळ्यांत तर घोटाळेबाजांना खुशाल पत (रेटिंग) देणाऱ्या पतमानांकन कंपन्यांवर तर कसलीच कारवाई होत नाही. 'कुणी जर अल्पावधीत प्रचंड संपत्ती कमावत असेल तर तो नक्कीच कर्तृत्ववान आहे. तो घोटाळ्यात जरी सापडला तरी ती फक्त तात्कालिक चूक आहे, गुन्हा नव्हे...’ असंही चित्र रंगवायला मागंपुढं पाहिलं जात नाही.

समाज म्हणून आपला हाच सगळ्यात मोठा 'नैतिक घोटाळा' आहे. उद्देश अगर तारण यांत खोटारडेपणा करणं हा जाणीवपूर्वक केलेला आणि पराकोटीचा अप्रामाणिकपणा आहे. तो करणारा लबाड आणि स्वार्थी तर असतोच... शिवाय स्वतःचे नसलेले पैसे ओरबाडणारा पांढऱ्या कपड्यातला धटिंगणच असतो. अशा वागण्यानं प्रामाणिक व्यवहार करणारे मागं पडतात आणि एकूणच भांडवल बाजारातल्या व्यवहारांवर प्रश्नचिन्ह येतं. ही वर्तणूक मूलतः गुन्हेगारी प्रवृत्तीच आहे आणि त्याबद्दल अशा व्यक्तीला कडक शिक्षा होणं अतिशय आवश्यक आहे हे आपण लक्षातच घेत नाही. 
सहसा अल्पावधीत प्रचंड पैसा कमावला जाऊ शकत नाही आणि कुणी तो कमावत असेल तर आधी त्याच्याकडे संशयानं पाहिलं पाहिजे... मगच कौतुकानं... हा शहाणपणा म्हणून आपल्याला समजलेलाच नाही. 

परिणामतः हर्षद ते नीरव, कुणी ना कुणी सापडतं... चार दिवसांच्या चर्चेनंतर सारेच विसरले जातात. हे लोक लोभी आणि फसवेच होते पण त्यांच्यामागं उभी असलेली विशाल यंत्रणाही किडलेली आहे याकडे दुर्लक्ष होतं. (जे सुचेता/देबाशीषनं त्यांच्या पुस्तकात परिणामकारकरीत्या दाखवलेलं आहे!) आपली आर्थिक साक्षरता वाढवावी आणि आपण शिक्षिततेकडे जावं असं समाजाला वाटतच नाही. ‘स्कॅम 1992’ मालिकेच्या निमित्तानं या अज्ञात मृगजळाकडे सजगपणे पाहण्याची प्रक्रिया सुरू झाली तर ती सर्वात मोठी कमाई ठरेल...! 

- डॉ. अजित जोशी, मुंबई
meeajit@gmail.com

(लेखक हे चार्टर्ड अकाऊंटंट असून एका व्यवस्थापन महाविद्यालयात सहायक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत.)

Tags: अजित जोशी अर्थसाक्षरता अर्थकारण वेब सिरीज स्कॅम 92 हर्षद मेहता शेअर बाजार वित्तीय घोटाळे Ajit Joshi Financial Literacy Economics Web Series Scam 92 Harshad Mehta Stock Exchange Share Baazar Financial Scams Load More Tags

Comments:

विष्णू दाते (कांदिवली)

योग्य विश्लेषण!

Sainath balaji jadhav

Great

Add Comment