ही सिंहस्थ पर्वणी मला पाहायला मिळेल का? 

नाशिकच्या सिंहस्थ पर्वासाठी तोडल्या जाणार असलेल्या अठराशे झाडांपैकी एकाची कैफियत 

नाशिकला दर बारा वर्षांनी सिंहस्थ कुंभमेळा होतो. या वेळी ऑक्टोबर 2026 पासून जुलै 2028 पर्यंत हा सोहळा चालेल. मोठ्या संख्येने संत, साधू आणि भाविक या मेळ्यात सहभागी होतील. या साधूंसाठी बाराशे एकरवर साधूग्राम विकसित केले जात आहे. या साधूग्रामासाठी त्या परिसरातील अठराशेच्या आसपास झाडांवर खुणा करुन त्यांना तोडण्याचा निर्णय शासनाच्या विचाराधीन आहे. पर्यावरणतज्ज्ञ व सामान्य नाशिककर याला विरोध करत आहेत. सदर लेखात या अठराशे झाडांपैकी एक झाड आपली कैफियत मांडते आहे अशी कल्पना केली आहे.

आज माझ्याही गळ्यात पिवळी खूण आली. क्षणभर आपण ज्यू आहोत की काय असं वाटून गेलं. पिवळी फुली मारली म्हणजे तुम्हाला तोडून टाकू असं नाही काही असं प्रेमळ आश्वासन कुंभमेळ्याचे कमिशनर शेखर सिंग यांनी दिलं असलं तरी भीती ही वाटतेच ना! "अठराशे नाही काही, त्यातली निम्मी अधिक झाडंच तोडू आम्ही!", असं उदार होऊन त्यांनी सांगितलं आणि भरूनच आलं आम्हाला. मी कुठल्या नऊशेपैकी असेन? माझं बर्थ सर्टिफिकेट बदलून दहा वर्षापेक्षा मोठं करण्यासाठी मी माझी हवी तितकी पानं, फुलं आणि फांद्या द्यायला तयार आहे. सुगरिणींची घरटी तेवढी घेऊ नका, प्लीज.

खूप मोठा इतिहास आमच्या नाशकाला. प्रभू रामचंद्रांच्या आधीपासूनचा. आमच्या तपोवनात तर त्याने तप केलं होतं. आमच्या पूर्वजांच्या छायेखाली बसून! आजही आमच्यातले अनेकजण या  दंडकारण्याचा वंशावळीवर आपला हक्क सांगतात. आम्ही तेवढे उच्चकुलीन नसलो तरी प्रभू रामाने जगायचा हक्क आम्हालाही दिलाय ना ! 

आमचे गिरीशअण्णा महाजन जळगावचे असले तरी नाशिकच्या या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी ते जातीने लक्ष घालतायत. प्रयागराजच्या धर्तीवर खूप मोठा इव्हेंट करायचाय. जगातल्या एक नंबरच्या पक्षाला साधसुधं काही चालतंच नाही ना ! पुढच्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात ध्वजारोहण होईल आणि मग अधिकृतपणे कुंभमेळा सुरु होईल. त्यानंतर देशभरातून संत महंत येऊ लागतील. वैष्णव पंथाच्या तीन आखाड्यातील साधू पंचवटीला गोदातीरी स्नानही करतील.

त्यांच्यासाठी आमच्या तपोवन परिसरात साधुग्राम बनवलं जातंय याचा कोण आनंद झाला होता आम्हाला! बाभळींनी तर साधूंना त्रास होऊ नये म्हणून लगेच काटे गाळायला सुरुवात केली. साधूंच्या स्वागतासाठी आपण बहरुन यायचं, ऑक्टोबर महिना असला तरी फुलून यायचं की दिक्षित डायेट करुन साधूंना साजेसं स्लिम ट्रीम व्हायचं यावर आमची जोरदार चर्चा सुरु झाली. अर्थात सगळेच साधू बारीक नसतात असं खोचकपणे कुणीतरी म्हटल्याबद्दल मोठ्या वृक्षांचा ओरडाही खाल्ला.

बाराशे एकर वर साधुग्राम बनवणं ही काय साधी गोष्ट आहे? बरं हे साधू शाही. त्यांचं स्नान तर शाहीच पण निवासस्थान ही शाहीच असायला हवं. जसं ग्रीन ॲव्हेन्यू हे नाव बघितलं की सर्वसामान्यांना हे हिरवा रंग दिलेलं सिमेंट काँक्रिटचं जंगल असणार याची खात्रीच असते, तसं साधूंसाठींच्या पर्णकुटी म्हणजे जोरदार असणार याची आम्हालाही कल्पना होती. असंही साधूंकडे राजसत्ता येऊन अनेक वर्ष झाली असल्यामुळे याबद्दल कोणाला काही तक्रार असण्याचं कारण नव्हतं. सिंहस्थ पर्वणी दर बारा वर्षांनी येणारी. आमच्यातील काही जणांना अशा दहा बारा पर्वणी बघण्याचं भाग्य लाभलेलं. त्यामुळे आधीच्या पर्वणींचे किस्से सांगताना ते फुलून आले होते.

पाहणी करायला अधिकारी येऊ लागले आणि आणि आम्हीही खूष होऊन गेलो. मोजमाप करताना अधिकारी आमच्याकडे टक लावून बघतायत याने किती फुशारलो आम्ही. हल्ली एवढी रसिकता कोणाकडे असते? त्या आनंदाच्या भरात आमच्या खोडांवर केलेल्या खुणा आम्ही प्रेमपत्र असल्यासारख्या कवटाळल्या. ही माणसांची गिचमीड आकड्यांची भाषा आम्हाला थोडीच कळते? 

मग या अधिकाऱ्यांपाठोपाठ आले नाशिकमधील सर्वसामान्य नागरिक. पर्यावरणतज्ज्ञ, वृक्षप्रेमी येऊ लागले आणि मनात शंकेची पाल चुकचुकली. उसासे टाकताना, आमच्याभोवती जमून त्यांनी घोषणा देताना ऐकलं आणि प्राणांची आहुती द्यायची आपली वेळ आली आहे हे समजून चुकलं. कुणाला प्राणार्पण करावं लागलं तरी आपल्या बदल्यात दहा जणांना जीवनदान मिळणार, कुणाला अलगद प्रेमाने उचलून दुसरीकडे राज उद्यानात जागा मिळणार, कुणाला बच्चा आहेस म्हणत तुच्छतेने असंच उपटून टाकणार हे सगळं रितीप्रमाणेच होत असलं तरी भिती वाटतेच हो. 

गेल्या जन्मीच्या पापामुळेच हलता डुलता न येणारे, साधा डासही मारता न येणारे झाड झालो आम्ही. पण तरी आमच्या या तुच्छ आयुष्यात पक्ष्यांच्या, किड्या माकोड्यांच्या, साप सरड्यांच्या सोबत आम्ही जगत राहतो, फुलत, फळत राहतो. जमेल तसं ढगांना खेचून आणतो. गोदाक्काला समृद्ध करतो. आमच्यातील कोणी शेकडो वर्ष हे करत राहतो तर कोणी काही वर्षांत मातीत मिसळतो. पण आज मात्र आम्हाला घाऊक मुक्ती मिळण्याची संधी मिळाली आहे याचा खरंतर आनंद वाटायला हवा ना? पण तरीही खरंच भिती वाटतेय मला. मी एकही सिंहस्थ अजून पाहिला नाहीये हो. हा तरी बघायला मिळेल? 


हेही वाचा - निसर्गविनाश थांबवण्यासाठीची शेवटची हाक! - अजिंक्य कुलकर्णी


अनेक झाडे वाढती, बहरुनिया सुकोन जाती. 
कोणी त्यांची गणती ठेविली असे?
परी जे म्युनिसिपाल्टीने उपटिले, श्रीसाधूंसाठी तोडिले
अठराशे वृक्ष ते अमर ठेले मोक्षदाते पावन.

आमच्या नाशिकच्या तात्याराव सावरकरांनी केलेल्या कवितेची नक्कल करीत आज कोणीतरी ही कविता इथे वाचली आणि शहारून यायला झालं. खरंच तात्यारावांनी अशी कविता लिहिली असती? की साधूग्रामासाठी कत्तल होणाऱ्या आम्हा झाडांच्या बाजूने उभे राहून कवी कुसुमाग्रज यांची सिंहस्थावरील कविता टॅग करुन साधू नव्हे हे तर भोंदू म्हणत या कत्तलीला विरोध केला असता? मला वाटतं कुसुमाग्रज आणि तात्याराव दोघेही आम्हाला मिठी मारून उभे राहिले असते!

- जयदीप कर्णिक
jaydeeprkarnik@gmail.com
लेखक आय टी क्षेत्राशी संबंधित आहेत आणि पर्यावरण अभ्यासक आहेत.

Tags: सिंहस्थ कुंभमेळा वृक्षतोड तपोवन 1800 झाडे 1700 झाडे तोडणार नाशिक साधना डिजिटल साधुग्राम जमीन जंगलतोड Load More Tags

Comments:

प्रीता नागनाथ

अगदी मनातलं लिहिलंस... पण इतकं हळवेपण आता काय उपयोगाचं? असं ही वाटून गेलं.

प्रीता नागनाथ

अगदी मनातलं लिहिलंस... पण इतकं हळवेपण आता काय उपयोगाचं? असं ही वाटून गेलं.

Add Comment