स्वयंशिक्षणाला पालकांची साथ

'कोरोना काळातील आमचे शिक्षण' या स्पर्धेत पहिले पारितोषिक मिळवलेला लेख...

(सर्व फोटो कृष्णात पाटोळे यांच्या सौजन्याने)

‘कोरोना काळात आमचे शिक्षण’ या स्पर्धेविषयी प्रसिद्ध केलेल्या निवेदनाला चांगला प्रतिसाद मिळाला आणि महाराष्ट्रातील 17 जिल्ह्यांतून मिळून 78 शिक्षक/मुख्याध्यापक यांनी त्यांच्या स्वतःच्या वा त्यांच्या संस्थेच्या कामाविषयी टिपणे पाठवली. या स्पर्धेतून निवडलेले सर्वोत्तम पाच लेख आजपासून सलग पाच दिवस प्रसिद्ध करत आहोत. त्यांपैकी स्पर्धेत पहिल्या क्रमांकाचे परितोषिक मिळवणारा हा लेख...

महिलादिनानिमित्त शाळेत कार्यक्रमाचे आयोजन केले होते. प्रवेशद्वाराजवळ साबण, पाणी आणि सॅनिटायझर यांची सुविधा होती. त्याच्या वापराची जबाबदारी सूर्यानी, परिधी, सबिना आणि प्राजक्ता या विद्यार्थिंनींकडे दिली होती. आमची मुलींची शाळा आहे. म्हणून सर्व जबाबदारी मुलींवर असते.

पूर्वनियोजनानुसार संतोष गुरव, प्रतीक्षा देवळेकर, दीपाली मगदूम, दीपाली कट्याप्पा या सहकारी शिक्षकांनी गृहोपयोगी दुर्मीळ वस्तू गोळा केल्या होत्या. त्याचे प्रदर्शन मांडले होते. प्रदर्शनखोलीत कोरोनाविषयी जनजागृतीची पत्रके लावली होती. 

मुलाखत, स्पर्धा, व्याख्याने पार पडली. यामध्ये दीक्षा ॲपची आणि इतर शैक्षणिक ॲप्सची माहिती तंत्रस्नेही शिक्षिका आयेशा नदाफ यांनी सांगितली. पालकांकडून ॲप वापराची प्रात्यक्षिके घेतली. ही भविष्याची नांदी ठरली. यापूर्वी ऑनलाईन शिक्षणाकडे आमचा काणाडोळा असायचा. तंत्रस्नेही हा विषय पुढे काही महिन्यांच्या कालावधीसाठी विद्यार्थ्यांमधला आणि आमच्यातला दुवा जोडणारा धागा ठरला.

दुसऱ्या दिवसापासून शाळा कुलूपबंद करावी लागणार होती. या दिवशी आम्ही प्रत्येक वर्गाचे व्हॉटसॲप ग्रुप तयार केले. 16 मार्चपासून ऑनलाईन शिक्षणाला प्रत्यक्ष सुरुवात झाली. इतकं हे तत्काळ घडलं. आज त्याचा खूप फायदा होत आहे. सहशालेय आणि अभ्यासपूरक उपक्रमांना वेळ मिळावा म्हणून द्वितीय सत्रातला अध्यापनाचा बराचसा भाग प्रथम सत्रात शिकवून पूर्ण झाला होता. गणितातल्या अब्जपर्यंत संख्येच्या मूलभूत क्रियांचा सराव झाला होता.

पुढच्या इयत्तेतला गणिताचा अभ्यास आपसूक झाला... त्यामुळे अध्ययनपूरक उपक्रम घेण्यासाठी वेळ मिळाल्यामुळे ते ऑनलाईन घेऊ लागलो. रोजचा अभ्यास एकदाच नेमून दिला. केलेला अभ्यास रोज ग्रुपवर पाठवणे मुलींना बंधनकारक केले. रोजच्या अभ्यासात मराठी, इंग्रजी वाचनाचा व्हिडिओ, अब्जपर्यंत सर्व क्रियांची अंकी आणि शाब्दिक गणिते सोडवणे, इंग्रजी शब्दलेखन आणि दैनंदिनी लेखन यांचा समावेश होता.

मुलींना सरावाला संधी मिळाली. सर्व विषयांना स्पर्श करता आला. रोजचा अभ्यास एकदाच दिल्यामुळे दररोज अभ्यास पाठवण्याची गरज भासली नाही. हे आमच्यासाठी अधिक सोपे झाले. मुली नियमितपणे केलेला अभ्यास आजपर्यंत रोज पाठवत आहेत.  

अभ्यास तपासून मार्गदर्शन व्हावे यासाठी पालकांशी आणि मुलींशी प्रत्यक्ष फोनवर बोलू लागलो. गणिताच्या बाबतीत युक्ती केली. बेरजेच्या गणिताचे उत्तर वजाबाकीच्या क्रियेने, वजाबाकीच्या गणिताचे उत्तर बेरजेच्या क्रियेने, गुणाकाराचे उत्तर भागाकाराच्या क्रियेने, भागाकाराचे उत्तर गुणाकार क्रियेने तपासून मुलींनी स्वतः बरोबर-चूक अशी खूण करायची. मुलींना याचा सराव होता. या कृतीने स्वतःची चूक कळायची. परिणामी मुली गणिताच्या मूलभूत क्रिया सहज करू लागल्या. शिक्षकांशिवाय अचूक मूल्यमापन होऊ लागले.

मुलींच्या स्व-अभिव्यक्तीला अधिक वाव देत गेलो. पूर्वी शिकलेल्या भागाचा हा सराव आहे. गोष्ट, कविता यांच्या लेखनासाठी ग्रुपवर शब्द दिला जायचा. दर शनिवारी मुक्त लेखनासाठी एक विषय दिला जायचा. मुलींना चित्र पाठवले जायचे. मुलींनी चित्रवर्णन, चित्रावर आधारित प्रश्ननिर्मिती आणि गोष्टीचे लेखन केले. अभिव्यक्तीविषयी अभिप्राय देत होतो.

उन्हाळी सुट्टीत हा ऑनलाईन अभ्यास सुरू ठेवला. थोडा भाग कमी करून मनोरंजकता वाढवली. निवडक मराठी चित्रपटांचे व्हिडिओ, ऑडिओ यांबरोबरच गोष्टी, गाणी, माहितीपट यांच्या लिंक्स आणि त्यांचे प्रत्यक्ष व्हिडिओही पाठवले. त्याचे वेळापत्रक केले. पाठवलेले व्हिडिओ, लिंक्स आणि चित्रपट यांबाबतची मते मुलींकडून लिहून घेतली. टीव्हीवरील निवडक जाहिरातींचे निरीक्षण करून नोंदी करण्यास सांगितले. जाहिरातींची निर्मिती करण्यास सांगितले. मुली घरात असूनही नवनिर्मितीचा आनंद घेऊ लागल्या. 

कोरोनाविषयीच्या उपाययोजना, घ्यायची काळजी, सावधगिरी अशी माहिती सातत्याने पाठवत राहिलो. पालकांशी संवाद साधला. नृत्य, गायन, अभिनय यांचे मार्गदर्शन पालक करत होते. केलेले काम मुली ग्रुपमध्ये पाठवत होत्या.

शाळा चालू होती तेव्हा रोज दैनंदिनी लिहिताना मुली कंटाळा करायच्या... पण कोरोनाकाळात दैनंदिनीचे लेखन त्या हिरिरीने करू लागल्या. या अभिव्यक्तीतून स्पष्टपणा आणि सच्चेपणा दिसत होता... यामुळे कौटुंबिक वातावरण व समस्या समजून घेणे सोपे झाले. मुलींनी घरातील ज्येष्ठांची, आईबाबांची मुलाखत घेतली. 

‘कुलूपबंद शाळेचे मनोगत’ असा विषय एक दिवस लेखनासाठी दिला. यावर काही मुलींनी कविता आणि गोष्टी लिहिल्या. श्रावणीने ‘कुलूपबंद शाळा’ या विषयावर कविता लिहिली. या कवितेची निवड राज्यस्तरीय ऑनलाईन बालकवी संमेलनासाठी झाली. ही कल्पना घेऊन गुगल मीटवर कविसंमेलन घेतले. ‘कोरोना’ या विषयावर मुलींनी स्वतः लिहून भाषणे सादर केली. त्याची ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धा घेतली. चढाओढ सुरू झाली. मुली टीव्हीवर बातम्या बघू लागल्या. पालकांचे फोन येऊ लागले. 

कोरोनाकाळात शिक्षण आणि शिक्षणपूरक उपक्रमांची मजबूत साखळी तयार होऊ लागली होती. उन्हाळी सुट्टीत घरीच सुरक्षित राहून मुलींनी शिक्षणाचा आनंद लुटला. व्हॉटसॲप ग्रुपचे नाव सृष्टीने सुचवले. ‘हाती घेऊ, तडीस नेऊ’ जे शाळेचे ब्रीदवाक्य आहे; हे सारे काही उत्स्फूर्तपणे चालले होते. शाळेतल्या एकूण दहा मुलींकडे ॲन्ड्रॉईड मोबाइल नव्हते. त्यांना शेजारच्या मैत्रिणींची साथ मिळाली. असा शंभर टक्के सहभाग होता. बैठ्या आणि पारंपरिक खेळांचा आनंद लुटण्याची मुभाही दिली गेली. 

नवीन शैक्षणिक वर्ष सुरू झाले. मोबाईलची उपल्बधता, वेळ ऑनलाईन शिक्षणाच्या आड येऊ लागले. हे वास्तव पाहता ऑनलाईन शिक्षणाचा हट्ट धरणे योग्य वाटले नाही. शिक्षक या समस्येला तोंड देत होते. कोणी प्रत्यक्ष घरी जाऊन, तर कोणी स्वयंसेवकामार्फत शिक्षण सुरू ठेवले. 

मी पालकवर्गाला साद घालून त्यांच्या मार्फत शिक्षण चालू ठेवण्याचा पर्याय काही दिवस करून पाहिला; पण माझी शिकवण्याची पद्धत आणि पालकांची पद्धत यांत तफावत जाणवू लागली. चुकीच्या संकल्पना जाऊ नयेत, मुलींचा गोंधळ उडू नये म्हणून पालकांबरोबर संवाद आणि मार्गदर्शन चालू ठेवले.

शासनाने टीव्हीवर शैक्षणिक कार्यक्रम सुरू केला. त्याचा लाभ शंभर टक्के मुली घेऊ शकत नव्हत्या. नवीन मार्ग शोधावा लागणार होता. अडचणी खूप होत्या. 25 जून रोजी सहकाऱ्यांपुढे संकल्पना मांडली. ‘घरी राहू, सुरक्षित राहू, घरीच शाळा भरवू.’ हा उपक्रम ठरवला. ही कल्पना सर्वांनी स्वीकारली. 

घरातल्या शाळेची वेळ सकाळी 9.30 ते दुपारी 2.00पर्यंतची. वेळापत्रक तयार केले. यात सर्व विषयांचा समावेश होता. परिपाठापासून ते हजेरी घेणे, टीव्हीवरील टिलीमिली कार्यक्रम पाहणे, वाचन, लेखन, अभ्यास तपासणे, अभ्यास देणे, नृत्य, नाट्य, गायन, योगासने आणि मुलाखत यांचा समावेश वेळापत्रकात केला होता. 

टीव्हीवरील कार्यक्रमाची गटचर्चा, त्यावरील अभिप्राय लेखन यांसाठी स्वतंत्र तासिका ठेवली. शैक्षणिक दिनदर्शिकेचा वापर होता. गटपद्धतीने शाळा भरणार होती. मुलींना शाळेत असताना गटात काम करण्याची, शिकण्याची, अभ्यास करण्याची सवय होती. सहकारी शिक्षकांना विश्वासात घेऊन हे नियोजन केले. पालकांची भूमिका महत्त्वाची ठरणार होती. 

26 जून छत्रपती शाहू महाराज यांची जयंती. या दिवशी शाळेत पालकांची वर्गवार सभा आयोजित केली. पालकांनी सॅनिटायझरच्या वापराबरोबर मास्कचा, सोशल डिस्टन्सचा वापर काटेकोरपणे आणि स्वयंस्फूर्तीने केला. आता हा त्यांच्या सवयीचा भाग झाला होता... त्यामुळे आमचे काम सोपे झाले. घरात शाळा भरवणे या विषयावर चर्चा झाली. पालकांना कल्पना आवडली. त्यांनी एकमुखाने मान्यता दिली.

अभ्यासात पुढे असणाऱ्या मुली निवडल्या. निवड करताना घरी पुरेशी जागा, टीव्ही, खडूफळा या गोष्टी असल्याची खात्री केली. शेजारच्या, गल्लीतल्या मैत्रिणींची नावे पालकांनी सुचवली. पाच ते सहा मुलींचा एक गट असे एकूण 20 गट तयार केले. हा घरातल्या शाळेचा पट होता. ज्या घरी ही शाळा भरवली जाणार होती त्या घरातल्या पालकांवर समन्वयकाची जबाबदारी दिली. गटनायक, समन्वयक आणि काही स्वयंसेवक शिकवण्याचे काम करणारे होते. पालकांना वेळापत्रकाच्या प्रती दिल्या.

‘घरी राहू, सुरक्षित राहू, घरीच शाळा भरवू’ या घरातल्या शाळेत हजेरी घेताना इंग्लीश शब्द सांगून मुलींनी हजेरी द्यावी असा शाळेतलाच नियम सुरू ठेवला. अभ्यास देणे, तपासणे, प्रत्यक्ष शिकवणे याचे पूर्ण स्वातंत्र्य गटनायकाला होते. ऑनलाईन शिक्षण चालू ठेवता आले नसले तरी घरातल्या शाळेतून शंभर टक्के मुलींचे शिकणे चालू होते. ऑनलाईन शिक्षणातील अडथळे पाहता हा उपक्रम संजीवनी देणारा ठरला. 
अद्याप समडोळी गावात कोरोनाचा रुग्ण आढळलेला नव्हता... पण सांगली जिल्ह्यात शिराळा इथे सुरुवात झाली होती... त्यामुळे सर्वांची सहमती आवश्यक होती. सोबत केंद्रप्रमुख सुनिता वाघमारे होत्या. पालक आणि शाळा व्यवस्थापन समितीने मंजुरी दिली.

मास्क, सॅनिटायझर वापरून आणि सोशल डिस्टन्सिंगचा नियम पाळून 1 जुलैपासून घराघरांत शाळा भरू लागल्या. पालकांनी घंटा, तक्ते, शैक्षणिक साधने, खडू, फळा या साधनांनी शाळा स्वयंस्फूर्तीने सजवली. अनौपचारिक वातावरणात शंभर टक्के उपस्थितीने आनंददायी शिक्षण सुरू झाले. दररोज संध्याकाळी गटनायक आणि समन्वयक यांच्याशी फोनवरून चर्चा, शंकेचे निरसन करू लागलो. फोन येऊ लागले. मुली खूश झाल्या. 

चार महिन्यांपासून शाळेला दुरावलेल्या चिमुकल्या ‘या शाळेत’ बागडू लागल्या. हसतखेळत शिकू लागल्या. वैयक्तिक मार्गदर्शन, समजावणं, समजून घेणं घडू लागलं. आमचा हुरूप वाढला. नियम पाळून शाळेला भेटी दिल्या. मार्गदर्शन केले. मुलींनी लिहिलेली दैनंदिनी या वेळी जाणीवपूर्वक बघायचो. दैनंदिनीत सारा लेखाजोखा पाहायला मिळत होता. मुलींनी शाळेतला आनंद मिळू लागल्याच्या भावना दैनंदिनीत मांडल्या होत्या. समान पातळीवर शिकू लागल्या होत्या. आम्हाला खूप आनंद झाला. 

परिपाठात खंड पडला होता. प्रार्थनेचे आणि समूहगीतांचे विस्मरण झाले होते. नियमित शाळेत होणाऱ्या संगीतमय आणि विचाररंजन करणाऱ्या परिपाठासारखा परिपाठ इथेही झाला पाहिजे असं वाटलं. यासाठी मी, माझे सहकारी, निवडक मुली आणि वादक मित्र एकत्र आलो. शाळेत सर्व गाण्यांचे व्हिडिओ रेकॉर्डिंग केले. शाळेचे यू-ट्यूब चॅनेल सुरू केले. गाणी अपलोड केली. साप्ताहिक नियोजन केले. लिंक पाठवली. दुसऱ्या दिवसापासून घराघरांत परिपाठ सुरू झाला. शाळेतल्या प्रसंगांचे फोटो, व्हिडिओ, पालक उत्स्फूर्तपणे पाठवू लागले. 

इयत्ता पहिलीत शिकणाऱ्या अक्साच्या साठ वर्षे वयाच्या आजीचा शिकवतानाचा व्हिडिओ बघून आम्हाला आश्चर्य वाटले. प्राजक्ता भिलवडेच्या मम्मीचे इंग्लीश शिकवणे कसलेल्या शिक्षकांसारखे होते. रावी पाटीलच्या मम्मीने कृतियुक्त आणि कौशल्यावर आधारित शिक्षणाचे धडे देऊन सगळ्यांना थक्क केले. या शाळेत पारंपरिक खेळ, मुलाखती होऊ लागल्या. सुसंवाद, सहकार्य, चिकित्सक विचार, सर्जनशीलता ही उद्दिष्टे साध्य होण्यासाठी माझी शाळा धडपडत असे. त्याला घरातल्या शाळेच्या उपक्रमाने बळकटी मिळाली. 

दोन महिने शाळा छान चालली. गावात कोरोनाची लागण झाल्याचा रुग्ण सापडला. शाळा बंद करण्याच्या सूचना माझ्याकडून अचानक दिल्या गेल्या. पालकांचे, मुलींचे फोन येऊ लागले. ‘सर आमच्या जबाबदारीवर शाळा चालू ठेवतो. शाळा बंद करू नका. आता कुठे आम्ही यात रमलोय.’ मुली रडू लागल्या. माझा नाइलाज होता. पालकसभेमध्ये एका सूचनेची कडक अंमलबजावणी करण्याविषयी मी दंडक घालून दिला होता, ‘ज्या क्षणी गावात कोरोनाचा रुग्ण सापडेल, त्या दिवसापासून घरातली शाळा बंद राहील.’ या सूचनेचे पालन करणे गरजेचे होते. 

पुन्हा अडथळा! करायचं काय? या शाळेत मुलींचं शिकणं, रमणं, तल्लीन होणं पालकांनी पाहिलं होतं. शाळा बंद असली तरी शिक्षण चालू होतं. याचं महत्त्व पालकांना उमगलं. आता पालक आमच्या प्रत्येक हाकेला साद देऊ लागले. नवीन मोबाईल घेतले, पुन्हा ऑनलाईन शिक्षण सुरू झाले. पुढची समस्या निर्माण होत असताना मागच्या समस्येतून उपाय निघत असतो याची अनुभूती आली. 

नव्याने सुरू झालेल्या ऑनलाईन शिक्षणात यू-ट्यूबवरील व्हिडिओ दाखवून संकल्पना स्पष्ट करणे सोपे झाले. मी तंत्रज्ञानातील नवनवीन आव्हाने स्वीकारली. गुगल मीटच्या माध्यमातून तास घेताना ॲप्स वापरणे, ती प्रेझेंट करणे हे तंत्रज्ञान मी शिकलो. यासाठी शीतल रुगे यांची मला साथ मिळाली. स्वतः ॲनिमेशन क्लिप्स बनवून पाठ संवादरूपाने शिकवत गेलो. बदलत्या तंत्रज्ञानाचा वापर करू लागलो... जे या कोरोनाकाळापूर्वी माझ्याकडून अभावानेच वापरले जात होते.

गुगल मीटवर अध्यापनाशिवाय इतर उपक्रम घेतले. विषय निवडून चर्चासत्रे घेतली. ‘कोरोनापासून ऑनलाईन शिक्षण’ या विषयावरची चर्चा रंगली. श्रावणी पाटील हिच्या अध्यक्षतेखाली कविसंमेलन रंगले. कविता सादरीकरण, सूत्रसंचालन, दाद देणे हे सारे इथे घडत होते. 

श्रावणीने गोष्ट आणि कविता लेखनासंबंधी मार्गदर्शन केले. इयत्ता दहावीत 100% गुण मिळवणाऱ्या अबोली कदम हिच्याशी मुलींनी ऑनलाईन गप्पा मारल्या. ऑनलाईन शिक्षणासाठी मुलींची उपस्थिती चांगली वाढू लागली. तरीही ऑनलाईन शिक्षण घरातल्या शाळेची जागा घेऊ शकत नव्हते हे निश्चित. 

गावात कोरोना रुग्णांची संख्या वाढत चालली होती. मृत्यूंची संख्या भीती वाढवत होती. अद्याप कोरोना शाळेतल्या मुलींपर्यंत आणि त्यांच्या कुटुंबीयांपर्यंत पोहोचला नव्हता. 

यादरम्यान क्वारंटाईन आणि पॉझिटिव्ह कुटुंबांचा सर्व्हे करण्याचे काम आम्हा शिक्षकांवर आले. हे करत असताना आम्हा सर्व शिक्षकांना आजारांचा सामना करावा लागला. 

कोरोना व्हायरसने जगरहाटीचे सगळे व्यवहार ठप्प केले खरे... पण आमचे शिकणे-शिकवणे तो थांबवू शकला नाही... कोरोनापूर्वीची गजबजणारी शाळा आणि शिक्षण यांची सर कोरोनाकाळातल्या शिक्षणाला येणार नाही हे सत्य कुणीही नाकारणार नाही... तरीही.... 

- कृष्णात पाटोळे
Krishnatpatole@gmail.com

जि. प. शाळा नं. 2, समडोळी,
ता. मिरज, जि. सांगली.

Tags: लेखमाला कोरोना काळातील आमचे शिक्षण शिक्षक प्रथम पारितोषिक कृष्णात पाटोळे Series Our education in the time of corona Teacher First Prize Krushnat Patole Load More Tags

Comments: Show All Comments

वाघमारे सुनिता संपत

सर्वच उपक्रम उत्कृष्ट आहेत

वाघमारे सुनिता संपत

सर्व शिक्षक याचे हार्दिक हार्दिक अभिनंदन

वाघमारे सुनिता संपत

पाटोळे सर गुरव सर मगदूम मॅडम देवळेकर मॅडम यांचे काम खूपच उत्कृष्ट आहे त्यानी शाळेत राबवलेले उपक्रम उल्लेखनीय आहेत मुली तर सकाळ पासून संध्याकाळपर्यंत अभ्यासात गुंग असतात पालकांचे सर्व बाबतीत सहकार्य उत्कृष्ट आहे मला या शालेविषयी खूप खूप अभिमान आहे असेच या सर्वांचे प्रगती होवो ही सदिच्छा

वाघमारे सुनिता संपत

पाटोळे सर गुरव सर मगदूम मॅडम देवळेकर मॅडम यांचे काम खूपच उत्कृष्ट आहे त्यानी शाळेत राबवलेले उपक्रम उल्लेखनीय आहेत मुली तर सकाळ पासून संध्याकाळपर्यंत अभ्यासात गुंग असतात पालकांचे सर्व बाबतीत सहकार्य उत्कृष्ट आहे मला या शालेविषयी खूप खूप अभिमान आहे असेच या सर्वांचे प्रगती होवो ही सदिच्छा

वाघमारे सुनिता संपत

पाटोळे सर गुरव सर मगदूम मॅडम देवळेकर मॅडम यांचे काम खूपच उत्कृष्ट आहे त्यानी शाळेत राबवलेले उपक्रम उल्लेखनीय आहेत मुली तर सकाळ पासून संध्याकाळपर्यंत अभ्यासात गुंग असतात पालकांचे सर्व बाबतीत सहकार्य उत्कृष्ट आहे मला या शालेविषयी खूप खूप अभिमान आहे असेच या सर्वांचे प्रगती होवो ही सदिच्छा

वाघमारे सुनिता संपत

9822349545

Urmila Bhikaya kirtankar

खरंच खुपच छान आहे हा लेख, हा लेख प्रत्येक उपक्रमशील, सृजनशील शिक्षकांना अध्यापन करण्यासाठी मार्गदर्शन करणारा आहे हा लेख.

SHRIKANT KRISHNA PATIL

अभिनंदन सर! आपल्या या कार्याला सलाम.

बि.लक्ष्मण

खूपच उत्तम .उपळब्ध साधनात चांगले अध्यापन करता येते . हे आपण दाखविले आहें . छान .

Dr.Ram Chatte

कृष्णात सर , सलाम तुमच्या जिद्दिला..मुलांचे शिकण सुरु राहावे यासाठी एका धेयवेड्या शिक्षकाचे प्रयत्न आम्हा सर्वांसाठी प्रेरणादायी आहेत. यासाठी आपले व आपल्या संपूर्ण टिमचे मनःपूर्वक अभिनंदन..या मध्ये पालकांनी आपल्यावर दाखविलेला विश्वास ही तेवढाच कौतुकास्पद आहे.

Dadasaheb Nawpute

कृष्णात सर खूपच सुंदर संकट काळात आपण खचून घरीच न बसता लेकरांच्या शिक्षणासाठी केलेली उपाययोजना मस्तच आहे. संकट तर मोठेच आहे. पण त्याचे तुकडे करून प्रत्येक तुकड्यावर( समस्येच्या)आपण यंपाय शोधलात. ही खूप म्हतवाची गोष्ट आपण केलीत. पालकांची मदत आपण मिळवलीत. सहकारी शिक्षकांना आपण सोबत घेतलं. आणि हे सर्व लेकरांच्या शिक्षणासाठी केलंत. ही गोष्ट मला फार भावली. तंत्रज्ञाची, तंत्रज्ञानाची मदत घेऊन परिपाठ चालू ठेवलात, ही खासच गोष्ट. एकूण तुमच्या कोरोना काळातील शिक्षणाला सलाम.

Nikalje Ashok Pachiram

व्वा दादा ! खूपच उपयुक्त आणि क्रियाशिल, आनंदादी उपक्रम राबवलेत आपण. नकळपणे मुलांना सहज करता येणारे आणि आवडणारे उपक्रम देवून मुलांचे स्वतः शिकणे चालू ठेवले. ग्रेट !

Hira pawar

सतत विद्यार्थ्यांसाठी काम करणाऱ्या शिक्षकांसाठी आपण राबवित असलेले उपक्रम प्रेरणादायी व मार्गदर्शक आहेत आपणा सर्वांचे हार्दिक अभिनंदन

Sharada devare

पाटोळे सर व सर्व सहकारी शिक्षक यांचे प्रथम अभिनंदन खूपच सुंदर असा उपक्रम

महादेव चौगुले

नमस्कार सर, कोरोना महामारीच्या काळात आपण शिकण्याचं व शिकवण्याचं नात घट्ट ठेवलतं.आपली धडपड व प्रयत्नास सलाम....!!!

Patole santosh

The education between corona lockdown is excellent

Aboli Kadam

मुलींच्या सर्वांगीण विकासाला प्रेरणा देणारे उपक्रम या 'शाळा बंद शिक्षण सुरू' या उपक्रामात पाटोळे सर आणि त्यांच्या सहकारी शिक्षकांनी राबवले गेले. या मुळे मुली पुस्तकी अभ्यासापुरत्या मर्यादित न राहता मुलींच्या सुप्त गुणांनाही वाव मिळाला. मलाही या मुलींच्या बरोबर Online संवाद साधताना त्यांच्यातील अनेक पैलू अनुभवायला मिळाले. हा उपक्रम अनेक शाळांना व शिक्षकांना प्रेरणादायी आहे. पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा

Abhijit kadam

सर, अतिशय स्तुत्य उपक्रम आहे. कोरोना काळातील हा उपक्रम अनेक शाळांना प्रेरणादायी ठरेल....

Pratiksha Devalekar

खरच सर ! आपल्या शाळेच्या तुम्ही सुचवलेल्या या उपक्रमामुळे खुप काही शिकायला मिळाले खुप आनंद होतोय, आपल्या शाळेच्या मुली शिक्षणापासून वंचित राहील्या नाहीत. तुमच्या कडून खूप काही शिकायला मिळाले. तुमच्या मार्गदर्शनाखाली असेच काम करण्याची संधी मिळो. अभिनंदन सर

Mahendra Murlidhar More

शिक्षण क्षेत्रातील नावीन्यपूर्ण उपक्रम राबविणाऱ्या सर्व शिक्षक मित्रांना पुढील कार्यासाठी हार्दिक शुभेच्छा व अभिनंदन

pentu maissnwad

16 मार्च लाच व्हाट्सएपचे गट तयार हे अफलातून आहे.

Nilesh R. Misal

अतिशय सुंदर नियोजन, तयारी, अन् उत्साह. कदाचित हीच खरी शाळेची संकल्पना असेल ज्यात मुख्याध्यापक संपुर्ण नियोजन व व्यवस्थापन करणार, शिक्षक सुविभधादाता व मार्गदर्शन करणार, पालक स्वत: शिक्षणात लक्ष घालणार; त्यांना आपापल्यापरीने शिकविणार, आणि विद्यार्थी या रर्वांसमक्ष शिकणार, स्वत: शिकत जाणार, सर्वगुणसंपन्नतेकडे वाटचाल करणार, अधिकाधिक सराव करणार, सर्जनशिल बनणार, नवनिर्मिती करणार, धडपडणार, तंत्रज्ञानाचा अधिकाधिक व योग्य वापर करणार, आपल्या स्वत:च्या कुवतीप्रमाणे, सवडीप्रमाणे, आवडीप्रमाणे, आणि स्वत: च्या गतीने शिकणार, क्रमिक शिक्षणाबरोबर विविध क्षेत्रांत प्रवेश करीत त्यातील ज्ञान आत्मसात करून आपला ठसा उमटवेल, जिथे अडचण असेल तेथे विद्यार्थी -पालक, शिक्षकाना विचारणार, म्हणजेच विद्यार्थी - पालक - शिक्षक व मुख्याध्यापक याॅच्यात सुसंवाद प्रस्थापित होणार, याचा फायदा विद्यार्थ्यांच्या शिक्षणाकरीता होणार, इ. ... हे सर्व होणार नव्हे याहीपेक्षा अजुन जे जे शक्य ते ते करणार पण विद्यार्थ्यांचे शिक्षण सुरूच ठेवणार. शिक्षण हे निरंतर, व सतत चालणारी प्रक्रीया आहे हे सिद्ध होणार. ही अद्भूत किमया आपण केली, नव्हे तर कोरोना महामारीच्या काळात ही शिक्षणाचे आव्हान स्विकारून आपण त्यावर यशस्वीरित्या व लिलया पेलले... हीच आपल्या कार्य-कर्तृृत्वाची खरी ओळख...... कदाचित हीच उद्याच्या Vertual जगाची Vertual शिक्षण पद्धती असेल. आपल्या कार्यास प्रणाम....... व शुभेच्छा....... ज्यांनी ही निबंधस्पर्धा आयोजित केली त्यांचेही विशेष आभार...... धन्यवाद

संतोष बबन भागवत

कोरोनाच्या संकट काळात शाळा बंद असल्या तरी आपण आपल्या विद्यार्थ्यांपर्यंत शिक्षणाची ज्ञानगंगा पोहचण्यासाठी राबवलेला उपक्रम अतिशय प्रेरणादायी व इतरांना मार्गदर्शक ठरेल असा आहे. कृष्णात पाटोळे सर , संतोष गुरव सर व इतर सर्व सहकारी शिक्षकांचे हार्दिक अभिनंदन व पुढील कार्यासाठी शुभेच्छा !

Deepali magdum

कोरोणा काळात तुमच्या मार्गदर्शनाखाली काम करताना खूप मजा आली. प्रत्येक उपक्रमातून सहकारी आणि मुली आनंदी होत गेल्या. नवे ज्ञान मिळत चालले आहे.खूप खूप धन्यवाद सर.

Subhash Naik

पाटोळे सरांचे मनापासून अभिनंदन आणि खूप खूप शुभेच्छा!

Rajendra Dargonda Patil

सन २०१९/२० या शैक्षणिक वर्षातील वार्षिक तपासणीच्या निमित्ताने पाटोळे सरांच्या समडोळी शाळेस भेट देण्याचा योग आला . मंत्रमुग्ध करणाऱ्या संगितमय परिपाठाने होणारी शाळेची सुरुवात दिवसभराच्या नियोजनबद्ध कामकाजासाठीची ऊर्जा देते.आपण स्वतः साहित्यिक आहात आणि हा वसा आपण आपल्या विद्यार्थीनींनाही दिला आहात. शाळा प्रगतीपथावर नेणेसाठी आपण व आपले सहकारी शिक्षक राबवित असलेले विविध उपक्रम निश्चितच वाखाणण्याजोगे आहेत.कोरोना काळात तुमच्यामधील हाडाचा शिक्षक तुम्हाला स्वस्थ कसा बसू देईल. या संकटाकडेही एक संधी म्हणून तुम्ही पाहिलंत आणि उपक्रमांचा धडाका लावलात.आपल्या व आपल्या सहकारी शिक्षकांच्या या कार्यासाठी खूप खूप अभिनंदन व शुभेच्छा.

विष्णू दाते (कांदिवली)

अतिशय स्तुत्य आणि प्रामाणिक प्रयत्न! स्पृहणीय कामगिरी, करोना/लाॅकडाऊनच्या काळातही शाळा चालु ठेवायचा निर्धार दिसून येतो!

सोनाली गोपाळराव कुंभार

प्रत्येक गोष्टीचा विचार,छान मांडणी, पुढील कार्यासाठी शुभेच्छा.

ज्ञानेश्वर बंगले

पाटोळे सर आणि सर्व टीमला सलाम आपल्या कर्तृत्वाचे वर्णन करणेस शब्द अपुरे आहेत. याहीपुढे निश्चित आपल्या कडून असेच काम होणार याची आम्हाला खात्री आहे आणि आमच्या कडून पुन्हा एकदा सलाम

Ravi

छान संतोष, मित्रा तुझे हे कार्य बघून खूप अभिमान वाटला,तुझे आणि तुझ्या स्टाफ चे मनःपूर्वक अभिनंदन

आयेशा नदाफ

धन्यवाद सर.आपलं कार्य खूप नियोजनबद्ध असते.आपणा सर्व टीमचे अभिनंदन .माझे नाव अवर्जून घेतल्याबद्दल धन्यवाद

Add Comment