महाराष्ट्राची लोकयात्रा : एक मौलिक अक्षरलेणे

सदानंद मोरे यांच्या 'महाराष्ट्राची लोकयात्रा' या पुस्तकाचा परिचय

महाभारत आणि विशेषत: त्यांतील कृष्णनीती हा प्रा. मोरे यांच्या चिरंतन चिंतनाचा प्रांत. लोकसंग्रह आणि लोकयात्रा या दोन तर महाभारतामधील प्राणभूत संकल्पना. ऐहिक-पारलौकिक कल्याणाच्या साधनेद्वारे समाजजीवन निरामय बनायचे असेल तर लोकसंग्रहाद्वारे सामूहिक ऊर्जेचे जागरण-उपयोजन घडून येणे अगत्याचे ठरते. त्यासाठी मुळात समाजपुरुषाची प्रकृती निकोप असावी लागते. स्वातंत्र्य-समता-बंधुता यांची त्रिगुणी मात्रा त्याचसाठी समाजपुरुषाला देणे भाग पडते. हे केवळ एकदाच करून भागणारे काम नसते. अशी लोकसंग्राहक त्रिगुणी मात्रा उगाळत राहण्यासाठी प्रबोधन-परिवर्तनाच्या जोडप्रक्रियांचा पाठपुरावा जारी राखणारी लोकयात्रा गतिमान राखावी लागते. प्रस्तुत ग्रंथाद्वारे प्रकटलेल्या प्रा. मोरे यांच्या अक्षरश्रमांचा सारभूत सांगावा नेमका हाच तर होय!

लोकव्यवहारामध्ये समतेच्या अनुभवास येणार्‍या सार्वत्रिक आणि सार्वकालिक घाऊक अभावाचे बीजारोपण एका विषम द्वंद्वात आदिम काळापासून झालेले आहे. त्या द्वंद्वाचे रूप विशुद्ध आर्थिक आहे. मानवमात्रांच्या अमर्याद गरजा आणि त्यांची पूर्तता करण्यासाठी सर्वतोपरी अपुरी असणारी भौतिक साधनसामग्री हा त्या द्वंद्वाचा गाभा आहे. आपल्या पोळीवर तूप ओढून घेण्याचे ज्याचे सामर्थ्य अधिक, तितका स्वत:च्या सुखसमृद्धीचा पैस विस्तारण्याच्या त्याच्या स्वातंत्र्याच्या सीमा अधिक विस्तारक्षम, हे मग ओघाने आलेच. या क्षमतेचे अथवा सामर्थ्याचे वाटपही निसर्गातच मुदलात समान नसते. आपल्या स्वातंत्र्याच्या कक्षा वर्धिष्णू करण्याची क्षमता अधिक असणाऱ्या व्यक्ती अथवा लोकसमूह आपले साम्राज्य विस्तारण्याचा खटाटोप बळजोरपणे सुरू ठेवतात. या चढाओढीत प्रथम बळी जातो तो समतेच्या तत्त्वाचा! या विषमतेचे चटके बसणारे समाजघटक, साहजिकच संबंधित विषम व्यवस्थेच्या विरोधात आवाज उठवतात. परिणामी, मार्क्सच्या मांडणीतील विरोध-विकासाच्या चक्रनेमिक्रमानुसार समग्र लोकव्यवहार उत्क्रांतीच्या मार्गावर गतिमान राहतो.

स्वातंत्र्य आणि समता या दोन आदितत्त्वांच्या सहसंबंधांचा, थेट प्रागैतिहासिक काळापासून भारतीय समाजव्यवहारात साकारत आलेला गतिमान आलेख शब्दबद्ध करणारा ‘महाराष्ट्राची लोकयात्रा’ हा प्रा. डॉ. सदानंद मोरे यांचा बृहद्ग्रंथ म्हणजे एक असाधारण, मौलिक असे अक्षरलेणे होय.

परंपरेचे कमालीचे सूक्ष्म आणि प्रगल्भ वाचन, औरसचौरस असे साक्षेपी संशोधन, उपलब्ध आधारभूत साधनसाहित्याची चिकित्सक छाननी करण्याची परिपक्व अशी संशोधकीय दृष्टी, ‘समाज’ नावाच्या लोकसंस्थेची निर्मिती, जडणघडण आणि वाटचाल यांतील गाभासूत्र जाणून घेण्याची निरलस जिज्ञासा, परिवर्तन आणि सातत्य यांचा इतिहासाच्या विशाल पटलावर चालू असलेला लपंडाव आस्थेवाईकपणे न्याहाळून, काळाच्या विविध टप्प्यांवर त्यांतून उमलणारे आकृतिबंध आणि त्यांतील साधर्म्य-वैधर्म्य अचूक हेरण्याची मायाळू प्रज्ञा, लोकमानसाला आकार देणार्‍या नानाविध भल्याबुर्‍या वृत्ती-प्रवृत्तींची त्या-त्या काळातील व्यक्तींच्या तसेच प्रेरणांच्या माध्यमातून अभिव्यक्त होत राहण्याची चिवट प्रकृती, आणि अशा अभिव्यक्तीद्वारे प्रत्येक काळातील लोकजीवनाला लाभत गेलेली गतिमानता संवेदनशीलतेने टिपण्याची बौद्धिक तरलता... अशा अनेकविध क्षमतांच्या प्रा. मोरे यांच्या ठायी साकारलेल्या संगमाचा परिपाक म्हणजे प्रस्तुत ग्रंथ.

वास्तविक पाहता, व्यष्टी तसेच समष्टीच्या ठायी प्रौढ अशी इतिहासदृष्टी विकसित करणे, हे इतिहासाच्या अभ्यासाचे पायाभूत मार्गदर्शक तत्त्व आहे. प्रचलित वर्तमानाचे अंतरंग वस्तुनिष्ठपणे उलगडण्यासाठी अशा इतिहासदृष्टीची निकड असते.

अस्मितांचे कंगोरे कमालीचे टोकदार बनलेल्या आजच्या वर्तमानात, निर्मम स्पर्धेचा माहौल चौफेर नांदताना दिसतो आहे. अशा स्पर्धाळू वातावरणात समतेच्या मूल्याला अवकाश लाभणे दुरापास्त होते. स्पर्धेसाठी का होईना, स्पर्धक ‘जोपासावे’ लागतात, इतपत बंधुतेचाही विसर पडण्याच्या कठीण पर्वामधून वैश्‍विक समुदायाचे संक्रमण आजघडीला चालू आहे. परिणामी, समतेचे मूल्य प्रचंड वावटळीत सापडल्याचे दुर्धर वर्तमान आपण सगळेच अनुभवत आहोत. मात्र, समतेच्या मूल्याचा सातत्यशील मूल्यर्‍हास ही केवळ जागतिकीकरणाच्या विद्यमान पर्वातील स्पर्धेच्या झंझावाताची परिणती नव्हे. समतेचे मूल्य प्रस्थापित करण्यासाठी आजवर प्रत्येकच पर्वादरम्यान लढा उभारावा लागलेला आहे. हे भान समाजमनाच्या ठायी चिरस्थायी बनवण्याचे प्रबळ साधन म्हणून या ग्रंथाचे मूल्य अढळ ठरते.

सर्वांगीण विकासाचे एक अंग गणल्या जाणार्‍या आर्थिक विकासाचा आणि लोकशाही राज्यव्यवस्थेचा असणारा घनिष्ठ आंतरिक संबंध सिद्ध झालेला आहे. तसेच, दुसरीकडे मुक्त बाजारपेठीय व्यवहारांचा पुरस्कार करणारे भांडवलशाहीप्रधान अर्थव्यवस्था आणि आर्थिक विकास व लोकशाही यांचा सहसंबंधही व्यवहारत: सर्वमान्य ठरला आहे. बाजारपेठीय अर्थकारणाची तळी उचलून धरणारे भांडवलशाहीप्रधान अर्थकारण हे व्यक्तिगत आवडीनिवडी आणि व्यावहारिक ऊर्मी-प्रेरणा यांच्या प्रकटीकरणास उन्मुक्त वाव पुरवते; तर लोकशाही राज्यव्यवहारात सर्वसामान्य नागरिकांच्या आशा-आकांक्षा बहरतात. भांडवलशाहीप्रधान आर्थिक विकास आणि लोकशाही राज्यव्यवहार यांच्या आंतरिक नात्याचा जैविक दुवा हा असा आहे.

मात्र, मुक्त बाजारपेठ म्हणजे अनियंत्रित बाजारपेठ नव्हे. सर्व प्रकारच्या निसर्गदत्त क्षमतांचे आणि भौतिक साधनसामग्रीचे वितरण मुळातच असमान असणार्‍या समाजव्यवस्थेमध्ये, खुल्या बाजारपेठीय अर्थव्यवस्थेचे लाभ उठवण्याची क्षमता नसणार्‍या लोकसमूहांच्या हिताचे संरक्षण-संवर्धन करण्यासाठी राज्यसंस्थेला आवश्यक तिथे हस्तक्षेप करावाच लागतो. आर्थिक विकासाच्या लाभांचे समन्यायी वाटप होण्याची ती जणू पूर्वअटच ठरते. अपुर्‍या बळापायी स्पर्धेमध्ये पिछाडीवर पडणार्‍या समाजघटकांच्या समांतर विकासाकरिता सक्रिय होण्यासाठीच लोकव्यवहारात बंधुतेच्या तत्त्वाचा परिपोष डोळसपणे घडवून आणावा लागतो.

स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या तीन आधुनिक मूल्यांचा लोकशाही राज्यव्यवस्थेच्या गाभ्याशी थेट अनुबंध आहे. या अनुबंधाचा अंकुर बाराव्या शतकापासून ऊर्जस्वल बनलेल्या संतांच्या चळवळीमधून धुमारलेला आहे. हे एरवी सहजासहजी आकलनाच्या कक्षेत न येणारे वास्तव ठळकपणे पृष्ठभागावर आणणे, हे प्रा. मोरे यांच्या या ग्रंथाचे अपूर्वपण होय.


हेही वाचा : परिवर्तनशीलता हा जीवनाचा स्थायीभाव - सोमनाथ कोमरपंत


आध्यात्मिक लोकशाहीचा पाया संतांनी रचला, या प्रतिपादनाचा सत्वांश आपल्याला सर्वार्थाने आकळलेला असतोच असे नाही. प्रत्येक व्यक्तीचे सार्वभौमत्व मान्य करणे आणि जपणे, हा तर लोकशाहीचा गाभा. विद्यमान युगात व्यक्तीच्या सार्वभौमत्वाला संरक्षक कवच लाभते ते राज्यघटनेचे. आधुनिक लोकशाही व्यवस्थेचा पायरव आसमंतात उमटण्याच्या शक्यताही नसलेल्या काळात संतांच्या चळवळीने प्रत्येक जिवाचे निसर्गदत्त असे स्वायत्त सार्वभौमत्व जोडले ते दृश्य विश्‍वाचे अधिष्ठान असणार्‍या विश्‍वचैतन्याच्या स्वायत्ततेशी. या अजोड कार्यकर्तृत्वाचे तत्त्वदर्शन साकारले ज्ञानदेवांनी; तर त्या प्रक्रियेचे व्यावहारिक दर्शन प्रकटले तुकोबांच्या जीवनसंघर्षाद्वारे!

कुटुंबसंस्था, राज्यसंस्था, अर्थसंस्था, न्यायसंस्था अशा बहुविध संस्थांवर प्रबळ नियंत्रण राखणार्‍या आणि जीवनाच्या विविध अंगांत रुजलेल्या अधिकारभेदावर मान्यतेची मोहोर उमटवत समतेचा प्रवाह अवरुद्ध करण्याच्या धर्मसंस्थेच्या सर्वंकष अधिसत्तेला मध्ययुगात आव्हान देणार्‍या त्या संतऊर्मींचेच पाथेय जपत-जोपासत स्वातंत्र्यप्राप्तीच्या संगराला समतेसाठीच्या संघर्षाची जोड एकोणिसाव्या शतकापासून सुधारकाग्रणींनी कशी पुरवली, यांचा प्रा. मोरे यांनी या ग्रंथामध्ये चितारलेला शब्दालेख सघन अशा आंतरिक समृद्धीची अनुभूती प्रदान करणारा असाच आहे. सत्यशोधक समाजाची महात्मा फुलेकृत स्थापना हा समतासंघर्षाच्या त्या पर्वाचा ठरतो पाया; तर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या अजोड परिश्रमांद्वारे साकारलेली भारतीय राज्यघटना ही ठरते त्याच पर्वाची सर्वोच्च परिणती!

गतकालाच्या सम्यक् आकलनाद्वारे कालोचित बोध ग्रहण करण्याबाबत भागवतधर्मी संत आणि सुधारक यांच्या दरम्यानची समरूपता नेमकी हेरण्यात प्रा. मोरे यांच्या प्रस्तुत ग्रंथातील अवघ्या विश्‍लेषणाची मार्मिकता एकवटलेली आहे. बुरसट, संकुचित आणि विकृत धर्माचरणाद्वारे तत्कालीन मराठी समाजव्यवहारात उदंड माजलेल्या विस्कळीतपणापायी यादवसत्ता अस्तंगत झाली. महाराष्ट्राची भूमी परसत्तेच्या अमलाखाली आली. हे उमगलेल्या संतविचाराने मूल्यपरंपरेतील सत्वांश जागवत समतेची पेरणी आरंभली. एकंदरच समाजव्यवहारावर प्रभाव असणार्‍या धर्मपरंपरेची सश्रद्ध चिकित्सा हाती घेत संतांनी तिच्यातील गाभ्याचे विस्तारक आणि सर्वसमावेशक उपयोजन प्रवर्तित केले. ज्ञानोबा-तुकोबांच्या पुढ्यात त्या संदर्भात आदर्श होता महर्षी व्यासांचा! भागवतधर्मी संतांनी मशागत केलेल्या समता सिंचित भूमीमधूनच शिवकालात स्वातंत्र्याचे अंकुरण साकारले.

समतेचे अस्तर लाभलेले स्वातंत्र्यच निकोप आणि शाश्वत शाबीत होत असते, हा धडा संतविचारांच्या डोळस आकलनाद्वारे मनीमानसी मुरवलेली लोकहितवादी-फुले-रानडे-शिंदे-शाहू-आंबेडकर ही सारी सुधारक परंपरा समतासंगरात कशी सक्रिय बनली, याचा विश्‍लेषक विचारपट विस्तारत प्रा. मोरे तोच धागा डॉ. नरेंद्र दाभोलकरप्रणीत लढ्याशी जोडतात.

‘परंपरेचा अर्थ विस्तारक आणि म्हणूनच सर्वसमावेशक पद्धतीने लावायचा, की संकुचित, विभाजनवादी पद्धतीने?’ हा या सगळ्या वाटचालीदरम्यान सतत पुढ्यात येत राहिलेला कळीचा मुद्दा होय. या दोन्ही प्रवाहांचे समर्थक सर्वच काळातील समाजव्यवहारात आपापल्या परीने आपली भूमिका लावून धरताना दिसतात. न्यायमूर्ती रानडे आणि महर्षी शिंदे हे परंपरेच्या सर्वसमावेशक अन्वयार्थाचे समर्थक; तर इतिहासाचार्य राजवाडे आणि चिपळूणकर हे त्याच परंपरेच्या संकुचित स्वीकाराचे पाईक! या दोन भूमिकांमधील संघर्ष हा मुळात झगडा होय दोन प्रवृत्तींमधील. याच दोन वृत्ती-प्रवृत्तींचे प्रतिनिधी समकालीन लोकव्यवहारात आजही दृष्टोत्पत्तीस पडतात.

महाभारत आणि विशेषत: त्यांतील कृष्णनीती हा प्रा. मोरे यांच्या चिरंतन चिंतनाचा प्रांत. लोकसंग्रह आणि लोकयात्रा या दोन तर महाभारतामधील प्राणभूत संकल्पना. ऐहिक-पारलौकिक कल्याणाच्या साधनेद्वारे समाजजीवन निरामय बनायचे असेल तर लोकसंग्रहाद्वारे सामूहिक ऊर्जेचे जागरण-उपयोजन घडून येणे अगत्याचे ठरते. त्यासाठी मुळात समाजपुरुषाची प्रकृती निकोप असावी लागते. स्वातंत्र्य-समता-बंधुता यांची त्रिगुणी मात्रा त्याचसाठी समाजपुरुषाला देणे भाग पडते. हे केवळ एकदाच करून भागणारे काम नसते. अशी लोकसंग्राहक त्रिगुणी मात्रा उगाळत राहण्यासाठी प्रबोधन-परिवर्तनाच्या जोडप्रक्रियांचा पाठपुरावा जारी राखणारी लोकयात्रा गतिमान राखावी लागते. प्रस्तुत ग्रंथाद्वारे प्रकटलेल्या प्रा. मोरे यांच्या अक्षरश्रमांचा सारभूत सांगावा नेमका हाच तर होय!

महाराष्ट्राची लोकयात्रा : सामाजिक संघर्ष आणि चळवळींचा इतिहास 
लेखक : डॉ. सदानंद मोरे
प्रकाशक : सकाळ पब्लिकेशन्स   
किंमत : 1299/- पृष्ठसंख्या : 750  

- अभय टिळक, पुणे
agtilak@gmail.com


महाराष्ट्राची लोकयात्रा या पुस्तकाचा प्रकाशन समारंभ जूनअखेरीस होतो आहे. या पुस्तकाची पूर्वनोंदणी सकाळ प्रकाशनाच्या वेबसाईटवर ऑनलाईन करता येईल. 

Tags: साहित्य संस्कृती सदानंद मोरे लोकमान्य ते महात्मा नवे पुस्तक परीक्षण सकाळ प्रकाशन Load More Tags

Comments:

प्रसन्न देशपांडे

हा ग्रंथ "किंडल"वर उपलब्ध आहे का? परिक्षणही आवडलं.

Add Comment

संबंधित लेख