‘दंगल गर्ल’ लीना सिद्दी

उत्तर कर्नाटकातील सिद्दी समाज : 12

देशातील विविध राज्यांमध्ये झालेल्या राष्ट्रीय कुस्तीस्पर्धेत बाजी मारुन लीनानं स्वतःला सिद्ध केलं आहे. मानाच्या कुस्तीस्पर्धांमध्ये तिनं सहा गदा पटकावल्या आहेत. 19 वर्षाखालील कुस्तीस्पर्धा खेळणाऱ्या लीनाला केंद्र सरकारच्या ‘खेलो इंडिया’ योजनेकडून पुढील आठ वर्षांसाठी दरमहा फेलोशिप मंजूर झाली आहे. तिचं खेळातील यश पाहून केंद्र सरकारकडून तीन लाख आणि कर्नाटक राज्य सरकारकडून दीड लाख रुपयांचं मानधनही मिळालं आहे. असं असलं तरी समाजाची विकृत नजर आणि मानसिकतेमुळं लीना खचून जाते. ती खचून जाऊ नये यासाठी तिचे वडील स्वतः तिच्या पाठीशी खंबीरपणं उभे आहेत.

‘एका तळ्यात होती बदके पिले सुरेख
होते कुरूप वेडे पिल्लू तयांत एक
कोणी न त्यास घेई खेळावयास संगे
सर्वांहुनी निराळे ते वेगळे तरंगे
दावूनी बोट त्याला म्हणती हसून लोक
आहे कुरूप वेडे पिल्लू तयांत एक’

कवी ग.दि.माडगूळकर यांनी लिहिलेल्या ओळी या सिद्दी समाजातील कुस्तीपटू लीना सिद्दी हिला अगदी चपलख लागू  होतात. कवितेतील त्या वेड्या कुरूप पिल्लासारखीच तिची कथा म्हणावी लागेल. जगाला वेडं, कुरूप वाटणारं हे पिल्लू खरं तर राजहंस असल्याची ओळख आता कुठं पटायला लागली आहे. त्याची सुरुवात तिच्या कुस्तीतील दमदार कामगिरीद्वारे झाली. कर्नाटकातल्या हलियाल तालुक्यातील ‘दोडकोप्पा’ हे एक छोटंसं गाव. याच गावातील 12 वीच्या वर्गात शिकणाऱ्या लीनानं राष्ट्रीय पातळीवरील कुस्तीस्पर्धेत स्वतःची छाप सोडली आहे. ऑलिम्पिक स्पर्धेत देशाला सुवर्णपदक मिळवून देण्याचं स्वप्न उराशी बाळगून तिची वाटचाल सुरू आहे.

पण हे सगळं एवढं सहज झालेलं नाही. कुस्तीमधील तिचं कौशल्य न पाहता तिचं सिद्दी असणं, तिचं दिसणं यावरून, रंगरूपावरून अनेक ठिकाणी तुच्छतेच्या वागणुकीचा, भेदभावाचा सामना तिला करावा लागला. तिच्याशी मैत्री तर सोडाच ओळखही करून घेण्यासाठी कोणी तयार नसायचं. कुस्तीच्या स्पर्धांना गेल्यावर एका बाजूला बसावं लागणं, कोणीही न बोलणं, कुस्ती खेळताना लोकांमधून येणारे गलिच्छ शेरे या सगळ्यांचा सामना तिला करावा लागला. पण कोणत्याही परिस्थिती स्वतःचं कुस्तीवरील लक्ष्य पक्कं करत, मानसिक संतुलन ढळू न देता ती नेटानं खेळत राहिली. तालुका, जिल्हा, राज्य आणि राष्ट्रीय पातळीवरील कुस्तीस्पर्धा जिंकत राहिली. देशातील विविध राज्यांमध्ये झालेल्या राष्ट्रीय कुस्तीस्पर्धेत बाजी मारुन लीनानं स्वतःला सिद्ध केलं आहे.

मानाच्या कुस्तीस्पर्धांमध्ये तिनं सहा गदा पटकावल्या आहेत. 19 वर्षाखालील कुस्तीस्पर्धा खेळणाऱ्या लीनाला केंद्र सरकारच्या ‘खेलो इंडिया’ योजनेकडून पुढील आठ वर्षांसाठी दरमहा फेलोशिप मंजूर झाली आहे. तिचं खेळातील यश पाहून केंद्र सरकारकडून तीन लाख आणि कर्नाटक राज्य सरकारकडून दीड लाख रुपयांचं मानधनही मिळालं आहे. असं असलं तरी समाजाची विकृत नजर आणि मानसिकतेमुळं लीना खचून जाते. ती खचून जाऊ नये यासाठी तिचे वडील स्वतः तिच्या पाठीशी खंबीरपणं उभे आहेत.

कुस्तीवर आधारित ‘दंगल’ सिनेमा सर्वांनी पाहिला. त्यातील प्रत्येक पात्राला प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलं. हरियाणातील महावीर फोगाट आणि त्यांच्या दोन पैलवान मुलींच्या आयुष्यावरील हा सिनेमा. या बापानं सर्व प्रकारची सामाजिक बंधनं झुगारून, वेळप्रसंगी अपमान सहन करून दोन्ही मुलींना आंतराराष्ट्रीय दर्जाचं कुस्तीपटू बनवलं हे दंगल सिनेमाच्या माध्यमातून साऱ्या जगाला माहीत झालं. पण असाच एक महावीर दंगल सिनेमा येण्याच्या आधीपासून आपल्या मुलींना जागतिक दर्जाचा पैलवान बनविण्यासाठी दिवसरात्र झटत आहे. त्यांचे नाव आहे अंथोन सिद्दी. लीनाचे वडील. राष्ट्रीय पातळीपर्यंत आपल्या मुलीला घेऊन जाण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे. महावीर फोगाट आणि अंथोन सिद्दी यांच्या जीवनात बरंच साम्य आहे. मुलाच्या आशेपोटी अंथोन यांना नऊ मुली झाल्या. त्यातील तीन मुली कुस्तीचं प्रशिक्षण घेत आहेत. त्यातील मोठी मुलगी अर्पणा कुस्ती प्रशिक्षकाचा अभ्यासक्रम (बीपीएड) पूर्ण करत आहे. चांगल्या प्रशिक्षकाअभावी सिद्दी मुलं खेळात निपुण असूनही पुढं जाऊ शकत नाहीत, याचा फटका स्वतः अर्पणालासुद्धा बसल्यामुळं तिनं हा निर्णय घेतला. तिसरी मुलगी सहावीत असून ती हलियालमधील कर्नाटक क्रीडा प्राधिकरणाच्या कुस्ती संकुलात कुस्तीचे प्रशिक्षण घेत आहे.

दोन वेळच्या जेवणाची भ्रांत असणारं हे कुटुंब. शासनाची मदत आता मिळते. पण सुरुवातीला भातात पाणी घालून खावं लागत होतं आणि त्यावरच कुस्तीचा सराव करावा लागत होता. प्रशिक्षकाची वानवा असल्यामुळं अंथोन स्वतःच लीनाचे प्रशिक्षक बनले. आजही त्यांचा दिवस पहाटे साडेपाचला सुरू होतो. सकाळी दोन तास व्यायाम करून घेतला जातो. त्यानंतर शाळा आणि सायंकाळी पुन्हा हलियालमधील कुस्ती संकुलात तीन तास कुस्तीचा सराव केला जातो.   

स्वतः एक चांगला खेळाडू असूनही केवळ परिस्थितीनं मागं राहिलेल्या अंथोन यांनी मुलींना मोठ्या खेळाडू बनविण्याचं स्वप्न उराशी बाळगलं आहे. जिथं आजही कळ्या गर्भातच खुडल्या जातात, जन्माला आलीच, तरी दुसऱ्याच्या घरचं धन म्हणून तिच्याकडं पाहिलं जातं, तिचं संपूर्ण आयुष्य सामाजिक बंधनांमधे अडकवून ठेवलं जातं अशा काळात अंथोन मात्र तसा विचार करत नाहीत. मुलींचं ओझं त्यांना वाटत नाही. या मुलीच त्यांची ताकद असल्याचं ते सांगतात. आजच्या काळातील हे दुर्मिळ आणि प्रेरणादायी उदाहरण. कुठलीही सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक पार्श्वभूमी नसलेल्या कुटुंबातील मुली बापाच्या मदतीनं खेळाच्या माध्यमातून स्वतःच्या अस्तित्वाच्या वाटा शोधत आहेत. संपूर्ण देशानं आदर्श घ्यावा असंच हे घर आहे.

- ज्योती भालेराव - बनकर
bhaleraoj20@gmail.com


लेखातील छायाचित्रे सूरज निर्मळे यांनी काढलेली आहेत.


प्रिय वाचकहो,
साधनाचे भूतपूर्व संपादक यदुनाथ थत्ते, वसंत बापट, ग. प्र. प्रधान या तिघांचे जन्मशताब्दी वर्ष चालू आहे. हा रिपोर्ताज त्या तिघांच्या स्मृतिला अर्पण करीत आहोत. या अभ्यासासाठी दिलेली फेलोशिप 'थत्ते बापट प्रधान फेलोशिप' या नावाने ओळखली जाईल! आणि एक आवाहन ...

1. या रिपोर्ताजसाठी दिलेल्या फेलोशिपच्या रकमेतून, या पाच तरुणांना पुरेसे मानधन राहिले नाही. त्यांना ते देता यावे असा प्रयत्न आहे.
2. शिक्षण घेणाऱ्या सिद्दी समाजातील मुलामुलींना आणि काही गावांना मदतीची गरज आहे.
3. अशा प्रकारच्या अन्य विषयांवरील अभ्यासासाठी साधनाकडे फेलोशिप मागणारे सात-आठ चांगले प्रस्ताव आलेले आहेत. 

वरील तीनपैकी कोणत्याही कारणासाठी कोणी आर्थिक मदत करू इच्छित असेल तर कृपया आमच्याशी संपर्क साधा. 'साधना ट्रस्ट'च्या बँक खात्यावर देणगी स्वीकारता येईल. (साधनाकडे 80 G आहे), नंतर तिची योग्य प्रकारे कार्यवाही होईल, त्याचे सर्व तपशील संबंधितांना कळवले जातील.
धन्यवाद! 

विनोद शिरसाठ, संपादक, साधना 
weeklysadhana@gmail.com
Mob : 9850257724

प्रवीण खुंटे (सिद्दी समाज रिपोर्ताजचा समन्वयक)
kpravin1720@gmail.com
Mob : 9730262119

Tags: सिद्दी समाज आदिवासी डॉक्युमेंटरी कर्नाटक दुर्लक्षित समाज अनुसूचित जाती अनुसूचित जमाती आरक्षण संशोधन लेखमाला उत्तर कर्नाटकातील सिद्दी समाज Load More Tags

Add Comment

संबंधित लेख