बॅ. नाथ पै : समाजवादाचा राजदूत

ज्येष्ठ समाजवादी नेते बॅरिस्टर नाथ पै यांच्या 101 व्या जन्मदिवसाच्या निमित्ताने..

‘समाजवादाचे संसदीय प्रवक्ते’ असं जेव्हा नाथबद्दल मी म्हटलं, तेव्हा त्याचं केवळ वक्तृत्वच मला अभिप्रेत नव्हतं. त्याची संस्कारितता आणि सभ्यताही मला तितकीच अभिप्रेत होती. लोकसभा हे लोकशाहीच्या क्रियाशील अस्तित्वाचं एक थोर स्थान असतं. त्याला अनुरूप अशी नाथची संस्कृती होती. म्हणूनच नेहरूंनी त्याचं वर्णन ‘ए जंटलमन पोलिटिशिअन’ असं केलं. सभ्यतेच्या एका समूर्त अवतारानं सभ्यतेच्या दुसऱ्या एका तितक्याच समूर्त अवताराला दिलेलं हे प्रशस्तिपत्र होतं, हे ध्यानात ठेवलं पाहिजे.

नाथ पैंची आठवण झाली की, समाजवादी नेत्यांची ऐतिहासिक मालिका माझ्या नजरेसमोर सरकते आणि एकेका नेत्याच्या वैशिष्ट्याचा माझ्या मनावरील संस्कार जागा होतो. आचार्य नरेंद्र देव म्हणजे विदग्ध तपस्विता. जयप्रकाश नारायण म्हणजे मानवाच्या सदसद्विवेकबुद्धीचा साक्षात्कार. डॉ. लोहिया म्हणजे प्रतिभेचा उच्छृंखल विलास. अच्युतराव पटवर्धन म्हणजे संस्कारशीलता. रावसाहेब म्हणजे खानदान. अशोक मेहता म्हणजे अभ्यास. नानासाहेब गोरे म्हणजे शैली. एसेम म्हणजे मनःपूर्वकता आणि मधू लिमये म्हणजे आक्रमक बौद्धिकता.

या मालिकेत नाथ पै जरा उशिरा सामील झाला, पण त्याचं वैशिष्ट्य वेगळं होतं. नाथ म्हणजे समाजवादी पक्षाचा अ‍ॅम्बॅसिडर - राजदूत! समाजवादी पक्षाची अप्रतिम प्रतिमा लोकांत आणि राज्यकर्त्यांत निर्माण करणारी ती एक समृद्ध शक्तीच होती.

अनेक समाजवादी नेते लोकसभेत व राज्यसभेत होते आणि आहेत. त्यांनी आपापलं अस्तित्व आपापल्या पद्धतीनं प्रत्ययास आणून दिलं. पण समाजवादी पक्षाचा संसदीय प्रवक्ता नाथच खरोखरच शोभला. त्यानं राज्यकर्त्यांत केवळ दरारा निर्माण केला नाही, तर आदरही निर्माण केला.

याचं पहिलं कारण अर्थात नाथचं वक्तृत्व. समाजवादी पक्षात तरी नाथच्या वक्तृत्वाला तुलना नव्हती. नाथ लोकसभेत जाण्यापूर्वी कम्युनिस्टांचे हिरेन मुखर्जी यांनी आपल्या वक्तृत्वानं आणि आपल्या इंग्रजी भाषाविलासानं संसद अनेकवार तापविली व उजळवली; पण नाथच्या वक्तृत्वानं मुखर्जींच्याही वक्तृत्वाला थोडंसं नमविलंच.

नाथला केवळ आवाजाची देणगी होती, असं म्हणण्यानं त्याच्या वक्तृत्वाचं पुरेसं वर्णन होत नाही. आवाजाची नैसर्गिक देणगी तर त्याला होतीच. त्याच्या आवाजाला एक विलक्षण सुरावट होती. पण या आवाजाचे जे विविध विभ्रम प्रत्ययास येत, ती नाथच्या साधनेची किमया. प्रारंभी नाथच्या लोकसभेतल्या भाषणांत अकारण आवेग, क्वचित् अकारण नाटकीपणा जाणवे. नाट्य हे नाथला उपजतच गवसलं होतं, पण नाट्य म्हणजे नाटकीपणा नव्हे. प्रसंगाला अशी आवाजाची फेक किंवा फिरत साधायची आणि आवाजाला अनुरूपतेच्या रिंगणाबाहेर उडी मारू द्यायची नाही, ही विद्या त्यानं जाणिवेनं कमावली. नाथ हा मोठा नकल्या होता. कोणाचीही नक्कल करणं हे त्याच्या रक्तातच होतं. दुसऱ्याचं म्हणणं सादर करताना ते त्याच्या खास लकबीत आणि आवाजात सादर करण्याचा त्याला हव्यास होता. (त्याच्या या छंदाची हुकूमत माझ्या आवाजावर कशी चाले हे पाहण्याची माझी फार इच्छा होती, ती त्यानं पुरी केली नाही; पण इतरांना ती मुबलक लाभली असेल!) पण लोकसभेत या नादाचा उपयोग पावित्र्यविडंबनासाठी त्यानं कधी केला नाही.

नाथचं देखणं व्यक्तित्त्व ही त्याच्या वक्तृत्वाची मोठी शक्ती होती. नाथ दिसायला तसा देखणा नव्हता, असं कोणी तरी म्हटल्याचं आठवतं. मला हे मंजूर नाही. 1952 मध्ये मी प्रथम त्याला भेटलो, तेव्हापासून त्याच्या देखणेपणाचाच संस्कार माझ्यावर झालेला आहे. पण याचं कारण असं असावं की, त्याच्या नजरेची छाप माझ्यावर सतत बसली. नाथचे पाणीदार डोळे हे त्याच्या व्यक्तित्त्वाचं एक मोठं वैभव होतं. हे त्याचे डोळे त्याच्या भावार्त वृत्तीबरोबर नेहमी शिवाशिवी खेळत. अनेकदा ते अकारण मिचकविण्याची त्याला वाईट खोड होती. पण तो कोठे तरी अज्ञातात किंवा अंतरंगात नजर लावून बसला की त्याचे डोळे जे तन्मयतेनं तेवत, त्यांचं सौंदर्य मला फार आवडे. लहानपणी पुळणीवर समुद्राकडे बघत बसण्याचा त्याला बेभान छंद होता, असं वासू देशपांडे सांगतात. समुद्राची दूरस्थ विशालता, विशालतेचे संदेश घेऊन येणाऱ्या त्याच्या लाटा, त्यांची किनाऱ्याशी चाललेली कुजबूज, कड्यांवरचा त्यांचा धडाका, खडकावरचा त्यांचा फेनाभिषेक आणि या साऱ्यांना क्षितिजानं दिलेला अर्थपूर्ण आशय- यांचा वेध घेण्यात ज्याची दृष्टी बालवयातच चूर झाली; त्याच्या नजरेचे क्षणात उदात्त तर क्षणात गंभीर, क्षणात अंतर्मुख तर क्षणात खेळकर, क्षणात करुण तर क्षणात मिस्किल असे विभ्रम प्रत्ययास यावेत, यात काय नवल! पण ही नजर अखेरीस समुद्राला अंतिम अधिष्ठान देणाऱ्या क्षितिजाकडे पाहत असे, हे ध्यानात ठेवलं पाहिजे. नाथच्या जीवनाला ध्येयाचं जसं एक निश्चित क्षितिज होतं, तसा सभ्यतेचा अचल ताल होता. तोच त्याच्या नजरेत मला नेहमी आढळे. नाथची नजर ही त्याच्या वक्तृत्वाची स्वाभाविक सहचारिणी होती. 

पण नाथचं वक्तृत्व संसदेत इतकं गाजलं ते केवळ त्याच्या नजरेच्या आणि आवाजाच्या अनेकविध विभ्रमांमुळे, हे मात्र खरं नव्हे. त्याची आंतरिक सभ्यता ही तिथे त्याची मोठी शक्ती बनली होती. संसद म्हणजे आखाडा नव्हे, प्रतिपक्षाला अक्षरशः भुईसपाट करण्याची ती जागा नव्हे; प्रतिपक्षाचं परिवर्तन करण्याची ती वादभूमी आहे, हे नाथ कधी विसरला नाही. लोहियावाद्यांचं आकर्षण नाथला कधी वाटलं नाही याचं मुख्य कारण हे होतं. लोहियावाद्यांनी अगर इतर कोणी लोकसभेत धुळवड माजविली की, त्याचा उल्लेख नाथ नेहमी तळतळून करी - किंवा तळमळून असंच म्हणणं योग्य होईल. त्याच्या आवाजात त्याचं व्यथित, व्याकुळ अंतःकरण जाणवे आणि त्याचं दुःख बोलकं होई. लोकसभेत जे काय पेच घालायचे ते युक्तिवादाचे, जी काही शक्ती वापरायची ती अचूक माहितीची आणि जो काही विजय मिळवायचा तो ध्येयदृष्टीचा, अशी त्याची श्रद्धा होती.

म्हणून जो काही थोडा वेळ त्याच्या गर्दीच्या आणि कौटुंबिक जिव्हाळ्याच्या आयुष्यात त्याला सापडे, त्याचा विनियोग तो अभ्यासासाठी करी. त्याच्या खोलीत सोफ्याच्या पलीकडे गिब्बनसारखे ग्रंथकार जे हारीने मांडलेले दिसत, ते केवळ शोभेसाठी नसत. त्यांच्या संचिताचा ठाव घेण्याचा तो प्रामाणिक प्रयत्न करी. नाथच्या अभ्यासाचं एक उत्कृष्ट उदाहरण प्रा. ग. प्र. प्रधान यांनी दिलं आहे. नाथनं भारतीय घटनेची एक प्रत प्रत्येक छापील पानाला कोऱ्या पानाची जोड देऊन बांधून घेतली होती आणि त्या कोऱ्या पानावर घटनेच्या प्रत्येक कलमाविषयीचे आपले विचार त्यानं लिहून काढले होते. नाथचं घटनादुरुस्तीचं बिल इतकं गाजलं त्याचं मर्म या वस्तुस्थितीत होतं. पण नाथ अभ्यासजड नव्हता. ते त्याच्या स्वभावाला शक्यच नव्हतं. अभ्यासाला शैलीनं अलंकृत करण्याचा आणि विनोदानं हलका-फुलका करण्याचा त्याला हव्यास होता. समर्पक संदर्भ, आकर्षक सुभाषितं आणि अनपेक्षित उद्धृतं यांनी तो आपलं भाषण सजवीत असे. म्हणून त्याच्या भाषणांना जपानी इकेबानाचं सौंदर्य प्राप्त होई. जपानी पुष्परचनेत अपूर्व शोभा नेहमी असतेच, पण ही पुष्परचना ही कोणत्या तरी तात्त्विक प्रमेयाचा आविष्कार करण्यासाठी असते - त्यात कलेसाठी कलेची खुलावट असतेच, पण तिला कसल्या तरी अर्थवत्तेचं अधिष्ठान असते. नाथच्या वक्तृत्वाला असंच अधिष्ठान असे.

आपल्या वक्तृत्वात इकेबानाचं सौंदर्य नाथ हमखास ओतू शकला याचं कारण त्याची आश्चर्यकारक स्मरणशक्ती आणि या शक्तीचा अतिसमर्पक उपयोग. गोवा स्वतंत्र झाला, तेव्हा नाथनं कवी बोरकरांना त्यांच्याच कवितेतील -
त्रिवार मंगलवार 
आजला त्रिवार मंगलवार

ही ओळ तारेच्या स्वरूपात पाठविली. अर्थात् बोरकरांनी त्या तारेचं उत्तर त्याच कवितेतील -
धन्य जाहलो मीही याचा घेउन साक्षात्कार

या ओळीच्या रूपात पाठविलं. मृत्यूची चाहूल लागली, तेव्हा जवाहरलाल नेहरूंनी 
‘But I have promises to keep, 
And miles to go before I sleep,
And miles to go before I sleep.’

या फ्रॉस्टच्या ओळी लिहून ठेवल्या होत्या, त्यांची आठवण नाथनं जी. जी. पारीख यांना 1968 च्या ऑक्टोबरमध्ये लिहिलेल्या पत्रात उद्धृत केलेल्या-
‘At my car
I always hear
Time's winged chariot
Drawing near.’
या ओळी वाचून होते.

नाथच्या आश्चर्यकारक स्मरणशक्तीनं मी नेहमीच थक्क झालो आहे. नानासाहेब गोरे यांच्या भाषेत बोलायचं म्हणजे ‘स्मरणशक्तीच्या नावानं मी म्हणजे आळं’- यामुळं नाथनं स्मरणशक्तीचे प्रयोग करण्यास सुरुवात केली की, मी गोंधळून जात असे. दिल्लीला एकदा फोनवर तो मला म्हणाला, “प्रभाकर, मला कोणता पाध्ये आवडतो, सांगू? ‘व्याधाची चांदणी’ ही कथा लिहिणारा. “असं म्हणून त्यानं कथेतली अवतरणं फोनच्या तारेत गुंफायला सुरुवात केली. 1943 मध्ये लिहिलेल्या या कथेतील ही वाक्यं मी साफ विसरून गेलो होतो. मी म्हटलं, “तो पाध्ये आता मेला आहे.” तत्काळ त्याचं उत्तर आलं, “पण त्याचा पुनर्जन्म ‘तोकोनोमा'त झाला आहे” आणि मग आपल्या आवाजाला मिस्किल फोडणी देऊन त्यानं त्या पुस्तकातलं पहिलंच वाक्य उद्धृत केलं, “आता मी मधुचंद्राचं अभिजात ठिकाण आहे.” मी पार अवघडून गेलो. माझ्या अंतःकरणात कृतज्ञता दाटली आणि ऊर अभिमानानं भरून आला.

जुलै 1960 मध्ये नाथनं केंद्रीय नोकरांच्या संपासंबंधात जे भाषण लोकसभेत केलं, त्यात त्याच्या वक्तृत्वाच्या विविध गुणांचा उत्कृष्ट प्रत्यय आला. या वक्तृत्वाचे नमुने श्री. वासू देशपांडे यांनी सादर केले आहेत, ते या संदर्भात अवश्य पाहावेत. नेहरूंनी मुख्यमंत्र्यांना पाठविलेलं पत्र उद्धृत करून नाथने या वेळी काँग्रेस सभासदांना एकाच वेळी थक्क आणि क्रुद्ध केलं, 1926 च्या ब्रिटिश संपाच्या वेळी नेहरूंनी काढलेले उद्गार उद्धृत करून त्यांच्या वृत्तीला विरामविलं आणि 1926 च्या त्या ऐतिहासिक संपाच्या वेळी बी.बी.सी. कशी वागली, तिची या संपातील ‘ऑल इंडिया रेडिओ’शी तुलना करून माहितीमंत्र्यांना आणि इतर काँग्रेस सभासदांना लाजविलं! पण नेहरूंची क्षुद्र अवहेलना त्यानं केली नाही. व्यथित अंतःकरणानं तो एवढंच म्हणाला, “पंडित नेहरूंच्या संबंधानं आमचं एकूण चुकलंच! त्यांची शिकवण परमार्थानं स्वीकारून आमच्या कुवतीप्रमाणे ती आचरणात आणण्याचा प्रयत्न आम्ही केला आणि फसलो, हेच खरं.”

‘समाजवादाचे संसदीय प्रवक्ते’ असं जेव्हा नाथबद्दल मी म्हटलं, तेव्हा त्याचं केवळ वक्तृत्वच मला अभिप्रेत नव्हतं. त्याची संस्कारितता आणि सभ्यताही मला तितकीच अभिप्रेत होती. लोकसभा हे लोकशाहीच्या क्रियाशील अस्तित्वाचं एक थोर स्थान असतं. त्याला अनुरूप अशी नाथची संस्कृती होती. म्हणूनच नेहरूंनी त्याचं वर्णन ‘ए जंटलमन पोलिटिशिअन’ असं केलं. सभ्यतेच्या एका समूर्त अवतारानं सभ्यतेच्या दुसऱ्या एका तितक्याच समूर्त अवताराला दिलेलं हे प्रशस्तिपत्र होतं, हे ध्यानात ठेवलं पाहिजे.

पण लोकशाहीचा प्रवक्ता केवळ राजदरबारात वावरतो, असं नव्हे. तिथे तर त्यानं वावरायलाच हवं; तिथल्या सत्ताबाज वातावरणात लोकशाहीचा ‘कॅटॅलिटिक एजंट’ किंवा आपल्या भाषेत बोलायचं म्हणजे शुद्धीचा मंत्र कार्यान्वित करायलाच हवा. पण लोकसत्ताक नेता हा कार्यकर्त्यांची सत्ता आणि जनतेचं वास्तव यांवर कमानीसारखा उभारलेला पूल असला पाहिजे. नाथ हा असा नेत्रदीपक पूल होता आणि म्हणून कार्यकर्त्यांत आणि जनतेत पक्षाची उत्कृष्ट प्रतिमा निर्माण करण्याचं कार्य तो सहज करी. जनतेत मिसळण्यासारखं, तिच्या सुख-दुःखांशी, राग-लोभांशी, आशा-अपेक्षांशी आणि तिच्या वृत्ती-प्रवृतींशी समरस होण्यासारखं लोभस, प्रसन्न आणि सहसंवेद्य व्यक्तित्त्व नाथला लाभलं होतं. नाथ लोकांत गेला की जुनी ओळख ठेवून शक्य तितक्या व्यक्तींना नावानं हाक मारणार, त्यांची विचारपूस करणार, त्यांच्या सुखाबरोबर सुखावणार, त्यांच्या दुःखाबरोबर व्यथित होणार, त्यांच्याशी हसणार, खेळणार, रमणार, त्यांच्या नकला करणार, डोळे मिचकावीत आठवणी काढणार, एखादी प्रादेशिक म्हण किंवा कथा हवेत फेकणार आणि जिथे हे प्रत्यक्ष नसेल तेव्हा त्याचा प्रत्यय त्याच्या अपरिहार्यपणे होणाऱ्या सायंकाळच्या किंवा दुपारच्या किंवा क्वचित् मध्यरात्रीच्याही सभेत आणून देणार! 

लोकांच्या, कार्यकर्त्यांच्या, अनुयायांच्या अंतःकरणात नाथ कसा शिरे याची अनेक उदाहरणं वासू देशपांडे यांनी दिली आहेत. त्यातल्या एकाचाच उल्लेख करतो. लोकसभेवर 1957 मध्ये निवडून आल्यानंतरची गोष्ट. लोकसभेची बैठक संपल्याबरोबर नाथ आपल्या मतदारसंघात गेला. सवड मिळेल तेव्हा मतदारसंघात जाणं, मतदारांशी संपर्क राखणं आणि त्यांच्या गरजांची व भावनांची आंतरिक नोंद करणं हा नाथचा परिपाठ होता. तो गेला तेव्हा तेव्हा रोमन कॅथॉलिकांचं एक शिष्टमंडळ त्याला भेटायला आलं. बाप्तिस्मांचे आणि विवाहविधीचे दर इथल्या बिशपनं वाढविले आहेत, अशी तक्रार त्यानं केली. नाथनं ती तक्रार मनात ठसविली आणि पुण्यात जाऊन रोमन कॅथॉलिक प्रमुखाची भेट घेतली व वेंगुर्ल्याच्या रोमन कॅथॉलिकांचं गाऱ्हाणं त्यांच्या कानांवर घातलं. वेंगुर्ल्याच्या बिशपची बदली झाली.

श्री. वासू देशपांडे यांनी हे चरित्र लिहून वाचकांवर फार मोठे उपकार केले आहेत. नाथबद्दलचा जिव्हाळा आणि अभिमान हे या पुस्तकाचे स्थायिभाव आहेत, त्यामुळे काही ठिकाणी चरित्र एकसुरी झाल्यासारखं वाटतं. नाथ स्वतःबद्दल फार थोडं बोले, क्वचितच बोले, असं एखादं निखालस चुकीचं विधान या पुस्तकात अंतर्भूत झालेलं आहे. पुस्तकाला काही ठिकाणी धांदल्या निवेदनाचं स्वरूप आलं आहे. लेखनाच्या क्षेत्रातील नवखेपणाच्याही चार-दोन खुणा आढळतील. पण हे दोष किरकोळ आहेत आणि ते या चरित्राचं वैशिष्ट्यही नव्हे. हे चरित्र नाथची लाघवी मूर्ती जिवंत करते आणि वाचकासमोर तिच्या अनेक विभ्रमांसह उभी करते, हे त्याचं वैशिष्ट्य आहे. या वैशिष्ट्यात या चरित्राचं यश आहे. या चरित्राच्या वाचनानं नाथ आपल्यासमोर ठाकतो, या गोष्टीला फार फार महत्त्व आहे. कारण नाथ हा त्याच्या कार्यापेक्षा श्रेष्ठ होता. His personality was richer than his work. नाथच्या या समृद्ध व्यक्तित्त्वाची प्रचिती या चरित्राच्या वाचनानं येते, हा त्याचा खरा गुण आहे. 

या व्यक्तित्वाची विविध दर्शनं या पुस्तकात घडतात. अनेक रूपांनी नाथ येथे आपल्याला दर्शन देतो... तुम्ही गंगाधरराव देशपांड्यांना पाडण्यास मदत करा, आम्ही तुम्हाला ए.आय.सी.सी.त पाठवितो असं प्रलोभन दाखविणाऱ्या सत्ताबाज काँग्रेसवाल्यांना धुत्कारणारा तरुण नाथ... मी कॉपी करणार नाही, नापास झालो तरी चालेल असं बजावणारा शालेय विद्यार्थी नाथ; माझा गुन्हा होता म्हणून परुळेकरांनी मारलं, त्यात काय झालं अशी त्या निर्घृण शिक्षकाची तरफदारी करणारा बालविद्यार्थी नाथ; पीएच.डी.साठी 'उपनिषदांचा जर्मन तत्त्वज्ञानावर झालेला परिणाम हा कोणाचीही बुद्धी गलबलविणारा विषय घेणारा नाथ; लोकशाही म्हणजे लोकांचं, लोकांनी, लोकांसाठी चालविलेलं राज्य या लिंकनच्या वचनाचा आपल्या लोकशाहीच्या संदर्भात 'Government of the incompetent by the corrupt, for the helpless' असा अमोघ अन्वर्थक अनुवाद करणारा नाथ; लक्ष्मी मेननना लक्ष्मी अशी एकेरी हाक मारून त्यांच्या आक्षेपाला, तरुणांनी कोणत्या म्हाताऱ्या स्त्रियांशी खेळू नये आणि कोणत्या म्हाताऱ्यांशी खेळावं याबद्दलचं एक विनोदवचन उद्धृत करणारा आणि वयाचा मुद्दा बाईनं मांडावा याबद्दल आश्चर्य व्यक्त करून लक्ष्मी मेननना एकाच वेळी मुग्ध व हास्यप्रवण करणारा नाथ; विदग्ध संगीतिकांप्रमाणं रांगड्या दशावतारांची स्पर्धा लावून ग्रामीण कलावंतांत कलेची ईर्षा उत्पन्न करणारा नाथ; पोस्टमनांच्या संपाच्या संदर्भात, पोस्टमनच्या पाठीवर पत्रांचं ओझं असतं तसंच दुःख आणि दैन्य यांचं ओझं असतं असं नेहरूंना चपखलपणे सांगणारा नाथ; कोकणचे स. का. पाटील केंद्रीय सरकारात असूनही त्याचा कोकणवासीयांना काहीच फायदा होत नाही हे सांगण्यासाठी सत्यभामेच्या पारिजातक वृक्षाचा दृष्टांत देणारा नाथ; आपल्या दिलीपला दिलीपकुमार म्हणणाऱ्या एका दिल्लीनिवासी अद्ययावत् प्रमदेला ‘मला कालिदासाच्या रघुवंशातला दिलीप अभिप्रेत आहे, सिनेमाच्या पडद्यावरचा नव्हे’ असं तत्काळ बजावणारा नाथ; कोकणच्या सुधारणेचा तपशील एखाद्या संशोधकाच्या अधिकारवाणीनं मंत्र्याला सुनावणारा नाथ; ‘काल मी सायकल डबलसीट नेली, मला पकडा’ - असं पोलीस ठाण्यावर हजर होऊन सांगणारा नाथ; संयुक्त महाराष्ट्रासाठी अमर्याद झगडून अखेरीस ते आलं तेव्हा त्याला म्हैसूर सरकारच्या तुरुंगात अभिवादन करणारा आणि अजून सीमेचा प्रश्न शिल्लक आहे या व्यथेचा प्रत्यय आणून देणारा नाथ; हृदयविकारानं शरीर पोखरत जात असताना हे पार्थिव हृदय आणि जन्मभर ज्या ध्येयाची उपासना केली त्या ध्येयाचं हृदय यांतील फरक तत्काळ टिपणारा नाथ... नाथची अशी नानाविध दर्शनं या पुस्तकात सजीव होतात, साकार होतात.


हेही वाचा : प्रकाशाचा पुत्र : नाथ पै - पु, ल. देशपांडे


या पुस्तकाचा मी व्यक्तिशः कृतज्ञ आहे. ज्या नाथला मी माझा नाथ असं म्हणू शकत असे, त्या नाथला या पुस्तकानं समृद्ध करून माझ्यापुढं उभं केलं. आमचा प्रशांत गेला तेव्हा ‘प्रभाकर, हे तुझं कधी भरून न येणारं नुकसान रे’ असं म्हणणारी नाथची विव्हळणारी वाणी; ‘तू स्टालिनची पापकृत्यं चव्हाट्यावर मांडीत असे, तेव्हा माझ्यासारख्या कम्युनिस्ट विरोधकालाही कधी कधी आशंका वाटे; पण आता हे क्रुश्चेव्हचं भाषण वाचलं आणि तुझी टीका कमीच होती असं वाटलं’, असे उद्गार काढणारा नाथचा कौतुकाचा आवाज; ‘सांग तुझ्या एसेमना’ असे टेलिफोनवरून थरकापत आलेले त्याचे शब्द; ‘या मुलीशी तू लग्न न करणे हा एक सामाजिक गुन्हा आहे’ असं त्याला एका सांगून आलेल्या मुलीच्या संदर्भात मी म्हटलं, तेव्हा माझ्याकडे आपल्या तरंगणाऱ्या स्तब्ध नजरेनं पाहणारी त्याची दृष्टी; स्वतःच्या मृत्यूबद्दल निर्दय विनोद करून क्रिस्टलला घाबरविणारी त्याची मिस्किल मूर्ती; परिचारिकेला दम भरून मला हॉस्पिटलच्या खोलीत बोलावणारा त्याचा निकराचा आवाज; Nath is the most successful leader of the most defeated party असं मी 1962 च्या निवडणुकीनंतर एका सभेत म्हटलं, तेव्हा विषण्ण कृतज्ञतेनं पाहणारी त्याची नजर; 1965 च्या ब्लॅक आऊटमध्ये त्याच्याबरोबर गाडीतून जात असताना, त्याच्या सोबतीमुळे त्या काळोखाला आश्वासक अर्थ प्राप्त देणारा त्याचा सहवास; ‘बोलू नकोस त्या तरुण तुर्काबद्दल; he is beneath discussion; त्याच्यातला खरा इसम म्हणजे चंद्रशेखर' अशा उद्गारांनी राजकीय चर्चेला धार आणून देणारी त्याची तडफ हे पुस्तक वाचताना असा हे अनेकरूप नाथ मला वारंवार आठवला आणि मी धन्य झालो.

महाराष्ट्रातल्या असंख्य स्त्री-पुरुषांना नाथ - निदान पाहून, ऐकून माहीत होता. या पुस्तकाच्या वाचनानं त्यांच्या नाथस्मृतीला चैतन्यपूर्ण जाग येईल व त्यांचं जीवन समृद्ध होईल, हा या पुस्तकाचा मी सर्वश्रेष्ठ गुण समजतो. यासाठीच हे पुस्तक मी आतुर आवडीनं वाचलं आणि लोकही ते तसं वाचतील, अशी ग्वाही मी देतो.

- प्रभाकर पाध्ये

('लोकशाहीचा कैवारी' हे नाथ पै यांचे जवळचे मित्र व सहकारी वासू देशपांडे यांनी रेखाटलेले त्यांचे चरित्र आहे. साधना प्रकाशनाने 1972 मध्ये ते प्रकाशित केले. प्रस्तुत लेख ही त्या पुस्तकाला लिहिलेली प्रस्तावना आहे.)


 

Tags: समाजवाद नाथ पै जवाहरलाल नेहरू संसद राजकारण कोकण चरित्रे साहित्य प्रभाकर पाध्ये nath pai prabhakar padhye socialist party nehru parliment politics biography Load More Tags

Add Comment