आपलं प्रत्येक पुस्तक पुरोगामी चळवळीला पूरक असावं, हेच माझं तत्त्व !

‘वाचन जागर’मधील प्रकाशकाची मुलाखत : 7

1 ते 25 नोव्हेंबर 2020 या कालावधीत मराठीतील दहा नामवंत पुस्तक प्रकाशकांकडून ‘वाचन जागर महोत्सवा’चे आयोजन महाराष्ट्रभरात करण्यात आले आहे. या प्रकाशनांच्या 250 वाचकप्रिय पुस्तकांवर प्रत्येकी 25 टक्के सवलत या महोत्सवात दिली जाणार आहे. महाराष्ट्रातील 23 शहरांतील मिळून 34 दुकानांमध्ये ही पुस्तके विक्रीसाठी उपलब्ध आहेत. या निमित्ताने मराठी प्रकाशनविश्वाचे अंतरंग जाणून घेण्यासाठी या दहाही प्रकाशकांशी साधलेला संवाद दहा दिवस ‘कर्तव्य साधना’वरून प्रसिद्ध होत आहे.

मनोविकास प्रकाशन गेल्या 36 वर्षांपासून पुस्तक विक्रीच्या आणि प्रकाशन व्यवसायात आहे. आजवर मनोविकासने एक हजारहून अधिक पुस्तके प्रकाशित केली आहेत. मानसशास्त्र, विज्ञान, आरोग्य, शिक्षण, अंधश्रद्धाविरोधी पुस्तके असे विविध विषय मनोविकास हाताळत आले आहे. कथा, कादंबऱ्या यांच्यासोबत थोरामोठ्यांची वेधक चरित्रे मनोविकासने प्रसिद्ध केली आहेत. लहान मुलांना कृतिशील बनवण्यासाठी अरविंद गुप्ता आणि इतर लेखकांच्या पुस्तकांच्या मालिका मनोविकासने प्रकाशित केल्या आहेत. 

विज्ञान विषयक पुस्तकांच्या मालिका हे मनोविकासचे आणखी एक वैशिष्ट्य. आनंद घैसास, बाळ फोंडके, अच्युत गोडबोले आणि दीपा देशमुख आदींच्या या विषयीच्या पुस्तक मालिकांनी सोप्या भाषेतील विज्ञानाचे नवे दालन वाचकांना उपलब्ध करून दिले. (अच्युत गोडबोले यांनी लिहिलेली अनर्थ, मनात, गणिती इत्यादी पुस्तकांचा खप तर प्रचंड झाला आहे.) रवी आमले यांची सध्या गाजत असलेली प्रोपगंडा आणि रॉ-भारतीय गुप्तचर संस्थेची गूढगाथा ही पुस्तकेही माहिती आणि मनोरंजनातून ज्ञान यांचा समतोल साधणारी. तर रावसाहेब कसबेंचे हिंदुराष्ट्रवाद, दत्तप्रसाद दाभोलकरांचे शोध स्वामी विवेकानंदांचा अशी चिकित्सा करणारी महत्त्वाची पुस्तकेही मनोविकासने प्रकाशित केलेली आहेत. या यादीत अलीकडेच भर पडली ती महाराष्ट्रातील महत्त्वाच्या सामाजिक कार्यकर्त्यांच्या कार्याचे दस्तऐवजीकरण म्हणता येतील अशा आत्मकथनाच्या पुस्तकमालिकेची. (पन्नालाल सुराणा, पुष्पा भावे आणि विजय विल्हेकर इत्यादी)

‘वाचन जागर महोत्सवा’च्या निमित्ताने मनोविकास प्रकाशनाचे संस्थापक अरविंद पाटकर यांच्याशी साधलेला संवाद...

प्रश्न - पुस्तक प्रकाशनामधला मनोविकासचा दृष्टिकोन काय आहे?
- मी मनोविकास सुरू केलं तेव्हा मुळातच माझी चळवळीची पार्श्वभूमी होती. पूर्ण वेळ कार्यकर्ता म्हणून मी भारतीय कम्युनिस्ट पक्षात काम करायचो... त्यामुळे विचारांची बांधिलकी पहिल्यापासूनच होती. प्रकाशन व्यवसाय सुरू करताना कोणत्याही परिस्थितीत जातीयवाद, अंधश्रद्धा निर्माण करणारी, धार्मिक तेढ निर्माण करणारी पुस्तकं प्रकाशित करायची नाहीत; समाजाचं एक पाऊल मागे पडेल अशी पुस्तकं छापायची नाहीत हे ठरलेलं होतं. 

मनोविकासची सुरुवातच लोकशाहीर कॉ. अण्णा भाऊ साठेंच्या लावणी, गाणी, पोवाडे एकत्र असलेल्या ‘शाहीर’ पुस्तकानं झाली. या पुस्तकाला प्रस्तावना आहे, आंतरराष्ट्रीय कीर्तीचे नेते श्रीपाद अमृत डांगे यांची. त्यानंतर आम्ही प्रामुख्यानं अंधश्रद्धा निर्मूलनावरची पुस्तकं प्रकाशित केली. विज्ञान, मानसशास्त्र, आरोग्य या विषयांवर आम्ही भर दिला. लहान मुलांसाठी पुस्तकं प्रकाशित केली. 

पुस्तकांमध्ये निरनिराळे विषय आले तरी आमची भूमिका तीच राहिली. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची काही पुस्तकं प्रकाशित केली. आंबेडकरी साहित्य प्रकाशित केलं.  आपल्याकडून प्रकाशित केली जाणारी जास्तीत जास्त  पुस्तकं पुरोगामी चळवळीला पूरकच असली पाहिजेत, हे माझं पहिल्यापासूनचं तत्त्व होतं. माझा मुलगाही ते आज पाळतो आहे.

प्रश्न - ‘आपल्या हातून हे काम झालं याचा खूप आनंद आहे...’ असं समाधान देणारे  कोणते पुस्तक प्रकल्प मनोविकासने राबवले? 
- पुस्तकं प्रकाशित करताना तुम्ही प्रकाशक आहात हे भान असायला हवं. याचं कारण एका लेखकाने मांडलेला विषय तुम्ही प्रकाशक म्हणून वाचकांसमोर घेऊन जाता. तो वाचकांना रुचेल की नाही हे प्रकाशक म्हणून तुम्हाला समजलं पाहिजे. प्रकाशकांचा नेमका इथेच कस लागतो. पण प्रकाशक असण्याचं भान बाळगलंत तर हे काम काहीसं सोपं होतं. 

लेखकाने मांडलेला विषय प्रकाशकाला भावला पाहिजे. त्या विषयाचा लेखकाचा अभ्यास, त्याचा आशय, त्याची मांडणी, लिहितानाची भाषा ही तुम्हाला प्रकाशक म्हणून आवडली पाहिजे, पटली पाहिजे. ते लेखन पुस्तकरुपाने प्रकाशित करण्याचं तुमच्या मनाने घेतलं पाहिजे. तरच तुम्ही प्रकाशक या नात्यानं पुस्तक निर्मितीचा विचार करू शकता. उदाहरणच द्यायचं झालं, तर नंदा खरे यांच्या “कहाणी मानवप्राण्याची’ या ग्रंथाचं देता येईल. विषय तसा जड आहे, पण नंदा खरे यांनी तो अत्यंत सोपा करून मांडला आहे. खरे यांचं ते वैशिष्ट्य आहे. त्यातूनच त्यांनी आपल्या लेखनाचा एक वाचकवर्ग तयार केला आहे. 

परंतु प्रकल्प म्हणून प्रकाशक जेव्हा एखाद्या ग्रंथाची निर्मिती करतो, तेव्हा नियमित वाचकांच्या पलीकडचा वाचकवर्ग मिळावा अशी अपेक्षा असते. त्यादृष्टीने असे ग्रंथ प्रकल्प राबवताना पुस्तकाच्या आशयाबरोबरच निर्मितीही तितकीच दर्जेदार असावी लागते. म्हणूनच कहाणी मानवप्राण्यांची हा ग्रंथ प्रकाशित करताना आम्ही प्रकाशक म्हणून त्याचा आकार, मांडणी, छपाई, कागद आणि अगदी बाइंडिंगचा देखील वेगळ्या पातळीवर जाऊन विचार केलेला होता. या बरोबरीनेच आतमध्ये विषयाला पूरक अशी रंगीत चित्रे द्यावीत असं ठरवलं. त्यासाठी ख्यातनाम चित्रकार वासुदेव कामत यांना भेटलो. ते पुस्तकासाठी म्हणून कधीच चित्रं काढत नाहीत. त्यांनी ती काढायची ठरवलीच तर मराठी प्रकाशकांना ती न परवडणारी असणार. तरीही आम्ही त्यांच्याकडे गेलो आणि हा विषय पुढे ठेवला.  त्यांना हा विषय आवडला आणि त्यांनी विषयाला अनुरूप अशी अत्यंत सुंदर चित्रे काढून दिली. तीही अल्प मानधन घेऊन. 

सांगायचा मुद्दा इतकाच की, काही महत्त्वाचे विषय वाचकांपुढे मांडताना न परवडणारी वाटही निवडावी लागते. संदेश भंडारे यांचं ‘वारी एक आनंदयात्रा’, चंद्रमोहन कुलकर्णी यांचं ‘कॉल ऑफ द सीज’ आणि मुकुंद संगोराम यांनी लिहिलेलं भीमसेन जोशी यांच्यावरील ‘ख्यालिया’, अशी अनेक वेगळ्या धाटणीची पुस्तकं आम्ही एक प्रकल्प म्हणून प्रकाशित केली. 'किरण पाणी' हे महावीर जोंधळे यांचं पुस्तक प्रकाशित करताना तर पुस्तकात उल्लेख आलेल्या गावाला भेट देऊन तिथं काढलेली चित्रं पुस्तकात वापरली आहेत. चंद्रमोहन कुलकर्णी, गिरीश सहस्त्रबुद्धे, महावी जोंधळे यांच्यासह मी आणि मुलगा आशिष असे सर्वजण बारा दिवस या दौऱ्यावर होतो. अशाच पद्धतीने संदेश भंडारे यांनी पंढरीची पायी वारी केली आणि त्यातून त्यांचं वारी एक आनंद यात्रा हे पुस्तक जन्माला आलं. त्याचप्रमाणे चंद्रमोहन कुलकर्णी यांच्या पुस्तकाची निर्मिती करताना लेखक-प्रकाशक या दोघांनी मिळून कोकण किनारपट्टी पालथी घातली. ख्यालियाच्या वेळी सतीश पाकणीकर यांनी काढलेले फोटो आणि मुकुंद संगोराम यांचं लेखन असा मेळ जुळून आणला होता. इतकंच नाही, तर या पुस्तकासाठी अत्यंत महागडा परंतु वेगळ्या प्रकारचा कागद बाहेरून मागवला होता आणि त्यावर ते प्रकाशित केलं होतं. 

एखाद्या पुस्तकावर अशी एवढी मोठी मेहनत न परवडणारी आहे. तरीदेखील पुस्तकाची गरज म्हणून प्रकाशकाने ती घेतली पाहिजे. आम्ही ती घेतो.  

 

प्रश्न - नवीन लेखकांची पुस्तकं करतानाचा अनुभव कसा असतो?
- नवीन लेखक दोन प्रकारचे असतात. एक आपल्या नावावर एखादं पुस्तक असावं असा विचार करून लिहिणारे आणि दुसरे चांगलं लिहू शकणारे, परंतु पुस्तक रुपात त्यांचं काहीही न आलेले असे असतात. अशा दोघांचाही विचार करता प्रकाशकाला त्यांची पार्श्वभूमी बघणं आवश्यक ठरतं. म्हणजे एखादा नवोदित लेखक आयुष्यात करतो काय? त्याच्याकडे जगण्याचे नेमके कोणते अनुभव आहेत? एखाद्याचं कामच एवढं मोठं असतं की ते पुस्तक रुपात आलं तर वाचकांना नवं प्रेरणादायी काही देता येऊ शकतं. असं काही आहे का? या दृष्टीने नव्या लेखकांकडे बघावं लागतं. काहीची लेखनशैली चांगली असते, पण मांडणीत दम नसतो. काहींना लेखन जमत नाही, पण त्यांच्याकडे सांगण्यासारखं खूप असतं. तेव्हा अशा लेखकाचा विचार प्रथम होतो. त्यातूनच डॉ. राजेंद्र बर्वे यांचं झोपेवरच पहिलं पुस्तक ‘तुमची झोप तुमच्या हाती’ हे आम्ही काढलं. श्याम मानव यांचं अंधश्रद्धा निर्मूलनातलं काम मोठं आहे. पण सुरूवातीच्या काळात वर्तमानपत्रातून किंवा मासिकांतून ते लिहीत. आम्ही त्यांचं 'शोध भानामतीचा' हे पहिलं पुस्तक प्रकाशित केलं. त्याच पद्धतीने 'बराक ओबामा- सक्सेसचा नवा पासवर्ड' हे संजय आवटे यांचं पहिलं पुस्तक केलं.  अशा अनेकांची पहिली पुस्तकं प्रकाशित करून आम्ही त्यांना लेखक म्हणून पुढे आणलं. त्यात अतुल कहाते आहेत, प्रसाद नामजोशी आहेत. त्याचप्रमाणे नीलांबरी जोशी, दीपा देशमुख, डॉ. संज्योत देशपांडे या लेखिका आहेत.  

आत्ताच आम्ही ‘फकिरीचे वैभव’ हे विजय विल्हेकर यांचं पुस्तक काढलं. हे विदर्भातले, शेतकरी संघटनेचे एक चांगले कार्यकर्ते. शरद जोशींसोबत काही वर्षं त्यांनी काम केलेलं आहे. त्यांचे अनुभव भन्नाट होते... पण ते शब्दबद्ध केलेले नव्हते. गेली चार वर्षं त्यांच्या मागे लागून आम्ही ते पुस्तक लिहून घेतलं. वैशिष्ट्य म्हणजे पहिल्या पंधरा दिवसांत त्याची पहिली आवृत्ती संपली. विजय विल्हेकरांच्या वागण्यात जो खरेपणा आहे तो त्यांच्या लेखनातही आहे. ही फार महत्त्वाची गोष्ट आहे असं मला वाटतं. 

सांगायचा मुद्दा इतकाच की, लेखक घडवण्याची प्रक्रिया सातत्याने करावी लागते, तरच नवनवे लेखक पुढे येत राहतात. त्यातून नवनवे विषयही पुढे आणता येतात. खरं तर ही एकूणच प्रक्रिया प्रकाशकाच्या दृष्टीने आनंद देणारी अशी आहे. 

प्रश्न - आपापल्या क्षेत्रातल्या तज्ज्ञ व्यक्तींच्याकडे सांगण्यासारखं खूप असतं, चांगले अनुभव असतात... पण म्हणून ते चांगल्या पद्धतीनं कागदावर उतरवू शकतीलच असं नाही. अशा वेळी प्रकाशकाची काय भूमिका असते?
- एखादा महत्त्वाचा विषय वाचकांसमोर यावा असं मनापासून वाटलं, तर प्रकाशकाने त्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे. यात लिहू न शकणाऱ्या माणसाला लेखनिक देता येतो. त्यानं बोलावं आणि ते रेकॉर्ड करून घ्यावं असाही पर्याय आहे तो वापरला पाहिजे. काहीजण जमेल तसं लिहून द्यायला तयार होतात. अशा संहितेवर स्वतंत्र संपादक नेमून त्यावर संस्कार करून घेण्याचं कामही प्रकाशकाने केलं पाहिजे. मुलाखतीच्या स्वरुपातही असे विषय पुढे आणता येतात. तेही प्रकाशकाने केलं पाहिजे. 

मनोविकास असे सर्व पर्याय वापरते आणि जे चांगलं आहे, महत्त्वाचं आहे ते वाचकांपुढे ठेवण्याचा सातत्याने प्रयत्न करते. त्याच प्रयत्नातून ‘लढे आणि तिढे – चिकित्सक गप्पा... पुष्पाबाईंशी’ हे आत्मकथन आम्ही मुलाखतीच्या स्वरुपात नुकतंच प्रकाशित केलं आहे. विशेष म्हणजे त्याला अत्यंत चांगला प्रतिसाद लाभत आहे. यापूर्वी प्रकाशित केलेलं ‘द्रष्टा अणुयात्रिक’ हे डॉ. अनिल काकोडकर यांचं चरित्र अशाच पद्धतीने केलं. अनीता पाटील या नवख्या लेखिका. त्यांच्याकडे हे लेखन सोपवलं. कारण डॉ. काकोडकर यांच्याशी बोलून ते करायचं होतं. त्यात अनीता पाटील यांच्या भावाचं, आईचं आणि सासूबाईंचं आजारपण आलं. ते सांभाळून लिखाण करणं अवघड होतं. तरीदेखील त्यांना धीर देत हे काम प्रकाशक या नात्यानं त्यांच्याकडून करून घेतलं. त्याला डॉ. काकोडकरांनीही भरपूर वेळ दिला. त्यातून एक महत्त्वाचं चरित्र वाचकांपुढे येऊ शकलं. 

याच पद्धतीने चंद्रकांत वानखडेंचं ‘गांधी का मरत नाही' हे पुस्तक आम्ही प्रकाशित केले. महाडमधील साने गुरूजी स्मारकात मी एका शिबिराचं आयोजन केलं होतं. त्यात वानखडे यांचं गांधी या विषयावर एक व्याख्यान ठेवलं होतं. त्यावेळी ‘गांधी का मरत नाही’चा विषय क्लिक झाला. त्या व्याख्यानानंतर आम्ही त्यांच्या मागे लागलो. या विषयावर त्यांनी अनेक व्याख्यानं दिली. त्या प्रत्येक ठिकाणी त्यांचे चाहते पुस्तकाची मागणी करत होते. एका चाहत्याने तर पुस्तक लिहिण्यासाठी जळगावच्या गांधी तीर्थ येथे राहण्याची-जेवणाची व्यवस्था केली. आम्हीही प्रकशक या नात्याने त्यांच्याकडे या पुस्तकाचा चार वर्षे पाठपुरावा केला आणि ते पुस्तक तयार करून घेतलं. ‘गांधी का मरत नाही’ची पहिली आवृत्ती 2019च्या ऑक्टोबरमध्ये आली. लॉकडाऊनमध्ये त्याचा खप थोडा कमी झाला, पण तरीही आता एक वर्षाच्या आत आम्ही त्याची चौथी आवृत्ती काढतोय.

विषय हेरून, माणसांची पारख करून प्रकाशकाला सातत्याने नवनव्या विषयांच्या मागे लागलं पाहिजे. त्यातूनच चांगली पुस्तकं पुढे येतात. विदर्भातले एक लेखक आहेत... संतोष आरसोड त्यांचं नाव. गाडगेबाबांवर प्रचंड काम आहे त्यांचं, खूप अभ्यास आहे. मी गेली सहासात वर्षं त्यांच्या मागं लागलो... त्यांनी पुस्तक लिहावं म्हणून... ते अजिबात मनावर घेत नव्हते... पण लॉकडाऊनच्या 22 दिवसांच्या काळात त्यांनी गाडगेबाबांचं चरित्र वैचारिक दृष्टीनं इतकं सुंदर लिहून काढलं... मात्र त्यांनी ते लिहावं म्हणून त्यांच्यावर दबाव टाकण्याचं काम आम्हाला सातत्यानं करावं लागलं. त्याचा फायनल रिझल्ट तुम्हाला थोडे दिवसांत वाचायला मिळेल. फेब्रुवारीमध्ये गाडगेबाबांची जयंती असते... तेव्हा ते प्रकाशित करण्याचा आमचा प्रयत्न आहे.

आमच्याकडे काही लेखक असेही आहेत, जे स्वतःच उत्तम असे नवनवे विषय घेऊन येतात. त्यावर दर्जेदार लेखनही करतात आणि आम्ही ती पुस्तकं प्रकाशित करतो. यात नंदा खरे, अच्युत गोडबोले, अतुल देऊळगावकर, उत्तम कांबळे अशा आघाडीच्या लेखकांचा समावेश होतो. अच्युत गोडबोले हे नवे विषय शोधताना त्यावर जगभरातलं साहित्य गोळा करतात. अनेक पुस्तकं स्वतः खर्च करून रेफरन्ससाठी मागवतात. त्याचा अभ्यास करतात आणि मग विषय पुस्तकरूपात आणतात. त्याचप्रमाणे नंदा खरे एकेका विषयासाठी कितीतरी मोठी मेहनत घेतात. त्यांचं 'दगड-धोंडे' हे पुस्तक आम्ही प्रकाशित केलं आहे. त्यासाठी ते विदर्भातले काही जिल्हे अक्षरशः पायी फिरले. शिवाय जीवाश्म, पुरातत्वशास्त्र याचा अभ्यास केला आणि त्यातून त्यांनी एक वेगळा विषय अत्यंत सोप्या भाषेत वाचकांसमोर ठेवला. उत्तम कांबळेही सातत्याने फिरत असतात. त्यातून त्यांचं लेखन घडत जातं. त्याचप्रमाणे अतुल देऊळगावकर पर्यावरणाचा सातत्याने अभ्यास करत नवनवे विषय घेऊन पुढे येतात. 

अशा मेहनती, अभ्यासू लेखकांना प्रकाशकांची जशी साथ गरजेची असते, तशी साथ प्रकाशकांना लेखक-वाचकांची मिळाली पाहिजे. कारण परस्पर सहकार्यातून आणि भक्कम साथीतून चांगलं काही घडू शकतं. मनोविकास त्यादृष्टीने प्रयत्न करत राहातं.  

प्रश्न - प्रकाशन व्यवसायाचा परीघ विस्तारण्यासाठी कोणते बदल व्हायला पाहिजेत असं तुम्हाला वाटतं?
- खरं तर प्रकाशन व्यवसायाचा परीघ विस्तारतो आहे. याचं कारण सर्वच अर्थाने जग बदलत आहे. नवं तंत्रज्ञान तुम्हाला ग्लोबल बनवत आहे. त्यातून जीवनशैलीत झपाट्याने बदल होत आहेत. या साऱ्या पार्श्वभूमीवर विषयांची व्याप्ती वाढत आहे. कथा-कविता-कादंबऱ्यांपासून माहितीपर पुस्तकांपर्यंत विषयांमध्ये विविधता येत आहे. त्यातून इतर क्षेत्रांप्रमाणेच प्रकाशन व्यवसायाचा परीघही विस्तारत जाणार आहे. अशा पार्श्वभूमीवर प्रकाशक आणि लेखक बदलला पाहिजे. पण अद्यापही ते फार घडताना दिसत नाही. 

एकूण वैज्ञानिक, तांत्रिक बदल लक्षात घेतले, तर लेखकांनीही बदललं पाहिजे. जुने विषय, जुन्या पद्धतीने मांडून आता चालणार नाही. नवे विषय नव्या पद्धतीने हाताळावे लागतील. त्यासाठी नवी तंत्रे आत्मसात करावी लागतील. इंटरनेटसारख्या साधनांचा जबाबदारीने वापर करत योग्य ती माहिती ज्ञानाच्या रुपात पुस्तकातून मांडली पाहिजे. त्यासाठी विषयाला भिडत अभ्यास केला पाहिजे. त्या त्या विषयातलं नवं संशोधन, नवा अभ्यास काय आहे याबाबत स्वतःला सतत अपडेट ठेवलं पाहिजे. तर आणि तरच नवे विषय, चांगल्या पद्धतीने वाचकांसमोर आणता येतील. 

लेखकांप्रमाणेच प्रकाशकांनीही सर्व बदल आत्मसात करत नव्या तंत्रयुगाशी स्वतःला जोडून घेतलं पाहिजे. खरं तर त्यादृष्टीने किमान प्रशिक्षण ही प्रकाशकासाठीची पहिली अट असली पाहिजे. जगभरात होणारे बदल, आपल्या वाचकांना नेमकं काय हवं याचा अंदाज येण्यासाठी आवश्यक अभ्यास त्याशिवाय करता येणार नाही. कारण तो असल्याशिवाय विस्तारणाऱ्या परीघात आपल्याला जाता येणार नाही. किंवा आपला परीघ विस्तारता येणार नाही. कारण प्रकाशक नव्या बदलांविषयी अनभिज्ञ असेल, तर तो लेखकांकडून हवं ते कसं काढून घेणार? पुस्तक निर्मितीच्या पातळीवरही नवे प्रयोग करण्यासाठी आवश्यक ज्ञान, बदल त्याला टिपता आले पाहिजेत. त्यादृष्टीने प्रकाशकानेही आपल्या कक्षा रुंदावण्याची गरज आहे.    

या सगळ्याच्या पलीकडे पुस्तक विक्रीची एक व्यवस्था आहे आणि त्यातही आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर अपरिहार्य आहे. कारण सध्याच्या टक्केवारीच्या व्यवस्थेत परीघ विस्ताराला बिलकूल वाव नाही. लेखक, विषय, निर्मिती अशा सगळ्या पातळ्यांवर चांगलं पुस्तक काढणाऱ्या आमच्यासारख्या प्रकाशकांची पुस्तकं ग्रंथालयांच्या टक्केवारीमध्ये बसत नाहीत. आम्हाला खरा आधार वैयक्तिक वाचकांचाच आहे. परंतु स्वतः सगळी पुस्तकं विकत घेण्याइतकी उत्तम परिस्थिती प्रत्येक वाचकाची असतेच असं नाही. अशा वाचकांना, विद्यार्थ्यांना ग्रंथालयांचा खरा आधार असतो... त्यामुळं चांगल्या दर्जाची पुस्तकं ग्रंथालयात जायलाच हवीत असं मला वाटतं. 

आता काही ग्रंथपाल स्वतः चांगले वाचक आहेत. ते टक्केवारीकडं न बघता चांगली पुस्तकं भरतात. हांऽ पण अशा ग्रंथपालांचं प्रमाण कमी आहे. ते वाढायला हवं, आपली ग्रंथालयं समृद्ध व्हायला पाहिजेत असं मला वाटतं. कारण तरच वाचक ग्रंथालयाकडे जातील. या दृष्टीने शासनानेही पुढाकार घेत किमान दोन गोष्टी कराव्यात. पहिली गोष्ट तज्ज्ञांची एक कमिटी नेमावी. त्या मार्फत दर तीन महिन्यांतून एकदा नव्यानं आलेल्या चांगल्या पुस्तकांची एक यादी तयार करावी. या यादीतली पुस्तकं शासनमान्य ग्रंथालयांनी विकत घ्यावीत अशी शिफारस करावी. दुसरी बाब म्हणजे महाराष्ट्रभरात पुस्तक विक्रीचं एक जाळं उभं राहण्याच्या दृष्टीने पुढाकार घ्यावा. म्हणजे प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयात तसेच बस स्थानकात किमान एक पुस्तक विक्रीचं दुकान सुरू करावं किंवा तशी जागा उपलब्ध करून द्यावी. आणि त्याद्वारे शासनाकडून प्रकाशित होणाऱ्या पुस्तकांसह कमिटीने शिफारस केलेल्या पुस्तकांची तसेच शासनाचा पुरस्कार प्राप्त पुस्तकांची प्रामुख्याने विक्री होईल अशी व्यवस्था करावी. असे काही प्रयत्न झाले, तर मराठी प्रकाशन व्यवसायाचा परीघ निश्चितपणे विस्तारेल.

याचं कारण माध्यमं बदलली असली तरी अजूनही छापील पुस्तकांना प्राधान्य आहे. मुळात पुढच्या पिढ्यांनी वाचावं असं मला वाटतं. मग ते त्यांनी कशावरही वाचलं तरी चालेल. 

प्रश्न - तुमच्या पुढच्या पिढीविषयी काय सांगाल?
- मनोविकासचा पैसे कमावणं हा अंतिम उद्देश नसून विचार पोहोचवणं हा आहे. त्यमुळे सरसकट कोणतेही विषय मनोविकासने स्वीकारलेले नाहीत. विशेषतः अंधश्रद्धा पसरवणारे, धार्मिक भावना भडकवणारे विषय जाणीवपूर्वक आम्ही टाळले आहेत. आज माझ्याबरोबरच मुलगा आशिष आणि सून रीना मनोविकासचं काम पाहतात. विशेष म्हणजे या दोघांनीही मनोविकासची तत्त्वं स्वीकारलेलीच आहेत. धार्मिक, अध्यात्मिक तसेच ज्योतिषविषयक पुस्तकांत जास्त पैसे मिळतील म्हणून ती काढूया, असा विचार ते करत नाहीत. किंबहुना याबाबतीत माझ्यापेक्षा ते एक पाऊल पुढे आहेत, असं मी म्हणेन. 

नव्या पिढीला विविध धर्म नेमकेपणाने समजावेत म्हणून मुलांसाठी एक पुस्तकमाला त्यांनी लिहून घेतलेली आहे. धर्माविषयी मुलांमध्ये चुकीचे संदेश जातात. त्यांना स्वतःच्या आणि इतरांच्या धर्माची विवेकवादी ओळख करून देण्याचा त्यांचा उद्देश आहे. मध्यंतरी  एक व्याख्यानमाला झाली होती. तिच्यात निरनिराळे विचारप्रवाह मांडले गेले होते. जसे की आंबेडकरी विचार, गांधी विचार, मार्क्सवाद, बुद्ध विचारप्रवाह. त्याचं पुस्तक करून घेण्यासाठी आशिष काम करतोय. 'गांधी का मरत नाही', 'भक्ती-भीती-भास' ही पुस्तकंही आशिषने याच विचारातून प्रकाशित केली आहेत. मी अंधश्रद्धा निर्मूलनापर्यंत काम केलं. त्याच्या एक पाऊल पुढे जाऊन आशिष सध्या काम करतोय. इतकंच नाही, तर जगभरातली चांगली पुस्तकं मराठीत यावीत असाही त्याचा प्रयत्न आहे. त्यातूनच नोबेल पारितोषिक प्राप्त अर्थतज्ज्ञ अभिजित बॅनर्जी यांचं एक पुस्तक मनोविकास लवकरच मराठीत आणत आहे. 

प्रश्न - ‘वाचन जागर महोत्सव’ किती महत्त्वाचा आहे आणि वाचकांचा प्रतिसाद कसा मिळतोय?
- चांगली पुस्तकं वाचकांपर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने वाचन जागर महोत्सवासारखे उपक्रम खूपच महत्त्वाचे ठरतात. याचा अनुभव आम्ही घेत आहोत. यात जास्तीत जास्त प्रकाशक सहभागी झाले पाहिजेत आणि सातत्याने असे उपक्रम राबवले पाहिजेत. कारण वाचकांचीही ती गरज आहे हे वाचन जागर महोत्सवाला त्यांच्याकडून मिळणारा प्रतिसाद बघता लक्षात येतं. वाचकांसह प्रकाशक-विक्रेते यांच्यासाठी ही एक पर्वणी आहे. त्याचा लाभ घेण्यासाठी असे नवनवे उपक्रम प्रकाशक-विक्रेते यांनी एकत्र येऊन राबवले पाहिजेत असं वाटतं. 

(मुलाखत आणि शब्दांकन – मृद्‌गंधा दीक्षित)


वाचन जागर महोत्सव - 250 वाचकप्रिय पुस्तकांवर प्रत्येकी 25 टक्के सवलत - पुस्तकांची यादी 


हेही वाचा - ‘वाचन जागर’मधील प्रकाशकांच्या मुलाखती :

अभिजात साहित्य मराठीत आणण्याकडे कल असला पाहिजे !  - अरुण जाखडे

डिजिटलच्या जमान्यात प्रकाशकांना बदलावेच लागेल! - साकेत भांड

प्रकाशकानं असमाधानी असायलाच पाहिजे! - प्रदीप चंपानेरकर

अलीकडच्या काळातील बहुतांश लेखक दोन- तीन पुस्तकांतच संपून जातात! - अशोक कोठावळे 

मराठीत संदर्भग्रंथ उपलब्ध करून द्यायचे हा उद्देश सुरुवातीपासूनच होता ! - दत्तात्रय पाष्टे

चिरस्थायी स्वरूपाचं काम आपल्याकडं व्हायला पाहिजे ! - मिलिंद परांजपे

Tags: मुलाखत वाचन जागर महोत्सव मनोविकास प्रकाशन अरविंद पाटकर मराठी प्रकाशन विश्व प्रकाशन संस्था ग्रंथ साहित्य मृद्‌गंधा दीक्षित Interview Vachan Jagar Mahotsav Manovikas Prakashan Arvind Patkar Marathi Publication World Marathi Literature Publication Books Mrudgandha Dixit Load More Tags

Comments:

संजय मेश्राम, पुणे

मोजक्या शब्दांत प्रवास छान उलगडून दाखवला. स्पष्ट विचार मांडले. प्रकाशन हा व्यवसाय असला तरी ती पुरोगामी चळवळ आहे, या भूमिकेतून आपण महत्वाचे काम करीत आहात. मनोविकासच्या पुढील प्रवासाला शुभेच्छा!

विष्णू दाते

मनोविकास प्रकाशनाने प्रकाशित केलेली पुस्तके वेगळ्या आणि जाणत्या विषयांवरील आहेत! प्रकाशक अरविंद पाटकर ह्यांचे विचारही प्रगल्भ आहेत!

अरुण कोळेकर , शरदचंद्रजी पवार महाविद्यालय जेजुरी.

स्व:ताची वेगळी वाट चोखाळून मनोविकास प्रकाशनाच्या क्षेत्रात एक नवा मानदंड निर्माण करीत आहे. प्रकाशकाची असणारी भूमिका किती महत्त्वाची आहे .ही सांगणारी मुलाखत आवडली. आपणांस शुभेच्छा वा अभिनंदन.

Add Comment

संबंधित लेख