पत्रकार महिलांसाठी संघर्षग्रस्त भागातील पत्रकारिता सोपी नाही!

अफगाणिस्तानातील महिला पत्रकारांविषयी...

ज्या ठिकाणी संघर्ष आहे त्या ठिकाणी बातमी आहे. संघर्षग्रस्त भागात घडणाऱ्या घडामोडीमुळे त्या ठिकाणी बातम्यांचा स्फोट झालेला असतो आणि अर्थातच माध्यमांचा. संघर्षग्रस्त भागात काम करणाऱ्या पत्रकारांसाठी तिथून वार्तांकन करणे ही प्रचंड जिकरीची गोष्ट असते.

तालिबानने 15 ऑगस्टला काबूल ताब्यात घेतले. त्यानंतर अफगाणिस्तानमधील स्त्रियांबद्दल चर्चा सुरू झाली. तालिबानचा पूर्वेतिहास पाहता तिथल्या स्त्रीस्वातंत्र्याची काळजी वाटणं साहजिक आहे. जगात चालू असलेल्या चर्चेची दखल तालिबानने तत्काळ घेतली आणि तिथल्या स्त्रियांचे स्वातंत्र्य अबाधित राहील हे सांगताना स्त्रियांना कामाच्या ठिकाणी रुजू होण्याचे आवाहन केले. त्यातून तालिबान बदलली आहे अशी शक्यता अनेकांना वाटली. आशेचा किरण दिसला. हे सगळे होत असताना अफगाणिस्तानमधील टोलो न्यूज वृत्तवाहिनीवर एका महिला पत्रकाराने तालिबानच्या प्रवक्त्याची मुलाखत घेतली. या मुलाखतीचे फोटो व्हायरल झाले त्यामुळेही तालिबान बदलले आहे की काय वाटले... तालिबानने काबूलचा ताबा घेतला आणि तिथल्या दुकानांबाहेर असलेले स्त्रियांचे फोटो रंग लावून झाकण्यात आलेल्या स्मृती ताज्या असताना एक महिला पत्रकार तालिबान्यांची मुलाखत घेते हा एक मोठा मेसेज होता पण हे सगळे खूप दिवस टिकले नाही.

महिला पत्रकारांना कामावर जाण्यापासून रोखले  
टोलो न्यूजवरील मुलाखत पार पडल्यानंतर दुसऱ्याच दिवशी अफगाणिस्तानमधील सरकारी वृत्तवाहिन्यांमध्ये काम करणाऱ्या दोन महिला पत्रकारांना कामावर जाण्यापासून रोखण्यात आल्याचा दावा या पत्रकारांनी केला होता. रेडिओ टेलिव्हिजन अफगाणिस्तान ही तिथली स्थानिक वृत्तवाहिनी आहे. शबनम खान डावरान आणि खदिजा अमिन या दोन महिला पत्रकार काम करण्यासाठी ऑफीसमध्ये पोहोचल्या. पण ऑफीसच्या गेटवरच तालिबानकडून त्यांना सांगण्यात आले की, तुम्ही काम करू शकत नाही आणि त्यांना माघारी पाठवण्यात आले. शबनम खान डावरान यांनी त्यानंतर जागतिक माध्यमांना दिलेल्या मुलाखतीत बोलताना त्यांना यापुढे कोणतीच अपेक्षा नसल्याचे सांगितले. अमेरिकेच्या हस्तक्षेपामुळे आणि तालिबानच्या पुनरुज्जीवनामुळे अफगाणिस्तानमध्ये पत्रकारिता करणे स्त्रियांसाठी अशक्य ठरणार आहे.

तू स्त्री आहेस... त्यामुळे बाजूला थांब 
क्लारिसा वार्ड ही मूळ अमेरिकन पत्रकार सीएनएन या वृत्तवाहिनीसाठी अफगाणिस्तानमधून वार्तांकन करत आहे. पूर्वी मोकळेपणाने वार्तांकन करताना दिसणारी क्लारिसा आता बुरखा आणि हिजाब घालून सीएनएनवर वार्तांकन करताना दिसत आहे. अनेक तालिबानी सैनिकांना धाडसाने सामोरे जात ती प्रश्न विचारत आहे. तालिबानच्या पुढच्या धोरणांबद्दल प्रश्न विचारत आहे. हे वार्तांकन करण्यासाठी ती जिथे जिथे जाईल तिथे मात्र परिस्थिती तणावपूर्ण होते. ती पत्रकार आहे म्हणून नाही... तर ती महिला पत्रकार आहे म्हणून. एका ठिकाणी तिला तालिबान्यांनी तिला तू स्त्री आहेस आणि त्यामुळे तू रस्त्याच्या बाजूला थांब आणि आम्हाला रस्ता दे, असे तिला सांगण्यात आले. हा सर्व प्रकार कॅमेऱ्यासमोर घडला आणि सीएनएनच्या यूट्यूब चॅनेलवर आणि संकेतस्थळावर उपलब्ध आहे. त्यामुळे अफगाणिस्तानमध्ये महिला पत्रकारांचे भवितव्य अधांतरी आहे. अशा परिस्थितीमध्ये काम करणे धोक्याचे आहे.

स्थानिक महिला पत्रकारांची परिस्थिती जास्त गंभीर
क्लारिसासारख्या सीएनएनमध्ये काम करणाऱ्या महिला पत्रकार किमान काबूलमधील रस्त्याच्या कडेला थांबून वार्तांकन तरी करू शकत आहेत. पण स्थानिक महिला पत्रकार जीव धोक्यात घेऊन आसरा शोधताना दिसत आहेत. तालिबानने काबूलचा ताबा मिळवण्याआधी 10 ऑगस्टला ‘द गार्डियन’ या जागतिक वर्तमानपत्रात एका अफगाण पत्रकार मुलीची मुलाखत प्रकाशित झाली आहे. ‘Please pray for me: female reporter being haunted by the Taliban tells her story’ या शीर्षकाने प्रसिद्ध झालेल्या या मुलाखतीत अर्थातच त्या पत्रकार मुलीचे नाव उघड केलेले नव्हते. तिच्या शहराचा ताबा तालिबानने मिळवल्यानंतर त्या पत्रकार मुलीला तिच्या घरातून पळून जावे लागले आणि ती आता जीव मुठीत घेऊन आसरा शोधत असल्याचे सांगते. ती पत्रकार मुलगी पुढं म्हणते, मी बावीसवर्षीय पत्रकार आहे. कालपर्यंत मी माझ्या नावाने वर्तमानपत्रात लिहीत होते. आज मी माझे नावही सांगू शकत नाही. उलट मी जीव वाचवत कुठे मला आसरा मिळेल का याचा शोध घेत फिरत आहे. मी मुलगी आहे. त्यात मी पत्रकार आहे. त्यामुळं माझ्यासाठी आजूबाजूची परिस्थिती धोकादायक झाली आहे. मी जर तालिबान्यांच्या हाती लागले तर माझे त्यांच्यातीलच एखाद्या सैनिकाशी लग्न लावून देतील किंवा मला मारूनही टाकतील.  

अशा अनेक पत्रकार महिला जीव मुठीत घेऊन अफगाणिस्तानमध्ये वावरत आहेत. तालिबानने परत सत्ता काबीज केल्याने त्यांचे काम करण्याचे स्वातंत्र्य हिरावून घेतले जाईलच, पण पूर्वी त्यांनी पत्रकार म्हणून काम केलेले असल्याने त्यांचा जीवही धोक्यात आला आहे. तालिबानने मागच्या एका वर्षात पत्रकारांच्या केलेल्या हत्यांमध्ये पाच पत्रकार महिलांचाही समावेश आहे. मलाल मैवाईद, शहनाझ रौफी, सादिया सदाअत, मुरसाल वाहिदी आणि मीना खाईनी या पत्रकार महिलांची तालिबानने हत्या केली आहे आणि आता इतर पत्रकार महिलांचा ते शोध घेत आहेत.

आपल्यापर्यंत फक्त अफगाणिस्तानमधील काबूलमधली आणि इतर मोठ्या शहरांमधली माहिती पोहोचत आहे. पण त्यापलीकडच्या भागांमध्ये स्थानिक पातळीवर काय घडत आहे याचा अंदाज येत नाहीये. स्थानिक पातळीवर काम करणाऱ्या पत्रकार महिलांची काय परिस्थिती आहे हे जेव्हा मानवाधिकार संघटना किंवा पत्रकारांच्या संघटना तिथे पोहोचतील तेव्हाच कळेल. त्यामुळे सध्याच्या अफगाणिस्तानमध्ये परदेशी महिला पत्रकार किमान बुरखा घालून तरी काम करू शकत आहेत. पण अफगाण पत्रकार महिलांना पत्रकारिता करणे अवघड होणार आहे. त्यातही सरकारी वाहिन्यांत काम करणाऱ्या पत्रकार महिलांना होणारा अटकाव टोलो न्यूजसारख्या खासगी वृत्तवाहिन्यांमध्ये काम करणाऱ्या पत्रकार महिलांना अजून तरी झाल्याचे समोर आलेले नाही. तसेच मोठ्या शहरांपेक्षा छोट्या शहरांमध्ये पत्रकार महिलांवर काम न करण्याची बंधने अधिक आहेत.

एवढे सगळे धोके असतानाही या महिला पत्रकारिता का करत आहेत? कारण संघर्षग्रस्त भागात होत असलेल्या अत्याचारांची त्या प्रत्येकीकडे काही ना काही स्टोरी आहे. टोलो न्यूजच्या अनिसा शाहीदनी एका आंतरराष्ट्रीय माध्यमसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत त्या सांगतात, 'अफागाणिस्तानमध्ये जगासमोर न आलेल्या अनेक गोष्टी आहेत. त्या गोष्टी जगाला सांगितल्या पाहिजेत. संघर्षग्रस्त भागातील जगणे सांगणे याच एकमेव प्रेरणेने पत्रकारिता करत आहोत. त्याचे धोकेही आहेत. मला माझ्या ऑफीसला येण्यासाठी दररोज वेगळ्या रस्ताचा वापर करावा लागतो.'

संघर्षग्रस्त भागात पत्रकारिता करणे स्त्रियांना सोपे नाही तरी...

पत्रकारांसाठी संघर्षग्रस्त भागात पत्रकारिता करणे सोपे नाही. त्यातही पत्रकार महिलांसाठी संघर्षग्रस्त पत्रकारिता करण्याचे धोके दुपटीने जास्त आहेत. संघर्षग्रस्त भागात बातम्या भरपूर असतात पण जिवाला धोकाही जास्त असतो. पत्रकाराचे प्रत्येक पाऊल बंदुकीच्या नळीच्या टोकावर असते. कधी गोळी लागेल कळतही नाही. दानीश सिद्दिकीच्या हत्येनंतर संघर्षग्रस्त भागातील वार्तांकन हा मुद्दा भारतीयांसाठी चर्चेचा ठरला.

2011मध्ये तहरीर स्क्वेअरवर क्रांतीचा इतिहास रचला जात होता. पण लारा लोगन या पत्रकार महिलेसाठी मात्र तिथल्या कटू आठवणी आहेत. तहरीर स्क्वेअरवर संघटितरीत्या आंदोलनकर्त्यांनी लारा लोगनचा विनयभंग केला होता. त्याच काळात मोना इल्थावे या इजिप्तमधील पत्रकार महिलेवर तिथल्या सैनिकांनी बलात्कार केला होता.  

मारिया कोल्विन या पत्रकार महिलेची 2012मध्ये सिरियामधील संघर्षात हत्या करण्यात आली होती. मारिया कोल्विन जगातील अनेक भागांत जाऊन संघर्षाचे वार्तांकन करत होत्या. श्रीलंकेमधून वार्तांकन करत असताना त्यांच्यावर झालेल्या एका हल्ल्यात त्यांचा एक डोळा निकामी झाला होता. यारा अब्बास या पत्रकार महिलेचीही सिरियामध्ये हत्या करण्यात आली होती.

मुख्यत: संघर्षग्रस्त भागात काम करत असताना पत्रकार महिलांवर लैंगिक अत्याचाराचा, शोषणाचा धोका जास्त असतो. संघर्षग्रस्त भागातून अशा घटना सतत समोर येत असतात. मध्य अरब देशातील संघर्ष, बोको हरामचा संघर्ष, कोलंबियामधील नागरी युद्ध या सगळ्याचे वार्तांकन करणाऱ्या पत्रकार महिलांना त्यांच्या महिला असण्याची मोठी किंमत मोजावी लागली होती. संघर्षातील दोन्ही बाजूंच्या गटांकडून महिला पत्रकारांना हा धोका तेवढाच असतो आणि तरी या पत्रकार महिला धैर्याने आणि धाडसाने वार्तांकन करत राहतात...!

- अभिषेक भोसले
bhosaleabhi90@gmail.com
 

(लेखक विश्वकर्मा विद्यापीठ, पुणे येथील पत्रकारिता व जनसंज्ञापन विभागात सहायक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत.)

Tags: महिला पत्रकार तालिबान पत्रकारिता महिला पत्रकार afganistan woman woman reporter journalism Abhishek Bhosale अभिषेक भोसले Load More Tags

Add Comment