INDIA आघाडीत तेजस्वी यादव यांची प्रतिमा एक विश्वासार्ह व ठाम नेते म्हणून उभी राहिली आहे. वेटर अधिकार यात्रेत देखील राहुल गांधी सोबत ते लढत आहेत. राहुल गांधी आणि इतर सहयोगी नेत्यांसोबत ते सातत्याने खांद्याला खांदा लावून उभे राहिले असून, बिहारमधून INDIA आघाडीला मजबूत करण्याचे महत्त्वाचे काम त्यांनी केले आहे. त्यामुळेच 2025 च्या विधानसभा निवडणुकीत INDIA आघाडीकडून मुख्यमंत्रीपदाचे प्रमुख दावेदार म्हणून त्यांची प्रतिमा अधिक ठळकपणे समोर आली आहे .
बिहारच्या राजकारणात आज सर्वाधिक चर्चेत असलेले नाव म्हणजे तेजस्वी प्रसाद यादव. क्रिकेटमधून आपली कारकीर्द सुरू करून नंतर राजकारणात प्रवेश केलेल्या या युवा नेत्याने थोड्याच काळात बिहारच्या राजकारणाला नवी दिशा दिली. आज ते राष्ट्रीय जनता दलाचे (आरजेडी) एक महत्त्वाचे नेते आणि बिहार विधानसभेतील विरोधी पक्षनेते असून, INDIA आघाडीचा एक विश्वासार्ह चेहरा म्हणून उदयास आले आहेत.
क्रिकेटपासून राजकारणापर्यंतचा त्यांचा प्रवास उल्लेखनीय आहे. दिल्ली डेअरडेव्हिल्स संघासाठी आयपीएलमध्ये आणि झारखंड संघासाठी रणजी स्पर्धेत क्रिकेट खेळल्यानंतर तेजस्वींनी क्रिकेटऐवजी आपल्या घराण्यातील राजकीय वारसा पुढे चलवण्याचे ठरवले, आणि 2015 मध्ये राजकारणात प्रवेश केला. पहिल्याच प्रयत्नात राघोपुर मतदारसंघातून निवडून येत त्यांनी आपली ताकद दाखवली. पुढे 2015-2017 आणि 2022-2024 या काळात दोन वेळा उपमुख्यमंत्रीपद भूषवून त्यांनी आरोग्य, पायाभूत सुविधा, शिक्षण आणि रोजगारनिर्मिती क्षेत्रात काम केले. विशेष म्हणजे, बिहारच्या तरुणांसाठी बिहारमध्येच रोजगाराच्या संधी निर्माण करण्याचे आश्वासन देऊन त्यांनी आपल्या नेतृत्वाला नवी ओळख मिळवून दिली.
बिहारसारख्या राज्यातून, माजी मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव यांच्या च्या घरातून आलेला आणि अल्पशिक्षित म्हणून विरोधकांकडून वारंवार टीका सहन करणारा हा तरुण नेता आपल्या तत्त्वांशी कोणतीही तडजोड न करता ठाम राहतो. सत्ता मिळवण्यासाठी तडजोडी करणे किंवा सत्ताधाऱ्यांच्या दबावाखाली झुकणे त्यांना मान्य नाही, हे त्यांनी वारंवार दाखवून दिले आहे. त्यामुळेच त्यांना केवळ “लालूंचा मुलगा” म्हणून न पाहता बिहारच्या सद्यःकालीन राजकारणात सत्ता आणि अन्यायाला थेट आव्हान देणारा नेता म्हणून जनतेने मान्यता दिली आहे मागील विधानसभेत सर्वाधिक आमदार निवडून आलेल्या पक्षाचा विधानसभेतील नेता म्हणजे तेजस्वी यादव.
तेजस्वींचा प्रवास हा आशा आणि आव्हानांचा संगम आहे. एकीकडे त्यांच्याजवळ लोकप्रियता आहे, मात्र त्याबरोबरच अनेक मोठी आव्हानेही त्यांच्यापुढे आहेत. एक म्हणजे त्यांच्यावर होणारे घराणेशाहीचे आरोप, त्यांच्या भावाची वादग्रस्त प्रतिमा, पक्षात इतर तुल्यबळ नेतृत्वाचा अभाव आणि पक्षातील नेत्यांमध्ये असलेली अनुभवाची कमतरता अशी अनेक आव्हाने आहेत. . तरीही बिहारच्या सामान्य जनतेत आणि तरुणाईत त्यांच्या भाषणांमुळे, आणि त्यांनी हस्तिदंती मनोऱ्यातून आदेश न देता लोकांच्या जवळ राहून त्यांच्या समस्या सोडविण्यावर भर दिल्यामुळे, आणि त्यांनी केलेल्या कामामुळे एक वेगळी ऊर्जा निर्माण झालेली आहे. राष्ट्रीय स्तरावर देखील एक विश्वासार्ह पर्याय म्हणून त्यांच्याकडे पाहणे शक्य आहे.
तेजस्वी यादव यांनी आपल्या राजकीय प्रवासात बिहारमध्ये काही ठळक मुद्द्यांवर सातत्याने भूमिका घेतली आहे. ते सुरुवातीपासूनच दारूबंदीचे ठाम विरोधक राहिले आहेत. 2016 पासून लागू असलेली दारूबंदी पूर्णपणे अपयशी ठरल्याचे ते म्हणतात. अवैध व्यापाराने उचल खाल्ली, जवळपास 30,000 कोटी रुपयांची समांतर अर्थव्यवस्था तयार झाली आणि त्यातून दारू माफियांना तसेच सत्ताधारी नेत्यांना थेट फायदा झाला, असे त्यांनी आरोप केले. त्याहून गंभीर म्हणजे अवैध दारू पिऊन झालेल्या घटनांमध्ये शेकडो लोकांचा जीव गेला, आणि त्याची जबाबदारी नितीश सरकारचीच असल्याचे त्यांनी नेहमी सांगितले. जातीय जनगणनेच्या मुद्यावर तेजस्वींची भूमिका स्पष्ट आहे. सामाजिक न्याय मिळवण्यासाठी जाती आधारित जनगणना आवश्यक असल्याचे ते नेहमी म्हणतात. राहुल गांधीच्या खालोखाल तेजस्वी हे सर्वाधिक जातीनिहाय जनगणनेबद्दल बोलताना दिसतात, 2022 मधील सर्वेक्षणानंतर ओबीसी व अति मागासवर्गीयांचे प्रमाण उघड झाल्यावर त्यांनी थेट 85 टक्के आरक्षणाची मागणी केली. यामुळे मागासवर्गीयांच्या हक्कांना त्यांनी जोरदार आवाज दिला. रोजगार निर्मिती हा त्यांच्या राजकारणाचा सर्वात मोठा आधार आहे. 2020 च्या निवडणुकीत दिलेले दहा लाख नोकऱ्यांचे आश्वासन बिहारच्या तरुणाईसाठी आशेचा किरण ठरले. उपमुख्यमंत्री म्हणून त्यांनी शिक्षक, पोलीस आणि इतर सरकारी पदांसाठी मोठ्या प्रमाणावर भरती प्रक्रिया सुरू करून हजारो तरुणांना रोजगाराची संधी दिली. त्यामुळे युवकांमध्ये त्यांचा प्रभाव लक्षणीय वाढला. बिहारी अस्मितेच्या मुद्यावर त्यांनी नेहमी आक्रमक भूमिका घेतली. राज्यातील युवकांना प्राधान्य देण्यासाठी 100 टक्के डोमिसाइल धोरणाची घोषणा केली आणि सध्याच्या सुर असलेल्या मतदार यादीतील नावे वगळण्याच्या प्रक्रियेला “बिहारी अस्मितेविरोधी” ठरवले. त्यांच्या मते, बिहारी ओळख आणि सन्मान हेच त्यांच्या राजकारणाचे केंद्र आहे. तेजस्वी यादव नेहमीच धर्मनिरपेक्ष मूल्यांचा पुरस्कार करत आले आहेत.
अल्पसंख्याक, दलित आणि मागासवर्गीयांसाठी ते सातत्याने लढा देतात. भाजपच्या धार्मिक आणि सांप्रदायिक राजकारणावर त्यांनी कठोर प्रहार केले आणि संविधानिक मूल्यांच्या संरक्षणाचा आग्रह धरला. विशेष म्हणजे, विधानसभेत तेजस्वींची भूमिका वेगळीच असते. त्यांना माध्यमांवर बंधने आहेत याची जाणीव असल्याने ते विधानसभेचे व्यासपीठ जोशात वापरतात. सत्ताधारी पक्षावर थेट हल्ला करताना ते आपल्या पीचवर घेऊन सत्ताधारी लोकांना पराभूत करतात. त्यामुळे त्यांचे भाषण केवळ विरोधकांसाठीच नव्हे, तर सामान्य लोकांसाठीही प्रेरक ठरते. याच कारणामुळे अब्दुल बारी सिद्दीकी यांच्यापासून ते नव्या पिढीपर्यंत आरजेडीतील जुने-नवे सर्वच नेते तेजस्वी यादव यांच्यावर विश्वास ठेवतात. त्यांच्या नेतृत्वामुळेच आरजेडी आणि INDIA आघाडी बिहारमध्ये सशक्तपणे उभी आहे. कधी कधी तेजस्वी, पप्पू यादव, कन्हैयाकुमार ह्यांच्या स्टोरी मीडिया रंगवते पण तिघे अजूनही एक भान ठेवून आहेत की सत्ता आणि धर्मांधता ह्यात खूप मोठं अंतर आहे.
तेजस्वी यादव यांची प्रचाराची स्टाईल ही ऊर्जावान, भावनात्मक आणि सामान्य जनतेच्या मनात उतरणारी आहे. बेरोजगारी, शिक्षण, सामाजिक न्याय यांसारख्या मुद्द्यांवर त्यांनी सातत्याने आवाज उठवला असून त्यामुळे विशेषतः युवक, शेतकरी आणि गरीब अतिदलित वर्गांत त्यांना मोठा जनाधार मिळाला आहे. महिला हा पूर्वीचा नितीशकुमार ह्यांचा मतदारवर्ग तेजस्वी यांच्याकडे ओढला जाण्याची शक्यता आहे. म्हणजे तेजस्वीने दिलेली नोकरीची हमी आणि पारदर्शक नियुक्तीचा हा परिणाम आहे. 2020 च्या विधानसभा निवडणुकीत आरजेडीने सर्वाधिक जागा जिंकल्या, तर 2024 च्या लोकसभा निवडणुकीत INDIA आघाडीसाठी बिहारभर शेकडो सभा घेऊन त्यांनी विरोधकांच्या पुढे कठीण आव्हान उभे केले.
लोकसभेच्या वेळी तेजस्वी यादव यांनी बिहारच्या प्रत्येक कोपऱ्यात सभा घेत जनतेत वादळ निर्माण केले होते. त्यांची सभा म्हणजे तरुणांची गर्दी, शेतकरी व ग्रामीण युवकांच्या उत्साहाने भरलेली असत. इतकेच नव्हे, तर काही शेवटच्या सभा त्यांनी तब्येतीच्या अडचणीमुळे व्हीलचेअरवरूनही केल्या, मात्र त्यांचा आवाज आणि हुरूप कमी झाला नाही. त्यांच्या सभांना लोक फक्त ऐकायला नव्हे, तर स्वतःच्या आशा-अपेक्षांचा आवाज म्हणून पाहत होते.
हेही वाचा : विकासाच्या राजकारणाला स्थलांतराचा आणि मागासलेपणाचा अडसर (सोमिनाथ घोळवे)
तेजस्वींची शैली लालूप्रसाद यादवांच्या परंपरेतून आलेली असली तरी त्यात स्वतःची नवी झलक दिसते. ते धर्मांधतेला उघडपणे आव्हान देतात आणि सामाजिक न्याय, धर्मनिरपेक्षता आणि बिहारी अस्मिता यासाठी कोणत्याही परिस्थितीत मागे हटत नाहीत. त्यामुळेच त्यांच्या सभांना युवक वर्गाकडून प्रचंड प्रतिसाद मिळतो आणि बिहारच्या राजकीय पटावर त्यांच्या नेतृत्वाचे वर्चस्व स्पष्टपणे जाणवते.
तेजस्वी यादव यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीत विरोधकांवर सातत्याने हल्लाबोल केला आहे. भाजपचे नेते सम्राट चौधरी यांच्यावर त्यांनी दारूबंदीच्या अपयशाबाबत तीव्र टीका केली असून, कथित दारू तस्करीतून लाभ घेण्याचा आरोपही केला आहे. जेडीयूचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावर त्यांनी वारंवार पक्षबदल, दारूबंदीतील अपयश आणि भ्रष्टाचाराला प्रोत्साहन दिल्याचा ठपका ठेवला. नितीश सरकारला त्यांनी बिहारच्या विकासासाठी अपयशी ठरवले आहे. याशिवाय, बिहारचे भाजप नेते विजय सिन्हा यांच्यावरही त्यांनी जोरदार प्रहार केला असून, त्यांच्या वक्तव्यांना केवळ राजकीय ढोंग आणि जनतेची दिशाभूल असे संबोधले आहे.
राष्ट्रीय स्तरावरही तेजस्वी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या धोरणांवर आणि भाषणांवर सतत टीका केली आहे. मोदी सरकार बेरोजगारी, आरक्षण आणि सामाजिक न्यायाच्या मुद्द्यांवर अपयशी ठरल्याचे ते ठामपणे सांगतात. बिहारच्या प्रश्नांवरून मोदी-शाह जोडीवर थेट हल्ला चढवून त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
INDIA आघाडीत मात्र तेजस्वी यादव यांची प्रतिमा एक विश्वासार्ह व ठाम नेते म्हणून उभी राहिली आहे. वेटर अधिकार यात्रेत देखील राहुल गांधी सोबत ते लढत आहेत. राहुल गांधी आणि इतर सहयोगी नेत्यांसोबत ते सातत्याने खांद्याला खांदा लावून उभे राहिले असून, बिहारमधून INDIA आघाडीला मजबूत करण्याचे महत्त्वाचे काम त्यांनी केले आहे. त्यामुळेच 2025 च्या विधानसभा निवडणुकीत INDIA आघाडीकडून मुख्यमंत्रीपदाचे प्रमुख दावेदार म्हणून त्यांची प्रतिमा अधिक ठळकपणे समोर आली आहे .
जरी तेजस्वी यादव हे बिहारच्या जनतेचे लोकप्रिय आणि ऊर्जावान नेते असले तरी त्यांच्या राजकीय प्रवासात काही कमतरता स्पष्टपणे दिसतात. आरजेडी पक्ष हा लालू प्रसाद यादव आणि राबडी देवी यांच्या कुटुंबाभोवती फिरतो, त्यामुळे कुटुंबशाही चा ठसा नेहमी त्यांच्या सोबत जोडला जातो. त्यांच्या भावाचे, तेजप्रताप यादव यांचे वादग्रस्त वक्तव्य अनेकदा पक्षाच्या प्रतिमेला धक्का पोहोचवत असत आता त्यांनी स्वतंत्र लढण्याची घोषणा करून काय साध्य केले हे काळच ठरवेल पण ते माध्यमांमध्ये हेडलाईन्स बनवतात, पण प्रत्यक्ष राजकीय लढाईत त्यांचा उपयोग फारसा होत नाही. याशिवाय, पक्षात तेजस्वी यांच्या बरोबरीचे अन्य नेते नसल्याने संपूर्ण जबाबदारी त्यांच्याच खांद्यावर येते. त्यांच्या प्रशासनिक अनुभवाबाबत आणि निर्णयक्षमतेबाबत अजूनही प्रश्न उपस्थित केले जातात, ज्यामुळे त्यांच्या नेतृत्वाबाबत शंका निर्माण होते.
तेजस्वी यादव हे बिहारच्या राजकारणातील युवा चेहरा आहेत. रोजगार, जातीनिहाय जनगणना, बिहारी अस्मिता आणि सामाजिक न्याय यांसाठी लढणारा नेता म्हणून त्यांनी स्वतःला सिद्ध केले आहे. त्याचबरोबर, दारूबंदीविरोधातील ठाम मते आणि विरोधकांवरील वास्तव टीका आणि काम यामुळे त्यांची लोकप्रियता वाढली आहे. आगामी 2025 निवडणुकीत त्यांचे नेतृत्व केवळ बिहारच्या राजकीय समीकरणांना नव्हे तर INDIA आघाडीच्या भवितव्यालाही दिशा देणारे ठरू शकेल.
- केतनकुमार पाटील
ईमेल : Ketankumarupsc@gmail.com
(लेखक राजकीय विश्लेषक आहेत.)
Tags: बिहार राष्ट्रीय जनता दल लालू प्रसाद यादव तेजस्वी यादव इंडिया आघाडी INDIA bloc राहुल गांधी बिहार निवडणूक Load More Tags
Add Comment