प्रिय बाबा

शब्द, रेषा, अगदी कागदाच्या घड्या या साऱ्यांवर त्याने ज्या निःशंकपणे प्रेम केले, त्याहीपेक्षा कितीतरी अधिक पटीने माणसांवर केले.

1944 मध्ये जन्मलेल्या अनिल अवचट यांचे 27 जानेवारी रोजी निधन झाले. 77 वर्षांचे आयुष्य त्यांना लाभले, त्यातील 55 वर्षे त्यांच्या सार्वजनिक आयुष्याची म्हणता येतील. युक्रांद या संघटनेचे ते संस्थापक सदस्य होते. साधना साप्ताहिकासाठी दोन-अडीच वर्षे कार्यकारी संपादक म्हणूनही त्यांनी काम केले. समाजातील अनेक उपेक्षित प्रश्नांना त्यांनी आपल्या लेखनातून वाचा फोडली. साधी-सरळ राहणी, कमीत कमी गरजा, कमी अपेक्षा व महत्त्वाकांक्षा, निसर्गसंवादी जीवनशैली हे त्यांच्या संपूर्ण लेखनाच्या केंद्रस्थानी होते. मराठीत 'रिपोर्ताज'च्या प्रकारचे लेखन रुजवण्याचे श्रेय अवचटांना दिले जाते. अवचटांशी असणाऱ्या व्यक्तिगत स्नेहाबरोबरच राजा शिरगुप्पे यांनी त्यांच्या शोधयात्रांतून केलेले लेखन त्या लेखनप्रकाराशीही नाते सांगणारे आहे. 

संस्कृत भाषेत मैत्री किंवा स्नेहाबद्दल एक सुभाषित प्रसिद्ध आहे - ‘समान शीले व्यसनेषु सख्यम्’. अनिल अवचट नावाचा लेखक मला नेमका कधी माहीत झाला हे सांगता येणार नाही. बालपणी लाभलेल्या वातावरणाने कला-साहित्याचा सहवास नैसर्गिकतःच लाभला होता आणि त्या माध्यमातून जगभरचे अद्‌भुत सर्व काही भेटत होते. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे हे जग समजून घेताना भाषेचा अडसर मुळीच राहिला नव्हता. त्याहीपेक्षा, आपल्या नजरेला जे जग दिसते आहे ते जग शोभादर्शीमध्ये पाहिलेल्या एकाच वास्तवाच्या अनंत रचनांप्रमाणे या विविध साहित्यातून अनुभवगठीत करणे चालू होते. विशेष म्हणजे, लाभलेल्या बालपणाच्या विशिष्ट परिस्थितीने हे जग अधिक वस्तुनिष्ठ, नेमकेपणाने अनुभवण्याची संधी मिळाली. मी कुमारवयात असताना नेमके बिहारमध्ये जयप्रकाश नारायण यांच्या नेतृत्वाखाली नवभारत आंदोलन युवकांच्या पुढाकाराने प्रभावी होऊ लागले होते. बिहारबद्दल एक तारुण्यसुलभ कुतूहल तयार झाले होते. अनेक तरुण उत्सुकतेपोटी बिहार भटकून तिथल्या आंदोलनाला भेट देऊन प्रेरित होऊन येत होते. मला आठवते, याच तरुणांमधील एका तरुणाने पूर्णिया जिल्ह्यातील भटकंतीवर लिहिलेले पहिले रिपोर्ताज प्रसिद्ध झाले. आमच्या कुमार, तारुण्यसुलभ आणि त्या काळी लाभलेल्या सामाजिक अवस्थेतून या पुस्तिकेने लक्ष वेधून घेतले. आपलीच अस्वस्थता आपण वाचतोय, असेच काहीसे हे वाचताना जाणवत होते. सामाजिक परिवर्तनाची इच्छा अधिक बलवंत करणारी ही वाचनप्रक्रिया होती. त्याहीपेक्षा, ‘सबकुछ समाज बदल डालने के लिए’ ही भावना अधिक बळकट करणारी होती. निपाणीतल्या सामाजिक, राजकीय वातावरणाने या भावनेला बळ दिलेच, पण नंतर निपाणीने हे वैचारिक सामर्थ्य पुरवण्यासाठी जी बलदंड माणसं भेटवली तेही कारण त्यामागे आहे.

अनिल अवचट काळाचा अंदाज करायचे. 1980 सालामध्ये निपाणीत आले. त्या काळात एक लेखक म्हणून त्यांची थोडीबहुत ओळख महाराष्ट्राला झाली होती. म्हणून आमचे मार्गदर्शक, सुभाष जोशी सरांनी आम्हा साऱ्या तरुण विद्यार्थीमित्रांना खास अवचटांना भेटण्यासाठी आपल्या घरवजा बिडी कामगार संघटनेच्या कार्यालयात गोळा केले. आम्ही सारे क्रांतीच्या नशेत होतो. त्यामुळे लेखक म्हणून कुणाचे फारसे कौतुक आम्हांला नव्हतेच. त्या झालेल्या बैठकीतही त्यांच्याशी एक लेखक म्हणून फारशी चर्चा झालेली आठवत नाही. उलट निपाणीतील वखार मालकांची मालकशाही, बिडी कामगार व स्त्रियांची लूट आणि एकूणच भांडवलशाहीचे हिडीस स्वरूप असे काहीसे भव्यदिव्य आम्ही बोलत होतो. त्यानंतर सरांनी या लेखकाला सोबत घेऊन कामगार महिलांच्या झोपड्यांतून आणि कामाच्या ठिकाणी वखारींतून भेटी द्यायला सांगितले. आम्हीही मोठ्या कौतुकाने एखादी रणभूमी दाखवावी तसे या लेखक महाराजांना कामगार आयाबायांशी आणि वखारीतल्या दिवाणजींशी  भेटवत होतो. काही दिवसांनी अनिल अवचट यांचे निपाणीच्या बिडी कामगार महिलांच्या पार्श्वभूमीवरती ‘निपाणी अंधेरनगरी’ हे छोटेसे पुस्तक आले. आम्ही ते कौतुकाने वाचले. सुरुवातीला चक्रावलो आणि एकदम भडकून उठलो. अतिशय चित्रमय शैलीत निपाणीतील या सगळ्या वातावरणाचे व परिस्थितीचे नेमके वर्णन लेखकाने केले होते. पण एक गोष्ट मात्र आम्हांला खटकली आणि ती तिडीक उठवणारी ठरली. लेखकाने कामगार स्त्रियांसाठी ‘वेश्या व्यवसाय हा जगण्याचा एक सरसकट मार्ग आहे’ अशा आशयाचे आम्हांला अवस्थ करणारे विधान केले होते. मला आठवते, आम्ही सगळ्यांनीच त्या काळात या साऱ्याचा जाहीर निषेध केला आणि ‘आमच्या आयाबहिणींचे एकांगी चित्रण’ असे मत त्या लेखनाविषयी नोंदवले होते. त्या काळात अनिल अवचट यांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली हे आता आठवत नाही.


हेही वाचा : गेल ऊर्फ शलाका - ज्ञानक्षेत्रातील एक विधायक वादळ - राजा शिरगुप्पे


पुढे नैसर्गिक उर्मीने लिहायला लागलो आणि लेखक म्हणून किंचित प्रस्थापित होऊ लागलो. अर्थात लिहिण्याचे सर्व विषय हे समाज परिवर्तनाच्या म्हणजे कार्यकर्त्याच्या भूमिकेनेच व्यापलेले असत. माझ्या कामगार आई-बहिणींच्यात वावरताना या झोपडपट्ट्यांतून घडणारी त्यांची लहान मुले मी पाहत होतो. त्या अनुभवांवरच, साधनाचे त्या वेळचे कार्यकारी संपादक विनोद शिरसाठ यांच्या प्रोत्साहनाने ‘न पेटलेले दिवे’ ही वंचित मुलांवरची मालिका साधनामधून लिहायला सुरुवात केली आणि ती लोकांना आवडलीही. विनोदने त्याचे पुस्तक करायचे ठरवले आणि मला विचारले, ‘‘प्रस्तावना कुणाची घ्यायची?’’ आश्चर्याची गोष्ट म्हणजे एका क्षणाचाही विचार न करता माझ्या तोंडात पटकन एकच नाव आले ते अनिल अवचट यांचे. विनोदलाही ते भावले. विनोदने लगेच अवचट यांना फोन केला. तेही माझे लेख वाचत होते. त्यांनी क्षणाचाही विलंब न करता प्रस्तावना लिहायचे कबूल केले. वर प्रतिक्रियाही दिली, ‘आता उरलो प्रस्तावनेपुरता!’ मला खूपच आश्चर्य वाटले. अनिल अवचट इतक्या पटकन तयार होतील असे वाटले नव्हते. कारण ‘निपाणी अंधेरनगरी’मुळे आपल्यात अंतर पडले आहे की काय असे वाटत होते. परंतु प्रत्यक्षात या मोठ्या मनाच्या माणसाच्या मनात तसे काहीच किल्मिष नाही हे पटकन लक्षात आले. अनिल अवचट यांनी या पुस्तकाला अतिशय सुंदर प्रस्तावना लिहून दिली. हे पुस्तक केवळ गाजले नाही, तर अनेक आवृत्त्यांसह अनेक भाषांत भाषांतरितही झाले.

या प्रस्तावनेपासून अनिल अवचट माझ्यासाठी केवळ एक नामवंत लेखक न राहता, माझा जिवलग बाबा झाला. नुसता ‘बाबा’ झाला नाही, तर अरे-तुरे करण्याइतका आत्मीय झाला. या पुस्तक प्रकाशनावेळी बाबा मोठ्या कौतुकाने आपल्या भाषणात म्हणाला होता, ‘‘राजा माझा वारस आहे. मी जिथे थांबतो तिथून राजाचा प्रवास सुरू होतो.’’ बाबाच्या या कौतुकाच्या शब्दांचा नेमका अर्थ तारुण्याच्या उन्मादात समजून न घेता मीही जाहीर उत्तरलो होतो, ‘‘बाबांनी मला आपला वारस मानला हे माझे भाग्य आहे. परंतु बाबा कुठे थांबतो हे मला माहीत नाही. कारण मी जंगलातून भटकतो आणि जंगलाला पाडलेल्या वाटा नसतात.’’ आता जाणवतं की, हे माझे उद्‌गार थोडेसे उद्‌दामपणाचे होते. तरीही बाबा त्यावेळी कौतुकाने म्हणाला होता, ‘‘तो जंगलचा राजा म्हणजे सिंह आहे आणि सिंह स्वतःची वाट स्वतःच तयार करतो.’’ बाबाचे समुद्रासारखे विशालपण आता या क्षणी किती व्यापून राहिल्यासारखे जाणवत आहे! त्यानंतर बाबा फक्त माझाच नव्हे तर माझ्या सर्व कुटुंबाचा एक अविभाज्य, अपरिहार्य असा सदस्य होऊन राहिला. माझी पत्नी मीना आजारी होती. पुण्यातील एका दवाखान्यात तिला दाखल केले होते. तेव्हा बाबा दररोज तिला भेटायला यायचा. कधी बासरी वाजवून दाखवायचा, तर कधी एखाद्या रागाचा तुकडा आळवून दाखवायचा. अध्येमध्ये ‘ओरिगामी’ असायचीच. रोहनला त्यांनी ओरिगामीचे एक सुंदर पुस्तक भेट दिले व त्यावर एकच वाक्य लिहिले होते, ‘रोहन, भेटत जा’. या दोनच शब्दांत निर्व्याज अशी आत्मीयता त्यांनी व्यक्त केली होती.

बाबा एक सधन लेखक होता. अंतर्बाह्य कार्यकर्ता होता आणि या साऱ्या पलीकडे जाऊन तो एक अत्यंत स्वच्छ, निखळ मनाचा माणूस होता. ‘हे जग मी सुंदर करून जाईन’ अशी आकांक्षा बाळगणारी काही पाक मनाची माणसं असतात, त्या कोटीतला तो होता. त्यामुळे शब्द, रेषा, अगदी कागदाच्या घड्या या साऱ्यांवर त्याने ज्या निःशंकपणे प्रेम केले, त्याहीपेक्षा कितीतरी अधिक पटीने माणसांवर केले. त्यामुळेच त्यांच्या लेखनातून ज्या सहजपणे मानवी प्रेमाचा सर्जकतेचा झरा आढळतो तो इतरांमध्ये दुर्मीळच!

- राजा शिरगुप्पे 
rajashirguppe712@gmail.com

(लेखक व कार्यकर्ता अशा दुहेरी भूमिकेत वावरणाऱ्या राजा शिरगुप्पे यांनी केलेल्या महाराष्ट्र, बिहार, ईशान्य भारत या तीन प्रदेशांतील दुर्गम भागांच्या शोधयात्रांवरील तीन पुस्तके विशेष महत्त्वाची आहेत. सांगली येथे झालेल्या विद्रोही साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते.)

Tags: अनिल अवचट सामाजिक कार्यकर्ते श्रद्धांजली Load More Tags

Add Comment

संबंधित लेख