डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन : तत्त्वज्ञ शिक्षक

डॉ. राधाकृष्णन यांचा जन्मदिवस (5 सप्टेंबर) शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो.

डॉ. राधाकृष्णन यांचा स्वातंत्र्य आणि लोकशाहीवर नितांत विश्वास होता. जे बलवान आहेत त्यांनीच सत्ता गाजवावी हे तर जनावरातही घडते. मग तसेच जर माणसांमध्येसुद्धा घडले तर मग माणसात व जनावरांमध्ये फरक काय? स्वतंत्रपणे विचार करण्याचा माझा हक्क गेला तर मग मी माणूस आहे याला काय अर्थ उरला. माणसाच्या माणूसपणाशी सुसंगत अशी रचना फक्त लोकशाहीच करू शकते असा त्यांचा विश्वास होता. पण या विश्वासाला धरून त्यांचा एक इशाराही होता. आपण माणूस तयार न करता लोकशाही राबवण्याचा प्रयत्न करतो आहोत. तीही अशा रीतीने की जे अर्धेमुर्धे माणूस आहेत त्यांनी माणसांप्रमाणे वागावे अशी अपेक्षा करीत आहोत. यामुळे स्वातंत्र्याचा आविष्कार बेजबाबदार व स्वार्थी वागणुकीत, अनिर्बंध वागणुकीत दिसू लागतो. यालाच सर्वांगीण भ्रष्टाचार असे म्हणतात. मग आपण लोकशाही रुजवणार कशी, हा त्यांनी आपल्यासमोर उपस्थित केलेला खरा प्रश्न आहे.

डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन हे भारताचे दुसरे राष्ट्रपती राहावे हा एक आश्चर्यकारक योग होता. ज्यांची विवेकबुद्धी त्यांच्या राजकारणावर कधीकधी मात करते असे राजकीय इतिहासातील राधाकृष्णन हे एक उदाहरण होय. पहिले राष्ट्रपती राजेंद्र बाबू आणि तिसरे झाकीर हुसेन. त्यांची बाब डॉ. राधाकृष्णन यांच्यापेक्षा निराळी होती. यानंतर क्रमाने सर्वश्री गिरी, फकरुद्दीन अली अहमद व नीलम संजीव रेड्डी हे राष्ट्रपती झाले. हे शेवटचे तीन राष्ट्रपती हा नेहमीच चालू असणाऱ्या राजकारणाचा भाग आहे. राजकीय जीवनाच्या परिघात राजकारण चालू असावे याला फार दोष देता येणार नाही. जिथे राजकारण नसावे तिथेही ते चालू असते, मग अशा वेळी जिथे राजकारण असतेच तिथे तर ते असणारच याबद्दल तक्रार तरी कशी करावी?

पहिल्या तीन राष्ट्रपतींची कहाणी थोडी निराळी आहे. जेव्हा भारत स्वतंत्र झाला व राष्ट्रपतींची निवड होण्याची वेळ आली त्यावेळी काँग्रेसश्रेष्ठी (हायकमांड) पुढीलप्रमाणे होत्या : सरदार पटेल, नेहरू, आझाद, राजगोपालाचारी आणि राजेंद्र बाबू. पैकी सरदार, पंडितजी व आझाद मंत्रिमंडळात असणार हे उघडच होते. राजगोपालाचारी गव्हर्नर जनरल होते. तेव्हा ह्यांनीच पहिले राष्ट्रपती व्हावे की संविधान सभेचे अध्यक्ष राजेंद्र बाबू ह्यांनी पहिले राष्ट्रपती व्हावे इतकाच प्रश्न होता. सरदार पटेलांचे मत राजेंद्र बाबूंच्या बाजूने होते. नेहरूंच्या इच्छेविरुद्ध राजेंद्र बाबू राष्ट्रपती झाले. पहिले राष्ट्रपती हे सात्त्विक, सज्जन, चारित्र्यसंपन्न म्हणून प्रसिद्ध होते. प्रत्यक्षात ते अतिशय कसलेले मुत्सद्दी होते. राजकारणी व संघटनेवर बळकट पकड असणारे नेते होते. स्वतंत्र युद्धातून तावून सुलाखून निघालेले देशभक्त होते. तिसरे राष्ट्रपती झाकीर हुसेन हे थोर शिक्षण शास्त्रज्ञ, चारित्र्यवान आणि आदरणीय असे गृहस्थ होते. राजकीय वजन त्यांना नव्हतेच. त्यांना संघटनेमध्येही स्थान नव्हते. जुने काँग्रेसमन व देशभक्त होते. स्वातंत्र्यपूर्व काळात अशी काही माणसे काँग्रेसने आपापल्यात गोळा केली होती जी राजकीय पक्षाची सभासद होती. चळवळ असेल तर सत्याग्रह करून ती सरळ जेलमध्ये जात. ही माणसे देशभक्त होती. नेत्याची निष्ठावंत अनुयायी होती. कोणत्याही त्यागाला तयार असत. ‘स्वातंत्र्यासाठी सांगाल ती किंमत देऊ.’ हे त्यांचे सूत्र. पण एरव्ही त्यांना राजकारणात रस नव्हता. ही सत्तेत व राजकारणात रस नसणारी काँग्रेसचीच माणसे होती. झाकीर हुसेन हे त्यापैकी एक होते.

झाकीर हुसेनांच्याविषयी सर्वांनाच आदर होता. त्यांचे एक उदाहरण सांगण्याजोगे आहे. विरोधी पक्षाच्या वतीने बाबू जयप्रकाश उभे राहावे असा प्रयत्न त्यावेळी जोरात चालू होता. जयप्रकाश म्हणाले, “विरोधी पक्ष काय काँग्रेससह सर्व पक्षांनी बिनविरोध जरी मला राष्ट्रपतीपद दिले तरी मी ते घेणार नाही. झाकीर हुसेन आमचेच उमेदवार आहेत.” त्यांच्याविरुद्ध न्या. सुब्रह्मण्यम उभे होते. ते म्हणाले, “झाकीर हुसेन जर अपक्षीय अगर सर्वपक्षीय उमेदवार म्हणून उभे राहणार असतील तर त्यांना आमचा पाठिंबा राहील.” आजकाल अशा बाबी घडणे फार कठीण झाले आहे.

डॉ. राधाकृष्णन यांची परिस्थिती याहून निराळी होती. ते कोणत्याही राजकीय पक्षांशी संबंधित नव्हते. सत्याग्रह, तुरुंग या बाबी त्यांच्या जीवनात नव्हत्या. म. गांधींशी त्यांचे संबंध होते. पण तेही देशावर प्रेम करणाऱ्या नागरिकांचे, राष्ट्रनेत्याशी आदराचे संबंध असावेत असे होते. कोणाशीही त्यांचे घनिष्ट व व्यक्तिगत संबंध नव्हते. राधाकृष्णन हे तत्त्वज्ञ म्हणून प्रसिद्ध होते. जगभर त्यांची तत्त्वज्ञ म्हणून प्रसिद्धी होती. काँग्रेसमधील शेकडो-हजारो लोक त्यांच्या ग्रंथाचे चाहते होते. स्वतः जवाहरलाल नेहरूच त्यांच्या लेखनाचे चाहते होते. पण त्यांचा काँग्रेस राजकारणाशी काही संबंध नव्हता. राजकीय नेते मधूनमधून त्यांना भेटत पण त्यांच्याशीही ते राजकारणावर कधी बोलत नसत.

त्यांच्या जीवनात प्रमुख प्रश्न तीन होते आणि कुणाशीही ते याच तीन प्रश्नांच्या अनुरोधाने बोलत. पहिला प्रश्न असा की, नीतिमान पण चिकित्सक, विज्ञानोन्मुख पण अध्यात्मप्रवण असा नवा माणूस कसा निर्माण करता येईल ? यादृष्टीने शिक्षणाचा काही उपयोग होऊ शकेल का? दुसरा प्रश्न असा होता की, प्राचीन भारतीय तत्त्वचिंतन सर्व जगाला आधुनिक भाषाशैलीत, आधुनिक पद्धतीने कसे समजावून सांगता येईल? उदा. न्याय दर्शनाला ‘लॉजिकल अॅनॉटानिझम’ म्हणावे की ‘लॉजिकल क्लॅरॅलिझम’ म्हणावे? भारतीय तत्त्वचिंतनाचे वैभव जगाला नेमकेपणाने कसे सांगावे? कसे पटवून द्यावे? तिसरा प्रश्न असा होता की मानवजातीचे भवितव्य घडवण्यासाठी सांस्कृतिक संचिताचा उपयोग किती? तत्त्वज्ञांसमोर तात्त्विक प्रश्न होते. वर्तमान व्यावहारिक प्रश्नात त्यांना फार रस नव्हता.

स्वातंत्र्याच्या उदयकाळी काँग्रेसचे श्रेष्ठ नेते राधाकृष्णन ह्यांच्याकडे गेले. त्यांना त्यांनी संविधान सभेचे सदस्य होण्यास पाचारण केले. आम्हाला तत्त्वज्ञ मार्गदर्शकाची गरज होती. त्यांना राजकारणात रस नव्हता. संविधान सभेत येण्यापूर्वी काही वर्षे ते प्राचार्य होते. नंतर बनारस विद्यापीठाचे ते कुलगुरू होते. प्रशासन त्यांनी सांभाळलेले होते. कौशल्याने सांभाळले होते. पण त्यांना त्यात रस नव्हता. क्षमता नसणे ही जीवनाची उणीव असते. पण क्षमता असूनही रस नसणे हा ऋषींचा स्वभाव असतो. राधाकृष्णनच्या रूपाने तत्त्वज्ञ राजा आपल्यापुढे उभा आहे हे नेहरूंनी जाणले. सरदार पटेल व नेहरूंचे फार थोड्यावेळी एकमत होई. त्यापैकी एक ठिकाण हे होते. या माणसाचा देशासाठी उपयोग करून घेता आला पाहिजे असे त्या दोघांनाही वाटे. म्हणून त्यांना रशियाचे वकील म्हणून पाठवण्यात आले. पुढे 10 वर्षे ते उपराष्ट्रपती होते. इ. स. 1962 मध्ये ते भारताचे राष्ट्रपती झाले. डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन हे असे राष्ट्रपती होते, ज्या माणसाचे राजकीय सामर्थ्य शून्य होते; संघटना, मुत्सद्देगिरी, डावपेच यात जो रस घेत नव्हता; पण त्याचे नैतिक वजनच एवढे मोठे होते की त्या सामर्थ्यासमोर नतमस्तक होण्यात सत्तेलाही आपला गौरव झाला आहे असे वाटे. दु:ख निराशेच्या क्षणी ज्याचा सहवास हेच एक मोठे सांत्वन होते असा हा आमचा राष्ट्रपती होता. राधाकृष्णन हे ऋजु स्वभावाचे म्हणूनच प्रसिद्ध होते. फटकळपणा, तुसडेपणा हा त्यांचा गुण नव्हता. पण त्यांचा सरळ साधा प्रश्नच कित्येकवेळा समोरच्या माणसाला सपाट करीत असे. एका मंत्र्याशी ते सॉक्रेटिसवर बोलत होते. सॉक्रेटिसचे असे एक मत आहे की, आपल्याला कोणकोणत्या विषयात काहीही कळत नाही हे नक्की माहीत असणे हे शहाणपणाचे लक्षण आहे. राधाकृष्णन उपराष्ट्रपती होते. त्यांनी मंत्र्याला विचारले, आपल्याला ज्या विषयात काही कळत नाही त्यांची यादी तुम्ही केली आहे का? मंत्री म्हणाले, यादी आहे पण अपूर्ण आहे. राधाकृष्णन म्हणाले, काही हरकत नाही. आपण दोघं बसून ती यादी पूर्ण करून टाकू.

नेहरू, राधाकृष्णन आणि राजेंद्र प्रसाद 

संकेत त्यांच्याकडून पाळले जातीलच याची खात्री नसे. सर्व संकेतांच्या पलीकडे असे त्यांचे व्यक्तिमत्त्व होते. त्यांनी संकेत मोडले तरी त्यांच्या मोठेपणाकडे पाहून त्याकडे दुर्लक्ष करणे भाग होते. जन्मभर ते असेच तत्त्वज्ञासारखे वागले. त्यात राजकीय संकेत डावलले गेले तरी त्यांनी दुर्लक्ष केले. संकेत मोडले जात तेव्हा बहुधा सत्यच त्यांच्या तोंडून बाहेर पडे. हा गृहस्थ निर्भयपणे सत्य बोलण्याचा संभव आहे याचीच अनेकांना जरब बसे. तोंडातून याबाबतच्या काही गोष्टी फार प्रसिद्ध आहेत.

डॉ. राधाकृष्णन एकदा सोव्हिएत रशियात भारताचे वकील होते. स्टॅलीनने एकदा त्यांना भेटीसाठी बोलावले. स्टॅलीन सामान्यपणे लोकांना भेट देत नसे. पण हा जगत्विख्यात तत्त्वज्ञ. त्यामुळे स्टॅलीनने त्यांना बोलावले. इकडच्या तिकडच्या औपचारिक बाबी बोलून झाल्यावर स्टॅलीन म्हणाले, “डॉक्टर, आपण रशियात आहातच तर रशियन जनतेने जी महान संस्कृती उभारली आहे तीही पाहून घ्या. नव्या भारताच्या उभारणीला आमच्या अनुभवाचा उपयोग होईल.” राधाकृष्णन म्हणाले, “महाराज, आकाशातून आपण पाखरासारखे उडू शकता व समुद्रात माशाप्रमाणे खोल वावरू शकता हे तर मला माहीतच आहे. पण पृथ्वीवर माणसांप्रमाणे वागायला शिकलात का?” तत्त्वज्ञाने हुकूमशहाच्या तोंडावर त्याच्या हुकूमशाहीचा निषेध नोंदवण्याचाच हा प्रकार होता. पण स्टॅलीनने हा फटका शांतपणे सहन केला. वकिलाने काय बोलावे या संकेताचा हा भंगच होता. पण तत्त्वज्ञाने काय बोलावे याच्याशी हा मुद्दा सुसंगत होता. इतर कुणी असे बोलले असते तर 24 तासांत रशियातून त्याची हकालपट्टीच झाली असती.

त्यांची व स्टॅलीनची अजून एक भेट प्रसिद्ध आहे. स्टॅलीन आजारी होता म्हणून तो अंथरुणावर निजलेला होता. राधाकृष्णन शेजारच्या कोचावर बसले होते. थोडीफार चर्चा झाल्यावर ते म्हणाले, आज तुमची प्रकृती बरी नाही. मी नंतर भेटेन आणि ते स्टॅलीनच्या जवळ गेले. त्यांच्या चेहऱ्यावरून हात फिरवत म्हणाले, “भल्या माणसा, थोडा विसावा घे. शरीराचे आजार हे असणारच, ते धैर्याने भोगावे. मनाच्या आरोग्याची काळजी घ्यावी.” स्टॅलीन म्हणाला, “त्यांचा हात किती वात्सल्य आणि मायेने भरलेला आहे!” आता हाही संकेतभंग होय! पण आजारी माणसाला तत्त्वज्ञ काय सांगणार ? राधाकृष्णननांच्या वत्सलतेला राष्ट्रसीमेची बंधने थोडीच होती.

ते राष्ट्रपती असताना झेकोस्लाव्हाकियाला गेले. तेथील संसदेसमोर त्यांचे व्याख्यान होते. व्याख्यानात ते म्हणाले, “जगभर शांतता नांदावी आणि मानवजातीचा उत्कर्ष व्हावा यावर तुमच्या आणि माझ्या राष्ट्राचे व जनतेचे एकमत आहे. पण प्रत्येक राष्ट्राचे काही निराळेपण असते. आम्ही असे मानतो की, संसदेचे काम शासनाचे तपासणी करून शासनावर वचक ठेवण्याचे आहे. तुमच्याप्रमाणे संसदेचे काम शासनाच्या सर्व कृतींवर शिक्कामोर्तब करणे एवढेच आहे असे आम्ही मानत नाही”' हा पुन्हा एक हुकूमशाहीला फटकाच होता. पाहुण्या राष्ट्रपतीने यजमानाचा असा अपमान करायचा नसतो. पण तो राधाकृष्णननी निर्भयपणे केला. प्रसिद्ध पत्रकार लुई फिशर या व्याख्यानाला हजर होते. त्यांनी म्हटले आहे, ‘त्यांचा आवाज स्पष्टपणाने व गंभीरपणाने निनादत होता. मात्र विजेच्या प्रचंड कडकडाटाने सर्वांनी सुन्न व्हावे तसा त्यांचा आवाज होता. क्षणभर मला वाटले, आपण टाळ्या वाजवून स्वागत करावे. पण पुन्हा वाटले ते बरे दिसणार नाही.’ झेकोस्लाव्हाकियाने वृत्तांत देताना ही वाक्ये गाळली, पण ते राष्ट्र गप्प बसले.. निषेध वगैरे काही केला नाही. कदाचित राधाकृष्णननी निषेधाच्या पत्राला असे उत्तर पाठवले असते. ‘बाळांनो, तुमचे पत्र मिळाले. तुमचे कल्याण असो. अरे खरे बोलण्यावर असे रागावू नये. अंतर्मुख होऊन चिंतन करावे. असो. सर्वांना आशीर्वाद.’ हीच त्यांची पद्धत होती.

इ.स. 1965 मध्ये भारत-पाक युद्धाच्या संदर्भात ते अमेरिकेला गेले. पाकिस्तान आक्रमक असूनसुद्धा अमेरिकेची सर्व सहानुभूती पाकिस्तानलाच होती. या वातावरणात हा दौरा झाला. राधाकृष्णन विमानतळावर पोहोचले. त्या वेळी पाऊस पडत होता. अमेरिकेचे अध्यक्ष विमानतळावर छत्री घेऊन आले होते. त्यांनी भारताच्या राष्ट्रपतींचे स्वागत केले. डोक्यावर छत्री धरली. अमेरिकेचे अध्यक्ष म्हणाले, “महोदय, निसर्गावर आमचा ताबा नाही. आपले स्वागत असो.!” राधाकृष्णन म्हणाले, “अध्यक्ष महाराज, निसर्गावर आपला ताबा नाही हे खरेच आहे. पण आपल्या भावना व बोलणे यावर तर आपण ताबा ठेवू शकतो. तेवढे केलेत तरी पुरे.”

राधाकृष्णन यांच्या अशा अनेक आठवणी सांगता येतील. त्या आपल्या देशातील आहेत तशा परदेशातीलही आहेत. ह्या सर्वच कथांमधून त्यांचे तत्त्वचिंतक व्यक्तिमत्त्व आणि सरळ व प्रांजळ मनच प्रकट होते. खरे म्हणजे भारतीय संस्कृतीत जे जे काही मधुर व मंगल आहे त्या सर्वांचा वारस लाभलेले ते व्यक्तिमत्त्व होते.

राधाकृष्णन यांचा विचार आपण तत्त्वज्ञ म्हणून करावा की शिक्षक म्हणून? कारण त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ देशभर शिक्षकदिन साजरा होतो. प्रथमदर्शनी हा प्रश्न वाटतो तेवढा उचित नाही. कारण जो शिक्षक असेल तो तत्त्वज्ञ असेलच याची खात्री नाही. पण जो तत्त्वज्ञ असतो तो मात्र शिक्षक असतोच. राधाकृष्णन असे समजत की, तत्त्वज्ञ हा दोघांचा शिक्षक असतो. प्रथमतः तो स्वतःचा शिक्षक असतो व नंतर तो दुसऱ्याचा शिक्षक असतो. त्यांच्या शिक्षणविषयक चिंतनातील अशा एका महत्त्वाच्या सूत्राचा उदय या ठिकाणी होतो. त्यांच्याविषयीच्या अनेक कथा ह्या आपल्या आनंदाचा व मौजेचा विषय आहेत. पण त्यांच्या विचारांचे स्वरूप मात्र असे नाही. गंभीरपणे आपण त्यांचे विचार समजून घेण्याची गरज आहे.


हेही वाचा : एखादी शाळा चांगली करणं म्हणजे युध्द जिंकणं! - नामदेव माळी


आधुनिक भारत ज्या मंडळींनी घडविला त्यांच्यात दोन परंपरा स्पष्ट दिसतात. पहिली प्राचीन भारताकडे अतीव प्रेमाने, ममतेने, गौरवाने पाहणाऱ्यांची परंपरा. तिला असे वाटते की, भारतीय संस्कृती ही जगातील सर्वश्रेष्ठ संस्कृती आहे. कालमानानुसार किरकोळ तपशील आपण सुधारून घेतले तर भविष्यकाळासाठी व राष्ट्राचे भवितव्य ठरविण्यासाठी ही संस्कृती पुरेशी उज्ज्वल आणि मार्गदर्शक आहे. तोंडाने भारतीय संस्कृतीचे हे गोडवे गात असतानाच किरकोळ तपशिलाच्या नावाने त्यांना आधुनिक भौतिक संस्कृतीच्या सर्व बाबी क्रमाने आत्मसात करण्याची इच्छा असते.

दुसरी परंपरा नव्या जगाचा आस्थेने विचार करणारी व आधुनिक विज्ञान, शास्त्रे, मूल्ये यांचा गौरवाने विचार करणारी आहे. भारताच्या भूतकाळात गौरव करण्यासारखे असे फारसे काही या मंडळींना दिसत नाही. तरीही परिस्थितीच्या दडपणाखाली येथील परंपरांचा विचार त्यांना करावाच लागतो. आधुनिक जगात प्रतिष्ठेने जगायचे असेल तर हजारो वर्षांपूर्वीचा भारतीय वारसा, नव्या जगाचे तंत्रज्ञान या दोघांचा समन्वय कसा करायचा असा त्यांच्यासमोर प्रश्न असतो.

या प्रश्नाकडे एका तत्त्वज्ञाच्या भूमिकेतून डॉ. राधाकृष्णन यांनी पाहिले आहे. ते म्हणतात, जगातील इतर राष्ट्रांना जसा त्यांचा स्वत:चा वारसा आहे, भारतालाही तसा स्वतःचा वारसा आहे. वारसा हा सर्वांना असणारच. या वारशाचे स्वरूप काय आहे? बऱ्यावाईट चालीरिती, धार्मिक कर्मकांड, सामाजिक, आर्थिक परिस्थिती हा सगळा आपला वारसाच आहे. हे सगळेच आपण सांभाळणार काय? आणि तुम्ही ज्याला नवे जग म्हणता त्यात नवे दोषी आहेत. नव्या जगाने निर्माण केलेल्या नव्या व्यथा आणि नव्या उणिवा हे ते दोन दोष आहेत. हे सगळेच नवे केवळ नवे आहे एवढ्याचसाठी आपण स्वीकारणार काय? राधाकृष्णन यांच्या मते नव्या-जुन्याचा वादच बरोबर नाही. भारतीय तत्त्वज्ञानाच्या परंपरेप्रमाणे त्यांनी सनातन प्रश्नांचा विचार केला आहे.

ते म्हणतात जिज्ञासा आणि चिकित्सा हे मानवी मनाचे कायम घटक आहेत. सर्वांच्याच ठिकाणी ही जिज्ञासू व चिकित्सक होण्याची क्षमता असते. पण या क्षमतेचा सार्वत्रिक वापर व उपयोग होण्यासाठी वाव नसतो. बहुतेकांची त्या क्षमतेचा वापर करण्याची इच्छा नसते. दुसरी बाब माणसात असणाऱ्या आध्यात्मिक प्रवृत्तीची आहे. या आध्यात्मिक प्रवृत्तीतून नीतीच्या सर्व कल्पना व श्रद्धा जन्माला येतात. या नैतिक कल्पनांच्यामुळे माणूस आपल्या जीवनाला अर्थ देतो. याही कल्पना जगभर आपल्याला दिसतात. एक नवा माणूस कसा घडवायचा की ज्याच्या आचरणात व मनात आध्यात्मिकता सहजधर्म म्हणून व्यक्त होत जाईल? त्याचप्रमाणे चिकित्सा व जिज्ञासाही सहजधर्म म्हणून त्याच्या ठायी वावरेल? चिकित्सा आणि नीति यांची पूर्ण संगती ज्याच्या जीवनात आहे असा नवा माणूस कसा निर्माण करता येईल हा खरा प्रश्न आहे.

हा माणूस निर्माण करण्यासाठी शिक्षण असावे लागते. असा माणूस निर्माण करणे व टिकणे उपयोगी ठरावे, ते शक्य व्हावे अशी समाजाची रचना व्हावी म्हणून सुधारणा असते. आपण स्वातंत्र्योत्तर काळात या दिशेने काय मिळवू शकलो असा प्रश्न डॉ. राधाकृष्णन स्वतःलाच विचारीत.

डॉ. राधाकृष्णन यांचा स्वातंत्र्य आणि लोकशाहीवर नितांत विश्वास होता. जे बलवान आहेत त्यांनीच सत्ता गाजवावी हे तर जनावरातही घडते. मग तसेच जर माणसांमध्येसुद्धा घडले तर मग माणसात व जनावरांमध्ये फरक काय? स्वतंत्रपणे विचार करण्याचा माझा हक्क गेला तर मग मी माणूस आहे याला काय अर्थ उरला. माणसाच्या माणूसपणाशी सुसंगत अशी रचना फक्त लोकशाहीच करू शकते असा त्यांचा विश्वास होता. पण या विश्वासाला धरून त्यांचा एक इशाराही होता. आपण माणूस तयार न करता लोकशाही राबवण्याचा प्रयत्न करतो आहोत. तीही अशा रीतीने की जे अर्धेमुर्धे माणूस आहेत त्यांनी माणसांप्रमाणे वागावे अशी अपेक्षा करीत आहोत. यामुळे स्वातंत्र्याचा आविष्कार बेजबाबदार व स्वार्थी वागणुकीत, अनिर्बंध वागणुकीत दिसू लागतो. यालाच सर्वांगीण भ्रष्टाचार असे म्हणतात. मग आपण लोकशाही रुजवणार कशी, हा त्यांनी आपल्यासमोर उपस्थित केलेला खरा प्रश्न आहे.

राष्ट्रपतीचे पद हे पाच वर्षांचे होते. नियमाप्रमाणे ते आले आणि गेलेही. पण डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचे व्यक्तिमत्त्व हे तत्त्वचिंतक म्हणून मात्र आहे तसेच स्थिर राहिले. त्यांचे विचार, चिंतन व त्यातून मिळणारे मार्गदर्शन आहे तसेच स्थिर आहे. काही काही शिक्षक हे केवळ वर्गातल्याच विद्यार्थ्यांचे शिक्षक असतात. समाजात त्यांचीच संख्या अधिक असते. यापुढे जाऊन काही काही शिक्षक मात्र आपल्या बरोबरच्या आणि अनेक भावी पिढ्यांचेही शिक्षक असतात. हे शिक्षकपण किंवा गुरुपद त्यांच्या खोल व तत्त्वनिष्ठ, तत्त्वचिंतक व्यक्तिमत्त्वामुळे निर्माण होत असते. डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन हे असे दुसऱ्या गटातील थोर आचार्य होते. त्यांच्या ऋषीतुल्य, तत्त्वचिंतक, तपस्वी व्यक्तिमत्त्वामुळे शिक्षक हे पद भूषणावह ठरले आहे. एखाद्या सामान्यच समजल्या गेलेल्या पदालाही त्यांच्या अंगभूत ज्ञाननिष्ठेमुळे, ज्ञानोपासनेमुळे व ज्ञानदानामुळे प्रतिष्ठा मिळाली आहे.

- नरहर कुरुंदकर 

(देशमुख अ‍ॅन्ड कंपनी पब्लिशर्स प्रा. लि. कडून प्रकाशित झालेल्या 'अन्वय' या पुस्तकात हा लेख समाविष्ट आहे)

Tags: Narhar Kurundkar Dr Sarvapalli Radhakrishnan Education शिक्षण शिक्षक दिन 5 सप्टेंबर व्यक्तिचित्रणे अन्वय देशमुख आणि कंपनी साधना प्रकाशन Load More Tags

Comments:

डाॅ. गोविंद दिगंबर कोकणे

लेख उत्कृष्ट आहे. खरोखरच विदयानभिमुख व अध्यात्मिक व्यक्ती घडवणे हे शिक्षण संस्था, विदयापीठाचे कार्य आहे. शाश्वत विकासासाठी तत्वज्ञान, साहित्य, व विज्ञान ह्या सर्व शाखांचे ज्ञान प्रतेक व्यक्तीला यश मिळविण्यासाठी आवश्यक आहे.

रेखा जोशी

मा. संपादक. नमस्कार. शिक्षकदिनानिमित्त पाठवलेला लेख अतिशय सुंदर आहे. याबद्दल धन्यवाद. लेख वाचून डॉ राधाकृष्णन यांच्याविषयी अधिक समजून घेणे जरुर आहे अशी उत्सुकता झाली आहे. आजही आपण लोकशाही पद्धतीस सामोरे जाण्यास अपुरे आहोत हे सत्य आहे. शिक्षणाशिवाय हे घडणे नाही. परंतु डॉना अपेक्षित अशी समाजनिर्मितीही अवघड आहे. डॉक्टरांचे विचार उच्च तात्विक आहेत. त्या दिशेने वाटचाल कशी करूत आपण असा प्रश्न समोर येतो.. मनःपूर्वक धन्यवाद.. रेखा जोशी

Add Comment