काश्मीरच्या अर्धवट फाईल्स (पूर्वार्ध)

'द कश्मीर फाईल्स' या सिनेमाची चिकित्सा

सिनेमात प्रारंभापासून मुस्लिमद्वेषाचं बीजारोपण केलेलं दिसतं. स्थानिक मुस्लिमांनी पंडितांविरोधात हिंसक कृत्ये केली, असा सिनेमाचा एकूण रोख आहे. पंडितांच्या विस्थापनाला स्थानिक मुस्लीम (आणि दहशतवादी) कसे जबाबदार आहेत, हाच चित्रपटाचा मध्यवर्ती विषय आहे. मात्र 30 वर्षांपूर्वीच्या इतिहासाची साधनं तपासून पाहिली तर असं दिसतं की, हे विस्थापन केवळ पंडितांचं नाही तर स्थानिक शीख व मुस्लिमांचंही झालेलं आहे. शिवाय या संघर्षात हजारोंच्या संख्येने मुस्लीमही मारले गेले. पण सिनेमा काश्मिरी मुस्लिमांच्या व्यथांना स्थान देत नाही. उलट मुस्लिमांनी हिंदूंचं अन्न-पाणी रोखलं असा भ्रामक प्रचार करतो.

मार्च महिन्यात दोन बहुचर्चित सिनेमे प्रदर्शित झाले. त्यात पहिला होता, मराठी दिग्दर्शक नागराज मंजुळे यांचा हिंदीतील ‘झुंड’; तर दुसरा विवेक अग्निहोत्री कृत ‘द कश्मीर फाईल्स’. पहिला सिनेमा मागास जाति-समुदायांच्या अस्तित्वाच्या प्रश्नाशी झगडत मागास समुदाय व सवर्ण-अभिजन यांच्यातील सांस्कृतिक संघर्षावर भाष्य करतो. तर दुसऱ्या सिनेमाला अभिजनवर्ग अर्थात काश्मिरी ब्राह्मणांच्या विस्थापनाची पार्श्वभूमी आहे.

गेल्या काही दिवसांत प्रसिद्ध झालेले ‘झुंड’चे सोशल मीडिया रिव्ह्यू अभिजनांच्या सांस्कृतिक वर्चस्ववादावर भाष्य करणारे होते. त्यामुळे जोशी, देशपांडे, कुलकर्णी, इत्यादी आडनावं असलेले सोशल मीडिया यूजर्स – अर्थात अभिजनवर्ग – ‘झुंड’वर जातिआधारित बहिष्कार घालण्याची घोषणा करताना दिसले. त्यांचा आरोप होता की, सिनेमात गरज नसताना सवर्णांना शत्रू ठरवलं गेलं आहे. हा गट उघडपणे ‘झुंड’ पाहू नका म्हणत, ब्राह्मणांचं उदात्तीकरण करणाऱ्या ‘पावनखिंड’सारख्या चित्रपटाचा पर्याय लोकांना देताना दिसला. तसंच विरोधी गट देखील तेवढाच आक्रमक झाला. साहजिकच आठवडाभर ‘दलित विरुद्ध ब्राह्मण’ अशा सांस्कृतिक संघर्षावर झुंज झाली. पुढच्या शुक्रवारी ‘द कश्मीर फाईल्स’ हा सिनेमा आला, तशी ब्राह्मणवर्गाच्या उदात्तीकरणाची चर्चा त्यांच्या ‘व्हिक्टिमहूड’वर येऊन ठेपली!

एक सिनेमा झुंडीचं रुपांतर टीम (समूह) मध्ये कसं करायचं याचा संदेश देतो तर दुसरा सिनेमा समूहाला उन्मादी झुंडीत बदलवण्यासाठीचा खटाटोप करतो. झुंड वर्ग, जात किंवा धर्माच्या पलीकडे जाऊन समाजाला समजून घेण्याची भाषा करतो तर द कश्मीर फाईल्स दर्शकांना जात-धर्माच्या विद्वेषी चौकटीत बंदिस्त करू पाहतो.

सदर लेखाचा विषय 'द कश्मीर फाईल्स' असल्यामुळे 'झुंड'ची चर्चा इथे फक्त दोन वेगवेगळ्या दृष्टिकोनांतला फरक दर्शवण्यापुरतीच दिलेली आहे. द कश्मीर फाईल्सची संपूर्ण समीक्षा त्याच सिनेमातील एका संवादातून केली जाऊ शकते. तो असा : “झुठी खबर को दिखाना जितना बड़ा गुनाह नही, जितना सच्ची खबर को छिपाना!”

कुठलाही सिनेमा तयार करताना सर्वप्रथम त्याचा उद्देश व लक्ष्यगट विचारात घेतला जातो. उदा. सलमान खानचे सिनेमे निव्वळ मनोरंजक असतात, त्यांत स्व-बुद्धी वापरण्यास मुभा नसते. रामगोपाल वर्मांचे सिनेमे हे हॉररपट असतात आणि दर्शकांचे दोन-अडीच तास वाया घालवणारे असतात. द कश्मीर फाईल्स या सिनेमाच्या केंद्रस्थानी कार्यरत असणारे बहुतेक घटक भाजपच्या राजकीय विचारसरणीचे वाहक आहेत. दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री, अनुपम खेर, पल्लवी जोशी, मिथून चक्रवर्ती, चिन्मय मांडलेकर इत्यादी कलावंत भाजपचे प्रवक्ते असल्याप्रमाणे सार्वजनिक आयुष्यात कार्यरत दिसतात. शिवाय प्रधानसेवक नरेंद्र मोदी व त्यांचे मंत्रिमंडळही या सिनेमाच्या प्रमोशन मोहिमेत उतरल्यामुळे द कश्मीर फाईल्सचा ‘नेमका’ उद्देशही जनतेसमोर उघड झाला. कदाचित त्यामुळेच इतिहासात प्रथमच असं घडलं असेल की, सिनेमाने दर्शकांमध्ये विचारसरणीच्या आधारावर विभागणी केली आहे.

भाजपचे सगळेच बडे मंत्री, प्रचारक, संवादक व तथाकथित राजकीय विश्लेषक हा सिनेमा पाहण्यासाठी भारतीय जनतेला भावनिक साद घालत आहेत. भाजपसमर्थक मीडियाने सिनेमांतील कलावंतांसह ‘प्राइम-टाईम’ शो आयोजित केले. इतकंच नाही तर सिनेमाचं तिकिट दाखवा आणि वस्तू/सेवा स्वरूपातील उत्पादनांवर भरघोस सूट मिळवा अशी योजनादेखील सुरू झाली. आसामच्या भाजप सरकारने सर्व प्रशासकीय कर्मचाऱ्यांना सिनेमा पाहण्यासाठी अर्ध्या दिवसाची सुटी दिली.

देशभरात या सिनेमाच्या प्रमोशनसाठी वेगवेगळ्या क्लृप्त्या आयोजल्या जात आहेत. काही राज्यांनी या सिनेमाला करमुक्त घोषित केलं, तर काही राज्यांत तशी मागणी सुरू आहे. वास्तविक केंद्राने या सिनेमावरील जीएसटी हटवला तर आपोआपच तो देशभर टॅक्स फ्री होऊ शकतो. मग ती अपेक्षा राज्यांकडून का बाळगली जात असावी, असाही प्रश्न पडतो.

सिनेमा ‘मास मीडिया’चं एक प्रभावी माध्यम आहे. त्यातून प्रश्न निर्माणही करता येतात आणि ते सोडवलेदेखील जाऊ शकतात. सिनेमाची निर्मिती व दृश्य संकल्पना हे एक प्रकारे संमोहनशास्त्रही आहे. कॅमेरा, दृश्यं व त्या दृश्यांत हाताळल्या गेलेल्या साधनं (टुल्स) यांची एक विशिष्ट भाषा असते. त्याचं एक तत्त्वज्ञान असतं. सिनेविश्लेषक समर नखाते यांनी प्रस्तुत लेखकाला पत्रकारितेच्या वर्गात शिकवलं आहे की, प्रत्येक चार-पाच सेकंदाचं दृश्य शूट करण्यामागे विशिष्ट उद्दिष्ट व संदेश असतो. सबजेक्ट व कॅमेरामधलं अंतर, कॅमेरा कुठे व किती सेकंद स्थिर राहील, शोल्डर शॉट, मीड शॉट, हॅण्डी कॅमेरा, टिल्ट डाऊन व टिल्ट अप या कॅमेऱ्याच्या प्रत्येक कृतीमागे दिग्दर्शक सिनेरसिकांच्या मनावर काय बिंबवू पाहतो याचं शास्त्र दडलेलं असतं.

द कश्मीर फाईल्स या सिनेमात वरील सर्व घटक सुप्त किंवा उघडपणे कार्यरत झालेले दिसून येतात. चित्रीकरणात अनेक ठिकाणी हॅण्डी कॅमेरा वापरण्यात आलेला आहे. म्हणजे हातात कॅमेरा घेऊन अगदी जवळून पात्राचे नाक, डोळे, भुवया, कपाळावर आठ्या, ओठ व नजरेच्या भावमुद्रा टिपल्या गेल्या आहेत. शिवाय अनेक वेळा कॅमेरा एकाच ठिकाणी स्थिरदेखील राहतो. त्यातून दिग्दर्शकाने प्रेक्षकांना त्या पात्राशी समरस करण्याचा यशस्वी प्रयत्न केलेला दिसून येतो. परंतु ज्यावेळी उत्तम आशयकल्पनांची कमतरता असते, त्यावेळी दिग्दर्शकाला नसत्या ठिकाणी गुरफटावे लागते! द कश्मीर फाईल्सच्या बाबतीत यापेक्षा वेगळं काही झाल्याचं जाणवत नाही.

सिनेमा पाहताना व्हॉट्सअ‍ॅप युनिव्हर्सिटीच्या भाजपभक्त गटातील एखाद्या दीर्घ पोस्टचा दृश्य स्वरूपात अनुभव आपण घेतो आहोत असा भास होतो. कारण गेली काही वर्षं कम्युनिस्ट, गांधी, नेहरू, मुस्लीम, देशद्रोह, विरोधक, जेएनयू आणि काश्मीर यांच्या बाबतीत जो काही अघोरी व विकृत प्रचार राबविला जात आहे, त्याचं विस्तारित स्वरूप द कश्मीर फाईल्समध्ये पाहायला मिळतं. त्यामुळेच अनेक लेखक, समीक्षक, विचारवंत व भाष्यकारांनी या चित्रपटाला भडक, प्रक्षोभक, अर्धसत्य मांडणारा आणि सांप्रदायिक असं घोषित केलेलं आहे.

या सिनेमानिर्मितीचं उद्दिष्ट भारतीय समुदायामध्ये ‘हिंदू विरुद्ध मुस्लीम’ असा तीव्र संघर्ष उभा करून त्यावर आधारित हिसेंला उत्तेजन देणे हे आहे असं दिसतं. त्यामुळे त्यानुकुल सर्व घटकांचा भरणा सिनेमात आढळतो. सिनेमातील एक प्रमुख पात्र असणाऱ्या पुष्करनाथच्या तोंडी एक संवाद आहे - बहुतेक समीक्षकांचं त्यावर लक्ष गेलेलं नाही - तो संवाद असा,

“उनके आने से पहले हम 100 परसेंट थे। उन्होंने हमे कन्वर्ट किया।”

उत्तरादाखल त्याचा नातू कृष्णा म्हणतो, “कितना ही कमाल का इतिहास रहा हैं आप लोगो का, तो कश्मिरी पंडितों ने अपने आप को कन्व्हर्ट कैसे किया?”

त्यावर पुष्करनाथ म्हणतो, “आतंक से, सुफीयों के तलवारों से!”

सुफी-संतांवर अशा प्रकारचे लांच्छन केवळ संघ-भाजपच्या विचारसरणीचे वाहकच लावू शकतात! असा प्रचार अज्ञानातून होत असता तर त्याकडे दुर्लक्ष करता आलं असतं. पण हेतूत: केलेल्या कृतीवर बोट ठेवणं गरजेचं असतं. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बौद्धिकात बहुसंख्याकांच्या धर्मांतराचं कारण सांगताना ‘तलवार’ हा घटक केंद्रस्थानी ठेवला जातो. ही दिशाभूल हेतूत: केली जाते. कारण सामान्य जनांना धर्मांतराचं पूर्ण सत्य कळता कामा नये, हा उद्देश त्यामागे असतो.

वास्तविक, भारतात झालेली बहुतेक धर्मांतरं इथल्या चातुवर्ण्य व्यवस्थेला कंटाळून झालेली आहेत. शूद्र म्हणून दिलेल्या तुच्छ वागणुकीमुळे झालेली आहेत. ही धर्मांतरं हिंदू असलेल्या बहुसंख्य जमातीला मंदिरात प्रवेश नाकारल्याने झालेली आहेत. अर्थातच ती जोर-जबरदस्तीने नव्हे तर स्वेच्छेने झालेली आहेत. स्वामी विवेकानंदांनी लिहून ठेवलं आहे की, “या देशातील धर्मांतरे मुसलमान आणि ख्रिश्‍चन यांनी केलेल्या अत्याचारामुळे नव्हे तर उच्चवर्णीयांनी केलेल्या अत्याचारामुळे झाली.”

सुफी-संत इथे येण्यापूर्वी भारतीय समाज हा जातिव्यवस्था, उच्च-नीच भेदांमध्ये व पुरोहितांच्या धर्मवर्चस्ववादी जोखडामध्ये बंदिस्त झालेला होता. निम्म जाति-समुदायांतील माणसांना शूद्र घोषित करून हीन वागणूक दिली होती. अशावेळी सुफी संतांनी शोषित-पीडितांना माणूस म्हणून कवटाळले. समतेची जाणीव, एकसारखी वागणूक व समान संधी दिली. जातिभेदात गुरफटलेल्या समाजाला एकात्मतेचा संदेश दिला. त्यांना आपल्या ताटात जेवू घातलं. त्यांच्याशी मानवतेचं नातं जोडलं.

सुफी-संतांनी जनकल्याणासाठी सत्कार्य केलं, आपल्या मृदू वाणीने पीडितांना जगण्याचं बळ दिलं, माणसाला मानव म्हणून सन्मान दिला. या सगळ्याने प्रभावित होऊन भारतात मोठ्या संख्येने धर्मांतरं झालेली आहेत. सुफी-संतांनी धर्मांतरासाठी तलवारीचा वापर केला, हा गैरसमजांना जन्म देणारा शुद्ध खोटारडेपणा आहे.

आज भारतात मुस्लिमांसोबत हिंदूदेखील तेवढ्याच भक्तिभावाने सुफींच्या मजारींना भेट देतात. हजारो वर्षं झाली तरी ही परंपरा आजही अखंडपणे सुरू आहे. जर सुफींनी दहशत माजवून धर्मांतरं घडवली असती तर आज त्यांचे दर्गाह-मजारे ओस पडली असते, निर्मनुष्य झाले असते.


हेही वाचा : राष्ट्रीय पारितोषिक विजेत्या 'अदामिंते माकन अबू' या मल्याळी चित्रपटाविषयी - राजश्री बिराजदार 


रा. स्व. संघ वगळता कोणीही, अगदी सामान्य हिंदूदेखील म्हणू शकत नाही की, सुफींच्या तलवारीने धर्मांतर घडवलं. मुळात सुफींकडे तलवार नसून भिक्षापात्र हे एकच साधन होतं, ज्यातून शिधा संकलित करून ते आपला उदरनिर्वाह चालवत. सुफी निशस्त्र होते, बलहिन होते. जुलमी राजकर्त्यांच्या विरोधात त्यांनी भूमिका घेतली. केवळ मृदू वाणी हेच लोकांना जोडण्याचं एकमेव साधन त्याच्याकडे होतं. सिनेमात एके ठिकाणी व्हॉट्सअ‍ॅपवर फिरत आलेल्या एका विकृत संवादाचं भडक सादरीकरण केलं गेलं आहे. दिग्दर्शकाने सिनेमाच्या शेवटीदेखील नाट्यमय पद्धतीने त्या संवादाची पुनरावृत्ती केली आहे. अशा मिथ्य प्रसंगांची मांडणी केल्यामुळे सिनेमाबद्दल संतापाची प्रतिक्रिया येणं साहजिकच आहे.

सिनेमात ऐतिहासिक तथ्यांशी प्रतारणा केल्याचा मोठा आरोप निर्मात्यावर आहे. वास्तविक चित्रपट सुरू होण्यापूर्वीच एक मोठा लिखित संदेश झळकतो. ज्यात असं लिहिलं आहे की, सिनेमा वास्तविक घटनेवर आधारित असला तरी त्यात ‘रचनेचं स्वातंत्र्य’ वापरलं आहे. परंतु या रचनात्मक स्वातंत्र्याच्या नावाखाली सिनेमाच्या कथानकाची ‘खरा इतिहास’ म्हणून मांडणी केली जात आहे. चित्रपटाची टीम वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन हा सिनेमा म्हणजे ‘खरा इतिहास’ असल्याचं प्रमोशन करत सुटली आहे. तब्बल 25 हजार कागदपत्रांची तपासणी करून हा चित्रपट तयार केला, अशी थापही मारली जात आहे.

काश्मिरी पंडितांची बाजू

सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ मेसेज प्रसारित झाले, ज्यात राजकीय हितासाठी सिनेमात आपल्याबद्दलचं खोटं नॅरेटिव्ह तयार केल्याचं खुद्द काश्मिरी पंडीत सांगत आहेत. शिवाय मध्यवर्ती विषय अतिरंजित स्वरूपात व एकांगीपणे मांडण्यात आल्याचा मोठा आरोपही त्यांनी केला आहे.

बीबीसीने 16 मार्च रोजी जम्मूच्या जगती टाउनशिपमध्ये राहणाऱ्या काही काश्मिरी पंडितांच्या मुलाखतींचा एक व्हिडिओ प्रसिद्ध केला आहे. त्यात सुनील पंडिता म्हणतात, “यह पिच्चर बनने से ना मेरी घरवापसी हो सकती हैं, ना मेरे देश का कोई समाधान हो सकता हैं। ना मेरे जम्मू-कश्मीर का कोई समाधान हो सकता हैं। 1990 से लेकर आज तक एक पॉलिटिकल टिश्यू पेपर की तरह हमे यूज किया गया और आज भी वहीं हो रहा हैं। जो दुरिया थी, जिसको हमने पास-पास लाने का काम किया था, इससे (सिनेमा) यह दुरिया और बढेगी.”

व्हिडिओत 55 वर्षीय राजेश टिकू म्हणतात, “मुझे याद हैं, वह 19 जनवरी की रात थी, मस्जिद से आवाजे आती रही, ये काफिरो, जालिमों कश्मिर हमारा छोड़ दो। वह थे पाकिस्तानी, जो हमारा हमयसाया हैं, हम इनके बारें मे बुरा नही सोचेंगे, लेकिन वह भी डर गये, उनको भी उन्होंने डराया, इनको आप ने शरण दिया तो आपकी भी यही हालात होगी।”

शादीलाल पंडिता म्हणतात, “काश्मिरी पंडितो के साथ जुल्म हुआ हैं। हमे मारा गया, हमे घसिटा गया। नारे लगते थे की, आप कश्मीर छोड दो। लेकिन इसमे यह भी होना चाहिए था की, कश्मिरी मुसलमान जो हैं, जो भारतीय हैं, उनको भी मारा गया, वह नही दिखाया गया हैं फिल्म में। जो सिख मारे गये मिलिटन्सी के वजह से उसको नहीं जोडा गया।”

“हा चित्रपट म्हणजे 2024 साठीचा इलेक्शन स्टंट वाटतोय. हे (भाजपवाले) जगभरात जातील आणि म्हणतील की पाहा काश्मिरी पंडितांवर अत्याचार झाले आहेत” असे म्हणत पुढे शादीलाल म्हणतात, “आठ साल से बीजेपी की सरकार हैं, उसे जो करना था उसने नही किया। वह दुसरी सरकारों वह आरोप लगाती थी की, इन्होंने यह नही किया। कहती थी, इन्होंने कश्मिरी पंडितों का उजाड़ा। इस सरकार ने भी आज तक हमारी सुध नही ली। उन्होंने हर जगह पर कश्मिर पंडितों के शोषण को बताया। लेकिन एक भी काम हमारा नही किया।”

समांतर माध्यमांनी काश्मिरी पंडितांच्या अनेक मुलाखती प्रसारित केल्या आहेत. प्रत्येक व्हिडिओमध्ये काश्मिरी पंडितांनी भाजपला विस्थापनाचा दोष दिलेला आहे. ‘पनून काश्मिर’चे डॉ. अग्नीशेखर यांनी 15 मार्च रोजी एक व्हिडिओ जारी करून भाजपविरोधात भूमिका घेतली. ‘मीडिया विजिल’मध्ये प्रकाशित ह्या व्हिडिओमध्ये काश्मिरी पंडितांच्या पुनर्वसनाबात भाजप देशाची दिशाभूल करत आहे, असा आरोप त्यांनी केला. त्यांनी म्हटलं, “रोजगार पॅकेज भाजपने नाही तर यूपीए सरकारच्या काळात देण्यात आलेले आहेत. भाजपने पंडितांसाठी काहीच केलेलं नाही.”

कलम 370 रद्द करून भाजपने देशाची दिशाभूल केली, असा आरोप करत त्यांनी म्हटलं, “पाच ऑगस्टला भाजप सरकारने कलम 370 हटविलं, आम्ही त्याचं स्वागत केलं. पण आजही आम्ही लाखो काश्मिरी 4 ऑगस्टमध्येच जगत आहोत. आमच्यावर त्याचा काहीच फरक पडलेला नाही, काहीच बदल झाला नाही. तुम्ही कायदा बदलला, संविधान बदलले. राज्याचं पुनर्गठन केलं. पण काश्मिरी पंडितासाठी काय केलं? हीच वागणूक राहिली तर आम्ही सर्वजण जगासमोर तुमच्याविरोधात बोलू, तुमच्यावर उघड टीका करू, आतापर्यंत काश्मिरी पंडित तुमचा आदर करत होते, पण आता ते तुम्हाला जगासमोर उघडे करतील.”

अमित शहा 14 मार्च रोजी आठवड्यात लोकसभेच्या बजेट सत्रात बोलताना म्हटले होते, “44000 काश्मिरी विस्थापित कुटुंबांना दरमहा 13000 रुपयांची मदत मिळते.” परंतु अग्नीशेखर याला दिशाभूल करणारी माहिती म्हणतात. “अमित शहा यांनी लोकसभेत काश्मिरी पंडितांबाबत चुकीची आकडेवारी मांडली आहे. मी जम्मूमधील मदत आयुक्तांशी बोलून खात्री केली आहे. त्यांनी रिलीफ कार्डवर सुमारे 22 हजार लोकांची संख्या दिली आहे, ज्यांना मदतीची रक्कम मिळते.”

तथ्यांशी छेडछाड

सिनेमात प्रारंभापासून मुस्लिमद्वेषाचं बीजारोपण केलेलं दिसतं. स्थानिक मुस्लिमांनी पंडितांविरोधात हिंसक कृत्ये केली, असा सिनेमाचा एकूण रोख आहे. सिनेमात वारंवार मुस्लिमांना शत्रूस्थानी लेखलं गेलं आहे. पंडितांच्या विस्थापनाला स्थानिक मुस्लीम (आणि दहशतवादी) कसे जबाबदार आहेत, हाच चित्रपटाचा मध्यवर्ती विषय आहे. बलराज पुरी ‘कश्मीर : टूवर्डस् इंसरजेंसी’ या पुस्तकात लिहितात, “पंडितांच्या स्थलांतराबद्दल काश्मिरी मुस्लिमांनी खऱ्या अर्थाने खेदाची भावना व्यक्त केली आणि आम्हाला विस्थापन थांबवण्याची विनंती केली.”

30 वर्षांपूर्वीच्या इतिहासाची साधनं तपासून पाहिली तर असं दिसतं की, हे विस्थापन केवळ पंडितांचं नाही तर स्थानिक शीख व मुस्लिमांचंही झालेलं आहे. शिवाय या संघर्षात हजारोंच्या संख्येने मुस्लीमही मारले गेले. पण सिनेमा काश्मिरी मुस्लिमांच्या व्यथांना स्थान देत नाही. उलट मुस्लिमांनी हिंदूंचं अन्न-पाणी रोखलं असा भ्रामक प्रचार करतो.

अब्दुल माजिद मट्टू यांनी ‘कश्मिर इशू : अ हिस्टोरिकल परस्पेक्टिव्ह’ या शीर्षकाचं, काश्मीरच्या राजकीय स्थितीवर भाष्य करणारं एक पुस्तक लिहिलं आहे. त्यांनी 17 ऑगस्ट 2016 रोजी ‘ग्रेटर काश्मीर’ या वृत्तपत्रात ‘Kashmiri Pandits: An incendiary, venomous narrative’ असा लेख लिहून काश्मिरी पंडितांच्या विस्थापनावर भाष्य केलं आहे. ते लिहितात, “एप्रिल 1990 मध्ये, प्रख्यात नागरी स्वातंत्र्य कार्यकर्ते, न्यायमूर्ती व्ही.एम. तारकुंडे यांनी काश्मीरच्या परिस्थितीवर एक अहवाल सादर केला. त्यात त्यांनी लिहिलं, ‘हिंदूंना स्थानिक मुस्लिमांकडून पूर्ण सहकार्य मिळालं आहे. मुस्लिमांनी सर्वांना रेशन आणि दैनंदिन वस्तूंचा पुरवठा केला. काश्मीरमध्ये संपूर्ण जातीय सलोखा आहे. ...गैर-मुस्लिमांच्या मालमत्तेची लूट किंवा जाळपोळीची एकही घटना घडलेली नाही.”

सिनेमात वारंवार असे संवाद आलेले आहेत की, स्थानिक मुस्लिमांनी पंडितांच्या महिलांची अब्रू लुटली, त्यांच्यावर अत्याचार केले. परंतु मट्टू या मिथ्यप्रचाराला खेदाची बाब संबोधतात. “(जगमोहन काळातील) प्रशासकीय समुदायाच्या एका वर्गाने मुस्लीम बांधवांविरुद्ध अपमानास्पद प्रचाराची जुनी रीत वापरली. त्यांनीच पंडिताच्या स्थलांतराचे औचित्य म्हणून लूट, जाळपोळ, बलात्काराच्या कथा रचल्या.” पुढे मट्टू यांनी स्थानिक मुस्लिमांच्या वेदना योग्य रीतीने शब्दबद्ध झाल्या नसल्याबद्दल खंत व्यक्त केली आहे.

काश्मिरी पंडितांवर पुस्तकरुपाने 900 पानांचा दस्तऐवज लिहिणारे अशोक कुमार पांडेय, यांनी 15 मार्च रोजी एक दीर्घ व्हिडिओ प्रसिद्ध करून काश्मिरी मुस्लिमांच्या व्यथा-कथांवर भाष्य केलं आहे. शिवाय चित्रपटात मांडण्यात आलेला एकांगी दृष्टिकोन, दिशाभूल करणारी माहिती, मिथ्यांवर आणि अर्धसत्यावर प्रकाश टाकत निर्मात्याचा खोटारडेपणा उघड केला आहे. या शिवाय काश्मिरी पंडितांवर ‘अवर मून हॅज ब्लड क्लॉट्स’ हे पुस्तक लिहिणारे राहुल पंडिता यांनी हा सिनेमा येण्याआधी, 2020 मध्ये ‘द काश्मिरी फाईल्स’ सिनेमात मिथ्य मांडणी करणार असल्याचा दिग्दर्शकावर आरोप केला होता. ज्यावरून विवेक अग्निहोत्री आणि पंडितांमध्ये खडाजंगी देखील उडाली होती.

विशेष म्हणजे राहुल पंडितांच्या उपरोक्त पुस्तकावर 2020 साली विधू विनोद चोपडा यांनी ‘शिकारा’ नावाचा एक उत्तम हिंदी सिनेमा तयार केलेला आहे. त्या सिनेमाचे लेखक व दिग्दर्शक दोन्ही काश्मिरी पंडीत आहेत.आणि त्यात अत्यंत संयत पद्धतीने पंडितांच्या विस्थापनाचा विषय हाताळला आहे. त्यात कुठल्याही प्रकारचं प्रक्षोभक चित्रण आढळत नाही. परंतु संघ-भाजपने त्याचं कधीही प्रमोशन केलेलं नाही किंवा प्रधानसेवकांनी त्यावर मन की बातही केलेली नाही. असो!

(या लेखाचा उत्तरार्ध वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

- कलीम अजीम, पुणे
kalimazim2@gmail.com

Tags: काश्मीर प्रश्न काश्मिरी पंडीत मुस्लीम भारतीय मुसलमान हिंदी चित्रपट Load More Tags

Comments:

Pradeep Vasantrao Kendre

लेख लिहीणाराच्या नावावरुनच कळालं किती निष्पक्ष लेखक आहे मुळात धार्मिक पाळेमुळे इतकी खोलवर रुजली आहेत की IAS जरी असला तरी तो असाच तुमचा समविचारी असेल... फक्त धार्मिक आधारावर राज्याची लोकसंख्या केली आहे कश्मिर मध्ये पण ते सत्य असूनही कथा असल्यासारखी परिस्थिती निर्माण केली आहे अन् तुमच्यासारखे लेखकच खरा प्रोपगंडा चालवत आहेत... हिंमत असेल अन् धमक असेल तर सत्य लिहून दाखव लिहीणार नाहीसच हे माहीत आहे

U P Aundhkar

साप्ताहिक साधनेला न शोभणारे अत्यंत सवंग भाषेत, पूर्वग्रह दुषित व एकांगी परीक्षण आहे.

Hiraj janardan

समीक्षा अगदी यथातथ्य आहे. गुजरातच्या दंगलीनंतर त्या दंगलींची भयावहता दाखवणारी दोन पुस्तकं प्रकाशित झाली होती द फुट सोल्जर ऑफ कॉन्स्टिट्यूशन आणि दुसरे गुजरात फाईल्स . पुस्तकं खूप गाजली आणि ह्या गाजलेल्या पुस्तकाच्या शीर्षकाचीन उचलेगिरी करून निघाला काश्मीर फाईल्स. मोठा खटाटोप करताना फाईल्स शब्दाची चक्क उसनवारी की चोरी?

Heena khan

एक सिनेमा झुंडीचं रुपांतर टीम (समूह) मध्ये कसं करायचं याचा संदेश देतो तर दुसरा सिनेमा समूहाला उन्मादी झुंडीत बदलवण्यासाठीचा खटाटोप करतो. - एका वाक्यात दोन्ही सिनेमांचा सार आहे.

Add Comment