झेलेन्स्कींच्या रूपाने जगाला ‘ज्यू’ नायक कसा मिळाला?

युक्रेनने वर्षानुवर्षं ज्यूंना हाकलण्याचा प्रयत्न केला, त्यांना आता कदाचित आपलंसं केलं जाईल हे या संघर्षाचं एक चांगलं फलित म्हणायला हवं

i24news.tv

युक्रेनियन राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की हे एकेकाळी अतिशय सामान्य नट होते, ज्यांच्यावर काही खासगी स्वरूपाची गाणी चित्रित केली जात होती. झेलेन्स्की यांनी त्यांच्या परकेपणाशी आणि ज्यू असण्याशी निगडीत पारंपरिक गोष्टी ऐकवून युक्रेनियन लोकांचे लक्ष वेधून घेतले. तेव्हा झेलेन्स्कींच्या एकाकी रुपामध्ये युक्रेनियन लोकांना स्वत:ची झलक दिसली असणार. कारण युक्रेनियनांच्या स्वातंत्र्याला असलेला धोका वाढत चालला होता आणि स्वत:ची राष्ट्रीय ओळख टिकवून ठेवण्याचादेखील ते आटोकाट प्रयत्न करत होते. म्हणूनच कदाचित युक्रेनियन लोकभावनेशी त्यांचा मेळ बसला आणि ते अचानक लोकप्रिय झाले. 2019 च्या निवडणुकीत त्यांनी 73 टक्के मते जिंकली. युद्धाच्या आणि अनिश्चिततेच्या या दिवसांत, एक ज्यू व्यक्ती युक्रेनच्या लढाऊ भावनेचे प्रतिनिधित्व करण्यासाठी पुढे आली आहे ही वस्तुस्थिती नक्कीच आशादायक आहे.

युक्रेनियन राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी आपल्या शौर्याने जगाला मोहित केलं आहे. त्यामुळे एकेकाळी पूर्व आणि मध्य युरोपीयन ज्यूंनी स्थलांतर करताना आपल्या अवस्थेवर मात करण्यासाठी जो संघर्ष केला होता, त्याचीच पुन्हा आठवण होते आहे.

इतिहास म्हणजे पुन:पुन्हा घडणाऱ्या निराशाजनक घटनांचे कालचक्र आहे असे काही लोक मानतात. युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे त्यांच्या या समजुतीला पुष्टी मिळणार आहे. असं वाटतं की, एखादी परिचित पटकथा पुन्हा सादर केली जात आहे; फक्त कलाकार तेवढे बदललेले आहेत! अगदी रशियाविरुद्धच्या निदर्शनांमध्ये जे लोकप्रिय फलक दिसताहेत, त्या फलकांवर पुतीनच्या चेहऱ्यावर 20 व्या शतकातल्या त्याच जुन्या बदनाम मिशा चिकटवलेल्या आहेत. पण या युद्धात एक नायक मात्र असा आहे जो अगदी विलक्षण आहे. त्याचं नाव आहे, व्होलोडिमिर झेलेन्स्की.

युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष होण्याआधी झेलेन्स्की हे एक कॉमेडियन होते. या 44 वर्षांच्या व्यक्तीने महान देशभक्ती आणि असामान्य शौर्याचे प्रदर्शन केले आहे. पश्चिमी जगाकडून त्यांना एअरलिफ्टची ऑफर देण्यात आली, तेव्हा त्यांनी देश सोडायला नकार दिला आणि कीवच्या रस्त्यावर उतरलेल्या आपल्या देशवासियांशी त्यांनी स्वत:चे नशिब जोडून घेतले आहे. आज रशियनांसाठी ते ‘नंबर एक’चे टार्गेट आहेत. कारण ते युक्रेनचे प्रथम नागरिक आहेत. राष्ट्राचे प्रतीक म्हणून त्यांचा स्वीकार करण्यामध्ये, त्यांचे ज्यू असणे कुठेही आड आलेले नाही ही इतिहासक्रमातली खरोखरच एक आश्चर्यकारक गोष्ट आहे.  

ज्या सोव्हिएतमध्ये झेलेन्स्की आणि त्यांचे पालक वाढले-घडले, तिथे ज्यूंना नेहमीच स्थलांतरित मानलं जात असे. स्टॅलिनच्या मते हे पंचमस्तंभी, फितूर किंवा मुळं हरवलेले भटके लोक होते. अर्थातच याला वांशिक भेदभावाची आणि नाझी कालखंडातल्या नरसंहाराची पार्श्वभूमी होती. सध्या जिथे युद्धाच्या ठिणग्या उडत आहेत त्या कीव शहराच्या अगदी बाहेरच बाबियार आहे. 1941 साली बाबियारमध्येच दोन दिवसांत 33,771 ज्यूंना गोळ्या घालून दरीत फेकण्यात आलं होतं. आज झेलेन्स्की युक्रेन देशाच्या निळ्या-पिवळ्या ध्वजाचं प्रतिनिधित्व करत आहेत. म्हणजे या देशाने वर्षानुवर्षं ज्यू लोकांना समाजाबाहेर हाकलण्याचा प्रयत्न केला, त्यांना आता इथे कदाचित आपलंसं केलं जाईल हेच या संघर्षाचं एक चांगलं फलित म्हणावं लागेल.  


हेही वाचा : पाच राज्यांतील निवडणुकांचा अन्वयार्थ लावणारी विशेष लेखमाला : पाच राज्यांतील विधानसभा निवडणुका - 2022 


झेलेन्स्की युक्रेनच्या पूर्वेकडील क्रिवीरिह् ह्या रशियन भाषिक शहरात लहानाचे मोठे झाले. बहुतेक सोव्हिएत ज्यूंप्रमाणे, त्यांचेही पालक उच्चशिक्षित होते. त्यांचे वडील गणिताचे प्राध्यापक होते आणि आईने अभियांत्रिकीचे शिक्षण घेतले होते. सोव्हिएत ज्यूंच्या त्या विशिष्ट सामाजिक वर्गात सामान्यत: एवढे शिक्षण घेतले जात असे, तरीही त्यांच्या महत्त्वाकांक्षेला खूपच मर्यादा होत्या. समाज आणि संस्कृतीला आकार देणार्‍या कोणत्याही महत्त्वाच्या क्षेत्रात आपण आपला ठसा उमटवू शकणार नाही हे ज्यांना माहीत होते अशा विशिष्ट वर्गातील ज्यूंकरता काही प्रचलित कार्यक्षेत्रं होती. म्हणून हा वर्ग कौशल्य कमावण्याचा एक मार्ग म्हणून उपयोजित विज्ञानाकडे वळला.

2020 मध्ये एका मुलाखतीत झेलेन्स्की यांना जेव्हा ‘त्यांच्यादृष्टीने ज्यू असण्याचा अर्थ काय’ असे विचारण्यात आले, तेव्हा ते म्हणाले की, 'मी एका सामान्य सोव्हिएत ज्यू कुटुंबातून आलो आहे. आणि सोव्हिएत युनियनमधील बहुतेक ज्यू कुटुंबे धार्मिक नव्हती.' वास्तविक त्यांच्या म्हणण्याचा गर्भितार्थ असा होता की, सोव्हिएत युनियनमध्ये ज्यूंची स्वतंत्र ओळख निर्माण झालेली नव्हती, कारण ती तशी निर्माण होणे शक्य नव्हते. स्टॅलिनच्या काळापासून ज्यू लोकांच्या ‘इंटर्नल पासपोर्ट’मध्ये एक विशिष्ट स्टॅम्प असायचा. (युक्रेनियन किंवा लॅटव्हियन राष्ट्रीयत्वदेखील अशाच प्रकारे दाखवले जात असे) ज्यू समुदायाच्या धार्मिक प्रथांसाठी किंवा सांस्कृतिक अभिव्यक्तीसाठी फारच कमी वाव होता. सोव्हिएत साम्राज्यात युक्रेनियन आणि लॅटव्हियन लोकांना निदान स्वत:ची राष्ट्रीय जन्मभूमी तरी होती. आणि कम्युनिस्ट पक्षाच्या शिस्तीच्या मर्यादेत मावेल इतपत सांस्कृतिक आणि भाषिक अभिव्यक्तिसाठी त्यांना थोडाफार वाव मिळत असे. पण ज्यूंच्या समुदायाकडे मात्र असे काहीही नव्हते. बहुतेक सिनेगॉग्स बंद करण्यात आली होती किंवा त्यावर ‘केजीबी’च्या हेरांची नजर असायची. 1980च्या दशकाच्या उत्तरार्धापर्यंत, ‘पासओव्हर सेडर’सारख्या निरुपद्रवी उत्सवासाठी एकत्र येणं हे देखील विध्वंसक कृत्य मानलं जात असे. हिब्रू भाषा शिकण्याची किंवा शिकवण्याचीदेखील परवानगी नव्हती.

झेलेन्स्की यांच्या वयात येण्याच्या काळात, सोव्हिएत ज्यूंच्या तीन-चार पिढ्यांसाठी त्यांची ‘ज्यू’ ही ओळख जवळपास निरर्थक होती. पासपोर्टवरची ती काळी खूण, बहिष्कृत असल्याची जाणीव आणि दुय्यम दर्जा यातून जन्मणाऱ्या भावनेशिवाय ज्यू समाजापाशी इतर काहीच नव्हते. पुष्किनमध्ये ते कितीही अडकले असले तरी, ते कधीही इतर कोणत्याही राष्ट्राबाबतच्या निष्ठेचा पूर्णपणे दावा करू शकले नाहीत. 1970 च्या दशकात ज्यूंनी स्थलांतरित व्हावे यासाठीच्या दबावाखाली जेव्हा सोव्हिएत युनियन झुकायला लागले, तेव्हा अनेकांनी त्या संधीचा फायदा घेतला. ज्या गणितज्ज्ञ आणि अभियंत्यांनी आपापल्या क्षेत्रात उंची गाठली होती, अगदी त्यांनीदेखील स्थलांतर केले. 1990 च्या दशकाच्या सुरुवातीस, सोव्हिएत युनियनच्या पतनानंतर या प्रवाहाचा एक महापूर बनला आणि सुमारे दीड दशलक्ष ज्यू लोक युनायटेड स्टेटस् आणि इस्रायलकडे निघाले.

झेलेन्स्की आणि त्यांचे कुटुंबीय मात्र सोव्हिएतनंतरच्या जगात तिथेच मिसळून आणि टिकून राहिलेल्या काही लाख ज्यूंपैकी आहेत. तिथेच झेलेन्स्की यांना - प्रथम अभिनेता म्हणून आणि नंतर राजकारणी म्हणून - यश मिळाले. गेल्या 20 वर्षांत दोन परस्परांना छेद देणाऱ्या घडामोडी घडल्या आणि ज्यांच्यामुळे युक्रेनमधील ज्यूंची स्थिती बदलली. एकतर सोव्हिएत युनियनच्या समाप्तीमुळे जे लोक तिथेच राहिले त्या ज्यूंच्या सांस्कृतिक जीवनात काही बदल घडू शकले. झेलेन्स्की जिथे लहानाचे मोठे झाले तिथून जवळच असलेल्या डनिप्रो या पूर्व-युक्रेनियन शहरात आता 10 सिनेगॉग आणि ‘मेनोराह’ नावाचे एक भलेमोठे कम्युनिटी सेंटर 2012 मध्ये उघडले गेले आहेत. डनिप्रोमध्ये फक्त 60,000 ज्यू लोक आहेत आणि या इमारती साधारण 40,000 लोकांना उपयोगी पडतात. प्यू रिसर्च सेंटरच्या सर्वेक्षणानुसार 2019 पर्यंत, सर्व मध्य आणि पूर्व युरोपीय देशांपैकी युक्रेनमध्ये सर्वाधिक ज्यू स्वीकारले गेले.

ज्यू धर्मीयांसाठी अशी नवीन संधीची दारं उघडली जात असताना, गेल्या दशकात मुक्त युक्रेनचे आणि लोकशाहीचे रक्षण करण्यामध्ये ज्यू आघाडीवर होते. ज्यू म्हणून ओळखल्या गेलेल्या अनेक महत्त्वाच्या कार्यकर्त्यांनी 2013 च्या युरोमेडन निदर्शनांमध्ये भाग घेतला. त्यामुळे 2014 च्या सुरुवातीला रशिया समर्थक अध्यक्ष व्हिक्टर यानुकोविच यांना पदच्युत करण्यात आले. त्याच वर्षाच्या उत्तरार्धात, निप्रॉपेट्रोव्स्क प्रदेशाच्या ज्यू गव्हर्नरने पूर्वेकडील फुटीरतावादी रशियन समर्थकांच्या विरोधात मिलिशियाची स्थापना करण्यासाठी व्यक्तिशः मदत केली.

झेलेन्स्की यांचा राजकीय उदयही याच संदर्भात झाला. ‘सर्व्हंट ऑफ द पीपल’ या मालिकेत टेलिव्हिजनवर जी व्यक्तिरेखा झेलेन्स्की यांनी साकारली होती त्यात त्यांच्या राष्ट्रपतीपदापर्यंतच्या चढाईचे भाकीत केले गेले होते, हे आता काहीसे अद्भुतच वाटू शकते. एकेकाळी ते अतिशय सामान्य नट होते, ज्यांच्यावर काही खासगी स्वरूपाची गाणी चित्रित केली जात होती. पण या योगायोगामागेही एक लॉजिक आहे. झेलेन्स्की यांनी त्यांच्या परकेपणाशी आणि ज्यू असण्याशी निगडीत पारंपरिक गोष्टी ऐकवून युक्रेनियन लोकांचे लक्ष वेधून घेतले. तेव्हा झेलेन्स्कींच्या एकाकी रुपामध्ये युक्रेनियन लोकांना स्वत:ची झलक दिसली असणार. कारण युक्रेनियनांच्या स्वातंत्र्याला असलेला धोका वाढत चालला होता आणि स्वत:ची राष्ट्रीय ओळख टिकवून ठेवण्याचादेखील ते आटोकाट प्रयत्न करत होते. म्हणूनच कदाचित युक्रेनियन लोकभावनेशी त्यांचा मेळ बसला आणि ते अचानक लोकप्रिय झाले. 2019 च्या निवडणुकीत त्यांनी 73 टक्के मते जिंकली. युद्धाच्या आणि अनिश्चिततेच्या या दिवसांत, एक ज्यू व्यक्ती युक्रेनच्या लढाऊ भावनेचे प्रतिनिधित्व करण्यासाठी पुढे आली आहे ही वस्तुस्थिती नक्कीच आशादायक आहे. सध्या लष्करी आक्रमण, स्वातंत्र्यावरील आक्रमण या घटनांची पुनरावृत्ती होताना दिसते आहे. पण त्याचसोबत ज्या भूमीमध्ये ज्यूंना सामावून घेतले जाणे आजवर अशक्य होते तिथे ज्यूंचा समावेश आणि स्वीकार होणे या अशक्य वाटणाऱ्या घटनाही आता शक्यतेच्या जवळ आलेल्या दिसतात.

(अनुवाद : वंदना खरे)

- गॅल बेकरमन
('द अटलांटिक' या आंतरराष्ट्रीय नियतकालिकाचे वरिष्ठ संपादक)


'द अटलांटिक'मध्ये प्रसिद्ध झालेला मूळ इंग्रजी लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

Tags: international affairs russia ukraine war Putin Change in Russian Ukrainian situation Ukraine Donetsk People's Republic Ukraine issue रशिया युक्रेन द अटलांटिक अंतरराष्ट्रीय घडामोड युद्ध अनुवाद Load More Tags

Comments:

Daniel M

Interesting Jewish angle..

Add Comment