‘बलसागर भारत होवो’ साकारताना...

साने गुरुजींचे आयुष्य आणि विचार यावर आधारित, दृक्श्राव्य नाट्यानुभव देणाऱ्या प्रयोगाचा शुभारंभ येत्या रविवारी (28 एप्रिल) सकाळी 10 वाजता मेन थियेटर, एफटीआयआय येथे होतो आहे. त्यानिमित्ताने दिग्दर्शकाचे मनोगत.. 

गायक नंदेश उमप व दिग्दर्शक शेखर नाईक त्यांच्या टिमसमवेत...

या प्रयोगाला संगीत देण्यासाठी मी चैतन्य आडकरशी बोललो. त्यानेही लगेच तयारी दाखवली. ‘बलसागर भारत होवो’ आणि ‘खरा तो एकची धर्म’ ही दोन्ही गाणी रवींद्र साठे यांनी आमच्या या प्रयोगाकरता गायली. ‘आता उठवू सारे रान’ हे नंदेश उमपने गायची तयारी दाखवली. दोन्ही गाणी नव्याने सर्वांसमोर येत आहेत. नुकतंच हे रेकॉर्डिंग मुंबईत पार पडलं. 

साने गुरुजी हे नाव समोर आलं की, ‘श्यामची आई’चे लेखक एवढीच त्यांची ओळख आजपर्यंत आपल्याला जास्त प्रमाणात माहीत आहे. या पलीकडील साने गुरूजी शोधण्याची संधी मला मिळाली ती डॉ. माधवी वैद्य यांच्यामुळे. साने गुरुजी यांच्यावर अभिवाचन प्रयोग करणार का? असं त्यांनी धीरेश जोशी या माझ्या मित्रामार्फत मला विचारलं आणि मी त्याला लगेच होकार दिला. माझी आणि माधवीताईंची ओळख झाली ती त्या जेव्हा ‘व्हिन्सेंट व्हॅन गॉग अभिवाचन’ या आमच्या प्रयोगाला आल्या होत्या, त्यावेळी. त्यांना तो प्रयोग खूप आवडला, त्यांनी भरभरून कौतुकही केलं. (काहीही राखून न ठेवता..) त्यांनी ‘आपकी अमरी’, ‘खजिना’ हेही प्रयोग पाहिले. 

माधवीताईंनी गुरुजींच्या पुस्तकातील काही उतारे घेऊन संहिता तयार केली. ती संहिता माझ्याकडे आल्यानंतर त्यातील नाट्य शोधायला मी सुरुवात केली. त्या प्रसंगाचा काळ आणि सामाजिक परिस्थिती याचा पाठपुरावा करताना, आजच्या काळात असलेली सामाजिक विषमता 1947 मध्येही मोठ्या प्रमाणात होती हे जाणवलं. कधी संपणार हे.. आपण सर्वजण या सगळ्याच्या पलीकडे जाऊन या सगळ्याकडे भूतकाळ म्हणून कधी पाहणार.. असं वाटून गेलं. संहिता वाचताना खूप अस्वस्थ व्हायला झालं. साने गुरूजी यांचा जीवन प्रवास या प्रयोगातून थोडक्यात समोर येईल

साने गुरूजी यांनी लिहिलेली गाणी नव्याने पुन्हा रेकॉर्ड करायचं मी ठरवलं. एखादा प्रयोग उत्तम होण्यासाठी लागणारं आर्थिक पाठबळ खूप महत्त्वाचं असतं. हे सर्व करण्यासाठी वाशी, नवी मुंबई येथील ‘प्रयास फाउंडेशन’चे अध्यक्ष श्री. राजेंद्र सुराणा यांनी पुढाकार घेतला. त्यांच्या पुढाकारामुळे संशोधन आणि निर्मितीसाठी मोठा हातभार लागला. साने गुरूजी यांच्यावर काही करत आहोत, यामुळेच ते लगेच तयार झाले.

संशोधन सुरू झालं, संशोधनासाठी पहिली भेट वडघरच्या ‘साने गुरूजी ट्रस्ट’ला दिली. तेथील कार्यकर्ते आणि अध्यक्ष यांनी जुने फोटो आणि स्कॅन केलेल्या कागदपत्रांची पूर्तता केली. त्यामुळे काम थोडं सोपं झालं असं म्हणायला हरकत नाही. गुरुजींची पुस्तकं ‘साधना प्रकाशन’मधून मिळाली होतीच. ‘साधना’चे संपादक विनोद शिरसाठ यांची याबाबत खूप मदत झाली. गुरुजींची पुतणी सुधाताई यांना बडोद्याला जाऊन भेटण्याचा एक विचार मनात आला. धीरेशने सुधाताईंचा मुलगा, सुधांशू यांच्याशी बोलून आमची भेट ठरवली. माधवीताई आणि मी बडोद्याला त्यांना भेटायला गेलो, ती भेट म्हणजे अनपेक्षित अशी भेट होती. इतकं वय झालेलं असतानाही आणि खरंतर त्यांची तब्येत ठीक नसतानाही त्यांनी वेळ देऊन आमच्याशी गप्पा मारल्या. आम्हाला साने गुरुजींविषयी त्यांच्या काही आठवणी सांगितल्या. काही अधिक माहिती त्यांनी दिली. खरंतर साने गुरुजींविषयी माझा खूप अभ्यास नव्हताच. पण नेहमीप्रमाणे एकदा विषय हातात घेतला की तो तळागाळात जाऊन त्याबद्दल माहिती गोळा करायची हा मला एक छंदच आहे. बडोद्याला जाऊन आलो. सुधाताईच्या बरोबर आता खूप जुनी ओळख असल्यासारखा, कधी न संपणारा धागा निर्माण झालेला आहे. त्यांच्याशी गप्पा मारताना आपण साधारण दहा मिनिटांपूर्वी त्यांना पहिल्यांदाच भेटलो आहोत असं अजिबात वाटलं नाही किंवा त्यांनी तसं जाणवूही दिलं नाही. खूप छान गप्पा झाल्या. आम्ही त्यांना आधी स्क्रिप्ट पाठवलं होतं. त्यावर त्यांनी काही नोट्स काढून ठेवल्या होत्या. त्याविषयी त्यांना ज्या ज्या गोष्टी वाटत होत्या, त्या त्या त्यांनी सांगितल्या. भेट झाल्यावर त्यांनी मला सांगितलं की, ते स्क्रिप्ट त्यांनी तीन वेळा वाचलं होतं. त्यांनी काही गोष्टी आम्हाला सांगितल्या, त्याप्रमाणे आम्ही त्या स्क्रिप्टमध्ये घेतल्याही आहेत. गप्पा झाल्यानंतर आम्हाला त्यांनी या कार्यक्रमासाठी शुभेच्छा दिल्या.  

आपल्याच घरातल्या खूप जवळच्या वाटाव्यात अशा आणि वयस्कर म्हणता येणार नाही अशा सुधाताई... त्यांचं वय 90 आहे, यावर विश्वासच बसला नाही. ही ओळख झाली ती, केवळ साने गुरुजींमुळे आणि अर्थातच डॉ. माधवी वैद्य यांच्यामुळे. 

स्वातंत्र्यपूर्व काळातली गुरुजींची मतं आजही आपल्यासाठी महत्त्वाची आहेत हे जाणवलं. कालांतराने आपण हे सर्व विसरून गेलो आहोत. मधल्या काळात वेगवेगळ्या विषयांवर काम झालं पण साने गुरुजी यांच्याविषयी माझं काही वाचन झालं नाही; का झालं नाही हे सांगता येणार नाही. पण एखाद्या कामाची वेळ यावी लागते, असं मला नेहमीच वाटतं. तर ती वेळ आता आली. साने गुरुजींनी जे लिहिलं आहे, त्यावर अभिवाचन करण्याचा योग आला. ‘श्यामची आई’ पलीकडील साने गुरुजी, त्यांचे विचार तुम्हाला ऐकायला मिळतील आणि इतिहासाची उजळणी होईल. साने गुरुजींइतका साधा सरळ माणूस आज सापडणं खरं तर खूपच अवघड आहे. पुन्हा एकदा साने गुरुजींचे विचार सर्वांसमोर यावेत या दृष्टीने आमचा हा एक प्रयत्न आहे.

 

साने गुरुजींच्या संवेदनशील मनाला जातीपातींमुळे होत असलेला त्रास त्यांच्या लिखाणात अनेक ठिकाणी दिसतो, जो मला व्यक्तीशः जास्त जवळचा वाटतो. आजही अनेक ठिकाणी आपण नकळत जात पाळतो. गुरुजींच्या काळात तर या गोष्टी मोठ्या प्रमाणात होत्या. नरसोबाच्या वाडीला गुरूजी गेले होते, तेव्हा त्यांनी अनुभवलेला गुरुद्वादशीचा एक प्रसंग लिहिला आहे. ते सर्व वाचलं आणि संताप झाला. खरंच आपण माणसं आहोत का? आपल्याकडील या अशा प्रथा किती लाज आणणाऱ्या होत्या!

मी मागे ‘गुरू गीता’ असा गुरुदत्त आणि गीता दत्तवर कार्यक्रम करायचो. का कोणास ठाऊक, हे सर्व करताना मला साने गुरूजी आणि गुरूदत्तच्या ‘प्यासा’ या चित्रपटातील नायकाची संवेदनशीलता एकच वाटली. साहिरच्या गाण्यांमधील वास्तव जे प्यासाच्या नायकाला अस्वस्थ करत असतं, तीच अस्वस्थता मला साने गुरूजी यांच्या मनाची वाटते. व्हिन्सेंट व्हॅन गॉग या चित्रकाराला जाणवलेली खाण कामगारांतली सामाजिक विषमता, दुःख आणि प्यासा मधील नायकाला अस्वस्थ करून गेलेलं साहिरच्या शब्दांतील ‘ये महलों ये तख़्तों ये ताजों की दुनिया, ये इंसाँ के दुश्मन समाजों की दुनिया..’ हे आठवलं. याच सामाजिक विषमतेमुळे साने गुरुजी अस्वस्थ होते. 1947 मध्ये ज्या तऱ्हेने धार्मिक द्वेष पसरवला जात होता. तसाच आजही, 2024 मध्ये पसरवला जातो आहे. आपण या सर्व गोष्टी उघड्या डोळ्यांनी फक्त पाहत आहोत. असो!

या प्रयोगाला संगीत देण्यासाठी मी चैतन्य आडकरशी बोललो. त्यानेही लगेच तयारी दाखवली. ‘बलसागर भारत होवो’ आणि ‘खरा तो एकची धर्म’ ही दोन्ही गाणी रवींद्र साठे यांनी आमच्या या प्रयोगाकरता गायली. ‘आता उठवू सारे रान’ हे नंदेश उमपने गायची तयारी दाखवली. दोन्ही गाणी नव्याने सर्वांसमोर येत आहेत. नुकतंच हे रेकॉर्डिंग मुंबईत पार पडलं. 

अभिवाचन करण्यासाठी धीरेश जोशी हे नाव सर्वप्रथम नक्की झालं होतं. ‘व्हिन्सेंट व्हॅन गॉग’साठी आम्ही एकत्र काम केलं होतंच, सानिका आपटे हिने माझ्या ‘आपकी अमरी’ या अमृता शेरगिलवरील हिंदी नाटकात काम केलं आहे, तिनेही यात अभिवाचक म्हणून भूमिका करायचं ठरवलं. यात एका गाण्यासाठी ती पार्श्वगायिकाही आहे. तिसरं नाव माझ्या समोर आलं, ते ओमकार गोवर्धन या कलाकाराचं. आम्ही पहिल्यांदाच एकत्र काम करत आहोत. सर्व कलाकारांनी तालमीसाठी वेळ दिला आणि आता हा प्रयोग आकार घेऊ लागला आहे. नेहमीच प्रयोगातून वेगळा अनुभव प्रेक्षकांना देण्याचा मी प्रयत्न करीत असतो. असाच प्रयत्न या प्रयोगाला प्रेक्षकांना दिसेल. स्वच्छंदने प्रकाश योजनेची जबाबदारी सांभाळली आहे. आम्ही सर्वजण मिळून साने गुरुजी यांचे प्रखर विचार रसिक प्रेक्षकांसमोर ठेवण्यासाठी उत्सुक आहोत. साधना प्रकाशनाने माध्यम प्रायोजक ही जबाबदारी सांभाळली. त्यामुळे हा प्रयोग महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेर पोहोचण्यास मदतच झाली आहे.

हा दृकश्राव्य अभिवाचनाचा शुभारंभाचा प्रयोग येत्या रविवारी दिनांक 28 एप्रिल रोजी सकाळी दहा वाजता लॉ कॉलेज रोड जवळच्या ‘फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिटयूट ऑफ इंडिया’ या संस्थेतील ‘मेन थिएटर’मध्ये होणार आहे. मित्रपरिवारासहित नक्की या.

- शेखर नाईक, पुणे
shekhard.nayeek@gmail.com 


या प्रयोगाला सुधा साने-बोडा यांनी दिलेल्या शुभेच्छा : 

 

Tags: नाटक साने गुरुजी श्यामची आई शेखर नाईक माधवी वैद्य साधना डिजिटल अभिवाचन ओंकार गोवर्धन धीरेश जोशी फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिटयूट ऑफ इंडिया नंदेश उमप Load More Tags

Add Comment