ज़बान-ए-फ़ारसी 

आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिनानिमित्त...

फारसी हा शब्द फारसी भाषेत...

21 फेब्रुवारी हा दिवस जगभर आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन म्हणून साजरा केला जातो. या निमित्ताने स्पेन आणि इराण  या दोन देशांतील अनुक्रमे स्पॅनिश आणि फारसी या भाषा आणि या भाषांचे त्या-त्या देशातील स्थान या विषयी दोन लेख प्रसिद्ध करत आहोत. त्यापैकी स्पॅनिश भाषेची ओळख करून देणारा लेख काल प्रसिद्ध झाला. तर फारसी भाषेवरील लेख आज प्रसिद्ध करत आहोत.

फारसी ही इराण देशातील फार्स भागाची भाषा! त्या भागाचे व भाषेचे मूळ नाव पारस व पारसी. ही इंडो-युरोपिअन भाषाकुलातील इंडो-आर्यन या उपकुलातील भाषा आहे...  त्यामुळे हिला आर्यभाषा असेही म्हणतात. 

आत्ताची फारसी भाषा ही तीन टप्प्यांमधून पुढे संक्रमित झाली आहे. एक ओल्ड पर्शिअन ही हेकामनेशी साम्राज्याची अधिकृत भाषा होती. दुसरी मिडल पर्शिअन ही सासानी साम्राज्याची राजभाषा होती. ओल्ड पर्शिअन ही क्युनिफॉर्म लिपीमध्ये लिहिली जात असे... तर मिडल पर्शिअन ही पहलवी लिपीमध्ये लिहिली जात असे.

सातव्या शतकात पर्शियावर अरबांनी आक्रमण केले आणि सासानी साम्राज्य लयास गेले. त्यानंतरच्या कालखंडात फारसी भाषेमध्ये दोन शतकांचा अंधार किंवा निःशब्दता दिसून येते. त्यालाच ‘दु कर्न - ए - सोकूत’  असे म्हटले आहे. याचे कारण या दोन शतकांमध्ये नेमके काय घडले, भाषा व लिपी यांमध्ये काय व कसे बदल झाले याबद्दल काहीच ठोस माहिती मिळत नाही. या साम्राज्याच्या उलथापालथीनंतर फारसी भाषेवर अरबी भाषेचा प्रभाव वाढला व लिपीदेखील बदलून अरबी झाली. अरबी भाषेमध्ये प हा उच्चार नसल्याने  पारसीऐवजी फारसी हे नाव रूढ झाले. त्याचबरोबरीने फारसी भाषेत असलेली ‘ग’, ‘झ्य’, ‘च’ व ‘प’ ही अक्षरे मूळच्या अरबी वर्णमालेत  सामावून घेण्यात आली.

देश 
फारसी ही इराणची राष्ट्रभाषा आहे. इराणव्यतिरिक्त ती अफगाणिस्तानमध्ये (दरी), ताजिकिस्तान (ताजिकी), आणि अझरबैजान या देशांत बोलली जाते. अफगाणिस्तानात ‘पश्तो’नंतर अधिकृत भाषा म्हणून  ‘दरी’ या नावाने ओळखली जाते. ताजिकिस्तानमध्ये राजकीय कारणांमुळे फारसी ही सीरिलिक लिपीमध्ये लिहिली जाते. इराणव्यतिरिक्त भारत, पाकिस्तान, अमेरिका, बांगलादेश, अफगाणिस्तान या देशांमध्ये फारसी शिकवली जाते. अझरबैजान या देशाची राजधानी बाकू येथील ऐतिहासिक ‘आतिश गाह’ (आगीचे स्थान) येथे संस्कृत व पारशी असा द्वैभाषिक शिलालेख आढळतो. 

फिरदौसीचा शाहनामा
दहाव्या शतकातील सुप्रसिद्ध इराणी कवी अबूल कासीम फिरदौसी यांनी ‘शाहनामा’ (राजांची कथा)  हे महाकाव्य लिहिले. शाहनामामध्ये फिरदौसीने इराणच्या राजांचा इतिहास आणि पुराणकथा लिहिल्या आहेत. या ग्रंथाचे वैशिष्ट्य म्हणजे याची भाषा! अरबांच्या आक्रमणानंतर मूळ फारसी भाषेचे अस्तित्व नाहीसे होत होते. फिरदौसीने शाहनामामध्ये अत्यल्प अरबी शब्दांचा वापर केलेला आढळतो. या ग्रंथावरून तत्कालीन फारसीचे स्वरूप समजण्यास मदत होते. 

‘शाहनामा’ हा फारसी भाषेच्या इतिहासातील महत्त्वाचा ग्रंथ आहे. याच कारणास्तव फिरदौसी हा इराणचा राष्ट्रीय कवी आहे व शाहनामा हा साहित्यिक विद्वानांबरोबरच सामान्य इराणी माणसाच्याही जिव्हाळ्याचा विषय आहे. शाहनाम्यातील सुप्रसिद्ध कविता या ग्रंथाचे सार सांगते - "बासी रंज बोर्दम् दार ईन साले सी, आजाम जिन्दे करदम बादीन पारसी" अर्थात तीस वर्षे कष्ट करून मी ही पारसी जीवीत ठेवली आहे.

फारसी साहित्य, काव्य व चित्रपट
इराणी माणूस हा जगभर त्याच्या इंटलेक्चुअल क्रिएटिव्हिटीसाठी अर्थात बौद्धिक सर्जनशीलतेसाठी प्रसिद्ध आहे. याचा उल्लेख प्रेषित महंमदांच्या वचनामध्ये - हदिसमध्येदेखील - मिळतो. फारसी भाषेमध्ये जगातील काही सर्वोत्तम काव्यरचना आहेत. हाफिज, सादी, फिरदौसी, मौलाना रूमी, ओमर खय्याम, अत्तार निशापुरी, साईब तबरेजी, सोहराब सेपेहेरी व निमायू सीज हे फारसीचे प्रसिद्ध कवी आहेत. सादीची 'बनी आदम' ही प्रसिद्ध कविता संयुक्त राष्ट्र संघाच्या मुख्यालयातील भिंतीवर कोरण्यात आली आहे. शब-ए-यल्दा या सणाला रात्रभर हाफिजच्या ‘दिवान - ए – हाफिज’ या काव्यसंग्रहाचे वाचन आणि रसग्रहण करण्याची परंपरा आहे.

जगभरात इराणी चित्रपटसृष्टीचे अनेक चाहते आहेत. इराणी चित्रपटांनी आपला एक ठसा उमटवला आहे. माजिद माजिदी, अब्बास कियारोस्तोमी, दारियुश मेहेर जूयी यांची नावे अत्यंत आदराने घेतली जातात. चित्रपट-साहित्य कलाकृतींसोबतच इराणी चित्रकला व स्थापत्य यांचेही महत्त्व अनन्यसाधारण आहे.

फारसी लिपी 
फारसी ही अरबी लिपीमध्ये उजवीकडून डावीकडे लिहिली जाते. भारतीय भाषा-लिप्यांप्रमाणे यांमध्ये बाराखडी नसते... त्यामुळे डायक्रिटीक मार्क तसेच चिन्हांच्या वापरावर उच्चार मोठ्या प्रमाणावर अवलंबून आहेत. नस्ख़, नस्तालिक़, शिकस्ते व शिकस्ते नस्तालीक़ या काही प्रमुख लिप्यांचा वापर सुलेखन करण्याकरता केला जतो. कुराणातील आयत लिहिण्याकरता थुलूथ / सोल्स या लिपीचा वापर केला जातो. 

फारसी भाषेमध्ये अनेक अरबी व फ्रेंच शब्दांचा वापर केला जातो. फारसीचे व्याकरण व इतर युरोपिअन भाषांच्या व्याकरणात साम्य आहे.

फारसी व भारत
फारसी भाषेचा भारताशी प्राचीन काळापासून संबंध आहे. वैदिक संस्कृत व अवेस्ता भाषांमध्ये अनेक साम्यस्थळे आहेत. नंतर मध्ययुगात बाराव्या शतकानंतर आलेल्या इस्लामी राजवटींची राजभाषा फारसी होती. तसेच राज्यव्यवस्थेवर पर्शिअन राज्यव्यवस्थेचा खोलवर प्रभाव होता. तत्कालीन इतिहासाची साधने - शिलालेख, नाणी, दरबारी दस्तऐवज, सुलतानाची व बादशहांची फर्माने, पत्रव्यवहार हे फारसीमध्ये लिहिले अथवा कोरले होते. उत्तर भारतातील मुघल राजवट व दक्षिण भारतातील बहमनी सल्तनत हा फारसीचा भारतातील सुवर्णकाळच म्हणायला हरकत नाही.

तबकात - ए - नासिरी, बाबरनामा, अकबरनामा, ऐन - ए - अकबरी, तुजुक - ए - जहांगिरी, बादशाहनामा, आलमगीरनामा, मासिर - ए - आलमगिरी इत्यादी मूळ फारसीतल्या  ग्रंथांमधून तत्कालीन समाजाचे चित्रण व इतिहासाचे चित्रांकन केलेले आहे. अमीर खुसरो देहलवी, बेदिल यांच्या फारसी काव्यरचना इराणमध्येही फार प्रसिद्ध आहेत. फारसीचे तत्कालीन महत्त्व अनन्यसाधारण होते... त्यामुळेच आपल्याकडे ‘हाथ कंगन को आरसी क्या और पढ़ें लिखें को फारसी क्या’ ही म्हण प्रचलित होती... म्हणजे सुशिक्षित व्यक्तीस फारसी येतच असणार...! 

छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्याभिषेकानंतर राजपत्रांमधील फारसी मायना बदलून संस्कृतप्रचुर मराठी केला. ‘राज्यव्यवहार कोष’ या ग्रंथाची निर्मिती केली, ज्यामध्ये राज्यव्यवहारातील फारसी शब्दांकरता पर्यायी संस्कृत शब्दांचा संग्रह करण्यात आला.

अठराव्या शतकाच्या उत्तरार्धानंतर फारसीचा प्रभाव हळूहळू कमी झाला आणि उर्दू भाषेचा प्रभाव वाढला. अठराव्या व एकोणीसाव्या शतकात मिर्झा गालिबसारखे कवी फारसीमधून व उर्दूमधून काव्य लिहीत होते... परंतु त्यांचे उर्दू काव्य जास्त लोकप्रिय झाले. आता ‘पढ़े फारसी, बेचे तेल’ असा वाक्प्रचार सुरू झाला... म्हणजे फारसीचा अभ्यासक विद्वान आहे... परंतु उपजिविकेसाठी तेल विकतो.  

पुण्याचे पेशवे व ईस्ट इंडिया कंपनी यांचा पत्रव्यवहार इंग्लीशमध्ये किंवा मराठीत नसून फारसीमध्ये आहे... यावरूनच फारसीचे महत्त्व या काळापर्यंत टिकून होते हे अधोरेखित होते. पुण्यात 1754मध्ये बांधलेल्या त्रिशुंड गणपती देवळात फारसी भाषेतील शिलालेख आहे. इंग्रज राजवटीमध्ये फारसी भाषेचे महत्त्व हळूहळू कमी होत गेले. 

आजमितीस दोनशे-चारशे वर्षांपूर्वीची फारसी कागदपत्रे व हस्तलिखिते वाचू व समजू शकतील असे हाताच्या बोटावर मोजण्याइतकेच जाणकार आहेत हे अत्यंत दुर्दैवी आहे. संगीत, संस्कृती, राजकारण, व्यापार तसेच सामाजिक इतिहास असा अनेक विषयांतील अप्रकाशित इतिहास या फारसी साधनांमध्ये दडलेला आहे.

मराठीवर फारसीचा प्रभाव
आज आपण जी मराठी बोलतो तिच्यात अनेक शब्द हे मूळचे फारसी-अरबी आहेत. उदाहरणार्थ, चेहरा, चरबी, पोक, जमीन, दुकान, बाजार, कुस्ती, तालीम, उर्फ, जोर, दस्तऐवज, खरेदी, मेवा, कायदा, फायदा इत्यादी. 1925मध्ये प्रसिद्ध झालेल्या कवी माधव पटवर्धन उर्फ माधव ज्युलिअन यांचा ‘फार्शी-मराठी कोश’ व यु. म. पठाण यांची ‘फारसी मराठी अनुबंध’ व ‘फारसी मराठी व्युत्पत्ती कोश’ ही अत्यंत महत्त्वाची पुस्तके आहेत. जिज्ञासूंनी ती जरूर (हा शब्दसुद्धा फारसी शब्द) वाचावीत.

- निखिल परांजपे 
nikhilhparanjape@gmail.com

(लेखकाने मुंबई विद्यापीठातून फारसी भाषेचा अ‍ॅडव्हान्स्ड डिप्लोमा पूर्ण केलेला असून सध्या ते सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या इतिहास विभागात फारसी भाषा शिकवतात.)


भाषेविषयीचे हे लेखही वाचा :

जगातील दुसरी सर्वाधिक बोलली जाणारी भाषा : स्पॅनिश - मृणालिनी साठे 

फ्रेंच भाषा आणि फ्रान्स - उज्ज्वला जोगळेकर 

जर्मन भाषा आणि जर्मनी - नीती बडवे

जपानी भाषा आणि जपान - स्मिता बर्वे-घाटगे 

Tags: मराठी भाषा आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन मातृभाषा फारसी इराण शिवाजी महाराज इतिहास रुमी हाफिज Language Mothertounge Persian Iran Shivaji Maharaj History Rumi Hafiz Poetry Cinema Load More Tags

Comments:

Sanjiv Deoraoji Bonde

खूप छान माहिती. धन्यवाद !

Mrs.Gauri Nitin More

Aatishay sakhol lekha. mahitipurna vivechan. lekha navkhya manasa la hi farsi che che ved va chand laun jayil asa aahe.

Anup Priolkar

Informative article about Farsi language. Great.

Add Comment