कंगना राणावतचे त्रांगडे

लोकसभेत जाऊन कंगना काय काय काम करते हे पाहावं लागेल. पण लोकसभा सदस्य होणं, एवढ्यावरच तिची महत्त्वाकांक्षा संपणार नाही एवढं मात्र खरं. 

हिमाचल प्रदेश हे एक छोटं आणि सुंदर राज्य आहे. तिथल्या एकूण फक्त चार लोकसभा मतदारसंघांपैकी मंडी ह्या लोकसभा मतदारसंघातून कंगना भाजपच्या तिकिटावर निवडून आलेली आहे. मंडीमधून 2019 ला सुद्धा भाजपचाच खासदार होता. ह्यावेळी भाजपाने कंगनाला उमेदवार बनवलं. या पाठीमागे तिच्या लोकप्रियतेचा लाभ उठवणं हा उद्देश असावा. भाजपची लाट देशभरातून ओसरत आहे याचा अंदाज वरिष्ठ लोकांना आला होता अशीही एक शक्यता आहे. 

कंगना राणावत ह्या बाई खासदारपदी निवडून आल्याबद्दल काय प्रतिक्रिया असावी ह्याबद्दल संभ्रम आहे.. कोणत्याही क्षेत्रात बाईला यश मिळताना बघणे ही आनंदाची बाब आहे. त्यातही राजकारणासारख्या, पुरुषांनी बजबजलेल्या क्षेत्रात बाईचं यश जास्त महत्त्वाचं मानलं पाहिजे. 

"In films women are essential commodity, but that is not the case in politics." असं एका मुलाखतीत सुश्री जयललिता म्हणाल्या होत्या. त्यामुळे सिनेमाच्या क्षेत्रात राहून राजकारणात यश मिळवणं हे तसं सोपं काम नाही. त्यातही 20 लाख लोकांचं प्रतिनिधित्व करून खासदार बनणं हे साधं काम नाहीच. पण कंगनाने ते करून दाखवलं. या आधी रेखा, जयाप्रदा किंवा हेमामालिनी ह्या अभिनेत्रींनी ही करामत करून दाखवली आहेच. आणि त्यांनी त्यानंतर काय केलं हेही सर्वज्ञात आहे. त्यामुळे कंगना आता काय करेल याची उत्सुकता राहील. 

पण कंगनाला हे यश मिळताना बघून निर्भेळ असा आनंद वाटत नाही. ह्याला कारण म्हणजे तिने वेळोवेळी केलेली वादग्रस्त विधानं!

कंगना तशी महत्त्वाकांक्षी आहे. सामाजिक जीवनात, सोशल मीडियावर ती बरीच व्हर्बल / वाचाळ राहिली आहे. फिल्म इंडस्ट्रीमध्ये ती स्वतःच्या जीवावर आली आणि तगली असं दिसतं. त्यासाठी तिला बराच संघर्ष करावा लागलेला आहे. तिने फिल्म्स आणि स्क्रिप्टससुद्धा खूप काळजीपूर्वक निवडलेल्या आहेत. 

फक्त सोळा वर्षांची असताना ती करिअरवरून वडिलांशी भांडून घर सोडून बाहेर पडली. त्यानंतर वेगवेगळ्या ठिकाणी मॉडेलिंग आणि थिएटर वर्कशॉपस् करीत होती. 2006 मध्ये ‘गँगस्टर’ ह्या चित्रपटातून तिने हिंदी सिनेमामध्ये पदार्पण केलं आणि त्या वर्षीचा ‘सर्वोत्कृष्ट नवोदित अभिनेत्री’ हा ‘फिल्म फेअर’ पुरस्कार तिला मिळाला. तेव्हापासून तिने मागे वळून पाहिलं नाही. तिची यशस्वी घोडदौड अजूनही चालूच आहे.. 

दरम्यानच्या काळात खूप वेगवेगळ्या कारणांनी तिने स्वतःला चर्चेत ठेवलं. त्यात, तिचं तिच्या वडिलांशी झालेलं भांडण असेल किंवा बहिणीसोबत बेबनाव.. ‘नेपोटिझम’संदर्भातील वादामुळे समस्त बॉलीवूडशी पंगा घेणे असेल किंवा हृतिक रोशनशी असलेले भांडण.. ती सतत बोलत राहिली. उपलब्ध सर्व प्लॅटफॉर्मसचा तिने स्वतःच्या फायद्यासाठी अत्यंत हुशारीने उपयोग करून घेतला. ‘लॉकडाउन’च्या काळात बाकीचे बरेच नट लोक ‘टिकटॉक’वर उथळ रील्स तयार करत असताना कंगना विविध सामाजिक विषयांवर बोलत राहिली. 

तिला राजकारणात रस होताच. मधल्या काळात ती मोदींच्या बाजूने बोलत राहिली, जमेल त्या ‘पोलिटिकल कॉन्फ्लिक्ट’मध्ये उलट सुलट विधानं करत राहिली. अशा उलट सुलट विधानांसाठी तिच्यावर आठ वेगवेगळ्या क्रिमिनल केसेस सुरू आहेत अशी माहिती तिच्याबद्दल निवडणूक आयोगाच्या वेबसाइटवरून मिळते. संघ आणि भाजपची माणसं तिचं त्यांच्यात असणं कायम नाकारत राहिली. पण ह्या बाईंनी पिच्छा सोडला नाही. अगदी शेवटची नामांकन यादी जाहीर होईपर्यंत कंगनाला भाजपचं तिकीट मिळेल असं बऱ्याच भक्त लोकांनादेखील वाटत नव्हतं. कंगना किंवा अमृता फडणवीस यांच्यासारख्या स्त्रिया भाजपवाल्यांच्या अवघड जागेचं दुखणं बनून राहतात. त्यांना धड नाकारता येत नाही आणि स्वीकारायलाही जड जातं.

राजकारणातील तिची महत्त्वाकांक्षा ती तिच्या पडद्यावरील आयुष्यात जगत राहिली. पडद्यावर तिने जयललिता, इंदिरा गांधी किंवा झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्या भूमिका साकार केल्या आहेत, आणि ती एक उत्तम अभिनेत्री असल्याचं तिने वेळोवेळी सिद्ध केलं आहे. तसंच, चित्रपट निर्मिती आणि दिग्दर्शन ह्यातही तिने आपला हात आजमावून पाहिला आहे.  

ती स्वतः म्हणते की, ती एका ‘हंबल बॅकग्राऊंड’मधून आली आहे.. पण ते खरं वाटत नाही. तिची आई शाळेत शिक्षिका आणि वडील व्यापारी असले तरी आजोबा आयएएस ऑफिसर आणि पणजोबा आमदार राहिलेले आहेत अशी माहिती विकिपीडियावरून मिळते. म्हणजे, राजकारण तिच्यासाठी नवीन नाही. पण तरीही तिच्या विरुद्ध उभे राहिलेले आणि हरलेले काँग्रेसचे उमेदवार विक्रमादित्य सिंह हे स्थानिक राजघराण्यातील आहेत, त्यामुळे ते मोठं प्रस्थ दिसतं. याही कारणाने एवढ्या लहान वयात कंगनाला हे यश मिळवता आलं याकडे दुर्लक्ष करता येत नाही. 

हिमाचल प्रदेश हे एक छोटं आणि सुंदर राज्य आहे. तिथल्या एकूण फक्त चार लोकसभा मतदारसंघांपैकी मंडी ह्या लोकसभा मतदारसंघातून कंगना भाजपच्या तिकिटावर निवडून आलेली आहे. मंडीमधून 2019 ला सुद्धा भाजपचाच खासदार होता. ह्यावेळी भाजपाने कंगनाला उमेदवार बनवलं. या पाठीमागे तिच्या लोकप्रियतेचा लाभ उठवणं हा उद्देश असावा. भाजपची लाट देशभरातून ओसरत आहे याचा अंदाज वरिष्ठ लोकांना आला होता अशीही एक शक्यता आहे. 

कंगना सार्वजनिक जीवनात ‘बेस्ट ड्रेस्ड सेलिब्रिटी’ म्हणून ओळखली जाते. अर्थातच तिची कपड्यांची निवड (ड्रेसिंग सेन्स) चांगली आहे. त्यातून तिने चांगली छाप पाडली आहे. ह्यासाठी तिच्या टीमचं कौतुक करावं लागेल. ती तिच्या ‘एअरपोर्ट लुक्स’साठी खूप प्रसिद्ध आहे. तसंच, मधल्या काळात ‘सर्वात जास्त इनकम टॅक्स भरणारी सेलिब्रिटी’ असा स्वतःचा प्रचारसुद्धा तिने केला होता. 


हेही वाचा : कुलविंदरला माझा सलाम! - सुरेश द्वादशीवार


एवढं सगळं असूनही ती बऱ्याच जणांना आवडत नाही. अलीकडेच चंदीगड  विमानतळावर एका महिला सुरक्षारक्षकाने तिला थोबाडीत मारल्याचं प्रकरण बरंच गाजलं. कारण त्या घटनेच्या काहीच दिवस आधी ती शेतकरी आंदोलनाबाबत म्हणाली होती की, तिथली माणसं 100 रुपये देऊन बोलावलेली आहेत. अशा विधानांनी तिला लवकर प्रसिद्धी आणि कव्हरेज मिळत गेलंय हे खरंय. पण आता सार्वजनिक जीवनात तिने जीभ सांभाळून बोलणं खूप गरजेचं आहे. एक खासदार म्हणून वावरताना, वेगवेगळ्या विषयांवर भूमिका घेताना स्वार्थ सोडून किमान संवेदनशीलता बाळगणं अपेक्षित आहे. लोकसभा सदस्य म्हणून तिला बरीच शक्ती आता मिळेल.. तिचा योग्य उपयोग केला तर खूप चांगलं काम तिला करता येईल आणि बदल घडवून आणता येईल. ज्या वेगवेगळ्या मुद्द्यांबाबत ती सोशल मीडियामधून पोटतिडकीने बोलत होती (किंवा तसा अभिनय करत होती) त्यासाठी खरं काम करण्याची तिला संधी मिळाली आहे. त्या संधीचा ती किती चांगला उपयोग करून घेते हे येणारा काळच सांगेल. पण लोकसभेत आणखी एका बेजबाबदार व्यक्तीची भर पडली असं शेवटी वाटू नये म्हणजे झालं! 

- स्नेहलता जाधव, सोलापूर
snehalatajj@gmail.com
(लेखिका, के.एन. भिसे कला व वाणिज्य महाविद्यालय, कुर्डूवाडी येथे प्राध्यापक आहेत.)

Tags: politics film industry loksabha elections himachal pradesh congress bjp narendra modi propaganda the curious case of kanagana Load More Tags

Comments:

Omkar Awchar

अग कांगना तु अपघातान निवडून आलीस पाचवर्शानन्तर् त्या अश्लील नरकात जाणार आहेस.

बाबुराव शिंदे

कंगना राणावत यांच्याबाबत आपण नोंदवलेली निरीक्षणे रास्त... पण तिच्या जोडीला अमृता फडणवीस यांना का ओढले बरे..? कंगना ही बंडखोर मुलगी आहे. संघर्ष करून.. लोक चर्चेची पत्रास न बाळगता आपल्या अभिनय गुणांवर पुढे आलेली अभिनेत्री आहे. आता तुम्ही सांगितलेला सल्ला तिने मानला तर ती उत्तम लोकप्रतिनिधी म्हणून घडू शकेल. परवा विमानतळावर झालेल्या प्रकार अनुचितच होता .तिने तो टाळायला हवा होता, असो.तूर्त तरी तिला शुभेच्छा देऊन काही काळ तिच्याकडून चांगल्या वर्तनाची आणि कामगिरीची वाट पाहायला हवी..,असे वाटते...

Add Comment