जो जानके मगन वे जाने.. सो तोहे पहचाना मालिक!

'संगीतमार्तंड' म्हणून गौरवल्या गेलेल्या पंडित जसराज यांना वाहिलेली आदरांजली...  

फोटो सौजन्य: zee5.com

ज्येष्ठ गायक पंडित जसराज यांचे काल अमेरिकेतील न्यू जर्सी येथील निवासस्थानी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते 90 वर्षांचे होते. भारतीय शास्त्रीय संगीतातील मेवाती घराण्याची गायकी त्यांनी भारतभर लोकप्रिय केली. भारतातील आणि परदेशातील जवळपास प्रत्येक संगीत महोत्सवामध्ये त्यांनी आपली कला सादर केलेली आहे. भारतीय शास्त्रीय संगीतासारखी गुंतागुंतीची कला सर्वप्रकारच्या श्रोत्यांमध्ये लोकप्रिय करण्यामध्ये जसराज यांचा मोठा वाटा होता. त्यामुळेच एक रसिकप्रिय कलावंत हरपल्याची भावना विविध स्तरांतून व्यक्त होते आहे.  

भारताला स्वातंत्र्य मिळण्याच्या आसपासचा काळ. हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतात स्वतःचं स्वायत्त स्थान निर्माण करणारे, तेव्हा उमेदीच्या वयात असणारे कुमार गंधर्व लाहोरला एका घरंदाज गवयाच्या घरी उतरले होते. पंडित मणिरामजी नामक हे गवई म्हणजे मेवाती घराण्याचे बुजुर्ग गायक. मेवाती घराणं ही हिंदुस्थानी संगीतातल्या मूळ ग्वाल्हेर घराण्याचीच एक शाखा. या घराण्याचे मूळ गायक घग्गे नजीर खाँ म्हणजे ग्वाल्हेर घराण्याच्या हद्दूखाँचे जावई. या वजीर खाँचे एक शिष्य पंडित नथ्थुलाल. हे मणिरामजींचे आजोबा. वडील मोतिराम यांच्यामार्फत ही विद्या त्यांच्याकडे आली. तर अशा मोतिराम यांच्याकडे उतरलेले कुमार गंधर्व दुपार उलटल्यानंतर लाहोरच्या रेडिओ स्टेशनवर गाण्यासाठी म्हणून निघाले. मणिरामजींच्या सर्वात धाकट्या भावाचा तबल्यावर हात चांगला होता, साथीला बरा पडेल म्हणून कुमारजींनी त्यालाही सोबत घेतलं. रेडिओ स्टेशनवर रेकॉर्डिंग सुरु झालं. भीमपलासातली ‘कगवा बोले’ ही बंदिश कुमार गायले. तबलजीची साथही उत्तम झाली. कार्यक्रम आटोपला.

दुसऱ्या दिवशी पंडित मणिरामजींच्या घरी दुसरे एक गायक तणतणत आले. त्यांचं नाव अमरनाथ. कुमारांचा कालचा कार्यक्रम त्यांनी प्रत्यक्ष ऐकला होता. “ये हमारा आगे का कलाकार है इस नजर से हम जिनको देखते है, वो अगर गलत गाये तो हम क्या करे”, आपली तक्रार त्यांनी मणिरामजींच्या पुढे ठेवली. “क्यू भाई क्या हुवा?” “कल कुमारजी गा रहे थे और उन्होने भीमपलासमें धैवतपें सम रख दिया.” कुमारांना काल तबल्याची साथ करणारा मोतिरामजींचा भाऊ ही चर्चा ऐकत होता. अचानक त्याला मध्ये पडण्याची बुद्धी झाली आणि तो म्हणाला, “लेकीन उन्होने भीमपलासके साथ तो कोई छेडखानी नही की. और अगर आपमे गानेकी काबिलीयत है तो सम आप रिषभपे भी रख सकते है.” हे ऐकून अमरनाथ उसळून त्याला म्हणाले, “जसराज, तुम मरा हुआ चमडा पिटते हो. तुम्हे स्वर से क्या मतलब?”

अमरनाथही मोठेच गायक. त्यांनी केलेला उपमर्द तरुण जसराजच्या मनाला झोंबला आणि त्यातूनच ‘गवई होईन तेव्हाच डोक्याचे केस उतरवेन’ ही प्रतिज्ञा त्याने केली. पुढे साधारण १९५१च्या आसपास आकाशवाणीवर जसराजजींचा पहिला कार्यक्रम झाला तेव्हा म्हणजे सातेक वर्षांनी या प्रतिज्ञेची पूर्ती झाली. एका मुलाखतीत जसराज यांच्याकडूनच ऐकलेला हा प्रसंग एकाचवेळी त्यांची बंडखोरी, महत्त्वाकांक्षा, निर्धार आणि ध्येयप्राप्ती यांचा प्रत्यय देणारा तर आहेच पण अनपेक्षितपणे कुमारगंधर्वांसारख्या मळवाटा नाकारणाऱ्या संगीतकाराशी त्यांचा अनोखा अनुबंध जोडणाराही आहे. 

एक उत्तम तबलावादक ते उत्तम गवई हा त्यांचा प्रवास निर्धाराने केलेल्या मेह्नेतीच्या बळावर झाला असला तरी घरामध्ये असलेलं संगीताचं वातावरण, तालज्ञान आणि रागज्ञान या दोन्हींचं शिक्षण देण्याची पद्धत यामुळे गाण्याचे संस्कार जन्मापासूनच त्यांच्यावर झालेले होते. हरियाणामधील हिसार या गावी 28 जानेवारी 1930 रोजी जसराज यांचा जन्म झाला. त्यांचे वडील मोतीरामजी सुरुवातीच्या काळात काश्मीरच्या राजदरबारी आणि कालांतराने हैद्राबादचे शेवटचे निजाम मीर उस्मान अली यांच्या दरबारी राजगायक म्हणून राहिले. जसराज चार वर्षांचे असताना त्यांचे वडील निवर्तले. तेव्हा त्यांच्यापाशी लहान जसराजची स्वरांची तालिम सुरु होऊन जेमतेम वर्ष झालं होतं. मग वडील बंधू मणिराम आणि प्रतापनारायण यांच्याकडून सुरुवातीला तबल्याचे आणि गायकीचे धडे त्यांना मिळाले. याशिवाय साणंदचे महाराणा जयवंतसिंग वाघेला आणि स्वामी वल्लभदास यांच्याकडूनही संगीतातली आणि आध्यात्मिक संथा त्यांनी घेतली. 

1960 सालादरम्यान जसराज मुंबईत आले. चित्रपटमहर्षी व्ही. शांताराम यांच्या कन्या मधुरा यांच्याशी 1962 मध्ये त्यांचा विवाह झाला. त्याच दरम्यान 1966 मध्ये त्यांची पहिली लॉंग प्ले रेकॉर्ड निघाली. त्यात ते नटभैरव, शुध्द बरारी आणि हंसध्वनी गायले आहेत. पाठोपाठ पुरिया, अडाणा, शुध्दनट, गोरख कल्याण, बिलासखानी या रागांच्या त्यांच्या ध्वनिमुद्रिका निघाल्या आणि या नव्या गायकाचा परिचय श्रोत्यांना होऊ लागला. साठच्या दशकात उस्ताद अमीरखांपासून कुमारगंधर्वापर्यंत अनेक मोठमोठ्या गायकांचा श्रोतृवर्ग आकाराला येत होता. महाराष्ट्रातही निरनिराळया घराण्यांचे लहानमोठे गायक आपापला जम बसवून होते. भीमसेन, वसंतराव, जितेंद्र अभिषेकी, किशोरीताई अशी मोठी नावं या क्षेत्रात आपापलं स्थान निर्माण करत होती. तितकेसे लोकप्रसिध्द नसणारे मात्र अफाट गानविद्या असणारे बुजुर्गही इतरांच्या मनातलं आदराचं स्थान बाळगून होते. अशा अनुकूल व तरीही आव्हानामक परिस्थितीत जसराज यांचा इथल्या संगीताजगतात प्रवेश झाला आणि पुढे एकविसावं शतक उजाडेपर्यंत ज्या गायकांची प्रस्थं महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राबाहेर निर्माण झाली त्यात आज जसराज यांचं नाव आपल्याला जरूर घ्यावं लागतं.

जसराज भारतातील एक लोकप्रिय गवई होते. भीमसेन जोशींचं नाव आणि गाणं जसं शास्त्रीय संगीताशी फारसा परिचय नसलेल्या व्यक्तीलाही ठाऊक असे तशाच पद्धतीची लोकप्रियता त्यांच्यानंतर लाभलेले जसराज हे एकमेव गवई असावेत. निरनिराळी संमेलने, संगीत सभा, महोत्सव इथपासून अगदी बॉलीवूडच्या ॲवॉर्ड फंक्शन्सपर्यंत सर्वत्र त्यांचा भरपूर वावर होता. संगीतमार्तंड या उपाधीपासून संगीत नाटक अकादमी, तिन्ही पद्मपुरस्कार असे असंख्य सन्मान त्यांना लाभलेले होते. देशीपरदेशी त्यांच्या मैफिलींना उदंड प्रतिसाद होता. संजीव अभ्यंकरापासून कला रामनाथ यांच्यापर्यंत अनेक सुजाण गायक वादकांनी त्यांच्याकडून विद्या घेतलेली होती. हरिप्रसाद चौरासिया, अमजद अली, शिवकुमार शर्मा, झाकीर हुसैन हे जगविख्यात वादक त्यांच्या जवळच्या  मित्रपरिवारातले होते. आपल्या गाण्याने, मैत्रीने आणि निरनिराळ्या सांस्कृतिक घटनांतील उपस्थितीमुळे जसराज यांचा परिचयपरीघ शास्त्रीय संगीतातल्या इतर गायक कलावंतांच्या तुलनेत बराचसा विस्तारला होता. त्यामुळे अशा व्यक्तीचं जाणं हे विशिष्ट वर्गापुरतं मर्यादित राहत नाही. त्याची दखल विविध क्षेत्रांतून घेतली जाणं स्वाभाविक आहे. 

घरातून शाळेला जाण्यासाठी निघायचं आणि वाटेत एका हॉटेलात ‘दिवाना बनाना है तो दिवाना बना दे वरना कही तकदीर तमाशा न बना दे’ हे अख्तरीबाई फैजाबादीचं (नंतरच्या बेगम अख्तर) गाणं ऐकत बसायचं असा लहान वयातला नित्यक्रम जसराज त्यांच्या संगीताशी झालेल्या पहिल्या प्रेमाची खूण म्हणून सांगत. पण पुढे त्यांचं सूत जुळलं ते ख्यालाशीच. घरात आणि त्यांच्या गुरुजींच्या सहवासात झालेल्या संस्कारांमुळे आणि कदाचित उपजत प्रवृत्तीमुळेही संगीताकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टीकोन भक्तीप्रधान बनला होता. त्यामुळे ख्यालाव्यतिरिक्त ठुमरी, टप्पा, गझल अशा शृंगारवृत्तीच्या उपशास्त्रीय प्रकारांमध्येही भजनाला अग्रक्रम मिळाला आणि ख्यालांमध्येही भक्तिरचनांना प्राधान्य मिळालं. उपनिषदं, संस्कृत काव्य, स्तोत्रं, सुक्तं, हिंदी संतांच्या पद्यरचना अनुकूल रागांमध्ये गाणं इथपासून अजब तेरी दुनिया मालिक, मेरो अल्ला मेहरबान अशा वैशिष्ट्यपूर्ण बंदिशी रचून गाण्यामुळे भारतातील विविधपंथी, सर्वसामान्य श्रद्धाळूजनांतील श्रोतावर्गही त्यांना मिळाला होता.   

हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताच्या विश्वातलं त्यांचं स्थान काय होतं? अद्वितीय प्रतिभासंपन्नतेचा दावा त्यांनी स्वतःदेखील कधी केला नाही. पण निरनिराळ्या प्रचलित – अप्रचलित रागांत भरपूर निर्मितीही केली. रचनाकार – वाग्गेयकार म्हणून त्यांचं स्थान निश्चितच महत्त्वाचं आहे. त्रितालाच्या वजनाने येत निष्णात तबलजीलाही चकवा देणारी झपतालातली ‘अब थारे बिन कौन मोरी राखे लाज’ ही पुरियातली बंदिश त्यांच्या सर्जनशक्तीचा प्रत्यय देणारी आहे. त्यांच्या बंदिशी त्यांच्या काव्यजाणीवेचीही खूण पटवतात. बंदिशींची संस्कृतप्रचुरता आणि त्यांचं सौंदर्यपूर्ण सांगीतिक उच्चारण हे त्यांचं उल्लेखनीय वेगळेपण होतं. बंदिशीच्या शब्दांना, त्यांच्या उच्चाराला आणि त्यांतील भावाला महत्त्व देत ख्याल मांडण्याची घराण्याचीच परंपरा त्यांनी अधोरेखित केली. याशिवाय काही राग धृपद अंगाने संथ विस्तार करत गायचे आणि काही टप्पा अंगाने बढत करत गायचे ही घराण्याची रीतही त्यांनी पाळली.

त्या काळातल्या बहुतांश गवयांवर अमीर खाँच्या गाण्याचा प्रभाव असे. तसा तो जसराजजींच्या सुरुवातीच्या काळातील रेकॉर्डिग्जमध्येही खास दिसतो. पण कालांतराने त्यांच्या स्वतःच्या विकसित होत गेलेल्या संगीतविचारात तो विरघळून गेलेलाही जाणवतो. संथ, सुस्थिर आलापीतून रागविस्तार करणं हे अभिजात वैशिष्ट्य जसं त्यांच्या गाण्याला होतं तसंच आवाजाला विशिष्ट कंप देणं, विशिष्ट प्रकारची घसिट, खर्जातून थेट तार सप्तकात मींड घेणं असं शैलीदार अलंकरणही होतं. त्यांच्या गाण्याने वीर आणि रौद्र रसाकडून शांत रसाकडे प्रवास केला. निरनिराळ्या प्रकारच्या वर्तुळांत वावरल्यामुळे एक सर्वसमावेशक उदारपण स्वभावाला, संगीतविषयक मतांना आलेलं होतं. गाण्यात सुध-बानी सोबत सुध-मुद्राही होती. त्यामुळे प्राथमिक पातळीवरच्या श्रोत्यालाही आकर्षून घेण्याची शक्ती आणि त्याच्या रंजनाची शक्यता त्यांच्या गाण्यात होती. असे जसराजजी मोठ्या लोकप्रियतेचे धनी बनले नसते तरच नवल होतं. 

जसराज गेले ही बातमी कळण्याच्या काही वेळापूर्वीच मी किशोरीताईंचा यमन ऐकत होतो. ‘तोसे नेहा लागा’ या अभिनव रचनेतून ताईंनी यमनाचं एक अपूर्व दर्शन घडवलं आहे. ते ऐकताना मनात येत होतं की, शहाजहानने कित्येक वर्षं खर्चून ताजमहालासारखं प्रेमाचं जे अद्वितीय शिल्प निर्माण करून ठेवलं आहे. त्याच ताकदीचं यमनाचं उदात्त भव्य प्रेमरूप ताईंनी केवळ काही स्वरांनी साकारलं आहे. यमनाच्या त्या रचनेला अनेक शास्त्रजाणत्यांनी नाकं मुरडली होती. त्याचक्षणी मला ताईंच्या यमनावरची जसराजजींची प्रतिक्रिया आठवली. ते म्हणाले होते, “मै भी बहुत अच्छा यमन गाता था. (याचा प्रत्यय म्हणून यमनमधली ‘जा जा रे पागल मनवा’ ही त्यांची बंदिश ऐकण्यासारखी आहे.) लेकीन एक बार इन देविजीने यमन सुना दिया और पता नही हमारा यमन कहां उड गया.” त्याला उत्तरादाखल ताई म्हणाल्या, “संगीताचं विश्व इतकं निसरडं आहे की, इथे आम्ही सगळे एकमेकांचे हात धरून असतो. जसराजभाई हे म्हणू शकतो कारण यमन काय आहे ते त्याला ठाऊक आहे.” संगीतात साकारणारा शास्त्रकाट्याच्या कसोटीपलीकडचा भावनेचा अमूर्त प्रदेश पाहिलेल्या कलावंतांनी परस्परांना दिलेली ही दाद आहे. जसराजजींप्रती कृतज्ञतेपोटी एक श्रोता म्हणून त्यातलीच भावना उसनी घेऊन त्यांच्या स्मृतींना अर्पण करावीशी वाटते.          

- सुहास पाटील, पुणे
suhas.horizon@gmail.com

Tags: व्यक्तिवेध पंडित जसराज सुहास पाटील शास्त्रीय संगीत हिंदुस्थानी संगीत जसराज Pandit Jasraj Suhas Patil Classical Music Hindustani Classical Music Jasraj Load More Tags

Comments:

Milind Pandit

Sir, very well articulated, expressed in a very simple sentences complexed articulation of these artform. It reaches to the sentiments of the common man.

Suraj Powar

लेख खूप छान लिहिला आहे. सदर लेखातून लेखकाचा पं. जसराजजी यांच्याबाबत अभ्यास तर दिसतोच तसेच सोबत आदरही स्वष्ट होतो. सामान्य वाचकाला ज्याला संगीता बद्दल काहीच माहित नाही त्यालाही या लेखातून सहज सोप्या शब्दात माहिती उपलब्ध होते. लेखकाचे आभार.

Tushar Pathade

शास्त्रीय संगीताची जाण नसलेल्या पण त्याबद्दल जाणून घेण्याचं आकर्षण असलेल्या माझ्यासारख्या सामान्य वाचकालाही समजेल अशी सोपी भाषा. शास्त्रीय संगीतासंबंधित बहुतांश लेख शब्दबंबाळ असतात, त्यामुळे ते सामान्य वाचकाला आकळायला प्रचंड अवघड जातात. हा तसा नव्हता त्यामुळे अभिनंदन. आणि मुख्य म्हणजे या विषयावर मी लोकसत्तेच्या अग्रलेखाची प्रतीक्षा करत होतो..तो काही मिळाला नाही पण हा! ❤

Niket

संगीत मार्तंड पं. जसराज यांना भावपूर्ण श्रद्धांजली. सदर लेख खरच खूप छान आणि साध्या सोप्या भाषेत लिहिला आहे, कुठेही क्लिष्टता भासत नाही. पंडितजींच्या कारकिर्दीचे अगदी कमी शब्दात प्रभावी, सुंदर वर्णन केले आहे.

Anup Priolkar

Deeply studied Article on legend of Indian classical music Pandit Jasraj ji.

Add Comment