1892 मध्ये जन्मलेली मॅडेलिन स्लेड ही ब्रिटिश अॅडमिरलची मुलगी वयाच्या पंधराव्या वर्षी बीथोव्हन संगीताच्या प्रेमात पडली. नंतर ती फ्रान्समध्ये गेली, तिथे रोमा रोलाँ या तत्त्वज्ञाच्या संपर्कात आली. त्यांनी लिहिलेले महात्मा गांधी यांचे चरित्र वाचून प्रभावित झाली. वयाच्या 33 व्या वर्षी म्हणजे 1925 अखेर भारतात आली, साबरमती आश्रमात राहिली. गांधीजींची मानसकन्या झाली. गांधीजींनी तिचे नामकरण 'मीराबेन' असे केले.
पुढील 23 वर्षे ती गांधींच्या सहवासात राहिली. गांधींनी सोपवलेल्या देश-विदेशांतील जबाबदाऱ्या पार पाडत राहिली. सेवाग्राम आश्रमाच्या उभारणीतही तिचे मोठे योगदान राहिले. गांधींच्या मृत्यूनंतर उत्तर भारतात आश्रम उभारून शेती व पर्यावरण या क्षेत्रांत काम करीत राहिली. 1959 मध्ये ऑस्ट्रियामधील व्हिएन्ना येथे स्थायिक झाली. 1982 मध्ये मृत्यू झाला, त्याच्या एक वर्ष आधी तिला पद्मविभूषण देण्यात आला.
कमालीचे रोमहर्षक आयुष्य जगलेल्या मीराबेनला गांधींजीनी 1924 ते 1948 या 23 वर्षांत लहान-मोठी अशी 386 पत्रे लिहिली होती, त्यांचे संकलन असलेले पुस्तक 'बापूज् लेटर्स टू मीरा' या नावाने 1950 मध्ये आले. त्या पुस्तकातील निवडक 254 पत्रांचा अनुवाद अनिल कारखानीस यांनी केला असून, 'चिरंजीव मीरास’ या नावाने ते पुस्तक साधना प्रकाशनाकडून 6 सप्टेंबर 2026 रोजी येत आहे. या पुस्तकाला रामदास भटकळ यांनी प्रस्तावना लिहिलेली आहे.
मीराबेननी मूळ पत्रसंग्रहात स्वतःच्या जीवनप्रवासाविषयी आणि त्यावर असलेल्या गांधीजींच्या प्रभावाविषयी, त्यांच्या सहवासाने स्वतःत झालेल्या बदलांविषयी देखील एक विस्तृत टिपण लिहिले आहे. काही ठिकाणी पत्रांतले संदर्भ स्पष्ट व्हावेत यासाठी टीपाही लिहिल्या आहे. जवळच्या सुहृद व्यक्तीला लिहिताना अनौपचारिकपणे सुचेल तसे वेगेवगळ्या विषयांवर ओघवत्या शैलीत गांधीजी लिहीत गेले आहेत. या पार्श्वभूमीवर ही पत्रे वाचली की गांधीजींच्या व्यक्तिमत्त्वाची एक वेगळी बाजू वाचकाला दिसते.
या पुस्तकात समाविष्ट असलेली काही निवडक पत्रे येथे प्रसिद्ध करत आहोत. यापैकी एक पत्रात गांधीजींनी मीरबेननी आपल्या जीवन आदर्शांचा वारसा पुढे चालवावा अशी इच्छा व्यक्त केली आहे, चरखा, सूतकताई, भगवद्गीता, उपनिषदे, मीराबेनची आणि गांधीजींची स्वतःची प्रकृती, हिंदीचे शिक्षण, आश्रमात तसेच वेगवेगळ्या शहरांत मीराबेनना नेमून दिलेली कामे, तुरुंगातली दिनचर्या, पत्रव्यवहार अशा वेगवेगळ्या विषयांवर गांधीजींनी लिहिले आहे.
पुस्तकातील पत्र क्र. 25 : गांधीजींनी 8/05/1927 रोजी नंदी हिल्स, म्हैसूर येथून लिहिलेले पत्र
चिरंजीव मीरास,
मी सर्वसाधारणपणे एक दिवसाआड तुला पत्र लिहीत आहे. तुला ती मिळत असतीलच. तुझे आणखी एक पत्र मला मिळाले. तुझी मनःस्थिती स्थिरावण्यास आणखी काही काळ जावा लागेल असे वाटते. परंतु मनाचा लवचिकपणा कायम ठेव. तुला सोपवलेले काम पूर्ण झाल्यावरच मी जिथे असेन तिथे तू यावेस असे मला वाटते, कारण ते स्वाभाविक आहे. त्यासाठी कितीही वेळ लागू दे. स्वतःहून ठरवलेले उद्दिष्ट पुरे झाल्याशिवाय मागे फिरू नये. परंतु तू खूप हळवी झाल्यामुळे मानसिक ताण पडत असल्यास, तुझा कार्यक्रम पुरा झाला नसला तरी परत यावेस.
तुझा अभ्यासक्रम तू पूर्ण करावास अशी माझी इच्छा आहे आणि तो तू करशीलच. पण अभ्यासक्रमापेक्षाही तुझी प्रकृती माझ्यासाठी महत्त्वाची आहे.
माझ्या प्रकृतीची काळजी करण्यासाठी तू इकडे येऊ नयेस. माझी प्रकृती उत्तम आहे आणि तुझ्या येण्याने माझ्या देखभालीमध्ये काही अधिक सुधारणा होईल असे मला वाटत नाही. मला तुझ्या सेवेची गरज लागली तर मी तुला तार पाठवीन. परंतु अशी परिस्थिती उद्भवणार नाही, कारण मला कुणाकडूनही सेवा करून घेण्याची सवय झाली आहे. नवीन परिचारिकांना मी माझ्या गरजा समजावून सांगतो. माझ्या जरूरीपेक्षा अधिक परिचारिका येथे आहेत. माझी व्यक्तिगत सेवा करण्याच्या उद्देशाने तू आलीस तर कंटाळशील, तुला टाळ कुटत बसावे लागेल.
आजाराच्या सुरुवातीच्या काळामध्ये व्यक्तिगत सेवेची गरज असते. त्यानंतर सगळ्यांनी मिळून केलेल्या कामातून ती गरज भागवली जाते. तू माझी कामे स्वतःचीच आहेत असे समजून करतेस व त्यामुळे व्यक्तिगत संपर्कामध्ये येतेस. ही वृत्ती माझ्या शारीरिक अस्तित्वानंतरही चालू राहिली पाहिजे आणि चालूच राहील अशी माझी खात्री आहे. मी जिवंत असो किंवा नसो, तू माझ्या संपर्कात असशीलच. तू तशी असावीस अशी माझी इच्छा आहे. तू माझ्याकडे माझ्यासाठी नव्हे, तर मी जी तत्त्वे पाळतो त्यासाठी आली आहेस. मी माझ्या आदर्शाचे जीवनात कसे पालन करतो ते तुला आता माहित झाले आहे. आता तू ते आदर्श समजावून घेऊन त्यांचे पालन अधिक कसोशीने करावेस.
जी व्यक्ती तसे करू शकेल त्या व्यक्तीला मी माझा वारस व प्रतिनिधी म्हणून स्वीकारेन. तू अशी व्यक्ती असावीस अशी माझी इच्छा आहे. कारण तू दूरवरून माझे परीक्षण केलेस आणि तुझा निर्णय घेतलास. कामाच्या निमित्ताने ईश्वर काही वेळा आपल्याला एकत्र आणतो. ते चांगलेच असते. परंतु ईश्वर आपल्याला एकमेकांपासून आपल्या समान ध्येयासाठी दूर ठेवतो. तेही आपण स्वीकारले पाहिजे.
अचूक वागण्यासंबंधीचा हा उपदेश ऐकून व समजावून घेतल्यावर तू तुझ्या मनाप्रमाणे निर्णय घे. दूर राहणे असह्य झाले तर तू जरूर इकडे यावेस. त्यामुळे मी नाराज होईन असे समजू नकोस. तू जर स्वतःवर अन्याय केलास व आजारी पडलीस तर मी नाराज होईन.
पुस्तकातील पत्र क्र. 36 : गांधीजींनी 24/10/1927 रोजी लिहिलेले पत्र
चिरंजीव मीरास,
साबरमती आश्रम
मला विश्रांतीची गरज आहे, पण मला विश्रांती कोण देणार ! आपल्याला हव्या असलेल्या सर्व गोष्टी मिळाल्या असत्या तर मग ईश्वरावर श्रद्धा ठेवण्याचा प्रश्नच आला नसता. ईश्वराच्या मर्जीशिवाय पानही हलत नाही हे लक्षात ठेवले पाहिजे. आपण संपूर्ण श्रद्धा ठेवली तर ईश्वर सर्व गोष्टींची काळजी घेईल. श्रद्धावान माणूस अशा प्रकारचे उपाय करणार नाही, जे सामान्य माणसाला उपलब्ध नसतात. त्यामुळे जरूरीपुरतीच काळजी घ्यावी. मी ज्या गोष्टी करतो त्यामध्ये थोडा अतिरेक असतो, त्यामुळे माझ्याकडे थोडे दुर्लक्ष केले तरी चालेल. मला एक दोन दिवसांसाठी दिल्लीला जावे लागेल असे वाटते. त्याबद्दल निश्चित माहिती आज मिळेल.
पुस्तकातील पत्र क्र. 112 : गांधीजींनी 22/04/1932 रोजी येरवडा कारागृहातून लिहिलेले पत्र
चिरंजीव मीरास,
आर्थर रोड, कारागृह, मुंबई
तुझ्याकडून अपेक्षित असलेले पत्र आताच मिळाले.
कमलादेवी तुझ्यासोबत आहेत व त्या सकाळ व संध्याकाळच्या प्रार्थनेत सहभागी होतात हे समजून खूपच आनंद झाला. त्यांनी उत्साहाने मारलेल्या दोरीवरच्या उड्यांबद्दल वाचून मला माझ्या दोरीवरच्या उड्या मारण्याच्या दिवसांची आठवण झाली. मी मुलांनादेखील शिकवल्या होत्या. रामदास फार सफाईदारपणे उड्या मारत असे. तो एक उत्तम व्यायाम आहे. विशेषतः हिवाळ्यामध्ये.
तुझा मीठ वर्ज्य करण्याचा प्रयोग तुला भावत आहे हे चांगले आहे.
आमच्याकडे नवीन डॉक्टर आले आहेत. ते पारशी आहेत. मेजर होते ते. स्वतःचे काम फार आवडीने करतात. पारशी समाजातील सुसंस्कृत व्यक्तींमध्ये असलेली नम्रता त्यांच्यामध्ये ओतप्रोत भरलेली आहे. माझ्या उजव्या अंगठ्याला आणि डाव्या कोपराला ते विद्युत उपकरणाने मसाज करतात. कोपर गेले काही दिवस दुखत आहे. विशेषतः मी विशिष्ट त-हेने काम करत असताना. त्यांच्या मते सूतकताईचे काम थोडे दिवस थांबवावे. राष्ट्रीय सप्ताहाच्या काळात दुप्पट जोमाने काम केले होते. मी आता दिवसाला 85 फेरे करू शकतो. चाक फिरवण्यासाठी डॉ. मेहता यांनी सांगण्याआधीच मी डावा हात वापरू लागलो. मी चांगलीच प्रगती केली आहे. उजवा हात अधिक स्थिरपणे काम करतो व सूत अधिक बारीक निघते. डावा हात वापरण्याची सवय झाल्यामुळे मला असे वाटते की, दोन्ही हातांचा वापर समान प्रमाणात करावा आणि मुलांना लहानपणापासूनच दोन्ही हातांनी काम करण्याचे शिक्षण द्यावे. मी नरनदासला याबद्दल अगोदरच कळवले आहे. दोन दिवसांच्या उपवासामुळे माझे वजन दोन पौंडांनी घटले आहे. जोपर्यंत वजन सातत्याने कमी होत नाही तोपर्यंत काळजी करण्यासारखे काही नाही. वजन सातत्याने कमी झाले तर मी तत्परतेने दूध घ्यावयास सुरुवात करीन. तू त्याची चिंता करण्याचे कारण नाही.
आश्रमाचा इतिहास लिहिण्याचे काम संथगतीने चालू आहे. पत्रव्यवहार पुरा करण्यासाठी गेले दोन दिवस ते काम थांबवले आहे.
आकाशातील ताऱ्यांच्या निरिक्षणाची आता सवय लागली आहे. माझ्याकडे आता त्या विषयांवरची काही पुस्तके आहेत. या अभ्यासामुळे माझे अनंताशी नाते अधिक सुदृढ होत आहे.
मला सूतकताईसाठी कापूस पिंजण्याची जरूर नाही. महादेवने त्याची सुरुवात केली आहे. सूतकताईस लागणाऱ्या पेळूपेक्षा तो नेहमीच अधिक कापूस पिंजून ठेवतो. सध्याच्या साठ्यामध्ये सतत भर पडत असल्यामुळे तो साठा संपण्याची शक्यता नाही.
आपण गरीब लोकांची जीवन जगण्याची पद्धत शिकली पाहिजे. त्या आदर्शापर्यंत पोहोचण्याच्या वाटेत मीच मोठा अडथळा आहे याची मला जाणीव आहे. तू आणि इतर व्यक्तींनी माझ्यानंतर माझ्या सान्निध्यामुळे ज्या गोष्टी करायच्या राहिल्या त्या सर्व गोष्टींची परत यथायोग्य जुळवाजुळव करावी.
आम्हा सर्वांची प्रकृती उत्तम आहे. डॉ. मेहता वल्लभभाईंवर औषधोपचार करत आहेत व लवकरच त्यांना आराम मिळावा.
हे पत्र आजूबाजूला चालू असलेल्या गडबडीच्या वातावरणात लिहीत असताना कमलादेवींना बेळगावच्या तुरुंगात पाठवण्यात येणार असल्याची बातमी वर्तमानपत्रातून समजली.
या बाबतीत कैद्याला काही पर्याय नसतो.
आम्हा सर्वांकडून शुभेच्छा !
पुस्तकातील पत्र क्र. 152 : गांधीजींनी 9/02/1933 रोजी येरवडा कारागृहातून लिहिलेले पत्र
चिरंजीव मीरास,
तुझी तिकडील परिस्थिती सांगणारे पत्र मिळाले. मी सरकारला पत्र लिहून तुझी येरवडा येथे बदली करून तज्ज्ञांकडून तपासणी करावी, असे सुचवले आहे.
कोणत्याही कैद्याला बदली मागण्याचा अधिकार नाही. ज्या परिस्थितीत त्याला ठेवले जाते ते मान्य करावे लागते. अर्थात् काही असामान्य परिस्थिती उद्भवली तर वेगळे.
हॉवर्डने तुरुंगातील जीवनाचे केलेले वर्णन आणि आजची परिस्थिती पाहिली, तर झालेल्या सुधारणांकडे बघून आश्चर्यच वाटते. सदसद्विवेकबुध्दीखातर तुरुंगवास भोगणाऱ्या कैद्यांनी हॉवर्डच्या दिवसांतील परिस्थितीला सामोरे जाण्यास तयार असले पाहिजे. त्यांना शारीरिक सुविधा आणि प्रियजनांना भेटण्याच्या संधीपेक्षा सदसद्विवेकबुध्दी ही अधिक महत्त्वाची असते. त्यामुळे शरीर सुस्थितीत ठेवण्याचा व इतर सुखसोयी मिळवण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करावा, परंतु त्या न मिळाल्यास अलिप्तपणे ते सहन करता यावे. आपल्या सर्व शारीरिक व्यथा व त्यांची पार्श्वभूमी डॉक्टरांना सांगाव्यात.
तू अगोदरच मला कळवले असतेस तर बरे झाले असते. आता सर्व काही सरकारच्या व ईश्वराच्या हातात आहे. "विधात्याच्या इच्छेविरुध्द गवताचे पातेदेखील हलू शकत नाही."
तू गीतेमधील ज्या परिच्छेदाचा उल्लेख केला आहेस तो सौम्य सवयींबद्दल आहे. माझ्या मनामध्ये शेवटच्या अध्यायातील 252 वा श्लोक आहे. त्याचे भाषांतर असे आहे.
"जो एकांत पसंत करतो, अपुरा आहार घेतो, स्वतःचे विचार, वाणी आणि कृती नियंत्रित करू शकतो, जो चिंतन करतो, जो नेहमीच साऱ्यापासून अलिप्त असतो."
तुला मिळणारे अन्न पुरेसे आहे. त्यापेक्षा दुप्पट अन्न दिले तरी आपल्या काही मित्रांना ते अपुरे पडेल. स्वतःच्या शरीराच्या आवश्यकता लक्षात घेऊनच (खावे.) किती अन्न मिळते हा विचार गैरलागू आहे. अपुऱ्या आहारावर स्वेच्छेने जगणे हे फार कठीण असते. तो एक दीर्घ काळ चालणारा उपवास असतो. काही कारणानिमित्त संपूर्ण उपवास करण्यापेक्षा तसे करणे कठीण असते. अपुरा आहार घेऊन शरीर व मनःस्वास्थ मिळवता आले पाहिजे. आपण त्या दिशेने प्रयत्न करू शकतो.
मी सूतकताईस मागच्या मंगळवारपासून सुरुवात केली आहे हे तुला कळवले आहेच. येणाऱ्या लोकांना भेटत असतानाच मी सूतकताई करत असतो. किती सूत कातावे याचे मी काही निश्चित माप ठरवलेले नाही. अजून 160 फेरे करण्यापर्यंत मी पोहोचलो नाही.
तू देवदासबद्दल लिहिलेले योग्यच आहे. त्याचा संसार सुखाचा असेल. लक्ष्मीचे जीवनदेखील बहरत आहे.
आम्ही सर्व सध्या 'हरिजन'च्या तयारीत आहोत. माझ्याकडे उत्तम संपादक व कार्यक्षम अधिकारी आहे. छापखाना 'सव्र्व्हट्स ऑफ इंडिया'च्या मालकीचा आहे. माझे त्यांच्याशी चांगले संबंध आहेत. त्यामुळे मला दैनंदिन कामकाजामध्ये लक्ष घालावे लागणार नाही. ईश्वर दयाळू आहे. परंतु काही वेळा निष्वुरही असतो. आम्हा सर्वांकडून शुभेच्छा !
पुस्तकातील पत्र क्र. 153 : गांधीजींनी 17/02/1933 रोजी येरवडा कारागृहातून लिहिलेले पत्र
चिरंजीव मीरास,
पहाटेचे 3.15 वाजले आहेत. तुझे दर आठवड्याला येणारे पत्र यापुढे गुरुवारी दुपारी मिळेल असे दिसते. ते माझ्या सोयीचे आहे. बुधवारी व गुरुवारी 'हरिजन'च्या कामामुळे मला व्यक्तिगत पत्रव्यवहार करण्यास वेळ मिळत नाही. गुरुवारी संध्याकाळी 6 वाजेपर्यंत 'हरिजन'चे सर्व काम पुरे करावयाचे असते. इतर दिवशीदेखील मी हरिजनचे काम करतो, परंतु बुधवार व गुरुवार संपूर्ण त्यासाठी द्यावा लागतो.
मला आणखी लिहायचे होते, परंतु त्यासाठी अधिक परिश्रम करावे लागले असते. तुझ्या पत्रावरून असे समजले की, तुला रात्री बंद खोलीत राहावयास लागत नाही. या सवलतीचा संपूर्ण फायदा करून घे. शुद्ध व मोकळी हवा यासारखा दुसरा उपाय नाही. दिवसभर मोकळ्या जागेवर लिंबोणीच्या झाडाखाली काम करावे व रात्री उघड्या आकाशाखाली झोपावे. दव पडले तरी चालेल. ग्रह ताऱ्यांची संगत अत्यंत उपयुक्त असते. अंग व डोके पांघरुणाने झाकलेले असेल आणि तोंड उघडे न रहाता नाकाद्वारे श्वासोच्छ्वास चालू असेल तर दवाचा काही त्रास होत नाही. यासाठी रात्री झोपण्याआधी बिछान्यावर पडून पाच मिनिटांच्या अंतराने काही वेळा दीर्घश्वसनाची सवय करावी. त्यामुळे नाकाने श्वासोच्छ्वास करण्याची सवय लागते. आपण नाकाद्वारेच श्वासोच्छ्वास करतो असे वाटते, परंतु प्रत्यक्षात तसे नसते. दुर्दैवाने योग्य तन्हेने श्वासोच्छ्ट्यास करण्याची सवय करावी लागते. जर एखादी व्यक्ती योग्य रितीने मोकळ्या व स्वच्छ हवेत श्वासोच्छ्वास करत असेल, शुद्ध पाणी पीत असेल, समतोल आहार घेत असेल आणि व्यायामही करत असेल तर क्षयाची बाधा होऊच शकणार नाही. तुला आर्थर रोड तुरुंगातून त्वरेने हलवल्याबद्दल मी सरकारचे आभार मानले आहेत. तुझी येरवड्याला बदली करण्याची माझी विनंती सरकारने मानली नाही. त्यांच्या दृष्टीने काही सबळ कारणे असावीत. साबरमती ठीकच आहे. मी जरी शरीराने येरवड्यात असलो तरी माझे चित्त साबरमती आश्रमात असते हे तुला माहितच आहे. चित्ताशिवाय शरीर म्हणजे शहाजहानखेरीज ताजमहाल, केवळ एक थडगे.
तू तुझ्या सर्व शारीरिक तक्रारी वैद्यकीय अधिकाऱ्याला सांगितल्या असशीलच. जरी बदली मागितली तरी शारीरिक व्याधीबाबत जरूर सल्लामसलत करावी. आपण आपल्या सर्व व्याधी त्यांना सांगाव्यात अशीच सरकारची अपेक्षा असते. तिथला अधिकारी योग्य आहे असे समजते. शरीर रोगमुक्त ठेवण्याचा प्रयत्न कर.
बा, गंगाबेन व कुसुम तुझ्याबरोबर आहेत हे समजून आनंद झाला. तुरुंगवासीयांना तुला भेटता येते का? गंगाबेन व कुसुम या दोघींनाही पत्रे लिहिली आहेत असे कळव. त्यांना व बाला खुशालीची पत्रे पाठवत आहे. त्यांना पत्रे मिळण्याची परवानगी असेल तर तू ती पत्रे त्यांना दे.
सर्वांकडून शुभेच्छा !
ता. क. मी या पत्रामध्ये दिलेल्या सर्व सूचना तुरुंगाधिकारी तपासून पाहतील.
पुस्तकातील पत्र क्र. 156 : गांधीजींनी 11/03/1933 रोजी येरवडा कारागृहातून लिहिलेले पत्र
चिरंजीव मीरास,
तुझे साप्ताहिक पत्र वेळेवर येत नसल्यामुळे तुला पत्र लिहिण्याच्या वेळापत्रकात फरक झाला आहे. त्यामुळे मी इतर महत्त्वाचा पत्रव्यवहार पूर्ण केला आहे. मला सकाळची वेळ पत्रव्यवहार करण्यास योग्य वाटते.
तू पुन्हा एकदा पक्षी व प्राण्यांच्या संगतीत वेळ घालवत आहेस असे दिसते. बेडूक असहाय्य प्राणी वाटतात आणि मांजरीच्या तावडीत सापडतात. माकड अत्यंत द्वाड व हुशार प्राणी, पण कृतज्ञता स्वभावात नाही. त्यामुळे माकडांबद्दल मला किंचितही सहानुभूती नाही. या सर्व आपल्या कल्पना तरी आहेत किंवा अज्ञान आहे. आपण आपल्या ज्ञानाप्रमाणेच अज्ञान व कल्पनाशक्तीचाही उपयोग करत असतो. 'अज्ञानात आनंद आहे आणि ज्ञान मिळवणे वेडेपणा आहे' अशी म्हण आहे. सर्वांत जुने व छोटे उपनिषद सांगते की "तो अज्ञानाच्या आधारे मृत्यूवर विजय मिळवतो व ज्ञानाच्या आधारे अजरामर होतो." मूळ शब्द अविद्या व विद्या असे आहेत. त्याचा अर्थ क्रियाशीलता व निष्क्रियता, शरीर व आत्मा, आस व अलिप्तता असाही असू शकतो. त्यांच्यातून अनेक वेगवेगळे अर्थ निघू शकतात. ते अगदी साधे व सोपे, परंतु अगम्य असे उपनिषद आहे. गीतेसारखेच ते सर्व ज्ञानाचे सार आहे. गीता कदाचित उपनिषदावरचे भाष्य असू शकेल.
गीतेच्या एका भाष्यकाराने उपनिषदाला गोमाता, गीतेला दूध व कृष्णाला गुराखी असे म्हटले आहे.
उष्णतेमुळे तुझ्या प्रकृतीला काही अपाय झाला नसावा अशी आशा आहे. कपाळावर मातीचा लेप किंवा ओले फडके ठेवल्यामुळे थंडावा शरीरात पसरतो. खोटेपणामुळे शरीरात उष्णता निर्माण होते व त्याचा दृष्टीवर परिणाम होतो, असे ग्रेगकडून मिळालेल्या पुस्तकात म्हटले आहे. निसर्गनियमाविरुद्ध वागणे म्हणजे असत्यता असे आपण म्हणू शकतो. जाणीवपूर्वक केलेल्या असत्य वर्तनामुळे आपले नैतिक अधःपतन होते. अजाणतेपणामुळे चुकीचे वर्तन झाले असेल तर तसे होत नाही. परंतु शरीरावर परिणाम दोन्ही प्रसंगी होतोच. प्राणायामाचे अभ्यासक असे सांगतात की, श्वासोच्छ्वासावर नियंत्रण ठेवता आले तर वातावरणातील बदलाशी मुकाबला करता येतो. या दाव्यावर आधुनिक विज्ञानाच्या आधारे संशोधन झाले पाहिजे. लोणावळ्याचे स्वामी कुवलयानंद असे संशोधन करत आहेत. शिट्टी वाजवताना करतात तसा ओठांचा आकार करून श्वास घेतल्यास शरीरामध्ये थंडावा जाणवतो. पाठीवर झोपले असता पाठीचे स्नायू प्रसरण पावणार नाहीत याची दक्षता घ्यावी व श्वासाच्छ्वास मंद गतीने करावा. त्यामुळे शरीरास आराम मिळतो. मनाचा आणि शरीराचा थकवा घालवण्यासाठी झोपेइतका रामबाण उपाय नाही. त्यामुळे दीर्घश्वसन करताना पाय एकमेकांवर ठेवून व ताठ बसून करावे. हे सर्व व्यायाम प्रकार रिकाम्या पोटी व धीम्या गतीने करावेत.
आर्नोल्डने केलेले भाषांतर मला इतर भाषांतरापेक्षा अधिक पसंत पडते. मर्यादित किंवा प्रमाणित आहार हा शब्दप्रयोग अधिक योग्य आहे. आपल्या मनामधील विचार हे अधिक महत्त्वाचे. विचारी व्यक्ती नेहमीच आपल्या इच्छेपेक्षा कमी आहार घेते. अनेक व्यक्तींचे आरोग्य बिघडण्याचे कारण जरुरीपेक्षा अधिक अन्नसेवन असते, कमी अन्नसेवन नाही. योग्य आहार निवडला तर अल्प आहारावरदेखील आपली प्रकृती व्यवस्थित राहू शकते.
बा तुझ्याबरोबर राहून हिंदी शिकत आहे आणि तुला भजने म्हणावयास सांगत आहे हे कळल्यामुळे मी खूष आहे.
सध्या फळे व दूध हाच आहार असल्यामुळे वजन प्रमाणात राहते. मी 55 ते 60 फेरे इतकीच सूतकताई करतो.
आम्हा सर्वांकडून शुभेच्छा !
हे पुस्तक येथे विकत घेता येईल.

Tags: मीराबेन महात्मा गांधी येरवडा साबरमती चरखा सूतकताई तुरुंग आहार Load More Tags
Add Comment