‘कस्तुरी’चा अस्वस्थ दरवळ

चित्रपट संपल्यावर नऊ प्रेक्षकांमध्ये निर्माण झालेली स्तब्धता हे या कलाकृतीचे यश तर उर्वरित 91 रिकाम्या खुर्च्या हे समाजाच्या अभिरुचीचे सामूहिक करंटेपणच अधोरेखित करते... 

ही कथा गोपी आणि आदिम या दोन जिवलग मित्रांची आणि त्यांच्या ‘कस्तुरी’ मिळवण्याच्या ध्यासाची आहे, असे ढोबळमानाने सांगणेही अयोग्य ठरेल कारण हा चित्रपट या कथारेषेला धरून आपण रोज पाहत असलेली पण न पाहिल्यासारखे केलेली किंवा आपल्याला जाणवतदेखील नसलेली विषमता, भयाणता निरनिराळ्या प्रसंगांच्या शृंखलेतून, संवादांच्या माध्यमातून देखील कोणतेही थेट भाष्य न करता प्रेक्षकांच्या मनावर ठसवतो व अंतर्मुख करतो. हे शोषण सामाजिक, आर्थिक, वैवाहिक, आरोग्य विषयक असे बहुआयामी आहे.

हे लिखाण म्हणजे या सिनेमाचे परीक्षण/समीक्षण असे काहीही नाही हे पहिलेच नमूद केले पाहिजे. हे लिखाण म्हणजे हा चित्रपट पुन्हा ‘रवंथ’ करणे आहे. आजमितीला हा चित्रपट बहुतांश चित्रपटगृहातून बाहेर पडला आहे. हा चित्रपट म्हणजे ‘अॅनिमल’ व ‘सॅम बहादूर’च्या झंजावातात येऊन गेलेली झुळूक असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.

या चित्रपटाचे ‘फर्स्ट पोस्टर’, ‘टीझर’, ‘ट्रेलर’ असे काही पाहण्यात आले नव्हते आणि त्याचे ‘प्रमोशन’ देखील तितक्या जोरकसपणे झालेले नव्हते. इतकेच काय तर चित्रपट क्षेत्रात असलेल्या जाणकार व्यक्तींना देखील असा कोणता चित्रपट आल्याचे माहीत नव्हते.

नागराज मंजुळे आणि अनुराग कश्यप जर एखाद्या चित्रपटासाठी एकत्र येत असतील तर त्यास नक्कीच ठोस कारण असले पाहिजे असे वाटून हा चित्रपट पाहायला गेलो. चित्रपटाच्या ‘शो’ ला मी धरून चार प्रेक्षक होते, “शो सुरु करायला किमान पाच प्रेक्षक पाहिजेत नाहीतर शो रद्द होईल” असे चित्रपटगृहाच्या व्यवस्थापकाने आधीच सांगितले होते. शेवटी विचारविनिमय करून आम्ही चार जणांनीच पाचवे तिकीट काढले (या आधी नागेश कुकूनूरच्या ‘धानक’ या चित्रपटाचा असाच अनुभव गाठीशी होता. त्यामुळे इतर तीन प्रेक्षकांना मी पाचवे तिकीट काढण्याचा ऑप्शन सुचवू शकलो.) व ‘शो’ सुरु झाला. चित्रपट संपताना मात्र नऊ प्रेक्षक होते व चित्रपटाचे ‘क्रेडिट्स’ संपेपर्यंत स्तब्धपणे बसून होते. 

एक आठवीमधला 14 वर्षांचा (सक्तीच्या मोफत शिक्षणाच्या वयोगटातील)  मुलगा एकीकडे बेवारस मृतदेहाचे दफन करणे, छिन्नविछिन्न झालेले बेवारस मृतदेह उचलणे, पोस्टमार्टम करणे, सार्वजनिक संडास साफ करणे, ड्रेनेज सफाई करणाऱ्यांना मदत करणे ही कामे करताना दिसत असेल  आणि दुसरीकडे तो अभ्यासात हुशार, संस्कृत भाषेचा जाणकार असेल, त्याच्या हातात कला असेल तर त्या मुलाविषयी जी भावना दाटून येईल त्यास शब्दसामर्थ्य कमी पडते आणि त्याची जागा स्तब्धता घेते. 

गोपी आणि आदिम हे जिवलग मित्र आहेत. गोपी वरील कामे करणाऱ्या समाजाचा आहे तर आदिम खाटिक समाजाचा आहे. खरे तर वरील सर्व कामे गोपीच्या वडिलांची आहेत पण दारूच्या व्यसनामुळे त्यांच्याकडून ही कामे पूर्ण क्षमतेने होत नाहीत (नशा केल्याशिवाय हे काम करताच येत नाही, असा हा ‘लूप’ आहे ) त्यामुळे गोपीला त्यांना मदत करावी लागते. आईसुद्धा संडास सफाईची कामे करते. तिला स्वतःला गुटख्याचे व्यसन आहे आणि ती नवऱ्याच्या व्यसनामुळे व काम न करण्यामुळे कावलेली आहे. गोपीची आजी भंगार जमवून विकायचे काम करते. तिची गोपीवर माया आहे. 

गोपीला मात्र शिकायचे आहे त्यामुळे तो कामाला नाईलाजाने जातोय पण शाळा बुडवायला नकार देतोय. त्यामुळे त्याची आई त्याच्यावर करवादते आहे. ‘शिकून काय करणार?’ हा तिचा मूळ प्रश्न आहे.

ही कामे करताना गोपीला अभ्यासाला वेळ मिळत नाही, त्यामुळे त्याला शाळेत शिक्षा होते आहे. शिक्षा होणार हे माहीत असूनदेखील ‘कोणी कोणी गृहपाठ नाही केला त्यांनी उभे रहा’ या शिक्षकांच्या आज्ञेनुसार स्वतः हून उभे राहण्याचा प्रामाणिकपणा गोपीमध्ये आहे. (गोपी एकटाच उठून उभा राहतो, वर्गातील इतर सर्वांनीच गृहपाठ केलेला असणे निव्वळ अशक्य आहे हे शाळेत गेलेला कोणीही सहज ओळखेल). गोपीचा वहीवर गृहपाठ झालेला नसला तरी मेंदूत/मनात झालेला आहे, कारण वर्गात विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे त्याला येत आहेत. 

रोज कोणत्या ना कोणत्या घाणीत काम करत असल्यामुळे गोपीला अत्तराचे एक प्रकारे ऑबसेशन आहे त्यामुळे तो अत्तराची रिकामी बाटली रगडून रगडून वापरत आहे. आणि आता त्याला कस्तुरी मिळवून त्याचे अत्तर घेण्याचा ध्यास लागलेला आहे. त्याच्या या कस्तुरी मिळवण्याच्या प्रवासात त्याच्यासोबत आहे त्याचा जिवलग मित्र आदिम.

त्यांची वस्ती म्हणजे टीन च्या शेड ची बकाल वस्ती आहे. त्या वस्तीच्या जरा लांब राहणाऱ्या ‘झोल’ ची सर्व कामे करणाऱ्या मुलाकडे कस्तुरी मिळेल असे त्यांना समजते व पाच हजार रुपयांवरून सुरु झालेला सौदा तीन हजार रुपयांवर निगोशिएट होतो. 

गोपीला संस्कृतच्या निबंध स्पर्धेत बक्षीस मिळालेले आहे आणि ते 26 जानेवारीच्या कार्यक्रमात घ्यायला जाताना गोपीला कस्तुरीचे अत्तर लावून जायचे आहे. म्हणजेच त्याआधी त्याला तीन हजार रुपये जमवायचे आहेत. त्यामुळे आता नाईलाजाने करत असलेले कामच त्याचे कस्तुरीसाठीच्या अर्थार्जनाचे साधन ठरणार असते.

ही कथा गोपी आणि आदिम या दोन जिवलग मित्रांची आणि त्यांच्या ‘कस्तुरी’ मिळवण्याच्या ध्यासाची आहे, असे ढोबळमानाने सांगणेही अयोग्य ठरेल कारण हा चित्रपट या कथारेषेला धरून आपण रोज पाहत असलेली पण न पाहिल्यासारखे केलेली किंवा आपल्याला जाणवतदेखील नसलेली विषमता, भयाणता निरनिराळ्या प्रसंगांच्या शृंखलेतून, संवादांच्या माध्यमातून देखील कोणतेही थेट भाष्य न करता प्रेक्षकांच्या मनावर ठसवतो व अंतर्मुख करतो. हे शोषण सामाजिक, आर्थिक, वैवाहिक, आरोग्य विषयक असे बहुआयामी आहे. कस्तुरीचा सौदा करणारा मुलगा पूर्णपणे व्यसनाधीन आहे, त्याची बायको अल्पवयीन आहे, तिला त्याच्याकडून मारहाण होते आहे, ती नंतर दुसऱ्या व्यक्तीबरोबर पळून गेलेली व त्यामुळे हा मुलगा विमनस्क झालेला दिसत आहे. गोपीचे कुटुंब वडिलांच्या व्यसनाधीनतेमुळे कर्जबाजारी झाले आहे त्याची उस्तवार आईला करावी लागत आहे.

ही व्यवस्था सर्वांच्या इतकी अंगवळणी पडलेली आहे की, त्यातील शोषण हाच नियम बनून जातो. त्यामुळे एका 14 वर्षांच्या मुलाला प्रेताची कवटी फोडायला सांगताना पोस्टमार्टेम करणाऱ्या डॉक्टरला काही वाटत नाही की, प्रेत दफन करायला सांगताना पोलिसांना किंवा शाळेची टाकी साफ करायला सांगताना शाळेच्या कर्मचाऱ्यांना. 

या चित्रपटातील सर्व कलाकार नवखे आहेत आणि सर्वांचा अभिनय उत्तम आहे. सर्व चित्रपटभर भीषण वास्तवाला रोजच्या रोज सामोरे जाणाऱ्या गोपीच्या चेहऱ्यावरील न ढळणारी निरागसता, डोळ्यातील चमक व समाजाकडून हिणवले गेल्यावर येणारा अपराधीभाव प्रेक्षकाला मनात कल्लोळ करून जातात. 

कथा,पटकथा, दिग्दर्शन, अभिनय या सर्वच बाबतीत चित्रपट अभिजात दर्जाचा आहे. सामाजिक वास्तवावर भाष्य करणारे चित्रपट हे प्रेमकथा, रहस्यपट, देमारपट, विनोदी चित्रपटांच्या जशा लाटांवर लाटा येतात तसे येत नाहीत. पण मागील काही वर्षांचा विचार केला तर असे दिसते की, सामाजिक चित्रपटांनासुद्धा प्रेमकथेचा आधार घ्यावा लागला आहे. हा चित्रपट पाहताना ‘आता गोपी ला आवडणारी मुलगी दिसेल’ असे वाटते पण तसे घडत नाही. हा चित्रपट ‘हटके’ ठरतो तो इथे.

सामाजिक चित्रपटाच्या जाणकार प्रेक्षकांना गोपीला कस्तुरी मिळणार नाही हे एका क्षणी लक्षात आलेले असते पण या चित्रपटातील प्रसंग प्रेक्षकाला एकाच जागी खिळवून ठेवतात. यातील काही प्रसंगांवर भाष्य करणे औचित्याचे ठरेल. 

एका प्रसंगात संपूर्ण पडदा व्यापलेला पूर्णपणे तुंबलेला संडास गोपीच्या नजरेतून दिग्दर्शक आपल्याला दाखवतो. तेव्हा पोटात मळमळ होते आणि निर्मळ मनाचा गोपी त्या संडासात हात घालून (रुग्णालयातील कर्मचाऱ्याने मुद्दाम टाकलेली) दारूची बाटली काढतो, तेव्हा त्या तुंबलेल्या घाणीचा निचरा होतो, त्या निचरा होण्याचा आवाज आपल्याला सुपरिचित असतो पण आज तो कानापासून मेंदूपर्यंतची आपली सर्व सिस्टिम गोपीविषयीच्या तळमळीने व्यापून टाकतो. (या नंतर सार्वजनिक शौचालय वापरताना गोपीसारखा एखादा मुलगा ते साफ करायला येणार आहे याचे भान राखले गेले तरी तो या चित्रपटाचा प्रभाव ठरू शकतो; फक्त तो प्रभाव मोजता येणार नाही इतकेच)

'कस्तुरी'ची टीम

गोपीच्या वडिलांच्या दारूच्या व्यसनामुळे व कामातील कुचराईमुळे पोस्टमार्टेमच्या कामावरून कमी करण्यात येते. गोपीच्या आईने बऱ्याच मिनतवाऱ्या केल्यानंतर डॉक्टर वडिलांच्या जागी गोपीला पाठवण्याचा सल्ला देतो. त्यामुळे गोपीला पूर्णवेळ काम करावे लागणार असते व त्याची शाळा बंद होणार असते. गोपीला हे कळते तेव्हा तो काहीकाळ विरोध करतो पण आई रागाच्या भरात पुस्तकच फाडून टाकते, आता शाळा बंद करण्याला पर्याय नाही हे कळल्यावर गोपी शाळेचे सर्व साहित्य एका ट्रंकमध्ये भरून पलंगाखाली ढकलतो. या प्रसंगात दिग्दर्शकाने कॅमेरा पलंगाच्या मागे लावला आहे. त्यामुळे गोपी जेव्हा ट्रंक पलंगाखाली ढकलतो तेव्हा ती ट्रंक आणि त्यामुळे पसरणारा अंधार प्रेक्षकाच्या अंगावर येतो. शाळा बंद झाल्यामुळे गोपीच्या जीवनात येणार अंधार दिग्दर्शक दाखवतो तो हा असा! 

चित्रपट शेवटाकडे जातानाच्या एका प्रसंगात 26 जानेवारीच्या दिवशी गोपी रुग्णालयातील साफसफाई संपवून बक्षीस घेण्यासाठी जायला निघतो तेव्हा रुग्णालयाचा कर्मचारी त्याला कचरा टाकायला पिटाळतो. त्याचा मित्र आदिम त्याची वाट पाहत थांबलेला आहे. ते कामसुद्धा संपवून गोपी निघणार इतक्यात रुग्णवाहिका येताना दिसते, पोस्टमार्टेमसाठी प्रेत आलेले असते त्यामुळे गोपीला आता शाळेत जाता येणार नसते. गोपी आणि आदिमची नजरानजर होते आणि दोघांच्या चेहऱ्यावर जे भाव येतात त्याला ‘मायुसी’ हाच शब्द वापरता येईल. (गोपी व आदिम यांची मैत्री हा या चित्रपटाच्या जाणीवेचा व नेणीवेचादेखील भाग आहे)


हेही वाचा : किचन : स्त्री शोषणाची प्रमुख जागा  - मकरंद ग. दीक्षित


‘फँड्री’चा शेवट ‘जब्या’च्या व्यवस्थेवर दगड भिरकावून होतो. ‘कस्तुरी’चा शेवट होतो तेव्हा गोपी स्वतःच्या हाताने फाडलेली पुस्तके स्वतः शिवतो व शाळेकडे जाऊ लागतो, वाटेत त्याचा जिवलग मित्र आदिम त्याला अत्तराची नवी कोरी बाटली देतो. गोपी ती बाटली बाजूच्या गटारात फेकतो (कस्तुरीच्या पाठलागामागे त्याच्या मूल्यांना ठेच लागलेली असते.. त्यातून तो शहाणा झालेला असतो, त्याच्या शिक्षण घेण्याच्या आड येणारे कोणतेही डिसट्रॅक्शन आता तो भिरकावून देणार असतो) व त्या बाटलीतले अत्तर गटाराच्या पाण्यात मिसळून एक हिरवी सुंदर नक्षी तयार होते.

कस्तुरीमृगाला त्याच्या बेंबीतच कस्तुरी आहे याची जाण नसते त्यामुळे त्या गंधामागे तो रानभर घुमत असतो. गोपीचेही तसेच आहे. त्याचे निर्मळ मन हीच त्याची कस्तुरी आहे आणि ती कायम त्याच्याजवळ राहील. बाह्य जगातील घाणीचा त्यावर प्रभाव पडणार नाही. त्याचे वय लहान आहे त्यामुळे हे सारेच तत्त्वज्ञान त्याला आत्ताच समजेल असे नाही, पण त्याची ‘बैठक’ आता पक्की झाली आहे आणि त्याची वाटचाल त्या दिशेने सुरु झालेली आहे.

चित्रपट असा आशावाद जागवून संपणार आहे याचे सूचन चित्रपटातील प्रसंगातून येऊन गेलेले असते. गोपीची आजी त्याला नेहमी नाथ आख्यानाला घेऊन जात असते. त्यात एक रूपक कथा अशी असते की नाथांना बरेच दिवस घाणीत-कचऱ्यात राहावे लागते पण ते जेव्हा त्यातून बाहेर येतात तेव्हा त्यांच्या अंगाला सुगंध येत असतो. 

चित्रपटाचा दर्जा व बॉक्स ऑफिसचा परस्परसंबंध नसतो. एखादी अभिजात कलाकृती आर्थिक निकषांवर अपयशी ठरून प्रेक्षकांची वाहवा मिळवून गेलेली असते.

कस्तुरी ही दुर्मिळ गोष्ट. ती मिळवायला प्रयत्न करावे लागतात आणि तिचा दूरवर जाणारा व बराचवेळ टिकणारा सुगंध घेण्याची पात्रता अंगी असावी लागते. वर उल्लेख केल्याप्रमाणे हा चित्रपट संपल्यावर नऊ प्रेक्षकांमध्ये निर्माण झालेली स्तब्धता व नंतर एकाच वेळी झालेला टाळ्यांचा कडकडाट हे या कलाकृतीचे यश तर उर्वरित 91 खुर्च्या रिकाम्या असणे हे आपल्या सर्व समाजाच्या अभिरुचीचे सामूहिक करंटेपणच अधोरेखित करते... 

- मकरंद ग.दीक्षित  
meetmak23@gmail.com
(लेखक, संगणक अभियंता असून ‘स्पार्क फाउंडेशन’ या स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून आदिवासी भागात शिक्षण, रोजगार व जलसंवर्धन क्षेत्रात कार्यरत आहेत.)


 

Tags: vinod kamble interview cinema bilingual film sadhana digital मुलाखत सिनेमा मराठी चित्रपट कस्तुरी लघुपट समीक्षा Load More Tags

Comments: Show All Comments

व्यंकटेश शिवाजी साळे

पहिल्या दिवशी पहिला show या न्यायाने कस्तुरी पाहिला असता तर मला अभिजात सिनेमा pahnes मुकलो नसतो. माझे वयोमान, आणि जाहिरात माहिती न होणे. यामुळे कस्तुरी मृग प्रमाणे मला धावत रहावे लागनार आहे.

Jayant Ghate

लेखातली पुढील वाक्य म्हणजे चित्रपटाचं सार म्हणावं लागेल - "हा चित्रपट या कथारेषेला धरून आपण रोज पाहत असलेली पण न पाहिल्यासारखे केलेली किंवा आपल्याला जाणवतदेखील नसलेली विषमता, भयाणता निरनिराळ्या प्रसंगांच्या शृंखलेतून, संवादांच्या माध्यमातून देखील कोणतेही थेट भाष्य न करता प्रेक्षकांच्या मनावर ठसवतो व अंतर्मुख करतो." लेखात शेवटी म्हटल्याप्रमाणे असे चित्रपट प्रेक्षकांची वाट पहातात हे खरोखर आपल्या समाजाचं करंटेपण नाहीतर काय?

मुकुंद रामचंद्र नगराळे

अप्रतिम परीक्षण, त्यामुळे आता चित्रपट पहायची उत्सुकता लागली.

विष्णू दाते

कस्तुरी सारखे आशयघन चित्रपट पहायला मिळणे हा दुर्मिळ योग! सहजतेने साध्य न होणारा!

Satish Raje

I feel sorry for missing this movie. This article has boosted my curiosity to watch this movie.

दत्ताराम जाधव.

नक्की! नक्की पाहीन मी हा चित्रपट!

Add Comment