रसिया तुम बन्सी बजावत रहियो!

विख्यात बासरीवादक पं. हरिप्रसाद चौरसिया आज वयाच्या 85 व्या वर्षांमध्ये प्रवेश करत आहेत.

भारतीय शास्त्रीय संगीताबद्दल जुजबी जाण असणाऱ्यांना सुद्धा हरिप्रसाद चौरसिया आणि त्यांची बासरी ठाऊक असतेच. आपल्या कलेचा ध्यास अत्यंत उत्कटपणे घेणे हे कुठल्याही सच्च्या कलावंताचं जीवन ध्येय असतंच; पण आपल्या संगीतातून जो आनंद निर्माण करतो आहोत तो अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचावा यादृष्टीने प्रयत्न करणारा कलावंत विरळा असतो. गेल्या शंभर वर्षांमध्ये, एकाच वेळी विचक्षण श्रोत्यांबरोबरच सामान्य कानसेनांनाही रिझवेल या दृष्टीने भारतीय शास्त्रीय संगीत श्रोत्यांपर्यंत पोहोचवण्यात यशस्वी झालेल्या कलावंतांमध्ये हरिजींचं नाव निश्चितपणे घेता येईल. संगीताची फार मोठी परंपरा घरामध्ये नसूनही ज्यांनी या क्षेत्रामध्ये स्वतःचं स्वायत्त स्थान निर्माण केलं अशा गायकांचा विचार करताना जसं भीमसेन जोशींचं नाव डोळ्यांपुढे येतं, तसंच वादकांमध्ये हरिजींचं येतं. असे हरिप्रसाद चौरसिया आज वयाच्या 85 व्या वर्षांमध्ये प्रवेश करत आहेत.

अलाहाबादसारख्या शहरात छेडीलाल नावाच्या एका पैलवानाच्या मध्यमवर्गीय घरात जन्मलेला हा मुलगा पुढे एवढा मोठा बासरीवादक झाला की, त्याने बासरीवादनाची स्वतःची शैली निर्माण केली. स्वतःचा मोठा श्रोतावर्ग देश-विदेशात निर्माण केला. आज हरिजींना संगीत नाटक अकादमीसह पद्मभूषण, पद्मविभूषण असे भारतातले महत्त्वाचे नागरी सन्मान लाभले आहेत. एवढंच नाही तर फ्रान्सचा ‘नाइट ऑफ द ऑर्डर ऑफ आर्ट्स अँड लेटर्स’ आणि नेदरलँड्स सरकारचा ‘ऑफिसर इन द ऑर्डर ऑफ ऑरेंज-नासाउ’ हे सन्मान मिळालेल्या दुर्मिळ भारतीयांपैकी ते आहेत. न कळत्या वयात आखाड्यात जोरबैठका काढण्यापासून सुरु झालेला आणि आज इथवर येऊन पोहोचलेला त्यांचा जीवनप्रवास विलक्षण प्रेरणादायी आहे. 

हरिप्रसाद चौरसिया यांचा जन्म 1 जुलै 1938 ला झाला. हरिजी पाच वर्षांचे होते, तेव्हाच त्यांची आई त्यांना सोडून गेली. त्यामुळे लहानपणापासून त्यांचं पालन-पोषण त्यांच्या वडिलांनीच केलं. वडिलांची इच्छा होती की, मुलाने पैलवान व्हावं किंवा शाळेत जाऊन शिक्षण घ्यावं आणि सरळ नोकरी करावी. हरिजींना या दोन्ही गोष्टींमध्ये रस नव्हता. पण केवळ वडिलांचं मन राखायचं म्हणून ते शाळेत जात. वडिलांच्या आग्रहामुळे ते तालमीतही जात, पण तिथे आपल्या उरावर बसून कोणीतरी आपल्याला पाडू इच्छित आहे, हे त्यांना कधीच फारसं पसंत पडलं नाही. गमतीचा भाग म्हणजे संगीत आणि मल्लविद्या ही दोन परस्परविसंगत वाटणारी क्षेत्र असली तरी तिथे ‘उस्ताद’ आणि ‘तालीम’ यांना सारखंच महत्त्व असतं! संगीताच्या सुदैवाने हरिजींना या दुसऱ्या क्षेत्रामध्ये फारसा रस वाटला नाही. (मल्लविद्येच्या आखाड्यात उतरून नंतर संगीतात मोठं स्थान मिळवलेल्या अशा दुसऱ्या गायक कलावंताचं नाव इथे आपसूक आठवतं – उस्ताद बडे गुलाम अली.) 

त्यांच्या घराच्या आसपासच राजाराम नावाचे एक गवई होते. वडिलांच्या नकळत हरिजी त्यांच्याकडे गाणं शिकू लागले. मात्र त्यांच्या आवाजाची रेंज मर्यादित आहे, म्हणजे तो मंद्र सप्तकात किंवा तार सप्तकात फार सहजतेने जाऊ शकत नाही हे राजाराम यांच्या लक्षात आलं आणि त्यांनी हरिजींना सांगितलं की, त्यापेक्षा तू एखादं वाद्य शीक, त्या वाद्याच्या माध्यमातून तुला गाता येईल. मग सहज उपलब्ध असणारं वाद्य म्हणून त्यांनी बासरी निवडली. यासंबंधात लहानपणीची एक गमतीशीर हकीकत त्यांनी आपल्या एका मुलाखतीमध्ये सांगितली आहे. एकदा साधारण त्यांच्याच वयाचा एक मुलगा रस्त्याने सुरेल बासरी वाजवत चालला होता. कुठेही मिळणाऱ्या साध्या बासऱ्या फारशा सुरेल वाजतातच असं नाही. त्यामुळे त्याची बासरी ऐकून हरिजींना वाटलं आपण हीच बासरी मिळवायला हवी. तो मुलगा वाटेत पाणी पिण्यासाठी थांबला, तेवढ्यात त्यांनी ती बासरी लांबवली आणि ते पळत सुटले. मुलाखतीत पुढे ते म्हणतात, “ती बासरी मी पळवली आणि आपल्याला त्याने पकडू नये म्हणून जो पळत सुटलो आहे तो आजतागायत... मी मागे वळून पाहिलेलं नाही!”

आता आपण बासरी वाजवायची हे तर ठरलं. पण त्यातून गायचं कसं हे कोण सांगणार? घरामध्ये या विषयाची चर्चा करणं शक्यच नव्हतं. हरिजींना तर शाळेतल्या शिक्षणातही रस नव्हता. शाळेत जाऊनही ते बासरी वाजवत बसायचे. शिक्षकांनाही त्यांचं कौतुक होतं. शिक्षणात फारशी गती नसली तरी मुलगा बासरी चांगली वाजवतो आणि आईविना वाढलेलं पोर आहे म्हणून शिक्षक त्यांना पास करायचे. अशा पद्धतीने ते मॅट्रिक झाले. पंधरा-सोळा वर्षांचं वय. त्या काळामध्ये टायपिंग येण्याला महत्त्व होतं म्हणून एक-दोन महिन्यांमध्ये ते शिकून घेऊन ते काम करू लागले. महिन्याला 85 रुपये हातात मिळतात म्हणून वडीलही खुश झाले. वडिलांनी कौतुकाने मोहल्ल्यात लाडू वाटले. एक-दोन वर्षांत त्यांनी स्टेनोग्राफरचं काम शिकून घेऊन ते करायला सुरुवात केली. पगार दुप्पट झाला म्हणून वडील आणखी खुश. वडील खुश होणार असतील तर आपण सरकारी नोकरीसुद्धा मिळवू या प्रयत्नामध्ये हरिजी होते. पण वयाची अडचण होती. या दरम्यान देवळात पूजेला जाण्याच्या बहाण्याने सकाळी लवकर घरातून बाहेर पडून मित्रांसोबत बसून बासरीचा रियाझ, संगीतावर चर्चा हे सुरूच होतं. मग पुन्हा घरात येऊन वडिलांसोबत त्यांच्या आनंदासाठी आखाड्यामध्ये जाऊन व्यायाम करणं आणि मग दहा वाजता नोकरीच्या ठिकाणी जाणं असा दिनक्रम होता. 

गायकीची शिकवणी बंद झाल्यानंतर लगेचच बासरी शिकता येईल अशा गुरुचा शोध सुरु झाला होता. दरम्यानच्या काळामध्ये त्यांनी ‘अलाहाबाद रेडिओ’वर भोलानाथ भट्ट यांचं बासरी वादन ऐकलं आणि त्यांना वाटलं की, असा प्रसन्न, शांत करणारा सूर आपल्या बासरीमधून यायला हवा. मूळचे वाराणसीचे असलेले भोलानाथ खानदानी वादक कलाकार होते. ते स्वतः आकाशवाणीवर नोकरी करत आणि उर्वरित वेळात विद्यार्थ्यांना शिकवत. हरिजींनी त्यांना गाठलं. त्यांच्यापाशी शिकण्याची आपली मनीषा व्यक्त केली. पुढे जवळपास आठ वर्षं नोकरी करत करतच ते त्यांच्याकडे बासरी वादनाचे धडे घेत होते.

वयाची 18 वर्षं पूर्ण झाल्यानंतर ‘अ‍ॅडिशनल डेप्युटी कमिशनर ऑफिस’मध्ये त्यांना स्टेनोग्राफरची सरकारी नोकरी मिळाली. पण त्याच त्याच पद्धतीचं काम करून ते आता कंटाळले होते. दरम्यानच्या काळामध्ये ते अलाहाबाद रेडिओवर मुलांच्या कार्यक्रमातही वाजवत असत. तिथे शांतीमय घोष नावाचे एक प्रोग्राम एक्झिक्युटिव्ह होते. हरिजींची संगीताची ओढ त्यांच्या लक्षात आली होती. त्यांनी सांगितलं की, ओरिसातल्या कटक इथे ‘ऑल इंडिया रेडिओ’मध्ये ‘स्टाफ आर्टिस्ट’ म्हणून जागा रिक्त आहे. तिथे अडीचशे रुपये पगार मिळेल. हरिजींनी तिथे जाण्याबाबत तत्परता दाखवली. पण अलाहाबाद सोडून इतक्या दूर जायचं म्हणजे वडिलांना सगळीच कल्पना देणं भाग होतं. तेव्हा वडिलांना पहिल्यांदा मुलाने संगीतावर किती मेहनत घेतली आहे याची जाणीव झाली. ऐन विशीतला पोटचा मुलगा आता इतक्या दूर जाणार या काळजीपोटी आपल्या पैलवान वडिलांचे पाणावलेले डोळे हरिजी पहिल्यांदाच पाहत होते. पण ओरिसाला जाण्याचा निश्चय झालेला होता. त्यांनी वडिलांना सांगितलं की, आता मी गेलो नाही तर मला अशी संधी पुन्हा कधी मिळणार नाही. त्यांचा निश्चय पाहून वडिलांनी परवानगी दिली.

विशीतले हरिजी पत्नी अनुराधा यांच्यासमवेत

1957 मध्ये ते कटकला रुजू झाले. तिथले डायरेक्टर पी. व्ही. कृष्णमूर्ती हे प्रेमळ गृहस्थ होते. हरिजींची परिस्थिती पाहून त्यांनी त्यांची राहण्या-खाण्याची सोय रेडिओ ऑफिसमध्येच केली. तीन वर्षं तिथे काम केल्यानंतर हरिजींची बदली मुंबईला झाली आणि त्यांचा मुंबईच्या सिनेजगतामध्ये प्रवेश झाला.

सिनेमाच्या रंगीबेरंगी दुनियेतल्या अनेक संगीतकारांच्या संगीताचं आकर्षण त्यांना आधीपासून वाटत होतं. या दुनियेत त्यांचा प्रवेश कसा झाला यासंबंधीचा भाग ओघाने पुढे येईलच. सिनेमात बासरीवादन केल्याने अर्थार्जनही होत होतं. मात्र ख्यालसंगीताची जी मूळ आवड - तिचा विकास करण्याची आंतरिक ओढ होती. पूर्वी अलाहाबाद रेडिओवर काम करत असताना बाबा अल्लाउद्दीन खान यांच्याशी त्यांची गाठ पडली होती. बाबा अल्लाउद्दीन खान हे वाद्यसंगीतातील मोठं प्रस्थ होतं. विसाव्या शतकातील ते एक महान संगीतशिक्षक मानले जातात. मैहर घराण्याचे ते कुलपुरुष. प्रख्यात सरोदवादक अली अकबर खान, सतारवादक रविशंकर, निखिल बॅनर्जी आणि बासरीवादक पन्नालाल घोष अशा रथी-महारथींचे ते गुरु. त्यांनी त्याचवेळी हरिजींना सांगितलं होतं की, तुझी तयारी चांगली आहे. तू माझ्याकडे शिक. पण वडिलांना सोडून केवळ शिक्षणासाठी त्यांच्याकडे जाण्याची परिस्थितीच तेव्हा नव्हती. मग बाबांनी त्यांना सांगितलं की, माझी मुलगी अन्नपूर्णा देवी मुंबईला राहते, भविष्यात शक्य होईल तेव्हा तिच्याकडे तू जाऊन शिक. हरिजी मुंबईला आल्यानंतरच्या चार-पाच वर्षांमध्ये त्यांची आर्थिक परिस्थिती सुधारली होती. त्यांनी तिथे एक घर घेतलं. एक छोटी गाडी घेतली. स्थिरता आल्यानंतर मग आणखी शिकण्याच्या ओढीने उचल खाल्ली. आणि मग ते अन्नपूर्णा देवींना भेटायला गेले. तेव्हा त्या पंडित रविशंकरांशी विवाहबद्ध होऊन मलबार हिलला राहत होत्या. त्या स्वतः सूरबहार नावाचं वाद्य वाजवत. प्रसिद्धीच्या झगमगाटात त्या फारशा अडकल्या नसल्या तरी वडिलांकडून मिळालेली श्रेष्ठ विद्या त्यांच्यापाशी होती. सुरुवातीला त्यांनी हरिजींच्या प्रयत्नांना दाद दिली नाही. जवळपास तीन वर्षं पाठपुरावा केल्यानंतर त्या त्यांना शिकवायला तयार झाल्या. मात्र त्यांनी त्यांना सांगितलं की, तुला जर माझं संगीत शिकायचं असेल तर तुझं आधीचं सगळं विसरून लहान मुलासारखं पहिल्यापासून सगळं शिकावं लागेल. तोवर सिनेसंगीतात नावलौकिक मिळवलेले हरिजी याही कठोर परीक्षेत पास झाले. मग मात्र अन्नपूर्णा देवींनी अतिशय प्रेमाने आपल्याकडची विद्या या गुणी शिष्याला दिली. 

मुंबईतील सुरुवातीचे दिवस 

बासरी हे वाद्य मूलतः लोकसंगीताच्या परंपरेतील आहे. एका बाजूने बंद केलेला वेळूचा पोकळ तुकडा आणि त्यात विशिष्ट अंतरावर काही छिद्रे इतक्याच सामग्रीतून निर्माण होणारं हे संगीत त्यामुळेच निसर्गाशी अधिकच जवळीक साधणारं वाटतं. त्यामुळेच आपल्याकडे जगभरातील सुषिरवाद्यांचं प्रचलन असूनही बासरीची प्रतिष्ठा कायम आहे. आपल्या प्राचीन-अर्वाचीन कवी-साहित्यकारांनी या वाद्याचं पेटंट वेणूनादाने गोपगोपीचं चित्त हरण करणाऱ्या गोपालकृष्णाकडे देऊन टाकलेलं आहे! कदाचित त्यामुळेच हे वाद्य भारतीय मनाला इतर वाद्यांच्या तुलनेत अधिक जवळचं वाटत असावं. मात्र हे वाद्य पूर्वापार लोकसंगीतामध्येच अडकून पडलेलं होतं. हरिजींनी एका मुलाखतीत सांगितलं आहे त्यानुसार मुळात ती आखूड लांबीची बासरी (मुरली) होती आणि तिचा टिपेच्या स्वरातला नाद लोकसंगीताच्या निसर्गसानिध्यामुळे खटकत नसे, चार भिंतींत मात्र तो कर्कश वाटत होता. ख्यालसंगीताच्या दृष्टीने तिचा उपयोग करून घेण्याचं पहिलं श्रेय जातं, पन्नालाल घोष यांच्याकडे. मूळच्या बासरीमध्ये बदल करून, तिची लांबी 32 इंचांपर्यंत वाढवून त्यांनी छिद्रांची संख्या सात केली आणि तिला ख्यालसंगीतानुकुल केलं. अन्नपूर्णादेवींप्रमाणे त्यांच्याकडेही मोठी विद्या होती. मात्र इतर समकालीन गायक-वादक कलाकारांच्या तुलनेत त्यांची आणि पर्यायाने बासरीवादनाची प्रसिद्धी मर्यादित राहिली. बासरीवादनाला खऱ्या अर्थाने मोठा ऑडियन्स आणि मैफिलीची प्रतिष्ठा मिळाली ती हरिजींच्या काळात. अर्थातच यामागे या वाद्याच्या प्रसारासाठी त्यांनी जाणीवपूर्वक केलेले प्रयत्न कारणीभूत होते. 

वाद्यसंगीतामध्ये कोणत्याही वादनाचं मुख्यतः दोन पद्धतीने वर्गीकरण केलं जातं. एक, गायकी अंग आणि दुसरं तंत अंग. गायकी अंगामध्ये कंठसंगीतातून म्हणजे व्यक्तीच्या गळ्यातून जे जे अलंकार निघू शकतात ते ते वाद्यातून दाखवण्याचा प्रयत्न असतो. अशा पद्धतीचं वादन श्रोत्यांच्या भावनिक आवाहनावर अधिक लक्ष केंद्रित करत. तर दुसऱ्या पद्धतीमध्ये त्या वाद्याच्या अंगभूत रचनेनुरूप त्याच्या क्षमता जास्तीत जास्त कौशल्याने वापरून कंठसंगीताहून वेगळा परिणाम (ज्यात केवळ बौद्धिक आनंदाचा भाग कदाचित अधिक असतो) साधण्याचा प्रयत्न केला जातो. अर्थातच, श्रेष्ठ कलाकार या दोन्हींचा समन्वय साधण्याचा प्रयत्न आपल्या वादनात करताना दिसतात. हरिजींनी एरवी बासरीसारख्या वाद्याला पेलवणं अवघड, अशी अनेक अंगं आपल्या वादनामध्ये आणण्याचा प्रयत्न केला. संथ लयीमध्ये विलंबित आलापी करण्याची तालीम त्यांना अन्नपूर्णा देवी आणि त्यांच्या मैहर घराण्याच्या धृपदसंगीताच्या वारशातून मिळालेली होती. ‘जोड’, ‘झाला’सारखे विशेषतः सतारीसारख्या तंतुवाद्यांच्या बाबतीत प्रचलित असणारे आणि ‘मींड’, ‘गमक’सारखे कंठसंगीतात संभावणारे अलंकार त्यांनी आपल्या वादनात आणले. त्या दृष्टीने आपल्या बासरीमध्ये तांत्रिक प्रयोगही त्यांनी केले. सर्वांगपरिपूर्णतेच्या या ध्यासातूनच त्यांची स्वतंत्र वादनशैली विकसित होत गेली आहे.

ख्यालसंगीत आपल्या बासरीवर अधिकाधिक परिणामकारकतेने ऐकवावं यादृष्टीने तर त्यांनी प्रयत्न केलेच. पण भारतामध्ये प्रचलित असलेल्या लोकप्रिय संगीतालाही त्यांनी वर्ज्य मानलं नाही. हरिजींनी ज्याप्रमाणे बासरीसारख्या वाद्याला अभिजात संगीतामध्ये प्रतिष्ठा मिळवून दिली, त्याच प्रकारचं काम संतूरसारख्या अनवट वाद्याच्या बाबतीत करणारे दुसरे श्रेष्ठ कलावंत म्हणजे शिवकुमार शर्मा. या दोघांनी मिळून जवळपास सहा-सात चित्रपटांसाठी संगीत दिलेलं आहे. 1981 मध्ये आलेल्या सिलसिला या चित्रपटापासून या दोघांचा एकत्र संगीतकार म्हणून सुरू झालेला प्रवास पुढे 12 वर्षं चालला. या चित्रपटात अमिताभ बच्चन यांनी पहिल्यादांच पार्श्वगायन केलं. आजही ज्या गाण्याशिवाय भारतात होळीचा सण साजरा होऊ शकत नाही, ते ‘रंग बरसे भीगे चुनरवाली’ हे गाणं हरिवंशराय बच्चन यांचं आहे. याच चित्रपटापासून जावेद अख्तर यांनी चित्रपटांत गीतलेखन सुरु केलं. या चित्रपटापासून हरिजींचा लतादिदींशी आणि त्यांच्या परिवाराशी जो स्नेह जुळला तो आजतागायत. (शिवहरी लतादीदींना एक चाल ऐकवतानाची क्लिप पाहण्यासाठी येथे क्लिक करा.) पुढे शिवजी आणि हरिजी यांनी फासले, विजय, चांदनी, लम्हें, परंपरा, साहिबा आणि डर या चित्रपटांसाठी संगीत दिलं. डर हा त्यांचा संगीतकार म्हणून शेवटचा चित्रपट. विशेष म्हणजे हे सर्व चित्रपट यश चोप्रा यांचे होते. या सर्व चित्रपटांसाठी संगीत देत असताना या दोघांनी ‘शिवहरी’ अशी नाममुद्रा धारण केली होती. जेणेकरून अभिजात संगीतातील पंडित हरिप्रसाद चौरसिया व पंडित शिवकुमार शर्मा याहून वेगळी आयडेंटिटी सिनेसंगीतामध्ये राहावी. 

अमिताभसह शिवहरी

याच काळात हरिजींनी ज्या मराठी गाण्यांमध्ये बासरीवादन केलं आहे, त्यातील दोन गीतांचा आवर्जून उल्लेख करायला हवा. हृदयनाथ मंगेशकर यांनी संगीतबद्ध केलेली, शांताबाई शेळके यांनी लिहिलेली आणि किशोरी अमोणकर यांनी गायलेली ‘जाईन विचारीत रानफुला’ आणि ‘हे शामसुंदर राजसा’ ही दोन गीतं - त्यांचे शब्द, त्यांचं संगीत आणि किशोरीताईंचा एकमेवाद्वितीय आवाज यांमुळे जशी चिरस्मरणीय आहेत तशीच ती त्यात हरिजींनी वाजवलेल्या धुनांमुळेही.

सिनेजगतात हरिजींचा प्रवेश कसा झाला त्या संदर्भाने एक किस्सा इथे सांगावासा वाटतो. ‘जहांआरा’ या चित्रपटातील मदनमोहन यांचं संगीत असलेलं ‘फिर वोही शाम वोही गम’ हे गीत तलत मेहमूद यांच्या आवाजामध्ये जेव्हा ध्वनिमुद्रित होणार होतं, तेव्हा तिथे संगीत दिग्दर्शकांनी आधी ठरवलेला बासरीवादक काही कारणाने येऊ शकला नाही. त्या काळामध्ये हरिजी आकाशवाणीमध्ये काम करण्याबरोबरच इतर लहान-मोठ्या वाद्यवृंदांसह तसंच काही नाटकांमध्ये संगीतदिग्दर्शनाचं काम करत असत. त्या परिचयातून मग ऐनवेळी त्यांना पाचारण करण्यात आलं. चित्रपटासाठी एखाद्या गीताचं ध्वनिमुद्रण करत असताना कोणी, कुठे, काय वाजवायचं यांचं नोटेशन असलेली ‘क्यू शीट’ सर्वांना दिलेली असते. हरिजींनी मात्र ती बाजूला ठेवून ऐनवेळी आपल्या कल्पनाशक्तीनुसार योग्य तिथे सुरावटी वाजवल्या. अर्थातच ही मोठी रिस्क होती! पण मदनमोहन यांना ते वादन इतकं आवडलं, की प्रत्येक ध्वनिमुद्रणाच्या वेळी हरिजींनी आलं पाहिजे अशी मागणी त्यांनी केली. पुढे लक्ष्मीकांत प्यारेलाल, शंकर जयकिशन, एस. डी. बर्मन, आर. डी. बर्मन, सी. रामचंद्र, नौशाद अशा त्या काळातील सर्वच मोठ्या संगीतकारांबरोबर हरिजींनी काम केलं. 

आज जगभरात हरिजींचा मोठा शिष्यपरिवार व चाहता वर्ग आहे. रूपक कुलकर्णी, राकेश चौरसिया, सुचिस्मिता व देवस्मिता असे आजचे अनेक तरुण बासरीवादक त्यांच्या तालमीत तयार झाले आहेत. मुंबई येथे 2002 मध्ये ‘सर रतन टाटा ट्रस्ट’च्या आर्थिक पाठींब्याने हरिजींनी स्थापन केलेल्या ‘वृंदावन गुरुकुल’ नावाच्या संस्थेमध्ये विद्यार्थी घडवण्याबरोबरच सुजाण श्रोते घडवण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे उपक्रम होत असतात. कोणे एके काळी अलाहाबादेत सुरु झालेली ही ज्ञानोपासना अजूनही थांबलेली नाही, तिचा विस्तार झाला आहे. 

गेला अर्धशतकाहून अधिक काळ भारतीय मनावर अधिराज्य करणाऱ्या या ‘बन्सीधरा’ला दीर्घायुष्य लाभो ही सदिच्छा!

- सुहास पाटील
suhas.horizon@gmail.com 
(लेखक, साधना साप्ताहिकाच्या डिजिटल विभागामध्ये सहाय्यक संपादक आहेत.)


वर्षाऋतूत ऐकायलाच हवा असा हरिजींनी वाजवलेला मियांमल्हार :

 

Tags: hariprasad chaurasaiya flute basari indian classical music instrumental music raga hariprasad chaurasiya ravishankar annapurna devi hariprasad chaurasia बासरी शास्त्रीय संगीत वाद्यसंगीत हरिप्रसाद चौरसिया हरिप्रसाद चौरासिया Load More Tags

Comments:

छान.

छान लिहिले आहे.शास्त्रीय संगीतातील एका दिग्गज कलाकाराबाबत संक्षेपाने, उत्तम लिहिले याचा मोद होतो.

Add Comment