चंद्रपूरचं आव्हान

माझे पप्पा हेमंत करकरे - भाग 9

प्रातिनिधिक चित्र

मी तेव्हा दहा वर्षांची होते.  9 ऑगस्ट 1991 या दिवशी मुंबईला माझा धाकटा भाऊ जन्माला आला. आई त्याला घेऊन घरी आली. आम्ही त्यांचं घरी स्वागत केल्याच्या किती छान-छान आठवणी आहेत. हॉस्पिटलमधून मम्मीला आणि भावाला घरी आणण्यासाठी मी, पप्पा आणि माझी बहीण असे तिघंही गेलो तेव्हा मला कोण आनंद झाला होता. बाळ अतिशय गोजिरवाणं होतं. त्याच्या निरनिराळ्या मुद्रा पाहून आम्ही खूश व्हायचो. आम्ही दोघी बहिणी त्याला मांडीवर घ्यायचो, खेळायचो, त्याचे खूप लाड करायचो. माझी धाकटी बहीण झाली तेव्हा मी चारच वर्षांची होते त्यामुळे तिच्या जन्माच्या आठवणी अगदी पुसट आहेत.

पप्पांच्या दोन्ही भावांना दोन-दोन मुली. माझा भाऊ हे करकरे कुटुंबातलं सातवं नातवंड. पप्पा त्याचे खूप लाड करायचे. पप्पांनी एकूणच आम्हा तिघा भावंडाचं खूप केलं, अगदी  बाळुतं बदलण्यापासून... ते दिवस खूप आनंदाचे होते. सगळं घर या तान्हुल्याभोवती फिरत होतं. दिवसभर दूध पिणं, ढेकर काढणं, बाळुतं बदलणं, झोपवणं... हेच सगळं चालायचं. बाळाचं दूध पिऊन झालं की बाल्कनीतल्या खुर्चीत बसून त्याची ढेकर काढणं मला आवडायचं. 

त्या वेळी मुंबईचा पावसाळा चालू होता. पावसाचा आवाज अविरतपणे यायचा. मी बाळाला घेऊन रॉकिंग चेअरमध्ये बसायचे. खूश असायचे. एकदा आम्ही सर्व जण छान कपडे घालून तयार झालो. फॅमिली फोटो काढले पण माझा सर्वात आवडीचा फोटो म्हणजे एकदा पप्पा युनिफॉर्म घालून कामावर जायला निघाले, तेवढ्यात कुणीतरी हिरव्या पानाच्या आकाराच्या मऊसुत दुपट्यात गुंडाळलेलं बाळ त्यांच्याकडे घेऊन आलं. फोटोत पप्पांच्या चेहऱ्यावरचे भाव फोटो काढण्यासाठी उत्सुक पण कामावर निघण्याची गडबड असे आहेत.

आम्हा पाच जणांच्या कुटुंबाचे ते एकत्र राहण्याचे, आनंदाचे दिवस काहीच दिवसांत संपले आणि पप्पांची चंद्रपूरला बदली झाली. पप्पा आपल्यासोबत का नाहीत, ते इतक्या लांब का आहेत असे प्रश्न आम्ही कधीही विचारले नाहीत. पप्पांचं बदलीच्या ठिकाणी असणं आमचा सवयीचं झालं होतं. त्या लहान वयातही मला कळत होतं की ‘खाकीचं बोलवणं’ हे पप्पांसाठी सर्वात जास्त महत्त्वाचं आहे.

आम्हाला आईच्या ताब्यात सोपवून पप्पांनी 'सुपरिटेंडंट ऑफ पोलीस' म्हणून चंद्रपूरचा ताबा घेतला. मुंबईत तेव्हा मुसळधार पाऊस चालू होता. आम्ही सरकारी कॉलनीतल्या ब्लॉकमध्ये पहिल्या मजल्यावर राहत होतो. तिथपर्यंत येणारा तो ओल्या मातीचा वास मला उदास करायचा. मला वाटायचं की, चंद्रपूर कसं असेल? आणि तिथला पावसाळा?

माझं लग्न झाल्यावर एकदा मम्मी मला सांगत होती. माझ्या बहिणीच्या वेळी गरोदर असताना तिला एकाच गोष्टीचे डोहाळे लागले होते. ते म्हणजे तापी नदीच्या किनाऱ्यावर पप्पांबरोबर लांब-लांब चालायला जावं पण ते जमलंच नाही. पप्पांचं सोबत नसणं समजूतदारपणे स्वीकारून सगळ्या गोष्टींना ती शांत मनानं सामोरी जात राहिली. 

चंद्रपूरला बदली म्हणजे शिक्षाच... असं अनेक पोलिसांना वाटायचं. पप्पांना मात्र तसं मुळीच वाटलं नाही. नक्षलवाद्यांचा चंद्रपूरमध्ये आणि आजूबाजूच्या प्रांतात धुमाकूळ चालू होता. पोलिसांना त्यांच्यापासून धोका होता. या आव्हानाला तोंड देणं आणि नक्षलवाद्यांना वठणीवर आणण्यासाठी प्रयत्न करणं यांकडे पप्पा एक संधी म्हणून पाहत होते. चंद्रपूरला बदली झाल्यावर पप्पांनी नक्षलवादासंबंधी पुस्तकं वाचली. नक्षलवाद्यांच्या कार्यप्रणालीचा अभ्यास सुरू केला.  

शेतकऱ्यांनी आणि आदिवासींनी हिंसक मार्ग स्वीकारावा आणि त्याच मार्गानं परंपरागत जमीनदारी आणि लोकशाही सरकार उलथून टाकावं या भूमिकेचा पुरस्कार नक्षलवादी विचारसरणी करते... आणि म्हणूनच आपलं स्वप्न साकारण्यासाठी हे नक्षलवादी आदिवासींना एकटं पाडायचे. त्यांना मुख्य प्रवाहापासून दूर ठेवायचे  त्यामुळं ते शिक्षण, आरोग्य, वीजपुरवठा अशा जीवनावश्यक गोष्टींपासून वंचित व्हायचे. त्यांना इतरांशी संपर्क साधू द्यायचा नाही, रस्ते बांधण्याला विरोध करायचा आणि पोलीस हेच शत्रू असं या नडलेल्या लोकांच्या डोक्यात ठसवायचं काम नक्षलवादी करायचे.

एखाद्या आदिवासी व्यक्तीनं पोलिसांशी थोडी जरी जवळीक दाखवली तरी हे नक्षलवादी त्या व्यक्तीला ठार मारायचे. आदिवासींच्या सुधारणांसाठी सरकारी निधीतून आलेल्या पैशातला बराचसा वाटा खंडणीच्या रूपात उकळायचे. सरकारही कोंडीत सापडायचे म्हणजे योजना आखल्या नाहीत आणि निधी मंजूर केला नाही तर तो प्रदेश असाच मागास राहणार आणि दुसरीकडे योजना राबवायच्या ठरवल्या की त्याचा फायदा नक्षलवादी घेणार. 

चंद्रपूर हे ‘काळ्या सोन्याचं गावं’ म्हणून प्रसिद्ध. तिथं मुबलक प्रमाणात कोळशाच्या खाणी आहेत... शिवाय ते सिमेंटच्या कारखान्यांसाठी प्रसिद्ध आहे. बल्लारपूर इंडस्ट्रीज् लिमिटेड हे भारतातले कागदाचे सर्वात मोठे उत्पादनकर्ते आणि निर्यातकर्ते. चंद्रपूरमध्ये या कारखान्यात काम करणाऱ्यांची प्रचंड मोठी वसाहत आहे.

तिथं काही संस्था-संघटना लोकशाहीचा मुखवटा घालून गुप्तपणे नक्षलवाद्यांचं समर्थन करत आहेत हे पप्पांच्या लक्षात आलं. पोलिसांकडं या संस्थांची माहिती होती. या संस्था सार्वजनिक कार्यक्रम आयोजित करून सामाजिक कार्यकर्त्यांना प्रमुख पाहुणे म्हणून निमंत्रित करायचे. त्यांच्या नावाचा उपयोग या संस्था स्वतःचं स्थान उंचावण्यासाठी करत आहेत याची त्या पाहुण्यांना कल्पनाही नसायची. त्यांनी वेगवेगळे मेळावे भरवून कामगारांच्या प्रश्नांवर चर्चाही घडवून आणल्या.

माणिकगड, जिवती पर्वत आणि भाईपठार हे भाग घनदाट जंगलांतले... त्यामुळं नक्षलवाद्यांसाठी हा प्रदेश गनिमी काव्यानं लढण्यासाठी योग्य होता. या जंगलात विपुल विषारी नाग, विंचू, इतर अन्य सरपटणारे प्राणी आणि त्यांच्या जोडीला गोंड आणि माडिया आदिवासी एकत्र नांदायचे. त्यांचं उदरनिर्वाहाचं काही ठोस साधन नसायचं. या आदिवासी लोकांसाठी सामाजिक सुधारणाच काय पण अत्यावश्यक वस्तू... उदाहरणार्थ, अन्न, कपडे हेसुद्धा दुर्लभच. सुधारणांपासून वंचित आणि मुख्य प्रवाहापासून दूर अशी त्यांची अवस्था. ते सतत या नक्षलवाद्यांच्या भीतीच्या छायेत वावरतात. 

सुधारणावादी आणि पुढारलेल्या महाराष्ट्रात असा आदिवासी भाग असणं हा केवढा विरोधाभास. एका बाजूला प्रशासक, पोलीस किंवा जंगल अधिकारी हे सगळे आपल्याशी अन्यायानंच वागणार तर दुसऱ्या बाजूला माओवादी बंदुकीच्या धाकानं आदिवासींकडून अन्न आणि आसरा मिळवणार असं या आदिवासींना वाटायचं. हे आदिवासी भेदरलेले, असहाय. प्राणालाच मुकावं लागण्याच्या भीतीनं ते पोलिसातही तक्रार करू शकत नसायचे. पप्पांच्या लक्षात आलं की, त्यांना या नक्षलवाद्यांची मानसिकता जाणून घेऊन मग त्यावर मात करावी लागेल. नक्षलवादाचं मूळ निपटून काढण्यासाठी हे गरजेचं आहे.

पप्पा त्यांच्या पथकाला घेऊन या नक्षलवाद्यांच्या गावांना भेटी द्यायचे. त्यांना गावातल्या लोकांचा विश्वास संपादन करायचा होता. मोठं झाल्यावर कोण व्हावसं वाटतं? असा प्रश्न एकदा त्यांनी गावातल्या मुलांना विचारला. त्या मुलांनी क्षणाचाही विचार न करता उत्तर दिलं, ‘शेखर अण्णा’.  शेखर अण्णा हा नक्षलवाद्यांचा म्होरक्या. खेड्यातल्या मुलांना तो हिरो वाटावा इतका त्या लोकांचा प्रभाव होता.

मी तेव्हा दहा वर्षांची होते, बहीण सहा वर्षांची होती आणि भाऊ तर तान्हाच होता. चंद्रपूरची मोहीम म्हणजे जोखीमच होती हे कळण्याचं आमचं वय नव्हतं. माझे मम्मी-पप्पा दोघंही गेल्यावर मला धाकट्या काकांनी सांगितलं की, नक्षली लोकांकडून आमच्या घरच्या पत्त्यावर सतत आमच्या आईला धमक्यांची पत्र यायची. त्यात ते लिहायचे, ‘तुझ्या नवऱ्याचे दिवस भरलेत. कपाळावरचं कुंकू पुसून टाक.’

पप्पांच्या बरोबरीच्या मित्रांनी, सहकाऱ्यांनी चंद्रपूरच्या दिवसांततल्या काही आठवणी आम्हाला सांगितल्या. त्या काळातला पप्पांचा काही पत्रव्यवहार वाचा उद्याच्या भागात... 

(अनुवाद: शोभा चित्रे)

- जुई करकरे - नवरे
jui.navare@gmail.com


वाचा 'माझे पप्पा हेमंत करकरे' या लेखमालेतील इतर भाग 

मुंबईतले ते भीषण तास...

शेवटचा प्रवास...

हेवा वाटावा असे वीरमरण...

संकटसमयी सगळ्यांच्या पुढे उभा राहून लढणारा धैर्यधर...

बुलेटप्रुफ जॅकेटचा अपशकुन

हौतात्म्यामागची आजन्म तपश्चर्या

कुटुंबवत्सल माणूस

Tags: लेखमाला जुई करकरे जुई करकरे - नवरे माझे पप्पा : हेमंत करकरे मुंबई दहशतवादी हल्ला 26/11 अँटी टेररिझम स्क्वॉड दहशतवाद विरोधी पथक एटीएस हेमंत करकरे भाग 9 Marathi Series Jui Karkare Majhe Pappa : Hemant Karkare My Pappa : Hemant Karkare Hemant Karkare: A Daughter's Memoir Part 9 Jui Karkare- Navare Load More Tags

Add Comment