काँग्रेसचे आणि काँग्रेसच्या प्रादेशिक मित्रपक्षांचे इंडिया आघाडीत वर्चस्व होते आणि आहे. उदाहरण म्हणून बिहारमध्ये राष्ट्रीय जनता दल, उत्तर प्रदेशात समाजवादी, महाराष्ट्रात शिवसेना आणि पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस, त्यामुळे आपच्या आवाजाला, वेगळेपणाला फारसा प्रतिसाद नव्हता. त्यांची स्वतंत्र ओळख जपण्याची कुणी तसदी घेणारे कार्यकर्ते किंवा नेते नव्हते. ‘डिसरप्टर’ केजरीवाल यांचं असणं आणि वागणं जणू बंदिस्त झालं होतं. आप आता आघाडीतून बाहेर पडल्यावर मात्र त्यांना एक महत्त्वाचा फायदा मिळेल. पक्षाला पुन्हा माध्यमांतील स्वतंत्र स्पेस मिळेल, जिथे आपची मते, भूमिका आणि धोरणं ही काँग्रेस किंवा इतर पक्षांच्या सावलीत न राहता स्वतंत्रपणे प्रसारित होतील.
अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वात आम आदमी पक्ष (आप / AAP) एकेकाळी भारतीय राजकारणात एक ‘डिसरप्टर’ (व्यवस्था हादरवून टाकणारा) म्हणून उदयास आला होता. हा पारंपरिक पद्धतीच्या जातीच्या, धर्माच्या राजकारणाच्या विरोधात बोलणारा, भ्रष्टाचाराविरोधी लोकचळवळीतून उभा राहिलेला, डिजिटल युगातला आणि ‘आम आदमी’साठी काम करणारा असा नवा राजकीय प्रयोग होता. त्याला सोशल मीडियाच्या साह्याने तरुणांत देखील स्थान मिळवता आले होते, आणि तेही अतिशय कमी काळात.
आज 11-12 वर्षांनंतर आपचा प्रवास एका वेगळ्या वळणावर आला आहे. INDIA आघाडीमधून बाहेर पडण्याची घोषणा, ही केवळ ह्या आघाडीतील मतभेद दाखवून देणारीच नाही, तर हा एक प्रकारचा राजकीय पुनरुज्जीवनाचा, शोध घेण्याचा एक टप्पा वाटावा अशी शक्यता आहे.
मागील काळात आपमधील अनेक ज्येष्ठ नेत्यांना अंमलबजावणी संचालनालय (ED) ,CBI यांच्याकडून अटक झाली ,काहींनी पक्ष सोडला ,काहींनी भाजप किंवा काँग्रेस मध्ये जाणे सयुक्तिक समजले. मनीष सिसोदिया, सत्येंद्र जैन, संजय सिंग, गोपाल राय हे नेते पक्षाबाहेर पडले आणि त्यासोबतच पक्षाचं निर्णय घेणारं, लोकांना माहीत असलेलं नेतृत्व दूर गेलं. दुसऱ्या फळीतील मजबूत नेतृत्व तयार करण्यात पक्षाला अपयश आलं, सौरभ भारद्वाज, आतिशी, राघव चड्ढा हे काही चेहरे अपवाद होते पण त्यांची व्याप्ती मर्यादित, म्हणजे अगदी स्पष्ट सांगायचे तर टीव्ही पुरतीच मर्यादित राहिली आहे. अनेक राज्यांत ज्यांना लोक ओळखतील, जे स्वतः लोकांतून निवडून येतील, ज्यांच्या नेतृत्वाखाली पक्षाचे अन्य नेते निवडून येतील, जे आणि मोठा काळ पक्षाला तग धरून ठेवण्यास मदत करू शकतील असे नेतृत्व आपच्या दुसऱ्या फळीत निर्माण झालेले नाही.
महाराष्ट्रासारख्या राज्यात कधी आपमध्ये किंवा आपच्या पाठीशी मेधा पाटकर, अंजली दमानिया यांसारख्या सामाजिक कार्यकर्त्यांचे पाठबळ होते पण आज ते पूर्णतः पक्षाबाहेर आहेत किंवा त्यासारखे दुसरे नेते घडवणे आपला जमले नाही असे वाटते आहे.
शीशमहाल वाद, मोहल्ला क्लिनिकच्या अकार्यक्षमतेचे अहवाल, अति जाहिरातबाजी, निवडणूक तिकिट वितरणात कार्यकर्ते लोकांचा सहभाग नसणे, एकखांबी नेतृत्व आणि एकहाती निर्णय, मोफत सुविधांच्या अंमलबजावणीत आलेली उदासीनता हे सर्व मुद्दे आपच्या ‘सरळ, पारदर्शक, बदल घडविणारा, क्रांतिकारी विचारांचा, नव्या पिढीचा व जनसामान्यांचा पक्ष’ या मूळ प्रतिमेला छेद देणारे ठरले.
आपने काँग्रेससोबत युती करून स्वतःचं वेगळेपण, स्वतःचा आवाज आणि मीडिया स्पेसचं अस्तित्व गमावलं. काँग्रेस आणि तत्कालीन UPA सरकार हीच आपच्या जन्माची पार्श्वभूमी होती त्यामुळे 2015 आणि 2020 मध्ये दिल्लीसारख्या भागात काँग्रेसचा पूर्णपणे पराभव झाला. परंतु लोकसभा निवडणुकीत 2024 मध्ये INDIA आघाडीत सामील होणे हे मतदारांसाठी गोंधळ निर्माण करणारे ठरले, आणि त्या अगोदर हरयाणा निवडणुकीत युती होऊ न शकणे आणि एकत्रित स्वरूपात संधी असूनही भाजप च पराभव न करू शकणे ह्यामुळे ह्या आघाडीच्या उपयोगितेचा प्रश्न लोकांना जाणवला असावा.
काँग्रेसचे आणि काँग्रेसच्या प्रादेशिक मित्रपक्षांचे इंडिया आघाडीत वर्चस्व होते आणि आहे. उदाहरण म्हणून बिहारमध्ये राष्ट्रीय जनता दल, उत्तर प्रदेशात समाजवादी, महाराष्ट्रात शिवसेना आणि पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस, त्यामुळे आपच्या आवाजाला, वेगळेपणाला फारसा प्रतिसाद नव्हता. त्यांची स्वतंत्र ओळख जपण्याची कुणी तसदी घेणारे कार्यकर्ते किंवा नेते नव्हते. ‘डिसरप्टर’ केजरीवाल यांचं असणं आणि वागणं जणू बंदिस्त झालं होतं. आप आता आघाडीतून बाहेर पडल्यावर मात्र त्यांना एक महत्त्वाचा फायदा मिळेल. पक्षाला पुन्हा माध्यमांतील स्वतंत्र स्पेस मिळेल, जिथे आपची मते, भूमिका आणि धोरणं ही काँग्रेस किंवा इतर पक्षांच्या सावलीत न राहता स्वतंत्रपणे प्रसारित होतील.
लोकसभा निवडणुकीत आपची असलेली आघाडीतील एक छोटा घटकपक्ष इतकीच ओळख, आता त्यातून बाहेर पडल्यावर एक पर्यायी विचारधारा असलेला, स्वतंत्र पक्ष म्हणून पुन्हा मांडण्याची संधी मिळेल. पण एकूणच भाजप विरोधात त्यांची भूमिका ही इंडिया आघाडीतील इतरांपेक्षा खूप वेगळी असेल असे एकूणच ह्या पक्षाच्या मूळ स्वभावानुसार जाणवत नाही, पण मांडणी साठी वेगळी जागा आणि वेळ निवडणे ह्याचे स्वातंत्र्य त्यांना मिळेल.
2020 नंतर दिल्लीतील दंगे, मुस्लिम समाजाकडे झालेले दुर्लक्ष, दलित-बहुजन मागास ह्यांच्या मुद्द्यांची उपेक्षा यामुळे आपच्या मूळ मतदारांमध्ये दुरावा आला आहे, एकेकाळी अण्णा हजारेंच्या नेतृत्वाखाली आंदोलनाचा उत्साह अनुभवलेला शहरी नवमध्यमवर्ग देखील आता उदासीन झाला आहे असे जाणवते.
आपचं फ्रीबीज मॉडेल हे अनोखं आणि वेगळ्या मांडणीचं होतं. वीज, पाणी, शिक्षण, आरोग्य मोफत ही यशस्वी रणनीती होती. पण काँग्रेस, भाजपसारख्या पक्षांनीही याच प्रकारच्या योजना दिल्या. यामुळे आपचं वेगळेपण कमी झालं. त्याचबरोबर या प्रस्थापित पक्षांकडे मोठी प्रचार यंत्रणा, मशिनरी, संघटनबळ आहे आणि संसाधनांच्या कमतरतेमुळे भाजपच्या काँग्रेसच्या तुलनेत आपमागे पडला हे मान्य करावे लागेल.
गुजरात, महाराष्ट्र, पंजाब, गोवा अशा राज्यांमध्ये पक्षाने विस्ताराचे प्रयत्न केले, पण पंजाब वगळता कुठेही कायमचे संघटन किंवा नेतृत्व तयार करता आलं नाही. निवडणुकीत आपकडे आलेले अनेक जण भाजप किंवा काँग्रेसमध्ये नंतर प्रवेश करते झालेत, गुजरातमध्ये विधानसभा निवडणुका येत आहेत, पण आपतिथे काँग्रेस आणि भाजपच्या मध्ये स्वतंत्र ओळख निर्माण करू शकेल का, हा प्रश्न आहेच, मागील मिळवलेली मत आणि जनाधार टिकवणे हे मोठे काम असेल आणि त्यात पाच वर्षांत लोकांप्रती जबाबदारीने वागलेले लोक टिकवावे लागतील आणि नवे नेतेदेखील शोधावे लागतील. फक्त भाजपविरोधाची किंवा काँग्रेसविरोधाची भूमिका सोडून पर्यायांची देखील चर्चा करावी लागेल, तिकडे जनमत वळवावे लागेल.
आपसाठी आता गरजेचं आहे ते म्हणजे दुसऱ्या फळीचं मजबूत नेतृत्व, राज्यांत संघटन आणि स्पष्ट भूमिका असलेली राष्ट्रीय कार्यकारिणी आणि नेते. नवीन भूमिका घेताना त्यांना आता केवळ योजनांवर नव्हे, तर विश्वासार्हतेवर आधारित राजकारण आणि भारतभर एक प्रादेशिक, सामाजिक वास्तवाशी जोडलेलं संघटन तयार करणे गरजेचं ठरेल.
आज आप अशा एका टप्प्यावर आहे जिथे त्यांच्यात भाजप+ आणि कॉंग्रेस+ यांच्यापेक्षा वेगळा तिसरा पर्याय बनण्याची क्षमता आहे आणि देशात त्याची गरजदेखील आहे, पण ती केवळ केंद्राशी, राज्यांशी आणि प्रशासनासोबत सतत वाद घालून, मीडिया स्पेस मिळवून किंवा घोषणांनी नव्हे, तर उत्तम कामगिरी, सततचा संवाद, जनता दरबार, आणि नवी राजकीय निष्ठा उभारूनच मिळू शकेल नाहीतर मग , आप हा पक्ष म्हणजे एक अधुरं स्वप्न, एक अर्धवट लोकचळवळ अशीच ओळख भारतीय राजकारणात नोंदली जाईल.
आपकडे क्षमता आहे, नेतृत्व आहे आणि देशाला नव्या राजकारणाची गरजदेखील आहे, आप तसा नवा पक्ष आहे आणि चुका करणे, त्यातून शिकणे ह्याची संधी आहेच, लोकांमध्ये जाऊन योग्य कार्यक्रम दिला आणि नवी नेतृत्वाची फळी शोधली, टिकवली तर उत्तम भविष्य असेल. आप आणि इंडिया आघाडी हे एकूणच समीकरण मिसफिट आणि त्यामुळे आजचं पाऊल हे कधीतरी पडणारच होतं हे सर्वच जाणून होते. तसा सध्याचा काळ एकूणच सत्ताविरोधी किंवा वेगळ्या भूमिका घेणाऱ्या पक्षांसाठी अवघड आहेच, पण निष्ठा असलेले लोक आणि संविधान-भान जागृत ठेवून विकासाची भूमिका घेणारे अनेक मतदार नागरिक नव्या पर्यायांच्या शोधात असतातच. आपला हे हेरावे लागेल आणि त्यांच्यापुढे स्वतःला सिद्ध करावे लागेल.
- केतनकुमार पाटील
ईमेल : Ketankumarupsc@gmail.com
(लेखक राजकीय विश्लेषक आहेत.)
Tags: आम आदमी पार्टी इंडिया आघाडी अरविन्द केजरीवाल कॉंग्रेस भाजप aap arvind kejriwal kejriwal congress INDIA INDIA bloc INDIA Alliance साधना डिजिटल Load More Tags
Add Comment