लुई फिशरच्या पुस्तकावरील पाच मान्यवरांच्या प्रतिक्रिया

लुई फिशर लिखित महात्मा गांधी  'His life and time' या पुस्तकाचा  वि. रा. जोगळेकर यांनी केलेला मराठी अनुवाद महात्मा गांधी जीवन आणि कार्यकाळ या नावाने ११ ऑगस्ट २०१९ रोजी साधना प्रकाशनाकडून येत आहे. त्या पुस्तकावर पाच मान्यवरांनी दिलेले अभिप्राय.

महापुरुषांचे चरित्र लिहिताना तत्कालीन वर्तमानाचे भान ठेऊन चरित्र नायकाला त्याच्या अंतर्बाह्य रूपात समजून घ्यावे लागते. महात्मा गांधी यांच्यासारख्या संत, महात्मा, राजकारणी,समाजसुधारक आणि बनिया अशी नित्यनूतन रूपे धारण करणार्‍या महापुरुषाला समजून घेणे म्हणूनच फार कठीण आव्हान आहे. हे आव्हान पेलण्याचे यशस्वी धाडस लुई फिशर यांनी केले आहे.

रावसाहेब कसबे, नाशिक

बापूंवर आजपर्यंत जगात हजारो पुस्तके लिहिली गेली. त्यांच्या जवळच्यांनी, नातेवाईकांनी, अनुयायांनी टिकाकारांनी आणि नामवंत अभ्यासकांनी. मात्र त्या सार्‍यांत 1950 च्या सुमारास आलेल्या लुई फिशर यांच्या गांधी चरित्राचा उल्लेख सर्वश्रेष्ठ असा करावा लागेल. त्यात गांधींचे चरित्र, त्यांचे बदलत जाणारे विचार, दृढ होत जाणार्‍या मूल्यनिष्ठा, प्रत्येक प्रश्‍नाचा गाभ्यापर्यंत जाऊन अभ्यास करण्याची त्यांची वृत्ती, स्वातंत्र्यलढ्याचे नेतृत्व, कारावास, काँग्रेसचा सांभाळ आणि सार्‍यांसोबत जपत ठेवलेले जनतेचे संबंध, या  सार्‍यांचा एवढ्या आत्मीयतेने व सामर्थ्याने आर्जवी आढावा दुसर्‍या कोणी घेतला नसेल. टीकाकारांविषयी आत्मीयता बाळगणारे गांधी केवळ फिशर यांनीच उभे केले. गांधीजींच्यावर होणार्‍या टिकेतील सच्चाई, फोलपणा आणि त्यावरचा खरा अभिप्रायही यात आहे. सार्‍या  भारतीयांनी अभ्यासावे व अनुसरावे असे हे पुस्तक आहे.

सुरेश द्वादशीवार, नागपूर

लुई फिशर यांना 1921च्या सुमाराला ‘न्यूयॉर्क टाइम्स’ने जर्मनीस पाठवले. त्यानंतर बरीच वर्षे ते रशियातही होते. ‘नेशन’ या नियतकालिकाचे नियमित प्रतिनिधी म्हणून त्यांनी दीर्घकाळ काम केले. त्यांची वार्तापत्रे स्वतंत्र मते मांडणारी असत. सत्य जाणून घेण्याची आणि ती निर्भेळ स्वरूपात वाचकांना सादर करण्याची पत्रकारांची निष्ठा त्यांनी आयुष्यभर सांभाळली. त्यांनी लिहिलेल्या गांधीचरित्रात एक तटस्थ दृष्टिकोन आढळतो. चरित्र लेखक अनेकदा भक्त तरी असतात, अनुयायी तरी असतात किंवा कट्टर विरोधक तरी असतात. गांधी-चरित्रकार लुई यांच्याबद्दल असे काही म्हणता येणार नाही.

नरेंद्र चपळगावकर, औरंगाबाद

 

गांधीजींविषयी जेवढे लेखन भारतात आणि परदेशांतही झाले आहे तेवढे क्वचितच दुसऱ्या कुठल्या भारतीय  नेत्याविषयी झाले असेल. विख्यात अमेरिकन पत्रकार लुई फिशर यांनी प्रत्यक्ष मुलाखती घेऊन आणि अनेक वर्षे खपून लिहिलेले विस्तृत गांधीचरित्र जगभर प्रमाण मानले जाते. वि.रा.जोगळेकर यांनी चरित्राचा मराठीत अनुवाद करून, ज्यांना इंग्रजी वाचनाचा प्रकार फारसा उपलब्ध नाही अशा वाचकांची खूप मोठी सोय केलेली आहे; त्याबद्दल मराठी वाचक त्यांचे कायम ऋणी राहतील.

मूळ कलाकृतीतील सौंदर्य आणि रंजकता अनुवादात आणणे हे खूप अवघड असते. सुदैवाने जोगळेकरांनी केलेला हा अनुवाद मूळ कृतीशी इमानही राखतो आणि तिचे सौंदर्यही कायम राखतो. अनुवादकाचे हे यश मोठे आहे. हा अनुवाद  अतिशय रसाळ झाला आहे. या उत्तम अनुवादाबद्दल मी अनुवादक जोगळेकर यांचे मनापासून अभिनंदन करतो आणि रसिक वाचकांचा उत्तम प्रतिसाद मिळून त्यांचे हे प्रचंड श्रम सार्थकी लागल्याचे समाधान त्यांना प्राप्त व्हावे, अशी आशा व्यक्त करतो.

जोगळेकर स्वत: एक निवृत्त अभियंता. त्यानंतर सहकारी क्षेत्रातील एका संस्थेचे यशस्वी निर्माते. यांच्यासाराख्याने इतका मोठा अनुवाद करायचे धाडस केले- आणि तेही वयाच्या पंचाऐंशीव्या वर्षी, याचेही कौतुक करायला हवे.

भानू काळे, पुणे

 

सध्या अहिंसा, सत्याग्रह, चरखा हे शब्द चेष्टेचे, टिंगलीचे आणि काही प्रमाणात निर्भत्सनेचेही झाले आहेत. पण ज्यांना हे शब्द 70-80 वर्षांपूर्वी विलक्षण स्फूर्तिदायक वाटले आणि त्या शब्दांमागे असलेले चैतन्यमयी व्यक्तिमत्त्व भावले, त्यात होते अल्बर्ट आइन्स्टाईन, नेल्सन मंडेला आणि लुई फिशर.

गांधीजींच्या हत्येनंतर आइन्स्टाईन उद्गारले होते की, ‘असा एक असामान्य माणूस या पृथ्वीवर होता, यावर कदाचित पुढच्या पिढ्यांचा विश्‍वासही बसणार नाही.’ आईन्स्टाईन तेव्हा 69 वर्षांचे होते, गांधीजींपेक्षा दहा वर्षांनी लहान. आणि नेल्सन मंडेला फक्त 30 वर्षांचे होते. हत्या झाली तेव्हा गांधीजी 79 वर्षांचे होते. ज्या दक्षिण आफ्रिकेत गांधींनी अहिंसा, सत्याग्रह आणि सविनय कायदेभंगाचे प्रयोग करून अपूर्व आणि अभिनव संघर्षाची सुरुवात केली, त्याच देशात मंडेलांनी पुढे वंशवादाविरुद्ध संघर्ष करून तेथील कृष्णवर्णीयांना मुक्तीचा मार्ग दाखवला.

गांधीजींची हत्या झाली तेव्हा लुई फिशर 52 वर्षांचे होते, पण गांधीजींच्या चित्तथरारक आणि चैतन्यमय जीवनाचा त्यांच्यावर इतका परिणाम झाला होता की, त्यांनी लगेचच गांधींच्या चरित्रलेखनाचा संकल्प सोडला. ‘महात्मा गांधी : हिज लाईफ अ‍ॅन्ड टाइम्स’ या त्यांच्या जगद्विख्यात पुस्तकाचे प्रकाशन झाले 1951 मध्ये- म्हणजे गांधींच्या हत्येनंतर फक्त तीन वर्षांनी.

फिशर हे एक अमेरिकन पत्रकार होते, त्यांचा जन्म 1896 चा. ते शाळेत शिकत होते, तेव्हा अवघ्या जगात प्रचंड खळबळ चालू होती. रशियात क्रांतीचे वारे वाहत होते आणि 1917 मध्ये तर ब्लादिमीर लेनिनच्या नेतृत्वाखाली झालेल्या कम्युनिस्ट क्रांतीने पूर्ण जग भारावून गेलेले होते. त्याच सुमाराला भारतातही स्वातंत्र्यभावना मूळ धरू लागली होती. काँग्रेसची स्थापना 1885 मध्ये झाल्यानंतर दादाभाई नौरोजी, पुढे लोकमान्य टिळक, गोपाळकृष्ण गोखले असे अनेक तेजस्वी तारे भारतीय नभांगणात दिसू लागले होते. गांधीजी भारतात आले 1915 मध्ये. काही वर्षांतच त्यांना देशच नव्हे तर जगही महात्मा म्हणून ओळखू लागले होते. जवाहरलाल नेहरू आणि वल्लभभाई पटेल यांच्यासारखे सुस्थित आणि यशस्वी वकीलही गांधीजींच्या व्यक्तिमत्त्वाकडे आणि त्यांच्या अभिनव संघर्षाकडे आकर्षित झाले होते.

आदर्शवादाने भारलेल्या फिशर यांना गांधींजी आणि लेनिन या दोघांच्या व्यक्तिमत्वाने आणि विचारांनी भारावून टाकले- त्यातही विशेष म्हणजे गांधीजींनी! गांधीजींच्या व्यक्तिमत्त्वाचा,विचारांचा, तत्त्वज्ञानाचा, जीवन-शैलीचा सखोल अभ्यास त्यांनी सुरू केलाच होता.

गांधीजींच्या हत्येनंतर फिशरचे हे पुस्तक प्रसिद्ध झाले आणि हा हा म्हणता अवघ्या जगभर त्या पुस्तकाची ख्याती पसरू लागली. फिशर यांनी लेनिन यांचेही प्रदीर्घ चरित्र लिहिले होते, पण गेली 70 वर्षे ज्या गांधीचरित्राने अवघे जग प्रभावित झाले, त्या चरित्राचे हे मराठी भाषांतर! इतका काळ हे पुस्तक मराठीत आले नाही ही बाब खेदाची म्हणावी लागेल. तिकडे रिचर्ड अ‍ॅटेनबरो या हॉलिवूडच्या दिग्दर्शकाचा ‘गांधी’ चित्रपटाचा मुख्य गाभा फिशर यांच्या याच पुस्तकातील आहे. गांधी चित्रपट 1982 मध्ये प्रसिद्ध झाला आणि आजही तो जगभर तितक्याच उत्कंठेने पाहिला जातो, त्याचप्रमाणे फिशर यांचा हा ग्रंथही.

वि. रा. जोगळेकर यांनी केलेले हे भाषांतर म्हणजे केवळ गांधीजीच नव्हे तर फिशर यांनाही दिलेला अपूर्व सन्मान आहे. ‘साधना’ने हे पुस्तक प्रसिद्ध करून गांधीजींच्या विचारांना व व्यक्तिमत्त्वाला नव्याने उजाळा दिला आहे- आज त्याची विशेष आवश्यकता आहे.

कुमार केतकर, मुंबई

Tags: महात्मा गांधी Kumar Ketkar sadhana publication साधना प्रकाशन लेख Load More Tags

Add Comment