पुण्याचे नैसार्गिक आणि भौगोलिक दर्शन घडवणारे स्मरणरम्य पुणे 2021

2021 या वर्षासाठी 'निसर्गाच्या पार्श्वभूमीवर बदलत गेलेले शहर पुणे' हा विषय घेण्यात आला आहे. 

पर्वतीवरून होणारे जुन्या पुण्याचे दर्शन | फोटो सौजन्य : स्मरणरम्य पुणे 2021

सांस्कृतिक महाराष्ट्राचे केंद्र असणारे पुणे नैसर्गिक आणि भौगोलिक दृष्टीनेही समृद्ध आहे. या ऐतिहासिक शहराच्या बदलत्या नैसर्गिक आणि भौगोलिक परिस्थितीचे दर्शन घडवायचे असेल तर त्यासाठी लेखन करण्यापेक्षा थेट चित्र वा छायाचित्र यांच्या माध्यमातून हा बदल ‘डॉक्युमेंट’ झाला तर तो अधिक प्रभावी ठरतो. त्यासाठी दिनदर्शिकेसारखे (कॅलेंडरसारखे) आकर्षक, सुबोध आणि वर्षभर नजरेसमोर राहणारे दुसरे माध्यम नाही. 

ही बाब लक्षात घेऊन आमच्या संग्रहातील आणि संपर्कातून मिळवलेली पुण्याची असंख्य जुनी आणि दुर्मिळ छायाचित्रे आम्ही ‘स्मरणरम्य पुणे’ कॅलेंडरसाठी सातत्याने वापरत आहोत. यंदा म्हणजे 2021 या वर्षासाठी 'निसर्गाच्या पार्श्वभूमीवर बदलत गेलेले शहर पुणे' हा विषय घेण्यात आला आहे. मोठ्या आकारातील छायाचित्रांसोबतच मराठी आणि इंग्लीश या दोन भाषांत माहिती देत ‘ज्ञान व रंजन’ यांचा समतोल साधण्याचा प्रयत्न केला आहे.

नवरात्रीच्या जत्रेपुरता वर्दळीचा झालेला एके काळचा चतुःश्रुंगी देवीचा डोंगर आणि तिथे पायी चालत जाण्यात पुणेकरांना होणारा आनंद. हनुमान टेकडी चढून वर गेल्यावर खाली सुबक दगडी वास्तूंनी नटलेला सर्व्हंट्स ऑफ इंडिया सोसायटीचा नयनरम्य परिसर, वडाच्या आणि पिंपळाच्या पारब्यांनी घनगर्द झालेला एके काळचा निमुळता फर्ग्युसन कॉलेज रस्ता आणि कर्वे रस्ता कोण विसरेल? 

25 एकरांच्या खड्ड्यातील अतिक्रमणे उठवून तेथील पेशवेकालीन तळ्यातल्या गणपतीच्या भोवती साकारलेली पुणे महापालिकेची 'सारस बाग' ही पुण्यात आलेल्या पाहुण्यांना नेऊन दाखवण्याचे एक आवडते ठिकाण! या आणि अशा अनेक गोष्टी या पुण्याच्या मूळ नैसर्गिक सौंदर्याकडे नेणाऱ्या आहेत... आणि म्हणूनच पुणे हे आपले जिवाभावाचे शहर आहे!

सुखद निसर्ग आणि पूरक भौगोलिक परिस्थिती हे महत्त्वाचे घटक कोणतेही समृद्ध ठिकाण लोकप्रिय होण्यास कारणीभूत ठरणारे असतात. इतर ऐतिहासिक-सांस्कृतिक, तसेच भौगोलिक आणि नैसर्गिक स्थानमाहात्म्यांप्रमाणेच पुणे हेही गेल्या तीनचार शतकांमध्ये हळूहळू बदलत गेले. पुणे हे निसर्गाचे वरदान ठरलेल्या जगातील मोजक्याच शहरांपैकी एक आहे! एकेकाळचे पुनवडी गाव ते शहर या आणि आता महानगराकडे होत असलेल्या सध्याच्या पुण्याच्या वाटचालीचे आपण सारे साक्षीदारही आहोत.

सह्याद्री पर्वतरांगांनाच लागून असणाऱ्या पुण्याची निर्मिती मुळा-मुठेच्या काठी तसेच चहूबाजूंनी पर्वतांनी आणि टेकड्यांनी वेढलेल्या मधल्या सखल भागात झाली. कपबशीतल्या बशीप्रमाणेच पुणे शहर असून वर्षातील बाराही महिने या शहराचे हवामान आल्हाददायक असते. 

निसर्ग संवर्धनातील पर्यावरणाची साखळी ही पुण्याला लाभलेली निरोगी संपत्ती आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात राज्यकर्ते असणाऱ्या ब्रिटिशांनीही पुण्याला पसंती दिली ती येथील अनुकूल निसर्ग आणि पूरक भौगोलिक परिस्थिती पाहूनच. भरपूर पाऊस, सुखद थंडी आणि वर्षभर मुबलक पाणी हे पुण्याला मिळालेले वरदान ही पुण्यनगरीची खासियत!

...मात्र आज जे इतर शहरांचे झाले आणि होत आहे... ते पुण्याबाबतीतही घडताना दिसते. वाढत्या शहरीकरणामुळे गेल्या पाचसहा दशकांमध्ये पुणे हळूहळू बदलत गेले असून मुठा नदीचा आकसत गेलेला आकार, वाढती रहदारी, वस्ती, उपनगरे आणि आता नव्याने येऊ घातलेली मेट्रो रेल्वे वाहतूक यांमुळे निसर्गाच्या पार्श्वभूमीवरील पुणे एका मोठया बदलाच्या टप्प्यावर येऊन थांबले आहे. या शहराने कालप्रवाहात अनेक जुनी ओळखीची ठिकाणे गमावताना त्यांची जागा नव्या अनोळखी गोष्टींनी घेतली आहे... पण ज्या गोष्टी आणि ठिकाणे अजूनही शिल्लक आहेत... त्या तरी आपण आवर्जून जपायला हव्यात.

हे करायचे तर शहराची ही उभीआडवी वाढ आता नियंत्रणात आणायला हवी आणि आपली मूळ निरोगी जीवनशैलीही टिकून राहायला हवी. आपल्या शहराची भौगोलिक आणि स्थानिक वैशिष्ट्ये असणारी मूळ ठिकाणे आहेत तशीच ठेवायला हवीत. पुण्याची पर्वती, हनुमान टेकडी, चतुःश्रुंगी देवीचा डोंगर, मुठेचा शुद्ध प्रवाह आणि सावली देणारी वृक्षराई ही आपली खरी संपत्ती आहे. तीच आपण जतन करायला आणि वाढवायला हवी. 

जुन्या ऐतिहासिक पुण्यावर आम्ही - मी, माझे ज्येष्ठ बंधू विजय सबनीस आणि पेपरलीफ संस्थेचे मुद्रक-प्रकाशक जतन भाटवडेकर - एकत्र येऊन गेली सहा वर्षे सातत्याने ‘स्मरणरम्य पुणे’ (तर इंग्लीशमध्ये ‘पुणे नॉस्टेल्जिया’) या भिंतीवरील द्वैभाषिक कॅलेंडरची निर्मिती करत आहोत. कॅलेंडरमध्ये वापरण्यात येणारी मोठ्या आकारांची छायाचित्रे ही माझ्या संग्रहातील आणि संपर्कातून मिळवलेली असून पत्रकारितेतील अनुभवांच्या आधारे मिळवलेली आणि अनेक विकत घेतलेली आहेत. ही छायाचित्रे गेल्या 100 ते 125 वर्षांमधली असून भिंतीवरच्या मोठ्या कॅलेंडरच्या माध्यमातून त्यांचा कल्पकपणे वापर करून ती घराघरांत पोहोचवणे हा उद्देश आहे.

पुस्तकापेक्षा कॅलेंडर आकाराने मोठे असून ते वर्षभर नजरेसमोर राहते हा त्याचा फायदा आहे. यातील सुमारे 13 इंच लांबीची आणि आठ इंच रुंदीची कृष्णधवल छायाचित्रे हेच त्याचे मुख्य आकर्षण आहे. त्यासाठी जाड इटालिअन कागद आम्ही दरवर्षी वापरतो. त्यावरील छपाई ही रंगीत असते. ती ऑफसेट पद्धतीने करतो... त्यामुळे मूळ कृष्णधवल छायाचित्रांना सोनेरी कडांची एक ‘सेपिया’ झळाळी मिळते! भूतकाळातली ही काहीशी स्वप्नमय छायाचित्रे असंख्य रसिकांच्या ‘मर्मबंधातली ठेव’ होतात आणि वर्ष संपले तरी नंतर आवर्जून जतन केली जातात. या कॅलेंडरचे हे जतनमूल्य आम्ही लक्षात घेतो आणि छपाईनंतर त्यावर काही विशिष्ट रसायनांचा एक थर देतो. यातून कॅलेंडरचे प्रत्येक पान पुढची चारपाच दशके आहे त्या स्थितीत टिकून राहायला मदत होते.

या कॅलेंडरमध्ये काय आहे?
हनुमान टेकडीजवळील गोपाळ कृष्ण गोखले यांच्या सर्व्हंट्स ऑफ इंडियाच्या दगडी बांधकामांचा विस्तीर्ण परिसर... आकाशातून टिपलेला, विविध वास्तूंनी नटलेला फर्ग्युसन कॉलेजचा मोठा भूप्रदेश, जंगली महाराज रोड होण्यापूर्वीचा शिवाजीनगरचा हिरवागार भूभाग, 1960मधले पर्वतीवरून दिसणारे टुमदार पुणे, 1968मध्ये ऐतिहासिक ‘तळ्यातल्या गणपती’भोवती पुणे महापालिकेने मोठ्या कल्पकतेने साकारलेली 25 एकरातील नयनरम्य ‘सारसबाग’, एकेकाळी वडाच्या पारंब्यांच्या झाडांसाठी ओळखला जाणारा गर्द सावलीचा फर्ग्युसन (गोपाळ कृष्ण गोखले) रस्ता, सातारा रस्त्याला लागून डोंगरांच्या कुशीत वाढत गेलेल्या पुण्याचे उपनगर असलेल्या बिबवेवाडीतली पहिलीवहिली घरे, आकाशातून टिपलेली पुलांसह दिसणारी नयनमनोहर मुठा नदी, तसेच गेल्या शतकाच्या अखेरीस पौड फाट्यावरील स्वातंत्र्यवीर वि.दा. सावरकर उड्डाणपूलाचा विस्तृत भाग... आणि याशिवाय आणखी बरंच काही....

(‘स्मरणरम्य पुणे 2021’ विक्रीसाठी 'साधना मीडिया सेंटर'मध्येही उपलब्ध आहे.)

- विवेक सबनीस
sabnisvivek@gmail.com

संपर्क क्रमांक : 9373085948

Tags: विवेक सबनीस पुणे इतिहास कॅलेंडर दिनदर्शिका स्मरणरम्य पुणे Vivek Sabnis Pune History Calendar Smaranramya Pune Load More Tags

Comments:

Anup Priolkar

It will be nice to witness original lay out of Pune.

Add Comment