आधुनिकतेची नवी काव्य-परिमाणे : सीसीटीव्हींच्या गर्द छायेत

गीतेश गजानन शिंदे यांच्या कवितासंग्रहाचा परिचय

या कवितासंग्रहात आधुनिक तंत्रज्ञानाची परिभाषा खूप ठिकाणी आली आहे. बरेच कवी तशी ती वापरताना दिसतात. जेव्हा ती यादी म्हणून येते तेव्हा तिचे महत्त्व उरत नाही. पण फाइल, डिलीट, बॅलन्स शीट, कॅलिडोस्कोप, नोटिफिकेशन, सबस्क्राइब असे कितीतरी संदर्भ गीतेश यांच्या कवितेतून येतात तेव्हा त्याचे मानवी संवेदनेशी बांधून असणे महत्त्वाचे ठरते. अशा वस्तू जेव्हा कवितेत सजीव होतात तेव्हाच त्या कवितेचा एकात्म भाग बनू शकतात. या कवितांमधून ते उत्तम पद्धतीने आले आहे.

कवीचे समकालीन असणे हे अनेक पातळ्यांवर असते याचा प्रत्यय कवी गीतेश गजानन शिंदे यांचा ‘सीसीटीव्हींच्या गर्द छायेत’ हा शब्दालय प्रकाशन प्रकाशित कवितासंग्रह वाचताना आला. काही महिन्यांपूर्वीच प्रसिद्ध झालेल्या या संग्रहातून आधुनिकतेची नवी परिमाणे गवसल्याचा आनंद होत आहे. गीतेश शिंदे यांची कविता अतिशय तरलतेने माणसाचे ‘असणे-नसणे’ ज्या रीतीने शोधते आहे, ती बाब मर्ढेकरी संवेदन प्रवाहाशी आशयाच्या पातळीवर संवाद साधणारी आहे. मुळात एका बाजूने असणारी जड व्यवस्था आणि त्यातील माणसांचे झालेले वस्तुकरण याचा शोध घेणारी ही कविता नक्कीच आजच्या काळातील एक लक्षवेधी कविता आहे. उदा. ‘वस्ती’ (पृ. क्र. 19) या कवितेतील पहिल्याच कडव्यात कवी लिहितो, 

‘पडत नाही शहरात
पूर्वीसारखी झाडांची सावली, 
असतात शोभेच्या पाच-सात कुंड्या
इमारतीच्या प्रशस्त लॉबीत 
आपल्या बुडाखालचा सोडून 
कुठलाच प्रकाश टिपू न शकणाऱ्या’

शहरी मध्यमवर्गीय माणसांचे एक जग - ज्याचा एक घटक आपणही आहोत - त्याबद्दल ही कविता असे काही तरलपणे सांगते, तेव्हा नाहक तडजोडीची एक कहाणीच समोर येते. जगण्यासाठीची अपरिहार्य, केविलवाणी धडपड आणि त्यात घेतला जाणारा सावलीचा शोध ही बाब इथे खूप महत्त्वाची वाटते. खरे म्हणजे ही कुंडी, बारीकसे झाड इथे वस्तू न राहता जगण्याचे एक प्रतीक बनते. कवीचे कविपण अशाच काही ठिकाणी शोधायचे असते. या कवितासंग्रहात आधुनिक तंत्रज्ञानाची परिभाषा खूप ठिकाणी आली आहे. बरेच कवी तशी ती वापरताना दिसतात. जेव्हा ती यादी म्हणून येते तेव्हा तिचे महत्त्व उरत नाही. पण फाइल, डिलीट, बॅलन्स शीट, कॅलिडोस्कोप, नोटिफिकेशन, सबस्क्राइब असे कितीतरी संदर्भ गीतेश यांच्या कवितेतून येतात तेव्हा त्याचे मानवी संवेदनेशी बांधून असणे महत्त्वाचे ठरते. अशा वस्तू जेव्हा कवितेत सजीव होतात तेव्हाच त्या कवितेचा एकात्म भाग बनू शकतात. या कवितांमधून ते उत्तम पद्धतीने आले आहे. त्याचबरोबर नात्यांमधील वाढलेले ताण, निर्माण झालेली खेच याबद्दलही ही कविता सूक्ष्मपणे भाष्य करते. उदा. ‘कशासाठी’ (पृ. क्र. 69) या कवितेतील काही ओळी पाहा -

‘घेऊन येईल उद्याचा दिवस नवी पहाट 
या आशेनं कितीदा बुचकळायचा सूर्य 
आयुष्याच्या काळोखात? 
किती दिवस करायचा जगण्याचा अभिनय 
करून परिस्थितीचा मेकअप?’

अशा स्वरूपाची हतबलता हीच एक कविता असते, जी जगणे समजून घेत पुढे जात असते. खरे तर यांत्रिकीकरण आणि माणूस यांच्या नात्याचा शोध आपण खूप वेगवेगळ्या पातळ्यांवर घेऊ शकतो. जागतिकीकरण आणि मानवी समाज यांचे नाते कितीतरी गुंतागुंतीचे आहे. कवी हा देखील एक अतिशय तरल असा समाजशास्त्रज्ञच असतो. पण ही गुंतागुंत मांडण्यासाठी खूप खोलात जावे लागते. केवळ पृष्ठस्तरीय आकलनातून हे होणारे नसते. अगदी हाच धागा कवीने ‘कारण’ (पृ. क्र. 68) या कवितेत पुढील शब्दांतून पकडला आहे,

‘जागतिकीकरणाच्या घोडदौडीत
कासव ठरतो;
वाटते सतत कसलीतरी उणीव,
दिवेलागणीच्या वेळेचा
देव्हाऱ्यातील स्निग्धपणाही
पुरेसा नसल्याची होत राहते जाणीव’ 

कवितेचे कवितापण इथे असते. ‘देव्हाऱ्यातील स्निग्धपणा’ ही प्रतिमा अतिशय सजीव असे रूप जेव्हा घेऊन येते तेव्हा तिची कविता होते. इथे मग कवितेपुढे जागतिकीकरण कोलमडून पडते. भौतिकीकरणाला वेढा घालून जगण्याचा आशय शोधण्याची जबाबदारी कवीला पार पाडायची असते. ऊन ठिपक्यांची जाळीदार रांगोळी, चिवचिव हुंदका, शब्दांचं मोरपीस अशी कितीक सौंदर्यस्थळे या संग्रहातील कवितांमध्ये दाखवता येतील. 

गीतेश गजानन शिंदे

या नव्या युगात कुटुंब नावाची एक व्यवस्था खूप बारीकशी होत गेलीय. तिचा संकोच हीच खरे तर मानवी वस्तुकरणाची सुरुवात होती. एका पिढीने दुसरीला समजून घेणे ही देखील तशीच क्लिष्ट बाब आहे. पती-पत्नीमधील मतभेदांत मुलांची होणारी होरपळ, बाप म्हणून कवितागत ‘मी’ची घुसमट काही कवितांमधून कवीने समर्थपणे टिपली आहे. उदा. ‘विभक्त तर’ (पृ. क्र. 71) या कवितेत कवी लिहितो, 

'पाहतो मुलाला
अपलोड केलेल्या
फोटोतच मोठं होताना,
त्याचं प्रगतीपुस्तक 
कधीच येत नाही सहीला 
फक्त ते दाखवतं स्वप्नात वाकुल्या 
माझ्या सुशिक्षित निरक्षरतेला’

आपली ‘सुशिक्षित निरक्षरता’ हीच आपली जनरेशन गॅप आहे; जी या कवितांमधून ठळकपणे कवी मांडतो. खरेतर गद्यप्रायता टाळून असे काही समोर ठेवणे कठीण असते. मात्र गीतेश यांची कविता त्यात यशस्वी झाली आहे. ‘मुलाच्या बुटाचा नंबर काय असेल आता?’ हा कवीला पडलेला प्रश्न केवळ व्यक्तिगत प्रश्न त्यामुळेच नसतो. व्यक्तीकडून समष्टीकडे जेव्हा काव्यजाणिवेचा प्रवास होतो, तेव्हा कविता नकळतपणे मोठी होत जाते. या संग्रहातील कवितांमध्ये अशी खूपशी लक्षणे जागोजाग आहेत. बाप-मुलाच्या नात्यावरील या हळव्या कविता वाचताना नकळतपणे डोळ्यांच्या कडा पाणावतात.

आई अंगाई असणे आणि बाप पाळणा, किती छान आहे ही कल्पना! पण कवितेची उंची केवळ शाब्दिक कोट्यातून वाढत नसते. आशय आणि अभिव्यक्तीची एकरूपता नसेल तर कोट्या ह्या केवळ शब्दच्छल ठरतात. अनेक कवींची कविता या रीतीने वाया जाताना आपण बघतो. कवीने केवळ विशिष्ट शब्दांच्या मोहातून कविता कधीच लिहू नये. त्यातून केवळ कचराच पैदा होतो. आपल्याभोवती असा खूप कचरा रोज गोळा होताना दिसतो आहे. त्यास गीतेश यांची कविता अपवाद म्हणावी लागेल; कारण त्यातून टिपलेला आशय खोलवर परिणाम साधणारा आहे. शब्द जाणिवपूर्वक वापरणारा हा कवी असून शब्दांविषयी, भाषेविषयीचे त्यांचे चिंतनही या संग्रहातून प्रकटते. उदा. ‘शब्दभेट’ (पृ. क्र. 97) या कवितेत ते लिहितात,

‘शतकानुशतकांचा प्रवास करत
चालत आलेले शब्द 
विणत राहिले अवकाश संवेदनांचे 
तर कधी फोडून टाहो 
केली शब्दांचीच शस्त्रे’ 

कवीला आपण शब्दांची शस्त्रे करू शकतो याचे भान सर्वप्रथम तुकोबांनी दिले आणि तेच भान या कवीलाही असल्याचे जाणवते. एकूणच तुकोबांच्या दिंडीत सामील होणे काय असते हे या कवितांमधून अनुभवयास मिळते. 

‘पुस्तकातील ओळीबद्ध शब्दांची 
लांबच लांब 
काळ्या मुंग्यांची रांग’ 

अशी एक वेगळी प्रतिमासृष्टी ‘वारुळात’ (पृ. क्र 99) या कवितेत आहे जी प्रसंगी चकीत करते. शब्दांकडे पाहण्याची एक वेगळी दृष्टी त्यातून गवसते. 

आध्यात्मिक असणे म्हणजे आयुष्य समजून घेणे असते. खरे अध्यात्म दांभिक असू शकत नाही. मराठी माणूस हा वारकरी परंपरेचा झेंडा खांद्यावर मिरवणारा आहे. त्यात खूप सवंगपणा अलीकडे आला आहे. त्याला छेद देणे हे मराठी कवींचे काम आहे. या संग्रहात ‘संचित’, ‘नको देऊ तडा’, ‘लोकलची वारी’ हे तीन अभंग आहेत. प्रत्येकातील आशय निराळा असून तो सशक्तपणे मांडला गेला आहे. उदा. ‘संचित’ (पृ. क्र. 35) या अभंगात कवी मांडतो,

शोधतो दुःखाला । ब्रँडेड पर्याय । मायेची ती साय । आटलेली ॥ 

सुखाच्या मागे जीव तोडून धावणारी पिढी आणि मागे सुटत चाललेली आतड्याची नाती याबद्दलचे चिंतन या कवितांमधून प्रगटते. अवतीभवती प्रचंड कोलाहल असताना, जगण्याची, सुखाची परिभाषा झपाट्याने बदलत असताना हा समकाल चिमटीत धरण्याचे कसब कवी गीतेश शिंदे यांनी दाखवले आहे. त्यांच्या कवितेची भाषा आधुनिक प्रतिमांनी युक्त असली तरी ती कवितापण जपणारी आहे. कवीच्या मनाच्या सीसीटीव्हीतून सार्‍या भावभावनांचे, जगातील बदललेल्या संदर्भांचे, मूल्यांचे स्कॅनिंग प्रगल्भपणे मांडणार्‍या या कविता असून त्या वाचकास निश्चितच आत्मभान देणार्‍या आहेत असे निश्चितपणे म्हणावेसे वाटते.

सीसीटीव्हींच्या गर्द छायेत (कवितासंग्रह)
कवी : गीतेश गजानन शिंदे
शब्दालय प्रकाशन
पृष्ठे 128 किंमत 250/-
कवितासंग्रहासाठी संपर्क : 9820272646

- श्रीकांत देशमुख, नांदेड


हेही वाचा : 

 

Tags: साहित्य मराठी ललित शब्दालय प्रकाशन गीतेश शिंदे Load More Tags

Add Comment

संबंधित लेख