उर्दू काव्याचे मोती उधळत जाणारे गोड पुस्तक...

'चौकात उधळले मोती' या पुस्तकाचा परिचय

मागचं संपूर्ण वर्ष सगळ्या जगासाठी भयंकर होतं. करोनानामक विषाणूने दुनिया आणि दुनियादारी ठप्प केली होती. अजूनही त्याचा प्रभाव आणि भय संपलेलं नाही. कधी संपेल हे माहीत नाही...

...तर फक्त बाहेर बघणाऱ्या माणसांना आत बघायला लावणारं आणि फक्त आत बघणाऱ्या माणसांना बाहेर बघायला लावणारं हे लॉकडाऊनचं वर्ष... अर्थात काही माणसं अंतर्मुख झाली काही बहिर्मुख... अनेकांना सक्तीचा एकांतवास  मिळाला. त्यात कुणी कोलमडलं तर कुणी बहरलं...  करोनाच्या एकांतवासात बहरलेल्या एका रसिक माणसानं एक छान पुस्तक आकाराला आणलं. ‘चौकात उधळले मोती’ हे त्या पुस्तकाचं नाव. लेखक आहेत अंबरीश मिश्र.

2020 सरताना हे पुस्तक प्रसिद्ध झालं. प्रसिद्धीसुद्धा मिळाली. या पुस्तकाचा विषय आहे उर्दू भाषा, उर्दू शायरी आणि काही मोजक्या प्रसिद्ध उर्दू कवींचा संक्षिप्त परिचय.

या पुस्तकाच्या जन्माची कहाणीसुद्धा विलक्षण आहे. ती लेखकानं सांगितली आहे.
अगदी अंगावर येणारा एकांत मिळतो तेव्हा लिहिता-वाचता माणूस एकच गोष्ट करतो. ती म्हणजे पुस्तकांचं कपाट उघडून ते नीट लावण्याच्या निमित्तानं आवडती पुस्तकं स्वेच्छेनं अंगावर पाडून घेणं, त्यांत स्वतःला गाडून घेणं आणि शब्दांच्या मखमली आठवणींत रमून जाणं.

प्रस्तुत लेखकाच्या अंगावर उर्दूतल्या ख्यातकीर्त कवींच्या कवितांची पुस्तकं (दीवान) पडली. त्यांच्या शब्दांचे मोती पुन्हा लेखकाच्या मनभर उधळले गेले आणि त्यानं ते आपल्यासाठी पुन्हा वेचले.

त्यातून आकाराला आलं हे 174 पानांचं पुस्तक... एक भावपूर्ण मुक्तच्छंद कविताच. प्रत्येक शब्द उत्कट, मधुर, लालित्यपूर्ण आणि अर्थघन.

पुस्तकाची सुरुवात लेखकाच्या आत्मनिवेदनानं होते. बऱ्यापैकी विस्तृत अशी ही आत्मरत प्रस्तावना उर्दू भाषा, तिचं महत्त्व, तिचा इतिहास, तिचा लोकभाषेपर्यंत झालेला प्रवास यांचा मनोज्ञ वेध घेते. त्यामध्ये स्वतःचे अनुभव, जाणकारांची मतं, लेखक कवींची उद्‌धृतं, संदर्भपुस्तकं अशा अनेक गोष्टी येतात. ते वाचताना आपण एका अतिशय वेगळ्या स्वप्नील, स्वर्गीय भाषादालनात प्रवेश करणार आहोत याची जाणीव वाचकाला होते आणि मग उघडतो एकेक दरवाजा.

त्यानंतरच्या भागात एकेक शेर घेऊन त्यावर लेखक स्वैर चिंतनभाष्य करतो. त्यात आजकालच्या काळाचे संदर्भ येतात, वेदना येतात, उद्याची आव्हानं येतात. फार फापटपसारा नाही. प्रत्येक लेख म्हणजे एकदीड पानात ठासून भरलेली दारू आहे... आतल्या आत स्फोट होत राहतात. या भागात ‘बेड्या विसर तू नाच’, ‘विस्तीर्ण पोकळीचा गंधार सापडावा’, ‘क्षण एक पुरे प्रेमाचा’ यांसारखे अतीव आत्मपर लेख जसे आहेत तसे ‘अनाथ मथळे गल्लोगल्ली’, ‘सम्राटा खाली उतर’ यांसारखे समाजाची सद्यःस्थिती दाखवणारे रोखठोक लेखही आहेत. ‘वेळेत काहीच होत नाही’, ‘सर्वात्मका सर्वेश्वरा’ यांसारखे चिंतनात्मक लेख आहेत. नंतर येतो कवींचा परिचय.

लेखकानं कालानुक्रमे दहा कवी निवडले आहेत. प्रत्येक कवीचा थोडक्यात जीवनपरिचय, त्याच्या कवितेची बलस्थानं यांचं उदाहरण आणि अर्थासहित रसग्रहण असं या लेखांचं स्वरूप आहे. मीर तकी मीर, सौदा, जौक, गालिब, मोमीन, दाग देहलवी, नजीर अकबराबादी, अकबर इलाहाबादी, जिगर मुरादाबादी आणि मिजाज लखनवी हे ते निवडक शायर आहेत.

मिर्झा गालिबच्या वाट्याला जास्त पानं येणं स्वाभाविक आहे. तशी ती आलीही आहेत. गालिबनं त्याच्या आयुष्यात इस्ट इंडिया कंपनीची इंग्रजी राजवट 1857चं बंड, त्यानंतरची सतर्क आणि कठोर झालेली इंग्रजी राजवट असा मोठा स्थित्यंतराचा कालखंड अनुभवला. त्यानं बहुतेक लेखन फारसी भाषेत केलं... पण उर्दू भाषेनं लोकभाषा म्हणून मारलेली बाजी ओळखून तो ऊर्दूमध्ये लिहायला लागला. गालिबच्या व्यक्तिमत्त्वातील वैयक्तिक, सामाजिक, साहित्यिक, राजकीय पैलू लेखकानं आत्मीयतेनं आणि रोचक पद्धतीनं थोडक्यात सांगितले आहेत.

गालिबच्या आधीचे मीर, सौदा, नजीर अकबराबादी समकालीन जौक, मोमीन व नंतरचे दाग देहलवी, जिगर मुरादाबादी, अकबर इलाहाबादी आणि मिजाज लखनवी या कवींचा संक्षिप्त पण नेटका परिचय लेखकानं करून दिला आहे. प्रेमात आणि वेदनेत अंतर्बाह्य बुडालेले हे कवी आणि लेखकानं समरसून सांगितलेलं त्यांचं मोठेपण, वानगीदाखल दिलेले शेर वाचताना मन तल्लीन होऊन जातं. 

गालिबप्रमाणे जास्त पानं मिळाली आहेत मजाज लखनवी या कवीला. त्याच्याबद्दलही लेखक भरभरून बोलला आहे. ‘नन्ही पुजारन’ ही त्याची लयबद्ध कविता, त्याचं मुंबईवरचं काव्यरूपी भाष्य, मुंबईत उपरेपणा जाणवून पुन्हा लखनऊला परत जाणं, त्याचं दारूचं व्यसन, त्याच्या जीवनावर प्यासाची निर्मिती होणं, त्याची डाव्या विचारांशी असलेली बांधिलकी, स्त्रीस्वातंत्र्याचा पुरस्कार, हिजाबला विरोध इत्यादी गोष्टी आपल्याला या लेखातून कळतात. याच लेखात लेखक ‘आवारा’ म्हणजे कोण यावर भाष्य करतो त्यांची वेगवेगळ्या क्षेत्रांतली उदाहरणं देतो तेव्हा त्या बदनाम शब्दांतलं सौंदर्य कळतं आणि आपल्यालाही आवारा होण्याची ओढ लागते...

तर असं हे फार गोड आणि ओढ लावणारं पुस्तक आहे. ज्यांना उर्दू भाषा, शायरी, कवी आवडतात त्यांना तर हे पुस्तक आवडेलच... शिवाय ज्यांना या विषयाचा गंध नाही त्यांनाही या विषयाची गोडी लागेल यात शंका नाही. हे पुस्तक ओझरतं, भरभर वाचायचं पुस्तक नाही हे मात्र लक्षात ठेवलं पाहिजे. पूर्ण शांत एकांत असेल तेव्हाच या पुस्तकाला हात घालावा. 

वाचलेला प्रत्येक शब्द आपण कधी-ना-कधी विसरतो हे जरी खरं असलं तरी काही शब्द मेंदूवर आपले ठसे उमटवून जातात आणि त्यांची स्पंदनं जीवनभर आपली सोबत करतात. आपल्याला समृद्ध आठवणी देऊन जातात.

...आणि खरं जगणं म्हणजे तरी काय?

सुंदर आठवणींच्या लाटांवर झुलणं तर असतं... बाकीच्या जगण्याच्या भागाला कुणी जगणं म्हणत असतील तर म्हणोत बापडे... त्यासाठी अशी पुस्तकं वाचावी लागतात... अनुभवावी लागतात....

- राजश्री बिराजदार, दौंड, जि. पुणे. 
rajshrib17@gmail.com


कर्तव्यवर रोज प्रसिद्ध होणारे लेखन मोफत मिळवण्यासाठी कर्तव्य साधनाचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा. त्यासाठी इथे क्लिक करा. किंवा टेलिग्रामवर Kartavyasadhana सर्च करा. ही सुविधा पूर्णपणे मोफत असून त्यासाठी मोबाईलवर टेलिग्राम अ‍ॅप (Telegram App) असणे गरजेचे आहे.

Tags: उर्दू राजश्री बिराजदार अंबरीश मिश्र शायरी गालिब मीर कविता पुस्तक परिचय Urdu Rajshri Birajdar Ambrish Mishra Shayari Ghalib Meer Poem Book Introduction Load More Tags

Add Comment