गोखल्यांचा स्वभाव व इतर गुण

साने गुरुजींचे पहिले पुस्तक, नामदार गोखले यांच्या पहिल्या मराठी चरित्राची नवी आवृत्ती साधनाकडून आली आहे, त्यानिमित्ताने त्यातील एका प्रकरणाचा संपादित अंश..

9 मे 1866 ते 19 फेब्रुवारी 1915 असे जेमतेम 49 वर्षांचे आयुष्य लाभलेल्या गोपाळ कृष्ण गोखले यांचे दहावे स्मृतीवर्ष सुरू झाले तेव्हा, म्हणजे 1924 मध्ये मुंबई विद्यापीठाने एक स्पर्धा जाहीर केली, नामदार गोखले यांचे चरित्र लिहिण्याची. तेव्हा केवळ 24 वर्षे वय असलेल्या आणि नुकतीच एम.ए.ची परीक्षा उत्तीर्ण झालेल्या पांडुरंग सदाशिव साने या तरुणाने त्या स्पर्धेत भाग घेतला. नामदार गोखले यांचे चरित्र लिहायला सुरुवात केली, ते मोठे होत गेले, तब्बल साडेतीनशे पानांचे झाले. मात्र तोपर्यंत स्पर्धेसाठी लेखन पाठवण्याची मुदत संपली होती. त्यानंतर त्या विद्यार्थ्याचे शिक्षक दत्तो वामन पोतदार यांनी ताम्हणकर नावाच्या प्रकाशकाला सांगून ते पुस्तक प्रकाशित केले. नामदार गोखले यांच्यावर विस्तृत लिहिले गेलेले ते पहिले चरित्र आणि त्या तरुणाने लिहिलेले ते पहिले पुस्तक. तोच तरुण भविष्यात साने गुरुजी या नावाने ओळखला गेला. ते पुस्तक पहिल्यांदा प्रकाशित झाले त्या घटनेला आता 99 वर्षे पूर्ण होत आहेत. त्या निमित्ताने त्या पुस्तकाची नवी आवृत्ती साधना प्रकाशनाकडून आली आहे. 

प्रत्येकाच्या स्वभावात काही ना काही तरी वैशिष्ट्य असते. सद्गुणांचा पुतळा एक परमेश्वरच असून, अपूर्ण राहण्यातच मौज व माणूसपणा आहे. ज्या मनुष्यात गुण व दोष यांचे संमिश्रण असते तो जनतेस फार आवडतो. चंद्र हा कलंकामुळे जास्तच खुलतो. गोखल्यांच्या स्वभावात अशीच मौज आहे.

त्यांचा मुख्य अवगुण म्हटला म्हणजे तापटपणा, हट्टीपणा. त्यांच्या विरुद्ध काही झाले की ते संतापत. रानड्यांच्या उदाहरणाने त्यांनी स्वतःचा दुर्गुण घालविण्याचा पुष्कळ प्रयत्न केला; परंतु थोड्या बहुत प्रमाणाने तो टिकलाच. त्यांच्या एखाद्या नोकराने जर सोसायटीचे काम वेळच्या वेळी केले नाही, तर ते संतापावयाचे आणि त्यास रागे भरावयाचे; परंतु मागून त्यांचे त्यांनाच वाईट वाटे. आपण त्यास फार बोललो असे वाटून ते त्या गड्यास हाक मारीत आणि म्हणत, 'अरे, काम वेळच्या वेळी करावे; टपालासारखे काम महत्त्वाचे असते. ते तू केले नाहीस म्हणून मी रागे भरलो, परंतु असे करू नको व मनात फार वाईट वाटू देऊ नको.' वादविवादात स्वतः चेच म्हणणे खरे, असे त्यांस वाटावयाचे व ते हमरीतुमरीवर यावयाचे, चिडावयाचे; परंतु मागून ते आपली चूक कबूल करीत. पुष्कळ लोकांस आपली चूक कळली तरी ती कबूल करण्यात कमीपणा वाटतो. परंतु गोखल्यांस असे वाटत नसे आणि खरोखरच स्वतःची चूक कबूल करण्यास मनाचे फारच मोठे धैर्य लागते. गोखल्यांत आणि त्यांच्या शिष्यांत - गांधींमध्ये - हा गुण उत्कटत्वाने वास करीत आहे. हट्टीपणाबरोबरच त्यांच्या अंगी उतावळेपणाही होता. एखादी गोष्ट मनात आली, की ती ताबडतोब अमलात आली पाहिजे असे त्यांस वाटे. एखाद्या गोष्टीची शंका आली, की लगेच ते दुसऱ्याला कळवावयाचे. 

कपड्यात नोक-झोक नसला, तरी देश तसा वेश ते करीत. कपड्याची घडी, इस्तरी बिघडू नये म्हणून ते फार जपत. दक्षिण आफ्रिकेत महात्मा गांधी त्यांच्या कपड्यालत्त्यांविषयी विशेष काळजी घेत. परंतु एकंदरीत ते साधेच होते. त्यांचा पोषाख सभ्यतेसाठी असे; दिमाखासाठी नसे. त्यांस कसलेही व्यसन नव्हते. 1897 पूर्वी ते चहासुद्धा पीत नसत. इंग्लंडहून आल्यावर मात्र ते चहा घेऊ लागले. विडी, सुपारी वगैरेचे तर त्यांस वारेही नव्हते. विडीच्या धुराचा वास त्यांस अगदी सहन व्हावयाचा नाही. त्यांच्या घरातील कोणा माणसाने विडी वगैरे ओढली असता, त्यांस जर गोपाळरावांनी बोलाविले, तर तो वेलदोडा, लवंग, काही तरी खाऊन मग पुढे जावयाचा. 

पुण्यास असले तरी ते सर्वदा सोसायटीतील आपल्या बैठकीच्या जागी असावयाचे. जेवणखाण सर्व तेथेच. फक्त दिवाळीच्या दिवशी आपल्या मित्र- मंडळीसह घरी जाऊन फराळ करावयाचे. इतके त्यांचे सोसायटीवर प्रेम असे. सोसायटीविषयी किंवा तिच्या उदात्त हेतूविषयी कोणी थट्टा केल्यास त्यांस आवडत नसे. एकदा नेव्हिन्सन् जेव्हा पुण्यास आला होता, तेव्हा त्यास व इतर मित्रमंडळीस गोखल्यांनी सोसायटीत फराळास बोलाविले. केळीची पाने वगैरे सर्व देशी थाट होता. नंतर विडे वगैरे झाले. गप्पागोष्टी निघता निघता 'इंग्लंड व हिंदुस्थान यांचा संबंध परमेश्वराने आणला आहे' आणि गोखल्यांच्या सोसायटीच्या ध्येयपत्रिकेतील 'Inscrutable Dispensation' या शब्दांविषयी वाद निघाला. सर्व जण हसले; परंतु गोपाळरावांस हसू आले नाही. त्यांच्या तोंडावर गांभीर्य व विचारसौंदर्य हीच प्रतिबिंबित झालेली होती. ज्या गोष्टीवर आपली आत्यंतिक श्रद्धा असते, तिची हेटाळणी, वाटाघाट कोणी केल्यास आपणांस राग येतो; परंतु गोखले आपल्या मनोविकारांवर दाब ठेवण्यास शिकले होते.

गोपाळरावांचा स्वभाव नादी होता. एखादी गोष्ट मनात आली की काही दिवस ते तिचाच पिच्छा पुरवावयाचे. एकदा लॅटिन शिकावयाचे मनात आले तेव्हा त्यांनी त्या विषयाची पुस्तके मागावली. परंतु काही दिवसांनी त्यांना त्या पुस्तकांची आठवणही राहिली नाही व पुस्तके धूळ खात पडली. 1900 नंतर जेव्हा त्यांची द्वितीय पत्नी परलोकवासी झाली, रानडेही गेले आणि 1897 चे शल्य अजून टोचतच होते, अशा मनाच्या अत्यंत अशांत स्थितीत, त्यांच्या काही मित्रांनी त्यांस गाणे शिकण्यास विनंती केली. गाणे ही एक दैवी कला आहे; हा पंचम वेद आहे; दुःखी जगाचा, त्रासाचा, उद्विग्नतेचा विसर पाडून निर्विकल्प अशा आनंदसागरात पोहावयास लावणारी ही गायन कला धन्य होय ! गाण्याच्या आलापाने विलापाचे परिवर्तन होते; हृदय हलके होते; मन मोकळे होते. गोपाळरावांस हे म्हणणे पटले आणि त्या वेळचे प्रसिद्ध गाणारे बाळकोबा नाटेकर यांस त्यांनी आपणास गायन शिकविण्यासाठी ठेविले. लगेच सांगली मिरजहून तंबोरे, तबले, सतारी यांचा साग्र संच जमविला; परंतु शेवटी बाळकोबा म्हणाले, "तुम्ही जन्मभर शिकला तरी तुम्हाला गाणे येणार नाही." हा अव्यापारेषु व्यापार होता. कारण गाणे ही ईश्वरी देणगी आहे. प्रत्येक मनुष्य कोणत्या तरी विशिष्ट कार्यार्थ निपजलेला असतो. सर्वत्र सारखे प्रावीण्य मिळविणारा असा गटेसारखा एखादाच महापंडित निघतो. व्याख्याने वगैरे देताना जरी गोपाळरावांचा आवाज परिणामकारी असला तरी गाण्यात काही जमेना. शेवटी त्यांनी हा नाद सोडून दिला.

न्यू इंग्लिश स्कूलमध्ये शिरल्यानंतर त्यांस क्रिकेटचा तर फारच नाद लागला. भिडे म्हणून एक मुलगा उत्तम चेंडू फेकणारा होता. 'जितके वेळा मला 'आउट' करशील, तितके आणे तुला देईन' अशी पैज लावून गोखले खेळावयाचे.

1907-8 च्या सुमारास त्यांस योगाचाही अभ्यास करावयाची हुक्की आली. पुण्यात त्या वेळेस कोणी एक आयंगार दवाखाना घालून होमिओपथीचा व्यवसाय करीत होता. त्याच्याजवळ गोखले योगाचा अभ्यास करण्यास जात. त्यांनी हे कोणास कळविले नव्हते; परंतु पुढे हे सर्व उघडकीस आले. गोखल्यांनी तो नाद सोडला. ते म्हणाले, "मी ध्यानधारणा करू लागलो की, इतर सर्व ध्याने बाजूस राहून 'Visions of Blue books and Government resolutions' माझ्यापुढे दत्त म्हणून उभे राहतात."

हे सारे नाद गोपाळरावांस होते, परंतु घरी हिशेब वगैरे मात्र ते कधी पाहावयाचे नाहीत. हे पैसे घ्या आणि करा काय ते, असे सांगावयाचे. खिशातून एखादे वेळेस पैसे मोजून ठेवलेले असलेच आणि कमी झाले असे आढळले तर क्वचित चौकशी करावयाचे. एखादे वेळेस मात्र लहर लागली तर तोंडाने सर्व हिशोब जमवावयाचे आणि मग मात्र तो पैच्याही अपूर्णांकापर्यंत जमवावयाचा. थोर लोकांस कोणतीच गोष्ट क्षुल्लक वाटत नसते. जे काही करावयाचे ते सर्व ते मनापासून करतात.

मानमरातबाचा त्यांस तिटकारा असे. कर्झन यांनी दिलेला सी. आय.ई. हा किताब गोखल्यांनी आपल्या नावावर आलेला बद्दपणा जावा व इंग्लंडमध्ये उजळमाथ्याने आपणास काम करता यावे म्हणून स्वीकारला. परंतु जेव्हा हार्डिंजसाहेबांनी त्यांस के.सी.आय.ई. हा किताब द्यावा असे स्टेट सेक्रेटरीस सुचविले, त्या वेळेस त्यांनी तो किताब साभार परत केला. त्या वेळेस ते रॉयल कमिशनचे सभासद होते. सरकारने पदवी देऊन आपणास मिंधे करून घेतले असे लोक कदाचित म्हणतील या भीतीने व आता त्यांस सर्वत्र मान्यता मिळाली असल्याने जरूरच नसल्यामुळे त्यांनी हा किताब स्वीकारला नाही. शिवाय रॉयल कमिशनवर असता सभासदांस तनखा मिळावयाचा. अर्थात् गोखले सरकारचे पगारदार होणार. यामुळे कौन्सिलांत त्यांस लोकप्रतिनिधी कसे राहता येईल, असा कौन्सिलात प्रश्न निघाला. ताबडतोब गोखल्यांनी जाहीर केले की 'मला पगाराची पर्वा नाही; मी काही पैशासाठी सुजलो नाही; मी तनख्याशिवाय काम करतो.' आणि अशा प्रकारे त्यांनी लोकसेवेचा कौन्सिलातील मार्ग स्वार्थत्यागपूर्वक स्वीकारला. देशासाठी फर्ग्युसन कॉलेज सोडल्यापासून आपल्या पुस्तकाबद्दल मिळणाऱ्या वेतनावरच त्यांनी स्वतःचा व स्वतःच्या कुटुंबाचा गुजराणा केला. अर्थशास्त्रावर त्यांस एक उत्तम पुस्तक लिहावयाचे होते, परंतु देशसेवा करता करता आसन्नमरण झालेल्या या कसलेल्या अर्थशास्त्रज्ञास पुस्तक लिहावयास फावले नाही. यामुळे त्याचे जगात नाव गाजले असते ते राहिले! हा एक प्रकारचा स्वार्थत्यागच नाही काय! 

आपल्या मित्रांविषयीसुद्धा ते पुढे यावे असे गोखल्यांस वाटे. हरिभाऊ आपटे यांस मुंबईच्या कौन्सिलांत निवडून येण्यासाठी उभे राहण्यास त्यांनीच आग्रह केला. हरिभाऊ निवडून येऊ शकले नाहीत तेव्हा त्यांस फार वाईट वाटले. स्वपक्षातीलच नव्हे तर परपक्षातील लोकांबद्दलही त्यांस आपलेपणा वाटे. त्यांच्याही गुणांचे चीज व्हावे, त्यांच्या गुणांच्या वाढीस, कर्तबगारीस अवसर मिळावा असे त्यांस फार फार वाटे. कोठेही स्पृहणीय गुण दिसला की, त्याविषयी आदरबुद्धी त्यांच्या मनात उत्पन्न होत असे. या बुद्धीने खऱ्या शिष्टांच्या, खऱ्या संभावितांच्या पंक्तीस त्यांस अग्रस्थान मिळून ते प्रतिपक्ष्याच्याही आदरास पात्र झाले. 

दुसऱ्याविषयी गोखले किती जपत हे सुरतच्या राष्ट्रीय सभेच्या वेळीही दिसून आले. ज्या वेळेस टिळक छातीवर हात ठेवून हिमालयाप्रमाणे धैर्याने उभे होते, त्या वेळेस एका मवाळपक्षीय गृहस्थास त्यांची मूर्ती पाहवेना. तो टिळकांच्या अंगावर चालून जाऊ लागला. त्या वेळेस गोखल्यांनी ताडकन उडी मारून त्या गृहस्थापासून टिळकांचे संरक्षण केले. दुसऱ्याविषयी त्यांस किती आपलेपणा वाटे हे या गोष्टीवरून दिसून येते. यास मनाचा मोठेपणा लागतो आणि तो गोखल्यांच्या जवळ भरपूर होता. टिळकांविषयी तर त्यांस आदर वाटतच असला पाहिजे. कारण त्यांच्याच स्फूर्तीने ते डेक्कन सोसायटीत शिरले होते.

गोखल्यांना वडील माणसाबद्दल विलक्षण आदर वाटे. रानड्यांबद्दल तर त्यांस किती आदर वाटे हे शब्दांनी सांगता येणे शक्यच नाही. रानड्यांची एक पगडी त्यांनी आपल्या कपाटात ठेवली होती व तिचे मोठ्या भक्तिभावाने ते दर्शन घेत. रानड्यांचे चरित्र आपण लिहिले नाही म्हणून त्यांस फार वाईट वाटे व वहिनीबाईंची ते नेहमी क्षमा मागत. 'My real joy is, that my true place is at his feet' असेच उद्गार त्यांनी निरंतर मनात काढले असतील. आपण आजारी आहो हे दादाभाईंच्याजवळ कसे सांगावे असे त्यांस वाटे, एकदा गोखले आजारी असल्यामुळे डॉ. भांडारकर त्यांस भेटावयास आले. गोपाळराव म्हणाले, 'मी तुमच्याकडे यावयाचे. तुम्ही मजकडे का येता?' 'तुम्ही आजारी आहा म्हणून मी येतो; बरे झाल्यावर मग तुम्हीच मजकडे या.' असे भांडारकरांनी त्यांचे समाधान करावे. मेथांविषयी त्यांस असेच वाटे. कुटुंबातही आईबापांविषयी त्यांची भक्ती मोठी आदर्शभूत होती; परंतु या गुणाचे पर्यवसान पुढे निराळ्या प्रकारात झाले असावे.

जसे आपण गुरुजनांना किंवा आपल्याहून अनुभवी पुढाऱ्यांस मानतो, तसेच आपणासही लोकांनी मानावे असे त्यांस वाटू लागले असावे असे दिसते. त्यांच्या मित्रमंडळीत व अनुयायांत तर त्यांच्या शब्दास विलक्षण किंमत असे. डॉ. परांजपे लिहितात : - 'His word was law, his advice most welcome and his smallest wish a peremptory order.' मनुष्य जसा दुसऱ्याजवळ वागत आला, त्याचप्रमाणे इतरांनी आपल्याजवळ वागावे असे त्यांस वाटू लागते. गोखल्यांचे पुढे पुढे असे होई की जर कोणी त्यांचा सल्ला विचारावयास गेला तर त्याने त्यांचे म्हणणे ऐकलेच पाहिजे. त्याच्यावर शंका घेणे मोठे कठीण असे. त्याचप्रमाणे अगदी शेतकऱ्यापासून सर्वांस जसा टिळकांचा दरवाजा खुला असे तसे गोखल्यांचे नसे. सुशिक्षित, मोठ्या विचारी लोकांचेच त्यांच्याकडे येणे जाणे असे. ते इतरेजनांस जरा अधिकारानेच सर्व सांगावयाचे. हा एक प्रकारचा अवगुण होय. आपणास आता अनुभव आहे, दुसऱ्यास शिकविण्याचा थोडा हक्क आहे, असे त्यांस साहजिकच वाटे; त्यात अहंकाराची छटा मुळीच नव्हती. त्यांच्यात अहंकार नव्हता असे गांधी म्हणतात:- 'I was by the side of that saintly politician to the end of his life and I found no ego in him. I ask you if there is no ego in you. If he wanted to shine, he wanted to shine in the political field of his country; he did so not in order that he might gain public applause but in order that his country may gain. He developed every particular faculty in him not in order to win the praise of the world for himself but in order that his country may gain; he did not seek public fame, but they were showered upon him, they were thrust upon him; he wanted that his country may gain and that was his great inspiration.'

या उताऱ्यावरून त्यांच्या अंगात अहंकार नव्हता असे दिसते; परंतु तो गांधीसारख्या थोर पुरुषांस दिसला नसला तरी पुष्कळांस दिसत असे, असे पुष्कळ लोक अनुभविल्याचे सांगतात. मोठ्या लोकांची दृष्टी चांगल्याकडेच असते. कारण सर्वगुणसंपन्न कोण असतो? जीवन म्हणजे काळ्या पांढऱ्या तंतूंचा पट आहे; आणि असे आहे म्हणूनच त्यास शोभा आहे. आणखी अशी गोष्ट असते की मोठ्या माणसांच्या मोठेपणाबरोबर, त्यांचे दोषही जग मोठे करून दाखविते. चंद्राच्या सुंदर व रमणीय प्रकाशवैभवाने त्याच्यावरचे डागही दिसतात. ताऱ्यांचे तेज अल्प म्हणून, डागही दिसत नाहीत. गटे याचा चरित्रकार लीप्वेस म्हणतो, 'The Faults of a celebrated man are apt to carry an undue emphasis. They are thrown into stronger relief by the very splendour of his fame. His glory immortalises his shame.' असे असले तरी आपण गुणांकडेच दृष्टी वळविणे हे आपल्या हिताचे आहे आणि पुष्कळ वेळा असेही असण्याचा संभव असतो की काही गोष्टी आपण समजतो तशा नसतात. कदाचित आपलीच चुकी होत असेल. गोखल्यांमध्ये थोडा अहंकार होता, असे म्हणावयाची धिटाई आपण कशास करावी? 'It is never well to put ungenerous constructions when others, equally plausible and more honourable are ready.' त्यांच्या अंगी अहंकार होता असे म्हणण्याऐवजी स्वतःच्या मार्गाची त्यांस इतकी खात्री वाटत असे, असेच आपण म्हणावे.

त्यांच्या सर्व आयुष्यात स्वार्थत्याग हा सद्गुण सूर्यप्रकाशासारखा तळपत आहे. "The one pure, sacred and efficacious virtue, sacrifice, the halo that surrounds and sanctifies the human soul.' अशा प्रकारचा स्वार्थत्याग विरळा! त्यांनी गरिबीला आपखुशीने कवटाळले. शेवाळातून जसे कमळ आपले डोके वर काढते त्याप्रमाणे जाती, पंथ, भेदभाव, स्वहित यांच्या चिखलातून, या शेवाळातून हे सुंदर पुष्प देशास दरवळून सोडते झाले; परंतु त्यांना नेहमीच चांगले दिवस लाभले नाहीत! 'Every gleam of sunshine in his life was chased by a gloomy shadow that undermined his constitution and hastened his end' त्यांच्या अंतःकरणात एक प्रकारचा उदासीनपणा होता. 1897 साली जेव्हा त्यांच्यावर गहजब उडाला आणि त्यांनी क्षमा मागितली, तेव्हा त्यांनी आपले मित्र रा. वासुदेवराव आपटे यांस विचारले, "माझे करणे आपणास कसे वाटले?" "देशाची अब्रू दवडणारे, अपमानास्पद वाटले." गोखल्यांना त्यांचे हे उत्तर ऐकून वाईट वाटले. आपल्या करण्याने देशाची हानी झाली? 'अरेरे,' ते ताबडतोब म्हणाले, "But a day will come when I shall cover my country with glory by way of compensation for the wrong, I am alleged to have done and then critics of your type, who are now running me to death, will be converted into my admirers." हे ध्येय सतत पुढे ठेवून या थोर पुरुषाने आपले नाव दिगंत केले यांत संशय नाही. परंतु हे सर्व झाले तरी त्यांच्या मनास पूर्ण शांतता लाभली नाही. त्यांच्या स्वतःच्या महाराष्ट्रात तरी त्यांस फार सन्मान मिळाला नाही. परंतु जे खरे असते ते केव्हा तरी खरे ठरणारच. त्यांच्या मार्गाची, त्यांच्या मतांची, त्यांच्या उणिवांची जरी टवाळी झाली, तरी त्यांच्यात असलेले सत्य थोडेच लपणार आहे? 'Minds may doubt and hearts may fail when called to face new modes of thoughts or points of view. But the time must come when what is false in all things will fade and what is true will no more seem strange.' हे इलिंगवर्थचे वाक्य किती खरे आहे? टिळक व गोखले दोघांहीमधील सत्य जर आपण नीट पाहू तर आपणास आता दिसेल. गोखल्यांस त्यांच्या उभ्या आयुष्यात फारसे सुखवाद मिळाले नाहीत. ते इंग्लंडमध्ये म्हणालेच होते की, "Public life in India, has many discouragements and but few rewards." आणि अखेर तेच खरे ठरले; परंतु गोखल्यांनी चिकाटी हा आपला गुण सोडला नाही. कौन्सिलमध्ये तेच तेच मागताना ते लाजले नाहीत की, कचरले नाहीत. कार्लाइलने म्हटले आहे की, "The characteristic of heroism is persistency.'

देशसेवा करीत असताना – 
'निन्दन्तु नीति-निपुणा यदि वा स्तुवन्तु ।
लक्ष्मीः समाविशतु गच्छतु वा यथेष्टम् ।।
अद्यैव वा मरणमस्तु युगान्तरे वा।
न्याय्यात्पथः प्रविचलन्ति पदं न धीराः ।।'

या धीर-व्रताप्रमाणे ते वागले. लोकांनी निंदा केली तरी ते तळतळले नाहीत.

आपले म्हणणे सत्य असेल तर ते आज ना उद्या लोकांस पटेल असे ते हृदयास संबोधीत. कॉल्डेनविषयी ब्राइट म्हणतो 'He loved his people too well to be afraid of their frown.' हेच गोखल्यांविषयी म्हटल्यास अतिशयोक्ती होणार नाही. स्वार्थत्याग व लोकांकडून गौरव न होणे याच दोन गोष्टींनी गोपाळरावांची कामगिरी फार शोभते.
"Measure thy life by loss instead of gain
Not by the wine drunk but the wine poured forth
For love's strength standeth in love's sacrifice
And who so suffers most, hath most to give."
ही हॅमिल्टनची उक्ती येथे यथार्थ लागू पडते. 

दक्षिण आफ्रिकेतील दौऱ्यादरम्यान गांधीसमवेत (डर्बन, 1912)

गोखल्यांच्या गुणांमधले सरळपणा, सर्वत्र नीतीने वागणे, हे गुण गांधींना जास्त स्पष्टपणे दिसले असतील. त्यांच्याच जोडीला, अस्पृश्योद्वार व हिंदू- मुसलमान यांचे ऐक्य, या प्रश्नांवर गोखल्यांचा विशेष कटाक्ष होता. गांधींची तर ती जीवनतत्त्वेच होऊन बसली आहेत. गोखल्यांमधील या गुणांमुळेच ते गांधींचे गुरू झाले; गांधींचे अंतःकरण त्यांच्याकडे ओढले गेले. ही गुरू-शिष्यांची जोडी अपूर्व आहे. त्यांच्या सद्गुणांकडे आपण पाहावे; त्यांचे आपण मनन करावे; हे पुरुष म्हणजे पर्वताप्रमाणे असतात; आपण त्यांच्याकडे उंच उंच, वर वर पाहत राहावे. दृष्टी भागते; परंतु शक्य ते करण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे. विशेषतः आपण व्यापक दृष्टीचे झाले पाहिजे. मोठ्या वर्तुळात फिरणे आता आपणांस जरूर आहे. आपल्या सभोवतालची परिस्थिती कशी आहे? - 'Where the passions of greed and hatred are allowed to roam unchecked having for their allies deceitful diplomacy and a widespread propaganda of falsehood, where the soul remains caged and the self-batters upon the decaying flesh of its victims.'

या परिस्थितीत आपण गुरफटलो असलो, तरी आत्मिक व नैतिक सामर्थ्याने, प्रेमाने व प्रामाणिकपणाने ही स्थिती बदलण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे. अंगी सद्गुणांचे बीजारोपण करावे. ते सगुण प्रत्यक्ष व्यवहारात आले पाहिजेत. 'The supreme end of our personality is to express itself in its creations.' कवी काव्ये निर्माण करतील. तत्त्वज्ञ नवीन तत्त्वे प्रसवेल. आपण ती तत्त्वे आपल्या कृतीत, आचरणात आणावयास नको काय ? हे सामर्थ्य आपल्या अंगी येण्यास या पुरुषांचे उदाहरण नित्य डोळ्यांपुढे ठेवावे. ही माणसे कशी असतात ? -

'Great hearts, strong minds, true faith and willing hands.
Men whom the lust of office cannot kill
Men whom the spoils of office cannot buy Men who possess opinions and a will,
Men who have honour, men who will not lie.'

मोठ्या लोकांप्रमाणे आपण सर्वच मोठे झालो तर त्यांचे महत्त्व काय उरले? परंतु सर्वांस तसे होता आले नाही तरी शक्य तो प्रयत्न करणे हे तरी प्रत्येकाचे कर्तव्य आहे की नाही? 'क्षुद्र माणसांच्या प्रगल्भ विचारांनी राष्ट्रे तयार होतात.' विचार प्रगल्भ होण्यास थोरांच्या चरित्रांचे अध्ययन करावे, मनन करावे व तदनुसार कृती करण्यास लागावे म्हणजे आपल्या राष्ट्राची उन्नती होण्यास काय विलंब?

- पांडुरंग सदाशिव साने 


हे पुस्तक खरेदी करण्यासाठी (+91) 70582 86753 या क्रमांकावर संपर्क करा किंवा sadhanaprakashan.in ला भेट द्या.

Tags: biography sopal krishna gokhale mahatma gandhi sane guruji sadhana prakashan sadhana digital congress freedom struggle Load More Tags

Add Comment